इ.स. 1952 पर्यंत मराठवाड्यात शिक्षणाचा प्रसार सार्वनिक स्वरूपात झाला नव्हता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठवाडा म्हणजे मध्ययुगीन इतिहासाच्या जिवंतपणाचे दर्शन घडवू शकेल असा एक भौगोलिक तुकडा होता. नव्या युगाची प्रभात आणि स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी मराठवाड्याला एकाच वेळी लाभल्या. अशा संगमावर मराठवाड्यातल्या पहिल्यावहिल्या शिक्षित पिढीला शाळांमधून भेटलेले पहिले लेखक साने गुरुजी हेच होते. आमच्या आधीच्या पिढीला क्रमिक पुस्तकाबाहेर वाचावे ह्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. योग्य वयात योग्य वाङ्मय वाचण्यास उपलब्ध होणे हा आमच्यासाठी एक योग होता. समीक्षा म्हणजे काय याचा गंधही आम्हांला नव्हता.
साने गुरुजींचे आडनाव 'साने', 'गुरुजी' ही त्यांची उपाधी. ती उपाधी सन्मानन म्हणून त्यांच्या आडनावात कायम केली. पण हा फरक मला खूप उशिरा कळला, साने गुरुजी हे त्यांचे आडनाव आहे असे गृहीत धरून मराठवाड्यातल्या आमच्या पिढीने त्यांचे सगळे वाङ्मय वाचले.
एखाद्या लेखक कवीचा उपाधी देऊन गौरव करावा आणि त्या लेखकाने आयुष्यभराच्या जगण्याने ती उपाधी अर्थपूर्ण ठरवावी असे क्वचित घडते. साने गुरुजींच्या बाबतीत असे घडले आहे. साने गुरुजी शाळेत आणि शाळेबाहेर, तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर भाषणात आणि लेखनात सर्वत्र आणि सदाकाळ 'गुरुजी' म्हणूनच वावरत होते. केवळ आकर्षक अध्यापन करणाऱ्याला आपला समाज 'गुरुजी' ही पदवी सहजासहजी बहाल करीत नाही. प्रभावी अध्यापनक्षमता, अनुकरणीय संस्कारशीलता, इतरांच्या दोषांसाठी आत्मपीडन करून मार्गदर्शन करण्याची वृत्ती आणि प्रेममय मार्गाने माणूस तेवढा मेळवावा असा ध्यास, ह्या सर्व गुणांचा समुच्चय ज्यांच्या ठिकाणी जाणवतो त्याला आपला समाज ‘गुरुजी’ ही पदवी आदराने प्रदान करतो. साने गुरुजींचे चरित्र वाचले म्हणजे समाज त्यांना आदराने ‘साने गुरुजी' का म्हणत असावा हे कोडे उलगडते.
वाङ्मय हा मनाचा आहार
माझ्या पिढीने साने गुरुजी पाहिले नाहीत. पण त्यांच्या सगळ्या लेखनातून आमच्या मनात निर्माण झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या लौकिकातील चरित्राशी अगदी संवादी आहे. ललित वाङ्मयात लेखकाचे चरित्र कोणत्या पद्धतीने व्यक्त व्हावे याविषयी काहीही ठामपणे सांगता येत नसते, पण जीवनाशी साहित्याची काहीएक बांधिलकी असते, असे ठामपणे मानणाऱ्या लेखकांचे लौकिक चरित्र त्याच्या ललितलेखनाशी बऱ्याच वेळा संवादी असू शकते असे सांगता येते. वाङ्मय म्हणजे मनाचा आहार. खाण्यापिण्याच्या आहाराचे आपण नियंत्रण करतो. सात्त्विक आहार घेण्याचा प्रचार करतो. आपणांस शारीरिक स्वास्थ्य हवे असते. त्याप्रमाणे मानसिक सामर्थ्य वाढविण्यासही आपण मानसिक आहाराची म्हणजेच वाङ्मयाची काळजी घेतली पाहिजे. समाजाचे मानसिक बल वाढविणारे वाङ्मय जीवनोपयोगी असते. जगाला आनंद देणारे, जगाची पुरोगामी पुनर्घटना करण्याची दिशा दाखविणारे लिखाण म्हणजे वाङ्मय. वैयक्तिक हित व सामाजिक हित याचा संबंध कलावंताने जोडला पाहिजे, अशी साने गुरुजींची वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी होती. म्हणूनच ते म्हणतात, ‘‘वाङ्मयाला मी वाहून घेतले याचा अर्थ मला कळत नाही. जीवनाला मी वाहून घेतले याचा अर्थ मला समजतो. जीवनाला वाहून घ्या. त्यातून वाङ्मय निर्माण होईल.’’ साहित्य आणि जीवनाचा साने गुरुजींच्या मनात अस हा परस्परसंबंध लक्षात घेतला म्हणजे त्यांच्या लेखनात त्यांचे व्यक्तित्व संवादी स्वरूपात का प्रकट झाले असावे हे लक्षात येते.
इ.स. 1952 पर्यंत मराठवाड्यात शिक्षणाचा प्रसार सार्वनिक स्वरूपात झाला नव्हता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठवाडा म्हणजे मध्ययुगीन इतिहासाच्या जिवंतपणाचे दर्शन घडवू शकेल असा एक भौगोलिक तुकडा होता. नव्या युगाची प्रभात आणि स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी मराठवाड्याला एकाच वेळी लाभल्या. अशा संगमावर मराठवाड्यातल्या पहिल्यावहिल्या शिक्षित पिढीला शाळांमधून भेटलेले पहिले लेखक साने गुरुजी हेच होते. आमच्या आधीच्या पिढीला क्रमिक पुस्तकाबाहेर वाचावे ह्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. योग्य वयात योग्य वाङ्मय वाचण्यास उपलब्ध होणे हा आमच्यासाठी एक योग होता. समीक्षा म्हणजे काय याचा गंधही आम्हांला नव्हता. अवतीभोवती कुणी समीक्षक नव्हता किंवा समीक्षा वाचून साने गुरुजी समजावून सांगणारा कुणी अवतीभोवती नव्हता. अशा वयात आमच्या पिढीने साने गुरुजी वाचला. त्यांचे ललित लेखन तर सोडाच, पण वैचारिक वाङ्मयसुद्धा भावनात्मक परिणाम करणार होते. त्यामुळे मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या पहिल्या शिक्षित पिढीच्या मनावर साने गुरुजींच्या वाङ्मयाचा एक अमीट ठसा निर्माण झालेला आहे. कुठल्याही प्रतिकूल समीक्षेने हा ठसा सहजासहजी पुसला जाणारा नाही. साने गुरुजींच्या साहित्याचा परिणाम आमच्या पिढीच्या जीवनविषयक दृष्टीत झाला असेल तर तो अनुकूलच झालेला आहे. म्हणून त्यांना अभिवादन करून मगच मी माझ्या विषयाकडे वळतो.
अस्पृश्यता - तात्त्विक आधार विषमता
साने गुरुजींच्या ‘बेबी सरोजा', 'करुणादेवी', 'मिरी' ह्या कादंबऱ्यांत त्या काळातील अस्पृश्यांची व्यक्तिचित्रे येतात. ‘बेबी सरोजा’ या कादंबरीत ‘हरिजनोद्धार म्हणजे देशसेवा’ हे समीकरणच जणू त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवले आहे. 'अस्पृश्योद्धार' या नावाची त्यांनी एक नाटिका लिहिली आहे. तर स्पृश्य बांधव ज्या देवाचे दर्शन घेतात त्याच देवावर श्रद्धा कायम ठेवून हरिजन बांधव हिंदू धर्मात टिकून राहिले, याबद्दल त्यांचे ऋणी होऊन त्यांना उच्च स्थान दिले पाहिजे हा बोध मनावर ठसावा यासाठी साने गुरुजींनी ‘ते आपले घर' या नावाची आणखी एक नाटिका लिहिली आहे.
अस्पृश्यतापालन हे एका वरिष्ठ जातीने अन्य कनिष्ठ जातींशी कसे वागावे ह्याविषयीचा धर्मसंमत आणि समाजमान्य नियम. पण ह्या नियमाचा तात्त्विक आधार विषमता असा घेतला तर साने गुरुजींच्या सगळ्यांच वाङ्मयात विषमतेचा निषेध आणि समतेचा पुरस्कार दिसेल. विषमतायुक्त आचरण म्हणजे अन्याय. ह्या अन्यायाचा निषेधाचा त्यांच्या वाङ्मयात सर्वत्र आढळतो. भारतीय तेवढा एक. पण ही विषमता एकत्वाच्या आड येते. म्हणून ही विषमता मोडून काढणारी रूपके साने गुरुजींच्या वाङ्मयात सर्वत्र आढळतात. हिंदू-मुस्लीम, ब्राह्मण-ब्राह्मणेतर ह्यांच्यातील संघर्ष रूपकात्मक पद्धतीने 'आस्तिक' या कादंबरीत आला आहे हे जसे दाखवून देता येईल; तसेच आर्य-नागांचा हा संघर्ष त्या काळातील सवर्ण दलितांच्या संघर्षाचं रूपकात्मक चित्रण आहे असंही दाखवून देता येईल, अस्पृश्य स्त्रिया, मजूर, कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाज या क्रमाने दलित हा शब्द व्यापक करीत नेला तर साने गुरुजींच्या सर्वच वाड्मयामध्ये दलितोद्धार हेच रूप मध्यवर्ती सूत्र होते हे लक्षात येऊ शकते.
दलितोद्धाराचे चित्रण करताना त्यांची प्रतिभा कल्पनाविलासाने फुलून येते. आणि हा ‘दलितोद्धार म्हणजेच देशभक्ती’ ह्या समीकरणाचा थेट परिणाम होईल अशी वैचारिकता तिथे आढळून येते. ‘उपाशी माणसाला खायला मिळणे म्हणजे स्वराज्य’ अशा शब्दात ‘आपण सारे भाऊ' या कादंबरीला गृहस्थ रघुनाथला बजावून सांगतो. ह्याच कादंबरीत विमल आणि कृष्णनाथ दोघांनी मिळून ‘स्वराज्यवाडी’चा प्रयोग सुरू केला आहे. या स्वराज्यवाडीत हिंदू-मुस्लीम, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव न बाळगता सहजीवन जगणाऱ्या व्यापक कुटंबाची कल्पना साने गुरुजींनी रंगवली आहे. आर्य व नाग यांच्यात प्रेम निर्माण व्हावे म्हणून मरण पत्करण्याचे डोहाळे लागलेली वत्सला साने गुरुजींनी 'आस्तिक’ या कादंबरीत चित्रित केली आहे. या कादंबरीतल्या ‘सुश्रुते’च्या जीवनाची वेल जातिभेदाच्या वणव्यापायीच सुकून-वाळून गेली आहे. नाग जातीला दूर न लोटणाऱ्या किंबहुना त्यांच्या कल्याणाकरिताच झटणाऱ्या पतीची पत्नी म्हणून जगण्यात तिला धन्यता वाटते. सारे जग जातिभेदाने जळत असतानाही व स्वत: त्या जातिभेदाने पोळून निघालेली असूनही तिच्या मनातला जातिभेद विरोध तसूभरही कमी झालेला नाही, स्वतःच्या नातीलासुद्धा ती नागपुत्राशी विवाह करण्यास संमती देते.
अस्पृश्यता निवारण्याचे कार्य करताना, जातिभेदाच्या विरोधा देताना साने गुरुजींची पात्रे कधीच निराश होत नाहीत. ती क्रमाने उदात्त होत जातात. कारण हे कार्य हीच देशसेवा आहे याविषयी ती ठाम असतात. ‘ते आपले घर’ ही नाटिका साने गुरुजींनी इ.स.1930 मध्ये त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना लिहिली. समाजसुधारणा हेच राष्ट्रीय कार्य आहे असे मानणारा राजा आणि सनातनी कडवे दिनकरराव यांच्यातील संघर्ष या नाटिकेत येतो. राजा इ.स. 1930 साली तुरुंगात गेल्यानंतर राजाचे वडील गणपतराव आपल्या शेतावर आयुष्यभर मजुरी करीत आलेल्या राम महाराला शेत देऊन टाकून सलोख्याने वागतात, हे सनातनी दिनकररावांना सहन होत नाही. म्हणून ते गणपतरावांचा छळ करतात. निसर्गाचा कोप होतो. दिनकररावांना असाध्य रोग होतो. त्यांना पश्चात्ताप होतो. ते राजाने चालविलेल्या ‘सेवाधाम’ या संस्थेत सहभागी होतात. राजा ग्रामस्थांना निरनिराळे दाखले देऊन त्यांचे मतपरिवर्तन घडवून आणतो. देवावर अभिषेक करणारे लोकांना कसे रडवितात याची तो उदाहरणे सांगतो. ब्राह्मणभोजने घालणारे हरिजनांना कसे लाथा मारतात हे तो दाखवून देतो. ‘महारासी शिवे, कोपे तो ब्रह्मण नव्हे,’ असे तुकारामाचे वचन सांगून आपल्याकडच्या संतांनीसुद्धा विषमतेचा कसा निषेध केला आहे हे समजावून सांगतो.
‘जगी कोण अस्पृश्यांची कीव हो करील?
कोण त्यांस प्रेमे हृदयी घट्ट हो धरील?’
अशा एका करुणरम्य पदाची योजनाही या नाटकात केली आहे. विषय हाताळताना साने गुरुजींच्या भाषेलासुद्धा कल्पनाविलासाची भरती कशी येते त्याचेही एक उदाहरण इथे सांगतो. नाटकातला डॉक्टर म्हणतो,
"शेटजी तुम्ही सांगा, पोटाची स्वच्छता असणारा अधिक स्वच्छ का वरच्या कोटाची स्वच्छता करणारा? तुमच्या पांढरपेश्यांच्या भोजनंक्तीत उदबत्त्या लावतात. कारण साऱ्यांचे कोठे घाणीने भरलेले. तुम्ही लंघन करा व या हरिजनाला घरात नेऊन पोटभर जेवायला वाढा.’’ साने गुरुजींच्या लेखनातला उदाहरणादाखल दिलेता हा तपशील पुरेसा आहे असे मला वाटते.
इ.स. 1930 मध्ये केवळ प्रबोधनपर व्याख्यानाने ललित वाङ्मयात जे साने गुरुजींनी शक्य करून दाखविले, त्याच्या अगदी विरुद्ध असा अनुभव यांना इ.स.1947 मध्ये पंढरपूर मंदिरप्रवेश सत्याग्रहात घ्यावा लागला. इ.स.1947च्या जानेवारी महिन्यापासून मंदिरप्रवेशासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून साने गुरुजी प्रयत्न करू लगारे. ‘प्यारे, प्यारे हरिजन घरात घ्या रे' असे पद लिहून महाराष्ट्र शाहीर पथकामार्फत आपला विचार पोचावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अस्पृश्यता कायद्याने दूर होणारी गोष्ट नव्हे. अस्पृश्यतेचे पालन करणाऱ्यांचे मन बदलले पाहिजे ह्यावर त्यांचा अढळ विश्वास होता. ही भूमिका गांधीवादी भूमिका होती. पंढरपूर सत्याग्रह सुरू झाला. साने गुरुनी उपोषणाला बसले. ‘जावो साने गुरुजी भीमा पार। नहीं खुलेगा विठ्ठलद्वार।।’अशा घोषणा सनातन्यांनी दिल्या. गुरुजींच्या पाठीशी त्यांचे चारित्र्य ताठ म्हणून उभे राहिले. सभापती मावळंकर, आचार्य अत्रे अशी थोर मंडळी साने गुरुजींच्या बाजूने उभी राहिली. उपोषण मागे घ्या अशी गांधीजींनी तार केली. तरीही साने गुरुजी मागे हटायला तयार नव्हते, 'आत्मक्लेशाने आपण ब्रिटिशांचे मन वळवू शकतो, मग बडवे मंडळींचे का नाही? या ठाम आशावादावर साने गुरुजींचे प्राणांतिक उपोषण सुरूच राहिले. आर्य आणि नाग यांच्यात प्रेम निर्माण व्हावे म्हणून मरण पत्करण्याचे डोहाळे लागलेली 'आस्तिक' या कादंबरीतील वत्सला आणि साने गुरुजी यांच्यातले संवादी साम्य आपणांला या ठिकाणी जाणवते. अखेर 10 मे 1947 या दिवशी पंढरपूरचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. 14 से 18 या वयोगटाच्या भाबड्या मुलांवर आपल्या लेखनाने साम्राज्य गाजवणाऱ्या साने गुरुजींच्या वास्तव जीवनातल्या ह्या दाहकतेने पुरेसे विव्हल केले असले पाहिजे. म्हणूनच ते आत्मसमर्पणापूर्वी आपल्या प्रिय मित्राला शेवटचा निरोप लिहून ठेवतात, ‘‘माझी अखेरची इच्छा सांग की लोकशाही नि सत्याग्रही समाजवादी ध्येयाने महाराष्ट्राने जावे.’’
साने गुरुजींचा पहिला तुरुंगवास 10 मे 1930 ह्या तारखेस सुरू झाला. गांधीवादाच्या प्रभावाने ते स्वातंत्र्यचळवळीत उतरले. ह्या वर्षी अस्पृश्यता निवारणास वाहिलेली ‘ते माझे घर’ ही नाटका त्यांनी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात बसून लिहिली. 10 मे 1947 या तारखेस गांधीवादाच्या निष्ठेपायी साक्षात गांधीजींच्या आदेशालाही न जुमानता पंढरपूर मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केला. हा क्रम लक्षात घेतला म्हणजे ‘अस्पृश्यता निवारण म्हणजेच देशभक्ती’ हे गांधीवादी सूत्र पचवून विकसित झालेले म्हणजे साने गुरुजी होत, हे आपल्या लक्षात येऊ शकेल.
ब्रिटिशांना सत्तेतून हाकलून देणे व देशात आपली सत्ता निर्माण करणे हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा पहिला टप्पा. लोकमान्य टिळकांनी आम्हाला या टप्प्यावर आणून पोचवले. ‘स्वातंत्र्य म्हणजे समाजसत्ता’ अशी मानसिकता निर्माण करून आपल्या देशातील सर्व स्तरांना सत्ताकांक्षी करणे, हा आमच्या स्वातंत्र्य चळवळीचा दुसरा टप्पा. ह्या टप्प्यापर्यंत आणून पोचवण्याचे काम गांधीजींनी केले. या वाटचालीत आडव्या आलेल्या खाचखळग्यांचे दर्शन आंबेडकरांनी घडविले. अनेक प्रश्नांचा पालापाचोळा दूर सारण्याचे काम बहुजनांच्या चळवळीने केले. म्हणूनच अस्पृश्यांच्या वेदनेचे चित्र मराठी वाङ्मयात स्पष्टपणे उमटते ते गांधी व आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे. अस्पृश्यांनी भोगलेले दुःख मराठी वाङ्मयात आंबेडकरांच्या प्रेरणेतून साकार होते. अस्पृश्यांच्या व्यथेचे सवर्णांना जाणवलेले दुःख मराठी वाङ्मयात गांधीजींच्या प्रेरणेमुळे मुखर होते.
सवर्णांची जबाबदारी
जातिभेद आणि विषमता ह्या दोन्हीला सवर्ण माणूस जबाबदार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी दूर करण्याची जबाबदारीही सवर्णांवर आहे. इथे ही विभागणी श्रमामुळे झाली. श्रमांना कमी अधिक लेखले गेले म्हणून सगळ्यांत हीन असणारे श्रम सगळ्यांत श्रेष्ठ असणाऱ्या वर्णांनी करावेत, भंग्याचे अथवा चांभाराचे काम ब्राह्मणाने करावे. हेच वरिष्ठ वर्णीयांसाठी प्रायश्चित्त आहे. पाणवठे, देवळे सर्वांना खुली करावीत हा अस्पृश्योहाराचा कार्यक्रम आहे. धर्म, वर्ण अथवा समाजव्यवस्था यांच्या निषेधाने नव्हे तर जन्मप्रणीत व्यवसायाची अदलाबदल करून अस्पृश्यतेचा आणि जातिभेदाचा प्रश्न संपू शकेल, असे गांधीजींना वाटत होते.
गांधीजींच्या ह्या भूमिकेत जे करायचे आहे ते सवर्णांना. अस्पृश्यांसाठी एकच कार्यक्रम, तो म्हणजे त्यांनी स्वच्छ व शुचिर्भूत राहावे. ह्या भूमिकेमुळे अस्पृश्य कृतलता व्यक्त करीत भावबंध वाचवत नेतील आणि सवर्ण त्यांच्या त्यागामुळे क्रमाने उदात्त होत जातील, असे जीवनदर्शन जन्माला येते. साने गुरुजींच्या सर्व वाड्मयांत अस्पृश्यांचे चित्रण ह्याच अंगाने येते.
मंदिरप्रवेशासाठी, विषमता निर्मूलनासाठी अथवा जातिभेद संपुष्टात आणण्यासाठी कायद्यात विशेष काही तरतुदी असाव्यात ह्या बाबत गांधीजी अनुकूल नाहीत. त्याऐवजी त्यांचा विश्वास मानसिक परिवर्तनावर आहे. आणि या मानसिक परिवर्तनाची वाटचाल प्रेममय पद्धतीने असे त्यांना वाटते. त्यामुळे गुरुजींच्या वाङ्मयात अस्पृश्यता निवारण्याचे कार्य अंगीकारलेली माणसे आत्मक्लेशाचा अथवा आत्मपीडाचा मार्ग पत्करतात. हा आत्मक्लेश सहन करणारा माणूस वरिष्ठ वर्णातला म्हणून आदरणीय, त्यात त्याच्या आत्मपीडेने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उदात्ततेचा स्पर्श होतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आदर द्विगुणित होतो. देव, धर्म अथवा श्रुती-स्मृती यांविषयीच्या आदराला कुठेही धक्का न पोचू देता ह्या व्यवस्थेने सगळ्यांत जास्त लाभ व प्रतिष्ठा ज्यांना दिली त्यांनाच पुन्हा उदात्त ठरवल्यामुळे वाचकांच्या मनावर प्रत्यक्ष परिणाम झाला तो एवढाच की आपण अस्पृश्यांच्या बाबतीत दयाळू असावे, गांधीवादी भूमिकेची मर्यादा आणि साने गुरुजींचे व्यक्तिमत्व ह्या दोहोंच्या मुशीतून साने गुरुजींच्या लेखनात अस्पृश्यतेचे चित्रण येते. उदात्ततेचे आकर्षण असणाऱ्या वयोगटातल्या वाचकांच्या मनाला हे चित्रण भारावून सोडणारे ठरते. जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता यांविषयीची प्रतिकूल आणि निषेधात्मक जाणीव मनावर संस्कारित होणे हे जीवनवादी साहित्याच्या अभिरुची निर्मितीचे आरंभस्थान होय, असे मला वाटते. साने गुरुजींच्या बाङ्मयाने हे आरंभस्थान मराठी वाचकात पक्केपणाने रुजवले. ही साने गुरुजींची आधुनिक मराठी वाङ्मयाला देणगी आहे असे मला वाटते.
वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता ह्या तीन निरनिराळ्या संज्ञांना पुरतेपणाने समजून घेणे, हा पुढचा टप्पा आहे. जातिव्यवस्था ही आमच्या समाजातील प्रमुख वस्तुस्थिती आहे. जातीजातींच्या वेगवेगळ्या वस्त्या, कुलदैवते, विवाहविषयक नियम इत्यादी वैशिष्ट्यांतून जातींची वस्तुस्थिती समजून घेता येते. विविध प्रकारच्या आचारधर्मांतून, जातीजातींचे स्वायत्त क्षेत्र निर्माण होते. जातीजातींच्या परस्पर व्यवहारातला एक नियम म्हणजे अस्पृश्यता. ह्या नियमांचा मूलाधार विषमतेची न्याय्य वाटणारी जाणीव हा आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा हीन आहे असे समजून वागणे म्हणजे ही विषमता. ह्या विषम वागणुकीचे सगळ्यांत अखेर तीव्र आणि उग्र टोक म्हणजे अस्पृश्यता.
वर्णव्यवस्था ही स्थिती नव्हे. जात ह्या वस्तुस्थितीचे व्यवस्थापन म्हणजे वर्णव्यवस्था. जातीच्या नियोजनासाठी वर्णव्यवस्था येते आणि पावित्र्याचे अधिष्ठान देऊन धर्म या व्यवस्थेला कुणीही आणि कधीही धक्का पोचवू नये अशी मानसिकता निर्माण करतो. आजच्या परिभाषेत सांगायचे तर एस.सी., एस. टी., ओ.बी.सी. अशा शब्दांत आपण जातीचे नियोजन करीत आहोत. ह्या नियोजनाला घटनेच्या चौकटीचा आधार आहे. जुन्या काळी ज्या वर्णव्यवस्थेने जातीचे नियोजन केले त्या वर्णव्यवस्थेचा आधार स्मृतिग्रंथ आणि स्मृतिग्रंथांना धर्माचे पावित्र्य. सारांश, जात नावाच्या वस्तुस्थितीला आचारधर्माने परस्परांशी बांधून टाकले होते. हा आचारधर्म विषमतापूर्ण होता. वर्ण नावाच्या व्यवस्थापन व्यवस्थेने ह्या आचारधर्मात प्रशासकीय पक्केपणा आणला होता. धर्माने व्यवस्थेला पावित्र्याचे अधिष्ठान दिल्यामुळे ह्या व्यवस्थेविरुद्ध कुणीही उठाव करू नये अशी मानसिकता निर्माण केली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आपल्या या समान स्थितीचे मान आम्हांला करून दिले. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेले साहित्य नकार व विद्रोहाचा स्वर साहित्यात आणते. हा स्वर समंजसपणे ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची सोशीकता साने गुरुजींचे साहित्य निर्माण करते. साने गुरुजींच्या नायकांत आढळून येणारी आत्मपीडा आणि आजच्या दलित साहित्याच्या आस्वादातला डोळसपणा परस्पर संवादी आहेत असे मला वाटते. अस्पृश्यता, जातिभेद, अन्यायपूर्ण रुढी, विषमता ह्या सगळ्यांविषयी योग्य वयात प्रतिकूल असा भावात्मक परिणाम साने गुरुजींनी साधला. म्हणूनच पुढच्या वयात बोचरा वास्तवतावादी असा वाङ्मयात प्रकट झालेला अनुभव आपणांला आस्वाद्य वाटू शकला आहे. साने गुरुजीचे मराठी अभिरुचीवर हे ऋण आहे असे मला वाटते.
Tags: पंढरपूर मंदिरप्रवेश गांधीविचारांचा वारसा ‘आस्तिक’ अस्पृश्यताविरोधी वाङ्मय अस्पृश्यताविषयक कार्य साने गुरुजी 'astik' literature against untochability untouchability work sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या