डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद यांचा पराभव झालेला असेल. मानवतावादाच्या नव्या धर्मालाही धाप लागलेली असेल. माणसांना केवळ संख्याशास्त्रीय आकड्यांचे, अक्षरांचे किंवा चिन्हांचे अस्तित्व राहील. माणसांचे व्यक्तित्व (Individuality) संपुष्टात येईल. माणसाचे निर्णयस्वातंत्र्य यंत्रे किंवा यंत्रमानव हिरावून घेतील. भविष्यकाळाच्या भविष्यकाळात संगणक आणि अद्ययावत यंत्रे माणसांना दुय्यम आणि कनिष्ठ बनवतील. बहुतांशांना एवढी भरपूर सुट्टी, विश्रांती व फुरसत मिळेल की कंटाळा ही प्राथमिक समस्या किंवा दुखणे होईल. वर्तमानकाळात नागरिक जगण्याचा हक्क (Right to live) ‘मागत आहेत. भविष्यकाळाच्या भविष्यकाळात नागरिक मरण्याचा हक्क (Right to die) मागू लागतील. लाखो लोक आत्महत्या करतील किंवा इच्छामरण पत्करतील.
 

भूतकालीन घटनांचे विश्लेषण करणाऱ्या आणि वर्तमानकाळातील समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या पुस्तकांपेक्षा मला भविष्यवेधी पुस्तके आवडतात. डॉ. युवाल नोह हरारी या इस्रायली विचारवंताचे 'Homo Deus : A Brief history of tomorrow' हे पुस्तक हल्लीच्या काळात मी वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी माझे आवडते पुस्तक आहे. भविष्यकाळाला इतिहास असतो का? भविष्यकाळ आणि इतिहास ह्या दोन विरोधाभासी संकल्पना नाहीत का? युवाल हरारी यांना तसे वाटत नाही. भविष्यकाळ हा न घडलेला किंवा घडू शकणारा इतिहास आहे असे त्यांना वाटते. हरारी केवळ भविष्यकाळाचाच वेध घेऊन थांबत नाहीत. भविष्यकाळाचा भविष्यकाळ (Future of Future) काय असू शकतो याचे ते विवेचन करतात.

युवाल हरारींचे '(Homo) Sapiens : Brief History of Humankind' हे 2014 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आधी वाचले, तर 2016 मध्ये लिहिलेल्या हरारींच्या 'Homo Deus' ह्या पुस्तकाचे आकलन थोड्या सोपेपणाने होते.

'Homo Deus' हे हरारींचे पुस्तक आपल्या विचारांचा वेग (Speed), विचारांची गती (Velocity) आणि विचारांची कक्षा (Orbit) बदलण्यास मदत करते. 'Science advances one funeral at a time'- ‘जगातल्या प्रत्येक मृत्यूनंतर विज्ञानाचे एक पाऊल पुढे पडते’, हे शास्त्रज्ञ मॅक्स प्लॅन्कचे उद्‌गार उद्‌धृत करून हरारी म्हणतात- ‘‘जुन्या विचारांची एक पिढीच्या पिढी स्मृती-शेष झाल्यावरच विज्ञान झेप घेते आणि पुढची पिढी विज्ञानाचे नवे सिद्धान्त मान्य करते.’’ पण हे मॅक्स प्लँकचे उद्‌गार आता कालबाह्य झाले आहेत. आपणा सर्वांच्या जीवितकालातच- विज्ञान अंकगणिती श्रेणीने (1, 2, 3, 4, 5) नव्हे, भूमिती श्रेणीने (2, 4, 8, 16, 32) नव्हे, फिबोनासी श्रेणीने (1, 1, 2, 3, 5, 8, 13 ) नव्हे; तर वर्गश्रेणीने (2, 4, 16, 256) विस्तारत जाणार आहे.

आपण भविष्यकाळाकडे निराशावादी दृष्टिकोनातूनही पाहू शकत नाही आणि आशावादी परिप्रेक्ष्यातूनही पाहू शकत नाही. सर्वसामान्य माणसांच्या नजरेतून भविष्यकाळ अनाकलनीय असेल. भविष्यकाळ त्यांना झेपणार नाही. कारण ज्या वेगाने बदल बदलतो तो वेगही बदलणार आहे.

मानवी इतिहासाच्या एका कालखंडात ‘होमो इरेक्टस’ नामशेष होऊन पृथ्वीतलावर ‘होमो सेपियन्स’चे अधिराज्य झाले, त्याचप्रमाणे भविष्यकाळात किंवा भविष्यकाळाच्या भविष्यकाळात ‘होमो सेपियन्स’ असलेल्या आपणा सर्वांची किंवा आपल्या वंशजांची कवचकुंडले गळून पडून आपण सर्व किंवा आपले वंशज ‘होमो दिएस’ होतील. मानवाचा महामानव होईल. सुपरमॅन होईल.

सध्याचा माणूस बदलत्या परिवर्तनशील (Transitional) अवस्थेत आहे. निसर्गाच्या नव्हे, तर विज्ञानाच्या दृष्टीने ज्याने पूर्णावस्था गाठली नाही असा Work in progress आहे, असे हरारींचे म्हणणे आहे.

भविष्यकाळात कोणत्या घटना घडणार आहेत? भविष्यकाळात माहिती (Information) आणि विदा (Data) सार्वभौम होणार आहे. संगणक आणि संगणक प्रणाली माहितीचे आणि विदाचे पृथक्करण करून नव्या अपरंपार ज्ञानाची, विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे.

भविष्यकाळात आपल्या सभोवती काय असणार आहे? अलाउदीनच्या जिनीप्रमाणे आज्ञाधारक रोबोज, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे संगणक व यंत्रे, स्वयंचलित मोटारी व विमाने, विजेवर, सौर शक्तीवर, हायड्रोजनवर चालणारी वाहने, त्रिमिती छपाई तंत्र (थ्रीडी प्रिंटिंग), बायोप्रिंटिंग (त्रिमिती छपाईच्या तंत्राने मानवी अवयवांची निर्मिती), स्वयंचलित ड्रोन्सचा अधिकाधिक वापर, नॅनो टेक्नॉलॉजी, संजीवक औषधे यांच्या परिसरात माणूस वावरेल.

गर्भातच किंवा जन्मानंतर जनुकीय हस्तक्षेप करून भावी रोग टाळता येतील. अतिसूक्ष्मातिसूक्ष्म नॅनो रोबोज रक्तवाहिन्यांतून सोडले जातील. ते शरीरातल्या रोगांचे अचूक निदान करतील आणि त्यावर इलाजही करतील. यामुळे माणसाचे आयुष्यमान 150 वर्षांपर्यंत वाढेल. याच गतीने आरोग्यक्षेत्रात, जनुकीय संशोधनात, शारीरशास्त्रीय अभियांत्रिकीत बदल होत गेला तर माणूस मृत्यूवर विजय मिळवून अमर होईल. केवळ अपघात, खून, आत्महत्या यांमुळेच माणसाला मृत्यू येईल. मरण पावलेल्या माणसाला जिवंत करणे मात्र शास्त्रज्ञांना शक्य होणार नाही.

आपण ठरावीक कालावधीनंतर मोटारगाडीचे सर्व्हिसिंग करतो, नादुरुस्त स्पेअर पाटर्‌स बदलतो त्याप्रमाणे माणसे ठरावीक कालावधीनंतर नादुरुस्त किंवा थकलेले अवयव बदलतील आणि पूर्ण शरीराचे सर्व्हिसिंग करून घेतील.

राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे संपून जातील. कारण प्रत्येक राष्ट्र सायबर युद्धतंत्रात पारंगत असेल. रोबो सैनिकांमुळे सर्व राष्ट्रांची युद्धक्षमता समान असेल. सर्व देशांचे इतर देशांत व्यापारी हितसंबंध गुंतलेले असतील. त्यामुळे युद्ध करणे कोणालाच परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रांतर्गत दहशतवाद संपून जाईल.

दहशतवादाला आताही आपण सामूहिक भीतीपोटी बहिर्गोल भिंगातून पाहतो. दहशतवाद आपण समजतो तसा व्यापक नाही असे हरारींचे मत आहे. 2010 मध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणामुळे होणाऱ्या दुखण्यामुळे 30 लाख लोक मरण पावले, तर दहशतवादामुळे केवळ 7697 लोक गतप्राण झाले. अल्‌-कायदापेक्षा कोका कोला अधिक भयानक आहे असे युवाल हरारींना वाटते.

संगणकीकरण, यांत्रिकीकरण, स्वयंचलितता, रोबोज, कृत्रिम बुद्धिमत्ता यांमुळे लाखो लोक बेकार होतील. ड्रायव्हर्स, वेटर्स, बँक कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट्‌स, पोलीस, सैनिक, सुरक्षा गार्ड, सुतार, प्लंबर्स, रंगारी, मेकॅनिक्स, तंत्रज्ञ, लोडर्स, स्वच्छता कामगार, औद्योगिक कामगार, शेतमजूर आपल्या रोजगाराला मुकतील. आज अमेरिकेच्या उत्पादक लोकसंख्येपैकी 2 टक्के नागरिक कृषिक्षेत्रात, 20 टक्के औद्योगिक क्षेत्रात, तर 78 टक्के नागरिक सेवाक्षेत्रात आहेत. सेवाक्षेत्राच्या प्रचंड प्रमाणामुळे भविष्यकाळात यंत्रे, संगणक, रोबोज, स्वयंचलित वाहने, अमेरिकेतल्या 47 टक्के उत्पादक नागरिकांना बेकार करण्यास कारणीभूत ठरतील.

यंत्रांची उत्पादकता कामगारांच्या उत्पादकतेपेक्षा जास्त असल्यामुळे कामगार पगारवाढीची मागणी करू शकणार नाही. कामगार संघटना नामशेष होतील. यंत्रे पगारवाढीचा आग्रह धरणार नाहीत, त्यामुळे उत्पादकांचा (भांडवलदारांचा) नफा प्रचंड वाढलेला असेल.

पूर्वी बाजाराचा  (Market) अदृश्य हात (Invisible Hand) अर्थव्यवस्थेचे चक्र फिरवत होता. आता माहिती आणि विदाचा अदृश्य हात अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करेल. माहितीचे आणि विदाचे लोकशाहीकरण होईल. सगळ्यांच्या सहभागाने (Collaboration of everyone) नवे उद्योग उभारले जातील. याचे सद्य:कालीन उत्तम उदाहरण म्हणजे Wikipedia, जी सामूहिक प्रयत्नांमुळे अद्ययावत व अधिकाधिक समृद्ध होत जाते. नवे उद्योजक व सामाजिक संस्था crowd Funding द्वारे (सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला अनेक नागरिकांनी प्रतिसाद देऊन मिळालेल्या पैशातून) भांडवल उभारतील. पूर्वी जमिनीवर, मनुष्यबळावर, पैशांवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकणारेच भांडवलदार होऊ शकत होते. भविष्यकाळात ज्ञानावर कोणाचीच मक्तेदारी किंवा मालकी हक्क असणार नाही. त्यामुळे जमीन, मनुष्यबळ आणि पैसे नसलेले नव्या पिढीतील उद्योजकही ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शिडीवर चढून यशस्वी होतील.

याच वेळी शारीरशास्त्रीय अभियांत्रिकी आणि जनुकीय हस्तक्षेप यांचा महाग खर्च पेलू शकणारे आणि निरोगी, बुद्धिमान, कुशल वंशज निर्माण करू शकणारे उद्योगपती व भांडवलदार आणि अशा निरोगी, बुद्धिमान, कुशल तंत्रज्ञांना आपल्या आस्थापनात सांभाळू शकणाऱ्या मोठ्या कंपन्या ह्या माहिती व विदांचे केंद्रीकरण करून किंवा त्यांची मक्तेदारी घेऊन (गुगल, ॲमेझॉन ही उदाहरणे) जास्तीतजास्त बौद्धिक संपदेचे (Intellectual Rights) हक्क बळकावून शक्तिशाली संगणक, कुशल यंत्रमानव व स्वयंचलित यंत्रे यांचा वापर करून प्रचंड संपत्ती कमावतील. दुसऱ्या बाजूने कोट्यवधी लोक बेकार होतील. बदलत जाणारे तंत्रज्ञान अनेकांना झेपणार नाही. त्यामुळे कोट्यवधी लोक नोकरीलायक असणार नाहीत. एका बाजूने नोकरी गमावणे किंवा अकाली निवृत्ती घ्यावी लागणे आणि दुसऱ्या बाजूने आयुष्यमान वाढणे, यांमुळे बहुतांश लोक कंगाल होतील. पेन्शन किंवा जीवनभरात केलेली बचत त्यांना अपुरी पडेल आणि सरकारला ह्या कोट्यवधी लोकांच्या अनुत्पादक समूहाला दरमहा ठरावीक उत्पन्नाची तरतूद करावी लागेल.

उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद यांचा पराभव झालेला असेल. मानवतावादाच्या नव्या धर्मालाही धाप लागलेली असेल. माणसांना केवळ संख्याशास्त्रीय आकड्यांचे, अक्षरांचे किंवा चिन्हांचे अस्तित्व राहील. माणसांचे व्यक्तित्व (Individuality) संपुष्टात येईल. माणसाचे निर्णयस्वातंत्र्य यंत्रे किंवा यंत्रमानव हिरावून घेतील. भविष्यकाळाच्या भविष्यकाळात संगणक आणि अद्ययावत यंत्रे माणसांना दुय्यम आणि कनिष्ठ बनवतील. बहुतांशांना एवढी भरपूर सुट्टी, विश्रांती व फुरसत मिळेल की कंटाळा ही प्राथमिक समस्या किंवा दुखणे होईल. वर्तमानकाळात नागरिक जगण्याचा हक्क (Right to live)  मागत आहेत. भविष्यकाळाच्या भविष्यकाळात नागरिक मरण्याचा हक्क (Right to die) मागू लागतील. लाखो लोक आत्महत्या करतील किंवा इच्छामरण पत्करतील.

माणसांचे यांत्रिकीकरण होईल. माणसे अधिक बलवान व कुशल असे यांत्रिक हात, वेगाने पळू शकणारे यांत्रिक पाय- एवढेच नव्हे, तर संगणकाला जोडलेला मेंदू वापरू लागतील. यंत्रांचे मानुषीकरण होईल. शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केलेलीच आहे. भावना असलेली यंत्रे किंवा यंत्रमानव निर्माण करणे हे शास्त्रज्ञांपुढचे आव्हान आहे. त्यात ते कदाचित यशस्वी ठरतील.

E = MC2 ऊर्जा म्हणजे वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे समीकरण मांडून अल्बर्ट आइनस्टाईनने जडांतून ऊर्जा निर्माण करता येते हे सिद्ध केले. पण अजूनही चैतन्य (Consciousness)  म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते हा प्रश्न सुटायचा आहे. भविष्यकाळाच्या भविष्यकाळात हा शोध लागला तर बुद्धिमत्ता, भावना व चैतन्य असलेले यंत्रमानव निर्माण होतील. हे यंत्रमानव चित्रकला, साहित्य, संगीत, शिल्प आणि वास्तुशिल्प ह्या क्षेत्रांत प्रवीण होतील. ‘अ’ ह्या यंत्रमानवाला पदार्थविज्ञानाचे नोबेल मिळेल. ‘ब’ या यंत्रमानवाला साहित्याचे नोबेल मिळेल. ‘क’ ह्या यंत्रमानवाला अर्थशास्त्राचे नोबेल मिळेल.

याचबरोबर माणसाच्या शरीरात असलेली उत्क्रांतिजन्य लवचिकता, माणसाच्या मेंदूची संगणकापेक्षा किती तरी पटींनी अधिक असलेली क्षमता, जनुकीय हस्तक्षेप करून मानवाचा महामानव होण्याची शक्यता, यांमुळे सरतेशेवटी मानवच यंत्रमानवांपेक्षा बुद्धिमान व बलवान ठरणार आहे. दुसऱ्या शब्दांत ‘होमो सेपियन्स’चे ‘होमो दिएस’मध्ये रूपांतर झालेले असेल.

डॉ. युवाल नोह हरारी यांचे ‘होमो दिएस’ हे पुस्तक त्यातला सूचक, गर्भित अर्थ समजून (Between the line) वाचले तर आपल्याला अनाकलनीय भविष्यकाळाच्या भविष्यकाळाचा थोडासा झरोका दिसतो.

शेवटी शास्त्र म्हणजे विदा गुणिले गणित (Science = Data x Mathematics) आणि मानवी ज्ञान म्हणजे अनुभव गुणिले संवेदनशीलता (Human Knowledge = Experience x Sensibility ) हे आपले सिद्धान्त हरारी मांडतात. विज्ञानाला आपल्या काबूत ठेवून, आपल्या अनुभवांचे विश्लेषण करून अत्यंत संवेदनशील व सजग मनाने मानवजात वागेल आणि भविष्याच्या भविष्यकाळाच्या अवकाशकाळाला (Spacetime) यशस्वीपणे वेसण घालील, असा सूचक आशावाद डॉ. हरारी व्यक्त करतात.

युवाल हरारींची ही भविष्यकाळाबद्दलची मांडणी मला महत्त्वाची वाटते, त्याला एक वेगळे कारण आहे. 'The Fabric of the cosmos'  या पुस्तकात पदार्थ विज्ञानतज्ज्ञ ब्रायन ग्रीन यांनी जॉन व्हिलर ह्या शास्त्रज्ञाच्या 'Delayed Choice experiment' बद्दल आश्चर्यकारक माहिती दिली आहे. या सिद्धांताच्या प्रतिपादनाप्रमाणे भविष्यकाळातील घटना वर्तमानकाळातील म्हणजे भविष्यकाळाच्या भूतकाळातील आणि भूतकाळातील म्हणजेच भूतकाळाच्या भूतकाळातील घटनांवर प्रभाव टाकत असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर वर्तमानकालीन आणि भूतकालीन घटना ह्या भविष्यकाळातील घटनांनी पूर्वनियोजित केलेल्या असतात. ज्यांना खगोलशास्त्राची, पदार्थविज्ञानाची व उच्च गणिताची पार्श्वभूमी नाही, त्यांना ही अद्‌भुत संकल्पना समजणे कठीण आहे. ही संकल्पना एका उदाहरणाने समजावून सांगता येईल. एखादा ग्रह किंवा तारा विश्वाच्या ‘क्ष’ या अवकाशकालात असेल तर एका सेकंदापूर्वी आपण अवकाशकालाच्या ‘य’ ह्या स्थितीत असू, असे तो ठरवत असतो.

हा सिद्धान्त अजून मांडणीच्या पातळीवर आहे. तो प्रयोगसिद्ध किंवा अनुभवसिद्ध नाही. पण हा सिद्धान्त खरा असेल तर युवाल हरारींचे भविष्यकालीन अंदाज आपल्या वर्तमानकाळावर व भूतकाळावर प्रभाव टाकत असले पाहिजेत असे मानले पाहिजे.

भूतकाळातील चुकांचा अभ्यास करून आपण वर्तमानकाळात सुधारले पाहिजे, असे आपण नेहमीच म्हणतो. मग भविष्यकाळातील संकटांचा आणि संधींचा अंदाज घेऊन आपण वर्तमानकाळात सावध व सज्ज राहिले पाहिजे आणि वर्तमानकाळात असे सावध व सज्ज राहणे हेदेखील भविष्यकाळ आपल्यावर टाकत असलेला प्रभाव किंवा प्रेरणा असे आपण समजले पाहिजे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके