डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अल्बर्ट एलिस यांचे 'अ गाईड टू रॅशनल लिविंग'

नियतीशरण होऊ नका, तुमची बुद्धी, तुमचे स्वभावगुण हेच तुमचे भविष्य ठरवत असतात. (Character is destiny) हा एलीसचा मंत्र आहे. माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक व सार्वजनिक जीवनात The Guide to Rational Living ह्या अल्बर्ट एलीसच्या पुस्तकाने खूप मानसिक आधार दिला. या आधाराविना मी वाकलो असतो, कोलमडलो असतो, उद्‌ध्वस्त झालो असतो, एवढे वाईट किंवा बरे-वाईट प्रसंग माझ्या जीवनात आले. अल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ मानसशास्त्रामुळे ह्या सर्व प्रसंगांतून मी सावरलो.  

मी पूर्ण वेळ उद्योजक आहे आणि वीक एन्ड ऑथर आहे. शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत मी सर्वोच्च क्रमांकावर होतो. गणित व अर्थशास्त्र हे विषय घेऊन पदवीधर झालो. उच्च शिक्षण घेऊन गणितज्ञ व्हावे की अर्थशास्त्रज्ञ हे द्वंद्व माझ्या मनात होते. गणित आणि अर्थशास्त्र या दोन्ही एकमेकांना पूरक अशा शुद्ध विज्ञानाच्या व समाजविज्ञानाच्या शाखा आहेत, हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा या दोन्ही विषयांत पारंगत व्हायचे ठरवले.

पण मी उच्च शिक्षण घेऊ शकलो नाही. गोव्यात आमच्या कुटुंबाचा पिढीजात कौटुंबिक धंदा होता. माझे वडील वृद्ध झाल्याने व मी त्यांचा एकुलता मुलगा असल्याने कौटुंबिक धंद्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी नातेवाईकांचा प्रचंड दबाव माझ्यावर आला. त्यामुळे नाईलाजाने व्यापारी झालो. मी ‘फुकट’ गेलो, आपल्या आयुष्याची माती झाली, अशी माझी त्या वेळची भावना होती. निराश झालो. वैफल्यग्रस्त झालो. धंद्यात लक्ष लागेना. खरे म्हणजे माझे कशातच लक्ष लागेना. मी मानसोपचारतज्ञाकडे गेलो. त्यांनी मला औषधे दिली. समुपदेशन केले.

ते वर्ष 1975 चे होते. तोपर्यंत मी पूर्ण नास्तिक बनलो होतो. मार्क्सवादाच्या प्रभावात येऊन कालांतराने त्या प्रभावातून बाहेर पडून समाजवादी विचारांपर्यंत माझा वैचारिक प्रवास झाला होता. 1971 ते 1975 या कालखंडात मी गोव्यातील विद्यार्थी चळवळीचा नेता होतो. महाराष्ट्रातील राष्ट्र सेवा दल, युक्रांद ह्या संघटनांची गोव्यातील डी फॅक्टो शाखा म्हणून आमची विद्यार्थी  संघटना वावरत होती. आमच्या घरात समाजवादी वातावरण होते. राम मनोहर लोहिया, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, नाथ पै हे नेते घरी आले होते.

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आमच्या कुटुंबाचा सहभाग पडद्याआडून होता. आमच्या कुटुंबातले कोणीही लढ्यात उतरून स्वातंत्र्यसैनिक झाले नाही, पण चळवळीला  गुप्तपणे आर्थिक मदत माझ्या आजोबांनी व वडिलांनी केली. प्रजासमाजवादी नेते पीटर आल्वारीस हे तर जणू माझे काकाच आहेत, असे मला लहानपणी वाटत होते.

माझ्या लहानपणचे आमच्या घरातले वातावरण अतिशय प्रागतिक होते. मी ब्राह्मण जातीचा आहे हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत मला माहीत नव्हते. आणि जेव्हा कळले तेव्हा जातीच्या गुरुत्वाकर्षणीय कक्षेच्या बाहेर पडण्याइतकी एस्केप व्हेलोसिटी माझ्या विचारांत होती.

जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीशी आमचे संधान होते. त्यामुळे 1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मला अटक होणे स्वाभाविक होते. कारण मी पोलिसांच्या काळ्या यादीत होतो. माझ्या इतर मित्रांना अटक झाली होती. पण मला अटक झाली नाही.

आणीबाणीच्या काळरात्रीत आणि जनता पक्षाच्या उषःकालात मी सक्रीयपणे, जाहीरपणे काहीच करू शकलो नाही, याची मला खंत वाटू लागली. माझा मानसिक आजार पुन्हा उफाळून आला.

आगीत तेल घालावे अशी एक घटना माझ्या जीवनात घडली. माझे वडील, माझे काका, माझे आजोबा आणि नायक घराण्याचे विस्तारित कुटुंब ‘गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे; मराठी ही गोव्याची भाषा आहे आणि कोंकणी ही मराठीची बोली आहे’ या मताचे होते. खूप वाचनाने आणि विचाराने कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे, मराठी भाषेची ती बोली नाही आणि ज्या महाराष्ट्राने गोव्याच्या 451 वर्षांच्या पारतंत्र्यात (छत्रपती शिवाजी व संभाजी राजे यांचा थोडासा अपवाद केल्यास) गोव्याला स्वतंत्र करण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही (मराठ्यांचे पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध होते आणि पेशवे पोर्तुगीजांनी पाठवलेल्या कलमी आंब्यांचा आस्वाद घेत होते.) त्या महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर गोव्यावर हक्क सांगण्याचा कसलाच अधिकार नाही, असे माझे मत झाले. वसाहतवादाविरूद्ध लढणारे आणि साने गुरुजींच्या आंतरभारतीचा पुरस्कार करणारे ना.ग. गोरे, एस.एम. जोशी, नाथ पै, पीटर आल्वारीस ह्या सर्व समाजवादी नेत्यांनी ‘कोंकणी’ ह्या दलित भाषेची व्यथा समजून घेतली नाही आणि महाराष्ट्राच्या वसाहतवादास प्रोत्साहन दिले, यामुळे माझा मोठा भ्रमनिरास झाला.

राजकीय मते विरोधी असल्यामुळे माझ्या वडिलांच्या आणि माझ्या वैयक्तिक नात्यात वितुष्ट निर्माण झाले. नाही तरी भारतीय हिंदू समाजातले पिता-पुत्र नाते फारसे निरोगी व निरामय नसते.

शंकर-गणपती, हिरण्यकश्यपु-प्रल्हाद, छत्रपती शिवाजी-संभाजी, महात्मा गांधी-हरिलाल, विजयपत -गौतम सिंघानिया ही पुराणकालीन, ऐतिहासिक व सद्य उदाहरणे आहेत. ऑर्थर कॉस्लरने हिंदू समाजाच्या ह्या वैगुण्याचे ‘बापूक्रॅसी’ असे वर्णन केले आहे.

ज्या सारस्वत ज्ञातीत मी जन्मलो त्या तथाकथित उच्च जातीने ज्ञातीवाचक संस्था काढली, तेव्हा त्याला विरोध करून आम्ही ‘समता आंदोलन’ ही संस्था उघडली आणि सारस्वतांचा रोष ओढवून घेतला. राजकीय जीवनात भारतीय जनता पक्षाला कडाडून विरोध केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माझ्या औद्योगिक आस्थापनावर धाड घातली आणि खोटे आरोप घालून मला अटक केली. ह्या सर्व घटनांमुळे माझे उद्योजकीय जीवन व सामाजिक, राजकीय जीवन यात समतोल नसल्यामुळे माझी मानसिक कुचंबणा होत गेली.

मी नास्तिक असल्याने देवाकडे जाऊ शकलो नाही. अध्यात्माचा व धर्म-तत्त्वज्ञानाचा आधार घेऊ शकलो नाही. ज्योतिषाकडे जाऊ शकलो नाही. जीवनात प्रथमच आपण देवभक्त असलो असतो, अंधश्रद्धाळू असलो असतो तर देव, पुजारी, ज्योतिषी यांनी प्लेसिबोचा उपयोग करून (फसवे का असेना) मानसिक समाधान दिले असते असे मला वाटू लागले.

अनेक वेळा मानसोपचारतज्ञाकडे गेलो. पण माझे मानसिक संतुलन पूर्वपदास येईना, तेव्हा स्वतःच मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. फ्रॉइड, जुंग यांचे गूढ, संदिग्ध व अध्यात्माला जवळ जाणारे (विशेषतः जुंगचे) तत्वज्ञान मला आवडले नाही. अशा वेळी डॉ. अल्बर्ट एलीस या मानसशास्त्रज्ञाचे The Guide to Rational Living हे पुस्तक माझ्या हाती आले. माझ्या मानसिक तणावावर हे पुस्तक रामबाण औषध ठरले.

अल्बर्ट एलीसचे तत्त्वज्ञान पूर्णपणे विवेकी व बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्याच्या थेरपीचे नावच मुळी Rational Emotive Behavior Therapy (REBT) असे होते. डॉ. एलीस यांनी आपली थेरपी ‘अबकडई’ ह्या मुळाक्षरांनी सांगितली आहे.

आपल्या जीवनातली एखादी घटना म्हणजे ‘अ’.

या घटनेनंतर आपण आपल्या मनात जो अविवेकी विचार आणतो आणि चुकीच्या परिप्रेक्ष्यातून त्या घटनेकडे  पाहतो ती अवस्था म्हणजे ‘ब’.

त्यानंतर आपल्याला जे नैराश्य व वैफल्य येते ती अवस्था म्हणजे ‘क’. यापुढे ‘ड’ अवस्थेत आपण आपल्या चुकीच्या, अविवेकी (Irrational) विचारांचे आपला विवेक व बुद्धिप्रामाण्य यांच्या साहाय्याने खंडनमंडन करतो.

‘ई’ अवस्थेत आपण आपले पूर्वीचे दूषित तत्त्वज्ञान सोडून देतो आणि पुढे अशा मानसिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून, विवेकनिष्ठ मानसशास्त्रावर आधारित आपले जीवनतत्त्वज्ञान निर्माण करतो.

अल्बर्ट एलीसच्या तत्त्वज्ञानाने माझे मानसिक आरोग्य सुधारले. ह्या तत्त्वज्ञानात कोणतीच संदिग्धता नव्हती. गूढ नव्हते. तर्कदुष्टता नव्हती. त्यामुळे हे तत्त्वज्ञान मला स्वीकारार्ह वाटले.

आपल्या जीवनात कुठली घटना केव्हा घडेल यावर आपले नियंत्रण नसते. पण त्या घटनेवर कोणती प्रतिक्रिया करावी व त्यानंतर आपले वर्तन कसे असावे यावर नियंत्रण असते असे अल्बर्ट एलीस म्हणतात.

उद्योजक किंवा उद्योगपती (कामगारांना लुटून) भरमसाठ नफा करून ऐशआरामात लोळणारे असतात, समाजवृक्षावरच्या बांडगुळासारखे असतात, असे बहुतांश लोकांना वाटते. पण उद्योजकीय जीवन सतत लोखंडाचे चणे खात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे असते. अर्थव्यवस्थेत अचानक येणारी मंदी, तीव्र स्पर्धा, कामगारांची अनुत्पादकता, संप, टाळेबंदी, बुडित खात्यात गेलेली, गिऱ्हाईकाला व मालाचा पुरवठा करणाऱ्यांना दिलेली देणी, बोकाळलेला भ्रष्टाचार, अकार्यक्षम व वेळकाढू नोकरशाही, आर्थिक उदारीकरणाला अजून पूरक न ठरलेली न्यायव्यवस्था यामुळे आम्हा उद्योजकांची सतत दमछाक होत असते. कोणताच धोका न पत्करणाऱ्या सुखवस्तू पत्रकारांना, समाज कार्यकर्त्यांना, मध्यमवर्गीयांना याची कल्पना नसते. ते फक्त उद्योजकांची श्रीमंती पाहून त्यांचा दु:स्वास करतात. पण एका यशस्वी उद्योजकामागे किती अयशस्वी उद्योजक दिवाळखोर होतात, याचे भान त्यांना नसते. म्हणूनच बहुसंख्य उद्योजक देवभक्त असतात, धार्मिक असतात. वास्तुशास्त्र, शुभ काल, अशुभ काल, ज्योतिष, कर्मकांडे यात गुंतलेले असतात. अशा वेळी माझ्यासारख्या नास्तिक उद्योजकाला अल्बर्ट एलीससारख्या मानसशास्त्रज्ञाचा आधार वाटतो.

कसल्याच घटनेचे किंवा गोष्टीचे सार्वत्रिकीकरण करू नका, स्वत:ला वृथा गुणदुर्गुणांची लेबले लावू नका, दुसऱ्यांच्या गुणावगुणांकडे बहिर्गोल भिंगातून पाहू नका, दुसऱ्यांच्या मतावरून आपले मूल्यमापन करू नका. अशी व्यवस्थापनशास्त्राला समांतर जाणारी सूत्रे अल्बर्ट एलीस सांगतात.

नियतीशरण होऊ नका, तुमची बुद्धी, तुमचे स्वभावगुण हेच तुमचे भविष्य ठरवत असतात. (Character is destiny) हा एलीसचा मंत्र आहे.

माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक व सार्वजनिक जीवनात The Guide to Rational Living ह्या अल्बर्ट एलीसच्या पुस्तकाने खूप मानसिक आधार दिला. या आधाराविना मी वाकलो असतो, कोलमडलो असतो, उद्‌ध्वस्त झालो असतो, एवढे वाईट किंवा बरे-वाईट प्रसंग माझ्या जीवनात आले. अल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ मानसशास्त्रामुळे ह्या सर्व प्रसंगांतून मी सावरलो.

आज मी यशस्वी उद्योजक आहे. सेंद्रीय शेती करणारा शेतकरी आहे. कोंकणी व मराठी भाषेत लेखन करण्याची हौस पुरी करण्याइतकी फुरसत मला आहे. निर्धास्तपणे हवे ते समाजकारण व राजकारण करण्याचे धारिष्ट्य माझ्यात आहे. समाजकार्यासाठी आपल्या संपत्तीतला काही वाटा देण्याची कुवत आहे. माझ्या सर्व यशात डॉ. अल्बर्ट एलीसचा वाटा आहे.

ज्या गतीने आणि वेगाने संगणकशास्त्र, जनुकीय शरीरशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनोटॅक्नॉलॉजी, थ्री-डी प्रिटींग ह्या क्षेत्रांत प्रगती होत आहे; त्याच गतीने व वेगाने मानसशास्त्राने झेप घेतली तर देव, धर्म, अंधश्रद्धा कालबाह्य व संदर्भहीन होतील आणि आपले अनेक सामाजिक प्रश्न सुटतील अशी माझी भावना आहे. नव्या युगातले नवे अल्बर्ट एलीस आपले हे स्वप्न पुरे करणार आहेत.

Tags: वाचन पुस्तकदिन थ्री-डी प्रिटींग नॅनोटॅक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता जनुकीय शरीरशास्त्र संगणकशास्त्र अ गाईड टू रॅशनल लिविंग अल्बर्ट एलिस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


Comments

 1. Ashok Sadekarpawar- 23 Apr 2021

  Jai Ganesh. Namskar. Aapan Nastik nahi ase maze mat aahe. Ka te kadachit bolane zale tar Vichar sangen. I'm from Baroda but now I'm in Panjim

  save

 1. Dominic Gonsalves- 23 Apr 2021

  मला त्यांचे विचार आवडले. साधना मध्ये त्यांचे लेख मी नेहमी वाचतो.

  save

 1. Vinay- 24 Apr 2021

  सप्रेम नमस्कार आपण अतिशय तर्कशुद्ध लिखाण केले आहे. लेख वाचून पुस्तक लगेच मागवले...

  save

 1. Suresh Rajaram Patil- 24 Apr 2021

  Short but sweet

  save

 1. Vasudev- 24 Apr 2021

  ह्या पुस्तकाची मराठी आव्रूती आहे का ?

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके