डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आँग सान सू कीचा पक्ष सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. लोकांचा थोडासा भ्रमनिरास झाला आहे. नेत्रदीपक कामगिरी त्यांनी केलेली दिसत नाही. अर्थात, मिलिटरी ज्युन्ताने केलेला गोंधळ निस्तरून देशाची घडी बसवायला 1000 दिवस तरी पाहिजेत, असे आँग सान सू कीचे म्हणणे आहे आणि त्यात तथ्यही असेल. पण एका बाबतीत सान सू की यांनी निराशा केली आहे. ब्रह्मदेशात रोहिंग्य नावाची अल्पसंख्य मुस्लिम जमात आहे. मागील निवडणुकीत या मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध ब्रह्मदेशातील बौद्ध भिक्खूंनी भारतातील संघ परिवारालाही लाज वाटेल एवढ्या स्तराला जाऊन मोहीम उघडली होती. 

रत्नागिरीत जन्मलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी कैदेत ठेवले होते आणि ब्रह्मदेश काबीज केल्यावर ब्रह्मदेशाचा राजा थिबा याला रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आले होते, हा एक विलक्षण योगायोग आहे. ज्या वास्तूत ब्रह्मदेशाच्या राजा-राणीचे वास्तव्य होते, ती रेखीव वास्तू रत्नागिरीत समुद्राभिमुख एका छोट्या डोंगरावर अजूनही आहे. रत्नागिरीचे लोक तिला थिबा पॅलेस म्हणतात. वस्तुत: आपण थिबा पॅलेसची वास्तू आणि हा परिसर याचे सौंदर्यीकरण करायला पाहिजे होते. पण इतिहासाचे जतन करायची दृष्टीच आपल्याकडे नाही. अन्यथा, पुण्याचा शनिवारवाडा ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात जसा पुनर्निर्मित केला तसा आपण केला असता. 

इंग्लंडमध्ये असे किल्ले मी पाहिले आहेत. आज तंत्रज्ञान, संगणक, दृक्‌-श्राव्य माध्यम यांच्या साह्याने हे सहज शक्य आहे. ब्रह्मदेशावर राज्य करणाऱ्या थिबा राजाची शोकांतिका वाचण्यासाठी अमिताभ घोषची ‘द ग्लास पॅलेस’ ही कादंबरी वाचायला हवी. सहा महिने न्यूयॉर्क आणि सहा महिने गोव्यात राहणारे माझे मित्र, प्रथितयश इंग्रजी साहित्यिक अमिताभ घोष यांची ‘द ग्लास हाऊस’ ही कादंबरी म्हणजे ब्रह्मदेशाचा भूगोल आणि इतिहास यांचे विहंगम दर्शन घडवणारा कॅलिडोस्कोप आहे. त्यातही ह्या कादंबरीतील रत्नागिरीतील थिबा राजाचे वास्तव्य, त्याच्या तिन्ही मुलींचे येथील मराठी शाळेतील शिक्षण, एका मुलीचे सावंत नावाच्या मराठी गृहस्थावर प्रेम व तद्‌नंतर त्याच्याशी विवाह, थिबा राजाचा मृत्यू, राणी आणि तिन्ही मुलींचे ब्रह्मदेशात गमन, आपली पत्नी आता परत येणार नाही अशी सावंतची समजूत, पण काही महिन्यांनंतर त्याच्या पत्नीचे आगमन आणि त्यानंतर कोकणात कायम वास्तव्य- हे सगळे कथानक फारच वाचनीय आहे. 

सन 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर मोगल बादशहा बहादूरशहा याला सत्ताच्युत करून ब्रह्मदेशाची राजधानी रंगून येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. तिथेच त्याचे देहावसान झाले. रंगूनमधील मोगल लेन या रस्त्यावर जिथे बहादूरशहाचे वास्तव्य होते, तो वाडा अजूनही अस्तित्वात आहे. 

भारत आणि ब्रह्मदेश या दोन्ही देशांचे संबंध फार पुरातन आहेत. कलकत्त्याहून रंगूनला गंगेतून होड्या व पुढे समुद्रातून व्यापारी जहाजे जायची. अनेक मारवाडी व्यापारी रंगूनला स्थायिक झाले आहेत. ते तिथे जडजवाहिर, संगमवर, कपडे, लाकूड, हस्तिदंत यांच्या व्यापारात गुंतले आहेत. भारत आणि ब्रह्मदेश यांना जोडणारा बळकट दुवा आहे ब्रह्मदेशाच्या- ज्याला ब्रिटिश लोक बर्मा म्हणत आणि ज्याचे नामकरण आता म्यानमार असे झाले आहे, त्या देशाच्या- सर्वोच्च नेत्या आँग सान सू की! आँग सान सू कीचा जन्म 1945 मध्ये झाला. त्यांचे वडील आँग सान हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या बर्माचे डेप्युटी पंतप्रधान होते. सन 1947 मध्ये त्यांचा खून झाला. पुढे आँग सान सू कींची आई रवीन सू हिची 1960 मध्ये भारताची राजदूत म्हणून नवी दिल्लीत नेमणूक झाली. त्यामुळे तिच्याबरोबर 15 वर्षांच्या आँग सान सू की या भारतात राहायला आल्या आणि त्यांचे शिक्षण भारतात झाले. 

पुढे त्या ऑक्सफर्डला गेल्या. तिथे भूतानवर संशोधन करण्यात गुंतलेला मायकेल एरिस या ब्रिटिश विद्यार्थ्याशी त्यांचे प्रेम जुळले आणि यथावकाश आँग सान सू की यांनी त्याच्याशी विवाह केला. अलेक्झांडर व की असे दोन मुलगे त्यांना झाले. एरिस यांच्यासमवेत आँग सान सू की भूतानला अनेक वेळा गेल्या, पण काही वर्षांतच एरिस मरण पावले. त्यांच्या मृत्यूनंतर 1988 मध्ये म्हणजे वयाच्या 43 व्या वर्षी आँग सान सू की ब्रह्मदेशात परतल्या. ब्रह्मदेशात त्या वेळी यू ने व्हिन या हुकूमशहाची राजवट होती व मिलिटरी ज्युन्ता सर्व राज्य चालवत होते. आँग सान सू कीने या हुकूमशहाविरुद्ध शांततापूर्ण लढा सुरू केला. त्यांना 1989 मध्ये अटक झाली. आँग सान सू की पुढील 15 वर्षे मिलिटरी ज्युन्ताच्या अटकेत होत्या. केवळ त्यांना तुरुंगवासात न ठेवता त्यांच्या निवासस्थानात राहायची मुभा देऊन त्याभोवती सैन्याचा पहारा ठेवायची व्यवस्था करण्यात आली. आपल्या राहत्या घरातूनही आँग सान सू कीने आपला लढा चालूच ठेवला. 

सन 1991 चा शांततेचा नोबेल पुरस्कार आँग सान सू की यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना प्रसिद्धी मिळाली. आँग सान सू कीचे व्यक्तिमत्त्व चुंबकीय आहे. आज तिने वयाची सत्तर वर्षे उलटली असली, तरी तिच्या रूपात एक ‘ग्रेस’ आहे; एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. पिवळा हा आँग सान सू कीचा आवडता रंग असावा. पिवळ्या रंगाचा बर्मी वेश परिधान केल्यावर आँग सान सू की आपल्या केसांत एखादे निळे किंवा गुलाबी किंवा जांभळे फूल माळते. हे फूल न माळलेल्या आँग सान सू कीला कुणीच कधी पाहिले नाही. जसे राजबिंडे जवाहरलाल नेहरू आपल्या शेरवानीत गुलाबपुष्प खोवायचे, तशी आँग सान सू की हे ताजे टवटवीत फूल केसांत माळते. आँग सान सू कीच्या भव्य कपाळावर तिच्या बुद्धिमत्तेचे तेज दिसते. तिच्या ओठांवर सायसाखरी हास्य असते. हे हास्य आँग सान सू कीच्या अंतर्हृदयातून पाझरत-पाझरत तिच्या ओठांपर्यंत आलेले असते. आँग सान सू कीचे व्यक्तिमत्त्व असे राजस-राजबिंडे आहे. त्यामुळे कोट्यवधी बर्मी लोकांच्या हृदयगाभाऱ्यात तिची महालसेसारखी प्राणप्रतिष्ठा झाली आहे. 

भूतकाळात झालेल्या एका निवडणुकीत तिच्या एनएलपी पक्षाला बहुमत मिळूनही मिलिटरी ज्युन्ताने त्या पक्षाला सत्तेवर येऊन दिले नाही. आँग सान सू कीच्या एनएलपी पक्षाला 2015 च्या निवडणुकीत ब्रह्मदेशाच्या जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिले. आंतरराष्ट्रीय दबावामुळे या वेळीही निवडणूक ‘रिग’ करणे मिलिटरी ज्युन्ताला जमले नाही. ब्रह्मदेशच्या म्हणजे म्यानमारच्या राज्यघटनेप्रमाणे संसदेतील 25 टक्के जागा मिलिटरी ज्युन्ताला राखीव असतात. म्हणजे मिलिटरी ज्युन्ताही वेगळ्या नावाने निवडणुकीत भाग घेतो, त्यामुळे सत्तेवर येण्यासाठी सत्ताकांक्षी पक्षाला किमान 63 टक्के जागा मिळणे आवश्यक असते. आँग सान सू कीच्या एनएलपी पक्षाला त्याहून जास्त जागा मिळाल्या आणि तो पक्ष सत्ताधारी झाला. पण मिलिटरी ज्युन्ताने राज्यघटनेत आणखी एक बदल केला आहे- म्यानमारमधील ज्या व्यक्तीचा परदेशातील गृहस्थाशी विवाह झाला आहे, त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. 

भारतातील भाजप, एके काळची शरद पवारांची भूमिका (परदेशात जन्मलेल्या सोनिया गांधींनी भारताचे पंतप्रधान बनू नये) यापेक्षा ही घटनादुरुस्ती असमर्थनीय आहे आणि अर्थातच आँग सान सू कीला राष्ट्राध्यक्ष बनता येऊ नये म्हणून ही घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे एनएलपी पक्ष सत्तेवर आल्यावर आँग सान सू की म्यानम्यारच्या राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत. त्यांचे विश्वासू सहकारी हिन की हे राष्ट्राध्यक्ष बनले आणि आँग सान सू की यांना सुरुवातीला त्यांचे सल्लागार हे पद देण्यात आले. पण हे सत्तेचे पद नसल्याने तद्‌नंतर आँग सान सू की यांची म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. सन 2015 च्या ऐन निवडणुकीच्या काळात ब्रह्मदेशाला भेट देण्याची मला संधी मिळाली. आँग सान सू कीची राजकीय सभा पाहायची आणि त्यांचे भाषण ऐकायची माझी फार इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. म्यानम्यारमधील वातावरण दबलेले होते, पण दबलेल्या आवाजात एकदुसरा आँग सान सू कीला आपला पाठिंबा व्यक्त करत होता. जो-तो माझ्या शर्टवर एनएलपीच्या चिन्हाचा स्टीकर लावत होता. मी भारतातून आलो आहे, हे कळल्यावर त्यांचा चेहरा आनंदाने उजळत असे. भारत हा महात्मा गांधींचा देश होय आणि आँग सान सू की या बर्मी लोकांच्या ‘लेडी महात्मा गांधी’ होत. नरसिंह रावांच्या काळात परराष्ट्रमंत्री धोरणाच्या चाणक्य नीतीचा भाग म्हणून आणि चीनला चेकमेट करण्यासाठी अन्यथा आँग सान सू कीच्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या भारताने आपले रूळ बदलले आणि मिलिटरी ज्युन्ताशी आपले संबंध सुधारले, याचा अनेक बर्मी लोकांना राग होता. अटलबिहारी वाजपेयी आणि तद्‌नंतर मनमोहनसिंग यांनीसुद्धा ही भूमिका चालूच ठेवली होती. 

पण डॉ.मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानकीच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तो म्हणजे भारतातील कोलकाता, बांगलादेशातील ढाक्का, बर्मातील यांगून (रंगून) आणि थायलंडमधील बँकॉक यांना जोडणाऱ्या महामार्गाची आखणी! ह्या महामार्गाचे कामही आता सुरू झाले आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्य बर्मा, बांगलादेश (म्हणजे पूर्वीचा भारतच) ओलांडून भारताच्या सीमेपर्यंत पोचले होते. त्या वेळी या सैन्याने अनेक पूल बांधले होते. हे पूल अजून वापरात आहेत. या जागी नवे विस्तृत पूल बांधण्यात येतील. नवा महामार्ग झाला की, कोलकात्याहून काही तासांत आपली गाडी घेऊन रंगूनला पोहोचता येईल. (आता विमानाने पावणेतीन तास लागतात) एवढेच नव्हे, आपण पुढे थायलंड आणि पुढे फेरीने सिंगापूरपर्यंत पोचू शकू. ईशान्य भारताच्या प्रगतीलाही या महामार्गाची मदत होईल. 

ब्रह्मदेशाला फारसे भारतीय भेट देत नाहीत. ब्रह्मदेश फारच सुंदर देश आहे. तिथे जाणेही खर्चिक नाही. तेथील चलन- ज्याचा उच्चार चेट (घूरीं) असा होतो ते. 60 रुपयांना 1000 चेट असे उपलब्ध होते. त्यामुळे ब्रह्मदेशमधील लॉजिंग-बोर्डिंचा खर्च माफक असतो. कोलकात्याहून पावणेदोन तासांत यांगूनला पोचता येते. यांगून, बगान, मंडाले ही तीन शहरे आणि इनले लेक हे 200 स्क्वेअर किलोमीटरचे तळे अन्‌ त्यात वसलेले गाव यांना भेट दिल्याशिवाय ब्रह्मदेश पाहण्याचे सुख मिळणार नाही. यांगून शहराने आपले पुरातनत्व सांभाळून ठेवले आहे. या शहराने कात टाकली आहे, असे वाटत नाही. शहराच्या मधोमध छानसे तळे आहे, शहरात खूप हिरवीगार झाडे आहेत; पण यांगून शहराचा सर्वांत प्रियदर्शन असा भाग आहे तो शहरातील छोट्याशा डोंगरावर असलेल्या अनेक सोनेरी स्तुपांच्या दीपमाळेचा! 

एका सरत्या संध्याकाळी मी यांगून शहराच्या ह्या डोंगरावर गेलो आणि सुवर्णवर्खी पत्र्यांनी केलेले ते लावण्यमयी नयनमनोहर स्तूप पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. पश्चिमेकडून सूर्याची तांबूस-लाल किरणे त्या सुवर्ण स्तुपांच्या कळसांवर चमकत होती. ह्या डोंगरावर मधोमध एक भव्य स्तूप होता आणि लावणीतील मधील नर्तिका अधिक सुंदर दिसावी म्हणून बाजूच्या नर्तिका थोड्याशा कमी सुंदर असाव्यात तसे त्याच्या आजूबाजूला अनेक बुटके स्तूप होते. हे बुटके स्तूपही सुवर्णवर्खी पत्र्यांनी मढवलेले होते. या बुटक्या स्तुपांमुळे मधल्या भव्य स्तुपाची भव्यता अतिभव्य वाटत होती. स्तूप हा भरीव असतो, त्याला दार नसते. त्यामध्ये मूर्ती नसते. स्तुपाच्या प्रांगणात नसतो घंटानाद, नसतो कसला कोलाहल. 

यांगूनच्या त्या स्तुपांच्या परिसरात जसजशी तिन्हीसांज होत गेली तसतसे प्रकाश आणि अंधार यांच्या संमिश्रणाने झालेले अद्‌भुत रंग त्या स्तुपावर धुक्यासारखे पसरू लागले, त्या वेळी त्या आसमंतात एक अद्‌भुत शांतीही पसरू लागली. ही शांती प्रशांत होती, अथांग होती, सर्वदूर होती. निवळशंख होती, वस्त्रगाळ होती. ‘शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी’ असे सगळे ते वातावरण होते. स्तुपाभोवती जांभळा वेष परिधान केलेले बौद्ध भिक्खू शांतपणे एकेका स्तुपासमोर ध्यानस्थ होऊन भूमिस्पर्श मुद्रेत बसले होते. डोंगराच्या कडेला पिंपळाचे एक झाड होते, त्या झाडाच्या पानांची सळसळ- त्यांचा आवाज तेवढा त्या प्रशांत शांतीच्या वर्तुळांची त्रिज्या बनला होता. यांगून शहरात आम्ही दुसऱ्या दिवशी बुद्धाच्या महाकाय निद्रिस्त मूर्तीचे दर्शन घेतले. अशा निद्रिस्त बुद्धाच्या मूर्ती मी नेपाळमध्ये, श्रीलंकेत, थायलंडमध्ये पाहिल्या आहेत. पण यांगूनमध्ये पाहिलेल्या निद्रिस्त बुद्धमूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. या बुद्धमूर्तीची पावले रंगवलेली आहेत. विशिष्ट चिन्हांनी चित्रांकित करण्यात आली आहेत. 

दुपारी आम्ही खास बर्मी पद्धतीचे जेवण घेतले. बर्मी खाव से हा फारच रुचकर पदार्थ आहे. गव्हाचे न्यूडल्स नारळाच्या रसांत त्यावर शेंगदाण्याचा कीस, मिरच्या आणि त्या मिश्रणात विविध भाज्या, चिकन घालून केलेला तो पदार्थ हे बर्मी पाककलेचे खास वैशिष्ट्य आहे. बर्मी जेवणात भात, खारे मासे, चिकन, विविध भाज्या यांचा समावेश असतो. ब्रह्मदेशाचे लोक हे हसतमुख, मनमोकळे व दिलदार असल्यामुळे ब्रह्मदेशाच्या प्रवासात सगळीकडे ‘ॲट होम’ असल्याची भावना होते. बगान हे शहर म्हणायचे की काय, ह्याचा मी विचार करतो. बगानला शहर म्हणणे म्हणजे बगानचा आणि शहर या संकल्पनेचाही अपमान आहे. 

बगान हे शहर होऊ पाहत असलेले रानगाव आहे, खेडेगाव आहे. या खेडेगावात जागोजागी स्तूप ‘उगवलेले’ आहेत. अक्षरश: अळ्यांप्रमाणे ह्या गावात जागोजागी स्तूप आहेत. एके काळी बगानमध्ये दहा हजार स्तूप होते, आजमितीला दोन हजार स्तूप आहेत. हे स्तूप आपल्या पूर्वजांच्या स्मृती म्हणून बांधण्यात आले. बगानमध्ये एक छान व्यवस्था आहे. सकाळी गाडीत बसून बगानमधील मोठमोठे स्तूप पाहायचे आणि दुपारी बैलगाडीत बसून शेतातून, मातीच्या रस्त्यावरून संध्याकाळपर्यंत बगानमधील शेतांमधील, रानांमधील छोटे छोटे स्तूप पाहायचे. बगानच्या भोवतीने आयेयावाडी नदी वाहते, त्यामुळे बगानला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. बगानहून आम्ही मंडालेला गेलो. मंडालेच्या अमरपुरा नदीवर दोन किलोमीटर लांबीचा लाकडी पूल आहे. पहाटे आम्ही ह्या पुलावरून चालताना प्रसन्न सूर्योदयाच्या किरणांनी सुस्नात झालेल्या अमरपुरा नदीच्या पात्राचे दर्शन घेतले. येथील राजा ध्यान करायला पलीकडील गावात जायचा, त्याच्या सोईसाठी लोकांनी श्रमदानाने हा पूल बांधला, अशी दंतकथा आहे. 

ब्रह्मदेशाचे इनले लेक हे 22 किलोमीटर लांब आणि 11 किलोमीटर रुंद आहे. हे तळे व्हर्जिन आहे. फार पहाटे उठून ह्या जलसफरीला निघावे लागते. मोटारबोट सुसाट वेगाने जाते. तळ्यात काही गावे वसली आहेत. इथे आपले पाय नांगरून घरे वसली आहेत. शाळा आहे, हॉस्पिटल आहे, बुद्ध मंदिर आहे, मार्केट आहे. सारे-सारे तळ्यातच आहे. एवढेच काय, तळ्यात बांबूचे उभे-आडवे पट्टे घालून त्यावर माती पसरून तिथे शेतीही केली आहे! तळ्यातील शेतीत टोमॅटो, कोबी-फ्लॉवर, ढब्बू मिरची आणि सर्व प्रकारच्या भाज्या पिकवण्यात येतात. ही भाजी गावातल्या माणसांना तर पुरतेच, पण गावाबाहेरही नेऊन विकली जाते. इनले लेकमध्ये काही हॉटेल्सही आहेत. इनले लेकमध्ये आम्ही पोचलो, तेव्हा स्थानिक लोकांचा उत्सवाचा दिवस होता. गोव्यात कर्निव्हलची परेड असते, तशी तळ्यातून सजवलेल्या असंख्य होड्यांची परेड आम्हाला पाहायला मिळाली. प्रत्येक होडीवर नटून-थटून पुरुषमंडळी बसली होती आणि वाद्यवृंद घेऊन स्थानिक गीते गात होते व काही जण होडीतच नाचत होते. काही जण वेगात होडी हाकत होते. ते सारे दृश्यच नयनमनोहर होते. 

इनले लेक हे व्हेनिसपेक्षा अधिक सुंदर आहे. त्याचे व्हावे तसे मार्केटिंग झाले नाही. खरे म्हणजे बर्माचेच व्हावे तसे मार्केटिंग झाले नाही, एवढा हा देश सुंदर आहे. ज्याला शक्य असेल त्याने माफक खर्चात भेट देण्याजोग्या आपल्या शेजारी मित्र देशाला भेट द्यायला पाहिजे. भारताने ब्रह्मदेशच्या राष्ट्राध्यक्षांना आणि आँग सान सू कींना भारतात यायचे निमंत्रण अजून दिले नाही. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी तरी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले पाहिजे. भारतीय पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी ब्रह्मदेशाला भेट दिली पाहिजे. आँग सान सू कीचा पक्ष सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. लोकांचा थोडासा भ्रमनिरास झाला आहे. नेत्रदीपक कामगिरी त्यांनी केलेली दिसत नाही. अर्थात, मिलिटरी ज्युन्ताने केलेला गोंधळ निस्तरून देशाची घडी बसवायला 1000 दिवस तरी पाहिजेत, असे आँग सान सू कीचे म्हणणे आहे आणि त्यात तथ्यही असेल. 

पण एका बाबतीत सान सू की यांनी निराशा केली आहे. ब्रह्मदेशात रोहिंग्य नावाची अल्पसंख्य मुस्लिम जमात आहे. मागील निवडणुकीत या मुस्लिम अल्पसंख्याकांविरुद्ध ब्रह्मदेशातील बौद्ध भिक्खूंनी भारतातील संघ परिवारालाही लाज वाटेल एवढ्या स्तराला जाऊन मोहीम उघडली होती. आँग सान सू की या निवडणुकीत रोहिंग्य अल्पसंख्य मुस्लिमांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि सत्तेवर आल्यावरही या अल्पसंख्याकांना दिलासा देणारी मोठी कृती त्यांनी केली नाही. ही गोष्ट आँग सान सू की यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला शोभादायक वाटत नाही. तेवढी एक गोष्ट सोडली तर आँग सान सू कीचे व्यक्तिमत्त्व उत्तुंगच आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात त्या ब्रह्मदेशाला प्रगतिपथावर नेतील, त्यांच्या प्रयत्नांत भारतवर्ष त्यांना साथ देईल, अशी आशा आपण करू या. 

Tags: दत्ता दामोदर नायक ब्रह्मदेश आँग सान सू की aung san suu kyi brahmadesh datta damodar nayak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके