डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक हेदेखील अतिशय सुरेख चित्र लूवरच्या म्युझियममध्ये आहे. याशिवाय व्हर्जिन मेरीची, बाल ख्रिस्ताची, क्रूसावर जाणाऱ्या ख्रिस्ताची, बायबलमधील अनेक प्रसंगांची, ग्रीक पुराणकथांची, रोमन इतिहासपुरुषांची चित्रे या म्युझियममध्ये आहेत. यापैकी अनेक स्त्री-पुरुष पूर्ण नग्नावस्थेत आहेत, पण ही नग्नावस्था प्रसंगावशात आलेली असल्यामुळे त्यावर अश्लीलतेची छाप पडत नाही. या म्युझियममध्ये असलेल्या अनेक शिल्पांच्या डोळ्यांत, ओठांत, सर्वांगात जीव ओतून त्यांना शिल्पकारांनी सजीव केले आहे. काही इजिप्शियन शिल्पे भग्नावस्थेत आहेत, पण त्यांत पुरातन इतिहास गोठलेला आहे. या शिल्पांत कथा, लोककथा, दंतकथा, मिथककथा दडलेल्या आहेत. हा सगळा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेज आहे.

कोणालाही आपले नाव चुकीचे उच्चारलेले आवडत नाही, पॅरिसचेही तसेच आहे. पॅरिस शहराला आपल्याला पॅरिस म्हटलेले आवडत नाही. पॅरिसला पारी म्हटले पाहिजे. पॅरिसमध्ये- किंबहुना, फ्रान्समध्ये- कोणालाही इंग्रजीतून बोललेलेही आवडत नाही. फ्रेंच लोकांचा आपल्या भाषेबद्दलचा अभिमान अतिशय कडवा आहे. मी काही वर्षांपूर्वी कॅनडात गेलो होतो. तिथे मॉन्ट्रियल शहरापासून जवळच क्युबेक नावाचा प्रांत आहे. तिथे फ्रेंच लोकांचे राज्य होते. अजूनही तेथील लोक फ्रेंच भाषाच बोलतात. क्युबेक गावात फिरताना तेथील एक गृहस्थ मला म्हणाले, ‘‘येथील 99 टक्के लोक फ्रेंच बोलतात, उरलेले 1 टक्का लोक मुके आहेत.’’

पॅरिस शहर दिवसा पाहू नये, ते रात्रीच पाहावे. कोकणी भाषेत ‘आमोर’ नावाचा शब्द आहे. आमोर म्हणजे ‘तिन्हीसांजा’. आमोर शब्दांतील ‘मेर’ ह्या शब्दाचा अर्थ बांध. त्यामुळे ‘आमोरी’च्या एका बाजूला दिवस आणि दुसऱ्या बाजूला रात्र असा अर्थ त्या शब्दात गर्भित असावा. पॅरिस शहराची सैर करायला आमोरीला निघावे, कारण पॅरिस हे सूर्यफूल नाही. ते प्राजक्ताचे फूलही नाही. पॅरिस ही रातराणी आहे, ती निशिगंधा आहे, रात्रीच तिच्या वासाचा घमघम सगळीकडे दरवळतो.

पॅरिस ही गणिका आहे, वारयोषिता आहे, की अभिसारिका आहे- असा मला प्रश्न पडतो. पॅरिसच्या डोळ्यांत प्रियकराला भेटायला आतूर झालेल्या वसंतसेनेचे, राधेचे, उर्वशीचे कामातूर भाव मला दिसतात. तिन्हीसांजेपासून मध्यरात्रीपर्यंत पॅरिस शहरात मुक्त मोकळेपणाने स्वच्छंद फिरताना अचानक माझ्या कानात मृच्छकटिक नाटकावरून काढलेल्या उत्सव सिनेमातील डॉ.वसंत देवांच्या गीताच्या ओळी गुंजारव करू लागल्या- ‘मन क्यूँ बहका रे आधी रात कोऽ बेला महेका रे महेका आधी रातकोऽ’

पॅरिस मोगऱ्याच्या (बहका) फुलासारखे सोज्वळ आहे, तसे उंची मद्यासारखे उत्तेजक आणि मादकही आहे. पारी संयमित आहे, तसे उन्मादक आहे. मर्यादाशील आहे, तसे विमुक्त आहे. पॅरिस म्हणजे फ्रेंच समाजाचं मॉझायक आहे. आरसाच आहे.

पॅरिसची मैफिल येथील लिडोमध्ये- नाइट क्लबमध्ये पाहावी. ध्वनी आणि प्रकाश, नर्तन आणि वादन, गीत आणि संगीत, आभूषणे आणि विभूषणे यांच्या संमिश्रणाने कमनीय शहराच्या रमणी इथे आपली नृत्ये सादर करतात. नृत्य करता-करता त्या एकेक वस्त्र काढत विवस्त्र होतात. फ्रेंच समाजाने विवस्त्रतेला, नग्नतेला अश्लील मानले नाही. नग्नता हेदेखील शरीराचे सेंद्रिय वस्त्रच आहे असे फ्रेंच समाज मानत असावा! शेवटी श्लील-अश्लीलता ज्याच्या-त्याच्या डोळ्यांत असते, मनात असते, मानसिकतेत असते!

लिडोमधून उत्तर मध्यरात्री- पहाट होण्यापूर्वी शॉ झालीझेकडे यावे. शॉ-झालीझे हा पॅरिस शहराच्या कपाळावरचा झगमगीत भांगटिळा आहे. पॅरिसमधल्या या प्रमुख रस्त्याच्या मधोमध विजयस्तंभ आहे. तो दिव्यांच्या आराशीने सुवर्णवर्खी रंगात माखला आहे. चारी बाजूला दिव्यांचा अक्षरश: लखलखाट आहे. ‘आपण गंधर्वनगरीत तर नाही ना?’ असा भास-आभास व्हावा, असे ते दृश्य आहे. शॉ-झालीझेचा विजयस्तंभ हे विजयाचे प्रतीक आहे, तसेच तिथे हुतात्म्यांचे स्मारक आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मन सैनिकांनी पॅरिस शहरावर कब्जा मिळवला, तेव्हा फ्रान्सचे तत्कालीन प्रधानमंत्री द गॉल यांनी लंडनला पलायन केले. तिथून फ्रेंच नागरिकांना उद्देशून त्यांनी केलेल्या भाषणाची कॅसेट इथे ऐकायला मिळते. ‘फ्रान्स इज नॉट अलोन... शी इज नॉट अलोन’ असे त्यांचे उत्साहवर्धक शब्द होते. ‘इज पॅरिस बर्निंग?’ या सिनेमात आपल्याला हा इतिहास पाहायला मिळतो.

पहाट व्हायला अजून तासभर आहे. तेवढ्यात आपल्याला पॅरिसमधले नॉत्र दाम कॅथेड्रल आणि आयफेल टॉवर पाहायचा आहे. पॅरिस शहराच्या मधोमध सेन नदीचे पात्र आहे. सेन नदीमधील एका छोट्या बेटावर नॉत्र दाम कॅथेड्रल आहे. या कॅथेड्रलचे वैशिष्ट्य हे की, त्रिमितीत असलेली ही वास्तू दुरून पाहिली की द्विमितीतच आहे असे वाटते. चित्रांत द्विमितीतल्या वास्तू त्रिमितींत आहेत, असा भास फिबोनासी सिक्वेन्सचा उपयोग करून चित्रकार करतात. इथे वास्तुशिल्पज्ञाने उलट त्रिमितींतील वास्तूच्या दर्शनी भागाला द्विमिती रूप दिल्याचे पाहून आपण अचंबित होतो.

शेवटी आपले पाय आयफेल टॉवरकडे वळतात. पॅरिस नगरीत असलेला आयफेल टॉवर हा अभियांत्रिकीतला चमत्कारच आहे. मानवी बुद्धिमत्तेचा, सामूहिक पुरुषार्थाचा, सामाजिक ऊर्जेचा आणि औद्योगिक प्रतिभेचा तो दृश्यावतारच आहे. मुळात गुस्ताव आयफेलने हा टॉवर स्पेनमधल्या बार्सिलोना शहरासाठी केलेला होता. त्या शहराने नाकारल्यावर गुस्ताव आयफेलने ह्या टॉवरचा प्रस्ताव पॅरिस शहरापुढे ठेवला. फ्रेंच क्रांतीच्या शताब्दी सोहळ्यानिमित्ताने हा टॉवर तात्पुरता पॅरिस शहरात उभारावा व मग मोडून टाकावा, असे ठरले. आयफेल टॉवर बांधून झाल्यावर अनेकांना तो विद्रूप वाटला. आयफेल टॉवर न आवडणारा एक लेखक आयफेल टॉवरमधील रेस्टॉरंटमध्ये दररोज जाऊन कॉफी पीत लेखन करत असे. कारण तिथून आयफेल टॉवर दिसत नाही, असे त्याचे म्हणणे होते. पण कालांतराने आयफेल टॉवरचे सौंदर्य लोकांना कळून चुकले. मध्यरात्र आणि पहाट यांच्या सीमारेषेवरील अंधारमिश्रित प्रकाशात किंवा प्रकाशमिश्रित अंधारात दिव्यांच्या पालवीने सळसळणारे ते आयफेल टॉवरचे प्रचंड झाड अतिशय सुंदर दिसते.

पॅरिसमध्ये मी 1983 मध्ये पहिल्या वेळी आलो होतो. त्यानंतर 1990 च्या दशकात मी पॅरिसला दुसऱ्यांदा भेट दिली होती. आता 25 वर्षांनंतर पॅरिसला तिसऱ्यांदा येत होतो. या भेटीत मला पॅरिस शहरांतला लूवर म्युझियम आरामात पाहायचा होता. मागच्या दोन भेटींत तो घाईघाईत पाहिला होता आणि त्या वेळी माझ्या कलाविषयक संवेदना प्रगल्भ झाल्या नव्हत्या. लूवर म्युझियम हा पॅरिसचा सांस्कृतिक मानदंड आहे. एका प्रशस्त मध्ययुगीन किल्ल्यात- ज्याचा पुढे राजवाडा बनवला गेला- लूवर म्युझियम स्थापला आहे. या म्युझियमच्या प्रवेशद्वारावर अमेरिकास्थित चिनी वास्तुशिल्पज्ञ आय.एम.पेयी याने धातू व ॲक्रेलिक शीट्‌स यांच्या साह्याने केलेला पारदर्शक पिरॅमिड हे म्युझियमचे मानचिन्ह आणि आकर्षण झाले आहे.

या म्युझियममध्ये तीन अमूल्य कलाकृती आहेत. यात ग्रीक, रोमन, इजिप्तशियन, इस्लामिक, आफ्रिकन, भारतीय व अन्य आशियाई शिल्पे, चित्रे, नाणी, हस्तलिखिते यांचा समावेश आहे. या म्युझियममधील सुप्रसिद्ध कलाकृती म्हणजे लिओनार्दो द विन्सी यांचे मोनालिसा हे विख्यात चित्र. मोनालिसा हे जगातील आजवरचे सर्वांगसुंदर चित्र आहे, असे चित्ररसिक व समीक्षक मानतात. मोनालिसाच्या मुग्ध व गूढ हास्यामुळे हे चित्र वाखाणले गेले आहे. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे- ते पाहताना तुम्ही डावीकडून उजवीकडे  वळता, तेव्हा मोनालिसादेखील आपली दृष्टी डावीकडून तुमच्या चालीप्रमाणे उजवीकडे वळवते. पाच शतकांवर मात करत मोनालिसा आपल्याशी बोलते, असा आपल्याला आजही भास होतो- एवढे हे चित्र जिवंत आहे!

मोनालिसाच्या हास्याचे गूढ जसे अनेकांना उलगडले नाही तसेच मोनालिसा कोण होती, हेदेखील कोडेच आहे. काहींना मोनालिसा हे लिओनार्दो द विन्सीने स्त्रीरूपातले आपले काढलेले सेल्फ पोट्रेट वाटते, तर बहुतेकांचा असा अंदाज आहे की, ती फ्रान्सिस्को दी गिओकोन्डाची पत्नी असावी. पोट्रेट काढताना मोनालिसा गरोदर होती का, असादेखील प्रश्न समीक्षकांना पडतो; पण चर्चेनंतर त्याचे उत्तर नकारार्थी मिळते.

नेपोलियन बोनापार्टचा राज्याभिषेक हेदेखील अतिशय सुरेख चित्र लूवरच्या म्युझियममध्ये आहे. याशिवाय व्हर्जिन मेरीची, बाल ख्रिस्ताची, क्रूसावर जाणाऱ्या ख्रिस्ताची, बायबलमधील अनेक प्रसंगांची, ग्रीक पुराणकथांची, रोमन इतिहासपुरुषांची चित्रे या म्युझियममध्ये आहेत. यापैकी अनेक स्त्री-पुरुष पूर्ण नग्नावस्थेत आहेत, पण ही नग्नावस्था प्रसंगावशात आलेली असल्यामुळे त्यावर अश्लीलतेची छाप पडत नाही. या म्युझियममध्ये असलेल्या अनेक शिल्पांच्या डोळ्यांत, ओठांत, सर्वांगात जीव ओतून त्यांना शिल्पकारांनी सजीव केले आहे. काही इजिप्शियन शिल्पे भग्नावस्थेत आहेत, पण त्यांत पुरातन इतिहास गोठलेला आहे. या शिल्पांत कथा, लोककथा, दंतकथा, मिथककथा दडलेल्या आहेत. हा सगळा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेज आहे. तो पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. हे म्युझियम पाहता-पाहता दिवस पुरत नाही.

पॅरिसमधले दुसरे म्युझियम- म्युझे दि ओर्से हे एका जुन्या रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करून तिथे स्थापन केलेले आहे. या म्युझियममध्ये रेल्वे स्टेशनमधील जुने घड्याळ पाहायला मिळते. मोने, व्हॅन गो, पिसारो या चित्रकारांची चित्रेही पाहायला मिळतात. दुपारच्या निरव शांत वेळी आम्ही पॅरिसच्या अंतर्भागातील एका स्मशानाला भेट दिली. हेमंत ऋतूला नुकतीच सुरुवात झाली होती. सिमेट्रीतल्या थोड्याच वृक्षांची पाने हिरवी होती. बहुतेक वृक्षांची पाने नारिंगी-लालसर झाली होती. काही वृक्षांची पाने पिवळी झाली होती. बरीच पिवळी पाने गळून सिमेट्रीतील थडग्यांवर पडली होती. त्या पिवळ्या पानांची रांगोळी थडग्यांभोवती तयार झाली होती. स्मशानात नितांत शांतता होती. ‘प्रेतात्मे’ शांत झोपले होते. वृक्षांच्या पानांची सळसळही थांबली होती. वारा वाहत नव्हता. सावल्यांनी उजेडाला अडवले होते. काही थडगी फुलांनी सुशोभित केलेली होती. काही थडगी अनाथ होती, भग्न होती. त्यांवर वेली चढल्या होत्या.

इतक्यात मला शाळकरी मुलांचा एक ग्रुप सिमेट्रीत रांगेने फिरताना दिसला. मग माझ्या लक्षात आले की- अनेक प्रथितयश लेखक, कलाकारांची थडगी या सिमेट्रीत होती. ती दाखवण्यासाठी व त्या लेखक- कलाकारांची माहिती देण्यासाठी ही शाळकरी मुलांची भेट आहे.

पॅरिसच्या प्रवासात मी मार्गारेट ॲटवूडचे ‘ऑन रायटर्स ॲन्ड रायटिंग’ हे पुस्तक वाचत होतो. त्यात ती म्हणते....

'But dead people persist in the minds of the living. There have been very few human societies in which the dead are thought to vanish completely once they are dead. Sometimes there is a taboo against mentioning them openly, but this doesn’t mean they are gone.'

मृत माणसांच्या स्मृती मानवी समाजात चिरंतन राहतात. काही वेळा भुता-खेतांच्या रूपाने त्या अंधश्रद्धा बनतात, तर काही वेळा आठवणीच्या रूपाने त्या आपले साहित्य समृद्ध करतात. स्मशानातल्या त्या दुपारच्या भेटीनंतर मी त्या रात्री एक भूतकथा लिहिली.

मी पूर्णपणे नास्तिक, अधार्मिक आणि कोणतीच अंधश्रद्धा न मानणारा असल्यामुळे भुता- खेतांवर अर्थातच माझा विश्वास नाही. पण ललित लेखक या नात्याने वाचकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाने भूतकथा लिहाव्यात का, असा मला प्रश्न पडला. अर्थात अशी कथा प्रसिद्ध झाली तर ‘लेखकाचा भुतांवर विश्वास नाही,’ अशी तळटीप घातली पाहिजे, अशा मताचा मी आहे. काही काळापूर्वी मी शंकर, राम व कृष्ण या हिंदू देवांवर ललित लेख लिहिले होते. मार्गारेट ॲटवूडचे पुस्तक वाचताना ललित लेखकाच्या स्वातंत्र्यापुढील लक्ष्मणरेषा कुठल्या, हा प्रश्न मला सतावू लागला.

लेखक किंवा कलाकार आणि त्याचे वैयक्तिक किंवा सामाजिक चारित्र्य याचा त्याच्या साहित्याचे किंवा कलेचे मूल्यमापन करताना विचार करावा का, हादेखील प्रश्नच आहे. विशेषत: साहित्यिकाच्या बाबतीत हा प्रश्न कळीचा आहे; कारण कलाकार आपल्या कलेतून नैतिक भूमिका घेतोच असे नाही, उलट साहित्यिक आपल्या साहित्यातून एक नैतिक विचार मांडत असतात.

आता लवकरच हेमंत ऋतू संपणार होता आणि शिशिर ऋतू सुरू होणार होता. पानगळ लागली की, सगळीकडे झाडे-वृक्ष निष्पर्ण होणार होते. ह्या निष्पर्णतेतही एक वेगळे सौंदर्य आहे. सगळ्या झाडांत ख्रिसमस ट्री हिवाळ्यात निष्पर्ण होत नाही, म्हणूनच त्याला ख्रिसमस ट्रीचा मान दिला आहे. अशा थंडीच्या दिवसांत गरम, कडक, थोडीशी कडवट कॉफी पिण्याची वेगळीच मजा असते. युरोपीय देशांना चहापेक्षा कॉफीचे व्यसन आहे. पॅरिसमध्ये कॅफेज आणि ब्रिस्ट्रोज यांची रेलचेल आहे. या कॅफेज आणि ब्रिस्ट्रोज ओपन-एअर म्हणजेच फूटपाथवर टेबल-खुर्च्या घालून थाटलेल्या असतात. युरोपमध्ये रस्त्यावरील किंवा फूटपाथवरील अतिक्रमण अथवा एनक्रोचमेंट असल्या मूर्ख कल्पना नाहीत. त्यामुळे लोक आरामात उघड्यावर बसून कॉफीचे घुटके घेतात.

कॉफीचे किती प्रकार? एक्स्प्रेसो, कॅफे लाते, कॅप्युचिनो, नेसकॅफे, कोल्ड कॉफी.... स्टार बक कॅफेच्या तर जागोजाग शाखा आहेत.

तिथे एक चांगली पद्धत आहे. तुम्ही कॉफी घ्यायची, पैसे द्यायचे आणि गरजू माणसाला कॉफी पिण्यासाठी आगाऊ पैसे भरायचे. हिवाळ्यात मग गरजू लोक अशा चॅरिटीतून दिलेल्या पैशांची कॉफी पितात. तिला सस्पेंडेड कॉफी म्हणतात. अरेबियन देशांतही अशीच वेगळी पद्धत आहे. तिथे सुपर मार्केटमध्ये एक भला मोठा फ्रिज असतो. तिथे लोक गरजू लोकांसाठी खाद्य पदार्थ विकत घेऊन ठेवतात. गरजू लोक आपल्या गरजेप्रमाणे तिथून ते खाद्य पदार्थ उचलतात.

पॅरिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेस्टॉरंट्‌स आहेत. इथे वर्ल्ड कुझीन चाखायला मिळते. इथे एकाच्या डोक्यांतून विचित्र कल्पना निघाली. त्याने ‘नो फूड रेस्टॉरंट’ सुरू केले. या रेस्टॉरंटमध्ये तो सर्व प्रकारची शीत पेये व मद्ये देऊ लागला. खाद्य पदार्थ तुम्ही घरून आणा किंवा अन्य रेस्टॉरंटमधून मागवा. त्याचा नफा तो शीत पेये व मद्ये यांची विक्री करून मिळवे. पॅरिस असे भन्नाट शहर आहे.

पॅरिसमध्ये मॉन्त मार्त नावाची टेकडी आहे. एका संध्याकाळी आम्ही त्या टेकडीवर गेलो. त्या टेकडीवर शुभ्रवस्त्रावृता अशी आभाळसन्मुख चर्चची सुबक, सुरेख वास्तू आहे. चर्चकडून थोडे उताराकडे गेले की, एक लहानसे पठार लागते. या पठारावर छोटी-छोटी सोव्हिनीरची दुकाने, कॅफेज, रेस्टॉरंट्‌स तर आहेतच; पण चित्रकार आणि संगीतकार तिन्हीसांजेला इथे जमतात. चित्रकार आपली रंगीबेरंगी चित्रे मांडून त्यांची विक्री करतात. काही चित्रकार पर्यटकांना समोर बसवून त्यांची स्केचेस काढतात. गिटारिस्ट गिटार वाजवीत वेगळी वातावरणनिर्मिती करतात. पर्यटक, स्थानिक लोक आणि कॉलेजमधले तरुण-तरुणी वाईनचा आस्वाद घेत खाद्य पदार्थांवर आरामात ताव मारतात. मध्यरात्र उलटून गेली तरी कोणी तिथून पाय काढत नाही. मॉन्त मार्तची टेकडी हेच एक सजीव, सेंद्रिय रंगीत चित्र होऊन जाते आणि आपण त्या चित्राचा भाग होऊन जातो. पॅरिस ही शॉपिंगची पंढरी आहे. फॅशनचे फाऊंटनहेड आहे.

लुई व्हिटोन, राल्फ लोरेन, चॅनल, ख्रिश्चन डिओर असे जगातील उत्तमोत्तम ब्रँड्‌सचे इथे एक्सक्ल्युझिव्ह स्टोअर्स आहेत. राफायल हा हायपर स्टोअर तर अपमार्केट ब्रॅड्‌ससाठी प्रसिद्ध आहे. पॅरिसमध्ये शॉपिंग करायला भरपूर पैसे व खूप वेळ पाहिजे. इथे पुस्तकांची अनेक दुकाने आहेत, पण त्यांतील बहुतेक पुस्तके फ्रेंच भाषेतील असल्यामुळे फारशी खरेदी करता येत नाही.

फ्रेंच भाषेला उदारमतवादी, अस्तित्ववादी, स्त्रीवादी लेखकांची परंपरा आहे. या लेखकांत वॉल्टेर, ज्याँ पॉल सार्त्र, सिमॉन  दी बियोर, अल्बर्ट कामू, व्हिक्टर ह्युगो यांचा समावेश होतो. सिमॉन दी बियोरच्या ‘द सेकंड सेक्स’ ह्या पुस्तकाने महिलांच्या चळवळीला चालना मिळाली, तर वॉल्टेरसारख्या लेखकांची फ्रेंच राज्यक्रांती घडवण्यातील भूमिका महत्त्वाची होती.

फ्रेंच राज्यक्रांतीतून फ्रान्सने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांची देणगी जगाला दिली आहे. फ्रेंच समाज प्रागतिक, प्रगमनशील व विज्ञाननिष्ठ आहे. मादाम मेरी क्युरी, तिचे पती पीयर क्युरी आणि त्यांची कन्या आयरिन क्युरी या तिघांनाही विज्ञानाचे नोबेल मिळालेले आहे. त्यापैकी मादाम मेरी क्युरीला ते दोनदा मिळाले आहे. फ्रान्समधील एकूण वातावरण वैज्ञानिक संशोधन, साहित्यिक साधना व कलेतील आराधना करण्यास पोषक आहे. त्यातही पॅरिस हे कलाकार, लेखक, वैज्ञानिक यांना जगभरातून आकर्षित करणारे लोहचुंबक आहे.

समाजकारण, राजकारण, पर्यावरण, स्थलांतर, धर्म, कामोपभोग, अर्थकारण या सर्व गोष्टीकडे पाहायची फ्रेंच समाजाची एक वेगळी दृष्टी आहे. फ्रेंच समाजातील निधर्मी तत्त्व अत्युच्च आहे. फ्रेंच शाळांत कुठल्याही धार्मिक शिक्षणास बंदी आहे. रस्त्यावरून धार्मिक मिरवणुका काढता येत नाहीत. मुस्लिम स्त्रियांना फ्रान्समध्ये बुरखा घालता येत नाही. शिखांना फेटा बांधता येत नाही. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रांत अनेकदा निधर्मी तत्त्वाचा अधिक्षेप होतो. त्याचे दुष्परिणाम आंतकवादाच्या रूपाने या समाजाने आणि मुख्यत्वे पॅरिस शहराने सोसले आहेत.

‘भारतावर ब्रिटिशांऐवजी फ्रेंचांनी दीडशे वर्षे राज्य केले असते तर?’ असा प्रश्न पॅरिसच्या भेटीत माझ्या मनात आला आणि एकदम व्हिएतनामचे नेते हो चि मिन्हचे उद्‌गार मला आठवले. हो चि मिन्ह म्हणाले होते, ‘भारतात ब्रिटिशांऐवजी फ्रेंचांचे राज्य असते, तर महात्मा गांधींना आपली अहिंसक चळवळ एका आठवड्यात आवरावी लागली असती!’ फ्रेंच प्रशासन हे फार कडवे आणि क्रूर होऊ शकते, याला अल्जेरिया, व्हिएतनाम येथील ऐतिहासिक दाखले आहेत.

आज स्थलांतरितांच्या बाबतीत फ्रेंच समाज उदार आहे. फ्रान्समध्ये बेकारभत्ता नाही. पण एखाद्याला तीन महिन्यांची का होईना नोकरी मिळाली आणि मग त्याची नोकरी गेली, तर त्याला पुढील एक वर्षभर त्याच्या पगाराएवढा बेकारभत्ता आणि त्यापुढील वर्ष 50 टक्के पगाराएवढा भत्ता मिळतो. पॅरिस शहरात अनेक स्थलांतरित आहेत, त्यापैकी काही भिकारी बनले आहेत. स्थलांतरितांमुळे आतंकवादी हल्ले झाले, असे आरोप होत आहेत. त्यामुळे स्थलांतराच्या धोरणाबद्दल आता उलट- सुलट चर्चा चालू आहे. पॅरिस शहरात नागरिकत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची आंतरिक भावना आहे.

पॅरिसमधील एका थिएटरवर आतंकवादी हल्ला झाला तेव्हा त्याचे दर्शन झाले. थिएटरमधील नागरिक फ्रेंच राष्ट्रगीत म्हणत प्रवेशद्वाराकडे कोणतीही झुंबड न करता रांगेत बाहेर पडले. पॅरिसमधल्या सर्व टॅक्सी ड्रायव्हरनी आपल्या टॅक्सीचे मीटर्स उत्स्फूर्तपणे बंद केले व सर्व नागरिकांना घरी मोफत पोचवले. हे सिव्हिल स्पिरिट पॅरिस शहरात जागोजागी पाहायला मिळते. पादचाऱ्यांना इथे खास मान आहे. झेब्रा क्रॉसिंगवर पाय ठेवलेल्या पादचाऱ्यांना वाहनचालक सिग्नल पडला तरी मानाने जाऊ देतात. फुटबॉल सामन्यावेळी स्टेडियममधील पोलीस प्रेक्षागृहाकडे पाहत उभे असतात. गोल झाला तरी ते मैदानाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, हे दुर्मिळ चित्र पॅरिसमध्ये दिसते.

सेक्ससंबंधी फ्रेंच समाजात एक मुक्त, निरामय दृष्टी आहे. तहान, भूक, झोप याप्रमाणे ती शरीराची प्राथमिक गरज आहे, असे फ्रेंच समाज मानतो. त्यामुळे कामोपभोगावर मध्ययुगोत्तर भारतीय समाजाने जशी बंधने व मर्यादा घातल्या, तशा फ्रेंच समाजाने घातल्या नाहीत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्या सीमारेषा कुठे संपतात, हे फ्रेंच समाज जाणतो. त्यामुळे त्यामध्ये लक्ष्मणरेषा काढायची गरज त्याला वाटली नाही. साहित्य, संगीत, शिल्पकला, नृत्य, खेळ, चित्रपट, विज्ञान सर्वच क्षेत्रांत फ्रेंच समाज धडाडीने पुढे गेला आहे. भव्यतेचे, दिव्यतेचे फ्रेंच समाजाला आकर्षण आहे. पॅरिसचा आयफेल टॉवर हा फ्रेंच समाजाच्या ह्या स्वभावाचा दृश्यावतार आहे, म्हणून तर फ्रेंच माणूस आपल्या आयुष्यात आयफेट टॉवरची प्रतिकृतीच बनण्याचा प्रयत्न करतो.

फ्रेंच नागरिक ज्या-ज्या क्षेत्रात जातो, त्या-त्या क्षेत्रांत उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच शॅम्पेनचे बूच उंच उडते, ते त्याला आवडते!

Tags: travel log paryatan pravasvarnan paris rupgarvita paris desh-pardesh weekly sadhana 06 january 2018 sadhana saptahik पर्यटन प्रवासवर्णन दत्ता नायक रूपगर्विता पॅरिस देश-परदेश साधना साधना साप्ताहिक अंक 06 जानेवारी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके