Diwali_4 आई, तुझ्यामुळेच दिसले जग हे थोडे!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आई, तुझ्यामुळेच दिसले जग हे थोडे!

दत्ता उर्फ अप्पा गांधी, जन्म 15 मे 1923, वास्तव्य मुंबई. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी  1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला. साने गुरुजींनी 1948 मध्ये साधना साप्ताहिक सुरू केले, तेव्हा सुरुवातीच्या काळात मुंबईतील आर्थर रोडवर साधना अंकांच्या घड्या घालून पोस्टाद्वारे वर्गणीदार वाचकांना पाठवण्याचे काम जे काही तरुण करीत होते, त्यातील एक हे अप्पा. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षकाचा पेशा स्वीकारला, आयुष्यभर इमानेइतबारे केला, अनेक विद्यार्थी घडवले. हे सर्व करीत असताना पुरोगामी विचारांच्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांना सर्व प्रकारची रसद पुरवली. गेल्या आठवड्यात अप्पा यांनी 98 व्या वर्षांत पदार्पण केले आहे, त्यांचे शरीर, मन व बुद्धी अद्याप ठणठणीत आहे. त्यांना या टप्प्यावर स्वतःच्या आईची आठवण झाली, ती त्यांनी स्वतःच्या केवळ सुवाच्च नाही तर बघत राहावे अशा सुंदर हस्ताक्षर शब्दबद्ध केली. ते त्यांचे मनोगत इथे प्रसिद्ध करीत आहोत.

- संपादक

सकाळीच पेपर वाचताना दिसले लोकसत्ताचे मधले पान. शीर्षक मोठे- ‘जागतिक मातृदिन’. काही प्रसिद्ध महिलांनी आपल्या आईच्या आठवणी जागवल्या होत्या. मग आठवला तो पन्नास वर्षांपूर्वीचा दिवस. त्या दिवशी आई होती अत्यवस्थ, महाड-पोलादपूरला. नंदादीप विद्यालयाचा अनुदानाचा चेक मिळावा म्हणून मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कचेरीत मी मुख्याध्यापक म्हणून 30 मार्च 1970 रोजी याचना करीत होतो. दुसऱ्या दिवशी पोलादपूरला पोहोचलो. आईच्या अंत्यदिनाचे सोपस्कार संपले होते.

सावित्रीच्या काठचे माझे गाव पोलादपूर. वयाच्या नवव्याच वर्षी गोपाळ गांधींची बायको होऊन आई, कशेणे-इंदापूरहून आली. आईच्या सासू-सासऱ्यांना मी कधीच पाहिले नाही. मात्र या निरक्षर मातेने दरिद्री ओंजळीने, प्रसंगी बारा अपत्यांना तिखट-मिठाचा गुळगुळीत भात खाऊ घातला. फाटक्या पातळांच्या गोधडीने थंडीत उबाराही दिला.

मला शाळेचा पहिला दिवस आठवला. तीन तुकड्यांची पाटी कोळशानं घासून आईने दिली. ‘‘जा शाळंला’’, म्हणत माझी पाठवणी केली. परतल्यावर तिनं पाटी पाहिली. ‘‘हे काय लिहिले आहे?’’ आईच्या प्रश्नावर मी म्हटले, ‘‘मास्तरांनीच ‘श्री गणेशाय नम:’ लिहिले आहे.’’ आम्ही दोघे अक्षरशत्रू होतो.

माझे वडील तसे थोडे रागीट. ते त्यांच्या त्र्याण्णाव्या वर्षी जाईपर्यंत मी त्यांच्या शेजारी बसल्याचे आठवत नाही. कधीमधी आईलाही प्रसाद मिळायचा. 80 वर्षांपूर्वीचा काळ तो. पण रागीट बाबांच्या गाठीत एक प्रेमळ नवराही होता. आई गेलेल्या चौथ्या दिवशी मी मुंबईला निघालो. पायरीवर आलेले बाबा म्हणाले, ‘‘आता काही तुम्ही येणार नाही. तुमचं माणूस गेलं.’’ मी डोळेभरल्या बाबांना आयुष्यात प्रथमच मिठी मारली. हुंदका अनावर झाला. ‘‘बाबा, आता हेही तुमचे-आमचे घर. तुम्हीच आता आईच्या जागी.’’ कसेबसे म्हणून मी बॅग उचलून चालू लागलो.

प्रवासात मग आठवली, अशीच एक पहाट. आई 4.30च्या सुमारास भल्या पहाटे कोंबडा आवरताना उठे. मी गाढ झोपेत असताना आईची ‘‘आई गंऽऽ!’ अशी किंकाळी ऐकली. कसाबसा उठून माजघरात गेलो. तिथलं दृश्य एक अजब ठेव आहे. जात्याचं वरचं पेड बाजूस पडलेलं. मिणमिणती चिमणी अंधाराला झाकीत होती. रक्ताळलेल्या आईच्या पायाला थाळ्याला ठेवून, अंगठ्याला बाबांनी फडके बांधलेले. आईचा पाय हाती धरून रक्त थांबावे म्हणून, बाबा अंगठ्यावर पेल्याने पाणी टाकत होते. आईचा दुखवा आणि बाबांची थरकाप उडवणारी घालमेल... आठ वर्षांचा मी आईची पाठ चोळत बाजूला बसलो होतो.

असाच आणखी एक दिवस. आई जेवणखाण आटोपून आडवी झालेली हाक ऐकायला आली. ‘‘शितुजे, सून अडली आहे. येतेस का?’’ निघालीच आई. परतली तो सायंकाळ झालेली. सोनारणीचं बाळंतपण. बयो आईच्या अंगावर पाणी घालत होती. ‘‘काय झालं गं?’’- बाबांची चौकशी. ‘‘अहो, खूप वाहिलं रक्त. हातानं ओढत चांगलं गोरगोमटं बाळ काढलं. पण तीन तास छळलं त्यानं.’’ -आईचा प्रतिसाद. ही आमची आई. अनुभवानं कोणाच्याही मदतीला धावे. गंगाबाईचा (शितुजा) झाडपाल्याचा बटवा. सभोवताली ती यासाठी मानमान्यता पावलेली.

ते 1930-32 चे गांधीजींच्या चळवळीचे दिवस. रोज सकाळच्या प्रभातफेऱ्या. आयाबायांच्या मागे झेंडा घेऊन आम्ही चिल्लीपिल्ली. घोष गांधीजींचा. ‘तकली चला चला के लेंगे, स्वराज्य लेंगे’, याबरोबरच ‘आचार्य श्री भागवतांनी जिल्हा पेटविला । धन्य धन्य तो बापू जोशी सेनानी झाला’ अशी गाणीही. त्या सानुल्या गावालाही गांधी श्रद्धेचे गारूड होते. मग आले 1934 चे साल. दुपारची वेळ. बाबा होते ओटीवर. पायरी ओलांडून चार पाहुणे आत आले. माझे थोरले भाऊ शंकरभाई, द. म. सुतार, तळेगावकर व बंडू गोरे जेलमधून सुटून आलेले. जेवणार तर सगळे- पण कोठे? तळेगावकर तर महार. काळजीने बाबांच्या येरझाऱ्या सुरू. भाकऱ्या भाजताना आई उठली. बाबांना थांबवून म्हणाली, ‘‘कशाला डोकं खाजवता? येरवड्यात गांधींनी उपवास का केला? आणि हे सगळे तर सत्याग्रही. स्वयंपाकघरातच पानं मांडा.’’ बाबांनी मग उशीर केला नाही. अन्‌ आमचं स्वयंपाकघर गांधीजींच्या नावाने पावन झालं. गावंढळ गुजराती माणसांची 85 वर्षांपूर्वीची वहिवाट. मराठे पण घोंगडी टाकून पायरीवर बसत.

याच वर्षीचा आणखी एक प्रसंग. सरदार वल्लभभार्इंची सभा. त्यांचे भाषण संपले. अध्यक्ष बाबाच. ते उठले. म्हणाले, ‘‘महात्मा गांधी की जयऽऽ’’ ‘वंदे मातरम्‌’ मीच म्हटले. वल्लभभार्इंनी जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, ‘‘खूप शीक अन्‌ मोठ्या भावासारखा सत्याग्रही पण हो.’’ आईने दरवाजाआडून पाहिलेच होते. सगळे आटोपल्यावर आईनंही मला जवळ घेतले. तोंडात एक गुळाचा खडा भरला. अकरा वर्षांच्या मला गुळाची गोडी खूप-खूप भावली. अठ्‌ठ्याण्णवीच्या उंबऱ्यावर आईच्या त्या उचंबळलेल्या भावना जाणवतात. का केले असेल आईने असे? खरंच ती अशिक्षित होती का?

1936 ची एक गोष्ट. जून सुरू व्हायच्या अगोदर वळवाच्या पावसाने वसुंधरेला सुस्नात केलेले अन्‌ पेरणीचा तरवा नांगरायचा राहिलेला. सगळीकडे नांगरटी व पेरण्यांचा हंगाम. ना बैल, ना मजूर मिळत. हैराण झाले बाबा. मग आईपण अस्वस्थ. म्हणाली, ‘‘कशाला हवी डोकेमारी? मी येते शेतावर.’’ पण बाबाच ते. तडकून म्हणाले, ‘‘अगं, तिथं काय चुलीत लाकडे सारयचीत?’’ आई काय बोलणार? चूल आणि मूल यापलीकडे त्या काळात मध्यमवर्गाच्या स्त्रिया कोठे जातच नसत.

दुपारचे तीन वाजलेले. स्वयंपाकघरातील आटपाआटप करून पदर ओच्याला हात पुसत आई ओटीवर आली. म्हणाली, ‘‘चला जाऊ शेतावर. दत्तू, तू पण चल.’’ बाबा, मी व आई चोळईवर गेलो. नांगराचे एक जू आईने आपल्या खांद्यावर घेतले, दुसरे माझ्या खांद्यावर. नांगर बाबांच्या हाती. सूर्य मावळतीआड होईतो काम फत्ते! चटकन बाबांनी आईच्या मानेवरचे जू काढीत म्हटले, ‘‘दमलीस का गं?’’ चुलीत लाकडे सारणाऱ्या आईला बाबांची अशी शाबासकी.

मी 1937 मध्ये फायनलला होतो. घरात बहिणीचे बाळंतपण. आई बिगीने गाईचे दूध काढण्यास निघाली. पेंड फोडण्यासाठी फरशी देऊन ती तांब्या आणण्यास गेली. माझ्याच्याने लवकर पेंड फुटेना. मग पाठीवर धबका आईचा. फरशीचा घाव माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर. नख फाटून रक्त भळाळले. हे हृदय कसे आईचे? आईने  माझा अंगठा स्वत:च्या तोंडात घातला. केवळ चौदाव्या वर्षी आईने दिला धडा- हात आहेत काम करण्यासाठी! आई-बाबांनीच दिले असे कर्ते हात. आजही फाटलेले नख बजावते, ‘काम करीत राहा.’

स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर राहण्याचा वसा थोरल्या भार्इंनीच दिलेला. मीही 1942 च्या 10 ऑगस्टपासून त्यांच्याबरोबर. मला व भार्इंना दीड वर्षे सक्तमजुरी व शंभर रुपये दंड. बाबा पण तुरुंगात. दंडवसुलीसाठी पोलिसांनी चुलीवरच्या तव्यासकट सारे काही जप्त केले. तात्या, दुसरे मोठे भाऊ दोन दिवसांनी आले महाडहून. ते दहा रुपये मासिकने दुकानात गुमास्ता. बाबा होते केवळ दोन खंडी भाताचे शेतकरी. कसे दिवस काढले असतील आईने?

स्वातंत्र्य 1947 मध्ये आले, भारताची चिरफाड करीत.  अन्‌ घाव बसला वहूरच्या ईसाने खोताचा, माझ्या धाकट्या बहिणीच्या नवऱ्यावर व त्याच्या बिरवाडीच्या मित्रावर. धन्याचे लाडके व प्रामाणिक बैल मात्र रक्तबंबाळ प्रेते गाडीत घेऊन सकाळीच दारी हजर. माणूस व पाळीव प्राण्यातही अशी प्रतिरोधी माणुसकी.

संकटे कधीच एकाकी येत नाहीत. पुढच्याच वर्षी मांडत्याची बहीण, तिच्या नवऱ्याचाही खून झाला. कमल तिच्या पाच मुलांसह मग घरी पोलादपूरला आली. दिवस, वर्ष आठवत नाही. पण पाठोपाठ तिसऱ्या बहिणीच्या घरावरही नांगर फिरला. चोरट्यांनी दुकानासह लुटून घर खाली केले. मग चार-पाच जणांचे कुटुंब घेऊन मेहुणे व बहीण चंपा महाडला भावाच्या दारी आली. एका मागोमाग एक पाचही बहिणी व त्यांची मुले अशी जीव घेणाऱ्या संकटात. फक्त मोठ्या बयोचा नवरा- पुरुषोत्तम सुरा- थोड्या चांगल्या स्थितीत. तोही बिजवरच.

आम्ही तिघे सत्याग्रही. मी तर कधीच पेन्शन घेतलं नाही. पण फाटक्या पदराच्या आईने या साऱ्यांच्या दु:खावर फुंकर मारीत त्यांना पदरी घेतले. विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘परमेश्वराचीही कोणी तरी आई असणारच’! ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी।’ हे काव्य खरे. पण माझ्या आईने कुणाला मदतीसाठी साद घालावी? स्वाभिमान टिकवून दिवस तरी कसे ढकलावेत? कोणत्या प्रकांड धैर्याने तिने वर्ष-वर्ष उसासून जाणारे दु:ख सहन केले?

मी 1949 ला शिक्षक बनल्यानंतर तेरा जणांच्या शिक्षणाला व पोषणाला आधार दिला. पण त्यातही सिंहाचा वाटा व मनोमिलाफ पत्नी आशाचाच. मी बराचसा राजकीय व सामाजिक कामात गुरफटलेला. माझ्या थोरल्या बंधूंना क्रांतिसिंह, बाबांना ‘सत्याग्रही गोपाळजी’ म्हटले गेले. आम्हा तिघांचा मानसन्मान व स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवही झाला. पण घराच्या पायाच्या ढासळणाऱ्या चिऱ्यांना पकडून धरले आईने. आयुष्यभर श्रमयज्ञ केले बहिणींनी. आईच्या मांडीवर लोळणाऱ्या परमात्म्याचे जग तरी असे उरफाटे का? जन्मदात्रीनं व स्त्रियांनी जीवनाचा होम करायचा व पुरुषांनी नावलौकिकाच्या महिरपीत बसायचे. आम्ही भाऊ बरेच सावरलो. आमचे संसारही थोडेफार जगण्यासारखे झाले. पण आईसह सगळ्या बहिणींच्या वाट्याला आले दु:ख, दु:ख आणि दु:खच. आम्हा दोघांचे सहजीवन अडुसष्ट वर्षांचे. कोरोना केंद्रावर असलेल्या माझ्या डॉ. मुलीने- सीमाने- दोन दिवसांपूर्वीच मला विचारले, ‘‘अप्पा, तुम्ही आईला काय दिलेत?’’

प्रसंगी तिने हातातल्या सोन्याच्या बांगड्याही उतरवल्या. माझे मात्र द्यायचे राहून गेले... आणि या सांध्यसमयी शब्दांशिवाय देणार तरी काय!

Tags: मातृदिन दत्ता गांधी mother's day matrudin datta gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात