डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चित्रकार व्हिन्सेट व्हॅन गॉग हा अमृता शेरगिलसारखा शापित यक्ष होता. 1853 मध्ये जन्मलेल्या व्हॅन गॉगला केवळ 36 वर्षांचे अल्पायुष्य लाभले. त्याने 1889 मध्ये वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वत:च बंदुकीच्या गोळीने आत्महत्या केली. एका श्रेष्ठ चित्रकाराच्या कलात्मक जीवनाची शोकांतिका झाली. व्हॅन गॉगच्या आयुष्यात त्याचे एकच चित्र 400 फ्रँकला विकले गेले. तथाकथित चित्रसमीक्षकांनी व्हॅन गॉगच्या चित्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. संपूर्ण आयुष्यात व्हॅन गॉगला आपला भाऊ थिओ हा देत असलेल्या मदतीवर अवलंबून राहावे लागले. व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर त्याचे दुसरे चित्र आजच्या दराने सुमारे 270 डॉलर्सना विकले गेले. पण त्यानंतर मात्र समीक्षक व रसिकांचे डोळे उघडले. व्हॅन गॉगच्या प्रतिभेला दाद मिळाली. व्हॅन गॉगचे एक चित्र 1990 मध्ये 8 कोटी डॉलर्सना विकले गेले. पण व्हॅन गॉगला त्याचा काहीच फायदा नव्हता. तो भुकेकंगाल अवस्थेत मरण पावला.

हॉलंड हा हसरा, हसतमुख देश आहे. तो फुलांचा देश आहे. ट्युलिप हे हॉलंडचे राष्ट्रीय फूल आहे. लाल- पिवळ्या रंगांची ट्युलिपची फुले फुलली की, हा फुल्ल- कुसुमित देश मोठा विलोभनीय दिसू लागतो. पस्तीस वर्षांपूर्वी हॉलंडला भेट दिली, तेव्हा फुलांची शेती हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदा ऐकला. हॉलंडमध्ये ट्युलिपची शेते आहेत. हॉलंड उर्वरित युरोपमध्येही फुले निर्यात करतो. हॉलंडची राजधानी ॲमस्टरडॅममध्ये फुलांचा लिलाव होतो. पाश्चात्त्य संस्कृतीला फुलांचे वेड आहे. इथे फुले देवाला वाहायची पद्धत नाही, स्त्रियाही केसांत फुले माळत नाहीत; पण पाश्चात्त्य लोक फुलांनी आपली घरे सुशोभित करतात. घराच्या, ऑफिसच्या टेबलावर फुले हवीच. नवा दिवस ताज्या-टवटवीत फुलांच्या घमघमीत वासाने सुरू व्हायला हवा, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भेट घेताना फुलांचा गुच्छ न्यायला हवा आणि ‘ऑल सोल्स डे’ला फुलांच्या सुंदर रांगोळीने स्मशानातली थडगी सजवायला हवीत. सगळीकडे फुले हवीत. फुलांचे निर्माल्य होते, ही कल्पना पाश्चात्त्य समाजात नाही. त्यामुळे सुकलेली फुले, फुलांचे हार नदीच्या पाण्यात-जलाशयात फेकण्याची गलिच्छ रीत मला युरोपमधल्या कुठल्याही देशांत दिसली नाही. कारण फुलांएवढेच पाण्यावरही त्यांचे प्रेम आहे.

हॉलंड हा फुलांचा देश आहे, तसा तो कालव्यांचा देश आहे. हॉलंडची 40% जमीन समुद्रसपाटीपेक्षा खाली आहे. समुद्राच्या पाण्यामुळे जमीन बुडू नये म्हणून डच लोकांनी नद्या आणि समुद्र यांच्या पाण्याचे योग्य नियंत्रण करण्यासाठी कालवे बांधले आहेत. ॲमस्टर नदीच्या काठी वसलेल्या ॲमस्टरडॅम शहरात जेवढे रस्ते आहेत, तेवढेच कालवे आहेत. हॉलंडमधल्या कालव्यांतून तेथील शहरांची आणि रम्य खेड्यांची जलसफर करायचा अनुभव अनोखा आहे. हॉलंडचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे तो सायकलींचा देश आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाकडे सायकल असते. साडेआठ लाख लोकसंख्या असलेल्या ॲमस्टरडॅम शहरात सतरा लाख सायकली आहेत, म्हणजे शहरातील दर नागरिकाकडे सरासरी दोन सायकली आहेत. ॲमस्टर नदीच्या काठी तीन-तीन मजल्यांचे सायकलींचे पार्किंग स्लॉट्‌स आहेत. सायकल हे मोठे पर्यावरण-संवेदनशील व आरोग्यवर्धक वाहन आहे. हॉलंडचे पंतप्रधानसुद्धा  सायकलवरून कार्यालयात जातात. हॉलंडमध्ये सायकलस्वारांसाठी रस्त्याला समांतर खास पट्टे आहेत. तो सायकल चालवण्याचा रस्ता समजला जातो.

दुर्दैवाने भारतीय सामाजिक मानसिकतेतून सायकल हद्दपार झालेली आहे आणि तिची जागा स्कूटरने घेतली आहे. हॉलंडच्या सोव्हिनीर शॉपमध्ये छोट्या रंगीत सायकली सोव्हिनीर्स म्हणून मिळतात. आम्ही रेहान, रणवीर व रैना या आमच्या नातवंडांसाठी त्या विकत घेतल्या. पॅरिस ते ॲमस्टरडॅम आम्ही रेल्वेने आलो होतो. ॲमस्टरडॅम रेल्वे स्टेशनवर उतरताच मी तिथल्या पर्यटन काऊंटरवर ॲमस्टरडॅम कार्ड विकत घेतले. हे कार्ड दाखवून मला शहरात पुढील दोन दिवस कुठलीही ट्रामसेवा, बससेवा, कुठलाही म्युझियम मोफत पाहायला मिळणार होता. रेल्वे स्टेशनजवळच ट्राम स्टेशन होते. ट्रामने आम्ही डॅमस्क्वेअरवर आलो. आमचे हॉटेल डॅमस्क्वेअरलाच होते. डॅमस्क्वेअर हा ॲमस्टरडॅममधला प्रख्यात चौक. रॉयल पॅलेसची वास्तू इथेच आहे. तिच्याभोवती दुकाने, रेस्टॉरंट्‌स आणि मोकळा चौक. तोच डॅमस्क्वेअर!

डॅमस्क्वेअरच्या जवळच नाईन रोड्‌स अर्थात नऊ रस्ते आहेत. ॲमस्टरडॅममधील तीन कालव्यांवरील नऊ पुलांमुळे हे नऊ रस्ते निर्माण झाले आहेत. हे नऊही रस्ते छोटे-बुटके आहेत, पण त्या बुटकेपणातच त्यांचे आगळे सौंदर्य आहे. त्या छोट्या रस्त्यांवर कसलीच रहदारी नाही. त्यामुळे तिथे रमत-गमत, आरामात चालत फिरता येते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घरे आणि दुकाने, कॅफेज आहेत. इथल्या सोव्हिनीर शॉपमध्ये छोट्या-लहान लाकडी पवनचक्क्या, बाहुल्या यांची आम्ही खरेदी केली. छोट्या साकववजा पुलावर उभे राहून फोटो काढले.

हॉलंडमध्ये दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे ॲमस्टरडॅम शहरात चीज विकणारी दुकाने जागोजागी आहेत. या दुकानांत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, चवीचे चीज उपलब्ध असते. त्याचा दर्जा उत्कृष्ट असतो. डच नागरिक दर वर्षी 14 किलो चीज फस्त करतो. वाईन घेताना क्रॅकरबरोबर चीज खाणे त्याला आवडते. तसेच स्वयंपाकात चीजचा विपुल वापर तो करतो. पोर्तुगीजांनी भारतात प्रथम चीज आणले. त्यातून आपण पनीर हा भारतीय चीजसदृश पदार्थ तयार केला. पुढे रसगुल्ला, संदेशा वगैरे बंगाली मिठाया हे त्यापुढचे खाद्यसंस्कृतीचे गोड पाऊल आहे. हॉलंडमध्ये रताळी, बिटरूट्‌स, गाजर, टोमॅटो, मुळा यांचे चिप्स मिळतात. ते अतिशय रुचकर असतात. हॉलंडला समुद्राचा शेजार असल्यामुळे तिथे माशांची विपुलता आहे. त्याशिवाय तो कृषिप्रधान देश असल्याने, तिथे भाज्याही मुबलक मिळतात. त्यामुळे हॉलंडमधील रेस्टॉरंटमधील जेवणाचे वैविध्य आणि वैचित्र्य पाहून जीभ पाघळून गेली.  

ॲमस्टरडॅम हे बंदर असल्यामुळे तिथे खलाशांची वर्दळ असते. शिवाय ते पर्यटनस्थळ आहे. साहजिकच शहरात रेडलाईट डिस्ट्रिक्ट आहे. पण कालव्याकाठचा तो रेडलाईट डिस्ट्रिक्ट अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने नियंत्रित केला आहे. अनेक पर्यटक तो नुसता पाहण्यासाठी तिथे भेट देऊन येतात. हॉलंडमधल्या पर्यटन-पत्रिकेत ‘तुम्ही रेडलाईट डिस्ट्रिक्टला भेट द्या’ एवढेच लिहायचे बाकी आहे; अन्यथा ॲमस्टरडॅममधले सगळे गाईड आपल्याला तिथे जाऊन तो माहोल पाहून यायचा सल्ला देतात. अर्थात, मी प्रवासवर्णन लेखक असल्याने मी तो भाग सपत्निक पाहून आलो! देहविक्रय हा आद्य व्यवसाय आहे. नगरवधू, देवदासी, कॉलगर्ल्स, सेक्स वर्कर्स अशी त्यांची विविध रूपे समाजाने पाहिली आहेत. वेश्या- व्यवसायाचे हिडीस, कुरूप, बीभत्स रूप वेश्यावस्तीत दिसते. ॲमस्टरडॅम शहराने आपल्या परीने या व्यवसायाला सुडौल, सुव्यवस्थित मुखवटा चढवण्याचा प्रयत्न केला आहे.

ॲमस्टरडॅम शहराच्या कालव्यांतून सफर करण्याचा अनुभव अप्रूप असा आहे. शहरातील कालव्यांवर 1500 पूल आहेत. हे सर्व अर्धवर्तुळाकार कमानीचे पूल कालव्यांच्या गळ्यात आपले सलगीचे हात घालून उभे आहेत. एके ठिकाणी रांगेने सात पूल एका सरळ रेषेत आहेत. त्याखालून मोटरबोट जाताना ते सप्तपुलांचे दृश्य रमणीय दिसते. या पुलांसंबंधी दोन श्रद्धा आहेत. जे प्रेमी युगुल पुलाखाली एकमेकांचे चुंबन घेईल, त्यांचे प्रेम टिकून राहील- ही एक श्रद्धा. दुसरी श्रद्धा अशी की- प्रेमी युगुलाने पुलावरील साखळीला कुलूप लावले व किल्ली कालव्याच्या पाण्यात फेकून दिली, तर त्यांचे प्रेम अमर होते. पुलावरच्या साखळ्यांना अशी अनेक कुलपे आम्ही पाहिली, त्यांच्या किल्या कालव्याच्या पाण्याखाली रुतल्या होत्या. कालव्याच्या दोन्ही बाजूला बहुमजली इमारती आहेत. यातच एक ॲन फ्रँकचं घर आहे. इथे चिमुरडी ॲन फ्रँक दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जर्मन फौजा हॉलंडमध्ये घुसल्या, तेव्हा लपून बसली होती. या घरातच तिने एका डायरीत आपले अनुभव लिहून ठेवले होते. दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हॉलंड मुक्त करण्यापूर्वीच ॲन फ्रँक मृत्यूमुखी पडली. पुढे ॲना फ्रँकची डायरी प्रसिद्ध झाली आणि तिच्या लाखो प्रती खपल्या.

ॲन फ्रँकप्रमाणेच हॉलंडची दुसरी नागरिक मार्गारेट झेले- जी माताहारी या नावाने प्रसिद्ध झाली, तिचीही दंतकथा झाली. माताहारी ही अतिशय सुंदर नर्तिका पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची हेर होती. पण ती डबल एजंट म्हणजे शत्रुपक्षाच्या वतीनेही हेरगिरी करते, असा संशय आला म्हणून तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तिच्यावरचा संशय खरा होता की खोटा, हे कधीच सिद्ध झाले नाही. पुढे माताहारीच्या जीवनावर ‘माताहारी’ ह्याच नावाने काढण्यात आलेल्या सिनेमात ग्रेटा गार्बोने माताहारीची भूमिका केली.

ॲमस्टरडॅमहून तासाभराच्या अंतरावर हेग शहर आहे. इथे युनोच्या आंतरराष्ट्रीय कचेऱ्या आहेत. हेग शहरातला टाऊन हॉल तिथल्या सुंदर तळ्याकाठी आहे. त्याच्या अवतीभवती शहराचा बाजार आहे. हेग शहरात मडुरोडॅम नावाची सुंदर बाग आहे. या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे हॉलंडमधल्या वेगवेगळ्या इमारतींच्या व वास्तूंच्या छोट्या प्रतिकृती करून ठेवल्या आहेत. या प्रतिकृती मूळ वास्तूच्या एक-पंचविसांश आकाराच्या आहेत. आपल्या गुडघ्याएवढ्या उंचीच्या या वास्तू मूळ वास्तूंशी एवढ्या सुसंगत आणि हुबेहूब आहेत की, आपण मूळ वास्तूचे आरशातले छोटे प्रतिबिंबच पाहतो आहोत, असे वाटते! विमानतळ, बंदर, रेल्वे स्टेशन- येथील विमाने, जहाज, रेल्वे यांना गती दिल्यामुळे या वास्तू सजीव आणि सेंद्रिय झाल्या आहेत. मडुरोडॅमच्या एकाच बागेला भेट देऊन हॉलंडमधल्या सर्व वास्तूंचे वास्तुशिल्प पाहिल्याचा आनंद उपभोगता येतो. मडुरोडॅमची ही बाग म्हणजे वास्तुशिल्पाचा बोन्सायच आहे- वास्तूंना दिलेले बालकरूप आहे!

अनसूयेने ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांना दत्तात्रेयाच्या रूपाने बालकरूप दिले. हॉलंडमध्ये निसर्गाने पंचमहाभूतांना दिलेले बाळरूप पाहायला मिळते. हॉलंडमध्ये पाणी, वारा, प्रकाश, माती आणि आकाश यांनी आपले चौदा कोटी वर्षांचे प्रौढ वय विसरून निज शिशुत्व पत्करले आहे. त्यामुळे इथली माती मऊ, मुलायम, विलोदी आहे. इथला प्रकाश धारोष्ण आहे, वस्त्रगाळ आहे, पहाडी आहे. इथला वारा मंद, शीतल, सुखद आहे. इथले पाणी शहाळ्याच्या पाण्यासारखे खडीसाखरी गोड आहे आणि इथले आकाशही बुटके आहे. इथल्या लोकांचे हात पोचण्यासाठी ते खाली झुकले आहे. हेग शहरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर डेफ्ट नावाचा मध्ययुगीन गाव आहे. तिथे एक पुरातन कॅथेड्रल आहे. डेफ्टला आम्ही पोचलो तो रविवारच्या दिवस होता. कॅथेड्रलमधली प्रार्थना संपवून लोक परतत होते. कॅथेड्रलसमोरच रविवारचा ओपन एअर बाजार भरला  होता. फूड ट्रकवर ताजे फिश ॲन्ड चिप्स मिळत होते. लोक त्यावर ताव मारत होते. आठवड्याची खरेदी करण्यात स्त्रिया गुंतल्या होत्या. सारे काही मुक्त, मोकळे, अनौपचारिक होते.

हेग शहरातून आम्ही रोटरडॅमला आलो. रोटरडॅम शहरातील क्रूकेड हावस नावाची वास्तू पाहण्यासारखी आहे. इथली मार्केटची भव्य इमारतदेखील देखणी आहे. रोटरडॅममधून पाऊण तासाच्या अंतरावर किंडरडायक नावाचे खेडे आहे. तिथे नदीतून मोटरबोटीत बसून जावे लागते. किंडरडायक खेड्याला युनेस्कोने हेरिटेज स्थळाचा दर्जा दिला आहे. या खेड्यात कालव्याच्या किनाऱ्यांवर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या एकोणीस पवनचक्क्या आहेत. त्यांपैकी काही पवनचक्क्या विटांनी बांधलेल्या आहेत, तर काही पवनचक्क्या लाकडी आहेत. पवनचक्क्यांचा आकार बराच मोठा आहे. त्यांची चार पाती म्हणजे त्यांचे अक्राळ-विक्राळ हात आभाळसन्मुख करून ती उभी आहेत. प्रत्येक पवनचक्कीभोवती फुलांची छोटीशी बाग आहे. पवनचक्कीत आत जायला एक छोटे दार आहे. खाली पवनचक्की चालवणाऱ्याची छोटी खोली आहे. वर जाण्यासाठी मधोमध जिना आहे. एके काळी या भागात फार मोठा पूर आला होता. मग ही सगळी जमीन दलदलीची बनली. डच लोकांनी मग या ठिकाणी कालवा बांधला. कालव्याच्या किनाऱ्यांवर पवनचक्क्या उभारून नदीचे पाणी कालव्यातून खेचून नदीत सोडले. पवनचक्क्यांच्या हाताची एक विशिष्ट सांकेतिक भाषा आहे. पवनचक्कीभोवती घड्याळ आहे, असे समजून चार पाती जेव्हा विशिष्ट अंकाभोवती असतील, तेव्हा पवनचक्क्या सुरू करायच्या. ज्या वेळी त्या वेगळ्या अवस्थेत असतील, तेव्हा चक्क्या बंद करायच्या. ही सोपी सांकेतिक भाषा पवनचक्क्या चालवणाऱ्या शेतकऱ्यांना माहीत होती.

‘पाणी वळवावे युक्ती’ असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. पाण्याचे नियोजन करण्याचे शास्त्र व कला डच लोकांना अवगत होती. नदीत लॉकर्स बांधण्याचे तंत्र इजिप्तशियन, चिनी लोकांप्रमाणेच डच लोकांनाही माहीत होते. लॉकर्स पद्धत कशी चालते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. नदीच्या उताराकडून जेव्हा जहाज येते, तेव्हा ते लॉकरूममध्ये येताच लॉकरूमच्या दोन्ही भिंती बंद केल्या जातात. मग लॉकरूममध्ये नदीच्या वरच्या पातळीवर जेवढे पाणी आहे, तेवढे पाणी भरले जाते. साहजिकच जहाज पाण्याच्या उंच पातळीमुळे उचलले जाते. त्यानंतर लॉकरूमची नदीच्या चढणीवरची भिंत उघडून जहाजाला जाऊ दिले जाते. ज्या वेळी जहाज चढणीकडून येते, तेव्हा ते लॉकरूमध्ये येताच लॉकरूमच्या दोन्ही भिंती बंद करून त्यातील पाणी नदीच्या उताराकडील पाण्याच्या पातळीएवढे करण्यात येते. त्यामुळे जहाज आपोआपच खालच्या पातळीवर उतरते, मग लॉकरूमच्या खालची भिंत उघडून जहाजाला उताराच्या दिशेने जाऊ दिले जाते. डच लोकांच्या या जलनियोजनाच्या कलेमुळे ‘देवाने जग निर्माण केले, पण डच लोकांनी नेदरलँड (अर्थात हॉलंड) निर्माण केले’ अशी सार्थ म्हण हॉलंडमध्ये रूढ आहे.

रोटरडॅममध्ये परतलो, तेव्हा हॉलंडमधला हिऱ्याचा एक निर्यातदार मला भेटला. तो मला म्हणाला, ‘‘हॉलंडमध्ये हिरे पॉलिश करण्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याशिवाय हिऱ्यांचा व्यापार, आयात-निर्यात याचीही कोट्यवधी युरोची उलाढाल इथे होते.’’ रोटरडॅममधून ॲमस्टरडॅमला परतलो. आता ॲमस्टरडॅममधली एकच जागा पाहायची राहिली होती, जी पस्तीस वर्षांपूर्वी पाहायची राहून गेली होती. ती जागा म्हणजे व्हिन्सेट व्हॅन गॉग म्युझियम.

चित्रकार व्हिन्सेट व्हॅन गॉग हा अमृता शेरगिलसारखा शापित यक्ष होता. 1853 मध्ये जन्मलेल्या व्हॅन गॉगला केवळ 36 वर्षांचे अल्पायुष्य लाभले. त्याने 1889 मध्ये वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वत:च बंदुकीच्या गोळीने आत्महत्या केली. एका श्रेष्ठ चित्रकाराच्या कलात्मक जीवनाची शोकांतिका झाली. व्हॅन गॉगच्या आयुष्यात त्याचे एकच चित्र 400 फ्रँकला विकले गेले. तथाकथित चित्रसमीक्षकांनी व्हॅन गॉगच्या चित्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. संपूर्ण आयुष्यात व्हॅन गॉगला आपला भाऊ थिओ हा देत असलेल्या मदतीवर अवलंबून राहावे लागले. व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर त्याचे दुसरे चित्र आजच्या दराने सुमारे 270 डॉलर्सना विकले गेले. पण त्यानंतर मात्र समीक्षक व रसिकांचे डोळे उघडले. व्हॅन गॉगच्या प्रतिभेला दाद मिळाली. व्हॅन गॉगचे एक चित्र 1990 मध्ये 8 कोटी डॉलर्सना विकले गेले. पण व्हॅन गॉगला त्याचा काहीच फायदा नव्हता. तो भुकेकंगाल अवस्थेत मरण पावला.

व्हॅन गॉगने त्या वेळच्या चित्रकलेच्या चौकटी मोडून टाकल्या. आपल्या चित्रकलेत त्याने इंप्रेशनिझम आणि सिंबोलिझम असे दोन घाट आणले. सगळे रंग व्हॅन गॉगला वश होते. ‘चित्रे काढताना मी रंगांचे अंगाई गीत गातो’ असे तो म्हणायचा. ‘माझ्या चित्रातून माझे रंगच बोलतील’ असे  त्याचे म्हणणे होते. रंगांच्या जिन्यावरून त्याची चित्रे कलात्मक वळणे घेत. व्हॅन गॉग म्हणत असे- ‘‘प्रत्येक रंगाला त्याचा-त्याचा स्वभाव असतो. काही रंग उष्ण असतात, काही शीतल असतात. काही रंग ताजे-टवटवीत असतात, तर काही रंग श्रांत असतात.’’ व्हॅन गॉग तीव्र रंग वापरायचा. रंगांची तीव्रता वाढवली की ते कोमल होतात, असा त्याचा सिद्धान्त होता. लाल, पिवळा आणि निळा हे प्राथमिक रंग तो वापरायचा. या प्राथमिक रंगांशेजारी हिरवा, जांभळा, केशरी हे दुय्यम रंग वापरले की, चित्राला खोली येते- असे त्याचे म्हणणे होते. गॉगचा पिवळा आवडता रंग होता. पिवळ्याधमक रंगात माखलेली सूर्यफुलांची चित्रे, भर उन्हातील पिकलेली मक्याच्या शेताची चित्रे, दुपारच्या हिरण्यगर्भ सूर्याची चित्रे ही गॉगची सिग्नेचर चित्रे आहेत.

गॉगला उन्हाचे, उजेडाचे वेड होते. त्याच्या चित्रात हा सतेज उजेड पसरलेला दिसतो. व्हॅन गॉगला फुलांचे वेड होते. फुले म्हणजे धरतीवरची नक्षत्रे आणि नक्षत्रे म्हणजे आकाशातली फुले, असे त्याला मनोमन वाटायचे. वसंत ऋतूतले फुलांनी डवरलेले बदामाचे झाड, फ्लॉवरपॉटमधील फुले ही त्याची चित्रे म्हणजे रंगांत बुडवलेल्या भावकविताच आहेत. स्टारी नाईट आणि उकडलेले बटाटे खाणारे शेतकरी ही त्याची दोन चित्रे थोडीशी वेगळी आहेत. स्टारी नाईट हे त्याचे चित्र आपल्याला कॉस्मिक अनुभव देते. ते आपल्याला आभाळाच्या पल्याड नेऊन आकाशगंगेच्या अंतरंगापर्यंत पोचवते. उकडलेले बटाटे खाणारे शेतकरी हे चित्र काळ्या, गडद रंगात रंगवलेले आहे. या शेतकऱ्यांनी हे बटाटे शेतातून नुकतेच खणून काढलेले आहेत. उकडलेल्या बटाट्याचा वास चित्रात दरवळतो आहे.

ऑलिव्ह आणि सायप्रस हे व्हॅन गॉगचे आवडते वृक्ष होते. स्मशानाजवळच्या तीन ऑलिव्ह वृक्षांचे त्याचे चित्र प्रसिद्ध आहे. यापैकी एका ऑलिव्ह वृक्षाची पाने नारिंगी आहेत, दुसऱ्याची पिवळी पडली आहेत आणि तिसरा ऑलिव्ह वृक्ष निष्पर्ण झालेला आहे. हेमंत ऋतूतील हे चित्र व्हॅन गॉगच्या उदास भावावस्थेचे प्रतीक मानले जाते. सायप्रस वृक्ष हा मृत्यूचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे व्हॅन गॉगला त्याचे आकर्षण वाटत असावे. व्हॅन गॉगच्या उत्तर आयुष्यातील चित्रांत कावळे येतात. समुद्रकिनाऱ्यावरील काळ्या नावा येतात. बालकवींच्या कवितांप्रमाणे व्हॅन गॉगच्या चित्रांत आनंद आहे, आमोद आहे; पण अचानक काळ्या डोहाकाठचा औदुंबर यावा तशी उदासीची पडछाया आहे. निष्पर्ण झाडे, सायप्रस वृक्ष, कावळे, नावा हे त्या निराश-विषण्ण मनोवस्थेचे दृश्यावतार आहेत.

व्हॅन गॉगला आपल्या आयुष्याच्या अखेरीस वाटले, ‘आपल्याला आध्यात्मिक पक्षाघात झाला आहे.’ एकदा त्याने आपल्या डाव्या कानाचा छोटा भागच कापून एका वेश्येला भेट दिला. व्हॅन गॉगने नैराश्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. त्याला आपल्या स्वभावाचा थांगपत्ता लागला नाही. व्हॅन गॉगेने इतरांची पोर्ट्रेट्‌स काढली तसे आपलेही पोर्ट्रेट काढले, पण त्यातही आपल्या अंतरंगातली खळबळ तो व्यक्त करू शकला नाही. अतिरेकातून येणारे सोपेपण आणि वैचित्र्यातून येणारी विसंगती ही व्हॅन गॉगच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. व्हॅन गॉग हा हॉलंडच्या निसर्गाचा बाय-प्रॉडक्ट होता. असा चित्रकार निर्माण व्हायला, त्याच्या अवतीभवतीचा निसर्गही तेवढाच रमणीय असायला हवा. हॉलंड आणि व्हिन्सेट व्हॅन गॉग हा दुग्ध-शर्करायोग जुळून आला, पण त्याला काळाची साथ थोडी उशिराने मिळाली.

ॲमस्टरडॅम-रोमच्या परतीच्या प्रवासात माझ्याशेजारी एक वयस्क बाई बसली होती. सहप्रवाशांत 98% सहप्रवासी एकमेकांशी बोलत नसतात, हे संख्याशास्त्र मला माहीत होते. वास्तविक, त्यापैकी बहुतेकांना एकमेकांशी बोलायचे असते; पण कोणी तरी पुढाकार घ्यायला हवा असतो, म्हणून मीच बोलणे सुरू केले. ती कवयित्री होती. ती हायकू करायची. हायकू हा जपानी कवितेचा प्रकार. ती तीन ओळींची छोटी कविता. तिसऱ्या ओळीत कवितेला कलाटणी मिळावी लागते. तिने आपला एक हायकू वाचून दाखवला. सफरचंदाच्या झाडावरील एक पिकलेले सफरचंद वाट पाहत होते, न्यूटन कधी खाली बसेल ह्याची! ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही लेखक असाल, तर तुम्हीही हायकू लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही हायकू लिहू शकाल.’’ हॉलंड सोडता-सोडता मी एक हायकू केला. पिवळा रंग - मी व्हॅन गॉगचा आवडता रंग होतो लाल रंग - व्हॅन गॉग माझा आवडता चित्रकार होता निळा रंग - मीच व्हॅन गॉग होतो.

Tags: प्रवासवर्णन व्हॅन गॉग व्हॅन गॉगचे हॉलंड दत्ता दामोदर नायक हॉलंड datta damodar naik vincent van gogh holland weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके