डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पिकासोच्या अंतर्मनाला निसर्गाचे आक्रंदन ऐकू येत होते आणि त्याच्या चित्रांतून ते परावर्तित होत होते. पिकासोच्या जीवनात ब्ल्यू पिरिएड आणि पिंक पिरिएड असे दोन कालखंड आले. ब्ल्यू पिरिएड हा त्याच्या आयुष्यातला नैराश्याचा काळ होता. या काळात त्याने आपली चित्रे निळ्या रंगात रंगवली. पुढे त्याने वैफल्यावर मात केली व त्याच्या जीवनात गुलाबी काळ आला. मग त्याच्या चित्रांत उबदार, सकारात्मक रंग आले. पिकासोने आपली काही सेल्फ पोर्ट्रेट्‌स काढली. त्याने अनेक शिल्पेही केली. आपली चित्रे व शिल्पे त्याने अनेक म्युझियम्सना व साम्यवादी देशांतील चौकांमध्ये ठेवण्यासाठी मोफत दिली.

स्पेन हा रंगांत माखलेला देश आहे. सप्तरंगांचा महोत्सव तिथे चाललेला असतो. रंगांचा मोरपिसारा फुलवून हा देश अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यावर बसला आहे.

रंग म्हणजे उजेडाचेच एक रूप! निळ्याला त्याची घननिळ, श्यामनिळ, निळी शीतल क्रांती उजेडानेच दिली आहे. पिवळ्या धम्मक कणसाचा मोतीदार पिवळा रंगही उजेडच देतो. लाल रंगाचे जास्वंदी-डाळिंबी रूप उजेडाचेच एक रूप आहे. गार हिरव्या शेतांचा हिरवा रंग हेदेखील उजेडाचेच श्रांत-विश्रांत स्वरूप आहे. सगळ्या रंगांचे मिश्रण-संमिश्रण करून उजेडाच्या देठातूनच अनंताच्या फुलाचा हा ताजा-टवटवीत, शुभ्र, सुस्नात श्वेतधवल रंग रसरसून येतो आणि उजेडाने पाठ केल्यावरच काळ्याला त्याचे शिसवी कृष्णरूप मिळते ना? स्पेन हा असा उजेडाचा वरदहस्त लाभलेला देश आहे. म्हणूनच तो रंगांच्या मखरात बसलेला आहे. रंगांची सारी रक्त-आरक्त-विरक्त रूपे पाहावीत तर ती स्पेनमध्ये!

स्पेन हा चित्रकारांचा देश आहे. शिल्पकारांचा देश आहे. स्थापत्यकारांचा देश आहे. संगीतकारांचा, नर्तकांचा, कलावंतांचा, साहित्यिकांचा देश आहे. चित्रकार पाब्लो पिकासो, फ्रान्सिस्को दी गोया, साल्वादोर दाली यांचा देश आहे तसाच वास्तुशिल्पज्ञ आन्तोनी गावदीचा देश आहे; डॉन क्विझोट ही अक्षर कादंबरी लिहिणाऱ्या मायकेल सेरवान्तेसचा देश आहे. स्पेन हा सर्जनशील देश आहे.

माद्रिद ही स्पेनची राजधानी आहे. माद्रिदसंबंधी एक दंतकथा आहे. माद्रिदचे नागरिक एकदा निसर्गदेवतेकडे गेले आणि म्हणाले, ‘‘माते, आम्हाला वर दे.’’ निसर्गदेवता म्हणाली, ‘‘तुम्हाला हवे ते मागा.’’ माद्रिदचे नागरिक म्हणाले, ‘‘आम्हाला उत्तम मद्य दे. चांगले सुग्रास खाद्य दे. आम्हाला सुंदर स्त्रिया दे.’’ निसर्गदेवता ‘तथास्तु’ म्हणाली. माद्रिदवासी म्हणाली, ‘‘माते, थांब- थांब. आणखी एक गोष्ट मागायची आम्ही विसरून गेलो. आम्हाला चांगले सरकार दे.’’ निसर्गदेवता म्हणाली, ‘‘एकदा तथास्तु म्टल्यानंतर मी पुन्हा वर देत नसते. त्यामुळे माद्रिदला अर्थात स्पेनला कधीच कार्यक्षम सरकार मिळाले नाही.

स्पेनच्या इतिहासातील सगळ्यात वाईट सरकार होते हुकूमशहा फ्रँकोचे. त्याचाही एक किस्सा मला माझ्या माद्रिदच्या भेटीत ऐकायला मिळाला. फ्रँकोच्या राजवटीत माद्रिदच्या लोकांना साध्या जीवनावश्यक गोष्टीही मिळत  नसत. एकदा माद्रिद शहरात पावासाठी भल्या मोठ्या रांगेत एक गृहस्थ उभा होता. रांग संपता संपेना, तेव्हा तो कंटाळून म्हणाला, ‘‘ही रांग पंधरा मिनिटांत संपली नाही तर मी माझे पिस्तुल घेईन आणि फ्रँकोला ठार मारीन!’’ ती रांग काही पंधरा मिनिटांत संपली नाही, त्यामुळे रागारागाने तो गृहस्थ तिथून निघून गेला. तासाभराने तो परत येऊन रांगेत उभा राहिला, तेव्हा लोकांनी विचारले, ‘‘काय हो, तुम्ही फ्रँकोवर गोळी झाडून आलात का?’’ त्यावर तो गृहस्थ म्हणाला, ‘‘काय सांगू, कप्पाळ! फ्रँकोला मारण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांची रांग याहून मोठी आहे, त्यामुळे कंटाळून इथे आलो!’’

माद्रिदला असताना प्राको मायोर या विख्यात चौकाला भेट दिलीच पाहिजे. या विस्तृत चौकाच्या मधोमध घोड्यावर स्वार झालेल्या एका अनामिक स्पॅनिश योद्ध्याचा पुतळा आहे. चोहोबाजूंना पिवळ्या रंगाच्या पुरातन इमारती आहेत. या साऱ्या इमारतींत एक साधर्म्य आहे. त्यामुळे चौकाला एक रेखीवपणा आलेला आहे. स्थानिक लोक आणि पर्यटक अष्टदिशांतील पक्ष्यांप्रमाणे चौकात स्वच्छंद बागडत असतात. चौकात ओपन-एअर रेस्टॉरंट आहेत.

माद्रिदचे सगळ्यात नामांकित रेस्टॉरंट म्हणजे मार्सिदा सान मिंगेल. हे रेस्टॉरंट तारांकित हॉटेलमध्ये नाही, प्राका मायोरच्या थोडे पुढे असलेला सामान्य माणसांच्या आवाक्यातला तो फूड कोर्ट आहे. त्या फूड कोर्टला भिंती नाहीत. त्याला चारी बाजूने आरसे आहेत. आरशांची दारे उघडून आत जायचे. आत भरपूर उजेड आणि वारा. मधे खुर्च्या व टेबले आणि सभोवती वेगवेगळ्या रेस्टॉरंट्‌सचे काऊंटर्स. त्याशिवाय तुम्ही टेबल-खुर्ची घेऊन बसल्यावर तुमच्याजवळ मद्य व खाद्य यांची ट्रॉली येते आणि तुमची ऑर्डर घेते. ती ती व्यवस्था! सगळीकडे स्वच्छता आणि टापटीप. कसलाच गोंधळ नाही, आवाज नाही. मंद संगीताची धून. हलक्या आवाजात लोक गप्पा मारत मद्याचे घुटके घेत स्पॅनिश जेवणाचा आस्वाद घेतात, असे चित्र!

माद्रिदचा रॉयल पॅलेस हा वास्तुस्थापत्याचा देखणा नमुना आहे. ही भव्य वास्तू पाहण्यास अर्धा दिवस पुरत नाही. ही वास्तू माद्रिदवर राज्य करणाऱ्या मुरिश  (मुसलमान) राजाने बांधली. मग या वास्तूचे ख्रिस्तीकरण करण्यात आले.

माद्रिदचं प्रादो म्युझियम तर पाहिलंच पाहिजे. हे म्युझियम अतिशय लक्षपूर्वक पाहायला दोन दिवस हवेत. प्रादो म्युझियममध्ये पाब्लो पिकासो, साल्वादोर दाली, फ्रान्सिस्को दी गोया यांची चित्रे आहेत. यापैकी फ्रान्सिस्को दी गोया यांच्या चित्रांचे खास वैशिष्ट्य आहे. अन्य चित्रकारांना फारसा न आवडणारा काळा रंग हा गोयाचा आवडता रंग आहे. त्यामुळे पांढऱ्या कॅनव्हासवर काळ्या रंगात रंगवलेले काळेकभिन्न आफ्रिकन निग्रो, वादळात सापडलेल्या काळ्या होड्या, काळ्या सिद्दी सैनिकांची युद्धे, आफ्रिकेतील पूर आणि पुराने घातलेले थैमान... ही आणि अशी विविध वैचित्र्यपूर्ण चित्रे पाहिली की, गोया हा चित्रकलेतला शेक्सपिअर वाटू लागलो. चित्रकलेतील शोकांतिकेचा तो खचितच नायक आहे.

बार्सिलोना हे स्पेनमधील माद्रिदनंतरचे दुसरे मोठे शहर. बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिंपिकनंतर त्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. बार्सिलोना शहराशेजारी समुद्र आहे. पण बार्सिलोना शहराने समुद्राकडे पाठ केली आहे, असे म्हणतात. आणि ते खरेच आहे! बार्सिलोना शहरातून हिंडताना समुद्राचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही. बार्सिलोना शहराहूनच अमेरिकेच्या (खरे म्हणजे भारताच्या) शोधास जहाजे घेऊन कोलंबस निघाला. म्हणून बार्सिलोना शहरात कोलंबसचे स्मारक आहे.

बार्सिलोनातला सगळ्यात विख्यात रस्ता आहे तो ला राम्बाला! वीक-एंडला या रस्त्यावर जत्राच भरते. या दुहेरी रस्त्याच्या मधोमध ओपन-एअर रेस्टॉरंट्‌स आहेत. तिथे स्पॅनिश लोक आणि पर्यटक गाँग्रिलाचे घोट मजेत घेत तपस-पथिला या स्पॅनिश जेवणाचा आस्वाद घेतात.

स्ट्रीट फर्निचर हे एक युरोपचे वैशिष्ट्य आहे. स्ट्रीट फर्निचर म्हणजे सामान्य माणसांची विविध पोझेसमधील शिल्पे. हे सगळे पर्यटकाच्या दृष्टीने फोटो पॉइंट्‌स- म्हणजे, फोटो घेण्यालायक जागा असतात. त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे, काही हौशी कलाकार मंडळी वेगवेगळे वेष घालून रस्त्यावर पुतळ्यासारखी न हलता-डुलता उभी राहतात. त्यांच्या शेजारी उभे राहून तुम्हाला फोटो काढता येतो. पण तिथे ठेवलेल्या हॅटमध्ये पैसे टाकावे लागतात. ला राम्बालासारख्या रस्त्यावर संगीतकार आपले संगीत पेश करून पैसे मिळवतात. चित्रकार तुमचे हुबेहूब चित्र काढून देतात. तोच त्यांचा व्यवसाय असतो. फोटोग्राफर परंपरागत स्पॅनिश वेषात तुम्हाला फोटो काढून देतो.

ला राम्बालाच्या डाव्या बाजूला पाहाल तर प्राका द रुई हा चौक आहे. हा चौक प्राका मायोरची छोटी आवृत्ती आहे. ह्या चौकातही सभोवती ओपन-एअर रेस्टॉरंट्‌स आहेत. इथेच एका रेस्टॉरंटमध्ये बसून सुशांताने आणि मी शांग्रिलाचे घोट-घेत घेत प्रॉन्स तपस, चीज, ऑलिव्हस, चिकन पायेला यांचे जेवण आरामात घेतले. स्पॅनिश जेवणात ऑलिव्ह ऑईलचा खूप उपयोग करतात. हे ऑईल स्वादिष्ट आणि आरोग्याला चांगले, असे म्हणतात. पायेला हा पदार्थ आपल्या बिर्याणीसारखा असतो. त्याचाही रंजक इतिहास आहे. अरबांनी आपला पुलाव हिंदुस्थानात आणला. मोगलांनी त्याची बिर्याणी केली. ती इटलीत गेली. तिचा रिझोटा झाला. तिथून हा रिझोटा स्पेनमध्ये पोचला. त्याचा त्यांनी पायेला केला. संस्कृतीची सरमिसळ ही अशी खाद्य पदार्थांतही होते. पायेला खाता-खाता ह्या वैश्विक परागीभवनाची कहाणी मी सुशांताला सांगितली. ती ऐकताना सुशांताचे पायेलाच्या रेसिपीविषयी कुतूहल जागे झाले.

बार्सिलोना शहराशी महान वास्तुशिल्पज्ञ अन्तोनी गावडी यांचे नाव एवढे निगडित झालेले आहे की, चंदीगड सोडले तर दुसरे कोणतेच शहर नाही की एखाद्या शहराशी एखाद्या वास्तुशिल्पज्ञाचे नाव इतके निगडित व्हावे!

आन्तोनी गावडीच्या उत्तुंग प्रतिभेचा विलास म्हणजे बार्सिलोनाची साग्रादा फॅमिली चर्चची भव्य वास्तू! या चर्चला दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणे गोपुरे आहेत. ही गोपुरे एवढी अतिभव्य आणि उच्च आहेत की, त्यामुळे या गगनाभिमुख वास्तूभोवती एक वेगळेच आध्यात्मिक वलय निर्माण व्हावे! चर्चमधल्या आरशांवरील फ्रेस्को पेंटिंग्जमुळे वास्तू रमणीय झाली आहे. या रंगीत आरशांतून येणारा उजेड वास्तूला एक वेगळी झळाळी प्राप्त करून देतो. साग्रादा फॅमिली चर्चला एक फेमिनिन सौंदर्य आहे. माता मेरीचे कौमार्य आहे. चर्चमधला अल्तार अन्तोनी गावडीने असा बसवला आहे की- तो पाहताच मन प्रसन्न व्हावे, उदात्त व्हावे. ख्रिस्ताच्या त्या प्रार्थना मंदिरात सामुद्रिक शांती होती.

नकळत मी हात जोडले... ते माता मेरी आणि तिचा पुत्र येशू ख्रिस्ताला वंदन करण्यासाठी होते, का अन्तोनी गावडीच्या थोर स्थापत्याला ती वंदना होती- कोण जाणे!

पाँडिचेरीची अरविंदाश्रमाची वास्तू तशी साधी आहे, पण तिथेही असाच आध्यात्मिक अनुभव येतो. ऑरोविलमधील  मातृमंदिराची वास्तू तर तुम्हाला वेगळ्याच जगात नेते. या वास्तूंचे आंतरिक सौंदर्य त्या वास्तू तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात परावर्तित करतात.

दुसऱ्या दिवशी पहाटे-पहाटे आम्ही अन्तोनी गावडीने डिझाईन केलेल्या पार्क गुयेलाला भेट दिली. गावडी हा केवळ वास्तुशिल्पज्ञ नव्हता, शिल्पकारही होता. पार्क गुयेला ही अक्षरश: ‘सा रम्या नगरी’ आहे. इथे गावडीने पानझाडे, फुलझाडे, फळझाडे आणि दगडी शिल्पे यांतून रम्य स्वप्ननगरी निर्माण केली आहे. मग आम्ही शहरात गावडीने बांधलेली दोन घरे पाहिली. उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मेळ घालणे सगळ्यांनाच जमते असे नाही; अन्तोनी गावडीला ते जमले.

अन्तोनी गावडीचा तरुण वयात प्रेमभंग झाला, त्यामुळे जन्मभर तो अविवाहितच राहिला. वृत्तीने तो अत्यंत धार्मिक होता. साग्रादा फॅमिली चर्चची वास्तू पूर्ण करण्यात मग्न असताना एका संध्याकाळी विचारात तल्लीन असलेल्या गावडीला रस्त्यावरच्या ट्रकने धक्का दिला. तीन दिवसांनी गावडीचे हॉस्पिटलात निधन झाले. या श्रेष्ठ वास्तुशिल्पकारास श्रद्धांजली वाहण्यासाठी स्पेनने तीन दिवस दुखवटा पाळला आणि राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला.

सेंट सेबेस्टाँव हे शहरही दर्याकिनारी आहे, पण बार्सिलोना आणि सेंट सेबेस्टाँव यात किती फरक आहे! बार्सिलोना हे समुद्रविन्मुख शहर आहे, तर सेंट सेबेस्टाँव हे समुद्रसन्मुख शहर आहे. बार्सिलोना हे थोडेसे माणूसघाणे शहर आहे. तिथे कोण कोणाला ओळखत नाही. बार्सिलोनात फिरताना हरवल्यासारखे होते. सेंट सेबेस्टाँव हे मोठे खेळकर, फ्रेंडली शहर आहे. समुद्रातील शिंपल्यांतून आलेले ते जिते-जिवे सेंद्रिय शहर आहे. बार्सिलोनाचा नटवेपणा, नाटकीपणा नाही सेंट सेबेस्टाँवमध्ये! म्हणून सेंट सेबेस्टाँवबद्दल लगेच आपलेपणा वाटू लागतो.

या शहरातून समुद्राला भेटायला इच्छुक नदी वाहते. शहरात अर्धगोलाकार रस्ता आहे, तो समुद्राला समांतर आहे. त्याचे नाव सिक्स क्लॉक. कारण सायंकाळी सहा वाजता या रस्त्यावरील दिवे पेटतात आणि हा रस्ता दिव्यांच्या लखलखाटात समुद्राच्या गळ्यातील चंद्रहारासारखा सुंदर दिसतो. शहरातच छोटासा डोंगर आहे. त्यावर चढले की, शहराचे आणि समुद्राचे विहंगम दर्शन घडते. समुद्रात इला सान्ता क्लारा- इला म्हणजे छोटे बेट, अर्थात सान्ता क्लारा नावाचे छोटे बेट आहे. तिथे लोक सहलीला जातात. शहरात रोगराई आली होती, तेव्हा लोक या बेटावर राहायला गेले होते, असे सांगतात.

सेंट सेबेस्टाँव शहरात ज्यू क्वार्टर आहे. तिन्हीसांजेला आम्ही ज्यू क्वार्टरमध्ये गेलो. तो भाग पर्यटकांनी खच्चून भरून वाहत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने घरे, मधेच दुकाने, रेस्टॉरंट्‌स, एक सिनेगॉग आणि कोबल्ड स्ट्रीट... ज्यू क्वार्टरने आपले पुरातनत्व सांभाळून ठेवले आहे. सर्पिणीने कात टाकावी तशी त्याने कात टाकली नाही. काळ जणू इथे गोठला आहे- सगळा भागच जणू फॉसिलाइज्ड झाला आहे! इथल्याच एका ताव्हेर्नमध्ये बसून आम्ही रेड वाईनचे घुटके घेत बीफ स्टेक आणि सी फूड पायेला याचे जेवण घेतले.

दुसऱ्या दिवशी आम्ही सेंट सेबेस्टाँवहून होन्दासिबिया या एका ‘बुटिक’ खेड्यात जाऊन आलो. बॅकवॉटर आणि छोटासा डोंगर यांच्यामधे रोमन लोकांनी वसवलेले हे छोटेसे टुमदार खेडे. खेड्यात एक किल्ला. किल्ल्यातच एक इगर्ज. खेड्यात रहिवाशांची छोटी-छोटी घरे. घरापुढे फुलझाडे, फुलवेली. खेड्यात शॉपिंगचा एकच रस्ता. तिथे हँडिक्राफ्टची-कपड्याची काही दुकाने, एक कॉफी शॉप. तिथे आम्ही कॉफी घेतली. होम मेड प्लम केकची चव पाहिली. वाटेत स्पेनची कंट्रीसाईड पाहायला मिळाली. ऑलिव्हची शेते, सूर्यफुलांची शेते, मक्याची शेते सर्वदूर पसरली होती. पाईनचे वृक्ष डोंगरापर्यंत दिसत होते. स्पेनमध्ये टोमॅटोचीही भरपूर लागवड होते. त्यामुळे स्पेनच्या एका शहरात एकमेकांवर पिकलेले टोमॅटो फेकायचा उत्सव असतो. सूर्यफुलांना पाहिले की, मला व्हॅन गॉगची आठवण होते. व्हॅन गॉगच्या आयुष्याची शोकांतिका झाली, पण त्याने आपल्या चित्रांतून जगभरच्या रसिकांना अमाप आनंद दिला. स्पेनमध्ये मैलच्या मैल मोकळे असलेले हिरवे- पिवळे, कापणी केलेले शेत दिसते. नुकत्याच प्रसूत झालेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जे समाधानी भाव दिसतात, ते प्रसन्न भाव त्या शेतावर सकाळचे धारोष्ण-वस्त्रगाळ उन पडले की दिसू लागतात.

व्हेनिशिया शहरांतून तुरिया नदी वाहते. फेलिक्स केनेडेला ह्या वास्तुशिल्पज्ञाने ह्या शहरात ओशनोरियम बांधला आहे. ह्या ओशनोरियममध्ये समुद्रविषयक म्युझियम आहे. ॲक्वेरियम आहे. ॲक्वेरियममध्ये पेंग्विन, शॉर्क, व्हेल आणि विविध छोटे-मोठे मासे आहेत. इथे माशांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल आहे. अंडरवॉटर हॉटेल व रेस्टॉरंट आहे. मुलांसाठी वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्‌स आहेत.

व्हेनिशिया शहरात दीपस्तंभासारखा एक टॉवर आहे. तो  शहराचा मानदंड आहे. या टॉवरशेजारीच मेरकारो सेंट्रल नावाचे सिटी मार्केट आहे. तिथे वेगवेगळी फळे, भाज्या, मासे, हवाबंद पदार्थ उपलब्ध असतात. बाजार हा मला जिवंत म्युझियमच वाटतो. परदेशात प्रवास करताना मी तेथील म्युझियम्सला भेटे देतो, तसा या जिवंत म्युझियममध्येही जातो. तिथे हाडा-मांसाची माणसे भेटतात. म्युझियममधल्या मृत शिल्पांपेक्षा आणि चित्रांपेक्षा मला ती महत्त्वाची वाटतात. त्यातून मला अधिक अर्थबोध होतो. माणसे वाचणे, हा माझा छंद आहे.

मेरकारो सेंट्रलमध्ये सुशांताने ऑलिव्ह ऑईलच्या बाटल्या घेतल्या आणि त्या दुकानादाराने तिला पायेलाची रेसिपीही दिली. तिथे सुशांताने केशराच्या डब्याही घेतल्या. स्पेनमधील कलिंगडे अतिशय रसाळ व गोड असतात. आम्ही कलिंगडाचा थंडगार रस प्यायलो. कलिंगडाच्या फोडी असलेले दोन बाऊल घेतले आणि ते खात मेरकारो सेंट्रलमध्ये रमत-गमत आरामात फिरलो.

व्हेनिशिया शहरात ख्रिश्चन आर्ट्‌स म्युझियम आम्ही बघितले. ते फारच सुरेख आहे. ‘गर्वसे कहे हम हिंदू है’ म्हणणाऱ्या हिंदुस्थानात कुठेच असे ‘हिंदू आर्ट्‌स म्युझियम’ मी पाहिलेले नाही.

ग्रेनेडा शहराचे नाव पोमेग्रेनेड (डाळिंब) ह्या फळावरून पडले. ग्रेनेडा शहराच्या परिसरात डाळिंबाचे भरपूर पीक येत असल्यामुळे या शहराला ग्रेनेडा हे नाव पडले. फळावरून गावाला नाव पडण्याची उदाहरणे आंब्यावरून ‘आंबेगाव’, चिंचेवरून ‘चिंचाळ’. झाडावरून गावाला पडलेले नाव, वडावरून वडोदा. पक्ष्यावरून गावाला पडलेली नावे, मोरावरून मोरजी, मोराची चिंचोली, मोरपिर्ल. सरपटणाऱ्या प्राण्यावरून पडणारे नाव, नागावरून नागेशी, नगर्से अशी आहेत.

गोव्यामधल्या प्रत्येक चर्चची वास्तू एकसारखी आहे, पण स्पेनमधल्या प्रत्येक कॅथेड्रलची वास्तू वेगळी आहे. ग्रेनेडाच्या कॅथेड्रलची वास्तू तशीच अतिभव्य व वैशिष्ट्यपूर्ण आहे. उंचीमुळे तिला वेगळा आयाम आणि परिमाण लाभला आहे. अर्थात भिंतीवरील रंगीत आरसे आणि आरशांवरील फ्रेस्को पेंटिंग्ज हे वैशिष्ट्य तिथेही आहे. ग्रेनेडाच्या कॅथेड्रलमध्ये बायबलमधील अनेक प्रसंग चित्रित आणि शिल्पित केलेले आहेत.

ग्रेनेडावर अनेक शतके मुरिश राजांचे राज्य होते. म्हणून इथे अरेबिक क्वॉर्टर आहे. गोव्यात आहेत तसे स्यूडोराष्ट्रवादी लोक स्पेनमध्ये नसावेत, त्यामुळे स्पेनचा कटू इतिहास त्यांनी पर्यटकांना दाखवणे टाळले नाही.

स्पेनच्या प्रवासातील अतिशय संस्मरणीय होती ती पुनवेची रात्र. त्या रात्री आम्ही ग्रेनेडाच्या डोंगरावर आहहाब्राचा किल्ला व राजवाडा पाहायला गेलो. हा किल्ला व राजवाडादेखील मुरिश राजाने अनेक शतकांपूर्वी बांधलेला होता. किल्ल्याच्या भिंतीवरील अरेबिक लिपी त्याची साक्ष देत होती. राजवाड्यात मधोमध पाण्याचे हौद आणि हौदांत कारंजी होती. हौदाच्या चारी बाजूला फुलझाडांची रांगोळी होती. संगमरवरी राजवाडा पुनवेच्या चांदण्यात लखलखत होता. त्याचे प्रतिबिंब विस्तृत हौदात पडले होते. ते दृश्य नयनमनोहर होते. हे स्थापत्य इस्लामिक होते. जागोजाग पाण्याचा वापर आणि त्यामुळे स्थापत्याला लाभणारे सेंद्रियत्व हे इस्लामिक स्थापत्याचे खास वैशिष्ट्य इथेही दिसत होते. राजवाड्याच्या छतावर व भिंतीवर केलेले कोरीव काम अप्रतिम होते.

ग्रेनेडात आम्ही मुरिश राजांनी बांधलेला अल काजार हा राजवाडाही पाहिला. मुरिश, गॉथिक, बरोक आणि रेनासान्स अशा विविध शैलींच्या संमिश्रणाने स्पॅनिश स्थापत्य समृद्ध झाले आहे. ग्रेनेडाच्या बाजारात गोड, लाल, रसरशीत डाळिंबे मिळतील, ही आमची अपेक्षा फोल ठरली. बाजारात दिसला तो केवळ कलिंगडांचा ढीग!

सेविल शहरात आम्ही स्पेनमधील प्रसिद्ध ‘बुल रिंग’ पाहिली. बुल रिंग म्हणजे बुल फाइट्‌स- बैलाच्या झुंजी जिथे होतात, ते स्टेडियम. साधारणत: मे ते ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या काळात ह्या बैलांच्या झुंजी होतात. सुमारे दहा हजार लोकांना बसायची सोय असलेले हे स्टेडियम! जिथे उन पडते, त्या जागांच्या तिकिटांच्या किमती कमी असतात. बैलांच्या झुंजीचा दिवस बहुधा गुरुवार असतो. आम्ही सेविलला सोमवारी पोहोचलो आणि बुधवारी आम्हाला सेविलवरून परतायचे होते, त्यामुळे बैलांच्या झुंजी पाहण्याची आमची संधी हुकली होती.

झुंजीच्या पहिल्या दिवशी सहा बैलांना आणून सहा खोल्यांत बांधतात. झुंजीच्या दिवशी मेटाडोर येतो. मेटाडोर म्हणजे तांबडा भरजरी वेष घालून, हातात भाला घेऊन घोड्यावर बसून येणारा आणि बैलांना भाला टोचून हुसकावणारा व संतप्त करणारा माणूस. हे सहा मेटाडोर आधी तिथल्या छोट्या कपेलात येशूला नमन करतात, मग आपापल्या बैलांना घेऊन स्टेडियमवर येतात. दोन-दोन बैलांची झुंज सुरू होते, ती एक बैल मरेपर्यंत थांबत नाही. बैल मेल्यावर चार घोड्यांचे कार्द (गाडी) येते व मेलेल्या  बैलाचे पार्थिव घेऊन जाते. झुंज चालू असताना लोक जल्लोष करतात. मेलेल्या बैलाच्या मांसाची मग विक्री होते. या अमानुष प्रकाराची माहिती ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. आम्ही प्राण्यांचे भोक्ते असल्यामुळे ही झुंज सुशांताला आणि मला पाहवलीच नसती!

बैलांतील झुंजीतला बैल हा स्पॅनिश पुरुषार्थाचे चिन्ह मानले जाते. सोव्हिनिर शॉपमध्ये झुंजीसाठी सज्ज असलेला बैल आणि तांबड्या भरजरी वेषातील मेटाडोर यांची चित्रे, छोटे-छोटे पुतळे मिळतात. असे असले तरी, बैलांच्या झुंजी बंद व्हाव्यात म्हणून स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये हजारो लोक निदर्शने करतात, असेही आम्ही स्पेनच्या प्रवासात वृत्तपत्रांत वाचले. स्पेन हा प्रचंड विरोधाभासाचा देश आहे.

सेविलमध्ये आम्ही फ्लेमिन्सीओ हे खास स्पॅनिश नृत्य पाहिले. हिप्पी लोकांनी हे नृत्य स्पेनला आणले, असे म्हणतात. ताल, नाद, सूर, स्वर, गीत, संगीत, नाच यांच्या मिश्रणाने होणारे वादन आणि नर्तन म्हणजे फ्लेमिन्सीओ! या नृत्यात एक सुंदर नर्तिका आकर्षक वेषात सुरुवातीला गाते. तिचे पूर्ण अंग झाकणाऱ्या त्या तिच्या वेषाचे वजनच दहा ते पंधरा किलो असते. तिला साथ द्यायला शर्ट-पँट आणि जॅकेट घालून एक तरुण स्टेजवर येतो. गायन संपल्यानंतर ते दोघेही तालबद्ध नृत्य करतात. गिटार, सेक्सोफोन यांचे पार्श्वसंगीत असते. गायनात इस्लामिक प्रार्थनेचे सूर असतात. तीच आर्तता, तीच गूढ-गहनता. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संगीताचे आणि नाचाचे परागीभवन होऊन या नव्या फ्लेमिन्सीओ नाचाचा जन्म झाला, असे म्हणता येईल. फ्लेमिन्सीओ हा अप्रूप अनुभव होता.

आमच्या स्पेनच्या प्रवासात आम्ही फिगेरेसो या साल्वादोर दालीच्या जन्मगावाला भेट दिली आणि त्याच्या चित्रांचे व शिल्पांचे म्युझियम पाहिले. साल्वादोर दाली हा चित्रकारांमधला सिग्मंड फ्रॉइड म्हणता येईल. त्याने आपल्या चित्रांना मानसशास्त्राच्या पातळीवर नेले. स्वप्ने जशी अर्थहीन असतात, तशी त्याची चित्रे अर्थहीन आहेत. चित्रे सुबोध असायला हवीत, त्यांचा अर्थ रसिकांना कळायलाच हवा- हा आग्रह साल्वादोर दालीला पसंत नव्हता.

कला ही खाद्य (इडिबल) वस्तू आहे, अशी भन्नाट कल्पना दालीने मांडली आणि आपल्या चित्रांतून व शिल्पांतून ती दाखवून दिली. महायुद्धातून आलेले वैफल्य, जीवनातील वैर्थ्य त्याने आपल्या कलेतून व्यक्त केले. साल्वादोर दाली म्हणे- मी आणि वेडा यांत एकच फरक आहे, तो म्हणजे मी वेडा नाही!

साल्वादोर दालीने आपल्या शिल्पांत अंड्याचा खूप उपयोग केला. अंडे फुटून बाहेर आलेले नार्सिससचे फूल हे त्याचे प्रसिद्ध चित्र आहे. याशिवाय मानवी कवटी, टायर्स, रिकाम्या बाटल्या, स्पेअर पाटर्‌स, सांगाडे, फॉक्सवॅगन बिटल गाडीचा मोल्ड यांचा त्याने आपल्या शिल्पांत कल्पकतेने उपयोग केला.

साल्वादोर दालीच्या म्युझियमला मोठे अंगण आहे आणि सभोवती त्याचे म्युझियम आहे. मेल्टिंग क्लॉक्स हे दालीचे सर्वश्रेष्ठ चित्र आहे. या चित्रातून साल्वादोर दालीने काळाची संदर्भहीनता दाखवली आहे. एका प्रकारे स्टीफन्स हॉकिंग्जच्या किती तरी वर्षे आधी तो त्याच्या तत्त्वज्ञानाकडे पोचला होता. ज्यांनी स्टीफन हॉकिंग्जचे 'The Brief History of Time' हे पुस्तक वाचले असेल, त्यांना ठाऊक असेल- काळ या संकल्पनेस काहीच अर्थ नाही. ती मानवी सोईसाठी केलेली संकल्पना आहे. विश्वनिर्मितीपूर्वी काळ ही संकल्पनाच नव्हती. कृष्णविवरात तर काळ गोठूनच जातो. साल्वादोर दाली तर त्याही पुढे गेला आहे. तो म्हणतो, ‘काळ वितळू शकतो!’

स्पेनच्या प्रवासात सतत आठवण होत होती ती डॉन क्विझोट ही अक्षर कादंबरी लिहिणाऱ्या सेरवान्तीसची! एका म्युझियममध्ये या कादंबरीचे हस्तलिखित सांभाळून ठेवले आहे. ते पाहून मी धन्य झालो!

माद्रिदमधल्या एका म्युझियममध्ये पाब्लो पिकासोची काही चित्रे पाहिली, पण ती पाहून आमचे समाधान झाले नाही. त्यामुळे बार्सिलोनाहून दोन तासांचा बसचा प्रवास करून आम्ही मालगा या पाब्लो पिकासोच्या जन्मगावात आलो आणि तिथे असलेले त्याच्या चित्रांचे व शिल्पांचे म्युझियम पाहिले.

पाब्लो पिकासो हे स्पेनला त्याच्या साखरझोपेत पडलेले मधाळ स्वप्नच होते. पिकासोमुळे चित्रकलेने आपले रूळ बदलले. फोटोग्राफीच्या शोधामुळे चित्रकारापुढे एक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पिकासोने त्या प्रश्नचिन्हापुढे उद्‌गारचिन्ह निर्माण करून त्याला उत्तर दिले. पिकासोने क्युबिझमचे नवे घराणे चित्रकलेत आणले. पिकासोच्या चित्रात बालसदृश निरागसता असायची. त्याची काही चित्रे मुग्ध तर काही गूढ, काही सुबोध तर काही अगम्य. सगळे रंग पिकासोला वश होते. ब्रश तर जणू पिकासोच्या शरीराचाच एक अवयव होता. पिकासोच्या चित्राचे एकेक थर असायचे. पापुद्रे असायचे. ते काढत गेले, तर त्याच्या  चित्रात एक ‘गाज’ ऐकू यायची- समुद्राची गाज. एक स्पंदन. एक अंतर्नाद. एक वायब्रन्स. काळाची गतिमानतास्थिर करण्याचे कौशल्य पिकासोला साध्य झाले होते. 

भास आणि आभास, स्वप्न आणि वास्तव, मानवी आणि अमानवी यांचा मेळ-सुमेळ पिकासोने आपल्या चित्रांत केला. माणूस आणि पशू यांचे द्वैत पाब्लोने कधीच मानले नाही. त्यामुळे त्याने कधी मानवी आकृतींचे अमानुषीकरण केले, तर कधी पशूंचे मानवीकरण केले. सामोरी आणि पाठमोरी रूपे त्याने एकमेकांत गुरफटून टाकली. पिकासोच्या चित्रांत साधेपण होते. त्याच्या चित्रांत फुलाचा ताजेपणा व टवटवीतपणा होता, झुळूझुळू वाहणाऱ्या झऱ्याचा पारदर्शीपणा होता.

पाब्लो पिकासोच्या चित्रात विनोद असायचा, उपरोध असायचा. म्हणून पिकासो म्हणायचा- I make Paintings that bite- माझे चित्रे तुम्हाला (कुत्र्याप्रमाणे) चावतील! आपली चित्रे दिवाणखान्यांतील भिंतीवर लावायच्या शोभेच्या वस्तू नव्हेत; माझी चित्रे म्हणजे मी केलेले राजकीय भाष्य- असे पिकासो म्हणायचा. म्हणूनच त्याने युद्धातील हिंसाचारावर केलेले ‘गेर्निका’ हे त्याचे चित्र जगभर गाजले.

आयुष्याच्या उत्तरायणात पिकासो साम्यवादी पंथाचा सदस्य झाला. पुढे-पुढे मात्र त्याचा साम्यवादी पक्षाबद्दल व साम्यवादी तत्त्वज्ञानाबद्दल भ्रमनिरास झाला.

क्युबिझमला जन्म देताना पिकासो भूमितीकडून त्रिमितीकडे वळला. त्याने उच्च गणिताचा अभ्यास केला. वस्तू दिसते तशी नसते, त्यामुळे वस्तूचे अंतरंगही रंगवले पाहिजेत- या परिप्रेक्ष्यातून तो चित्रे काढू लागला. एकाच चित्रात स्त्रीचे दोन-दोन डोळे, दोन-दोन चेहरे काढायचे तंत्र त्याने विकसित केले. मानवी अवयवांचे विरूपीकरण तो करू लागला. पिकासोला नग्न स्त्रीदेहाचे भयंकर आकर्षण होते. नग्नता ही कलात्मक आहे, असे त्याला वाटायचे. पिकासो भूतकाळात रमणारा चित्रकार नव्हता. आपले सर्वश्रेष्ठ चित्र ‘यापुढचे’- असे तो नेहमीच म्हणे.

पिकासो हा वृत्तीने मूर्तिभंजक होता, तो म्हणायचा... "You have to wake people up, to revolutionalise their way of identifying things, You have got to create images they won't accept. A world that is not what they think it is."

पिकासो हा निसर्गपूजक होता, तो म्हणे... "I hear Stones Cry. Bricks Cry. Trees Cry. Rivers Cry. Nature Cry. I hear Their inner voice."

पिकासोच्या अंतर्मनाला निसर्गाचे आक्रंदन ऐकू येत होते आणि त्याच्या चित्रांतून ते परावर्तित होत होते. पिकासोच्या जीवनात ब्ल्यू पिरिएड आणि पिंक पिरिएड असे दोन कालखंड आले. ब्ल्यू पिरिएड हा त्याच्या आयुष्यातला नैराश्याचा काळ होता. या काळात त्याने आपली चित्रे निळ्या रंगात रंगवली. पुढे त्याने वैफल्यावर मात केली व त्याच्या जीवनात गुलाबी काळ आला. मग त्याच्या चित्रांत उबदार, सकारात्मक रंग आले.

पिकासोने आपली काही सेल्फ पोर्ट्रेट्‌स काढली. त्याने अनेक शिल्पेही केली. आपली चित्रे व शिल्पे त्याने अनेक म्युझियम्सना व साम्यवादी देशांतील चौकांत ठेवण्यासाठी मोफत दिली.

पाब्लो पिकासोच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या. आपल्या आयुष्यात सगळे शारीरभोग त्याने आकंठ भोगले. ओल्गा खोखेलोवा, मारिया तेरेझा आणि डोरा मारिया या तीन स्त्रिया त्याच्या चित्रांत त्याने चित्रबद्ध केल्या. पाब्लो पिकासोला यशस्वी दीर्घायुष्य लाभले. व्हॅन गॉग किंवा हेमिंग्वेसारखी त्याच्या जीवनाची शोकांतिका झाली नाही.

स्पेनचा प्रवास संपला. आता कधी सुशांता स्पेनमधून आणलेल्या ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करून प्रॉन्स, कॅ्रब्ज, ऑयस्टर्स यांची सरमिसळ करून छान स्पॅनिश सी- फूड पायेला बनवते... त्याचा आस्वाद घेऊन मी वॉल्तेरावर बसतो आणि स्पेनच्या प्रवासाची आठवण काढतो; तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर सगळे रंगच रंग येतात!

पाब्लो पिकासोच्या चित्रांतील निळा रंग, मेटाडोरच्या वेषाचा लाल रंग, फ्रान्सिस्को गोयाच्या चित्रांतील काळा रंग, साग्रादा फॅमिलीच्या चर्चमधील फ्रॅस्को पेंटिंग्जमधील जांभळा रंग, फ्लॅमिन्सीओ नाच करणाऱ्या नर्तिकेच्या वेषाचे पिवळा रंग, ताज्या ऑलिव्हचा हिरवा रंग आणि अटलांटिक महासागरातील लाटांवरील फेसाचा पांढरा रंग... रंगच रंग!

रंगांची सारी रक्त-आरक्त-विरक्त रूपे पाहावीत, तर स्पेनमध्ये!

Tags: पिंक पिरिएड ब्ल्यू पिरिएड पिकासो दत्ता नायक पाब्लो पिकासोचा स्पेन निसर्गपूजक फ्लेमिन्सीओ बुल रिंग ग्रेनेडा ख्रिश्चन आर्ट्‌स म्युझियम सेंट सेबेस्टाँव साग्रादा फॅमिली चर्च अन्तोनी गावडी स्ट्रीट फर्निचर ला राम्बाला बार्सिलोना रॉयल पॅलेस फ्रँको निसर्गदेवता साल्वादोर दाली फ्रान्सिस्को दी गोयाझ पाब्लो पिकासो माद्रिद स्पेन उजेड रंग Godess of nature Nature Worshipper Flamenco Dance Bull Ring Greneda Christian Art Museum Saint Sebastian Church Sagrada Familia Church Antoni Gaudi Street Furniture La Rambla Barcelona Salvador Dali Royal Palace Francisco Franco Franciso D Goya Territory Clime Region Country Nation land Home Overseas Foreign Abroad Desh-Videsh Black Light Colours Pink period Blue period Datta nayak Madrid Pablo Picasso weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके