डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व्हिएतनाम हा मूळ व्हिएत लोकांचा देश. इथले 86 टक्के लोक व्हिएत आहेत. पण देशाच्या वायव्येला अनेक अल्पसंख्य जमाती राहतात. अशा 53 जमाती येथे आहेत. वेगवेगळे 54 आदिवासी समूह देशात राहतात. त्यांनी आपली सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांभाळून ठेवली आहेत. येथील खेड्यांतली घरे आयताकृती असतात. त्यांची छपरे गवताची असतात. या घरांचे स्वयंपाकघर घरापासून वेगळे असते. कारण छप्पर गवती असल्यामुळे स्वयंपाकघराला आग लागल्यास ती सर्व घरभर पसरून घर आगीत खाक होऊ नये. इथली घरे बहुमजली नसतात, त्यामुळे घर वाढवायचे झाल्यास दोन्ही बाजूने घराला काटकोन करून खोल्या वाढवतात.

व्हिएतनामने गरिबीवर मात करण्यात यश मिळवले आहे. देशातील फक्त 8 टक्के नागरिक गरिबी रेषेखाली आहेत. देशातील बेकारी 2 टक्के एवढी कमी आहे. हा देश राजकीय दृष्ट्या साम्यवादी असला, तरी 1990 च्या दशकात देशाने आर्थिक क्षेत्रात खुले धोरण स्वीकारले.

जगाच्या नकाशावर असे अनेक देश आहेत, ज्यांची आपल्याला फारशी ओळख नसते. त्या देशांना भेट द्यावी, असेही आपल्याला वाटत नाही. आपल्या मर्यादित पर्यटनविश्वात जसा काही तो देश अस्तित्वातच नसतो. असा एक देश म्हणजे दक्षिण-पूर्वेकडचा व्हिएतनाम. युरोप, अमेरिका, कॅनडा, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे रंगीत, भरजरी देश डोळ्यांपुढे असताना व्हिएतनामसारखा साधा देश आपल्याला आठवत नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी व्हिएतनामला आवर्जून भेट दिली. त्याचे कारण म्हणजे, व्हिएतनामचे नेते हो चि मिन्ह यांचे जीवन व कार्य याबद्दल मला असलेले विलक्षण आकर्षण. या छोट्या राष्ट्राने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुमारे दोन दशके कशी टक्कर दिली, हे जाणून घेण्याची उत्सुकता आणि या साम्यवादी देशाने आर्थिक क्षेत्रात कशी मुसंडी मारली, हे पाहण्याचा उद्देश.

व्हिएतनाममध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की, येथे पाहण्यासारखे खूप काही आहे. या बौद्ध देशाला दर वर्षी सुमारे 1 कोटी 20 लाख पर्यटक भेट देतात. व्हिएतनामने बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या पायावर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा मनोरा कसा रचला, हेदेखील मी जाणून घ्यावे, असा विचार करून मी या भूमीवर पाय ठेवला.

रेड रिव्हरच्या काठावर असलेले हनोए शहर ही व्हिएतनामची राजधानी आहे. व्हिएतनामची लोकसंख्या 9 कोटी, तर हनोएची 90 लाख आहे. हनोए हे फार पुरातन शहर आहे. या शहराची स्थापना 2010 मध्ये झाली. या शहराचा हजारावा वाढदिवस 2010 मध्ये शहरातील नागरिकांनी थाटामाटात साजरा केला. हनोए शहराचे जुने हनोए आणि नवे हनोए असे दोन विभाग आहेत. यातला नव्या हनोएचा भाग सर्वसाधारण शहरासारखा आहे. पण जुन्या हनोएचा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. जुन्या हनोएच्या मध्यवर्ती भागात एक विस्तृत तळे आहे. त्याच्याभोवती वृक्षराजी आहे.

तळ्याच्या मधोमध मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी सुबक रंगीत लाकडी साकव आहे. मंदिराच्या दारापाशी लाकडी द्वारपाल आहेत. मंदिराच्या प्रकारात छोट्या-छोट्या कुंड्यांत वडाचे बोन्सॉय पाहायला मिळतात. या मंदिराची एक दंतकथा आहे. या तळ्यातील पाण्यातून सुवर्णकांतीच्या एका कासवाने येऊन राजाला जादूची तलवार दिली. त्या तलवारीने राजाने चिनी मिंग राजवटीचा पराभव केला, असे सांगण्यात येते.

तळ्यासमोर थिएटर आहे. तिथे पर्यटकांच्या रांगा पाहून आम्ही चौकशी केली. तिथे व्हिएतनाममधील वॉटर पपेट शो म्हणजे पाण्यातील कळसूत्री बाहुल्यांचा नाच चालू होता. आम्ही तो पाहण्यास गेलो. तो तासाभराचा कार्यक्रम होता. रंगमंचावर संपूर्ण तळे होते. त्या तळ्यातून बाहुल्या वर येत होत्या. मासे, मगरी, होडीवाले, मासे पकडण्यास येणारे कोळी, शेतात काम करण्यास येणाऱ्या स्त्रिया, शेत नांगरणारे शेतकरी, फळे खाण्यासाठी टपलेले माकड, राजाचे सेवक, राजाची हत्तीतून येणारी मिरवणूक-0 अशी दृश्ये पाण्यातील बाहुल्यांच्या आधारे दाखवली जात होती. बाहुल्या लोकनृत्येही करत होत्या, त्याला स्थानिक लोकसंगीताची साथ होती. येथे खेडेगावांतील शेतांत पुराचे पाणी आल्यावर गवताच्या बाहुल्या करून शेतकऱ्यांनी ही लोककला विकसित केली. आज या पाण्यातील कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग व्हिएतनामी लोककलाकार देश-विदेशांत करतात.

हनोएला गेल्यावर तेथील ओल्ड क्वार्टरला भेट दिलीच पाहिजे. ओल्ड क्वार्टर बराच मोठा आहे. तो आरामात पायी हिंडून किंवा सायकलरिक्षात बसून पाहता येतो. ओल्ड क्वार्टरमध्ये उभे-आडवे 36 रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याला नाव आहे. त्या रस्त्यावर एक विशिष्ट वस्तूच विकली जाते. त्यामुळे त्या वस्तूच्या नावाने तो रस्ता ओळखला जातो. उदाहरणार्थ- ड्रम स्ट्रीटवर फक्त ड्रम्स विकले जातात. शू स्ट्रीटवर फक्त चपला आणि बूट विकले जातात. असे बास्केट स्ट्रीट, सिल्क स्ट्रीट, बॅग स्ट्रीट, टॉय स्ट्रीट, चिकन स्ट्रीट, मसाला स्ट्रीट अशा नावाचे वेगवेगळे रस्ते इथे आहेत. मसाला स्ट्रीटवर चालताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ठेवलेले असतात की, त्यांच्या खमंग वासाने नाक दरवळून जाते!

हॅट स्ट्रीटवर आम्ही बांबूच्या त्रिकोणी हॅट्‌स घेतल्या. त्यावर होडी वल्हवणाऱ्या व्हिएतनामी तरुणीचे सुंदर रंगीत चित्र होते. बॅग स्ट्रीटवर छान कापडी बॅगा होत्या. त्यावर घुबडाची चित्रे होती. चित्रातील घुबडे खेळकर होती. आम्ही काही बॅगा खरेदी केल्या. भारतात आपण घुबडाला अशुभ मानतो. घुबडाचे चित्र कुठल्याही सोव्हिनेरवर भारतात दिसणार नाही. वास्तविक, घुबड हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो पिकाची नासाडी करणाऱ्या उंदरांना गिळंकृत करतो. त्यामुळे घुबडाला आपण शुभ मानले पाहिजे.

ओल्ड क्वार्टरची आणखी एक खासियत म्हणजे तिथले स्ट्रीट फूड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हिएतनामला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी येथील रस्त्यावरील रेस्टॉरंटमध्ये जाऊन स्टूलवर बसून 6 डॉलर्समध्ये थंड बिअर आणि गरमागरम राइस न्यूडल्सचे जेवण घेतले होते. आता त्या रेस्टॉरंटने बराक ओबामांनी जेवण घेतलेल्या रिकाम्या प्लेट्‌स, बिअरची रिकामी बाटली, टेबल, स्टूल याभोवती ग्लासची पारदर्शक भिंत उभारून पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले आहे.

व्हिएतनाम हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे तिथे भरपूर भाज्या व फळांचे उत्पादन होते. जमीन सुपीक असल्यामुळे तांदूळ भरपूर पिकतो. व्हिएतनामी जेवणात भात व ताज्या भाज्या यांचा समावेश असतो. राइस न्यूडल्स सूप हा इथला लोकप्रिय प्रकार आहे. समुद्राचे सान्निध्य असल्यामुळे माशांची विपुलता आहे. साहजिकच येथील जेवणात मासे व माशांपासून केलेले स्वादिष्ट फिश सॉस असतो. त्याशिवाय खेकडे, बीफ, पोर्क यांचाही समावेश असतो. नारळ भरपूर असल्यामुळे गोवा, कोकण या प्रदेशांतील जेवणाप्रमाणे व्हिएतनामी लोक नारळाच्या रसाचा वापर करतात.

येथे जेवणातला- अर्थात इथल्या स्ट्रीट फूडमधला आम्हाला आवडलेला पदार्थ म्हणजे चाका! हा पदार्थ त्यांनी आमच्या टेबलवरच बनवला. टेबलवर छोटी शेगडी आणून पेटवली. त्यावर परात ठेवून त्यात थोडे तेल ओतले. परातीत वेगवेगळ्या ताज्या भाज्या कापून त्यांचे तुकडे घातले. त्यानंतर त्यावर ताज्या माशांचे तुकडे घातले. हे मिश्रण तेलात तळून काढले. मग त्यावर फिश सॉस शिंपडला. या व्हिएतनामी चाक्यात कुठलेच मसाले नव्हते. असे असूनही तो चाका फारच रुचकर होता.

व्हिएतनाममध्ये कॉफीचे खूप उत्पादन होते. रस्त्यावरच्या स्टॉल्समध्ये बसून कडक-कडू कॉफी पिण्यात मजा येते. या कॉफीत ते साखर घालत नाहीत. त्यांनी साखरेचा पाक अर्थात शुगर सिरप बनवलेले असते. तुमच्या इच्छेप्रमाणे थोडे शुगर सिरप कडवट कॉफीत विरघळले की, कॉफी छान लागते. आंबा, फणस, कलिंगडे, अननस, पपया, मोसंबी ही सर्व ट्रॉपिकल फळे रस्त्याच्या बाजूला मांडून विकणारे विक्रेते असतात. पण या विक्रेत्यांना मायक्रो सेलिंगचे तत्त्व माहीत असते. फणस कापून त्याचे गरे, आंबे कापून त्याच्या फोडी ते छोट्या पॅकेटमध्ये विकतात. व्हिएतनामच्या प्रवासात आम्ही इथल्या गोड फळांवर यथेच्छ ताव मारला. इथल्या ॲव्हाकाडो फळाचा रस किंवा स्मूथी फारच स्वादिष्ट लागते. ती पौष्टिकही असते.

व्हिएतनामी लोक भाज्यांची किंवा फळांची नासाडी होऊ देत नाहीत. इथे अन्नप्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान खूप पुढारलेले आहे. फणसाच्या गरांपासून पाणी शोषण करून (डिहायड्रेशन) इथे त्याच्या चिप्स करतात. याच प्रकारे बटाटे, रताळी, केळी, बीटरूट्‌स, भेंडी यांच्याही चिप्स येथे बनवल्या जातात. येथे काजू आणि शेंगदाण्यांचे उत्पादन होते. व्हिएतनाम हा भारतापाठोपाठ काजूगर उत्पादन करणारा दुसरा देश आहे. व्हिएतनामाची या क्षेत्रातली मुसंडी पाहिली, तर नजीकच्या भविष्यकाळात उत्पादन व निर्यात या दोन्ही क्षेत्रांत हा देश भारतावर मात करेल.

ओल्ड क्वार्टरमधील विक्रेत्याकडून फणसाच्या चिप्स व शेंगदाण्याचे हवाबंद डबे घेतले. खारवलेले, आंबवलेले शेंगदाणे खाणे किंवा कुरकुरीत चिप्स खाणे हा एक चांगला टाइमपास आहे. खरे म्हणजे खाण्याचे मानसशास्त्र तपासून पाहिले, तर आपल्याला भूक लागली म्हणून आपण खात नाही; आपल्याला कंटाळा आला म्हणून आपण काही ना काही खात असतो. आपण सतत कुठल्या तरी सर्जनशील किंवा उत्पादक कामांत तल्लीनपणे मग्न असू, तर आपल्याला खाण्याची आठवणही राहत नाही!

जगात कुठल्याही शहरात साहित्याचे मंदिर (टेम्पल ऑफ लिटरेचर) असल्याचे मला ज्ञात नाही. हनोएमध्ये या नावाची सुंदर पुरातन वास्तू आहे. खरे म्हणजे, ते प्राचीन चिनी विद्यापीठ आहे. त्या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वास्तूच्या आवारात असलेली सुमारे 9 विस्तृत अंगणे आणि प्रत्येक अंगणात प्रवेश करण्यापूर्वी उभारलेली पौर्वात्य पद्धतीची रंगीत प्रवेशद्वारे. शेवटच्या अंगणानंतर असलेल्या मंदिरवजा वास्तूत कॅन्फ्युशियसचा रंगीत बैठा पुतळा आहे. बाजूला त्याच्या शिष्यांचे पुतळे आहेत. कॅन्फ्युशियस हा फार मोठा तत्त्वचिंतक इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात चीनमध्ये जन्माला आला. कॅन्फ्युशियसचा मानवाच्या अंगभूत नैतिकतेवर विश्वास होता. अनैतिक माणसेही सुधारू शकतात, असे त्याला वाटत होते.

योग्य विचार, योग्य करणी, विश्वास, न्याय आणि दया हे पाच गुण आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात विकसित केले पाहिजेत, असा उपदेश कन्फ्युशियस करायचा. व्हिएतनाम हा साम्यवादी देश असल्यामुळे ह्या देशाला कुठलाच अधिकृत धर्म नाही. पण देशातले काही लोक कॅन्फ्युशियसचा धर्म मानतात. बहुसंख्य लोक मात्र वैयक्तिक पातळीवर बौद्ध धर्म मानतात. संपूर्ण व्हिएतनाममध्ये बौद्ध धर्म, या धर्माचे विहार व पॅगोडा यांचे अस्तित्व जाणवते.

नव्या हनोएच्या मध्यवर्ती भागात व्हिएतनामचे नेते हो चि मिन्ह यांचे स्मृतिस्थळ आहे. हो चि मिन्ह यांचे 1969 मध्ये निधन झाल्यावर त्यांचे पार्थिव या स्थळी जतन करून ठेवण्यात आले आहे. काळोख्या खोलीतील काचेच्या पेटीत ठेवलेल्या हो चि मिन्हच्या पार्थिवाचे दर्शन मंद उजेडात आम्हाला घेता आले. स्मृतिस्थळाच्या आवारातच हो चि मिन्ह यांचे राहते घर आहे. ते पाहून हो चि मिन्ह राष्ट्राध्यक्ष असूनही कोणतीच औपचारिकता न पाळता किती साधेपणाने राहत होते याची कल्पना येते. ब्रह्मचारी असल्यामुळे घरात ते एकटेच राहत होते. त्यांच्या साधेपणामुळे व्हिएतनामी जनतेला हा नेता आपल्या कुटुंबातलाच जवळचा नातेवाईक वाटला.

हो चि मिन्हला ते ‘अंकल हो’ म्हणू लागले. हो चि मिन्ह हा व्हिएतनामचा जॉर्ज वॉशिंग्टन किंवा महात्मा गांधी होता. फरक एवढाच की, महात्मा गांधींनी भारताला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. हो चि मिन्ह यांना त्यासाठी अहिंसक लढा उभारावा लागला. हो चि मिन्ह एकदा म्हणाले होते की, ‘भारतात व्हिएतनामप्रमाणे फ्रेंच राजवट असती, तर महात्मा गांधींना आपला अहिंसक लढा एका आठवड्यात गुंडाळावा लागला असता!’

व्हिएतनामवर इसवीपूर्व दुसऱ्या शतकापासून इसवीसनाच्या आठव्या शतकापर्यंत एक हजार वर्षे चिनी राजवट होती. 1858 ते 1954 ही सुमारे शंभर वर्षे व्हिएतनामवर फ्रेंचांनी राज्य केले. यामध्ये 1941 ते 1945 अशी 4 वर्षे जपानने फ्रेंचकडून व्हिएतनामचा कब्जा मिळविला. व्हिएतनामचे 1954 मध्ये उत्तर व दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन झाले. उत्तर व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळून हो चि मिन्ह राष्ट्राध्यक्ष झाले, पण दक्षिण व्हिएतनामवर अमेरिकेचे आधिपत्य आले. 1954 पासून 1975 पर्यंत 21 वर्षे व्हिएतनामला अमेरिकेशी युद्ध करावे लागले.

अमेरिकेने 1975 मध्ये व्हिएतनाममधून माघार घेतली. उत्तर व दक्षिण व्हिएतनामचे विलीनीकरण झाले व व्हिएतनामला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. पण त्याआधीच 1969 मध्ये हो चि मिन्हचे निधन झाले होते. हो चि मिन्हच्या स्मरणार्थ कृतज्ञ देशाने सायगाव या दक्षिण व्हिएतनाममधल्या प्रमुख शहराचे नामकरण हो चि मिन्ह सिटी असे केले.हो चि मिन्हचा जन्म 1890 मध्ये व्हिएतनाममधल्या खेड्यातील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी जहाजावर नोकरी धरून परदेशगमन केले. नोकरीच्या निमित्ताने त्यांनी आफ्रिका, युरोप व अमेरिका या खंडांतील देशांना भेट दिली.

हो चि मिन्ह हे साम्यवादी विचारसरणीने प्रभावित होऊन पॅरिसला फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी चीन व रशियाला भेट दिली. हो चि मिन्हनी व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 1930 मध्ये केली. 1941 मध्ये त्यांनी व्हिएतनाममध्ये प्रवेश केला, तर 1945 मध्ये जपानने व्हिएतनाममधून माघार घेतल्यानंतर हो चि मिन्हनी पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली व ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष झाले. पण फ्रेंच सरकारने त्यांना मान्यता दिली नाही. त्यामुळे 1945 ते 1954 अशी 9 वर्षे त्यांना फ्रेंच राजवटीशी युद्ध करावे लागले. 1954 मध्ये जिनिव्हा करार झाला आणि व्हिएतनामचे विभाजन होऊन हो चि मिन्ह अधिकृतपणे स्वतंत्र उत्तर व्हिएतनामनचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1954 ते 1969 म्हणजे त्यांच्या निधनापर्यंतची 15 वर्षे त्यांनी अथक परिश्रम करून राष्ट्रउभारणीचे काम केले.

शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांबरोबरच औद्योगिकीकरण व संसाधन यावर त्यांनी भर दिला. चीन व रशिया या साम्यवादी देशांकडून हो चि मिन्ह यांनी भरपूर आर्थिक साह्य घेतले. हो चि मिन्ह यांनी जमीन सुधारणा कायदे आणि गरिबीनिर्मूलन याकडे जातीने लक्ष दिले. याशिवाय दक्षिण व्हिएतनामचा कब्जा असलेल्या अमेरिकेशी गनिमी युद्ध करण्यात त्यांची बरीच शक्ती खर्च झाली. व्हिएतनामचे आजचे अस्तित्व हो चि मिन्हच्या कर्तृत्वाशिवाय शक्यच झाले नसते!

हनोएपासून दोन तासांच्या अंतरावर हॅलोंग बे नावाचे आखात आहे. या आखातात 2000 छोटी बेटे आहेत. या आखातातल्या ‘ला रेजिना ग्रॅण्ड’ नावाच्या लक्झरी क्रूझ बोटीवर आम्ही एक रात्र वास्तव्य केले. हॅलोंग बे हा व्हिएतनामच्या समुद्रातला आखाती प्रदेश सुमारे 30 ते 50 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला असावा. इथे पूर्वी महासागर होता. तो ओसरत गेला. हवेचे तापमान वाढत गेले. समुद्रातल्या कोरल रीफ मरून गेल्या. भूकंपामुळे जमिनीखालील पर्वत उसळून वर आले. त्यानंतरच्या हजारो वर्षांच्या काळात चुनखडीच्या दगडांची उत्पत्ती झाली. भूकंपामुळे पर्वतांचे तुकडे-तुकडे झाले. त्यानंतर हिमयुग आले. त्यानंतर बर्फ वितळून जगबुडी आली. मग पाणी ओसरून ही छोटी-छोटी बेटे, हे छोटे-छोटे अंगठ्याएवढे टेकड्यांचे सुळके आणि हे शांत, निवांत, संथ, निळ्या पाण्याचे आखात निर्माण झाले.

हॅलोंग बेच्या आखातात आम्ही होडीमधून जलसफर केली. इथल्या टेकड्यांनी आखातात नैसर्गिक बोगदे निर्माण केले आहेत. त्यातून जाताना मजा येते. भरतीच्या वेळी होडी सहज वल्हवता येते; पण ओहोटीच्या वेळी प्रवाहाच्या विरुद्ध होडी वल्हवावी लागते, तेव्हा फार प्रयास करावे लागतात. ला रेजिना ग्रॅण्डच्या डेकवर सरत्या उन्हात तिन्हीसांजेला अंधाऱ्या आकाशाखाली बसून सामुद्रिक वातावरणाचा आनंद घेणे, यात एक आगळा आनंद होता. पहाटेच्या वेळी आम्हाला आखातातल्या लगूनवजा तळ्यात नेण्यात आले.

तेथे आम्ही मनसोक्त कयाकिंग केले. इथल्या बेटांवर 13000 लोक राहतात. त्यापैकी 3000 लोक आखातात तरंगती घरे बांधून राहतात. बहुतेकांचा धंदा मासेमारी व शेती हा आहे. काही बेटांवर लिचीरूची फळे भरपूर पिकतात. एका बेटाचे नाव कॅट बा अर्थात वुमन्स आयलॅण्ड म्हणजे स्त्रियांचे बेट असे आहे. पण त्या बेटावर स्त्रियांबरोबर पुरुषही राहतात. या बेटावरील दुर्जन डोंगरातील एका गुहेत अमेरिकन युद्धात सैनिकांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल उघडण्यात आले होते. त्यामुळे या गुहेला ‘हॉस्पिटल केव्ह’ म्हणतात. आम्ही ही दुर्गम गुहा पाहून चकित झालो.

होयान हे व्हिएतनाममधले दुसरे महत्त्वाचे शहर. ते युबॉन नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. हनोएप्रमाणे होयान शहरातही ओल्ड टाऊन आहे. पण नदीच्या काठावरील हे ओल्ड टाऊन हनोएमधल्या ओल्ड क्वार्टरप्रमाणे रस्टिक नाही. ते फार देखणे आहे. तिथे नदीच्या दोन्ही काठांवर जुन्या व्हिएतनामी घरांत दुकाने आणि रेस्टॉरंट्‌स थाटली आहेत. नदीच्या एका फाट्यावर जुना लाकडी रंगीत जपानी पूल आहे. जवळच बौद्ध प्रार्थनामंदिर आहे. विणलेले कपडे, बॅगा, खेळणी, सोव्हिनीर्स, हस्तकाम यांचे विक्रेते, ताजी फळे विकणारे, कॉफी शॉप्स, स्ट्रीट फूड स्टॉल्स यांनी ओल्ड टाऊन व्यापला आहे.

संध्याकाळी इथे दिव्यांचा झगझगाट होतो. त्या दिव्यांची हलती प्रतिबिंबे नदीच्या पात्रात पडतात. नदीवर पूल आहेत, पण पर्यटक होड्यांतून पैलतीरी जाणे पसंत करतात. होयानचे ओल्ड टाऊन पाहून व्हेनिसची आठवण आल्याशिवाय राहत नाही. येथील सर्व शहरे स्वच्छ आहेत. कुठेच कचऱ्याचे ढीग नाहीत. कुठेच झोपडपट्टी दिसत नाही. कुठेही भीक मागणारे भिकारी नाहीत.

होयान शहरापासून तासाभराच्या अंतरावर बाना हिल्स नावाचे हिल स्टेशन आहे. बाना हिल्स म्हणजे खरे तर बनाना हिल्स. केळींची लागवड असल्याने या डोंगराला प्रथम बनाना हिल्स आणि पुढे फ्रेंच लोक बाना हिल्स म्हणू लागले. फ्रेंचांनीच हे हिल स्टेशन विकसित केले. इथली हवा फारच थंड व सुखद आहे. बाना हिल्सच्या पर्वतावर रोपवेने जावे लागते. नंतर काँक्रीटच्या दोन अजस्र हातांवर उभारलेल्या गोल्डन ब्रिजवरून आपण पर्वतावरच्या पठारावर पोचतो. तिथे प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांचे रंगीबेरंगी पुतळे उभारून आणि सुरेख फुलझाडे लावून लव्ह गार्डन नावाची छान बाग विकसित केली आहे. पर्यटनस्थळाच्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याला पूरक असे कृत्रिम आकर्षक संसाधन कसे निर्माण करावे, यात व्हिएतनामचे उदाहरण आपण डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे.

बाना हिल्सवर लेडी बुद्धाचा पॅगोडाही आहे. पुरुष दैवतांचे स्त्रीकरण करण्याचा मोह मानवी संस्कृतीच्या एका विशिष्ट टप्प्यात उपासकांना का व्हावा, हे एक गूढच आहे. हिंदू धर्माने शंकराला अर्धनारीनटेश्वराचे रूप तर दिले आहेच; पण त्याशिवाय खजुराहो, ग्वाल्हेर या उत्तर भारतातील देवळांत विष्णू, नृसिंह, गणपती या पुरुष दैवतांची शिल्पे स्त्रीरूपात आपल्याला पाहायला मिळतात. विष्णूच्या स्त्रीरूपाला नारायणी, तर गणपतीच्या स्त्रीरूपाला विनायकी असे नाव असल्याचा उल्लेख सापडतो. बौद्ध देशांत बुद्धाचे स्त्रीरूप आपल्याला दिसते. बुद्धाला मातृरूपात पाहण्याचा का हा प्रयत्न आहे? कोण जाणे! गोव्यात स्त्री दैवतांचे पुरुषीकरण करण्याची पद्धत आहे.

बाना हिल्सच्या दुसऱ्या टप्प्याच्या पठारावर फ्रेंच व्हिलेज आहे. फ्रेंचांनी इथे फ्रान्सचा किंवा युरोपचा एखादा भागच अलगद उचलून आणून ठेवला आहे, असे वाटू लागते. इथल्या सगळ्या इमारती युरोपियन धर्तीच्या आहेत. मध्यवर्ती भागात कारंजे आणि त्याच्यासमोर कॅथेड्रल आहे. सभोवती रेेस्टॉरंट्‌स आणि सोव्हिनीर्स शॉप्स आहेत. इथे फिरताना वेळ कसा जातो तेच समजत नाही.

व्हिएतनामच्या पर्वतराजींत निन्ह बिन्ह नावाचे रम्य स्थळ आहे. रेड रिव्हरच्या फाट्यातून होडीतून प्रवास करावा लागतो. मग पर्वताच्या पठारावर पोचल्यावर निसर्गरम्य स्थळी बौद्ध पॅगोडा आहेत. या स्थळाचे कौमार्य आणि पावित्र्य भंग होऊ नये, म्हणून व्हिएतनाम निन्ह बिन्हला फारशी प्रसिद्धी देत नाही. त्यामुळे आम्हीही निन्ह बिन्हला गेलो नाही. मग आम्हाला त्याचा पश्चात्ताप झाला. व्हिएतनामला जाणाऱ्यांनी निन्ह बिन्हचे पॅगोडा पाहणे चुकवू नये. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पाचशे पायऱ्या चढून पर्वताच्या टोकावर जाऊन निन्ह बिन्ह पर्वतराजीचे विहंगम दृश्य पाहावे. निन्ह बिन्हचे फोटो आणि व्हिडिओ पाहून तिथे न जाण्याची चूक आम्ही केली, याची हुरहूर आम्हाला प्रवासात सतत लागत होती.

सायगाव- ज्याचे नामकरण हो चि मिन्ह सिटी असे करण्यात आले, ते दक्षिण व्हिएतनाममधले शहर सायगाव नदीच्या काठावर आहे. त्याची लोकसंख्या 90 लाखांच्या आसपास आहे. या शहरात पॅरिस शहरातील नॉत्र दाम कॅथेड्रलची हुबेहूब प्रतिकृती दिसावी, असे नॉत्र दाम कॅथेड्रल आहे. त्याच्या शेजारी फ्रेंच वास्तुशिल्पातील भव्य व देखणी अशी पोस्ट ऑफिसची वास्तू आहे. फ्रेंच राजवटीमुळे व्हिएतनामचे खूप नुकसान झाले, पण फ्रेंचांमुळे व्हिएतनाममध्ये सुंदर वास्तुशिल्पाच्या इमारती उभ्या झाल्या. बाना हिल्ससारखे हिल स्टेशन निर्माण झाले.

फ्रेंचांमुळे व्हिएतनाममध्ये कॉफी व काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. बेकरी उद्योग फ्रेंचांनी व्हिएतनाममध्ये आणला. त्यांनी व्हिएतनामला रोमी लिपी दिली आणि तेथील लोकांनी आपल्या भाषेची लिपी सोडून रोमी लिपीचा स्वीकार केला. हा फार मोठा व महत्त्वाचा निर्णय होता. आज प्राथमिक स्तरापासून विद्यापीठापर्यंतचे शिक्षण रोमी लिपीतील व्हिएतनामी भाषेतून दिले जाते. मात्र ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली तशी फ्रेंचांनी उत्तर-दक्षिण जोडणारी रेल्वे आणली नाही. ती आणली असती, तर फ्रेंचांनी व्हिएतनामला दिलेले ते फार मोठे योगदान ठरले असते. आजही येथे दक्षिणोत्तर जोडणारी रेल्वे अस्तित्वात नाही.

सायगावला आमचे वास्तव्य होते, ते मॅजेस्टिक हॉटेल 1925 मध्ये उघडले होते, म्हणजे येत्या 5 वर्षांत त्याची शताब्दी साजरी होणार आहे. अमेरिका-व्हिएतनाम युद्धाचा गुरुत्वमध्य सायगाव शहर होते. या युद्धाच्या काळात मॅजेस्टिक हॉटेलचा वापर सैनिकांना राहण्यासाठी करत होते. सायगाव शहराचा पाडाव 1975 मध्ये झाल्यानंतर अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेतली.

सायगाव शहरापासून 3 तासांच्या अंतरावर कुची टनेल्स आहेत. ती आम्ही पाहायला गेलो, सुमारे 500 किलोमीटर्स लांबीची ही जमिनीखाली खोदलेली टनेल्स 1945 ते 1975 या तीन दशकांच्या फ्रेंच व अमेरिकेविरुद्धच्या युद्धात लढताना व्हिएतनामच्या सैनिकांनी वापरली. या टनेल्समध्ये जास्तीत जास्त 5000 सैनिक राहू शकत होते. त्यात त्यांना राहण्याची, झोपण्याची, जेवणाची, प्राथमिक उपचार करण्याची सोय होती. काही ठिकाणी टनेलचे तोंड नदीच्या पात्रात उघडत होते. त्यामुळे सैनिक नदीच्या पात्रातून पळून जाऊ शकत होते. 1954 ते 1975 या 21 वर्षांच्या अमेरिकेविरुद्धच्या घनघोर युद्धात अडीच लाख व्हिएतनामी सैनिक ठार झाले. अमेरिकेेने व्हिएतनामी शहरांवर वा गावांवर केलेल्या बॉम्बफेकीत 20 लाख नागरिक मरण पावले. या युद्धात 60,000 अमेरिकन सैनिकांना व्हिएतनामी सैनिकांनी कंठस्नान घातले.

व्हिएतनामसारख्या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाविरुद्ध युद्ध जिंकताना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमी काव्याचा वापर केला. पण त्यांना ना शिवाजीमहाराज माहिती होते, ना त्यांचे गनिमी काव्याचे तंत्र. व्हिएतनाममध्ये शिवाजीमहाराजांचा पुतळा आहे, ही गोष्टही खोटी आहे. अशा अफवा सोशल मीडियावर प्रसृत होतात, त्यावर कोणी विश्वास ठेवू नये.

सायगावपासून जवळच मेकाँग नदीचे खोरे आहे. ती लाओस, कंबोडिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांतून वाहत समुद्राला मिळते. तिची लांबी 4350 किलोमीटर्स आहे. ती आशियातली सातवी आणि जगातली बारावी लांब नदी आहे. मेकाँग नदीचे खोरे सुपीक असून त्यात लोक भातशेती करून तांदळाचे उत्पादन घेतात. म्हणून मेकाँगच्या खोऱ्याला व्हिएतनामचा राइस बाऊल म्हणतात. याशिवाय या खोऱ्यात भरपूर फळे व भाज्या पिकतात. नदीच्या काठावर माड व बांबूची झाडेही खूप आहेत. नारळापासून स्वादिष्ट टॉफीज व वाईन करणारे लघुत्तम उद्योग आहेत. बांबूच्या दोरापासून इथे त्रिकोणी रंगीत टोप्या करतात. या रंगीत टोप्या ही व्हिएतनामची सिग्नेचर सोव्हिनीर आहे. इथे मधाचेही उत्पादन होते. स्त्रिया बांबूपासून कावड करतात. त्यात ताज्या भाज्या व फळे घालून विकायला येतात.

एक ग्रामीण स्त्री बांबूच्या एका कावडीत ताजी भाजी आणि दुसऱ्या कावडीत आपली दोन जुळी तान्ही मुले बसवून आली होती. ते चित्र मोठे मजेदार होते. मला तिचा फोटो काढायचा होता. पण वरवर निरागस दिसणारी ती स्त्री बेरकी होती. फोटोसाठी पोझ देण्यासाठी ती दोन डॉलर्स मागू लागली. मला तिच्या बेरकीपणाचा राग आला. मी तिला दोन डॉलर्स दिले नाहीत आणि तिचा फोटोही काढला नाही.

मग माझे मन द्विधा झाले. तिला दोन डॉलर्स दिले असते, तर चालले नसते का? एक छान फोटो माझ्या संग्रहात जमा झाला असता! पण नाही; साध्या फोटोसाठीही पैसे देण्याची सवय आपण ग्रामीण लोकांना लावली, तर त्याच्या निरागस संस्कृतीला आपण आपल्या व्यापारी संस्कृतीचे नख लावून ती नासवून टाकू. बहुधा विदेशी पर्यटकांनी फोटो काढल्यावर टिप्स देण्याची सवय करून त्यांना बिघडवले असावे.

केरळात मला असाच अनुभव आला. एका निर्जन जागी मी तिथल्या रहिवाशाला पुढील गावात जाण्याचा रस्ता विचारला, तर तो माझ्याकडे चक्क पैसे मागू लागला. याउलट, इटलीत माझे हॉटेल दाखवण्यासाठी एक स्थानिक इसम अर्धा किलोमीटर चालत माझ्याबरोबर हॉटेलपर्यंत आला. प्रवासात असे अनुभव येतात.

मेकाँग या शब्दाचा अर्थ नद्यांची आई. व्हिएतनाममध्ये स्त्री मातृरूपात तर दिसतेच, पण तिने आपले स्त्रीरूप सांभाळून सर्व मानवी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. व्हिएतनामी स्त्रिया होड्या वल्हवतात. सायकली, मोटारसायकली, रिक्षा चालवतात. त्या टॅक्सी ड्रायव्हरही आहेत. त्या टूर गाईड्‌स आहेत. त्या दुकाने चालवतात. त्या वेटर्स, कॅशियर्स, मॅनेजर्स अशा सर्व रूपांत दिसतात.

व्हिएतनाम हा मूळ व्हिएत लोकांचा देश. इथले 86 टक्के लोक व्हिएत आहेत. पण देशाच्या वायव्येला अनेक अल्पसंख्य जमाती राहतात. अशा 53 जमाती येथे आहेत. वेगवेगळे 54 आदिवासी समूह देशात राहतात. त्यांनी आपली सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांभाळून ठेवली आहेत. येथील खेड्यांतली घरे आयताकृती असतात. त्यांची छपरे गवताची असतात. या घरांचे स्वयंपाकघर घरापासून वेगळे असते. कारण छप्पर गवती असल्यामुळे स्वयंपाकघराला आग लागल्यास ती सर्व घरभर पसरून घर आगीत खाक होऊ नये. इथली घरे बहुमजली नसतात, त्यामुळे घर वाढवायचे झाल्यास दोन्ही बाजूने घराला काटकोन करून खोल्या वाढवतात.

व्हिएतनामने गरिबीवर मात करण्यात यश मिळवले आहे. देशातील फक्त 8 टक्के नागरिक गरिबी रेषेखाली आहेत. देशातील बेकारी 2 टक्के एवढी कमी आहे. हा देश राजकीय दृष्ट्या साम्यवादी असला, तरी 1990 च्या दशकात देशाने आर्थिक क्षेत्रात खुले धोरण स्वीकारले. देशातील बचतीचा दर केवळ 17 टक्के होता. गुंतवणुकीच्या नजरेने तो फारच कमी असल्याचे अर्थतज्ज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे देशाचे औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण करायचे असेल तर, विदेशी गुंतवणुकीचे स्वागत केलेच पाहिजे, हे त्यांनी राजकीय नेतृत्वास पटवून दिले.

जागतिकीकरण म्हणजे आंतरराष्ट्रीयीकरण या परिपे्रक्ष्यातून व्हिएतनामी साम्यवादी पक्षाने जागतिकीकरणाकडे पाहायचे ठरवले. प्राप्त परिस्थितीत जागतिक अर्थव्यवहाराच्या परिघाबाहेर राहणे देशाला परवडणार नाही, हा विचार केला. विदेशी भांडवलाबरोबरच तंत्रज्ञान व विज्ञान यांच्या आयातीवर देशाने भर दिला. मानवी संसाधन बळाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक केली. गुड पीपल - गुड डीड्‌स ही गौतम बुद्धाच्या समीकरणावर आधारित लोकचळवळ सरकारने सुरू केली आणि लोकांच्या व्यक्तिमत्त्वविकासावर भर दिला.

राष्ट्रप्रेम व राष्ट्रउभारणीची महत्त्वाकांक्षा यातून हो चि मिन्ह आणि त्यांच्यानंतर राष्ट्रीय पुढारी हे लॅटिन अमेरिका, आफ्रिका या देशांतील राजकीय नेत्याप्रमाणे भ्रष्टाचारी झाले नाहीत. त्यामुळे विकासाच्या क्षेत्रात व्हिएतनामने आश्चर्यजनक भरारी मारली.

आज शेती, मासेमारी, पर्यटन, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, फर्निचर, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक, खनिज तेल, कोळसा हे देशांतील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, फळे, काजू, कॉफी, मासे, लाकूड, फर्निचर, वस्त्रे यांची व्हिएतनाम मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो.

व्हिएतनाममध्ये चीनमधल्या बीजिंग शहराप्रमाणे प्रदूषण नाही. हवा स्वच्छ आहे. साम्यवाद असूनही अधिकारशाही नाही, गुप्तता नाही. चिनी राजवटीप्रमाणे नागरिकांचा छळ नाही. रशियाप्रमाणे गरिबी नाही. राजकीय क्षेत्रातला साम्यवाद सांभाळून देशाने आर्थिक क्षेत्रात भांडवलशाहीचा आधार घेऊन प्रगती केली आहे. व्हिएतनामचा साम्यवाद चिनी आणि रशियन साम्यवादाप्रमाणे कठोर नाही, तर बुद्धाच्या करुणेने ओथंबलेला सहृदय आहे.

कासव हे व्हिएतनामचे प्रतीक आहे. व्हिएतनामच्या पॅगोड्यात कासवाचे शिल्प नेहमी असते. प्रत्येक व्हिएतनामी माणूस कासवासारखा असतो. त्यांच्यात कासवासारखी चिकाटी आणि संयम असतो. त्यामुळेच तीन दशकांच्या दीर्घ, प्रदीर्घ युद्धानेही तो खंगला नाही वा वाकला नाही. युद्धानंतर मोठ्या चिकाटीने त्याने राष्ट्रउभारणीचे काम केले आहे.

हो चि मिन्हच्या व्हिएतनामला आपण भेट दिलीच पाहिजे. अनेकदा आपण देशाचे नैसर्गिक सौंदर्य पाहायला त्या देशाला भेट देतो. असे नैसर्गिक सौंदर्य येथे आहेच, पण व्हिएतनामी नागरिकाचे आंतरिक सौंदर्य पाहायलाही आपण व्हिएतनामला गेलेच पाहिजे.

Tags: चीन बराक ओबामा अमेरिका साम्यवादी टॉय स्ट्रीट बॅग स्ट्रीट सिल्क स्ट्रीट स्ट्रीट स्ट्रीट फूड स्टॉल्स कॉफी शॉप्स शिल्प कासव पॅगोडा व्हिएतनाम chin America barak obama samywadi ty strit bag strit silk strit strit strit food stal strips cophy shops kasaw shilp pagoda viatnam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके