डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अलास्का सर्पासारखी आपली कात वर्षानुवर्षे टाकत असतो. कधी गोठणे, कधी वितळणे ही प्रक्रिया लाखो वर्षे चालूच आहे. अलास्काचे लोक तुम्हाला निरोप देताना सांगतात- ‘इथून जाताना येथील आठवण म्हणून इथला थोडासा बर्फ घेऊन जा, तेवढाच इथला बर्फ कमी होईल.’ पहाटे साखरझोपेत असताना बोटीचा सायरन वाजला तेव्हा लक्षात आले- अरे, आपली बोट सिॲटलच्या किनाऱ्यावर लागली; आपला अलास्काचा प्रवास संपला! मी साखरझोपेतून नाखुशीने जागा झालो. डोळ्यांपुढे अलास्काचे हिमखंड आले, तेव्हा ओठांतून उद्‌गार आले- आह! अलास्का!  

आर्क्टिक महासागरात उत्तर ध्रुवाशेजारी अलास्का आहे. दहा हजार वर्षांपूर्वी इथे बर्फच बर्फ होता. त्यानंतर हिमखंड वितळू लागले, भूमीवर आले. तद्‌नंतर कधी काळी इथे मानवाचे वास्तव्य सुरू झाले.

सन १७१५मध्ये कॅप्टन जॉर्ज व्हँक्युअर हा सर्वप्रथम आपले जहाज घेऊन कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आला. त्याची स्मृती म्हणून पश्चिम किनाऱ्यावरील या बंदराचे नाव कॅनडाने व्हँक्युअर ठेवले. आज व्हँक्युअर हे कॅनडातील मोठे शहर म्हणून ओळखले जाते. जॉन मूर हा निसर्ग व प्राणी यांचा अभ्यासक १८८४मध्ये त्याहून पुढे पोहोचला आणि झोपडी बांधून तिथे काही वर्षे राहिला. येथील हिमखंडांचा, वनस्पतींचा, प्राण्यांचा, माशांचा त्याने अभ्यास केला. विल्यम कूपर याचे अलास्काच्या भूमीत १९१४मध्ये आगमन झाले. त्याच्याच प्रयत्नाने अलास्का ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली. दरम्यान, अलास्काचा हा भूखंड अमेरिकेने रशियाकडून विकत घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी १९७५मध्ये अलास्का कॉन्झेर्व्हेशन ॲक्ट अमेरिकन सिनेटमध्ये संमत करून घेतला.

अलास्काच्या भूमीवर एस्किमो आणि ट्रलिंगिट या समूहांतील लोक वास्तव्य करतात. एस्किमो हे इग्लू नावाच्या अर्धगोलाकार घरांत राहतात. एस्किमो लोकांची स्वत:ची वेगळी भाषा आहे. या भाषेत बर्फाच्या विविध स्थितीला वेगवेगळे शब्द आहेत. उदाहरणार्थ- इंग्रजीत बर्फाला ‘आइस’ आणि ‘स्नो’ असे दोन शब्द आहेत. एस्किमोच्या भाषेत ‘स्नाइस’ अशा अर्थाचा शब्द आहे. ‘स्नाइस’ म्हणजे ‘स्नो’ आणि ‘आइस’ यांच्या मधील बर्फाची स्थिती! अलास्कातील रहिवाशांचे स्वरूप आदिवासी लोकांसारखे आहे. आदिवासी लोकांची प्राणिदर्शक चिन्हे (Totem) असतात. आदिवासी लोकांत मानव आणि प्राणी, मानव आणि वनस्पती- किंबहुना, मानव आणि निसर्ग यांचे मैत्र दिसते. इथे Animals are non-humans with souls that connect with people... म्हणजे प्राणी हे आत्मा किंवा मन असलेले माणसासारखे सचेतन असे निसर्गाचे अंश मानले जातात. येथील घरे निसर्गावर घाला घालणारी नाहीत. निसर्गातून अळंब्यांप्रमाणे उगवलेली ही घरे सेंद्रिय आणि अकृत्रिम असतात. या घरांना आत्मा असतो, ऊर्जा असते. अलास्कातील लोकांच्या गरजा माफक असतात. अस्वले, रानबकऱ्या हे येथील भूचर प्राणी; तर देवमासे, सामन, शार्क (मोरी) सी-लायन हे  येथील जलचर प्राणी. अलास्कातील लोक शिकार व मासेमारी करून जगतात.

एस्किमो लोकांमध्ये एक विशिष्ट रीत आहे. माणूस म्हातारा झाला की, तो झोपल्यावर त्याच्या बिछान्याजवळ एक दिवा पेटवून ठेवला जातो. मध्यरात्री त्या माणसाला जाग आली की, तो पेटवलेला दिवा पाहतो. हा दिवा घेऊन तो बर्फाच्या जंगलात जातो. तिथेच प्राण सोडतो. म्हाताऱ्या माणसांची निगा राखणे एस्किमोंना शक्य नसते. त्यामुळे ही काहीशी क्रूर असली, तरी सर्वमान्य प्रथा ते आजतागायत पाळत आले आहेत. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे सामाजिक चाली-रीती कशा बदलतात, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

अलास्काच्या काही भागांत रेनफॉरेस्ट आहे, त्यामुळे उंच झाडांवर आपली घरटी बांधण्यासाठी इथे गरुड पक्षी येतात. गरुडाचे वयोमान साधारणतः ३० वर्षे असते. गरूड हा अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि म्हणून संरक्षित पक्षी आहे. सामन माशांचा जन्म अलास्काच्या गोड्या पाण्यात होतो. मग ते इथून हजारो किलोमीटरपर्यंत प्रवास करीत खाऱ्या पाण्याच्या महासागरात जातात, पण अंडी घालण्यासाठी परत हा प्रवास करीत गोड्या पाण्यात येतात. परतीच्या प्रवासात कित्येक सामन मासे मोठ्या माशांच्या भक्ष्यस्थानी पडतात. सामन माशांना काही वेळा प्रवाहाविरुद्ध उलटे पोहावे लागते. पण सगळी संकटे पार करून ते अंडी घालण्यासाठी अलास्काच्या पाण्यात येतात.

एका पहाटे सिॲटल शहरातून आम्ही अलास्काला भेट देण्यासाठी प्रिन्सेस या आलिशान बोटीवर चढलो. प्रिन्सेस बोटीने सुमारे चार हजार पर्यटकांना घेऊन सिॲटलचा किनारा सोडला.

प्रिन्सेस बोट हे छोटे शहरच होते! प्रिन्सेसवर काय नसावे? प्रिन्सेसमध्ये लायब्ररी, सिनेमा थिएटर, कॉन्फरन्स हॉल, कॅसिनो, हॉटेले आणि बार व रेस्टॉरंट्‌स होती. नृत्यगृह होते. सारे काही होते. या बोटीवर आम्हाला सारा आठवडा घालवायचा होता. एकदा सिॲटल सोडल्यावर जमिनीचे दर्शन कुठेच झाले नाही. वरती निरभ्र निळे आकाश आणि चोहो बाजूंनी कृष्णनिळा समुद्र... अष्टदिशांतून येणारा अंगांग सुखावणारा थंडगार वारा... आकाश, पाणी, वारा आणि प्रकाशही! अंधाराचे नाव नव्हते. उत्तर गोलार्धातील ते उन्हाळ्याचे दिवस होते. तिथे जवळजवळ २२ तासांचा दिवस आणि केवळ २ तासांची रात्र अशी परिस्थिती होती. चार महाभूतांच्या संगतीत आमचा सारा प्रवास चालला होता.  भारतीय साहित्यात समुद्राला फारसे स्थान नाही. त्याला अपवाद म्हणजे विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ आणि अनंत सामंत यांची ‘एमटीआयवा मारू’ ह्या कादंबऱ्या! शेकडो गोमंतकीय ‘तारवटी’ (खलाशी) गलबतांवर आहेत, पण त्यांच्या जीवनावर एकही कादंबरी कोकणीत नाही. र.वि.पंडितांच्या कवितेत म्हटले आहे...

‘दर्या गाजोता, दर्या गाजोता

दरेका हहारामोदी देव दिसोता’

असे किनाऱ्यावर बसून केलेले तोंडदेखले समुद्रदर्शन आहे. याउलट, इंग्रजी साहित्यात ‘मॉबीडिक’ आणि ‘द ओल्ड मॅन ॲन्ड द सी’ यांसारख्या कादंबऱ्या तर आहेतच, शेक्सपिअरच्या टेम्पेस्टमध्ये समुद्राचे प्रत्ययकारी वर्णनही आहे.

भारतातून बौद्ध धर्म हद्दपार झाल्यावर हिंदूंचा बौद्धांकडे संबंध येऊ नये म्हणून हिंदू धर्मात समुद्रपर्यटन पाप मानले, त्याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली तशी भारतीय साहित्यालाही मोजावी लागली. छत्रपती शिवाजी- महाराजांनंतर एकाही राजाने आरमाराकडे लक्ष दिले नाही. नानासाहेब पेशव्यांनी तर आंग्रे यांचे आरमार बुडविण्यासाठी इंग्रजांना मदत केली- हा सारा इतिहास मला आठवला.

भारताला पाच हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा असूनही आणि भारतभर नद्यांचे जाळे असूनही अनेक भारतीयांना पोहताही येत नाही!

ज्ञानपीठविजेते गोमंतकीय लेखक रवींद्र केळेकर यांनी एकदा एक सर्जनशील सूचना केली होती. हिंदू अंत्यविधीला सुमारे सत्तर-ऐंशी किलो लाकडे लागतात. ख्रिश्चन दफनविधीला महागडे लाकडी कॉफिन घ्यावे लागते व जमिनीची समस्या उद्‌भवते. या संदर्भात ते म्हणाले- ‘‘सर्व गोमंतकीय जीवनभर माशांवर ताव मारतात; त्यामुळे मेल्यावर हिंदू, ख्रिश्चन गोमंतकीयांच्या पार्थिवांचे विसर्जन समुद्रात का करू नये आणि माशांना त्यांच्या पार्थिवावर ताव मारायची संधी का देऊ नये?’’

जगाचा दोन-तृतीयांश पृष्ठभार समुद्राने व्यापलेला आहे. भविष्यकाळात आपल्याला समुद्राकडे सर्जनशील दृष्टीने पाहावे लागेल. समुद्रशेती, समुद्र-उत्खनन करावे लागेल. समुद्रावर घरे बांधून राहावे लागेल. समुद्रपर्यटनाची शक्यता लक्षात घ्यावी लागेल. कचऱ्याची समस्या समुद्राची मदत घेऊन कशी सोडवता येईल, समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोड्या पाण्याची निर्मिती करून पाण्याची समस्या कशी दूर करता येईल, लाटांपासून वीजनिर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होऊ शकेल काय- अशा अनेक संभाव्यतांचा आपल्याला विचार करावा लागेल. बोटीने आता वेग घेतला. दुरून शुभ्र हिमखंड दिसत होते. प्रकाशाने हे हिमखंड चकमत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र- हे वेळेचे भान इथे राहिले नव्हते. प्रकाश थोडासा मंदावला की, तिन्हीसांजा झाल्या असाव्यात आणि रात्रीची वेळ आली असावी हा अंदाज येत होता. हा प्रकाशमिश्रित अंधार होता की, अंधारमिश्रित प्रकाश होता, कोण जाणे! आसमंतात दूरस्थ तारे लखलखत होते. ह्या ताऱ्यांचा प्रकाश भूतकालीन होता, याचे भान माझ्यासाठी होते. आसमंतात निस्सीम शांतता होती, या शांतीला कोणतीच त्रिज्या नव्हती, व्यास नव्हता, परीघ नव्हता. या शांतीचे वर्तुळ सर्वव्यापी होते. ही शांती ओतप्रोत होती. अथांग होती. अपार होती. मला हा अनुभव वेगळा होता. डेकवर मी एकटाच निवांत बसलो होतो. माझे मनही शांत, प्रशांत, निवांत झाले. सगळे विचार, विकार, सगळा गाळ तळाला जाऊन बसला. घनदाट वनात निवळशंखआरस्पानी पाण्याचे तळे असावे आणि कार्तिकी नवमेचे चांदणे त्या तळ्यात पडावे, तशी मनाची अवस्था झाली. माझी समाधी, अवस्थाच होती. मी पुण्यश्लोक बुद्धाचे पुण्यस्मरण केले आणि मनोमन प्रार्थना केली-

भवतु सर्व मंगलम्‌

भवतु सर्व कल्याणम्‌...

आता शांत, निवांत, प्रसन्न मनोवस्थेत बुद्धाकडे मी दुसरे काय मागणार? सर्वमंगलाची प्रार्थना करून मी अनिच्छेने उठलो. मध्यरात्र उलटून गेलेली असली पाहिजे. बोट कधीच झोपत नसते. मी खाली आलो. नृत्यगृहातील संगीताचे सूर माझ्या कानी आले. कॅसिनोही चालू होता. बोट वेगात पुढे जात होती.

दुसऱ्या दिवशी बोटीने किनाऱ्यावर नांगर टाकला. आम्ही ज्युन्यु ह्या गावात पोहोचलो होतो. ह्या गावातील सगळी घरे लाकडी. घरांना कलती रंगीत छपरे. घरांना कुंपणे नाहीत. इथे प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या हक्काची जाणीवच नाही. जे-जे निसर्गदत्त ते-ते सर्व सामुदायिक, ही भावना! ज्युन्यु गावात आम्ही सामन माशांच्या पैदाशीचे केंद्र पाहिले. येथील रेन फॉरेस्ट, तेथील उंचच उंच झाडे, झाडांवरची गरुडाची घरटी, बोटॅनिकल गार्डन, हिमखंड वितळून झालेला धबधबा आणि नदी... सगळे पाहून आम्ही परतलो. ती छोटीशी एकदिवसीय सफर संपली. रात्री बोट परत निघाली.  

दोन दिवसांनी आम्ही स्केगव्हे गावात आलो. या गावात सोने मिळेल, म्हणून गेल्या शतकात अनेक अमेरिकन लोकांचा लोंढा इथे आला. इथे रेल्वेलाईनसुद्धा घालण्यात आली. चिलकूट ट्रेल म्हणून ती प्रसिद्ध आहे. रेल्वेचे बांधकाम करताना आणि सोन्याच्या खाणीत काम करताना शेकडो मजुरांना मरण आले. त्यांची दफनभूमी आम्ही पाहिली. उंचावरून स्केगव्हे गाव फार विलोभनीय दिसते. पण या गावाच्या पोटात शोकान्त कहाणी दडलेली आहे.

त्या रात्री प्रिन्सेस बोटीच्या कॅप्टनने आम्हाला जेवण दिले. रेड वाईन, रोस्टेड पोटॅटो, गोल्ड सामन, चिकन स्ट्यू, क्रीम ब्यूले असा मेनू होता. कॅप्टनने छोटेसे भाषण केले. तो म्हणाला, ‘‘उद्या आपली बोट अलास्का ग्लेशियर बेमध्ये जाणार आहे. तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. तिथे धुके असले, तर तुमची निराशा होईल. मी तिथे बोट चार-पाच तास थांबवेन. उन्ह असले, तर तुम्हाला हिमखंड पाहता येतील.’’

दुसऱ्या दिवशी पहाटे बोटीचा सायरन वाजला, म्हणजे बोट अलास्का ग्लेशियर बेमध्ये पोचली होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले- सगळीकडे लख्ख उन्ह होते. सुशांता आणि मी लगबगीने डेकवर आलो. कॅप्टनने अगदी मोक्याच्या जागी बोट आणून पार्क केली होती. समोरचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. २७० अंशांत जिथे दृष्टी जाईल तिथे शुभ्रवस्त्रावृता हिमखंडच हिमखंड होते. पहाटेच्या सुस्नात, ताज्या टवटवीत उन्हात ते अक्षरश: न्हाऊन गेले होते. केशरी उन्हाचा मोरपिसारा हिमखंडांवर नाचत होता. मधेच हिमखंडाचा काही भाग ढासळत होता. त्याचा आवाज आसमंतातील शांतीचा भंग करत होता. लाखो वर्षे हे हिमखंड इथे गोठलेल्या स्थितीत होते. त्या हिमखंडांबरोबर सारा परिसरही इथे गोठलेला होता. बुद्धाचा ‘अनित्य बोध’ इथे फोल ठरला होता. इथे काही काहीच बदलत नव्हते!

अलास्का हे बर्फाचे श्वेतविवर होते जणू! हे हिमखंड प्रकाशातील निळा सोडून अन्य सारे रंग शोषून घेत होते. त्यामुळे ह्या हिमखंडावर निळी झळाळी फाकली होती. निळ्या आणि धवल रंगांचे ते संमिश्रण मोठे लावण्यमयी होते. वाटत होते- हिमखंडाच्या जवळ जावे आणि त्याच्या पाठीला अलगद स्पर्श करावा!

तीन-चार तास कसे केले, ते कळलेच नाही. बोटीचा सायरन परत वाजला. बोट परतीच्या प्रवासाला निघाली.

दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिक्टोरिया ह्या कॅनडाच्या शहरात उतरलो. वास्तविक, आमच्याकडे कॅनडाचा व्हिसा नव्हता. पण आम्हाला कोणी अडवले नाही. ते शहर अतिशय आखीव-रेखीव होते. शहरातील रस्त्यारस्त्यावर सुंदर दिवे व दिव्यांखाली फुलांच्या परड्या लोंबकळत होत्या. शहरात छोटी-मोठी उद्याने होती. उद्यानात कित्येक हरणे आणि मोर बागडत होते.

व्हिक्टोरियानंतर आमचा पुढचा थांबा होता केंटचिकन या छोट्या खेडेगावाचा. हे खेडेगाव ट्‌लिंगिट या आदिवासी लोकांनी वसवले आहे. किनाऱ्यावर सहा उंच रंगीत लाकडी खांब होते. या खांबांवर विविध प्राण्यांची चिन्हे (टोटेम) होती. ही चिन्हे विविध टोळ्यांची प्रतीकात्मक चिन्हे किंवा त्यांचे झेंडे दर्शवीत होती. परतीच्या प्रवासात आम्ही हिमखंडांचे प्रिय दर्शन डोळ्यांत सामावले. लाखो वर्षे बर्फाच्या भिंतीत वाऱ्याची छिन्नी हातात घेऊन निसर्गदेवतेने ही हिमखंडांची लेणी खोदली होती.

अलास्का सर्पासारखी आपली कात वर्षानुवर्षे टाकत असतो. कधी गोठणे, कधी वितळणे ही प्रक्रिया लाखो वर्षे चालूच आहे. अलास्काचे लोक तुम्हाला निरोप देताना सांगतात- ‘इथून जाताना येथील आठवण म्हणून इथला थोडासा बर्फ घेऊन जा; तेवढाच इथला बर्फ कमी होईल.’

पहाटे साखरझोपेत असताना बोटीचा सायरन वाजला, तेव्हा लक्षात आले- अरे, आपली बोट सिॲटलच्या किनाऱ्यावर लागली; आपला अलास्काचा प्रवास संपला. मी साखरझोपेतून नाखुशीने जागा झालो. डोळ्यांपुढे अलास्काचे हिमखंड आले, तेव्हा ओठांतून उद्‌गार आले- आह! अलास्का!

Tags: कॅप्टन जॉर्ज व्हँक्युअर सिॲटल अलास्का दत्ता नायक केंटचिकन ट्‌लिंगिट व्हिक्टोरिया चिलकूट ट्रेल स्केगव्हे बुद्ध हिमखंड समुद्र आलिशान बोट प्रिन्सेस गरुड पक्षी मासेमारी शिकार शार्क (मोरी) सी-लायन सामन देवमासे रानबकऱ्या अस्वले आदिवासी स्नाइस स्नो आइस इग्लू ट्रलिंगिट एस्किमो अलास्का कॉन्झेर्व्हेशन ॲक्ट विल्यम कूपर जॉन मूर कॅनडा Victoria Ketchikan Chilkoot trail Skagway Glacier Buddha See Dactyl Craft Huge Boat Princes Saman Eagle Fishing Hunt See Lion Fish Shark Salmon Whale Devmasa Wild Goat Bears Origin Indigenouns Trible Snow Ice Egloo TralinGit Eskimo Alaska Conservation Act William Kapoor Jon Moor Canada Captain George Vancouver 1715 Alaska Seattle Aah ! Alaska weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके