डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अर्जेंटिनाचे- विशेषतः ब्युनॉस आयर्सचे युरोपीकरण झाले, त्याचे श्रेय डोमिंगो फावस्टिनो सारमिंटो या गेल्या शतकातील अर्जेंटिनाच्या दूरदर्शी राष्ट्राध्यक्षाला द्यावे लागेल. 1869 ते 1895 हा कालावधी अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेचा सुवर्णकाळ होता. या काळात देशाच्या संसाधन क्षेत्रात, नागरी सुधारणांच्या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात खूप गुंतवणूक झाली. स्पेन, इटली, जर्मनी या देशांतील कुशल मनुष्यबळ अर्जेंटिनात आल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट झाली. पण पुढे मात्र अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था हा वेग राखू शकली नाही. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अर्जेंटिनाचे अर्थकारण कोसळत गेले. ब्राझीलप्रमाणेच फुटबॉल हा खेळ अर्जेंटिनाचा जीव की प्राण आहे. दिॲगो मॅराडोना आणि लिओनेल मेस्सी हे फुटबॉलपटू त्यांचे राष्ट्रीय हीरो आहेत. अर्जेंटिनाने पाच वेळा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे, तर 1978 आणि 1986 अशा दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे.

अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन देशांची सरहद्द इग्वासू नदीपात्राच्या मधोमध आहे. त्यामुळे या नदीवर असलेला इग्वासू फॉल हा अर्जेंटिना आणि ब्राझील अशा दोन्ही देशांत विभागून गेला आहे. 270 फुटांवरून कोसळणाऱ्या या महाप्रचंड धबधब्याची रुंदीच तीन किलोमीटर आहे. इग्वासू या शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ म्हणजे पाण्याचा प्रचंड लोट! या धबधब्याचा शोध लागल्यानंतर ब्राझीलच्या तत्कालीन कॅथॉलिक सत्ताधाऱ्यांनी त्याला ख्रिश्चन संताचे नाव देण्याचा प्रयत्न केला, पण इग्वासू हे स्थानिक नाव त्यांना पुसून टाकता आले नाही आणि तेच आजतागायत कायम राहिले. 

आमच्या ब्राझीलच्या वास्तव्यात आम्ही इग्वासू फॉलचे दर्शन घेतले होते. पण ते बरेचसे धावते आणि दूरस्थ होते. अर्जेंटिनाच्या बाजूने तो फार जवळून आणि आरामात पाहायला मिळाला. त्यासाठी एका मिनी ट्रेनने पंधरा मिनिटांचा प्रवास आणि मग नदीवर बांधलेल्या फूटब्रिजवरून परत पंधरा-वीस मिनिटे चालत जावे लागले. नंतर आम्ही इग्वासू फॉलच्या अगदी सन्मुख येऊन पोहोचलो. तो महाप्रपात आपल्या सहस्रावधी तुषारांनी आम्हाला भिजवून टाकू लागला. गाईडने पूर्वकल्पना दिल्यामुळे आम्ही रेनकोट घालून गेलो होतो, अन्यथा आम्हाला सचैल स्नानच घडले असते.  

सकाळच्या सोनेरी उन्हात इग्वासू फॉलचे प्रकाशमिश्रित तुषार आभाळात सगळीकडे विखुरलेले होते. धबधब्याचे पाणी प्रचंड लोटाने खालच्या दरीत कोसळत होते. सुमारे 270 डिग्रीच्या कोनात त्या धबधब्याचे छोटे-मोठे 275 लोट खाली उड्या मारत होते. ते दृश्य नयनमनोहर होते. इग्वासू फॉलच्या अनेक धबधब्यांपैकी प्रमुख धबधब्याचे नाव होते ‘डेबिल्स थ्रोट’ (सैतानाचा कंठ) आणि त्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या दोन धबधब्यांचे नाव होते ‘टू सिस्टर्स’ (दोन बहिणी). इग्वासू फॉल विविध ठिकाणी आणि विविध कोनांतून पाहता यावा म्हणून नदीवर कधी पूल, कधी फूटब्रिज, कधी इलेव्हेटर यांची योजना केली होती.
 
कॅनडातला नायगारा धबधबा पाहून मी मंत्रमुग्ध झालो आहे. तिथे धबधब्याच्या पायथ्याशी जायला ‘मेड ऑफ द मिस्ट’ नावाची मोटरबोट आहे. त्यात बसून नायगाराच्या अतिजवळ गेल्यानंतर मी विचित्र अनुभवाला सामोरा गेलो होतो. तिन्ही बाजूंनी धबधब्याचे लोट आणि चौथ्या बाजूने पाण्याचे तुषार यामुळे चारही बाजूंनी आपण शुभ्रधवल पाण्याने घेरून जातो. ते दृश्य भयाण, पण तेवढेच सुंदर होते. जगबुडी आली तर काय होईल, त्याची त्यावरून कल्पना येते. इग्वासू फॉलच्याही पायथ्याशी मोटरबोटने जाता येते. पण आम्हाला नायगारा फॉलचा अनुभव असल्याने आम्ही त्याची पुनरावृत्ती केली नाही. 

इग्वासू फॉलच्या सभोवती ब्राझीलच्या बाजूने 1,85,000 हेक्टरचा आणि अर्जेंटिनाच्या बाजूने 67,000 हेक्टरचा नॅशनल पार्क आहे. या दोन्ही पार्क्समध्ये दोन्ही देशांतील जैविक संपत्ती सांभाळून ठेवली आहे. या नॅशनल पार्कजवळच्या बर्डस पार्कचा मात्र उल्लेख केला पाहिजे. या पार्कमध्ये अक्षरशः शेकडो पक्षी आहेत. ते मोठ्या पिंजऱ्यात ठेवले आहेत, पण ते एवढे मोठे आहेत की, ते पिंजरे आहेत असे पक्ष्यांना वाटतच नाहीत. पिंजऱ्यावर वेली सोडल्या आहेत. पिंजऱ्यात छोटी झाडे आहेत. पाण्याचे झरे आणि छोटी तळी आहेत. तो रानाचा एक भागच आहे, असा आभास निर्माण केला गेला आहे. त्यामुळे पक्षी इथे मुक्तपणे, स्वच्छंदपणे उडताना दिसतात. 

या पिंजऱ्यांचे दुसरे वैशिष्ट्य असे की, पर्यटकांना या पिंजऱ्यांपैकी काही पिंजऱ्यात जाता येते. पक्षी उडत-उडत येऊन पर्यटकांच्या खांद्यावर बसतात. त्यांची सेल्फी काढता येते. फिकट गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो, मोठी टोकदार चोच असलेला टुकानो, माणसाच्या आवाजाची नक्कल करणारा काकाकुवा, विविध रंगांचे छोटे-मोठे पोपट, मोर या पिंजऱ्यात आहेत. गरुड, घुबडे, गिधाडे, या भक्षक पक्ष्यांसाठी दुसरे पिंजरे आहेत. याशिवाय या बागेत विविध रंगांची आणि आकारांची फुलपाखरे आहेत. ती पाहून मन प्रसन्न होते. दुपारची वेळ झाली तेव्हा पक्ष्यांचे जेवण आले. पपया, पेरू, काकड्यांचे तुकडे, वेगवेगळ्या भाज्यांचे सॅलड यांची ताटे आणि पाण्याने भरलेल्या वाट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्या. किलबिलाट-चिवचिवाट करीत पक्षी आपल्या खाद्याचा आस्वाद घेऊन तृप्त झाले. 

अर्जेंटिनाच्या आमच्या प्रवासात आम्ही एका रांचला भेट दिली. रांच म्हणजे घोडे पाळण्यासाठी राखीव ठेवलेले मोकळे कुरण. ते सुमारे 10 एकरांचे होते. तिथे पन्नाससाठ उमदे घोडे होते. आम्ही घोड्यावरून रपेट केली. घोडा हा 5000 वर्षांपासून माणसाने पाळायला सुरुवात केली. त्यापूर्वी 5 कोटी वर्षांपासून उत्क्रांतीच्या चक्रात घोड्याचे शरीर उत्क्रांत होत गेले. घोडा ताशी 50 किलोमीटर वेगाने धावू शकतो. तो 360 अंश डिग्रीत पाहू शकतो. त्याचे आयुष्यमान साधारणतः 25 ते 30 वर्षांचे असते. एका घोड्याची किंमत आज दोन लाख रुपये आहे. जगात सहा कोटी घोडे आहेत. घोड्यांचा उपयोग वाहतूक, शेती, मनोरंजन, खेळ यासाठी केला जातो. घोड्यामुळे मानवी संस्कृतीला मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणे व नवे प्रदेश काबीज करणे शक्य झाले. 

रांचमध्ये आम्ही दुपारचे जेवण घेतले. अर्जेंटिना तेथील वाइन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या लोकप्रिय माल्बेक वाईनचा आस्वाद घेतला. अर्जेंटिनाची आवडती डिश म्हणजे बीफ स्टेक. अर्जेंटिनाचे रहिवासी प्रतिवर्षी दर माणशी 49 किलो बीफ फस्त करतात. रांचमध्ये घेतलेल्या जेवणात आम्ही सॅलड्‌स आणि खरपूस भाजून खमंग केलेली बीफ स्टेक खाल्ली. 

ब्युनॉस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी. ब्युनॉस आयर्सचा शब्दशः अर्थ म्हणजे चांगली, शुद्ध हवा. हे शहर आपल्या नावाला जागते, असे म्हटले पाहिजे. शहरात जागोजागी मोकळी मैदाने आहेत. सुंदर-सुंदर बागा आहेत. तळी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवे वृक्ष आहेत. चौका-चौकात कारंजी आहेत. प्रत्येक घरापुढे  छोटी बाग आहे. घराच्या बाल्कनीतून फुलांनी बहरलेल्या झुकत्या वेली दिसतात. विस्तृत रस्त्यांना गोल वळणे घेऊन जाणारे रुंद व स्वच्छ रस्ते आहेत. सुंदर दिव्यांनी सुशोभित पथखांब आहेत. ब्युनॉस आयर्सला दक्षिण अमेरिकेचे पॅरिस म्हणतात ते उगाच नाही. पॅरिसप्रमाणे शॉपिंग आर्केड्‌स, रेस्टॉरंट्‌स, मॉल्स, थिएटर्स, ऑपेराज, म्युझियम्स यांनी हे शहर नटले आहे. ब्युनॉस आयर्समधल्या एका चौकाला ‘9 जुलै ॲव्हेन्यू’ असे नाव आहे. 1553 मध्ये स्पेनने अर्जेंटिनाची भूमी बळकावली. दि.9 जुलै 1816 रोजी अर्जेंटिना स्वतंत्र झाला. त्या दिवसाची आठवण म्हणून या चौकाचे नाव 9 जुलै ॲव्हेन्यू ठेवण्यात आले. 

गोव्यात पणजी शहरात क्रांतिदिवसाची आठवण म्हणून ‘18 जून’ मार्ग आहे, तसाच ‘31 जानेवारी रोड’ आहे. या दिवशी पोर्तुगालला स्पेनकडून 1891 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्याची स्मृती म्हणून पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी पणजीतील एका रस्त्याचे नामकरण ‘31 जानेवारी रोड’ केले. आपल्या शहरात 15 ऑगस्ट मार्ग, 26 जानेवारी चौक, 2 ऑक्टोबर रोड का असू नये? भारतात चंडीगड हे एकच शहर असे आहे की, जिथे रस्त्यांना नावे नाहीत! 

ब्युनॉस आयर्समधल्या प्लाझा दी मायो या चौकाला एक राजकीय महत्त्व आहे. 1976 ते 1983 च्या दरम्यान अर्जेंटिनात हुकूमशाही होती. या कालावधीत हुकूमशाहीला विरोध करणारी अनेक बंडखोर तरुण मुले गायब झाली. त्यांच्या आयांनी या प्लाझा दी मायो चौकात डोक्याला पांढरा स्कार्फ बांधून जोरदार आंदोलने केली. या स्त्रिया मानवाधिकाराच्या दक्षिण अमेरिकेतील पहिल्या रक्षणकर्त्या म्हणून आजही ओळखल्या जातात आणि त्यांचे आंदोलन ‘मदर्स ॲजिटेशन’ म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. ब्युनॉस आयर्समधल्या शाळांना रंगीबेरंगी इंद्रधनुष्यी रंग दिलेला असतो. 

कॅनडात मुलांच्या हॉस्पिटल्सना रंगीबेरंगी रंगात रंगवलेले मी पाहिले आहे. हेतू हा की हॉस्पिटल्स- शाळेत लाल, पिवळा, निळा, जांभळा, हिरवा हे रंग पाहून मुलांच्या मनावर प्रसन्नतेचा शिडकावा व्हावा. आपल्या शाळांच्या इमारती एकाच किंवा दुहेरी रंगात रंगवलेल्या असतात. त्या कंटाळवाण्या वाटतात. अनेक इमारतींना वर्षानुवर्षे रंगरंगोटी केली जात नाही. पाश्चात्त्य देशांत एक-दोन वर्षांनी इमारतींना नवा रंग दिला जातो. रंग म्हणजे वास्तूचे नवे वस्त्र. त्यामुळे वास्तू सतेज, टवटवीत दिसू लागते. 

ब्युनॉस आयर्समध्ये फिरताना आम्हाला एक स्त्री वेगवेगळ्या जातीचे वीस-पंचवीस कुत्रे घेऊन बागेत फिरताना दिसली. तिच्यापाठोपाठ अशाच दोन-तीन स्त्रिया वीस-पंचवीस कुत्र्यांना बरोबर घेऊन फिरताना पाहून आम्ही चकित झालो. येथील लोकांना कुत्र्यांचे एवढे प्रेम असावे का, असा प्रश्न पडला. मग कळून चुकलं की, या हाऊसमेड्‌स आहेत. दिवसभर नोकरी करणाऱ्या नवऱ्या-बायकांचे कुत्रे सांभाळणे, त्यांना फिरायला नेणे, त्यांना दुपारचे जेवण देणे- हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या हातात हातमोजे होते. कुत्र्यांनी रस्त्यावर किंवा बागेत विष्ठा केली, तर ती तत्काळ साफ करून त्या डस्टबिनमध्ये टाकत होत्या. 

ब्युनॉस आयर्स शहरातले मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल 1827 मध्ये बांधलेले आहे. त्याचा दर्शनी भाग त्रिकोणाकृती असून तो बरोक स्टाईलच्या वास्तुशिल्पात बांधलेला आहे. याच कॅथेड्रलचे कार्डिनल जॉर्ज मारियो बर्जेग्लिओ यांची 2013 मध्ये व्हॅटिकनने पोप म्हणून निवड केली. दक्षिण अमेरिकन नागरिकाला सर्वप्रथम हा मान मिळाला. नव्या पोपने फ्रान्सिस्क-1 हे नाव घेतले. अर्जेंटिनावासीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. क्रांतिकारी चे गव्हेरा हासुद्धा मूळ अर्जेंटिनाचा नागरिक. क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोशी भेट होण्यापूर्वी त्याने मोटरसायकलवरून दक्षिण अमेरिका पूर्णपणे फिरून या खंडातील विविध देशांतील लोकांची गरिबी, आर्थिक विषमता, त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहिले आणि तो साम्यवादी बनला. क्युबात जाऊन तो फिडेल कॅस्ट्रोला भेटला. तेथील सत्तांत्तरानंतर दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांत अशीच डावी क्रांती व्हावी, यासाठी चे गव्हेरा अथक प्रयत्न करू लागला. याच वेळी त्याचा निर्घृण खून झाला. चे गव्हेराच्या अनुभवांवर ‘मोटरसायकल डायरीज’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. देशांचा प्रवास करून त्या अनुभवांमुळे समृद्ध झाल्याने महापुरुष बनलेल्या व्यक्तींमध्ये नरेंद्र दत्त (स्वामी विवेकानंद), मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) आणि चे गव्हेरा यांचा समावेश करावा लागतो. 

अर्जेंटिनाचे- विशेषतः ब्युनॉस आयर्सचे युरोपीकरण झाले, त्याचे श्रेय डोमिंगो फावस्टिनो सारमिंटो या गेल्या शतकातील अर्जेंटिनाच्या दूरदर्शी राष्ट्राध्यक्षाला द्यावे लागेल. 1869 ते 1895 हा कालावधी अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेचा सुवर्णकाळ होता. या काळात देशाच्या संसाधन क्षेत्रात, नागरी सुधारणांच्या क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात खूप गुंतवणूक झाली. स्पेन, इटली, जर्मनी या देशांतील कुशल मनुष्यबळ अर्जेंटिनात आल्यामुळे अर्थव्यवस्था बळकट झाली. पण पुढे मात्र अर्जेंटिनाची अर्थव्यवस्था हा वेग राखू शकली नाही. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अर्जेंटिनाचे अर्थकारण कोसळत गेले. 

ब्राझीलप्रमाणेच फुटबॉल हा खेळ अर्जेंटिनाचा जीव की प्राण आहे. दिॲगो मॅराडोना आणि लिओनेल मेस्सी हे फुटबॉलपटू त्यांचे राष्ट्रीय हीरो आहेत. अर्जेंटिनाने पाच वेळा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे, तर 1978 आणि 1986 अशा दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. फुटबॉलबरोबरच गोल्फ, पोलो, बॉक्सिंग, टेनिस, बास्केटबॉल हे खेळ अर्जेंटिनात लोकप्रिय आहेत. 

ब्युनॉस आयर्स शहरातील ला रिकोलेटा सिमेट्री हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. भारतात स्मशाने ही अतिशय भयाण व विद्रूप असतात. पाश्चात्त्य देशांत सिमेट्रीज सुंदर व प्रसन्न वाटतात. हा विरोधाभास का असावा? ऑल सॉल्सच्या रात्री तर थडग्यांवर फुलांची व दिव्यांची अशी आरास केलेली असते की, आहा! आपल्या देशात स्मशानात गेल्यावर आपल्याला स्मशानवैराग्य यावे, हा हेतू तर स्मशाने भयाण ठेवण्यामागे नसावा ना? ख्रिश्चन धर्माने इहलोकापेक्षा परलोक सुंदर मानला आहे. परलोकाचा प्रवास सिमेट्रीजपासून सुरू होत असल्यामुळे त्या सुंदर करणे त्यांना भाग पाडले असावे का? काही का असेना, ब्युनॉस आयर्समधली ती ला रिकोलेटा सिमेट्री इतकी सुव्यवस्थित आणि सुरेख होती की- मरण यावे तर इथेच, ब्युनॉस आयर्समध्ये यावे आणि या रिकोलेटा सिमेट्रीत देहाचे दफन होऊन चिरशांती घ्यावी, असे वाटावे! प्रत्येक थडगे संगमरवरी होते. प्रत्येकाचे शिल्प वेगळे होते. 

एका थडग्यात तर चक्क एक खोलीच होती. त्यात कॉफीन होते. कॉफीनवर ताजी फुले होती. त्याच्यापुढे खुर्ची होती. मृताची पत्नी दर महिन्याला खोली उघडून आत जाई. कॉफीनवर फुले वाही. खुर्चीवर बसून मृताचे स्मरण करी. जुन्या फुलांचे निर्माल्य घेऊन जाई. पाश्चात्त्य सिमेट्रीजपुढचा प्रश्न म्हणजे जागेची वाढती टंचाई. त्यामुळे खुशवंतसिंगने एकदा सूचना केली होती की, प्रेत आडवे न पुरता उभे पुरावे आणि त्यावर थडगे न बांधता केवळ क्रॉस लावावा. व्यवस्थापनशास्त्रात अशा सूचनांना ‘लॅटरल थिंकिंग’ म्हणतात. आता अमेरिकेत काही कॅथॉलिक लोक प्रेतांचे दहन करून रक्षाकलश घरी ठेवतात. हिंदू दहनविधीत प्रेत जाळताना सत्तर-ऐंशी किलो लाकडांचा विध्वंस होतो आणि पर्यावरणाची हानी होते. म्हणून ज्येष्ठ गोमंतकीय विचारवंत रवीन्द्र केळेकर यांनी एकदा असा विचार मांडला होता की, समुद्रकाठी राहणाऱ्यांची प्रेते खोल समुद्रात फेकावीत. त्यांनी पुढे गमतीने म्हटले होते की- आपण गोमंतकीय आपल्या जीवनात एवढे मासे खातो, तर आपण मेल्यावर माशांना आपले शरीर का खायला देऊ नये? 

रिकोलेटा सिमेट्रीतून परतताना व्यवस्थापनशास्त्राच्या कार्यशाळेत ऐकलेली अतिलोभाच्या दुष्परिणामावरील एक कथा मला आठवली. एक शास्त्रज्ञ अमर होण्यासाठी उपयुक्त असे रसायन शोधत असतो. त्याला एका विचित्र रसायनाचा शोध लागतो. हे रसायन प्यायल्यावर मनुष्य तत्काळ मरतो, पण मेल्यानंतर 24 तासांनी जिवंत होतो. तो शास्त्रज्ञ अतिशय निराश होतो. तो आपल्या बायकोला म्हणतो, ‘‘हे कसले निरुपयोगी रसायन? याचा प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोग नाही.’’ त्याची बायको खूप चाणाक्ष आणि तेवढीच लोभी असते. ती थोडा वेळ विचार करून नवऱ्याला म्हणते, ‘‘मला एक कल्पना सुचली आहे. येत्या शनिवारी पहाटे तुम्ही हे रसायन प्या, पुढचं मी बघते.’’ तो शास्त्रज्ञ बायकोच्या सल्ल्यानुसार ते रसायन पितो आणि तत्काळ मरण पावतो. बायको आक्रोश करीत शेजारीपाजारी, नातेवाइकांना बोलावते आणि संध्याकाळपर्यंत नवऱ्याचा दफनविधी उरकून टाकते. दुसऱ्या दिवशी पहाटे ती सिमेट्रीत जाते. पाहते तर नवऱ्याचे प्रेत पुरलेला खड्डा रिकामा आहे. तिला धक्का बसतो. इतक्यात सिमेट्रीचा चौकीदार येतो. त्याला विचारल्यावर तो खुलासा करतो. चौकीदाराने ते प्रेत पोस्टमॉर्टेमसाठी स्थानिक हॉस्पिटलला विकलेले असते. ती स्त्री धावत धावत हॉस्पिटलमध्ये जाते. पण तोपर्यंत तिच्या नवऱ्याच्या प्रेताचे विच्छेदन झालेले असते. नवरा जिवंत झाल्यावर त्याचा केलेला लाखो डॉलर्सचा विमा घेऊन परदेशात स्थलांतर करण्याचा बायकोचा बेत फसलेला असतो. 

लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिना, पेरू  आणि ब्राझील या देशांच्या अर्थकारणाचा या कथेच्या पार्श्वभूमीवर मी विचार केला. सत्ताधारी राजकारण्यांच्या अतिलोभामुळे- ज्याला दामोदर धर्मानंद कोसंबींनी आपल्या साहित्यात टर्माइट ग्रीड (वाळवी लोभ) असे सुंदर शब्द वापरले आहेत- त्यातून निपजणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे नैसर्गिक संपत्ती असूनही या देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या. संयम किंवा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारला असता तर वेगळे चित्र दिसले असते. ब्युनॉस आयर्स शहरात इटालियन क्वार्टर आहे. तिथे इटालियन लोकांची ब्युटिक शॉप्स आहेत. शिवाय शहरात उत्तम इटालियन पिझ्झा, ब्रुशेटा, पास्ता, क्रोस्टेनी वगैरे पदार्थ मिळतात. या शहराने दूरवरून आलेल्या इटालियन, स्पॅनिश, जर्मन, आफ्रिकन स्थलांतरितांची संस्कृती बुलडोझ करून टाकली नाही किंवा अमेरिकेप्रमाणे आपल्या मेल्टिंग पॉटमध्ये टाकून त्यांचे होमोजिनायझेशनही केले नाही. त्यामुळे या शहरात या विविध संस्कृतींची बेटे आपल्याला पाहायला मिळतात. 

याच स्थलांतरितांनी ब्युनॉस आयर्स शहराला आणि अर्जेंटिनाला भेट दिली आहे- टँगो या सुंदर नृत्याची! एके काळी शृंगारिक आणि थोडेसे अश्लील समजले जाणारे हे नृत्य आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले आहे. आज लब्ध प्रतिष्ठितही हे नृत्य करत असल्यामुळे एके काळच्या गरीब मजुरांच्या, वेटरांच्या, वेश्यांच्या या नृत्याभोवती आता एक वेगळे वलय- ऑरा निर्माण झाला आहे. हे शहर सोडायच्या पूर्वसंध्येला आम्ही एका वातानुकूलित सभागृहात आधी वाईन व डिनरचा कोर्स आणि मग टँगो नृत्याच्या कार्यक्रमाची तिकिटे काढली. हे संपूर्ण देहबोलीचे नृत्य आहे. नर आणि नारी यांच्या प्रियाराधनाचे, शृंगाराचे ते आहे. यात प्रियकर व प्रेयसी यांच्या डोळ्यांची भाषा, भावमुद्रा, हातवारे, पदलालित्य आणि एकूण दोन्ही देहांची लवचिकता, सहजता, मार्दव यांचा संगम दिसून येतो. या नृत्यात दोन देहांचे द्वैत संपून अद्वैत कधी सुरू होते, ते कळतच नाही. नर्तक आणि नर्तिका नाचताना त्यांना पार्श्वसंगीताची साथ असते. यात कधी नर्तक आणि नर्तिका यांची एकच जोडी नृत्य करते, तर कधी नर्तक-नर्तिकांच्या चार-पाच जोड्या समूहाने नृत्य करतात. नर्तक गिरक्या घेऊन नर्तिकेला सहजतेने वर उचलतो. दोघेही भान विसरून बेभान होतात. दोन प्रणयासक्त, मीलनोत्सुक देह एकमेकांना बिलगतात आणि शेवटी एकमेकांचे चुंबन घेता-घेता या नृत्याचा समारोप होतो. संगीत आणि नृत्य हे अर्जेंटिनाच्या रंध्रारंध्रातच असावे. त्यामुळेच अर्जेंटिना सोडताना त्या देशाचे लोकप्रिय गीत आठवले- 

Dont cry for me, Argentina 
The truth is, I never left you 
All through my wild days, 
My mad existence I kept my promise 
Dont keep your distance
It won't be easy, you’ll think it strange
When I try to explain how I feel
You won’t believe me, all you will see is a girl 
you once knew 
Although she’s dressed up to the nines 
At sixes and sevens with you 
I had to let it happen, I had to change 
Couldn’t stay all my life down at heel
Looking out of the  window, staying out of the sun 
So I chose freedom, running around trying 
everything new 
But nothing impressed me at all 
I never expected it to
Have I said too much? 
There’s nothing more I can think of to say to you 
But all you have to do is look at me to know 
That every word is true
Dont cry for me, Argentina 
The truth is, I never left you

Tags: दत्ता दामोदर नायक प्रवासवर्णन टँगो नृत्य ब्युनॉस आयर्स अर्जेंटिना tango dance Buenos aires pravasvarnan datta damodar nayak travelogue argentina weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके