डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तेलाचे साठे संपले तरी दुबईचे महत्त्व कमी होऊ नये, म्हणून दुबईच्या शेखसाहेबांनी दुबई ही आंतरराष्ट्रीय व्यापारी पेठ केली आहे. खाण्याबाबतची सर्व वस्तूंची दुकाने दिसली; पण चांगले पुस्तकांचे दुकान मात्र दिसले नाही. दुबईच्या लोकांना त्याची गरजही नसावी. ऐहिक उपभोगात मश्गूल असताना दुबईला साहित्य, संगीत, कला, विचार यांची सांस्कृतिक झालर नाही. दुबईच्या स्थानिक लोकांचे हक्क परदेशातील लोकांनी हिरावून घेऊ नयेत, म्हणून इथे स्पॉन्सरशिप लॉ केला आहे. त्या कायद्यानुसार कोणाही परदेशी माणसाला इथे व्यापार-उद्योग करायचा असेल, तर स्थानिक रहिवाशाला भागीदार घ्यावे लागते. त्यामुळे स्थानिक लोकांना कोणतेच काम न करता पैसे मिळतात व ऐषारामात राहता येते. 

अरबस्तानच्या नावातच आहे एक कोलाज मैलोन्‌मैल पसरलेल्या वाळवंटाचा, खजुराच्या झाडांचा, उंटांच्या काफिल्याचा, पांढराशुभ्र वेष परिधान केलेल्या अरबांच्या तंबूंचा आणि निरभ्र आकाशात खोवलेल्या विजेच्या चंद्रकोरीचा! अरबस्तानच्या कॅलिग्राफीत लिहिली आहे हजार रात्रींची कहाणी आणि अरबस्तानच्या पोटात दडला आहे एक दीर्घ-प्रदीर्घ लाखो वर्षांचा इतिहास जो सुरू झाला आहे धरित्रीच्या जन्मापासून!

1400कोटी वर्षांपूर्वी अंतरिक्षात विश्वाचा जन्म झाला. त्यानंतर लाखो वर्षांनंतर सूर्यापासून फुटून पृथ्वी अंतरिक्षाच्या अंगणात फिरत राहिली. फिरता-फिरता हा प्रकाशाचा गोळा थंड होत गेला. पृथ्वीवर आधी पाणीच पाणी होते. मग जमीन तरारून वर आली. डोंगर-दऱ्या वर आल्या. आप, तेज, वायू ही महाभूते अवकाशाच्या जात्यातून प्रकाशाचे, तुफानाचे, पावसाचे दळण दळू लागली. पृथ्वीवरील काळी माती मोहरून आली; पण पृथ्वीचा काही भाग पावसाविना करंटाच राहिला, तिथे वाळवंट बनले. तेथील माती वांझ बनली. तळपत्या उन्हात ती करपून गेली. साडेतीन कोटी वर्षांपूर्वी भयानक भूकंप झाला. आफ्रिका खंडाचा एक भूखंड आशिया खंडाला धडकला. मधला समुद्र मागे सरकला. वाळवंटामधल्या मातीची वाळू बनली. वाळवंटातील दिशा हरवल्या. आकार अनाकार झाले. भूमिती आणि त्रिमितीला यमनियमांचे बंधन उरले नाही. आभाळाची निरभ्रता आणि भूमीची निराकारता हेच वाळवंटाचे सारभूत लक्षण ठरले.

मी विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहिले. सगळीकडे काळोखच काळोख होता. धरतीच्या जन्माआधीही असाच काळोख असावा. काळोखाला कोणतेच परिमाण नव्हते. नव्हती लांबी, रुंदी, खोली. आभाळभर काळोखच काळोख. पण तो काळोख दिसत होता, त्यामुळे त्याला काळोख म्हणता येणार नाही. दिसणाऱ्या काळोखाला काळोख म्हणता येईल काय?

मी विमानात पाहिले. विमानात मंद उजेड होता. विमानातील सगळे जण झोपले होते. सगळ्यांच्याच झोपेला स्वप्नांची चौकट होती. हे सगळे अरबस्तानात नोकरीसाठी चालले होते. घरापासून दूर, आई-वडील, बायको-पोरे यांच्यापासून दूर... घर, अंगण, तुळस, खुरीस, जत्रा, फेस्त, माड, केळी, फेणी, मासे या साऱ्यांपासून दूर... आठवणीचे दोर सोडून स्वप्नांच्या जगात...

विमान दुबई विमानतळावर उतरत होते. घड्याळाचे  काटे दीड तासाने मागे घ्यावे लागत होते. दुबईच्या हॉटेल सी शेलमध्ये पोहोचलो, तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती.

अरबस्तानची पहिली ओळख अरेबिअन नाइट्‌समधून झाली होती. अरेबियन नाइट्‌समधली प्रत्येक कहाणी त्या वयात वेड लावायची. सिंदबाद आणि त्याच्या सात सफरी, अलिबाबा आणि चाळीस चोर, अल्लाउद्दीन आणि त्याचा जादूचा दिवा, विलासी सुलतान अन्‌ व्यभिचारी राण्या, खिडक्यांतील दोरखंडावरून राजमहालात चढून येणारे प्रियकर, बोलणारे चहाड्याखोर पोपट,  उडणाऱ्या पऱ्या, आभाळातून सतरंजीवरून जाणारे जादूगार यांच्या त्या कहाण्या... किशोरवयात वाचलेल्या त्या अरेबियन नाइट्‌स  आणि आता कित्येक वर्षांनी आलेले हे अरेबियन डेज!

शुक्रवार हा दुबईचा सुट्टीचा दिवस. त्यामुळे इथे वीक- एन्ड गुरुवारीच सुरू होतो. गुरुवारी नजीर आणि नवाज गाडी घेऊन आले. हे दोघेही जुळे भाऊ. ते मूळ वाळपईचे. ते इथे नोकरीसाठी दुबईला आले आणि इथेच स्थायिक झाले. अनीसा आणि असीमा ह्या बहिणींशी त्यांनी निकाह केला. रहिला, वहिदा आणि नूर ही त्यांची मुले.

 नजीर आणि नवाजने सर्वप्रथम मला दुबईच्या एका पुरातन किल्ल्यात आणले. इथे दुबई म्युझियम आहे. ध्वनी, प्रकाश, संगीत, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रे आणि सिनेमा यांच्या साह्याने दुबई म्युझियममध्ये दुबई शहराचा इतिहास दृक्‌-श्राव्य माध्यमाच्या रूपाने सादर केला जातो. दुबई हे शंभर वर्षांपूर्वी मासेमाऱ्यांचे खेडे होते. त्यानंतर तेथील समुद्रात मोती मिळू लागले. 50वर्षांपूर्वी आखाती समुद्रात क्रूड ऑईलच्या विहिरींचा शोध लागला, तेव्हा दुबईचे भाग्य पालटले. दुबई गावावरचा गावंढळ वेष जाऊन त्याने भरजरी शहरी वस्त्र परिधान केले. उंटांचे काफिले जाऊन जपानी गाड्या आल्या. होड्या जाऊन  जहाजे आली. जेटी जाऊन दुबई आता विख्यात बंदर  बनले. दुबई शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला.

दुबई शहराच्या रेखीवपणाला एक कॅरेक्टर आहे. शहर म्हणजे एक प्रकारचे स्पेस फ्युजन. दुबई शहराने ते नेमके साधले आहे. समुद्राचे पाणी शहरात घुसून दुबई शहराचे दोन भाग पडले आहेत. एक डेरा आणि दुसरा बर दुबई किंवा पर दुबई. पण केरळी माणूस ‘ल’चा उच्चार ‘ळ’ने करतो, तसा दुबईचा रहिवासी ‘ब’चा उच्चार ‘प’ने करतो. दुबईचे पोलीस नो-पार्किंगला बहुधा नो-बार्किंग म्हणत असावेत! दुबई क्रिकाच्या किनाऱ्यावर कित्येक रेस्टॉरंट्‌स आहेत. नजीरने एका अरबी रेस्टॉरंटपुढे गाडी थांबवली. आम्ही खबूज, हमूस, तंदुरी चिकन आणि रोस्टेड मटण असे सुग्रास जेवण घेतले. म्हणजे पराठ्यासारखी रोटी आणि त्याबरोबर ऑलिव्ह ऑईल व सॅलड्‌स. हमूस म्हणजे रगड्यावर वाटलेली डाळ. नवाजने धौ चालवणाऱ्या ओळखीच्या नावड्याला बोलावले. धौ म्हणजे छोटेसे होडके. धौत बसून आम्ही दुबई क्रिकच्या वाहत्या पाण्यांतून रात्रीच्या प्रसन्न उजेडात जलसफर केली. क्रिकच्या दोन्ही किनाऱ्यांवरील सुशोभित पाण्याचा लखलखाट, दिव्यांची पाण्यात पडलेली प्रतिबिंबे,  काळोख,  उजेड,  वारा,  थंडी,  शांती,  चांदणे,  आकाश  आणि आकाशाच्या मशिदीवरची चंद्रकोर...!

अरबस्तानात रेडक्रॉस नाही. इथे रेड क्रॅसर असतो. भारतात रेड क्रॉसऐवजी रेड ॐ करायची दुर्बुद्धी अजून विश्व हिंदू परिषदेला झाली नसावी.

शुक्रवारी नवाजने मला शॉपिंग मॉलमध्ये नेले. दुबई म्हणजे शॉपिंग पॅरेडाईज. जगातील सर्व वस्तू इथे मिळतात. शॉपिंग फेस्टिव्हल असला, तर सर्व वस्तूंवर इथे भारी सूट  असते. पारंपरिक अरबी बाजाराला इथे सौक म्हणत. इथे वेगवेगळे सौक आहेत. सुवर्णालंकरांचा सौक. सुक्या मेव्याचा सौक. मसाल्यांचा शौक /सौक. अत्तराचा शौक/सौक. इथे विमाने, शस्त्रास्त्रे यांचीही मोठी प्रदर्शने भरतात आणि फार मोठे सौदे होतात. तेलाचे साठे संपले तरी दुबईचे महत्त्व कमी होऊ नये, म्हणून दुबईच्या शेखसाहेबांनी दुबई ही आंतरराष्ट्रीय व्यापारी पेठ केली आहे. खाण्यायोग्य सर्व वस्तूंची दुकाने दिसली; पण चांगले पुस्तकांचे दुकान मात्र दिसले नाही. दुबईच्या लोकांना त्याची गरजही नसावी. ऐहिक उपभोगात मश्गूल असताना दुबईला साहित्य, संगीत, कला, विचार यांची सांस्कृतिक झालर नाही. दुबईच्या स्थानिक लोकांचे हक्क परदेशातील लोकांनी हिरावून घेऊ नयेत, म्हणून इथे स्पॉन्सरशिप लॉ केला आहे. त्या कायद्यानुसार कोणाही परदेशी माणसाला इथे व्यापार- उद्योग करायचा असेल, तर स्थानिक रहिवाशाला भागीदार घ्यावे लागते. त्यामुळे स्थानिक लोकांना कोणतेच काम न  करता पैसे मिळतात व ऐषारामात राहता येते. दुबईमध्ये  कोणतेच कर नाहीत. युवकांमध्ये व्यासनाधीनता वाढत चालली आहे. वेश्याव्यवसाय सर्रास चालू आहे. एके काळी ज्ञानसंपन्न असलेली अरबी संस्कृती आता ऐहिक संपत्तीत बुडून गेली आहे, पण ज्ञान-विज्ञानापासून कैक प्रकाशवर्षे दूर जात आहे.

1932 मध्ये बहारिनमध्ये सर्वप्रथम क्रूड ऑईलच्या  विहिरीचा शोध लागला. त्यानंतर 1966मध्ये दुबईजवळच्या आखाती समुद्रात तेलाच्या विहिरींचा सुगावा लागला. समुद्राच्या पाण्याखाली 2500 मीटरखाली उत्खनन सुरू झाल्यावर तेलाचे स्रोत मिळाले. अमेरिकन आणि ब्रिटिश कंपन्यांनी लक्षावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. आशियाई देशांतून मनुष्यबळ आले. कोट्यवधी डॉलर्स अरबी देशांच्या गंगाजळीत जमा झाले. शंभर दशलक्ष वर्षांआधी धरणीमातेच्या पोटात क्रूड ऑईल बनण्याची प्रक्रिया सुरू झाली. भूमीवरच्या सुकलेल्या वनस्पती, मेलेली श्वापदे यांवर मातीचे दडपण येऊन ती भूगर्भात गेली. ही सेंद्रिय द्रव्ये भूगर्भातील लाव्हारसात उकळत राहिली. त्यांतून हायड्रोकार्बन बनले. त्यामधून क्रूड ऑईलचे थेंब-थेंब पाझरत भूगर्भाच्या स्पंजासारख्या ‘पोरस’ खडकांमध्ये साठत राहिले. लक्षावधी वर्षे ही प्रक्रिया चालू राहिली आणि विसाव्या शतकात हा तेलाचा साठा माणसाला सापडला.

दुबई आणि शारजा ही जुळी शहरे. शारजा शहर हे क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. शारजा शहरापासून डेझर्ट पार्क जवळच आहे. तिथेच मी ऑईल म्युझियम पाहिले. तिथे पुढे मी लॅन्ड रोवरची फोर व्हील ड्राइव्ह जीप घेऊन डेझर्ट सफारीवर निघालो. जीपचा ड्रायव्हर अबू बेकर जीप अगदी सफाईदारपणे चालवत होता. वाळवंटात जागोजागी उंचच उंच सॅन्ड ड्यून्स होते. त्यावरून तो जीप चालवत होता. सत्तर डिग्रीच्या कोनातून सॅन्ड ड्यून्सवर जीप चढवायची आणि त्याच कोनातून खाली उतरायचे. रोलर कोस्टरसारखा तो अनुभव होता. अबू बेकर कधी सॅन्ड ड्यून्सना समांतर जीप चालवायचा, तेव्हा जीप जमिनीला आडवी व्हायची. डिसेंबरचा महिना होता. शामाल म्हणजे ईशान्येकडून अरबस्तानात येणारा वारा. हा वारा कधी मंद वाहतो, तर कधी दारूड्यासारखा पिसाट वाहतो. कधी तो वाळवंटातील रेतीच्या केसांतून हळुवार आपली बोटे फिरवतो, तर कधी कामांध-बेबंद होऊन वाळवंटाची वस्त्रे फाडत राहतो. वाळवंटाचा भूगोल शामाल बदलूनच टाकतो. शामाल वाऱ्याच्या कहाण्या सांगत अबू बेकर आमच्या हृदयात धडकी भरवत होता. अबू बेकर आता बराच दूरवर आला होता. वाळवंटात आता एकही झाड नव्हते. एकही पक्षी नव्हता. वर एकही ढग नसलेले निरभ्र पांढरे आकाश आणि खाली सर्वदूर पसरलेले मोकळे पांढरे वाळवंट, नग्न- नागडे.

नग्नता हेदेखील एक वस्त्रच असते. निराकारता हादेखील एक आकारच असतो. निर्गंध हादेखील गंधच असतो. काळोख हे उजेडाचेच रूप असते आणि अनस्तित्व हीदेखील अस्तित्वाचीच स्थिती असते! शांती हेदेखील एक संगीतच असावे. सैमाची सायलंट सिम्फनी!

जीपमधून उतरून मी एकटाच चालत राहिलो. दुपारची उन्हे आता मऊ होत आली होती. सगळीकडे मुलायम, मुदयाला उजेड पसरला होता. मी एका सॅन्ड ड्यूनवर चढलो आणि बराच वेळ शांतपणे बसून राहिलो. तिन्हीसांजा होत आल्या. दूरवर नभात चंद्रोदय झाला. अरबस्तानाच्या वाळवंटात जन्मलेल्या इस्लाम धर्माला चंद्रकोरीचे अप्रूप, यात काय नवल? चंद्र वाळवंटात अरबांचा वाटाड्या असतो. पुनवेआधी सात दिवस आणि नंतर सात दिवस हे  वाळवंटात प्रवास करण्याचे दिवस असतात, कारण त्या वेळी चांदणे भरपूर असते.

मी सर्वदूर पसरलेल्या विस्तीर्ण वाळवंटाकडे पाहिले. सैमाच्या अनाकार-अनलंकृत रूपात मुहमंद पैगंबरला अल्ला निराकार दिसला याला खास अर्थ आहे- अरबस्तानातला देव सगुण-साकार असूच शकत नाही... माझ्या मनात विचार आला.

चंद्राप्रमाणेच उंटदेखील अरबांचा मित्र. उंटाच्या पाठीवर बसून अरबी लोक कोसोमैल प्रवास करतात. उंटांच्या शर्यती हा अरबांचा आवडता खेळ आहे. एके काळी चलनी नाणी नव्हती, तेव्हा उंटाचा वापर चलनी नाण्यासारखा होई.

सतरा उंटांची एक कहाणी सांगितलीच पाहिजे. वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात आपल्या सतरा उंटांची विभागणी आपल्या तीन मुलांमध्ये केली होती. मोठ्या मुलाला आपली अर्धी संपत्ती, दुसऱ्या मुलाला 1/3 संपत्ती आणि छोट्या मुलाला 1/9 संपत्ती- असे मृत्युपत्रात लिहिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिन्ही भाऊ भांडू लागले, कारण वडिलांच्या संपत्तीत 17 उंटांखेरीज अन्य काही नव्हते. तिथून उंटावर बसून एक शहाणा अरब जात होता. त्याने त्यांचे भांडणे मिटवले. त्याने आपला उंट वडिलांच्या संपत्ती मिळवला. अर्धी संपत्ती म्हणजे 9 उंट मोठ्या भावाला दिले. 1/3 संपत्ती म्हणजे सहा उंट मधल्या भावाला दिले. आणि 1/9 संपत्ती म्हणजे दोन उंट धाकट्या भावाला दिले. अशा रीतीने 17 उंटांची विभागणी करून, आपला एक उंट घेऊन तो शहाणा अरब निघून गेला.

असा हा अरबी माणसाचा प्रिय मित्र उंट. पण कुराणात उंट हा शब्द एकदाही आलेला नाही, असे संपूर्ण कुराण वाचलेल्या माझ्या मित्राने मला सांगितले. खऱ्या-खोट्याची शहानिशा मी केलेली नाही. रात्री वाळवंटातच बॉन फायर होता. अरबी लोकगीते, लोकनृत्ये व अरबी जेवण असा कार्यक्रम होता. तो आटपून आम्ही शारजाला परतेपर्यंत बरीच रात्र झाली होती. दुबई शहरातून शेअर टॅक्सीतून मी अबुधाबीला आलो. टॅक्सीचा ड्रायव्हर अब्दुल्ला हा पाकिस्तानचा होता. कराचीहून त्याच्या गावाला जायला 27 तास लागायचे. दर तीन वर्षांनी तो गावी जायचा. गावी त्याची वृद्ध आई, बायको आणि तीन मुले होती. अब्दुल्ला अबुधाबीला एका खोलीत त्याच्या गावच्या अन्य तिघांबरोबर राहायचा. शुक्रवारच्या सुट्टीच्या दिवशीही तो टॅक्सी चालवायचा, अन्यथा काय करणार? दर महिन्याला घरून पत्र यायचे. दर पत्रात त्याच गोष्टी. नवे काहीच नसायचे. तरीही प्रत्येक पत्र तो उत्सुकतेने वाचायचा. आखाती देशांतील सगळ्या देशांतरिताची कहाणी जवळजवळ अशीच.

अबुधाबी शहर दुबईपेक्षा थोडे पॉलिश्ड. पण इस्लामिक वास्तुशिल्प न घेता त्याने अमेरिकन वास्तुशिल्प अंगीकारले होते. त्यामुळे त्या शहराला खास वैशिष्ट्य असे नव्हते. मला मस्कतची आठवण झाली. दुबईला येण्यापूर्वी मी ओमानची राजधानी मस्कतला एक दिवस थांबलो होतो. मस्कत शहराने इस्लामिक वास्तुशिल्पाची मेंदी आपल्या हातावर जपली आहे. तेथील सगळ्या वास्तूंचा रंग एकसारखा. क्रिमिश व्हाईट. दुधाळ पांढरा. अन्य दुसऱ्या रंगाचे नाव नाही. त्यामुळे त्या शहराला एक विशिष्ट सौंदर्यच्छटा लाभली होती. वैविध्यातून सौंदर्यनिर्मिती होते तशीच एकतारी-एकांगी वास्तुशिल्पातून-रंगलेपनातूनही ती होऊ शकते हे मस्कत, जयपूर, जोधपूर, जेसलमेर या शहरांनी दाखवून दिले आहे.

इरफान मला 24 वर्षांनी भेटला. इरफान माझ्याबरोबर कॉलेजमध्ये शिकायचा. पुढे इरफानचे हिंदू मुलीवर प्रेम जडले आणि तिच्याबरोबर तो पळून गेला. मुंबईत त्याने खूप कष्टांत दिवस काढले. मग त्याला लुफ्तान्झात नोकरी मिळाली. सुखाचे दिवस आले. पण इरफानच्या जीवनात एक शोकांतिका घडली. इरफानला छोटी मुलगी होती. तिचे नाव सायका. अकराव्या मजल्यावरून सायका बेबी खाली पडली आणि तिचे तत्काळ निधन झाले. रक्ताने माखलेल्या सायकाला पाहून इरफान आणि राधियाने रडून आकांत केला. इरफानला पुढे मूलबाळ झालेच नाही. एकेकाचे जीवन हे कादंबरीहून वेगळे नसते. साप-शिडीच्या खेळासारखे असते. इरफान मला अबुधाबीच्या हॉटेलमध्ये भेटला आणि त्याने मला आलिंगन दिले. काही मिनिटे तो काहीच बोलला नाही.

अबुधाबीहून निघताना इरफानने मला ‘सनशाईन ॲट मदिना’ हे मुहमंद पैगंबराचे चरित्र भेट दिले. अबुधाबी-कुवेत ह्या विमानप्रवासात ते वाचून काढले. दीड हजार वर्षांपूर्वी अरबस्तानात मुहंमद पैगंबराचा जन्म झाला; तेव्हा अरबस्तानात सगळा जुगार, मद्यपान, कामोपभोग, सावकारी, लुटालूट असा अनैतिक धुमाकूळ चालू होता. मक्का हे व्यापारी केंद्र होते. तिथे व्यापारी टोळ्यांची भांडणे व्हायची. सावकार कर्जावर भरमसाट व्याज लावायचे. प्रत्येक टोळीचा एक देव असायचा. त्याची मूर्तिपूजा चालायची. मुहंमद पैगंबराने हे चित्र पाहिले. पैगंबर हा  धर्मसंस्थापक होण्यापूर्वी समाजसुधारक होता किंवा ‘इष्टम्‌ धर्मन्‌ योजयेत्‌’ या नियमाने त्याने समाजाला पूरक-प्रेरक अशा तत्त्वांचा प्रसार धर्माच्या आधारे केला. मद्यपान आणि कर्जावरील व्याजास त्याने बंदी आणली. मूर्तिपूजा आणि बहूश्वरवादाला त्याज्य ठरवून निराकार एकेश्वरवादाचे महत्त्व लोकांना पटवले. व्यभिचार सोडून विवाहबंधनाचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले. युद्धांत मरण पावलेल्या अरबांच्या स्त्रियांना नवरे मिळावेत, म्हणून बहुपत्नीत्वाची चाल रूढ केली. विरोधी टोळ्या एकमेकांना अन्नातून विष घालून ठार मारत असत. ते पाहून सर्वांना एका ताटातून एकच अन्न जेवण्याची पद्धत सुरू केली. मक्केच्या व्यापाऱ्यांना हे आवडले नाही, त्यामुळे त्यांनी मुहंमद पैगंबराविरुद्ध कट केला; म्हणून पैगंबराला मदिनाला पळून जावे लागले आणि हातात तलवार घेऊन मक्केवर चाल करून मक्का ताब्यात घ्यावी लागली.

मुहंमद पैगंबर राजकारणी, लष्करी योद्धा, विचारवंत, समाजसुधारक आणि धर्मसंस्थापक होता. तो निरक्षर होता. अरबस्तानाच्या वाळवंटात ध्यान करताना त्याला साक्षात्कार झाला आणि त्याने कुराणातील उपदेश विदित केला. कुराणावर ख्रिश्चन धर्मातील तत्त्वांचा व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो. त्यावरून पैगंबराचा संपर्क ख्रिश्चन धर्मगुरूंशी व बौद्ध भिक्षूंशी आला असावा. इस्लामच्या मदिना आणि मक्का अशा दोन मानसिकता आहेत. मक्केची मानसिकता ही जेत्याची आहे, त्यामुळे ती सौम्य आणि उदारमतवादी आहे. मदिनेची मानसिकता ही जिताची आहे, ती जहाल आणि पुनरुत्थानवादी आहे. इस्लामचे हे द्वैत इस्लामचा अभ्यास करताना आपण लक्षात घेतले पाहिजे.

कुवेतला पोहोचलो तेव्हा विमानतळावरच अलेक्स, रोजारिओ या गोमंतकीयांनी माझे स्वागत केले. रात्री त्यांनी त्यांच्या अन्य गोमंतकीय मित्रांना बोलावले आणि आम्ही एका रिव्हॉलव्हिंग रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तिथून कुवेत शहराचे विहंगम दर्शन घडत होते. कुवेत शहर हे चक्राकार आहे जणू चकरीसारखे किंवा जिलबीसारखे आहे कुवेत शहर! शहरात सगळीकडे दिव्यांचा लखलखाट होता. उजेडाची कारंजी उसळत होती. काळोखाची भीतीच असावी कुवेत शहराला. ते काळेकुट्ट काळोखी दिवस विसरले नसावे हे शहर. दि.2 ऑगस्ट 1990ची मध्यरात्र. इराकच्या सद्दाम हुसेनचे रणगाडे धाड्‌धाड्‌ करून कुवेत शहरात घुसले. आभाळात इराकी विमाने दिसू लागली. झोपेतून उठलेल्या कुवेती लोकांना काय झाले ते कळण्याआधीच इराकी सैनिकांनी कुवेतचा ताबा घेतला. एक अरब राष्ट्र दुसऱ्या अरब राष्ट्रावर आक्रमण करेल, असे कुवेतच्या शेखला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. शिवाय इराण आणि इराक युद्धात कुवेतने इराकला पैशाची भरघोस मदत केली होती. पण सद्दाम हुसेनचा कुवेतच्या तेलाच्या विहिरींवर डोळा होता आणि इराकला कोणतेच बंदर नव्हते. कुवेत जिंकल्यावर त्यांना हक्काचे बंदर मिळणार होते. इराकी सैन्याने शहरात येऊन लुटालूट केली. पन्नास लाख कुवेती लोकसंख्येत दहा लाख विदेशी रहिवासी होते. अलेक्स, इकबाल, रशीद त्या वेळी गोव्यात होते; पण रोजरिओ कुवेतमध्ये होता. खाण्या-जेवण्याच्या वस्तूंची टंचाई झाली. शाळा बंद झाल्या, औषधे मिळेनाशी झाली. कुवेती दिनारचे चलन दोन वर्षे कुठे चालत नव्हते. शेवटी दोस्त राष्ट्रांनी कुवेतवर हल्ला करून इराकी सैन्याला कुवेतमधून हाकलून लावले. जाण्यापूर्वी इराकी सैन्याने तेलाच्या विहिरींना आगी लावल्या. त्या विहिरी अनेक महिने जळत होत्या. कुवेतच्या आभाळात धुराचे काळेकुट्ट ढग दिसत होते. रोजारिओने हे सगळे पाहिले होते, भोगले होते. ते ऐकून अंगावर काटा येत होता.

हळूहळू कुवेत शहर पूर्वस्थितीवर येऊ लागले. अमेरिकेने कुवेतचे रक्षण करण्याचा करार अर्थात कोट्यवधी डॉलर्स घेऊन केला आहे. कुवेतच्या युद्धाने कुवेतमधील कित्येक गोमंतकीय गोव्यात गेले, ते परत आलेच नाहीत. जे कुवेतमध्ये अजून आहेत, ते कधी गोव्यात परतावे या विचारात आहेत. ‘‘पुढच्या वेळी तू कुवेतला येशील, तेव्हा इथे अलेक्स नसेल, इकबाल नसेल, रशीद आणि रोजारिओही नसेल.’’ माझे मित्र म्हणाले. म्हणूनच कुवेतमध्ये माझे वास्तव्य लांबवण्याचा माझ्या मित्रांनी आग्रह केला. रोजाचे दिवस सुरू झाले होते. रमझान ईदचा सण जवळ आला होता. पहाटेला खूपच थंडी होती, पण दुपारी छान उन्ह पडत होते. संध्याकाळी सुखद-शीतल वारे वाहत होते. अरब मित्रांकडे आम्ही इफ्तारच्या जेवणाला जात होतो. युद्धाच्या जखमा क्षणभर विसरून कुवेत रमझान ईदचा सण साजरा करणार होते... अशा वेळी मी अरबस्तान सोडले.

Tags: मुहमंद पैगंबर दुबई दत्ता नायक अरेबियन डेज arbian days Dubai Datta Nayak Arebian days weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके