डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोवा ते लिस्बोवा पाचशे वर्षांचा प्रवास

लिस्बन सोडण्यापूर्वी पणजीचे रामचंद्र नायक आम्हाला भेटायला आले. गोवा स्वतंत्र झाल्यावर रामचंद्र नायक नोकरी करण्यासाठी अंगोलाला गेले होते. पुढे ते लिस्बनला स्थायिक झाले. पोर्तुगीज युवतीशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे वय आज ८३ वर्षांचे आहे, पण त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे. रामचंद्र नायक हे मोठे गोष्टीवेल्हाळ गृहस्थ आहेत. मडगावमधील आपल्या समवयीन मित्राची त्यांनी चौकशी केली आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता ते म्हणाले, ‘‘समराधनेत उपरणे पांघरावे तसे त्यांनी म्हातारपण पांघरले आहे; मी मात्र तसे केले नाही!’’ त्यांचे शब्द काव्यात्म तर होतेच, पण फार मार्मिकही होते.

गेल्या जानेवारी महिन्यात पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कॉश्ता यांचे गोव्यात आगमन झाले. त्या वेळी सर्व गोमंतकीयांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भारताच्या प्रधानमंत्र्यालाही पाहायला होणार नाही अशी गर्दी त्यांना पाहण्यासाठी गोव्यात लोटली, त्याला कारणही तसेच खास होते. पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कॉश्ता हे गोव्याचे सुपुत्र आहेत. मडगाव शहरातील आबे फारिया मार्गावर त्यांच्या वडिलांचे घर आहे. त्या घरात त्यांचे नातेवाईक राहतात. ह्या घराला अंतोनिओ कॉश्तांनी भेट दिली आणि परंपरागत गोमंतकीय पद्धतीचे जेवण घेतले.

सन १५१०ते१९६१ या ४५१ वर्षांच्या दीर्घ कालावधीत पोर्तुगालने गोव्यावर राज्य केले. आज त्याच गोव्याचा सुपुत्र पोर्तुगालवर राज्य करत आहे, हा काळाने पोर्तुगालवर उगवलेला एक प्रकारचा सूडच आहे! कालाय तस्मै नम:।

अंतोनिओ कॉश्ताचे वडील ओरलॅन्डो दी कॉश्ता १९४७मध्ये गोव्याहून पोर्तुगालला स्थायिक व्हायला गेले. अंतोनिओचा जन्म १९६१मध्ये लिस्बनमध्ये झाला. यथावकाश ते राजकारणात पडले. पुढे लिस्बन शहराचे मेयर बनले आणि २०१५पासून पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. प्रवासी दिवसाच्या समारंभात ‘मी  अनिवासी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे’, असे त्यांनी नम्रपणे सांगितले.
गोव्यातील भेटीत अंतोनिओ कॉश्ता यांच्या हस्ते त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या Sem Flores New Coros' (Without flowers or wreaths) ह्या मूळ पोर्तुगीज भाषेतून लिहिलेल्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन झाले. ह्या तीनअंकी नाटकाचे कथानक गोवा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या काल्पनिक घटनेवर आधारलेले आहे. एका कुटुंबातील व्यक्तीचा त्या संध्याकाळी मृत्यू होतो; पण सगळीकडे युद्धसदृश वातावरण असल्याने त्यांना अतिशय साधेपणाने कोणत्याही फुलांविना व पुष्पचक्राविना अंत्यसंस्कार करावे लागतात, असे हे कथानक आहे.

आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीची अद्ययावत साधने नसताना, पाचशे वर्षांपूर्वी हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या ज्या पोर्तुगालने गोवा जिंकला, त्या पोर्तुगालला भेट देण्याची मला फार इच्छा होती. गेल्यावर्षी तो योग जुळून आला.

मी गोव्याहून लिस्बोवाला पोहोचलो तो दिवस सोमवार, ११ जुलै २०१६ हा होता. रविवारी पोर्तुगालच्या टीमने फुटबॉलचा युरो चषक जिंकला होता. तो घेऊन पोर्तुगीज टीम लिस्बोवाला पोचली होती. लिस्बोवात कार्निव्हलसदृश वातावरण होते. वाचन, गाणी म्हणत नागरिक रस्त्यावर धुंद होऊन नाचत होते. सगळीकडे ‘व्हिवा पोर्तुगाल, व्हिवा पोर्तुगाल’ हा गजर चालला होता. रात्री उशिरापर्यंत वाईनचा आस्वाद घेत लिस्बोवाचे रहिवासी फादो संगीतात तल्लीन झाले होते.

संगीत हा लिस्बोवाचा आत्मा आहे. त्यातही फादो हे लिस्बोवाचे आणि पोर्तुगालचे वैशिष्ट्यपूर्ण लोकसंगीत आहे. फादो संगीतात एक गूढ, गहन आर्तता असते. फादो संगीताच्या स्मृतिरंजकतेला दु:खाची दाट-घनदाट झालर असते. फादो संगीतातील शब्दांचा अर्थबोध होत नाही, पण सूरांची आर्तता काळजापर्यंत जाऊन भिडते.

फादो गाणारी गायिका नम्रपणे म्हणते- ‘आय डोन्ट सिंग फादो, फादो सिंग्‌स मी.’ लिस्बोवाला ‘लिस्बन’ हे दुसरे नाव आहे, पण...

Lisban is a City, Lisboa is a feeling..
असे लिस्बोवावासीयांना वाटते.

अटलांटिक महासागर, त्याला भेटायला येणाऱ्या टायस नदीचे २० किलोमीटर्सचे पात्र आणि सात डोंगर यांच्या सान्निध्याने लिस्बनला त्याचे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. लिस्बनमधली बरीचशी घरे येथील डोंगर-उतारावर आहेत. येथील घरांचे स्थापत्य पाहून गोव्यातील पणजी शहराची आठवण आल्यावाचून राहत नाही.

पांढरा, पिवळा, निळा आणि फिकट गुलाबी हे सकारात्मक आशावादी रंग हे लिस्बन शहराचे आवडते आहेत. येथील घरांच्या भिंती प्रामुख्याने पिवळ्या किंवा निळ्या, पांढऱ्या तर कधी तरी फिकट गुलाबी रंगाने रंगवलेल्या दिसतात. छपरे मातीच्या रंगाची असतात. लिस्बनच्या डोंगरावरून या रंगीबेरंगी घरांचा विहंगम कोलाज फार सुरेख दिसतो. लिस्बनच्या नगररचनाकाराने ही रमणीय वास्तूंची रांगोळी अशा नजाकतीने आणि सेंद्रियतेने घातली आहे, जशी एखाद्या माळ्याने आपल्या बागेत वेगवेगळ्या फुलझाडांची मायेने लागवड करावी!

लिस्बन शहराचे रस्ते विस्तृत असून ते एकमेकांना काटकोनात छेद देतात. चौरस्त्यावर विस्तृत चौक असतो. चौक, प्लाझा, पियेझा ही छान युरोपीय संकल्पना आहे. या चौकाच्या मधोमध सुंदर कारंजे किंवा पुतळा असतो. कारंज्याच्या अवतीभोवती किंवा पुतळ्याच्या खांद्यावर अष्टदिशांतील पक्षी असतात. या पक्ष्यांमुळे पुतळे सजीव वाटतात. कारंजी नैसर्गिक आणि अकृत्रिम वाटायला लागतात. चौकाच्या चारी बाजूला ओपन एअर रेस्टॉरंट्‌स्‌ किंवा कॅफेज असतात, जिथे बसून आरामात गप्पा मारता येतात.

लिस्बनमध्ये फिरताना अधून-मधून छोट्या-मोठ्या इगर्जी, कपेले, चर्च आणि बासिलिका दिसतात. या वास्तू बहुधा डोंगरावर असतात. त्यांचा दर्शनी भाग पांढऱ्या रंगात रंगवलेला असतो; पण कोपऱ्यांतून त्यांच्यावर गुलाबी, केशरी, लाल फुलांनी डवरलेली बोगनवेल- जिला काकासाहेब कालेलकरांनी भुवनवेल हे समर्पक नाव दिले आहे- चढवलेली असते. या झगमगीत रंगीत भुवनवेलीमुळे कितीही प्रयत्न केला तरी ह्या इगर्जी दिसाव्या तशा संन्यस्त दिसत नाहीत. त्या प्रसन्न, खेळकर आणि हसतमुख वाटू लागतात. देवळे, मशिदी, चर्च या साऱ्या वास्तू बुद्धविहारानंतर आल्या. रामायण-महाभारतात एकाही देवळाचा उल्लेख नाही. घराला मात्र फार पुरातन परंपरा आहे. घराचे आद्य रूप म्हणजे गुहा. गुहेपासून आजचे घर हा स्थापत्यकलेचा मनोहर इतिहास आहे.

भारतातील बहुतेक घरे जमिनीच्या पातळीवरच असतात. घरांची पातळी (प्लिंथ) ही जमिनीच्या पातळीपेक्षा वर असावी, ही कल्पना बहुधा युरोपमधील स्थापत्यकारांना सुचली असावी. यातून घरांना पुराचे पाणी, दलदल यापासून संरक्षण मिळावे हा एक हेतू असावा. पण दुसरा हेतू हा की, घरे जमिनीच्या पातळीहून वर असली की, त्यांना एक वेगळी सौंदर्यात्मकता प्राप्त होते.

घरे जमिनीच्या वर जाऊन बसली की, घरात जाण्यासाठी पायऱ्या कराव्या लागतात. पोर्तुगीज स्थापत्यकारांनी पायऱ्या ही नेहमीच कलात्मक गोष्ट मानली. म्हणूनच एकाच पातळीवरून दुसऱ्या पातळीवर जाण्यासाठी त्यांनी डावीकडून आणि उजवीकडून असे पायऱ्यांचे दोन-दोन संच केले.

सर्व पाश्चात्त्य देशांत पायऱ्यांचे स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण असते. रोममधल्या स्पॅनिश स्टेप्स्‌, कॅलिफोर्नियामधल्या केझी स्टेप्स्‌ पर्यटकांचे खास आकर्षण आहेत.

पायऱ्यांतूनच जिन्याचा जन्म झाला. जिन्याला पोर्तुगीजमध्ये इश्काद हा शब्द आहे. जिन्याचे वेगवेगळे सुंदर प्रकार पोर्तुगालमध्ये पाहायला मिळतात. भूमिती आणि त्रिमितीला सर्व अंशांतून फिरवून आणि दगड व धातूचा कल्पक उपयोग करून पोर्तुगीज स्थापत्यकारांनी कलात्मक जिने बांधले. हे जिने इतके रोमँटिक केले आहेत की, ललनेला पाहता-पाहता जिना चढणाऱ्या युवकाचे तिच्यावर प्रेम जडावे आणि जिन्यावरच तिला त्याने मिठीत घ्यावे व तिचे चुंबन घ्यावे! घराची दारे आयताकृती न करता  लंबगोलाकार झाली. घराच्या दारापुढे बलकाव ही संकल्पना आली. बलकाव म्हणजे घर आणि घराबाहेरचा निसर्ग यांना जोडणारी जागा. अर्थात, घराच्या दाराबाहेर छताखाली तिन्हीसांजेला गप्पा करत बसण्यासाठी बनवलेली जागा. बलकावात बसण्यासाठी वेगवेगळे सोपे आले.

यानंतर मानवी संस्कृतीतील सगळ्यात मोठे सांस्कृतिक पाऊल स्थापत्यकरांनी टाकले. ते म्हणजे खिडकीचा शोध. गुहांना खिडक्या नव्हत्या. घरांना स्थापत्यकारांनी विविध प्रकारच्या खिडक्या ठेवल्या. खिडकी हा घराचा डोळा आहे, खिडकी हा घराचा कान आहे, खिडकी हे घराचे नाक आहे. स्थापत्यकारांनी खिडक्यांच्या दारांना शिंपल्यांचे खवले लावले आणि खिडक्या शोभिवंत केल्या. यथावकाश खिडक्यांपुढे बाल्कनी आली. खिडक्यांच्या माथ्यावर फुलवेली चढल्या आणि खिडक्या सेंद्रिय झाल्या. युरोपीय तथा पोर्तुगीज स्थापत्यकारांनी घरांना बाशिंगासारखी लाकडी सुंदर पट्टी बसवली.

मग आले घरातले फर्निचर. डुलणारी खुर्ची- तिचे नाव वोहतेर कसे पडले, मलाही माहीत नाही. नक्षीदार खुर्च्या, सुबक टेबले, शोभिवंत कपाटे. भिंतीच्या कोपऱ्यात त्रिकोणी लाकडी टेबल आणि त्यावर छोटे-छोटे सुंदर सोव्हिनिर्स, विणलेले डौलदार पडदे. एका कोपऱ्यात नाजूक बोटांची वाट पाहत बसलेला पियानो, दुसऱ्या कोपऱ्यात उंची मद्याच्या बाटल्या असलेला बार काऊंटर.

लिस्बनमध्ये फिरताना अशी घरे पाहिली की, लिस्बन हे ‘घरांचे’ शहर आहे असे वाटू लागते. असे दुसरे शहर भूतानमधले थिंपू आहे. त्याही शहराचे आपल्या घरांवर प्रेम आहे. अशी आपल्या घरांवर प्रेम करणारी शहरे मला आवडतात!

लिस्बनचे आपल्या रस्त्यांवरही प्रेम आहे. लिस्बनचे रस्ते कसे स्वच्छ-मोकळे आहेत. या रस्त्यांवरून मधोमध संथ पिवळी ट्रॅम जाते. ट्रॅम ही मला नेहमीच स्त्रेण- फेमिनीन वाटते. ती रेल्वेसारखी पुरुषी- मॅस्क्युलिन नाही. पाहिजे तेव्हा ती अलगद थांबते. रेल्वेसारखी ती धाड्‌धाड्‌ धावत नाही. पिवळ्या वेषात नटलेल्या पोर्तुगीज रमणीप्रमाणे लिस्बोवाच्या रस्त्यावरून रमत-गमत ती जात असते.

लिस्बन शहराचा अल्फाया हा भाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. ह्या भागात चालत फिरण्यातच खरी मजा आहे. जुलैमधल्या एका सुरेख सकाळी ऊबदार उन्हात आम्ही अल्फायाचा डोंगर आरामात चढून गेलो. डोंगरावर समुद्राभिमुख इगर्जी आहे. इगर्जीपुढे उभे राहिल्यास लिस्बन बंदराचे विहंगम दृश्य दिसते. तिथूनच पुढे एक पुरातन किल्ला आहे. या किल्ल्यावरचा पेरिस्कोप शो पाहण्यासारखा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या शोमध्ये अर्धगोलाकार पडद्यावर लिस्बन शहराचे लाइव्ह दृश्य दाखवले जाते.

डोंगर उतरून येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सोव्हिनिर्स  शॉप्स व रेस्टॉरंट्‌स आहेत. खाली प्राक द कमर्शिया हा विस्तृत चौक आणि त्यापुढे अटलांटिक समुद्राचे दर्शन घडते. प्राक द कमर्शियाच्या समोर आर्को रुआ आगुस्ता हा विख्यात आर्क आहे. त्यापुढचा रुआ आगुस्ता हा तीन किलोमीटर्सचा- केवळ पादचाऱ्यांसाठीच मोकळा ठेवलेला रस्ता फार मजेदार आहे. त्याला रेस्टॉरंट स्क्वेअर असेही नाव आहे. कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच नव्हे, तर मधोमधही ओपन एअर रेस्टॉरंटस्‌ आहेत. दुपारची वेळ होती. सुशांताने आणि मी इथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये रेड वाईनचा आस्वाद घेत ट्यूना सॅलड, बीफ स्टेक आणि रोस्टेड सामन यांचे सुग्रास जेवण घेतले.

त्यानंतर आम्ही आजुल्याच्या म्युझियमला भेट दिली. आजुले म्हणजे विविध डिझाइन्स निळ्या रंगांत रंगवून केलेल्या मोझाइक टाइल्स. ह्या टाइल्सचा वापर बहुधा भिंतींवर करतात. आजुल्याचा शोध पोर्तुगालमध्ये लागला. आता गोव्यातही आजुले करतात. नंतर आम्ही बेलेम येथील पुरातन मॉनेस्ट्रीला भेट दिली. त्यापुढे लिस्बोवाचे प्रसिद्ध बेकरी शॉप होते, तिथे आम्ही पेस्टेस द बेलेम हा कस्टर्ड टार्टचा प्रकार चाखला.

संध्याकाळी जगद्‌विख्यात गोमंतकीय आर्किटेक्ट पद्मविभूषण चालर्‌स कुरैया यांनी डिझाईन केलेले शांपाली मॉल हे कॅन्सर रिसर्च सेंटर आम्ही पाहिले.

टागस नदी जिथे अटलांटिक समुद्राला मिळते, तिथे ही जहाजासारखी दिसणारी वास्तू उभी आहे. इथूनच पाचशेहून अधिक वर्षांपूर्वी वास्को द गामा हा जहाज घेऊन भारतात (खरे म्हणजे अमेरिकेचा शोध लावण्यासाठी) जाण्यासाठी निघाला होता. दगड किंवा काँक्रिट न वापरता जास्तीत जास्त आरशांचा वापर करून ही वास्तू बांधण्यात आली आहे. वास्तूत जागोजागी फुलझाडे व पानझाडे आहेत, त्यामुळे बाहेरचा निसर्ग आणि आतला अवकाश यांत एक अनुबंध जोडला गेला आहे. ही वास्तू दोन इमारतींत जोडली गेली आहे आणि दोन इमारतींना जोडणारा एक ॲक्रलिक सेतू आहे. या वास्तूच्या बाहेरून समुद्रापर्यंत जायला चढणीचा रस्ता आहे. चढताना समुद्राचे पाणी दिसत नाही, फक्त दोन उंच खांब दिसतात. चढण संपली की, दोन खांबांमधले एक छोटे तळे व त्यामधील कासवाच्या पाठीसारखा खडक दृष्टिक्षेपास पडतो आणि त्यानंतर टागस नदीचे संथ वाहणारे पात्र आणि पुढे अटलांटिक महासागराचे प्रशांत-निळे पाणी दिसू लागते. समोर समुद्र बिलोरी ऐना होता. मी चालर्‌स कुरैयांच्या उत्तुंग प्रतिभेला शतश: नमन केले.

दुसऱ्या दिवशी लिस्बनच्या बाजारात शॉपिंग केले. कोंबडा हा पोर्तुगालचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यामुळे येथील घरांच्या छपरांवर लाल कौलारू रंगात कोंबडा असतो. आम्ही कोंबड्याचे सोव्हिनिर्स घेतले. पोर्तुगालमध्ये दर्जेदार चीज मिळते. आम्ही चीजचे हवाबंद डबेही विकत घेतले.

लिस्बन सोडण्यापूर्वी पणजीचे रामचंद्र नायक आम्हाला भेटायला आले. गोवा स्वतंत्र झाल्यावर रामचंद्र नायक नोकरी करण्यासाठी अंगोलाला गेले होते. पुढे ते लिस्बनला स्थायिक झाले. पोर्तुगीज युवतीशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे वय आज ८३ वर्षांचे आहे, पण त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे. रामचंद्र नायक हे मोठे गोष्टीवेल्हाळ गृहस्थ आहेत. मडगावमधील आपल्या समवयीन मित्राची त्यांनी चौकशी केली आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता ते म्हणाले, ‘‘समराधनेत उपरणे पांघरावे तसे त्यांनी म्हातारपण पांघरले आहे; मी मात्र तसे केले नाही!’’ त्यांचे शब्द काव्यात्म तर होतेच, पण फार मार्मिकही होते.

भारतातील माणसे अकाली म्हातारपण ‘पांघरतात’; पाश्चात्त्य देशांतील ज्येष्ठ नागरिकांत मात्र ‘अजून यौवनात मी’ ही भावना असते. त्यामुळे व्हीलचेअरवर बसूनही ते जगप्रवास करतात. शरीर म्हातारे होण्यापूर्वी मन म्हातारे होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. काही माणसे तर मरण्यापूर्वीच ‘मेलेली’ असतात; फक्त त्यांची तिरडी ‘राम नाम सत्य है’ म्हणत स्मशानात नेणे बाकी असते. अशा पार्श्वभूमीवर, रामचंद्र नायकांसारखा योगासने करून मन आणि शरीर सुदृढ ठेवणारा ‘तरुण’ भेटला की, मन प्रसन्न होते! रामचंद्र नायक दर सहा महिन्यांनी आपल्या १०२ वर्षांच्या आईला भेटायला गोव्यात येतात आणि जाताना कोंकणी पुस्तके, कोंकणी तिपात्र, मराठी नाटके- सिनेमा यांच्या सीडीज घेऊन जातात. माणूस कितीही वर्षे परदेशात असला तरी त्याचे मातृप्रेम, मातृभूमिप्रेम आणि मातृभाषाप्रेम यत्किंचितही कमी होत नसते.

लिस्बनहून आम्ही पोर्तो शहरात आलो. पोर्तो शहर ‘पोर्त’ ह्या प्रसिद्ध वाईनसाठी विख्यात आहे. पोर्तुगालचे नावही त्यावरूनच पडले असावे. पोर्तो शहराच्या ज्या हॉटेलमध्ये आमचे वास्तव्य होते, त्या हॉटेलमधल्या लिफ्टची एक गोष्ट चट्‌कन्‌ माझ्या नजरेस आली. ती म्हणजे, ह्या लिफ्टमध्ये बसायला सीट आहे. माझ्या जगभरातल्या प्रवासात मी लिफ्टमध्ये कधीच सीट पाहिली नव्हती. हल्ली मात्र मी राजस्थानमध्ये लिफ्टमध्ये सीट असल्याचे पाहिले.  

पहाटे पाचला उठायच्या सवयीचा प्रवासात फार फायदा होतो. सकाळी सातपर्यंत ब्रेकफास्ट घेऊन शहराची भ्रमंती सुरू करता येते. आम्ही युरोपमधल्या शहरांत चालतच फिरणे पसंत करतो. यामुळे शहरे आपला खरा चेहरा जवळून दाखवतात. आपले हितगुज सांगतात. क्वचित आम्ही हॉप ऑफ बसने शहरात फिरतो. पोर्तो शहर तसे छोटेसे आहे, त्यामुळे आम्ही पायीच भटकंती केली. शहरात एक पुरातन चर्च आहे. त्यामागे दीपस्तंभासारखा एक टॉवर आहे. हे चर्च केव्हा, कोणी व का बांधले- या इतिहासाचे उत्खनन आम्ही केले नाही. आमचे पाय पोर्तो रेल्वे स्टेशनकडे वळले. पोर्तो हे एकच रेल्वे स्टेशन आहे जिथे पर्यटक केवळ गाडी पकडण्यासाठी जात नाहीत; तर तिथल्या रेल्वे स्टेशनवर भव्य आजुले आहेत, त्यावर पोर्तुगालचा इतिहास चित्रित केला आहे. भिंतीवरचे ते आजुले डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्यानंतर आम्ही एका जेलला भेट दिली. गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनाही ह्या जेलमध्ये ठेवले असेल आणि त्यांनी ह्या जेलमध्ये किती हाल-अपेष्टा सोसल्या असतील, हा विचार माझ्या मनात आला व मी उदास झालो.

पोर्तुगालच्या भेटीत हा पाचशे वर्षांपूर्वीचा कटु इतिहास विसरणे शक्य नव्हते. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा पोर्तुगाल सरकारने अनन्वित छळ केला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांचे संसार देशोधडीस लागले.

पाचशे वर्षांच्या कटु इतिहासाचे दुसरे पान म्हणजे, धर्मांतर. पण धर्मांतराचे अनेक अंतर्प्रवाह आहेत. एक अर्थात बळजबरीने आणि तलवारीचा-सत्तेचा धाक दाखवून केलेले धर्मांतर. पण एकूण धर्मांतरितांची संख्या पाहिल्यावर हे धर्मांतर नगण्य म्हटले पाहिजे. बहुसंख्य तथाकथित उच्च जातीचे हिंदू आपल्या जमिनीचे आणि व्यापाराचे हितसंबंध राखण्यासाठी ख्रिश्चन झाले. ते ख्रिश्चन झाल्यावर त्यांच्या जमिनीवर राबणारी कुळेही ख्रिश्चन झाली. काही तथाकथित खालच्या जातीतील हिंदू लोक जातिसंस्थेला कंटाळून येशू ख्रिस्ताच्या समतेच्या संदेशाने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाले. पण ख्रिस्ती झालेल्या पूर्वाश्रमीच्या हिंदूंनी आपल्या खाण्या-जेवण्याच्या पद्धती, लग्नविधी, सण-उत्सव पूर्वीप्रमाणेच चालूच ठेवले. ते त्यांनी बंद करावेत आणि पूर्णपणे ख्रिश्चन पद्धतीने जीवन जगावे, म्हणून इन्क्विझिशनची स्थापना झाली. मग पूर्वापार चालीरीती चालू ठेवणाऱ्या धर्मांतरित ख्रिश्नांचा प्रचंड छळ इन्क्विझिशनच्या नावाखाली झाला.

पोर्तुगीजांनी कोंकणी भाषेतील हस्तलिखिते जाळली आणि पोर्तुगीज भाषा स्थानिक लोकांवर लादली. याच वेळी साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या सकारात्मक योगदानाकडे दुर्लक्ष करता कामा नये.

राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड बेंटिंग यांच्या साडेतीन शतके आधी १५११मध्ये आफोंस द अल्बुकर्क याने गोव्यात सतीची चाल बंद केली. पोर्तुगीजांमुळे गोव्यात आणि पर्यायाने भारतात काजू, अननस, कॉफी, कोको, बटाटा, टोमॅटो, मिरची, चिकू अशी अनेक कृषिपिके आली. पोर्तुगीजांचे कृषिक्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचे योगदान म्हणजे हापूस (अफ्लान्सो), मानकुराद, मांगिलाल, मुसराद, फेंर्दाद, कुलास यांसारखे रसाळ, मधुर कुलमी आंबे! पोर्तुगीजांमुळे गोव्यात व भारतात बेकरी उद्योग आला. पोर्तुगीजांनी मराठ्यांना इंग्रजांविरुद्ध लढायला घोडे, तोफा व दारूगोळा दिला. याशिवाय पोर्तुगीजांकडून शेष भारत गुलाब, मध व आंबे घेत असे.

सुरुवातीची चूक उमगल्यानंतर पोर्तुगीजांनी कोकणी भाषेला उत्तेजन दिले. कोकणी भाषेचे व्याकरण लिहिले. कोकणी ग्रंथ छापले. फादर स्टीफनने ‘ख्रिस्त पुराण’सारखा मराठी ग्रंथ लिहिला.

पोर्तुगीजांनी गोव्यात समान नागरी कायदा केला व स्त्रीपुरुषांना समान अधिकार दिले. स्वच्छ भारत अभियानाच्या अनेक शतके आधी पोर्तुगीजांनी गोव्यात स्वच्छ गोवा अभियान राबवले. गोमंतकीयांवर ब्रिटिशांप्रमाणे फारसे जाचक कर लादले नाहीत. ब्रिटिशांनी भारत ही आपली वसाहत मानली. पोर्तुगीजांनी गोवा हा आपल्या देशाचा भाग मानला. गोमंतकीयांना आपल्या संसदेत प्रतिनिधित्व दिले. आजही १९६१पूर्वी जन्मलेल्या गोवा, दमण, दीवच्या नागरिकांना आणि त्यांच्या पुत्र-पौत्रांना पोर्तुगालचे नागरिकत्व मिळणे सहज शक्य होते. आणि एकदा पोर्तुगालचे नागरिकत्व मिळवले की, कुठल्याही युरोपीय राष्ट्रात ते जाऊ शकतात.

पोर्तुगीज भाषेच्या ज्ञानामुळे पोर्तुगाल, अंगोला, मोझांबिक, ब्राझील, तिमोर या देशांत नोकरी व्यवसायासाठी गोमंतकीय जाऊ शकले.

पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनिओ कॉश्ता गोव्यात आले; तेव्हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पुढारी सुदीन ढवळीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर वगैरेंनी ‘पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी गोमंतकीयांची माफी मागवी’ अशी मागणी केली. ती हास्यास्पद ठरली. गोव्यात  त्याला कुणीच फारसा प्रतिसाद दिला नाही.

पोर्तो शहरात ट्रेलर ही वायनरी आम्ही पाहिली. तिथे हिरव्या द्राक्ष्यांपासून व्हाईट वाईन आणि काळ्या द्राक्ष्यांपासून रेड वाईन अद्ययावत यंत्रांच्या साह्याने बनविण्याची प्रक्रिया आम्ही पाहिली. पण दर वर्षी इथे परंपरागत पद्धतीने द्राक्षे पायांनी तुडवण्याचा व त्यावेळी नाचगाण्याचा कार्यक्रम होतो. वायनरीमध्ये आम्ही वेगवेगळ्या वाईनची चव घेतली. तिथे एक व्हाईट व एक रेड वाईनची बाटली आम्ही खरेदी केली.

पोर्तोमधले एक दुकान आता एक दंतकथाच बनली आहे. त्या दुकानाचे नाव- ‘लिव्हारिया लेला.’ या दुकानात जायला भली मोठी रांग होती आणि आत जायला तीन युरोंचे तिकीट होते. अर्थात, दुकानात पुस्तक खरेदी केल्यास पुस्तकाच्या किमतीतून तिकिटाचे पैसे कमी करण्यात येणार होते. हे पुस्तकाचे दुकान एवढे प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे, हॅरी पॉटरची लेखिका जे.के.रौलिंग ही (पोर्तोमध्ये इंग्रजीची शिक्षिका असताना) कॉफी प्यायला व पुस्तके खरेदी करायला या दुकानात यायची. इथेच तिने हॅरी पॉटरच्या कथानकाचा कच्चा मसुदा लिहिला, असे म्हणतात. हे पुस्तकाचे दुकान १८६२मध्ये सुरू झाले. त्याचे स्थापत्य अन्तोनिओ फ्लोरिस या स्थापत्यकाराने एखाद्या चर्चसारखे केलेले आहे. इथे मी पोर्तुगालचे नोबेल प्राईज विजेत्या सारामागोची दोन पुस्तके विकत घेतली. त्यात ‘ब्लाइंडनेस’ ही भन्नाट कादंबरी आहे. एका देशातील सगळीच माणसे आंधळी होतात, मग त्यांचे आपापसातले व्यवहार कसे होतात त्याचे वर्णन त्या कादंबरीत आहे.

पोर्तो शहरातून आम्ही कोइब्राला आलो. पोर्तुगालमधला सगळा अंतर्गत प्रवास आम्ही बसमधून केला. इथे बसमध्ये दोन ड्रायव्हर्स असतात. तीन तासांनंतर ड्रायव्हर बदलतो. माझ्या मनात विचार आला- भारतातही बसेस, ट्रक्समध्ये दोन-दोन ड्रायव्हर्स असले; तर रोजगार वाढेल. उत्पादकता वाढेल, वेग वाढेल आणि अपघात कमी होतील.

युरोपीय देशांत महामार्गावर सगळीकडे मॉटेल्स असतात, त्यामुळे स्वच्छ टॉयलेट्‌सची सोय होते. भारतातील महामार्गावर प्रत्येक पेट्रोल पंपावर स्त्रीपुरुषांसाठी टॉयलेट्‌स करणे अनिवार्य केले पाहिजे. त्याशिवाय महामार्गावर मॉटेल्सनाही उत्तेजन दिले पाहिजे.

कोइब्रा शहर हे पाचशे वर्षांच्या पुरातन विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. हे विद्यापीठ एका डोंगरावर आहे. कोइब्रा विद्यापीठातील विद्यार्थी काळा गाऊन व काळी टोपी घालून परिसरात फिरत असतात. विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके सुव्यवस्थितपणे मांडलेली आहेत. या पुस्तकांचे किड्या-मुंग्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून रात्री इथे वटवाघळे सोडली जातात, कारण वटवाघळे किड्या- मुंग्यांचे भक्षण करतात.

पोर्तुगालच्या दक्षिण किनाऱ्यावरचा आल्फुबेरा हा गाव पोर्तुगालच्या आमच्या प्रवासातला शेवटचा थांबा होता. उन्हाळ्यात पोर्तुगालमधले स्थानिक लोक आणि पर्यटक इथे समुद्रस्नान व सूर्यस्नान घेण्यासाठी आले होते. बिअर आणि वाईनचा ओघ वाहत होता. मीही थंडगार बिअर रिचवली. येथील पोर्तुगीज प्रॉन्स करी राइस ही राइस व करी यांचे छान मिश्रण करून सर्व्ह करतात. ती छान लागते. आल्फुबेराहून स्पेन जवळच आहे. तिथून आम्ही स्पेनला जाणार होतो. पोर्तुगाल आणि स्पेन हे जवळचे देश आहेत. दोन्ही देशांत कधीच मोठी युद्धे झाली नाहीत. पोर्तुगालची सीमा पार करून स्पेनमध्ये जाताना ना कोणी पासपोर्ट चेक केला, ना कोणी व्हिसा पाहिला. इथे भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातानाही नाकीनऊ येतात!

गोवा स्वतंत्र झाला, तेव्हा मी केवळ सात वर्षांचा होतो. त्यामुळे मला पोर्तुगीज भाषेतून शिक्षण घेता आले नाही. पण कोकणीमध्ये अनेक पोर्तुगीज शब्द आहेत, त्यामुळे पोर्तुगीज मला थोडीशी समजते. पोर्तुगीज ही अतिशय भारदस्त, श्रीमंत आणि शिरवंत भाषा आहे, याचे एकच उदाहरण पुरेसे आहे. या भाषेत कंडोमला कामिस द व्हेनस असा प्रतिशब्द आहे. त्याचा शब्दश: अर्थ फारच रोमँटिक म्हणजे- शुक्राचा सदरा असा होतो.

आता कधी तिन्हीसांजेला मी वोहतेरावर बसून पोर्तोहून आलेल्या रेड वाईटचे घुटके घेतो, तेव्हा माझ्या नाकासमोर सगळे वास दरवळतात. पोर्तोच्या वायनरींमधला नुकत्याच काढलेल्या द्राक्ष्यांचा मंद सुवास, रेस्टॉरंट स्क्वेअरमध्ये खाल्लेल्या रोस्टेड सामनचा उग्र गंध, रुआ आगुस्ताच्या बुटांच्या दुकानांतील चामड्याचा वास, आर्त स्वरात फादो गाणाऱ्या गायिकेच्या अत्तराची घमघम, अल्फायाच्या डोंगरावरील इगर्जीत पाद्रींनी केलेल्या धुपारतीतील धुंगराचा वास आणि अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या झुळकीचा अनाघ्रात वास.... हे सगळे वास!

पोर्तुगाल हे असे विविध वासांनी थबथबलेले पोळे आहे.

Tags: लिस्बन रामचंद्र नायक अंतोनिओ कॉश्ता दत्ता नायक गोवा ते लिस्बोवा पाचशे वर्षांचा प्रवास हापूस बेकरी उद्योग कोंबडा आजुले बलकाव जिना पायऱ्या बासिलिका चर्च कपेले इगर्जी अटलांटिक महासागर वास्को द गामा अल्फाया ट्रॅम खिडकी इश्काद फादो संगीत Antonio Costa Ramchandra Nayak Fado Music Vasco da Gama's Christianity Porto Tram Lisbon Steps Ladder Atlantic Ocean Hapus Aamba Cock Bakery Bussiness Church staircase window quick look glance Sem Flores New Coros' (Without flowers or wreaths) weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके