डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जपानमध्ये राजाला खूप मान आहे, जसा इंग्लंडमध्ये राणीला. जगातले सगळे राजा-राणी अस्तंगत होतील, फक्त पाच राजा आणि पाच राण्या जगाच्या अस्तापर्यंत कायम असतील असे म्हणतात. पत्त्यांतील चार राण्या व इंग्लंडची राणी आणि पत्त्यांतील चार राजे व जपानचा राजा! जपानच्या राजाला जपानी लोक देवासमान मानतात. जपानी राजाला दोन राजकुमार आहेत. मोठ्या राजकुमाराला मुलगा नाही, त्यामुळे आपण राज्याला वारस देऊ शकलो नाही, या विचाराने मोठ्या राजकुमाराची पत्नी मोसक हिला वैफल्य आलेले आहे. ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. भारताप्रमाणे जपानी समाजदेखील पुरुषप्रधान आहे. मुलीला राज्यपद देणे, जपानी समाज स्वीकारू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी बुद्धगयेला गेलो होतो, तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली ज्या जागेवर सिद्धार्थाला ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि तो बुद्ध झाला, त्या जागी जाऊन पुण्यश्लोक बुद्धाला भावांजली अर्पण केली. त्याच वेळी मनात विचार आला, आपल्या जीवनात गौतम बुद्ध आणि त्याचे शिष्य जिथे-जिथे पोचले आणि देश-विदेशांत जिथे-जिथे बौद्धविचार पोहोचला व रुजला त्या सगळ्या प्रदेशांना, देशांना आपण भेट दिली पाहिजे.

पुढे सारनाथला गेलो. सारनाथला बुद्धाने आपल्या आठ शिष्यांपुढे पहिले प्रवचन केले. मध्य प्रदेशात इंदूरजवळच असलेला सांचीचा स्तूप पाहिला. सांचीचा स्तूप हे साधेच पण अतिशय सुबक आणि सुंदर वास्तुशिल्प आहे. त्यात बुद्धाची रक्षा आहे, अशी बौद्ध भाविकांची श्रद्धा आहे. अजंठाचे विहार आणि लेणी पाहिली. अजंठाच्या डोंगरावर बुद्धाची रंगीबेरंगी जातककथा पाहून मन तृप्त झाले.

नेपाळमधले बुद्धाचे भूमीवरचे पहुडलेले शिल्प पाहिले. श्रीलंकेत गेलो, तेव्हा तिथल्या कँडी ह्या सुंदर गावात एक रात्र राहिलो. सरत्या तिन्हीसांजेला बुद्धमंदिरात मंद वातींच्या प्रसन्न उजेडात भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धमूर्तीचे दर्शन घेतले.

लेह ही लडाखची राजधानी. तिथले लामांचे बुद्धविहार पाहिले. तिथे लामांनी बुद्धाला अक्षरश: सजवून-नटवून त्याला कृष्णरूपी केला आहे. बुद्ध तसा बहुरूपी, कामरूपीच आहे!

पुढे चीनमध्ये गेलो. म्यानमारमध्ये गेलो. थायलंडच्या बुद्धविहारांचा थाट तर काय सांगावा! प्रशस्त प्राकारातले ते भव्य राजेशाही बुद्धविहार सुवर्णवर्खी पत्र्यांनी मढलेले. भूतानमधला बुद्ध तिथल्या मातीत रुजून सेंद्रिय झाडासारखा फुलून आलेला!

बुद्धाची ही विविध रूपे. बुद्धाचे हे बहिर्रंग आणि ह्या त्यातून बुद्धाच्या अंतरंगांत जाण्याचा प्रयत्न!

अजून जपानमध्ये जाण्याची संधी आली नव्हती. अचानक तो योग आला. ज्या भूमीत बुद्ध जन्मला, त्या भारतभूमीपासून  जपान हजारो मैल दूर, मधे सागर व महासागर- असे असतानाही बौद्ध भिक्षू आणि बौद्धविचार जपानमध्ये पोहोचला. तिथल्या संस्कृतीचा भाग झाला आणि त्या संस्कृतीने बौद्धविचाराला एक आगळेवेगळे रूपही दिले. हे सगळेच विस्मयकारी आहे.

बुद्धाचा विचार प्रथम चीनमध्ये पोहोचला. तिथल्या  स्थानिक कॅन्फ्युशियस तत्त्वज्ञानाशी त्याचा संपर्क आला. त्या तत्त्वज्ञानात विरघळून एक नवे रसायन तयार झाले. बुद्धाचे ध्यान चीनमध्ये झेन झाले. हेच झेन तत्त्वज्ञान पुढे  जपानमध्ये पोचले. स्वत:ला बौद्धधर्मीय मानणारा जपान कसा असेल, याचे मला फार आकर्षण आणि उत्सुकता होती.

जपानच्या जन्माची एक मिथककथा आहे.

विश्वाच्या महाकाय गर्भाशयात पृथ्वीचा जन्म झाला, तेव्हा पृथ्वीच्या सर्वांगावर दूरवर पसरला होता अथांग समुद्र. मग लाखो वर्षांनी भूमी तरारून वर आली. पण जपानची छोटी-छोटी बेटे समुद्रातच रुतून राहिली. अशा वेळी निसर्गदेवतेने आपली महाकाय तलवार काढून समुद्राच्या पोटात खुपसली. ही तलवार वर काढताच समुद्रावर रक्ताचे काही थेंब शिंपडले. यथावकाश त्यांची छोटी-छोटी बेटे झाली. तीच ही जपानी बेटे!

चार मोठी बेटे आणि त्या भोवतीची सहा हजार छोटी बेटे मिळून जपानचा भूप्रदेश बनलेला आहे. पूर्वेला सूर्याला सर्वप्रथम अर्घ्य वाहणारा हा देश. म्हणूनच ह्या सूर्यपूजक, प्रकाशपूजक देशाच्या पांढऱ्या झेंड्यावर आरक्त तांबड्या पूर्ण सूर्याचे चित्र असते.

जपानला सुसंगतीपेक्षा विसंगतीचेच अप्रूप आहे. भौगोलिकदृष्टीने हा पौर्वात्य देश आहे, पण त्याची जीवनशैली पूर्णपणे पाश्चात्त्य आहे. जपान जेवढा आधुनिक आहे, तेवढाच तो परंपरानिष्ठही आहे. जपान छोटासा देश आहे. जणू सुंदर बोन्साय असावा, तसा! पण त्याच्या मनात वटवृक्ष होण्याची स्वप्ने आहेत. जपानी समाजजीवनात गती आहे, वेग आहे, आवेग आहे. जागतिक क्षेत्रात सर्वांच्या पुढे जायची आकांक्षा असलेला गतिमान, प्रगमनशील असा हा देश आहे. जपानची ‘शिनकानसेन’ नावाची बुलेट ट्रेन ही या जपानी स्वभावाचा दृश्य अवतार आहे. पण वेगाचे प्रचंड आकर्षण असलेला हा देश सगळ्याच गोष्टी वेगाने, घाईघाईने करतो, असे समजण्याचे कारण नाही. काही परंपरागत गोष्टी जपानी माणूस अतिशय संथपणे करतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानी टी सेरेनी! ह्या टी सेरेनीला जपानी संस्कृतीत खास महत्त्व आहे. पाहुण्यांना चहा देण्याचा हा समारंभ अतिशय संथ गतीने व सावकाश केला जातो.

ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान ह्या क्षेत्रांत सुसाट धावत सुटलेला हा देश कला, साहित्य, संगीत, धर्म ह्या क्षेत्रांत मंद गतीने वाटचाल करतो. मानसिक शांती आणि समाधान यांच्या आराधनेसाठी, सौंदर्याच्या आणि कलात्मकतेच्या आस्वादासाठी तो योग्य वेळ देतो.

जपानी समाजातले वृद्धांचे प्रमाण वाढत आहे. त्या दृष्टीने ती एजिंग सोसायटी आहे. जपानी माणसे म्हातारी होत आहेत, पण जपानी मन म्हातारे झालेले नाही. ते अजूनही तरुण आहे, चिरतरुण आहे.

लाल आणि हिरवा हे दोन्ही- कुठलीही रंगसंगती नसलेले विसंगत रंग जपानला फार आवडतात. जपानी झेन गार्डनमध्ये जसे पाणी असते, तसे खडक असतात, जपानी इकेबानात फुले असतात तशी पानेही असतात. जपानी पाककलेत गोड आणि आंबट असे दोन्ही रस असतात. चिंग व यान म्हणजे पौरुषत्व आणि स्त्रीत्व या दोन्ही तत्त्वांच्या संगमातूनच उत्कटतेची निर्मिती होते, असे जपान मानतो.

जपान निसर्गपूजक शिन्तो धर्माला जेवढे मानतो, तेवढेच ध्यानमार्गी बौद्ध धर्मालाही मानतो. करुणेचा महामंत्र म्हणणाऱ्या बौद्ध धर्माचा अंगीकार जपानने केला आहे खरा; पण बौद्ध धर्माच्या मूल्यांचे जपानी स्वभावात किती आंतरिकीकरण झाले आहे, हा प्रश्नच आहे. मूलत: जपानी माणसाचा स्वभाव हा क्रूर असावा. जपानी माणसाचे हे पशुवत्‌ क्रौर्य बौद्ध धर्माच्या करुणाष्टकाने यत्किंचितही कमी झाले आहे याला इतिहासाचा आधार नाही. गेल्या काही शतकांत युद्धात, महायुद्धात आणि युद्धातील विजयानंतर जपानी लोकांनी केलेल्या क्रौर्याच्या कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. हा बौद्ध धर्माचा पराभव आहे, की मानवी गुणसूत्रांतील पशुत्वाचा विजय आहे? कोण जाणे! पण जपानी स्वभावातील ही फार मोठी विसंगती आहे, हे मात्र खरे!

जपानी समाजाचे आणि संस्कृतीचे भरजरी वस्त्र असे परस्परविरोधी अशा उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणले आहे.

मुंबईहून विमान उडाले ते क्वालालंपूर विमानतळावर उतरले. तिथे काही वेळ थांबून विमानाने परत उड्डाण केले. संध्याकाळ संपून तिन्हीसांजा झाल्या होत्या. उजेड करपून काळोख आता कारामेलायज्ड झाला होता. जपानमधला नारिटो विमानतळ जवळ आला होता. काळोखातून विमानतळाचे लखलखीत दिवे विमानाच्या खिडकीतून दिसत होते.

नारिटो विमानतळावर उतरलो, तेव्हा मनातल्या मनात  या बुद्धभूमीला नमस्कार केला आणि मनातल्या मनात म्हटले,

‘समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले

बुद्धभूमी नमस्तुभ्यम्‌ पादस्पर्श्‌ क्षमस्व मे ।’ पावसाळी दिवस होते. पहाटे पावसाचा शिडकावा येऊन गेला होता. टोकियो शहर सचैल भिजून सुस्नात झाले होते. या शहरात स्काय ट्री नावाचा उंच टॉवर आहे. त्याच्या ह्युइंग गॅलरीवरून टोकियो शहराचे विहंगम दृश्य दिसते.

सुमिदा नदी टोकियो शहरामधून वाहते. त्याशिवाय समुद्राची खाडी शहरात घुसून ती सुमिदा नदीला भेटायला येते. कुठल्याही शहराला असा नदीचा आणि समुद्राचा संगम मिळाला की, ते शहर कमनीय-रमणीय दिसू लागते. ते शहर फेमिनीन बनते. सुमिदा नदी आणि टोकियो बे यामुळे शहराला एक वेगळी रया लाभली आहे.

स्काय ट्रीवरून खाली पाहिले, तर सर्वत्र दिसत होते ते टोकियो शहरातले रस्त्यांचे जाळे. एकात एक घुसलेले वाकडे-तिकडे रस्ते. जशी एखाद्या बाऊलमध्ये स्पागेती असावी, तसे ते रस्ते आणि फ्लायओव्हर्स !

एका फ्लायओव्हरबद्दल सांगितलेच पाहिजे. एका वास्तुविशारदाने टोकियो शहरातील मध्यवर्ती जागेवर एका बहुजली इमारतीचा आराखडा महानगरपालिकेला सादर केला. तिथल्या अभियंत्यांनी तो आराखडा मंजूर केला नाही. कारण त्या जागेवरून एक फ्लायओव्हर येणार होता. वास्तुशिल्पज्ञाने त्या फ्लायओव्हरची माहिती घेतली व वेगळा आराखडा सादर केला. ह्या आराखड्याप्रमाणे त्याने आपल्या बहुजली इमारतीच्या आठव्या, नवव्या व दहाव्या मजल्याच्या जागी कोणत्याच सदनिका घेतल्या नाहीत आणि ही जागा फ्लायओव्हरसाठी मोकळी ठेवली. अभियंत्यांनी हा आराखडा मंजूर केला. या शहरात ही इमारत आज त्यामधून जाणाऱ्या फ्लायओव्हरसह उभी आहे.

टोकियो शहर हे असे जपानी समाजाच्या सामूहिक पुरुषार्थाचा दृश्यावतारच आहे. अभियांत्रिकीचा चमत्कार किंवा इंजिनियरिंग मार्व्हल म्हणजे टोकियो शहर असेही म्हणता येईल. ॲन रॅन्ड ह्या विख्यात लेखिकेने म्हटलेच आहे- यंत्र म्हणजे गोठलेली मानवी बुद्धिमत्ता- कन्डेन्सड इंटेलिजन्स.

टोकियो शहराला वडाचा महावृक्ष म्हणावे- की एक जायंट व्हील म्हणावे, हे मला कळत नाही. स्काय ट्रीवरून शहरातले रस्ते कन्व्हेअर बेल्टसारखे दिसत होते. त्यावरून शेकडो गाड्या धावत होत्या. हजारो लोक नोकरीला, व्यवसायाला जाण्यासाठी निघाले होते. मनात विचार आला- प्रत्येक शहर म्हणजे मानवी ऊर्जेचे कारंजेच असते- फाऊंटन हेड!

टोकियो शहराच्या शिरतरांतून ही चैतन्याची ऊर्जा वाहत होती. त्यानेच हे शहर असे रसरशीत, टवटवीत दिसत होते.

खेड्यांचे गाव झाले. गावांची शहरे झाली. शहरांची नगरे झाली. नगरांची महानगरे झाली. तसतसे मानवी संस्कृतीचे पाऊल पुढे-पुढे पडत गेले.

शहरीकरण आणि अर्थकारण यांचा अन्योन्य संबंध असतो. तो एकमार्गी नसतो, तर द्विमार्गी असतो. देशातले शहरीकरण वाढत जाते, तसे देशातले अर्थकारण बळकट होते आणि देशाची जशी आर्थिक प्रगती होते, तशी देशातील शहरीकरणाची प्रक्रिया वाढत जाते.

खेडी स्वयंपूर्ण आणि समृद्ध करावीत, का शहरीकरणाकडे भर द्यावा- हा अर्थशास्त्रातला सनातन वाद आहे. महात्मा गांधींचे अर्थशास्त्र खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याभोवती फिरत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे दोघेही शहरीकरणाच्या बाजूने होते.

खरे आणि खोटे, चांगले आणि वाईट अशा द्वैतातून मानवी प्रश्न सुटत नसतात; कारण मानवी प्रश्न अतिशय जटील असतात. आपण आज VUCA म्हणजेच Volatile, Uncertain, Complex आणि Ambigous अशा परिस्थितीतून जातो आहोत. अशा वेळी आपल्याला Multiple Truths म्हणजे बहुविध सत्यांचा सिद्धान्त स्वीकारावा लागेल. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरूंनी गांधीवादी आर्थिक तत्त्वज्ञान न स्वीकारता शहरीकरणावर- औद्योगिकीकरणावर भर दिला, हे त्या काळाच्या संदर्भात योग्यच होते. पण याचा अर्थ गांधींचे अर्थशास्त्र कालबाह्य झाले, असा होत नाही. कारण बुद्धाच्या अनित्यबोधाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे सगळे बदलत जाते. आता नव्या संशोधनाप्रमाणे ज्या वेगाने बदल होतो आहे, तो वेगही बदलता आहे. The rate of change is also changing.. अर्थशास्त्रात आता Civillage नावाची नवी संकल्पना रूढ होते आहे. खेड्यात ऑप्टिक फायबर पोहोचल्यावर खेड्यांची व्हर्च्युअल शहरे होणार आहेत. चांगल्या  रस्त्यांमुळे अंतर मृतवत्‌ होणार आहे. Distance will be dead. त्यामुळे शहरांना खेड्यांचे रूप देऊन त्यांचे बकाल स्वरूप कसे बदलावे आणि खेड्यांना शहरी मुखवटा आणून अद्ययावत कसे करावे, अशी ही सिव्हिलेजची संकल्पना आहे.

टोकियो शहर हे एका वारुळासारखे आहे. हे वारूळ वाढतच जात आहे. आज टोकियोची लोकसंख्या एक कोटी तीस लाख आहे. टोकियो शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अन्य शहरांप्रमाणे बकाल झालेले नाही. त्याला अर्बन पोलिओ झालेला नाही. आपल्या ओझ्याने त्याची पाठ खंगलेली नाही. जपानी लोकांनी आपली राजधानी प्रयत्नपूर्वक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. टोकियो पॅरिससारखे रूपगर्विता शहर नाही, पण ते प्रियदर्शनीय शहर खचितच आहे.

सेनसोजी देवळाच्या प्राकारांत पोचलो, तेव्हा तिथले जग वेगळेच होते. टोकियोसारख्या मॉडर्न शहरात हा सेनसोजी देवळाचा प्राकार म्हणजे एक छोटे बेटच आहे! सेनसोजी देवळाला शेकडो वर्षांचा इतिहास असावा. त्या इतिहासाची गडद छाया त्या प्राकारावर स्पष्ट दिसत होती. सेनसोजी देवळाच्या प्राकारात आत शिरताना तांबड्या आणि सोनेरी रंगात रंगवलेले प्रवेशद्वार तुचे स्वागत करते. अशा प्रवेशद्वाराला जपानमध्ये तोरी म्हणतात. सेनसोजी देवळात जाताना पंधरा-सोळा पायऱ्या चढून जावे लागते. देवळाची प्लिंथ उंच असल्याने देवळाला एक भव्यता लाभते. देवळात कोणतीच मूर्ती नाही. देवळाचा अंतर्भागही प्रवेशद्वारासारखाच तांबड्या आणि सोनेरी रंगात रंगवलेला आहे. देवळात सुंदर दिवे लटकवलेले आहे. मंद वाती पेटवलेल्या आहेत. अगरबत्त्यांच्या पुड्या जळत आहेत. त्यांचा सुवासिक धूर दरवळत आहे. मंदिरातला एकूण माहौल मन प्रसन्न करणारा आहे.

देवळाच्या पुढे दीपस्तंभ असावा तसा एक पॅगोडा आहे. त्याच्या पुढे रांगेने अनेक वस्तूंची दुकाने मांडीला मांडी लावून बसली आहेत. स्थानिक लोक, पर्यटक स्वच्छंदपणे फिरत आहे. देवळाभोवती असा बाजार असला की, देवळाला त्याचे सेंद्रिय रूप लाभते.

दोन प्रकारची देवळे मी पाहिली आहेत. एक अरंग्य रानातली एकटी, मख्ख मौनी-ध्यानमग्न देवळे आणि दुसरी अशी माणसांच्या गर्दीत बसलेली माणसाळलेली देवळे. दोन्ही प्रकारची देवळे मला आवडतात!

सेनसोजी देवळापुढे एक कुंड आहे. त्यात भक्तांनी अगरबत्त्या पेटवून लावल्या आहेत. ह्या अगरबत्त्यांचा धूर अंगावर घेतला तर सर्व पापांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमा अशी धुरकटच असते!

सेनसोजी प्राकाराबाहेरच जपानी रेस्टॉरंट्‌स आहेत. अशाच एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. बसायला छोट्या बुटक्या खुर्च्या आणि टेबले. एक किमोनो परिधान केलेली जपानी स्त्री हसत-हसत नम्रपणे तुमच्याजवळ येते. वाकून तुम्हाला अभिवादन करते आणि तुमची ऑर्डर घेते. आम्ही रायस आणि असॉर्टेट टेम्पुराची ऑर्डर दिली. टेम्पुरा म्हणजे कॉर्नफ्लोअर लावून तळलेली वांगी, कॉलीफ्लॉवर, कोळंबी (प्रॉन्स) यांची भजी. जपानी भात चिकट असतो. त्याबरोबर सोया सॉस देतात. जेवण फारच रुचकर होते. जेवणाबरोबर आम्हाला चॉपस्टिक्स दिल्या. पण ते वापरायची आम्हाला सवय नव्हती, म्हणून आम्ही काटे चमचे मागवले. जेवल्यानंतर आम्ही परत सेनसोजी मंदिराच्या प्राकारात आलो. परत एकदा मंदिरात जायचा मोह झाला. या वेळी ह्या शिन्तो मंदिराच्या छताखाली असलेले हातांनी हलवायचे पंखे माझ्या दृष्टीस पडले. आता मंदिरातली भाविकांची वर्दळ वाढली होती. मंदिराच्या पायऱ्यांवरून मंदिराचा पुरातन प्राकार सुरेख दिसत होता.

जपानला आम्ही भेट दिली, तो जून महिना होता. एप्रिल महिन्यात जपानमधल्या चेरीच्या झाडांना मोहोर येतो. ह्या झाडांना इथे साकुरा म्हणतात. चेरी ब्लॉसममध्ये ही साकुराची झाडे शुभ्र पांढऱ्या, फिकट गुलाबी रंगाच्या चेरीच्या फुलांनी गच्च फुलून येतात. हा पुष्पजडित, पुष्पखचित असा चेरी ब्लॉसम पाहणे हा अप्रूप अनुभव असतो. तो आम्हाला पाहता आला नाही, याची रुखरुख मनात होती. आम्ही कल्पनेनेच ते नयनरम्य दृश्य मन:चक्षूंपुढे आणले आणि कधी तरी खास चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जपानला यायचे, असे ठरवले. अमेरिकेतही असाच फॉल कलर पाहणे हा आगळा अनुभव असतो. हिवाळ्यापूर्वी झाडाच्या पानांचे रंग बदलतात, तेव्हा अमेरिकेच्या उत्तर भागाला भेट दिली पाहिजे. माझी ही संधीही हुकली ती हुकलीच!

टोकियो मध्ये एका छोट्याशा डोंगरावर जपानच्या राजाचा राजवाडा आहे. राजवाड्याची वास्तू दुरूनच पाहता येते. राजवाड्याभोवती हिरवीगार झाडे आणि वृक्षवेली आहेत. सभोवती खंदक आहे आणि त्यावरून राजवाड्यात जायला छोटासा साकव (पूल) आहे. राजवाड्याच्या भिंती पूर्ण पांढऱ्या रंगाच्या आहेत. राजवाड्याचे छप्पर त्रिकोणी आहे. राजवाडा भव्य- दिव्य नाही, पण आहे त्या आकारात तो सुबक आणि सुरेख आहे.

प्रत्येक वास्तूला योग्य तोच आकार असावा लागतो. ताजमहाल, गोलघुमट किंवा चारमीनार अधिक मोठे किंवा छोटे असले असते तर त्यांच्या सौंदर्याला बाधा आली असती. जपानी राजवाड्याचेही तसेच आहे. तो मोठाही नाही आणि छोटाही नाही. आपल्याला हवा तो आकार त्याने स्वाभाविकतेने घेतला आहे.

जपानमध्ये राजाला खूप मान आहे, जसा इंग्लंडमध्ये राणीला. जगातले सगळे राजा-राणी अस्तंगत होतील, फक्त पाच राजा आणि पाच राण्या जगाच्या अस्तापर्यंत कायम असतील असे म्हणतात. पत्त्यांतील चार राण्या व इंग्लंडची राणी आणि पत्त्यांतील चार राजे व जपानचा राजा! जपानच्या राजाला जपानी लोक देवासमान मानतात. जपानी राजाला दोन राजकुमार आहेत. मोठ्या राजकुमाराला मुलगा नाही, त्यामुळे आपण राज्याला वारस देऊ शकलो नाही, या विचाराने मोठ्या राजकुमाराची पत्नी मोसक हिला वैफल्य आलेले आहे. ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. भारताप्रमाणे जपानी समाजदेखील पुरुषप्रधान आहे. मुलीला राज्यपद देणे, जपानी समाज स्वीकारू शकत नाही. हल्लीच दुसऱ्या राजकुमाराच्या पत्नीला पुत्र झाल्यामुळे त्याला राज्यपद द्यावे, अशी चर्चा सुरू आहे.

टोकियोचा राजवाडा पाहिल्यावर आम्ही टोकियोच्या गिंजा या गजबजलेल्या बाजारात आलो. ही हाय स्ट्रीटच आहे जणू! जसा न्यूयॉर्कचा फिफ्थ अव्हेन्यू. कपड्यांचे, खेळण्यांचे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्टोअर्स, सुपर स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्स, मार्ट्‌स, हायपर स्टोअर्स यांनी गिंजाचा हा बाजार भरून ओततो आहे. मित्स्युकोशी हे तीनशे वर्षांपासून असलेले डिपार्टमेंटल स्टोअर्स इथे आहे. युनिक्लो हे कपड्यांचे दुकानही विख्यात आहे.

जपानमध्ये तयार होणारा माल आज जगभर जातो. जपानी घड्याळे, जपानी मोटारसायकली, जपानी मोटारी, जपानी कॅमेरे, जपानी म्युझिक सिस्टीम्स, जपानी बाहुल्या, जपानी क्रोकरी.... ‘मेड इन जपान’ या शब्दाला जगभर मान आहे. साऱ्या जगात जपानी ब्रँड लोकप्रिय झाले आहेत. लोकांच्या ओठांवर ते घोळत आहेत. एक-दोन नव्हे, तर शेकडो जपानी ब्रँड्‌स..... टोयोटा, होंडा, सोनी, पॅनासॉनिक, तोशिबा, निप्पॉन, इसुजू, सुझुकी, निक्कोन, किरीन, सिको, शार्प, ऑलिम्पस, मित्सुबिशी, माजदा...

हे केवळ ब्रँड्‌स नाहीत, तर ते जपानचे राजदूत आहेत. ते निर्माण करण्यामागे जपानची प्रचंड तपश्चर्या आहे. जपानने कायझेन हे नवे तंत्र शोधून काढले आहे. जपानी माणूस काम हा ध्यानाचाच एक भाग मानतो. ध्यान करताना जी एकाग्रता- जी मनाची तन्मयता लागते, तीच काम करतानाही हवी, असा आग्रह जपानी माणूस धरतो. काम करतानाचे ध्यान किंवा झेन म्हणजे कायझेन. कायझेनचे पाच लिखित आणि दोन अलिखित नियम आहेत.

कायझेन म्हणजे कामात सतत, सातत्याने सुधारणा करत राहणे. कायझेनचा पहिला नियम म्हणजे- आपल्या आस्थापनातील अनेक अनावश्यक गोष्टी, नियम काढून टाका. Less is More. कमीत कमी गोष्टींचा आग्रह धरा आणि जास्तीत जास्त परिणामकारक उत्पादकता साध्य करा. कायझेनचा दुसरा नियम सांगतो की- प्रत्येक वस्तूला एक ठरावीक जागा द्या आणि प्रत्येक जागेवर  एक ठरावीक वस्तू ठेवा. यालाच PEEP Place for Everything and Everything in Place असे म्हणतात. कायझेनचा तिसरा नियम म्हणजे- सगळे वेळेवर करा. चालढकल करू नका. सगळे व्यवस्थित करा. टापटिपीने करा. कायझेनचा चौथा नियम म्हणजे- सगळ्या वस्तूंचे, नियमांचे प्रमाणीकरण- अर्थात Stadndardisation करा. कायझेनचा पाचवा नियम म्हणजे- बाह्य नियमांवर अवलंबून न राहता, आपल्यावर आपली स्वत:ची आचारसंहिता घाला. आपल्यावर स्वयंशिस्त लादा. स्वत:वर स्वत:चे नियंत्रण ठेवा. कायझेनच्या दोन अलिखित नियमांपैकी पहिला अलिखित नियम म्हणजे- जी वस्तू मी निर्माण करतो, ती माझी वस्तू आहे. मी निर्माण केलेली आहे. तिचा मला अभिमान आहे. त्यामुळे ती सर्वोत्कृष्ट झाली पाहिजे. तिच्यामुळे मला शरम वाटता कामा नये. दुसरा अलिखित नियम म्हणजे- जी वस्तू मी बनवतो, ती सुंदर असली पाहिजे. कलात्मक असली पाहिजे. म्हणून ती करताना मी माझी सौंदर्य दृष्टी वापरून ती तयार करेन.

गिंजाचा बाजार पाहिल्यानंतर आम्ही टोयोटा कंपनीची शोरूम पाहण्यासाठी गेलो. टोयोटा कंपनी ही जगातील अद्ययावत गाड्या करणारी कंपनी आहे. तिच्या लॅन्ड क्रूझर, लॅक्सस आणि वीज व पेट्रोलवर चालणारी हायब्रीड प्रियूस ही नवी गाडी- अशा विविध गाड्यांची मॉडेल्स आम्ही पाहिली. टोयोटा कंपनी ही कायझेनचे तंत्र वापरते. हे तंत्र अमेरिकन व्यवस्थापनशास्त्राच्या री- इंजिनिअरिंगच्या पूर्ण विरोधी आहे. कारण री- इंजिनिअरिंगमध्ये वस्तू मध्ये, उत्पादनप्रक्रियेमध्ये पूर्ण कायापालट केला जातो; तर कायझेनचे तंत्र हे पायरीपायरीने सुधारणा करणे योग्य मानते.

टोयोटा कंपनीचे ब्रीदवाक्य आहे- ‘इफ यू थिंक यू कान्ट, यू डोन्ट. इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. यू शुडे थिंक वुई कॅन, वुई मस्ट, वुई विल.’’ आम्ही गाड्या बनवण्यापूर्वी माणसे घडवतो- हा टोयोटा कंपनीच्या व्यवस्थापनाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे ते शिक्षित प्रशिक्षित संसाधनबळाच्या जोरावर दर्जेदार मोटारगाड्यांचे उत्पादन करतात.

टोयोटा कंपनीच्या शेजारी एक छोटासा मॉल आहे. तिथे शंभर येनचे दुकान आहे. तिथे कुठलीही वस्तू घ्या- तिची किंमत शंभर येन असते. अनेक महाग वस्तू शंभर येनला मिळतात, म्हणून ग्राहक खूश होतात; पण शंभर येनपेक्षा कमी किमतीच्या वस्तूही इथे शंभर येनला ग्राहकाच्या माथी मारल्या जातात, हे ग्राहकाला कळत नाही. मॉलमध्ये एक पेट शॉप आहे. तिथे कुत्र्या-मांजरांना लागणारे सारे सामान आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे, तिथे वेगवेगळ्या जातीची- पॉमेरियन, लॅब्रेडॉर, गोल्डन रिट्रीव्हर, बुलडॉग, अल्सेशियन, डाल्मेशन, रॉट व्हॉयलर सगळ्या प्रकारच्या कुत्र्यांची पिल्ले तुम्हाला विकत घेता येतात. मी जगात अनेक देशांत फिरलो, कित्येक मॉल्समध्ये गेलो; पण असे पेट शॉप मी कुठेच पाहिले नाही.

रात्री आम्ही हॉटेलवर परतलो. देवी धाबा नावाच्या एका इंडियन हॉटेलमध्ये मोगलाई पद्धतीचे जेवण घेतले. जेवणाआधी तांदळापासून केलेली जपानी साकी चाखून पाहिली. जेवणानंतर पाय मोकळे करायला क्वीन्स स्टेशनवर आलो. स्टेशन लोकांनी भरून गेले होते. जपानी लोक कामावरून उशिरा परतत होते. कोणी घरी जाण्यापूर्वी पबमध्ये जाऊन साकीचे ग्लास रिचवत होते. मग मला आठवण झाली, ‘थँक गॉड इट इज फ्रायडे’ म्हणतात तो आज शुक्रवार होता. म्हणजे वीकएन्डची सुरुवात होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेच जाग आली. टोकियोचे ते प्रशस्त हॉटेल रात्रभर जागेच असावे. आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला गेलो. ब्रेकफास्ट टेबलावर मोठी बफेच होती. वेगवेगळी फळे, उकडलेल्या भाज्या, पाव, चीज, क्रेकर्स, ड्रायफ्रूट्‌स, अंड्यांचे विविध प्रकार, मशरूम्स, स्टीम राईस, नूडल्स, करी, उकडलेले मासे, माशांची सुशी- ते जेवणच होते. जपानी माणूस सकाळी न्याहारी घेत नसावा; तो बहुतेक जेवणच घेत असावा! मी बशीत कलिंगडाच्या रसरशीत लालेलाल फोडी घेतल्या. गोड पपई, लिची, पीच, ड्रायफ्रूट्‌स अशी पोटभर फळे खाऊन चीज आणि क्रेकर्स, मशरूम्स घातलेली अंड्याची ऑम्लेट आणि टोस्ट, नूडल्स व सुशी असा भरपूर ब्रेकफास्ट घेतला. नंतर थोड्या कडू-कडक कॉफीचा आस्वाद घेतला. मग आम्ही टोकियोहून माऊंट फुजी हा पर्वत पाहायला निघालो.

तेरा हजार फूट उंचीचा माऊंट फुजी हा जपानमधला पवित्र डोंगर. शिन्तो इयानसारखे ते जपानचे तीर्थस्थानच जणू! हल्लीच युनेस्कोने माऊंट फुजीला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने पुरातन व सुंदर अशाच वास्तूंना, प्रार्थना मंदिरांना, किल्ल्यांना हा दर्जा युनेस्को देते. नैसर्गिक स्थळांना असा दर्जा अपवादानेच  मिळतो.

सात लाख वर्षांआधी जपानी भूमीचे भूस्तर कंप पावले आणि माऊंट फुजी वर आला. त्या वेळी माऊंट फुजी होता उष्ण लाव्हांनी धगधगणारा ज्वालामुखी. आता जो शांत आहे, निद्रिस्त आहे. माऊंट फुजीचा आकार प्रमाणबद्ध आहे. समभुज त्रिकोणाच्या त्रिमितीत तो आसनस्थ झाला आहे. माऊंट फुजीच्या पायथ्याशी मोटोसू सरोवर आहे. लख्ख उजेडात सरोवराच्या निवळशंख आरसपानी पाण्यात माऊंट फुजीचे प्रतिबिंब पडते, तेव्हा ते फारच सुरम्य असते. आम्ही माऊंट फुजीचे दर्शन घेतले, तेव्हा माऊंट फुजीने धुक्याची गोधडी पांघरली होती. ध्यानमग्न अशा संन्यस्त बुद्धासारखा तो जलस्पर्श मुद्रेत बसला होता. उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात- हर ऋतूत हा बहुरूपी माऊंट फुजी आपले रूप बदलतो. एप्रिल महिन्यात चेरी ब्लॉसमचा मोहोर आला की, तो आपले पुरुषी वेश काढतो. मग माऊंट फुजीच्या कमनीय शरीराची रमणी होते. चेरीची गुलाबी फुले माळून ती मोटोसू सरोवरात आपले रूप पाहत शृंगार करते. माऊंट फुजी पर्वताच्या समोर माऊंट फुजीच्या आकाराचे पांढरे आयसिंग असलेले छोटे-छोटे कप केक्स्‌ लहान मुले घेऊन खातात. इथे माऊंट फुजीचे चित्र असलेली पोस्टकार्ड्‌स मिळतात, ती तिकिटाविना तुमच्या नातेवाइकांना पाठवू शकता. तुम्ही तुमच्या देशात पोहोचण्यापूर्वी माऊंट फुजी तुमच्या घरात पोहोचलेला असतो. माऊंट फुजीहून परतीच्या रस्त्यावर एक म्युझिकल पॅच आहे. तिथून मोटारी, बस जाताना संगीताची धून वाजू लागते. जपानमध्ये अशा तंत्रज्ञानाच्या अनेक गमतीजमती आहेत.

जपानमध्ये ७०% जमिनीवर डोंगर आहेत. जी ३०% जमीन शिल्लक आहे, तिचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला आहे. जिकडे-तिकडे हिरवीगार भातशेती आहे. कुठेच पडीक जमीन नाही. शेतांच्या बाजूला छोटी तळी आहेत. अधूनमधून छोट्या नद्या वाहताना दिसत असतात. शेतामध्ये घरांचे पुंजके दिसतात. जपानी लोकांनी जमिनीचा योग्य ऑप्टिमम वापर केलेला आहे. कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त पीक देणारी भाताची बियाणे त्यांनी विकसित केली आहेत. पूर्वेकडच्या काही देशांनी (माझी स्मृती दगा देत नसेल तर, फिलिपाइन्सने) पुरामध्ये न कुजणारी भाताची बियाणे विकसित केली आहेत. जपानमध्ये शेती आणि उद्योग यांचे सहजीवन दृष्टिक्षेपास येते. उद्योग आणि प्रदूषण हा वाद मला तिथे आढळला नाही.

माऊंट फुजी पाहिल्यावर दीड तासाचा प्रवास करून आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. तिथे आम्ही जपानच्या विख्यात बुलेट ट्रेनमध्ये बसलो. जपानमध्ये तिला ‘शिनकानसेन’ म्हणतात. ती ताशी तीनशे किमी वेगाने जाते. म्हणजे गोवा-मुंबई प्रवास दोन तासांत होऊ शकेल, इतका तिचा वेग आहे. १९६४ मध्ये टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या, त्या वेळी जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरू झाली. बुलेट ट्रेनमध्ये बसून आम्ही हिरोशिमाला आलो.

दि. ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमावर ॲटमबॉम्ब टाकला. विमानातून नऊ हजार मीटरवरून टाकलेला हा बॉम्ब जमिनीवर सहाशे मीटरवर असतानाच फुटला. ॲटमबॉम्बच्या महास्फोटाने अख्खे हिरोशिमा शहर जळून गेले. तीन लाखांवर माणसे मरण पावली. शहरातील घरे, इमारती मोडून पडल्या. टावल हॉलचा घुट असलेली इमारत अर्धवट खाक झाली. आज ही इमारत हिरोशिमा ॲटमबॉम्बचे स्मारक म्हणून उभी आहे. त्याच्यापुढे पीस मेमोरियल आणि फ्ले ऑफ पीस ही ज्योत जळते आहे. जोपर्यंत जगात अण्वस्त्रे असतील तोपर्यंत ही ज्योत अखंड जळत राहणार आहे.

हिरोशिमावर बॉम्ब पडला, तेव्हा सादोको सासाकी ही छोटी जपानी मुलगी दोन वर्षांची होती. तीन वर्षांनी तिला रक्ताचा कॅन्सर झाला. सासाकीला खूप जगण्याची उमेद होती. जपानमध्ये क्रेन पक्षी हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानतात. हॉस्पिटलमध्ये असताना सासाकीने ओरिगामीची कला वापरून एक हजार क्रेन्स करण्याचा संकल्प केला. पण सासाकीला जास्त दिवस आयुष्य लाभले नाही. ज्या दिवशी तिला मरण आले, तोपर्यंत तिने सुमारे  सातशे क्रेन्स केले होते. उरलेले तीनशे क्रेन्स सासाकीच्या मरणानंतर तिच्या शाळेतील मैत्रिणींनी केले. हिरोशिमाला सासाकीचे स्मारक आहे. हिरोशिमाच्या म्युझियममध्ये एक अर्धा जळलेला टिफिन आहे. हा टिफिन शिगेस नावाच्या लहान मुलीला तिच्या आईने दिला होता. शाळेत जाताना शिगेस आगीत भस्मसात झाली. हातातला टिफिन अर्धवट जळलेल्या स्थितीत आईला सापडला, तेव्हा तिच्या आईने रडून आकांत केला. तो टिफिन पाहून माझ्याही डोळ्यांत अश्रुधारा आल्या. मियोको ह्या छोट्या मुलीला तिच्या आईने रंगीत कपड्याची  चप्पल शिवून दिली होती. बॉम्ब पडल्यावर मियोको भाजून मरण पावली. तिची एक चप्पल तिच्या आईला सापडली. ती हिरोशिमा म्युझियममध्ये आहे. हिरोशिमा म्युझियममधल्या एकेका वस्तूमागे शोकांत कहाणी आहे. हिरोशिमा म्युझियम ही तर अंतहीन कादंबरीच आहे!

हिरोशिमाच्या समर्पणानंतर दुसरे महायुद्ध संपले. करुणाकार बुद्धाच्या भूमीने क्रौर्याचा परमावधी पाहिला. पण हळूहळू त्या जखमा बुजल्या. थोड्याच वर्षांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे हिरोशिमा शहराचा राखेतून पुनर्जन्म झाला.

हिरोशिमा शहरापासून जवळच मियाजिमा बेट आहे. तिथे इत्सुकुशिमाचे शिन्तो देऊळ आहे. समुद्रदेवाला वाहिलेले हे देऊळ समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहे. त्याच्यापुढे समुद्राच्या पाण्यात देवळाचे प्रवेशद्वार अर्थात तोरी समुद्रातून उगवल्याप्रमाणे उभी आहे. रात्रीच्या काळोखात द्वितीयेची चंद्रकोर आकाशात असली की, तिच्या मंद चांदण्यात ही पाण्यात पाय सोडून उभी असलेली तोरी खूपच सुंदर दिसते, असे सांगतात. पण आम्हाला रात्रीचे ते दृश्य पाहायला मिळाले नाही. मियाजिमा बेटावर हरणे स्वच्छंदपणे फिरतात. जपानी धर्मशास्त्राप्रमाणे हरिणांना जपानी लोक देवाचे दूत मानतात. मियाजिमा बेटावर मोठी ऑइस्टर्स मिळतात. ग्रील्ड केलेली ही ऑइस्टर्स फारच रुचकर लागतात. परतीच्या वाटेवर आम्ही आकोनोमियाकी नावाचा खास जपानी पदार्थ खाल्ला. आपल्या मसाला डोशासारख्या असलेल्या ह्या पदार्थात सर्व प्रकारच्या भाज्या व काळंबी (प्रॉन्स) असतात. एक आकोनोमियाकी खाल्ला की पोट तुडुंब भरते.

हिरोशिमापासून पाच तासांच्या अंतरावर ओसाका हे जपानमधील शहर आहे. हे शहर योदोगाआ नदीच्या किनारी वसले आहे. तिथे रात्रीचा मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी क्योटो शहराकडे जायला निघालो.

क्योटो शहर ही जपानची सांस्कृतिक राजधानीच आहे. हे देवळांचे गाव आहे. इथले कियामिजू देऊळ आठव्या शतकात बांधलेले आहे. हे देऊळ एका छोट्या डोंगरावर आहे. डोंगरावर हिरवीगार झाडे आहेत. देवळाकडे जाताना पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला रांगेने दुकाने आहेत. हा बाजार आणि देऊळ यांची म्हटले तर एकमेकांना संगत आहे, म्हटले तर एकमेकांत थोडा दुरावा आहे. देवळाने आपले देऊळपण सांभाळून ठेवले आहे आणि बाजाराने आपले बाजारपण. कियामिजू देवळात थोडा काळोखच आहे. मंद वाती पेटल्या आहेत, पण त्या देवळातला काळोख अधिक गडद करत आहेत. देवळात घंटानाद होतो आहे. भाविक बुद्धमूर्तीचे दर्शन घेत आहेत आणि बुद्धमूर्तीदेखील भाविकांचे दर्शन घेते आहे!

कियोमिजूचे देऊळ पाहिल्यानंतर आम्ही गोल्डन पॅव्हेलियनची वास्तू पाहिली. सुवर्णवर्खी पत्र्यांनी मढवलेली ही लावण्यमयी वास्तू सकाळच्या धारोष्ण उन्हात लखलखत होती आणि समोरच्या तळ्यात तिचे लख्ख सोनेरी प्रतिबिंब पडले होते. सभोवतालचा सारा परिसर फुलझाडांनी सुशोभित होता. ते जपानी झेन गार्डन होते. तळ्याचे पाणी छोट्या पाटातून वाहत होते. त्यावर छोटे साकव होते. जपानी सौंदर्यदृष्टी Asthetics कशी असते, त्याचे उत्तम उदाहरण आमच्या डोळ्यांपुढे होते.

त्यानंतर आम्ही क्वोटो शहरात पाहिला तो प्रसिद्ध जपानी टी सेरे नी. पण त्याआधी चहाच्या जन्माची दंतकथा सांगितली पाहिजे. एका बौद्ध भिक्षूला ध्यान करता-करता झोप येऊ लागली. त्यामुळे तो भडकला आणि त्याने आपल्या डोळ्यांच्या पापण्याच कापल्या. त्या पापण्या तिथे मातीत पडल्या आणि रुजून आल्या. त्याला अंकुर फुटले आणि पाने आली. बौद्ध भिक्षूने ही पाने गरम पाण्यात टाकली आणि हे गरम पाणी तो प्यायला, तेव्हा त्याला झोप येईनाशी झाली. चहाला जपानमध्ये असा धार्मिक संदर्भ आहे.

एका छोट्याशा जपानी घरात हा टी सेरेनी होतो. सुरुवातीला किमोनो घातलेली सुंदर जपानी स्त्री कमरेत वाकून नम्रपणे हसत-हसत तुचे स्वागत करते आणि तुम्हाला जमिनीवरील आसनावर बसायला सांगते. मग ती स्वत:ही पाय दुडून जमिनीवर बसते. मग ती सावकाश चहा करायचे भांडे स्वच्छ करते. दुसऱ्या भांड्यातले गरम पाणी ह्या भांड्यात ओतते. त्यात चहाची पाने घालते. प्रत्येक गोष्ट ती अतिशय कलात्मक रीतीने करते. मग चमच्याने ती ते पाणी खिरवते आणि मोठ्या अदबीने ते पाणी छोट्या कपात ओतते आणि बशीसह तो कप तुमच्या हातात देते. हा असतो ग्रीन टी. साखर व दूध नसलेला चहा. पण मुळात चहा महत्त्वाचा नसतो, महत्त्वाची असते ती चहा करायची प्रक्रिया.

जपानी माणूस हा नेहमीच सामूहिक कृतीवर भर देतो. ‘हे मी केले’ अशा अर्थाची क्रियापदे जपानी भाषेत  नाहीत. ‘हे माझ्याकडून घडले’ अशा अर्थाची क्रियापदे जपानी भाषेत आहेत. बुटांच्या कारखान्यातील कामगार संपावर जात नाहीत, ते केवळ उजव्या पायाचे बूट बनवतात आणि मालकाची गैरसोय करतात, पण उत्पादन चालूच ठेवतात. मागण्या मान्य झाल्यावर डाव्या पायांच्या बुटांचे उत्पादन सुरू करतात.

जपानी माणसाला कामचुकारपणा मान्य नसतो. पण आता याचा अतिरेक झाला आहे. कामाच्या ताणामुळे जपानी समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारोशी म्हणजे कामाच्या अतिरेकामुळे येणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जपानमध्ये वाढले आहे. त्यामुळे शनिवार-रविवारच्या वीकएन्डव्यतिरिक्त शुक्रवारी संध्याकाळी सुटी द्यावी, असा विचार जपानमध्ये चालला आहे. जपानमध्ये नैराश्याचे, डिप्रेशनचे प्रमाणसुद्धा खूप आहे. घटस्फोटाचे प्रमाण पंचवीस टक्के आहे. म्हणजे चार लग्नांतले एक लग्न मोडते. जपानी माणूस उशिरा लग्न करतो. पुरुषाचे वय लग्नाच्या वेळी सरासरी ३१, तर स्त्रीचे वय २९ वर्षे असते. जपानी माणूस सहा वर्षे प्राथमिक शिक्षण मग तीन वर्षे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतो. ज्याला कॉलेजमध्ये  जाणे परवडते, तो २ ते ४ वर्षांपर्यंत कॉलेज शिक्षण घेतो. व्यावसायिक शिक्षण सहा वर्षांचे असते. टेबल टेनिस, लॉन टेनिस, गोल्फ, बास्केट बॉल, सॉकर हे जपानमधले लोकप्रिय खेळ.

जपानी लोकांचा आहार म्हणजे भात, मासे, करी, सुशी, टेम्पुरा, स्पागेटी, हॅम्बर्गर वगैरे. जपानी माणसाचे मेल्यावर दहन करतात व त्याची रक्षा एका कलशात घालून त्या कलशाचे दफन करतात. जपानी माणूस वेळेच्या बाबतीत अतिशय चोख असतो. काटकसर, टापटीप, स्वच्छतेचे भान, नम्रता, कलात्मक दृष्टी हे त्याचे स्वभावगुण. पण अनेकदा जपानी माणूस अपारदर्शी असतो. त्याच्या मनात काय आहे, याचा अंदाज येत नाही. जपानी लोक बौद्ध मूल्यांचे जेवढे पालन करता येईल तेवढे करतात. सातोरी (Satori) हा एक नवा शब्द बौद्ध तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत जपानने पुढे आणला आहे. सातोरी म्हणजे मनाची अतिशय शांत, सुंदर, संतुलित, स्थितप्रज्ञ अशी अवस्था!

क्योटो शहरातून आम्ही तासाभरात नारा शहरात पोचलो. नारा शहरात तोडायजीचे मंदिर आहे. हे मंदिर ७५२ मध्ये बांधून पूर्ण झाले. हे पूर्ण लाकडी मंदिर बांधायला दोन लाख साठ हजार कामगारांना रात्रंदिवस खपून दहा वर्षे लागली. दोन वेळा ते आगीत भस्मसात झाले आणि पुन्हा बांधण्यात आले. जगातली ही सगळ्यात मोठी लाकडी वास्तू आहे, असे सांगतात. देवळात अठरा मीटर उंचीची ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती आहे. देवळाबाहेर एक बाहुला आहे. ह्या बाहुल्याच्या ज्या अवयवाला हाता लावाल, तो अवयव बरा होईल- अशी भाविकांची अंधश्रद्धा आहे.

तोडायजी मंदिराच्या प्राकार खूप मोठा आहे. प्राकाराभोवती विस्तृत झाडी आहे. सुमारे एक हजार हरणे तिथे बागडत असतात. मी देश-विदेशांत खूप हिंडलो, पण तोडायजी मंदिरासारखी भव्य लाकडी वास्तू अन्यत्र पाहिली नाही. १४०० वर्षांआधी जपानमध्ये बौद्ध धर्माचा महायान पंथ पोचला. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. तोडायजी मंदिर ही त्याची साक्ष आहे. तोडायजी देवळाचा प्राकार डोळे भरून पाहून घेतला आणि नारा शहर सोडले.

संध्याकाळी ओसाका शहरात परतलो, तेव्हा आम्हाला परतीचे वेध लागले होते. बाजारात जाऊन एक जपानी पंखा आणि जपानी छत्री घेतली. लाल किमोनो घातलेली छोटी जपानी बाहुली जपानचा मेमेंटो म्हणून घेतली.

घरी परतल्यावर माझ्या दिवाणखान्यातील कपाटात एकेका खणात हे पाहा किती मेमेंटोज ..... पॅरिसचा आयफेल टॉवर, ब्रुसेलचा मुतणारा मुलगा, हॉलंडची पवनचक्की, पोर्तुगालचा कोंबडा, स्पेनचा मेटाडोर, न्यूझीलंडचा पेंग्विन, अमेरिकेचा स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, पिसाचा कलता मनोरा आणि जपानची ही किमोनो परिधान केलेली बाहुली....

माझा नातू रणवीर मला विचारतो, ‘‘आजोबा, हे खण रिकामे का आहेत?’’ मी त्याला सांगतो, ‘‘बाळा, हे खण रिकामे आहेत ते त्या देशांच्या मेमोंटोजसाठी, ज्या देशात मी यापुढे जाणार आहे!’’

Tags: जपान दत्ता दामोदर नायक जपानी आठवणींचा इकेबाना datta nayak King in Japan Queen in Engliand Playig cards Five Queen King Japan Datta Damodar Nayak Memories in Japan foreign country PEEP Asthetics Place for Everything and Everything in Place Less is More weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके