डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कोल्हापूर हे संस्थान, येथील चळवळीचे निरीक्षण, मार्गदर्शन करावयाचे तर चळवळ जवळून पाहता आली पाहिजे. परंतु त्या वेळी खालसा हद्दीतील नागरिकांना प्रवेशास बंदी होती. तेव्हा नानासाहेब वार्ताहर बनले. त्यामुळे पहिल्या शेतकरी मोर्च्याबरोबर त्यांना संस्थानी हद्दीत येता आले, चळवळीशी संबंध ठेवता आला. पुढे संस्थान विलीन झाले.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट, राजाराम कॉलेजच्या सभागृहात नानासाहेबांची सभा होती. सभागृह गच्च भरले होते. सभागृहाची गॅलरीही गच्च भरली होती. सभागृहात एका बाजूस मुलींची बसण्याची सोय केली होती. नानासाहेबांचे भाषण ऐन रंगात आले होते आणि त्याच वेळी गर्दीतून मुलीच्या दिशेने कागदी बाण आले. ते पाहून नानांनी आपले भाषण थांबविले आणि आपला आवाज चढवून म्हटले, "कागदी बाण काय मारता? असेल हिंमत तर या खाली आणि हात धरून जन्माची जोडीदारीण मिळवा... माझ्या तारुण्यात मी हे केले." नानांच्या या आव्हानाला मुलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. हे नानाच बोलू शकले. दुसऱ्याला हे जमले असते काय?

कोल्हापूर हे संस्थान, येथील चळवळीचे निरीक्षण, मार्गदर्शन करावयाचे तर चळवळ जवळून पाहता आली पाहिजे. परंतु त्या वेळी खालसा हद्दीतील नागरिकांना प्रवेशास बंदी होती. तेव्हा नानासाहेब वार्ताहर बनले. त्यामुळे पहिल्या शेतकरी मोर्च्याबरोबर त्यांना संस्थानी हद्दीत येता आले, चळवळीशी संबंध ठेवता आला. पुढे संस्थान विलीन झाले. लोकसभा व विधानसभा येथे संस्थानिकांचे (प्रजेचे नव्हे) प्रतिनिधी राजाने पाठविले. तेव्हा दक्षिणी संस्थानांचा दौरा नानांनी केला. 'ना प्रतिनिधी, ना कर' ही घोषणा देऊन जनतेमध्ये आपल्या हकांची जाणीव निर्माण केली. पुण्यामध्ये संस्थानी प्रजेच्या वतीने सत्याग्रह्मांच्या तुकडीचे नेतृत्व केले. या शिक्षेच्या काळात त्यांनी सर्व सत्याग्रहांच्या समवेत 'क' वर्गात शिक्षा भोगली व कार्यकर्त्यांना दैनंदिन आवरणाचे धडे दिले.

पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत नानांनी एकदा नम्रतेने विनंती केली की, 'मला सेक्रेटरी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. लेख लिहून मला काहीतरी अर्थार्जन करू द्या.' सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

विकानेरची जनरल कौन्सिलची सभा आटोपून आम्ही परतत होतो. तर नानांनी तेथून हरभ-याची वाळलेली भाजी बरोबर आणली. त्यातली निम्मी मला दिली. हे स्मरण एवढ्यासाठीच होते की, त्यांना जे आवडे ते त्या त्या भागातून आणत. शिजवीत व मोठ्या चवीने खात व इतरांनाही देत असत. नानांना स्वयंपाक करण्यात रस होता, तसेच लोणची घालण्यातही. घरकामात स्वयंपाकापर्यंत ते समानता स्वकृतीने आचरणात आणत.

नानांच्या परखडपणाची एक आठवण 

एका प्रभाती हॉटेलवर आम्ही चहा पीत होतो. नाना सीमा लग्नासाठी आले होते. तेव्हा गप्पा निघता निघता एका धनवान कार्यकर्त्यांने आपल्या मुलीच्या नावे ट्रस्ट केल्याचे सांगण्यात आले. तेव्हा मी म्हणालो, 'मुलीच्या नावाने का? त्यांना स्वतःच्या नावे करण्यात काय अडचण होती?' तेव्हा आमचे सहकारी मित्र म्हणाले, 'त्यांनी तर आपली संपत्ती कारखान्याद्वारे निर्माण केली. तुम्ही नुसते तत्व मांडता, तात्विक चर्चा करता.' तेव्हा नाना एकदम रागावले, अन् म्हणाले, "तुम्हा कार्यकर्त्यांकडे गाड्या आहेत, बंगले आहेत. लंडनमध्ये मी जेव्हा हायकमिशनर होतो तेव्हा जर का एका विमानाच्या खरेदीपोटी 1 पेन्स् कमिशन घेतले असते तर पुण्यात तीन मजली घर व कॅडिलॅक मोटर दिमतीला दिसली असती. आम्ही निव्वळ तत्ववेत्ते काय! मी येथूनच परत जातो. आपण व्यवहारी तेवढे सीमेकडे जा!" काही वेळाने आपले स्पष्ट मत मांडल्यानंतर ते शांत झाले आणि सीमाभागाकडे पुढील कार्यासाठी गेले.

बेळगावच्या गोगट्यांकडे बसलो असतानाही कोकणचा कॅलिफोर्निया होऊ शकेल काय, या विषयावर बोलणे चालले होते. तेव्हा नाना म्हणाले, "कोकणचा कॅलिफोर्निया होईल पण कोकणचे कोकणपण जाईल, नष्ट होईल त्याचे काय?"

अलीकडे नाना सर्वोदय बैठकांना, संमेलनास उपस्थित राहत पण त्या कार्यकर्त्यांकडून जेवढी साथ हवी तेवढी मिळत नसे. तरीसुद्धा म. गांधींच्या विश्वस्त कल्पनेचा त्यांनी स्वीकार केला होता. त्याचा प्रचारही ते करत, साधनेच्या 'साधना-जनता' या जोड अंकात त्यांनी संपादकीयात पुढील उल्लेख केला होता: कर्जाच्या या लोह पंजरातून सुटण्याचा आपल्या समोर एकच मार्ग आहे. आपले काम अत्यंत नेकीने करणे, आयुष्यातील छानछोकी शक्य तेवढी कमी करणे आणि स्वखुशीने स्वतःवर अंकुश ठेवणे. देशाच्या आणि व्यक्तीच्या जीवनात हे आचरणात आणण्याचा संदेश त्यांनी दिला नाही काय?

नाना कोल्हापूरचे जावई ना? 23, 24, 25 एप्रिल 93 हे दिवस त्यांनी कोल्हापूरसाठी दिले होते. 23 ला निघण्यापूर्वी अगर त्यापूर्वी त्यांना जर प्रकृतीची शंका आली असती तर त्यांनी दौरा रद्द केला असता. पण तसे घडले नाही. वेळ फुकट जातो हा सल्ला मिळाल्याने नानांनी सकाळ ऐवजी दुपारचा प्रवास केला एकढेच. वरील तीनही दिवस मी त्यांचे समवेतच होतो. या काळात ते कधीही अनुत्साही दिसले नाहीत, तर समाधानी होते. दि.24 रोजी रात्रीचे जेवण चुये येथे झाले. अक्षय तृतीयेचा दिवस. नेहमीप्रमाणे जेवणात भाकरीची सूचना दिली होती. ताट पुढे आल्यानंतर त्यांना विचारले, पोळी घ्याल का? एक चतकोर दे, म्हणाले. पण जेव्हा त्यांना गरम पोळी वाढली तेव्हा तूप-दुधाबरोबर त्यांनी मोठ्या चवीने खाल्ली. जेवणानंतर घरच्या मंडळींना जेवणाच्या समाधानाचे धन्यवाद दिले. तेथून कोल्हापूरला आलो. दुसरे दिवशी गोकुळ दूध योजना, जिल्हा शेतकरी संघ यांना भेटी दिल्या. नानांनी जिल्हा शेतकरी संघाच्या शेरे बुकात शेरा लिहिता. तो त्यांचा शेवटचा शेरा असावा. 

कोल्हापूरचा दौरा हा शेवटचाच झाला. दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नानांची व माझी भेट पुण्यात झाली. सोशलिस्ट फाउंडेशनचे ग्रामीण भागात काम करण्याबाबत बोलणी झाली. मधून मधून फोनवर बोलत होते. परंतु सुरुवातीसच ते मला म्हणाले, "कोल्हापूरहून परतलो अन् शक्तिपात झाला." मी म्हणालो, आता जास्त त्रास, दगदग घेऊन उपयोगी नाही व निरोप घेतला. कोल्हापुरी रात्री परतलो. दि. 1 मे रोजी सकाळी नाना गेल्याचे वृत्त आले. पंचेचाळीस वर्षांचा सहवास संपला. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मरण आले. पण आठवणीने विरहाचे दुःख व वेदना होतात, होत राहतील. पण त्यांचा विचार व आचार हा हरक्षणी स्मरण देतो त्यामुळे ते दूर गेले असे वाटतच नाही.

Tags: कॅलिफोर्निया. कोल्हापूर दत्ता शिंदे California Kolhapur #Datta Shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके