डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कॉ.अभ्यंकर व साथींनी विनाकारण भीती बाळगू नये…

वस्तूत: डाव्यांनी अणुकराराला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. जे सामान्य माणसाला समजते, ते या 70-80 वर्षांपासून राजकारण करीत असलेल्या डाव्यांना कळत नाही असे कसे म्हणावे? ‘आमचा अणूकराराला विरोध नाही’असे हळू आवाजात सांगून ‘देश अमेरिकेच्या प्रभावाखाली जाईल’अशी भीती मोठ्या आवाजात घालण्याचे काम डावे करीत आहेत. त्यांची साधार वा निराधार भूमिका समजून घेता येईल, पण अमेरिकेची दादागिरी चालू न देणारी लीडरशिप भारतामध्ये झाली आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.जवाहरलाल नेहरूंनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता अलिप्त राष्ट्रसंघटना (नाम) उभारली होती. एवढेच नव्हे तर 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी अणुबाँबची भीती भारताला दाखवली होती; त्या भितीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भीक घातली नव्हती. ‘गुँगी गुडिया’असे करू शकतात तर त्यांचाच वारसा सांगणारे डॉ.मनमोहनसिंग, सोनिया गांधी असेच धैर्य दाखवू शकणार नाहीत काय? इतिहासाची पुरावृत्ती सतत होत असते, भारतात तर ती परंपरा उज्वल आहे, हे कॉ.अभ्यंकर व त्यांच्या साथींनी लक्षात घ्यावे आणि विनाकारण भीती बाळगू नये, एवढेच सुचवावेसे वाटते.

29 डिसेंबरच्या ‘साधना’अंकात ‘वस्तुस्थिती समजावून घ्या!’या शीर्षकाचा कॉ.अजित अभ्यंकर यांचा लेख वाचला. त्या लेखाचे एकंदर स्वरूप व मांडणी पाहता, तो लेख ‘साधना’त घेण्याचे कारण नव्हते, पण कॉ.अभ्यंकर हे आपले सहप्रवासी आहेत आणि याच अंकात मेधा पाटकर व पन्नालाल सुराणा यांचे ‘नंदीग्राम’याच विषयावर लेख आहेत, म्हणून ‘साधना’च्या संपादकांनी कॉ.अभ्यंकराचे टीपण छापले असावे.

अलीकडच्या काळातील डाव्या पक्षाच्या नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिका व त्यांची उलट-सुलट विधाने नीट लक्षात घेतली तर असे वाटते की डाव्यांनी ताळतंत्र सोडला आहे.किमानपक्षी जनआंदोलनाच्या चळवळीबाबत तरी त्यांनी असे करायला नको होते.

वस्तुतः कॉ.अभ्यंकर यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मेधाताई व पन्नालाल यांच्या ‘त्या’लेखांतून नेमकेपणाने आली आहेत. हे दोघेही समाजवादी परिवारातील, असून डाव्यांचे सहप्रवासी आहेत. त्यांचे कम्युनिस्टांशी वाईट असण्याचे काहीच कारण नाही. किंबहुना त्यांनी काही ठिकाणी कम्युनिस्टांची तळी उचलून धरण्याचे कामही केले आहे.

आज डाव्या पक्षांचे जे चित्र माध्यमातून समोर येत आहे, त्याकडे कॉ.अभ्यंकर यांनी दुर्लक्ष करणे समजू शकते; पण त्यांच्याच पक्षाचे नेते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेवबाबू भट्टाचार्य यांनी अलीकडेच नंदिग्रामला दिलेल्या भेटीनंतर जो कबुलीजबाब दिला आहे, त्याबद्दल ‘वस्तुस्थिती समजावून घ्या’असे म्हणणाऱ्या कॉ.अभ्यंकरांना काय म्हणायचे आहे? बुद्धदेवबाबूंनी सुरुवातीला ‘जशास तसे’अशी भूमिका घेतली आणि नंतर मात्र नंदिग्राम दौरा करून, तेथील जनतेची झाल्या प्रकाराबद्दल अक्षरश: माफी मागितली. याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे तेही कॉ.अभ्यंकरांनी समजून सांगितलीपाहिजे.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यापासून कम्युनिस्टांचा मिजासखोरपणा वाढला आहे. याची जाणीव त्या पक्षातील सर्वंकष विचार करणाऱ्या पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही आहे. तसे नसते तर पश्चिम बंगाल व केरळमधील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या नसत्या. म्हणूनच कदाचित पश्चिम बंगालमधील फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने आपला सवता-सुभा मांडला आहे. गेले काही महिने संयुक्त पुरोगामी आघाडीतील काँग्रेस व इतर घटक पक्षांनाही कपाळाला हात लावण्याची पाळी येत आहे ती या कम्युनिस्टांच्या अडेलतट्टपणामुळे. भाजपाला शह देण्याच्या तथाकथित भूमिकेच्या नावाखाली त्यांनी युपीए सरकारला पाठिंबा दिला आहे, पण केंद्र सरकारच्या मार्गात वारंवार अडथळे आणून देशाला वेठीस धरण्याच्या प्रयत्न चालवला आहे.

डॉ.मनमोहनसिंग हे सभ्य व सत्शील गृहस्थ आहेत. त्यांची जागतिकीकरणाची भूमिका कम्युनिस्टांना मान्य नसणे हे स्वाभाविक आहे, पण कोणत्याही राजकीय पक्षाने, पक्षहितापेक्षा व देशहिताला अधिक महत्त्व द्यायचे असते. मात्र डाव्यांची देशहिताच्या नावाने चालू असलेली धडपड देशाचे अहित करणारीच वाटते.

वस्तूत: डाव्यांनी अणुकराराला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. जे सामान्य माणसाला समजते, ते या 70-80 वर्षांपासून राजकारण करीत असलेल्या डाव्यांना कळत नाही असे कसे म्हणावे? ‘आमचा अणूकराराला विरोध नाही’असे हळू आवाजात सांगून ‘देश अमेरिकेच्या प्रभावाखाली जाईल’अशी भीती मोठ्या आवाजात घालण्याचे काम डावे करीत आहेत. त्यांची साधार वा निराधार भूमिका समजून घेता येईल, पण अमेरिकेची दादागिरी चालू न देणारी लीडरशिप भारतामध्ये झाली आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.जवाहरलाल नेहरूंनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता अलिप्त राष्ट्रसंघटना (नाम) उभारली होती. एवढेच नव्हे तर 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी अणुबाँबची भीती भारताला दाखवली होती; त्या भितीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भीक घातली नव्हती. ‘गुँगी गुडिया’असे करू शकतात तर त्यांचाच वारसा सांगणारे डॉ.मनमोहनसिंग, सोनिया गांधी असेच धैर्य दाखवू शकणार नाहीत काय? इतिहासाची पुरावृत्ती सतत होत असते, भारतात तर ती परंपरा उज्वल आहे, हे कॉ.अभ्यंकर व त्यांच्या साथींनी लक्षात घ्यावे आणि विनाकारण भीती बाळगू नये, एवढेच सुचवावेसे वाटते.

Tags: दत्ता वान्द्रे पन्नालाल सुराणा मेधा पाटकर कॉ.अजित अभ्यंकर वाद संवाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात