डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

राजधानी दिल्लीत हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलच्या जवळ भगीरथ पॅलेसमध्ये दिल्लीतील औषधांची ठोक विक्री होते. तिथे तुम्हांला भारतातील कोणत्याही प्रमुख औषधी कंपनीचे कोणतेही औषध ठोक विकत मिळते. अगदी उघडपणे असे सांगितले जात असे की, ‘हे औषध तुम्हांला कोणत्या किमतीचे हवे आहे?’ म्हणजे एखाद्या डब्यात पन्नास पुड्या बरोबर व पन्नास पुड्या बनावट असत. शहरातील व्यापारी तो डबा घेत. त्यातील बनावट पुडी कोणती आणि खरी कोणती, हे कसे ओळखायचे याची माहिती व्यापाऱ्याला दिली जात असे. गावातील कोणत्या माणसाला खरे औषध दिले तर चालेल हे व्यापाऱ्याला माहीत असे. मात्र खेडेगावातील एखादा दुकानदार शंभर टक्के बनावट असलेली पेटी स्वस्तात घेऊन जात असे.

साधना 9 एप्रिलच्या अंकात ‘धोका’ या आपल्या लेखात आनंद करंदीकर यांनी बनावट किटकनाशके विकणाऱ्या लोकांच्या विरुद्ध कारवाई करताना त्यांना आलेला एक भयंकर अनुभव दिला आहे. मात्र परिस्थिती याहूनही महाभयंकर आहे. ती किती भयंकर आहे, हे लक्षात यावे म्हणून सुमारे पंचवीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच्या कालखंडातील राजधानी दिल्लीमधील काही गोष्टींची नोंद करावीशी वाटते.

1) कालनिर्णय दिनदर्शिका हिंदीमध्ये प्रसिद्ध झाली होती आणि तिचा विक्रमी खप होत होता. मात्र जयराज साळगावकर त्याच्या प्रशासकीय कौशल्यातून माहिती गोळा करत होता. कालनिर्णय हिंदीमध्ये छापून (म्हणजे त्याच्या पायरेटेड कॉपी) मोठ्या प्रमाणात वितरीत होत आहेत, हे त्याच्या लक्षात आले. वेगवेगळ्या खासगी आणि सरकारी गुप्तहेर यंत्रणा वापरून त्याने सर्व माहिती काढली. सदर बझार ही दिल्लीतील गजबजलेली प्रमुख पण मध्ययुगीन बाजारपेठ! प्रचंड गर्दी, एकमेकांत गुंतलेल्या छोट्या छोट्या रस्त्यांचे जाळे. त्यातील एका दुकानात पाठीमागच्या गोदामात त्या दिनदर्शिका ठेवतात, तो दुकानदार त्या ठोक भावात विकतो, ही नक्की बातमी मिळाली. त्या दुकानावर रेड घालण्यासाठी तो दिल्लीला आला. दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील पोलिस बरोबर घेऊन आम्ही दोघे रेड टाकायला गेलो. दिवसभर ही रेड सुरू राहिली. प्रचंड मोठ्या प्रमाणात पायरेटेड कॉपीज मिळाल्या. आणखीही अनेक धागेदोरे मिळाले. पोलिस त्या दुकानदाराला त्या रात्री विमानाने मुंबईला घेऊन गेले. पुढे मात्र अनेक काळ रेंगाळलेल्या या न्यायालयीन लढाईत फारसे काहीच हाती आले नाही. महत्त्वाचे म्हणजे कालनिर्णय दिनदर्शिकेबाबत इतर भारतीय भाषांतही हे घडत असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.

2) या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे. स्टेशनरीमधील अनेक वस्तू बनविणाऱ्या भारतातील एका प्रमुख उद्योगसमूहाबरोबर आम्ही काही छोटे संशोधन प्रकल्प करत होतो. एकदा त्या उद्योग समूहाचे प्रमुख मला म्हणाले, ‘‘दिल्लीच्या बाजारात सुमारे 25 टक्के माल आमच्या नावावरील बनावट वस्तूंचा आहे. आम्ही छापे टाकत त्यांना सहज पकडू शकू. पण या लोकांना आजच्या न्यायालयीन प्रक्रियेत फारसा काही त्रास होणार नाही. मात्र छापा टाकून आमच्या नावावर विकला जाणारा बनावट माल पकडला, ही बातमी वृत्तपत्रांत येणार. परिणामी आमच्या नावाने बनावट वस्तू बाजारात आहेत, हे माहीत झाल्यावर काही ग्राहक आमच्या वस्तू विकत घेणे थांबवणार!’’

3) उद्योगपतींनी यावर शोधलेले उपाय चक्क व्यावहारिक आहेत. पस्तीस वर्षांपूर्वी उषा पंखा केवळ भारतातच नव्हे, तर मध्यपूर्वेतसुद्धा लोकप्रिय होता. पंख्याचा नियंत्रक (म्हणजे रेग्युलेटर!) म्हणजे एक छोटी प्लॅस्टिकची डबी असते. मध्यपूर्वेत उन्हाळ्यात ती डबी थोडी वितळून वेडीवाकडी होत असे. त्यामुळे त्या डबीसाठी वेगळे प्लॅस्टिक ठरवणे आणि डबीच्या रचनेतून उष्ण हवा बाहेर जाण्याची सोय करणे, हे काम आमच्याकडे होते. आम्ही ते पूर्ण केले. त्याचे प्रात्यक्षिक दिले. त्या वेळी त्या कंपनीच्या विक्रीविभागाचे प्रमुख मला म्हणाले, ‘‘आपल्याला आता ही सर्व माहिती व हे प्रात्यक्षिक आपल्या शत्रू-मित्रांनापण द्यावे लागेल.’’ त्यांच्या या सांगण्याने मी गोंधळात पडलो आहे, हे  पाहून त्यांनी सांगितले ‘‘बाजारात आमच्या नावावर 20टक्के बनावट पंखे विकले जातात. हा संपूर्ण कारभार एक डॉन चालवतो. त्याच्याशी आम्ही करार केलाय. बाजारात 20 टक्क्यांहून अधिक बनावट माल नसेल. मात्र या बनावट मालाची गुणवत्ता कमी असेल तर आमच्या चांगल्या मालाच्या गुणवत्तेबद्दलही बाजारात साशंकता असेल. आमचा आणि पर्यायाने त्याचाही खप कमी होईल. त्यामुळे त्यांनी पंखे याच गुणवत्तेचे बनवावेत म्हणून, पंखे बनविण्याची आणि त्यांची गुणवत्ता तपासण्याची आमच्याकडे असलेली सर्व तांत्रिक माहिती त्याला देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत! आता हा नवा नियंत्रक बनविण्याचेही सर्व तंत्रज्ञान अगदी प्रात्यक्षिकासह आपण त्याला द्यावयाचे आहे.’’ (उषा पंखे डी.सी.एम ग्रुप बनवत होता. त्या वेळी तो भारतामधील पाचव्या क्रमांकाचा उद्योगसमूह होता आणि श्री. डोंगरे हे अतिशय कर्तबगार, प्रामाणिक मराठी गृहस्थ त्यांच्या विक्रीविभागाचे प्रमुख होते.)

4) या देशातील कायदे आणि न्यायव्यवस्था अत्युत्कृष्ट आहे. पण आम्हा पामरांना ती नीटपणे समजत नाही. त्यामुळे या बनावट गोष्टींच्या संबंधात काही कृती करणे अवघड असते. पस्तीस वर्षांपूर्वी पिण्याचे पाणी वेगवेगळ्या ब्रँड्‌सकट बाजारात यावयास सुरुवात झाली होती. आमच्या  संशोधन केंद्रातील महेंद्रसिंग या तरुण उत्साही शास्त्रज्ञाने दिल्लीमध्ये होणाऱ्या एका राष्ट्रीय परिसंवादात एक वेगळा संशोधन निबंध सादर करण्याचे ठरवले. तो दिल्लीमधील वेगवेगळ्या दुकानांत गेला. वेगवेगळ्या नामांकनांचे बाटलीमधील पाणी त्याने खरेदी केले. नमुने गोळा करताना ज्या ज्या वैज्ञानिक गोष्टी सांभाळाव्या लागतात, त्यांची त्याने पूर्तता केली. त्या पाण्याची गुणवत्ता दिल्लीमध्ये नळात मिळणाऱ्या पाण्याहून वेगळी नाही, असा संशोधन निबंध त्याने दिल्लीत राष्ट्रीय परिसंवादात वाचला. अर्थातच या अशा राष्ट्रीय चर्चासत्रात जेवण आणि करमणुकीचे कार्यक्रम यापलीकडे श्रोत्यांना रस नसतो. हा कार्यक्रम झाला. आम्ही सर्व जण तो निबंध विसरूनही गेलो. मात्र अळमटळम करीत दिल्लीमधील या कार्यक्रमांना उपस्थिती लावणाऱ्या पत्रकारांमध्ये ‘इंडिया टुडे’चा वार्ताहर होता. ‘इंडिया टुडे’ने त्या निबंधावर मुखपृष्ठकथा केली! आणि त्यानंतर आमचे संशोधन पर्व सुरू झाले. पिण्याचे पाणी बाटलीमधून देणाऱ्या सर्व धंदेवाईक लोकांनी एकत्र येऊन दिल्लीतील एका प्रख्यात वकिलामार्फत, तुमच्या या संशोधनामुळे आमचे इतक्या कोटी रुपयांचे नुकसान झाले, त्याची भरपाई करा असे पत्र पाठवले! न्यायालयात जाणे म्हणजे केवढे पैसे आणि केवढा वेळ खर्च होणार, याची आम्हांला कल्पना आली. मात्र खटला कोर्टाबाहेर ‘सामोपचाराने मिटवणे’ म्हणजे केवढा खर्च आणि केवढा मनस्ताप असतो, याचा आम्हांला अनुभव मिळाला.

एक गोष्ट तर अगदी भन्नाट आहे. तामिळनाडूमधील एक फार मोठा पण अनाम उद्योगपती आम्हांला भेटायला आला. तो ‘एम लक्ष्मण’ या नावाने विजेचे दिवे म्हणजे बल्ब बनवत होता. त्या दिव्यांची गुणवत्ता वाढवावी आणि त्यांची किंमत कमी करता यावी यासाठी आम्ही संशोधन प्रकल्प हातात घ्यावा, अशी त्याची विनंती होती. आम्ही हे संशोधन करण्यासाठी, आमच्या मते सांगितलेली फी तो लगेच द्यावयास तयार होता. संशोधन सुरू करण्यापूर्वीच केवळ भारतात नव्हे, तर आणखी काही देशांत व युरोप-अमेरिकेतही आम्ही या अभिनव कल्पनेवर संशोधन सुरू करत आहोत, असे सांगणारी ‘प्रोव्हिजनल पेटन्ट्‌स’ घ्यावीत ही त्याची मागणी होती. परदेशांत अशी प्रोव्हिजनल पेटन्ट्‌स घेण्याचाही खर्च खूप असतो. पण तो सारा खर्च देण्याची त्याची अगदी सहजपणे तयारी होती. मात्र त्याच्या सांगण्यात एक तिढा होता. हे सारे संशोधन आम्ही चार वर्षांपूर्वी सुरू केले आहे, असे त्याला पत्र द्यावयाचे होतेे. हे आम्हांला अर्थातच शक्य नव्हते. मग त्यानेच एक तोडगा सुचवला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आम्हांला असे पत्र द्या- ‘‘आम्ही तुम्हांला चार वर्षांपूर्वी भेटून हा प्रकल्प हातात घेण्याची विनंती केली होती. मात्र त्या वेळी वेळ नसल्यामुळे आम्ही नाही म्हणालो होतो. मात्र आता हा प्रकल्प आम्ही हातात घेत आहोत.’’- त्याचे हे सारे सांगणे गोंधळात टाकणारे होते. यात आंतरराष्ट्रीय पेटन्ट्‌स या शब्दामुळे पेटन्ट क्षेत्रातील हा काही घोटाळा आहे का, हे समजावून घेण्यासाठी मी जी. एस. दावर यांच्याशी बोललो. भारतातील हे अग्रगण्य पेटन्ट ॲटर्नी. आमच्या संस्थेची पेटन्ट्‌स फाईल करण्याचे कामही तेच बघायचे. अगदी जवळचा मित्र. त्यांनी हा चक्रव्यूह समजावून दिला. त्या वेळी ‘सिल्व्हेनिया लक्ष्मण’ ही भारतातील विजेचे दिवे बनवणारी एक प्रमुख कंपनी होती. दावर हे त्या कंपनीचेपण पेटन्ट्‌सचे काम पाहत होते.

त्या कंपनीची एक जाहिरात त्या वेळी दूरदर्शनवर खूप लोकप्रिय होती. हिंदी चित्रपटातील अभिनेता असरानी एका दुकानात जातो. रामलक्ष्मण बल्ब द्या असे म्हणतो. दुकानदार म्हणतो की, या नावाचा बल्ब बाजारात नाही. मग असरानी ‘हा बल्ब किती चांगला, किती उपयुक्त आहे’ हे सविस्तर सांगतो. त्यावर हसत हसत दुकानदार सांगतो, अरे, रामलक्ष्मण या नावाचा कोणताच बल्ब बाजारात नाही. मात्र तू सांगतो आहेस, त्या सर्वोत्कृष्ट बल्बचे नाव आहे ‘सिल्व्हेनिया लक्ष्मण’. तर आम्हांला भेटलेल्या त्या उद्योगपतीला- ‘मी रामलक्ष्मण बल्ब बनवत होतो, मात्र या जाहिरातीमुळे माझा काही कोटी रुपयांचा धंदा बसला,’ असा दावा ‘सिल्व्हेनिया लक्ष्मण’ या कंपनीवर लावायचा होता. त्याची केस मजबूत करण्यासाठी आम्ही त्याला हवे होतो. अर्थात आम्हांला तो संशोधन प्रकल्प हातात घ्यायला लागला नाही, कारण हा रामलक्ष्मण बल्ब बनवत होता. या माणसाने आपली केस एवढी परिपूर्ण बनवायला सुरुवात केली आहे हे लक्षात आल्यावर ‘सिल्व्हेनिया लक्ष्मण’ तर या कंपनीने त्याच्या बरोबर कोर्टाबाहेर अर्थपूर्ण तडजोड केली!

दिल्लीतील आमची संशोधन संस्था अनेक क्षेत्रांत संशोधन करत होती. मात्र अनेक अनाकलनीय कारणांमुळे आम्ही औषधी क्षेत्रात संशोधन करणे टाळले होते. पण तरीही अप्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे आलेले काही अनुभव सांगावेसे वाटतात. राजधानी दिल्लीत हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलच्या जवळ भगीरथ पॅलेसमध्ये दिल्लीतील औषधांची ठोक विक्री होते. तिथे तुम्हांला भारतातील कोणत्याही प्रमुख औषधी कंपनीचे कोणतेही औषध ठोक विकत मिळते. अगदी उघडपणे असे सांगितले जात असे की, ‘हे औषध तुम्हांला कोणत्या किमतीचे हवे आहे?’ म्हणजे एखाद्या डब्यात पन्नास पुड्या बरोबर व पन्नास पुड्या बनावट असत. शहरातील व्यापारी तो डबा घेत. त्यातील बनावट पुडी कोणती आणि खरी कोणती, हे कसे ओळखायचे याची माहिती व्यापाऱ्याला दिली जात असे. गावातील कोणत्या माणसाला खरे औषध दिले तर चालेल हे व्यापाऱ्याला माहीत असे. मात्र खेडेगावातील एखादा दुकानदार शंभर टक्के बनावट असलेली पेटी स्वस्तात घेऊन जात असे. अर्थातच, मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही. मात्र दिल्लीला येण्यापूर्वी मी सात वर्षे राजस्थानात कोटा येथे होतो. त्या विभागातून येणारे दुकानदार भेटले, तर या गोष्टी अगदी सहजपणे सांगत. या गोष्टीला आता तशी 25-30 वर्षे झालीत. मात्र अजूनही या गोष्टी तिथे सुरू असतील आणि सहजपणे त्याचा खरे-खोटेपणा तपासता येईल, असे मला वाटते.

आम्हांला आलेले दोन अनुभव सांगतो - व्ही.पी. सिंग यांचे डायलिसिस सुरू होते. अर्थात ही गोष्ट बाहेर फारशी माहीत नव्हती. मात्र काही काळाने डायलिसिस झाल्यावर त्यांना ताप यावयास लागला. याचे कारण डायलिसिससाठी वापरले जाणारे पाणी कदाचित दूषित, त्यात मुद्दाम काही पदार्थ मिसळून हानिकारक करण्यात येत असेल किंवा ते मंतरलेले असेल अशा शंका त्यांच्या निकटवर्तीयांना आल्या. (‘रावपर्व’ हे प्रशांत दीक्षित यांचे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक किंवा मी त्याचे साधनेत केलेले परीक्षण ज्यांनी वाचले असेल, त्यांना दिल्लीमधील राजकारणातील ‘छू मंतर’ हा काय प्रकार आहे, हे माहीत झाले असेल, ते असो.) त्यामुळे बातमी कोठेही बाहेर जाणार नाही, याची काळजी घेऊन त्यासाठी लागणारे पाणी सिंगापूरहून आणण्यास सुरुवात झाली आणि तरीसुद्धा त्या पाण्याची गुणवत्ता तपासून त्याचा अहवाल गुप्तपणे त्यांना देण्याची जबाबदारी आमच्या संस्थेकडे सोपवण्यात आली!

मी आता जो अनुभव सांगणार आहे, तो विश्वास बसू नये असा भयानक आहे. भारतात तयार औषधींचे निर्जंतुकीकरण (निरजंतुकीकरण) प्रामुख्याने रासायनिक पद्धतीने करतात. म्हणजे त्या तयार औषधांचे डबे अथवा पाकिटे काही काळ छोट्या खोलीत ठेवतात. त्या खोलीत इथिलियन ऑक्साइडच्या वाफा असतात. या पद्धतीने निरजंतुकीकरण होतेे. पण अत्यल्प असे इथिलियन ऑक्साइड त्या पदार्थांना चिकटले जाते. त्यामुळे किरणोत्सर्ग वापरून हे निरजंतुकीकरण करण्याचे तंत्रविज्ञान भाभा ॲटॉमिक रीसर्च सेंटर (बार्क) या संस्थेने विकसित केले होते. या पद्धतीत एका खोलीत किरणोत्सर्गी पदार्थ असतो. त्या खोलीत एका धावपट्टीवरून औषधी पदार्थांची खोकी वा पाकिटे फिरत असतात. त्या खोक्यांवर एक लाल रंगाचे लेबल असते. ज्या वेळी निरजंतुकीकरण पुरे होते, त्या वेळी त्या लेबलचा रंग हिरवा होतो. हे संयंत्र बार्कमध्ये होते. त्यानंतर भारतात फक्त आमच्या संशोधन संस्थेत होते.

एके दिवशी दुपारी एका पंचतारांकित हॉस्पिटलमधून तेथील सर्जनचा फोन आला. शस्त्रक्रियेची सर्व तयारी करताना तो नवा सर्जिकल ॲप्रन अंगावर घालत होता. त्या लेबलचा रंग हिरवा नसून जांभळा होता, म्हणून तो गोंधळला होता. त्याच्यापेक्षाही अधिक गोंधळ आमच्या मनात होता. आमचा वैज्ञानिक लगेच त्या हॉस्पिटलमध्ये गेला. योगायोगाने हे सर्जिकल ॲप्रन पुरवणाऱ्या जयपूर येथील कंपनीचा विक्रेता तिथेच होता. तो म्हणाला, ‘‘यांना ॲप्रनचा पुरवठा लगेच हवा होता. त्यांच्यावरती प्लॅस्टिकचे कव्हर चढवल्यावर आमचा पेंटर म्हणाला, की हिरव्याऐवजी हा रंग चांगला दिसेल. जे झाले होते, होत होते ते महाभयंकर होते. शस्त्रक्रियेसाठी सर्जनने सर्व काळजी घेतली, तरीही काही फायदा नव्हता. त्याने जो ॲप्रन अंगावर घातला होता, त्याचे निरजंतुकीकरण झालेले नव्हते!

हा सर्व किस्सा मी बार्कने आयोजित केलेल्या एका राष्ट्रीय परिसंवादात सांगितलेला आहे. मात्र या सर्व प्रकरणात त्या कंपनीवर कोणतीही कारवाई करणे अशक्य होते. ‘आम्ही किरणोत्सर्गी निरजंतुकीकरण थांबवून खूप दिवस झालेत, आता आम्ही इथिलिन ऑक्साइड वापरून रासायनिक पद्धतीने निरजंतुकीकरण करतो,’ असे त्यांनी सांगितले.

या गोष्टी 25-30 वर्षांपूर्वीच्या. आज या बनावट गोष्टींचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात असणार. मध्यंतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांच्या वेळी काय होते, हे बाहेर आले. त्या व्यवस्थेचे प्रमुख शशिकांत कर्णिक यांच्यावर कारवाई झाली. मात्र त्यापूर्वी काही वर्षांत, या प्रक्रियेतून उर्त्तीर्ण होऊन बाहेर पडलेले प्रशासकीय अधिकारी कुणी शोधले नाहीत. कदाचित ते अशक्य असेल.

...आणि आजच्या आपल्या रचनेत अनेक ठिकाणी एकच पदवी असलेले दोन जण आपणांसमोर आले, तर त्यांना आपण पूर्णपणे वेगळी वागणूक देतो! खरी आणि बनावट यातील रेषा आपणच पुसून टाकल्यात! अगदी सारखी योग्यता असलेले दोन तरुण प्राध्यापक होण्यासाठी महाविद्यालयात मुलाखतीसाठी गेले तर एकाला पक्की नोकरी म्हणून दरमहा दीड लाख रुपये पगार मिळतो. दुसऱ्याला तासिकेवर महिन्याला चक्क दहा हजार रुपये देतात. त्याऐवजी त्या दोघांना दरमहा पन्नास हजार रुपये पगार देणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकत नाही. त्याहूनही वाईट म्हणजे, ज्याला लाख-दीड लाखाची नोकरी दिली त्याच्याकडून त्या संस्थेने त्याचा दोन वर्षांचा पगार म्हणजे वीस लाख रुपये घेतलेले असतात, असे अगदी उघडपणे सर्वत्र बोलले जाते. सांगण्याचा मुद्दा वेगळा. बनावट गोष्टी आणि बनावट वस्तूंना योग्य ठरवणारी रचना भोवताली सर्वत्र आहे. संवेदनशील व्यक्तीसमोर फक्त एकच पर्याय आहे. गांधारीचे अवघड व्रत स्वीकारावयाचे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके