डिजिटल अर्काईव्ह

हे सारे मी सांगतोय, याचे कारण वेगळे. हे पुस्तक वाचेपर्यंत हे डॉ. मो. ना. आगाशे हे केवढे मोठे महाआयामी व्यक्तिमत्त्व आहे, हे मला अजिबात माहीत नव्हते. ते तसे ठीक आहे- पण डॉ. मो. ना. आगाशेंच्या नातवंडांनासुद्धा त्यांच्याबद्दल ‘आपले आजोबा’ यापलीकडे फारशी किंवा अजिबात काही माहिती नसावी. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे, खरे तर प्रत्येक गावात दोन पिढ्यांपूर्वी प्रचंड ऊर्जा आणि प्रतिभा असलेली आणि अंधारात चाचपडत या देशाच्या नवनिर्माणासाठी आजन्म प्रयत्न करणारी माणसे होती. प्रत्येक गावात आपण त्या माणसांना स्मृतीआड केलंय. हे पुस्तक पथदर्शक ठरावे आणि प्रत्येक गावात पुसून गेलेल्या पाऊलखुणा शोधत आणि सांगत अशी पुस्तके साकार व्हावीत.

मी सातारचा. 1932 ते 1955 अशा शालान्त परीक्षेपर्यंतची माझी आयुष्यातली पहिली सतरा वर्षे सातारला गेली. त्या वेळी डॉ. मो. ना. आगाशे हे नाव कानांवर जायचे, पण हिमखंडाचा फक्त आठवा भाग आपणाला वर दिसतो, तसाही तो प्रकार नव्हता. गावातील एक नावाजलेले मोठे डॉक्टर एवढीच ती ओळख होती. त्यानंतर 47 वर्षांनी देशातील आणि देशाबाहेरचे वास्तव्य संपवून मी 2002 मध्ये सातारला परत आलो. पुढील जवळजवळ 20 वर्षांत कोणत्याही निमित्ताने त्यांचे नावही कानांवर पडले नाही.

नाही म्हणायला, एका वेगळ्या कारणाने त्यांची पुसटशी आठवण झाली. दोनेक वर्षांपूर्वी ‘गावोगावचे दीपस्तंभ’ म्हणून ‘साधने’त एक सदर सुरू करावे, अशी चर्चा मी आणि विनोद शिरसाठ करत होतो. त्यातला पहिला लेख मी लिहावा असे विनोदने सुचवले. माझ्यासमोर लगेच आले ते डॉ. रविंद्र हर्षे. वयाची 75 वर्षे ओलांडलेले डॉ. हर्षे बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम. डी. पदवी मिळवल्यावर सातारला आले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी सातारसारख्या छोट्या गावात व्यवसाय सुरू केला. ते साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला उमेदवार नक्की पडणार, हे माहीत असूनही घरोघरी त्याचा प्रचार करायला जात. नंतर ते संतवाङ्‌मयाकडे वळले. संतवाङ्‌मय समाजवाद कसा यथार्थपणे सांगतो, हे सांगत त्यांनी प्रवचनेपण दिली. मात्र त्यांचे मोठेपण जाणवले, ते वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेल्या आमच्या एका मित्राचा रौप्य महोत्सव आम्ही त्यांच्या हस्ते साजरा केला त्या वेळी! आमच्या या मित्राला पंचवीस वर्षांपूर्वी एक जबरदस्त हार्टॲटॅक आला. ॲब्युलन्स बोलावून त्याला बायपास सर्जरीसाठी पुण्याला नेण्याची तयारी सुरू होती. डॉ. हर्षे ठामपणे म्हणाले, ‘‘मला या ऑपरेशनची अजिबात गरज वाटत नाही. थोडा व्यायाम, थोडे पथ्य, थोडी औषधे यामुळे तो ठणठणीत होईल.’’ मित्राचा रौप्य महोत्सव साजरा करताना जाणवले, की सातारा शहराच्या आसपास असे किमान शंभर जण सापडतील, ज्यांना डॉ. हर्षेंनी असा मोलाचा सल्ला दिलाय.

त्या वेळी ‘साधने’त डॉ. हर्षेंवर लिहिलेल्या लेखात मी त्यांची जडणघडण, बालपण यांवर लिहिलेले आहे. त्यांचे बालपण फार वेगळे होते. पणजोबा सनातनी हिंदू. पुण्यात प्रचंड मोठा वाडा. सनातन धर्माचे नीटपणे पालन झाले नाही, म्हणून हा देश पारतंत्र्यात पडला असे समजणाऱ्या सनातनी मंडळींचे ते कदाचित एक प्रतिनिधी असणार. मात्र डॉ. हर्षेंच्या आजोबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. वाडा सोडला. चाळीतील एका खोलीत येऊन राहायला लागले. हिंदू धर्मातील न संपणारी घृणास्पद जातिव्यवस्था ही  या देशाच्या अवनतीचे एकमेव कारण आहे, असे सर्वप्रथम गौतम बुद्धाने सांगितले आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या रेव्हरंड टिळकांपासून अनेकांच्या मनात अशीच काही वादळे असणार. मात्र डॉ. हर्षेंच्या वडिलांना प्रश्न पडला, आता माझा धर्म कोणता? आजोबांचा की वडिलांचा? त्यांनी सरळ महात्मा गांधींना पत्र पाठवले. गांधीजींनी पोस्टकार्ड पाठवले. ‘‘प्रत्येकाने आपला धर्म शोधायचा असतो. तो व्रतस्थ होऊ पाळायचा असतो.’’ डॉ. हर्षेंच्या चाळीतील खोलीत ते पत्र कायम भिंतीवर लटकलेले होते. हर्षेंची मुलाखत घेताना, एका गोष्टीचा उलगडा झाला. त्यांनी सातारला येऊन व्यवसाय सुरू केला, याचे कारण म्हणजे डॉ.मो.ना.आगाशे हे त्यांच्या आईचे वडील- त्यांचे नाना. आईला मुलाने माहेरच्या गावी जावे असे वाटत असणार!

मात्र तरीही हे पुस्तक हातात येईपर्यंत डॉ. मो. ना. आगाशे हे डॉ. हर्षेंचे नाना- याहून त्यांची ओळख मला झालेली नव्हती. मात्र हे पुस्तक हातात आले आणि आपण सारेच जण आज आपल्या आधीच्या पिढीतील त्यागी, समर्पित, अस्वस्थपणे पारतंत्र्यात नव्या वाटा शोधणाऱ्या पथदर्शक माणसांना पूर्णपणे विसरून गेलोय, याची दाहक जाणीव झाली. या पुस्तकाचा ब्लर्ब सदानंद मोरे यांनी लिहिलाय. त्यांचा ब्लर्ब तसा पानभर आहे. त्यात त्यांनी या पुस्तकाचे वेगळेपण व गरज दोन्ही गोष्टी सांगितल्यात. त्यांनी लिहिलंय, ‘‘एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या चरणात महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत जागरणाची आणि पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू झाली. विशेष म्हणजे ही प्रेरणा  फक्त राजकीय कार्यापुरती मर्यादित नव्हती. शिक्षण, अर्थ, उद्योग इ. मानवी जीवनाची अंगोपांगे तिने व्यापली होती. साताऱ्यातील अर्कशाळा आणि अगदी अभिनव अशा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे प्रणेते डॉ. मो. ना. आगाशे यांना या प्रक्रियेचे प्रातिनिधिक प्रतीक मानता येईल.’’

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी या पुस्तकाला दहा पानी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. अशा पुस्तकांची आज समाजाला असलेली गरज बेडकिहाळ यांनी नेमक्या शब्दांत मांडली आहे. त्यांनी लिहिलंय, 'Bliss was it in that dawn to be alive and to be young was very heaven'  हे उद्‌गार आहेत सुप्रसिद्ध आंग्ल कवी विल्यम वर्ड्‌सवर्थचे. ते उद्‌गार फ्रेंच राज्यक्रांतीच्या संदर्भातील आहेत. वर्ड्‌सवर्थला जे फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेचे वातावरण वाटले, तेच मला आपल्याकडील एकोणिसाव्या शतकाबद्दल वाटते. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठीही एकोणिसावे शतक हे नव्या सर्जनशील विचारांचे होते. वसाहतकाळात सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वात या समाजाला एका चैतन्याचा स्पर्श झाला. नव्या सामाजिक रचनेची नांदी झाली. सर्वस्वी नवा मध्यम वर्ग या काळात अवतरला. जरुरीपुरते अर्थार्जन करून समाजाची सेवा करणे याला महत्त्व आले. स्वत:ची राजकीय मते असूनही ती बाजूला ठेवून विधायक रीतीने संस्था निर्माण करणारे, तिचे जिवापाड संगोपन करणारे, सर्वसमावेशक दृष्टिकोन व संवादाचा मार्ग सतत पत्करणाऱ्या लोकांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात निर्माण झाली. याच परंपरेत साताऱ्याचे डॉ. मो. ना. आगाशे अतिशय चपखल बसतात. साताऱ्याचे संस्थापुरुष म्हणूनही त्यांचा उल्लेख रास्तपणे करता येतो. महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील या मंडळींनी ज्या एकल उद्दिष्टासाठी आपले आयुष्य बांधून घेतले, त्याप्रमाणे स्वत:चे आयुष्य आयुर्वेद आणि पाश्चात्त्य वैद्यकशास्त्र यांच्या सहकार्यासाठी व समन्वयासाठी वाहून घेतले.

सातारचे आर्यांग्ल महाविद्यालय व आयुर्वेद अर्कशाला यांतले डॉ. आगाशेंचे योगदान अलौकिक आहे, पण त्याचबरोबर जवळजवळ सर्व संस्थांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. युनायटेड वेस्टर्न इन्शुरन्स कंपनीपासून युनायटेड वेस्टर्न बँक अशा अनेक संस्थांच्यात कार्यकर्ता ते संचालक- अशा अनेक भूमिका त्यांनी सहजपणे सांभाळल्या. सातारचे सामाजिक जीवन त्या वेळी केवढे मैत्रीपूर्ण होते, याचा एक किस्सा या पुस्तकात येतो. डॉ. आगाशेंची अखंड धावपळ पाहून कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, खूप काम करून तुम्ही थकणार. प्रत्येक क्षेत्रात तुमचे  मोलाचे योगदान आहे, त्यामुळे फार थकलात तर मला सांगा. तुमचा हा भाऊ तुम्हांला खांद्यावर बसवून प्रत्येक ठिकाणी घेऊन जाईल.’’

‘डॉ. मो. ना. आगाशे - एक राजस योगी’ या पुस्तकात डॉक्टरांच्या आयुष्यातील अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अखंड धडपड आणि धावपळ, अनेक क्षेत्रांतील त्यांचे मोलाचे, अतुलनीय कार्य अगदी सहजपणे आपल्या समोर उलगडते. या पुस्तकाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हे चरित्र नाही. हा गौरवग्रंथपण नाही. चरित्र आणि गौरवग्रंथ यांच्या संगमावर हे पुस्तक उभे आहे. त्यामुळे प्रथम त्यांचे विस्तृत चरित्र आहे आणि त्याचबरोबर त्या वेळच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या वेळी त्यांच्या कार्याला दाद देत, त्यांचे प्रामाणिक मूल्यमापन करणारे जे लेख लिहिलेत, त्यांचाही यात समावेश आहे. त्यामुळे डॉ. आगाशे यांचे प्रचंड कार्य आणि मनस्वी स्वभाव अगदी सहजपणे आपल्या समोर साकार होते.

आर्यांग्ल महाविद्यालय सुरू झाल्यावर डॉक्टरांनी काय केले? आपण एम.बी.बी.एस. आहोत. सातारा शहरातील आपण एकुलते एक एम.बी.बी.एस. डॉक्टर आहोत, आपला व्यवसाय धो धो पैसे देणारा आहे, मात्र आयुर्वेद मूल संस्कृतमधून नीट समजावून घेतले, तरच आपण खऱ्या अर्थाने आर्यांग्ल स्थापन करू. म्हणून डॉक्टरांनी मूळ संस्कृतमधून सर्व आयुर्वेद समजावून घेण्याचे ठरवले. त्या वेळी काय झाले, हे यतेश्वरशास्त्री केळकर, महामहोपाध्याय यांनी आपल्या लेखात दिलंय. ते लिहितात, ‘‘डॉक्टर मला म्हणाले, मी तुम्हांला महिना शंभर रुपये देणार. (त्या वेळी सोने पन्नास रुपये तोळा होते.) तुम्ही साडेतीन वर्षे रविवार सोडून दररोज सकाळी 9 ते 10.30 आणि दुपारी 3 ते 4.30 असे तीन तास मला संपूर्ण आयुर्वेद मूळ संस्कृत ग्रंथांमधून समजावून द्यायचा. साडेतीन वर्षांत डॉक्टरांनी रविवार सोडून एकही सुट्टी घेतली नाही. साडेतीन वर्षे संपली त्याच वेळी त्यांना एकसष्टावे वर्ष लागले होते. त्यांचा षष्ट्यब्दिसमारंभ साताऱ्यात मोठ्या समारोहाने साजरा झाला. मला लाज वाटली की, साठी उलटताना असलेला डॉक्टरांचा उत्साह कोणीकडे आणि चाळिशीची आमची पेन्शनर वृत्ती कोठे?’’

डॉक्टरांच्या उमदेपणाची एक गोष्ट डॉ. एन. आर. आपटे यांनी सांगितली आहे. ते लिहितात, ‘‘भारत सरकारने एक कमिटी नेमली होती, एतद्देशीय औषधोपचार पद्धतींचा विचारविनियम करण्यासाठी. त्या समितीसमोर डॉ. आगाशे यांना एक तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर फक्त एक पाहुणा म्हणून मी हजर होतो. त्या चर्चेत भाग घेण्याचा कोणताही अधिकार मला नव्हता. नेहमीच्या पद्धतीने उथळपणे चर्चा होत राहिल्या. जेवणाची सुट्टी झाली, तेव्हा डॉक्टरांनी मला विचारले की, माझी पंचमहाभूतांसंबंधीची कल्पना दुपारच्या चर्चेत समितीसमोर विस्ताराने मांडली पाहिजे. माझी ही कल्पना डॉक्टरांनी समजावून घेतलेली होती व त्यांना ती महत्त्वाची वाटली होती. दुपारच्या सत्रात ही कल्पना मांडण्याचे ठरले. चर्चासत्राच्या अध्यक्षांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी डॉ. आगाशेंना तो विचार समजावून देण्यास सांगितले. पण डॉ. आगाशे त्यांना एकदम म्हणाले की, तुम्ही या अशा शास्त्रीय चर्चेत बंदिस्तपणा का आणता? या माझ्या मित्राची ही कल्पना आहे. तो आमंत्रित नसला तरीही त्याला ती मांडावयास मिळाली पाहिजे. - मी हा प्रसंग जन्मात विसरणार नाही. स्वत: बाजूला होऊन नव्या माणसाला संधी देण्यासाठी मनाचा फार मोठेपणा लागतो. तो त्यांच्याकडे पुरेपूर आहे.’’ या अशा वेगवेगळ्या लेखांमधून डॉ. आगाशे आणि त्या वेळचा अस्वस्थ कालखंड अगदी सहजपणे आपल्या समोर साकार होतो.

आणखी एक गोष्ट आहे. साधनेच्या वाचकांना रमेश आगाशे हे नाव परिचित आहे. अभ्यासू, समतोल, सविस्तर वाचकपत्रे ते साधनेत लिहीत असतात. ‘सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड’ या संस्थेत ते चंदीगड येथे अनेक वर्षे संचालक होते. डॉ. मो. ना. आगाशे यांच्या चौदा (14) मुलांपैकी ते एक. आज वय वर्षे फक्त 85. प्रकृती तशी यथातथाच. पण एक वर्ष झपाटून माहिती गोळा करून त्यांनी हे पुस्तक साकार केलंय. त्यांची अर्धांगिनी सौ. सुनेत्रा आगाशे यांनी त्यांना भरपूर मदत केली. सुनेत्रा आगाशे यांनी बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज, पुणे येथून पदवी घेतलेली आहे. विजय केळकर आणि शरद पवार हे त्यांचे सहविद्यार्थी. मात्र आयुष्यभर त्यांनी फक्त गृहिणी ही पदवी बरोबर ठेवली. म्हणजे ‘लव-कुश रामायण गाती’ असे काहीसे किंवा ‘ज्योतीने तेजाची आरती’.

डॉ. मो. ना. आगाशे (एक राजस योगी)
प्रकाशक : रमेश आगाशे.
यशोधन प्राइड अपार्टमेंट, शनिवार पेठ, सातारा,
Mob. 75229 66469
पृष्ठे 190, मूल्य - 250/-

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी