डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रचंड मिरवणुका, रस्त्यावर कमानी, घराघरांतून फुलांचा वर्षाव, मिरवणुकीत समोर हत्ती, विवेकानंद रथात बसलेले, घोड्यांना रांगेत उभं करून लोक रथ ओढताहेत... सारं वातावरण चैतन्यमय होतं... या वातावरणाचा फायदा घेऊन विवेकानंदांनी सनातन व्यवस्थेवर घणाघाती प्रहार केले. ते कुंभकोणम इथे आले. कुंभकोणम हा चेन्नई प्रांतातला सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला. तिथल्या ब्राह्मण तरुणांसमोर भाषण देताना ते म्हणाले, ‘ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्युघंटा वाजवण्यासाठी मी इथे उभा आहे. आपण सुखाने मरण पावलो नाही, तर आपण कुजू. त्यामुळे आपल्याला आणि इतरांनाही त्रास होईल. तसं काही होऊ नये म्हणून आपण सांगितलं पाहिजे, ‘आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी असलेल्या सर्व नोकऱ्या दलितांसाठी राखून ठेवून स्वयंरोजगाराकडे वळणार आहोत’

माझी खात्री आहे, शून्यापासून सुरुवात करून सर्वधर्म परिषदेतल्या अद्‌भुत यशापर्यंतचा विवेकानंदांचा प्रवास तुम्ही नीटपणे समजून घेतला आहे. ‘ज्याची हिंमत हरली नाही, तो आयुष्यात कधीच हरत नाही’ हे तुमच्या लक्षात आलंय आणि ‘मी यशस्वी होणारच’ म्हणून तुमच्या आयुष्यातली अथक, अपराजित, दमदार वाटचाल यापुढे कायम सुरू राहणार आहे. मोठं झाल्यावर तुम्ही विवेकानंदांना नीटपणे आणि पूर्णपणे समजून घेणार आहात, हेसुद्धा मला माहीत आहे.

मात्र त्यांना निरोप देत असतानाच त्यांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ या :

1) विवेकानंद अमेरिकेत का गेले होते?

2) भारतात परत आल्यावर सनातनी मंडळींनी त्यांना केवढा आणि कसा त्रास दिला?

3) या सनातनी मंडळींवर मात करता येईल, असं स्वत:चं व्यक्तिमत्त्व विवेकानंदांनी कसं घडवलं?

सर्वधर्म परिषदेतल्या अभूतपूर्व यशानंतर केवळ तीन महिन्यांनी, म्हणजे 28 डिसेंबर 1893 रोजी हरिपद मित्रा यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, ‘मी या देशात केवळ आपलं कुतूहल पूर्ण करण्यासाठी किंवा गंमत पाहण्यासाठी आलेलो नाही. ‘आपण फार मोठं नाव मिळवावं’ हा विचार तर माझ्या मनात अजिबात नव्हता. माझ्या देशाचं नवनिर्माण करण्याच्या काही योजना माझ्या मनात आहेत. या योजनांना उपयोगी येतील, अशी माणसं किंवा अशा रचना या देशात आहेत का, हे मला पाहायचं आहे.

आपल्या मनातली रचना या पत्रात विवेकानंदांनी सांगितलेली नाही. खरंतर हरिपद मित्रा त्यांचे जवळचे मित्र! मात्र ‘मसलतीचं बोलू नये; बोलायचं लिहू नये’ हा रामदास मंत्र विवेकानंदांनी आजन्म पाळलाय. तुम्हालाही आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर हा मंत्र नीटपणे समजून घेऊन व्यवहारात वापरता आला पाहिजे. कुणाला कोणती गोष्ट सांगायची आणि कोणती गोष्ट चुकूनही सांगायची नाही, याचं भान हवं.

खरंतर आपल्या मनातली ही योजना त्यांनी त्यांचे मित्र प्रा.राईट यांना सांगितली आहे. त्यांच्यामुळेच तर विवेकानंद सर्वधर्म परिषदेत सामील झाले. मात्र त्यांच्या मनातली ही योजना ते कशा प्रकारे अमलात आणणार होते, हे त्यांनी सर्वधर्म परिषदेनंतर फक्त एक महिन्याने, म्हणजे 26 ऑक्टोबर 1893 रोजी राईट यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. ते पत्र असं आहे :

‘अमेरिका हीच एक अशी जागा आहे, जिथे कोणतीही गोष्ट यशस्वी होण्याची शक्यता आहे, पण विचारान्ती मी माझ्या योजनेबद्दल बोलणं अजिबात सोडून दिलं आहे. कारण माझ्या योजना मांडण्याने जेवढे लोक येतील, त्यापेक्षा खूप अधिक माणसं ‘हा मूर्तिपूजक काय बोलतो’ या उत्सुकतेमुळेच भाषण ऐकायला येणार! अर्थात, मला माझं सारं काम माझ्या योजनेसाठीच करायचं आहे, पण ती योजना प्रत्यक्ष न मांडता, मी इतर वक्त्यांप्रमाणे भाषणं देणार आहे. माझं इथे फार चांगलं चाललं आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. पैसे मिळवण्याच्या बाबतीत मला आणखीही पुष्कळ यश मिळेल, अशी मला आशा आहे. अर्थात, या धंद्यात मी अजून फार कच्चा आहे, पण लवकरच मी हा सगळा उद्योग शिकेन. माझी योजना यशस्वी होईल, असं मला वाटतं आणि त्याचं श्रेय तुम्हालाच आहे.’

आपल्या या योजना चार पत्रांमधून आपला शिष्य, आपला गुरुबंधू आणि आपले मित्र यांना विवेकानंदांनी सांगितल्या आहेत. पहिलं पत्र त्यांचे गुरुबंधू शशी म्हणजेच श्रीरामकृष्णानंद यांना त्यांनी 19 मार्च 1894 रोजी लिहिलंय. त्यात ते सांगताहेत, ‘माझ्या साऱ्या योजना मी या लहानशा पत्रात सविस्तर लिहू शकत नाही. मात्र आपलं सारं राष्ट्र आज खेड्यात राहत आहे. खेड्यातले हे आपले बांधव अर्धपोटी, अर्धनग्न आणि अज्ञानी आहेत. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तीनही राजवटींनी त्यांना पायाखाली तुडवलं आहे. त्यामुळे ‘आपण माणूस आहोत’ हेच ते विसरून गेलेत. हे गरीब लोक अगदी खेड्यातल्या शाळेत येऊनही शिक्षण घेऊ शकणार नाहीत. ‘पर्वत महंमदाकडे येत नसेल, तर महंमदाने पर्वताकडे गेलं पाहिजे’. हे कार्य करण्यासाठी प्रथम माणसं हवीत आणि मग पैसा. गुरुदेवांच्या कृपेने मला भारतातील प्रत्येक गावात दहा-पंधरा लोक खात्रीने मिळतील. पैसा गोळा करण्यासाठी मी सर्वत्र हिंडलो, पण भारतातल्या लोकांकडून पैसा मिळवण्याची आशाच नको. आज ते स्वार्थाचे मूर्तिमंत पुतळे आहेत. म्हणूनच तर मी इथे, अमेरिकेत आलो आहे. या ठिकाणी मी स्वत: खपून पैसे मिळवीन आणि मग मायदेशात परत जाऊन जीवनातलं माझं ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी उरलेलं आयुष्य वेचीन. आज भारतात लाखो संन्यासी आहेत. ते भारतभर हिंडून लोकांना धर्म शिकवतात. अरे, उपाशी पोटी कधी धर्म शिकविता येईल का? आपण खेड्यात जाऊन इतिहास, भूगोल, विज्ञान, शेती कशी करायची हे शिकवलं पाहिजे. मला हे काम करणाऱ्या संन्याशांची संघटना उभारायची आहे.’

आपला शिष्य अळसिंगा पेरुमल याला 28 मे रोजी पाठवलेल्या पत्रात त्यांनी सांगितलं आहे, ‘तुम्ही पैसे गोळा करून काही निधी उभारा. तुम्हाला ते जमत नसेल, तर मी पैसे पाठवतो. मात्र त्या पैशातून काही मॅजिक लॅन्टर्स (म्हणजे प्रकाशचित्रं दाखवणारं उपकरण), नकाशे, पृथ्वीचा गोल, लोहचुंबक, रासायनिक पदार्थ विकत घ्या. दररोज संध्याकाळी खेड्यातल्या गरीब आणि दलित लोकांना, अगदी मुसलमान, ख्रिश्चन व अस्पृश्यांनादेखील एके ठिकाणी जमवा. प्रथम त्यांना धर्मासंबंधी उपदेश द्या आणि मग मॅजिक लॅन्टर्न आणि इतर वस्तूंच्या साहाय्याने  त्यांना त्यांच्या भाषेत खगोलशास्त्र, भूगोल, विज्ञान शिकवा... ‘मासिकं, वर्तमानपत्रं काढणं’ हे तुमचे विचार तसे ठीक आहेत, पण अगदी थोडं जरी असलं, तरी प्रत्यक्ष कार्य हे सदैव होणाऱ्या वटवटीपेक्षा आणि बोरूबहाद्दर होण्यापेक्षा शतपटीने चांगलं आहे.’

त्याच वेळी अखंडानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, ‘खेत्रीत जे कुणी गरीब आणि खालच्या जातीतले लोक असतील, त्यांच्या घरी जा आणि त्यांना खरा धर्म समजावून द्या. मात्र त्याचबरोबर त्यांना इतिहास, भूगोल आणि विज्ञान शिकवा. जोपर्यंत गरीब आणि अस्पृश्य यांच्यासाठी प्रत्यक्ष कष्ट घेऊन तुम्ही काही करत नाही, तोवर ‘आपण साधू आहोत’ म्हणून पंचपक्वान्नांवर ताव मारत, तोंडाने ‘श्रीरामकृष्ण हरी’ म्हणत आळसाने मजेत दिवस पुढे ढकलल्याने काहीही साध्य होणार नाही. खेड्यात जा, तिथल्या लोकांना धर्म आणि जीवनोपयोगी विद्या शिकवा.’

20 जून 1894 रोजी जुनागडच्या दिवाणसाहेबांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपली ही योजना सविस्तरपणे लिहिली आहे. ‘माझ्या मते, देश पुन्हा उभा करण्यासाठी आपल्या खेड्यांतल्या लोकांना साक्षर करून त्यांना जीवनोपयोगी शिक्षण दिलं पाहिजे. मात्र हे काम खूप कठीण आहे. कारण आपलं खरं राष्ट्र आज फाटक्या झोपडीत राहतं आहे; आणि हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन शासकांच्या पायाखाली सतत तुडवले गेल्यामुळे ‘आपण माणूस आहोत’ हेच हे लोक विसरून गेलेत. ‘जे वरच्या जातीतले आहेत आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांच्या टाचेखाली चिरडून जाण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत’ अशी त्यांची समजूत आहे.

‘त्यांना साक्षर करून जीवनोपयोगी शिक्षण देण्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. प्रत्येक खेड्यात शाळा काढण्याएवढा पैसा आपल्याकडे नाही; आणि समजा, आपण शाळा काढल्या, तरी मुलं शाळेत येणार नाहीत. त्यांना शेतात काम करायला किंवा गुरं राखण्यासाठी बाहेर जावं लागणार. म्हणून मी एक मार्ग शोधून काढला अहे. गावातले लोक शाळेत जाणार नाहीत, मात्र शाळा गावातल्या लोकांपर्यंत जाईल! म्हणजे काय ते सांगतो. दिवसभरातले काबाडकष्ट संपल्यावर खेड्यातले लोक पारावर बसून बिड्या फुंकत दिवसभरातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करतात; मुलं जवळ खेळत असतात. अशा वेळी दोन सुशिक्षित संन्यासी तिथे जाऊन, त्यांचे मित्र बनून त्यांना साक्षर बनवतील. ज्ञान, विज्ञान, धर्म शिकवतील. शेती अधिक चांगली कशी करता येईल, ते त्यांना सांगतील. हे काम करण्यासाठी अनेक तरुण मला भारतात मिळतील. त्या कामासाठी लागणारे पैसे आता मी अमेरिकेत भाषणं देऊन मिळवीन.’

23 जून 1894 रोजी म्हैसूरच्या राजेसाहेबांना पत्र पाठवून आपल्या मनातली ही योजना त्यांनी पुन्हा सविस्तरपणे मांडली आहे. विवेकानंदांनी एका पाठोपाठ एक पाठवलेल्या या पत्रांमुळे ते आपल्या या योजनेत मनापासून कसे गुंतले होते किंवा खरंतर कसे झपाटले होते, हे आपल्या लक्षात येतं. मात्र विवेकानंदांच्या मनातली ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. भारतातले गुरुबंधू आणि मित्र यांच्याकडून फारसा किंवा खरंतर अजिबात प्रतिसाद नव्हता. त्यांचा शिष्य अळसिंगा पेरुमल याने तर पत्र पाठवून कळवलं, ‘असं काही करणं आम्हाला जमेल, असं वाटत नाही. तुम्ही परत आल्यावर बघू!’ त्याहूनही क्लेशदायक गोष्ट म्हणजे, त्यांची भाषणं आयोजित करणाऱ्या मंडळींनी त्यांना फसवलं. 11 जुलै 1894 रोजी अळसिंगा पेरूमल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलं, ‘डेट्रॉईट इथल्या एका व्याख्यानाचे मला 900 डॉलर्स, म्हणजे 2700 रुपये मिळाले. अन्य एका ठिकाणी मला एका व्याख्यानाला 2500 डॉलर्स म्हणजे 7500 रुपयांचं उत्पन्न झालं, पण माझ्या हातात केवळ 200 डॉलर्सच पडले! या दुष्ट लेक्चर कंपनीने मला फसवलं’. ‘भाषणं देऊन पैसे मिळवता येतील’ हे स्वप्नरंजन असल्याचं त्यांना समजलं. ते जानेवारी 1897 मध्ये भारतात आले, त्या वेळी निष्कांचन अवस्थेत होते. 1899 च्या जून महिन्यात विवेकानंद दुसऱ्यांदा इंग्लंड-अमेरिकेत गेले. ते डिसेंबर 1900 मध्ये परत आले. या वेळी ‘भाषणांतून परतीच्या प्रवासाचं तिकिटसुद्धा मी विकत घेऊ शकत नाही’ ही खंत त्यांनी अनेक पत्रांतून व्यक्त केली आहे. 17 जून 1900 रोजी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय, ‘आता भाषण हे केवळ माझ्या उपजीविकेचं साधन म्हणून उरलंय.’ त्यामुळे असेल, विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना पाठवलेल्या एका पत्रात सांगितलंय, ‘आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला व्यवहार जमला पाहिजे. पैशाच्या व्यवहारात प्रत्यक्ष बापावरही विश्वास ठेवायचा नसतो!’

आपल्या देशातल्या तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी विवेकानंदांवर भरभरून प्रेम केलंय आणि त्याच वेळी आपल्या देशातल्या सनातनी मंडळींनी विवेकानंदांना मरणयातना भोगायला लावल्यात. सर्वधर्म परिषदेतल्या त्यांच्या भाषणानंतर आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या आनंदाला उधाण आलं होतं. मात्र आपल्या देशातल्या एकाही शंकराचार्याने वा एकाही मठाधिपतीने त्यांचं अभिनंदन तर राहूच दे, पण साधं कौतुकसुद्धा केलं नाही. आपल्या मनातली याबाबतची खंत विवेकानंदांनी 20 जून 1894 रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून सांगितली. ‘ ‘मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे’ असं अमेरिकी लोकांना स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न, साधा प्रयत्नसुद्धा कोणाही शंकराचार्यांनी, मठाधिपतींनी वा हिंदू संघटनांनी केलेला नाही. उलटपक्षी हे लोक अमेरिकी लोकांना सांगत आहेत की, मी एक पक्का भोंदू माणूस असून अमेरिकेत आल्यावर मी संन्याशाची वस्त्रं धारण केली आहेत; ‘हा खरा संन्यासी आहे, हा कुणी फसवणारा माणूस नाही, हा आमच्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे’ एवढंदेखील अद्याप सांगितलेलं नाही. हे एवढे थोडे, चार शब्द, पण तेदेखील माझ्या देशबांधवांनी माझ्यासाठी अजून खर्च केलेले नाहीत! आपल्या देशबांधवांची खरोखरच धन्य आहे!’

खरं तर विवेकानंदांनी या पत्रात फारच सौम्य शब्द वापरले आहेत, कारण वास्तवात, हे त्यांचे देशबांधव त्यांना अमेरिकेत हालाहल प्राशन करायला लावत होते. ‘युनिटी अँड दि मिनिस्टर’ या ब्राह्मो समाजाच्या मुखपत्राने लिहिलं, ‘बाबू नरेंद्रनाथ दत्त तथा विवेकानंद यांना आम्ही नववृंदावन थिएटर या नाट्यसंस्थेच्या रंगभूमीवर काम करणारा एक नट म्हणून ओळखतो; एक तत्त्वज्ञ म्हणून नाही.’ ‘इंडियन रिव्ह्यू’मधले शब्द आहेत, ‘विवेकानंद हिंदू धर्माचा विचार सांगतात असं समजणं हास्यास्पद आहे.’ आता तुम्हाला फार मोठं यश मिळालं आणि घरातली माणसंच जर तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमची खिल्ली उडवत असतील, तर शेजारी गप्प बसतील. अमेरिकेतल्या रमाबाई सर्कलमधून त्यांच्याबद्दल कंड्या पिकवायला सुरुवात झाली. त्यांच्या प्रवक्त्या मॅक्कीन यांनी लिहिलं, ‘या माणसाला धर्म वगैरे काही फारसा माहीत नाही आणि बॉस्टनमधल्या काही स्त्रियांनी ‘हा देखणा हिंदू आमच्यावर त्याच्या संमोहन शक्तीचा प्रभाव टाकतो’ असं सांगितलं आहे.’

कुत्र्याला भुंकू द्यावं, हत्तीने आपली डौलदार वाटचाल सुरू ठेवावी, हे विवेकानंदांना माहीत होतं. फळांनी लगडलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, हेही त्यांना माहीत होतं. सूर्यावर थुंकणाऱ्या लोकांकडे सूर्य कधी लक्ष देत नाही... हे सारं खरं! मात्र या सगळ्या प्रकारात दोन कारणांनी त्यांना फार यातना झाल्या. ते प्रा.राईट यांच्यामुळे सर्वधर्म परिषदेत उभे राहिले होते आणि या तुफानी अपप्रचाराचा त्यांच्यावरही परिणाम होत होता. त्यामुळे मे 1894 मध्ये राईट यांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितलं, ‘बाकी ढीगभर लोक काय म्हणतात, याला मी अजिबात महत्त्व देत नाही. कारण शहाणा माणूस दुसऱ्याच्या टीकेने कधी विचलित होत नाही. त्याला उत्तर देण्यासाठी आपला वेळ वाया घालवत नाही. मात्र तुमच्याबद्दल असं नाही. तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा, त्यांना उत्तर देण्यासाठी मी बांधलेला आहे. तुम्हाला प्रथम सांगितलं होतं, तेच पुन्हा सांगतो- ‘माझे देशबांधव भयानक दैन्य-दु:खात खितपत पडलेले आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग मी शोधतो आहे.’ ’

त्याच वेळी त्यांनी श्रीमती सारा ओली बूल यांना पत्र पाठवलं. विवेकानंद त्यांना धीरमाता- म्हणजे परदेशात मला धीर देणारी माझी आई - म्हणत. 21 मार्च 1895 रोजी धीरमाता यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी सांगितलंय, ‘माझ्याबद्दल रमाबाई सर्कलमधून ज्या कंड्या पिकवण्याचा प्रयत्न होतो आहे, तो ऐकून मला फार नवल वाटतं. त्यांतली एक कथा अशी सांगितली जाते आहे की, माझ्या लफडेबाज वागणुकीमुळे डेट्रॉइटला मिसेस बॅगले यांना आपल्या घरातल्या मोलकरणीला कामावरून काढून टाकावं लागलं. पाहिलंत धीरामाता! माणूस कितीही चांगला असला, चांगला वागला, तरीही त्याच्या अंगावर घाण उडवणारे काही जण भोवताली असतातच.’ या पत्रात विवेकानंदांनी ‘मला नवल वाटतं’ असं लिहिलं आहे. मात्र या प्रकारामुळे त्यांना जी फार मोठी भीती वाटत होती, ती त्यांनी धीरमातांना सांगताना पुढे एकदा म्हटलंय, ‘मला माझ्या आईची काळजी वाटते. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिला स्वत:ला माझ्या काही निर्णयांमुळे खूप त्रास झाला आहे. मात्र त्या वेळी ती म्हणाली होती, ‘आपल्या देशाचं भलं व्हावं, म्हणून नरेंद्र मला सोडून बाहेर पडलाय. मला त्याच्या या वागण्याचा गर्व वाटतो. त्याच्याहून लहान असलेल्या माझ्या दोन्ही मुलांनी देशासाठी असं काही करावं, असं मला वाटतं.’ धीरमाता, आता मला सांगा, ‘आपला हा मुलगा अमेरिकेत जाऊन बायांना फशी पाडतोय’ असं तिला कळलं, तर तिला किती मरणप्राय यातना होतील हा विचार मनात येऊन मला कधी रात्र रात्र झोप येत नाही.’ यावर धीरमाता यांनी त्यांना सांगितलं, ‘तुम्ही मला आई मानता. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर मग तुमच्या आईचा तुमच्यावर केवढा विश्वास असेल! ‘माझा नरेंद्र असं काही स्वप्नातही करणार नाही’ असं ती आत्मविश्वासाने सर्वांना सांगेल. आईचा मुलावरचा विश्वास आणि त्या विश्वासाला तडा जाईल, असं मुलाने चुकूनही न वागणं एवढंच या जगात खरं आहे!’

जानेवारी 1897 मध्ये विवेकानंद अमेरिका, इंग्लंड इथली तुफानी भाषणं संपवून भरतात परत आले. मात्र परदेशातून येताना त्यांनी फारसे, खरं तर अजिबात पैसे बरोबर आणले नव्हते. भारतात परत आल्यावर या देशातल्या भोळ्याभाबड्या जनतेने त्यांचं दैवदुर्लभ असं स्वागत केलं! प्रचंड मिरवणुका, रस्त्यावर कमानी, घराघरांतून फुलांचा वर्षाव, मिरवणुकीत समोर हत्ती, विवेकानंद रथात बसलेले, घोड्यांना रांगेत उभं करून लोक रथ ओढताहेत... सारं वातावरण चैतन्यमय होतं...

या वातावरणाचा फायदा घेऊन विवेकानंदांनी सनातन व्यवस्थेवर घणाघाती प्रहार केले. ते कुंभकोणम इथे आले. कुंभकोणम हा चेन्नई प्रांतातला सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला. तिथल्या ब्राह्मण तरुणांसमोर भाषण देताना ते म्हणाले, ‘ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्युघंटा वाजवण्यासाठी मी इथे उभा आहे. आपण सुखाने मरण पावलो नाही, तर आपण कुजू. त्यामुळे आपल्याला आणि इतरांनाही त्रास होईल. तसं काही होऊ नये म्हणून आपण सांगितलं पाहिजे, ‘आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी असलेल्या सर्व नोकऱ्या दलितांसाठी राखून ठेवून स्वयंरोजगाराकडे वळणार आहोत’ मात्र दलितांसाठी शंभर टक्के आरक्षण ठेवूनही उपयोग नाही. कारण आपण त्यांना पाच हजार वर्षं ज्ञानापासून वंचित ठेवलंय. त्यामुळे आम्हाला एक शिक्षक लागत असेल, तर त्यांना दहा शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी आपल्याला दहा पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करायची आहे.’

सनातन धर्मावरचे हे आघात इथेच थांबत नाहीत. त्या वेळी गोहत्या बंदीची चर्चा जोरात सुरू होती. विवेकानंद मालमदुरा इथे गेले होते. तिथे भाषण देताना त्यांनी सांगितलं- ‘रूढी, परंपरा म्हणजे धर्माज्ञा नव्हे; धर्मही नव्हे. आपल्याकडे जवळ जवळच्या खेड्यांतली ग्रामदैवतं वेगळी आहेत; रूढी आणि परंपराही वेगळ्या आहेत. त्या केवळ वेगळ्या आहेत, असं नव्हे, तर अनेकदा पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. तुम्हाला माहीत आहे, एक वेळ या देशात गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आपल्या वेदांत तर अगदी स्पष्टपणे सांगितलंय, ‘तुमच्या घरी राजा किंवा फार मोठा संन्यासी आला, तर गाय किंवा बैल कापून त्याच्या मांसाचं रुचकर जेवण त्याला द्या’ पण काळ बदलला. या देशातल्या विचारवंतांच्या लक्षात आलं की, ‘हा कृषिप्रधान देश आहे. गोवंश वाचला पाहिजे, म्हणून त्यांनी एक रूढी निर्माण केली.’ आज काळ बदलला असेल, भाकड गाई-बैलांचं पालनपोषण करणं शेतकऱ्यांना त्रासदायक असेल, तर ती रूढी, ती परंपरा आपण ठामपणे नाकारली पाहिजे.’

मात्र एवढं स्पष्टपणे सांगूनही ऐकतील, तर ती सनातनी मंडळी कसली! भाषणाचे दौरे संपवून विवेकानंद बेलूर मठात परत आले. त्यांना भेटायला मुंबईहून काही  गोरक्षक आले. त्या वेळी ते गोरक्षक आणि विवेकानंद यांच्यात जी चर्चा झाली, ती एका शिष्याने लिहून ठेवलेली आहे. तो सारा प्रसंग फारच मजेशीर आहे.

ते गोरक्षक विवेकानंदांना म्हणाले, ‘‘स्वामी, आम्ही भाकड गार्इंसाठी पांजरपोळ चालवितो. कसायाबरोबर मारामारी करून वा त्यांना पैसे देऊन भाकड गार्इंना आणतो. त्यांची काळजी घेतो. त्यांना अन्नपाणी देतो. तुम्ही आम्हाला पैसे द्या, नाही तर किमान आम्हाला आशीर्वाद द्या.’’

विवेकानंद त्या गोरक्षकांना म्हणाले, ‘‘अरे, आज मध्य प्रदेशात माणसं भुकेने तडफडून मरताहेत. काही काळ या गार्इंना विसरा आणि सर्व पैसे भुकेने मरणाऱ्या त्या माणसांच्या तोंडात अन्न पडावं म्हणून पाठवा.’’

मात्र ती सनातनी मंडळी चलाख होती. ती म्हणाली, ‘‘स्वामी, तुम्ही सांगताय, ते तर आम्हालाही माहीत आहे. पण आपले धर्मग्रंथ सांगतात, ‘ती माणसं मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केल होतं.’ त्यामुळे आपण त्यांना मदत करण्याचं काही कारण नाही. त्या माणसांनी आपल्या कर्माचं फळ भोगलं पाहिजे.’’

शिष्य लिहितो, ‘‘ते ऐकून विवेकानंदांच्या फुलांसारख्या डोळ्यांमधून अग्निज्वाळा बाहेर पडत असल्यागत वाटलं. विवेकानंद त्या गोरक्षकांना म्हणाले, ‘अरे, ही तुमची रचना फारच सोपी आहे. त्या गाई मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं. त्यांना त्याची शिक्षा मिळते आहे!’’ पण सनातनी मंडळी चलाख असतात. ती माणसे म्हणाली, ‘‘स्वामी, तुम्ही सांगता ते खरे, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात, गाय ही आमची आई आहे. आणि आपली आई कितीही वाईट असली, तरी आपण तिचं रक्षण केलं पाहिजे.’’

शिष्य लिहितो, ‘विवेकानंद आता लहान मुलासारखे खळखळून हसले आणि म्हणाले, ‘‘आता निघा! आज मला तुमचे आई-वडील समजले! आणि हेच आई-वडील बरोबर घेऊन हिंडणाऱ्या या देशाचं नवनिर्माण करायचं आहे, याची जाणीव झाली.’’ मात्र विवेकानंदांनी ही गोष्ट इथेच सोडलेली नाही. ब्रह्मानंदला पत्र पाठवून त्यांनी विचारलं, ‘आपल्या या देशाला हा कोणता रोग झालाय? उद्या मुंबईमधला एखादा श्रीमंत व्यापारी ढेकणांसाठी हॉस्पिटल काढेल आणि ‘आपल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी ते कसं गरजेचं आहे’ हे समजावून देईल!’

मात्र विवेकानंद इथेही थांबलेले नाहीत. त्यांनी ‘धर्म, त्याचा उद्देश आणि त्याच्या पद्धती’ या आपल्या निबंधात स्पष्टपणे सांगितलंय, ‘एखादी गोष्ट धर्मग्रंथात दिलेली असेल किंवा एखादा फार मोठा धर्मगुरू किंवा शास्त्री-पंडित सांगत असेल, पण ती गोष्ट जर तुम्हाला विचारान्ती पटत नसेल, तर ती अगदी ठामपणे नाकारा. कारण परमेश्वराने तुम्हाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे, ‘विचार करण्याची शक्ती’! परमेश्वराने ती तुम्हाला दिलेली आहे; जनावरांना मात्र अजिबात दिलेली नाही. म्हणून तुम्हाला विचारान्ती न पटणारी गोष्ट तुम्ही नाकारलीत, तर ‘तुम्ही माणूस आहात’ म्हणून परमेश्वराला आनंद होईल. मात्र तुमच्या विचारांना न पटणारी गोष्ट ‘धर्मग्रंथात सांगितली आहे’ किंवा ‘साधू महाराज सांगत आहेत’ म्हणून स्वीकारलीत, तर ‘तुम्ही पशू बनलाय’ म्हणून परमेश्वराला वाईट वाटेल.’

विवेकानंदांच्या या अशा मांडणीमुळे आणि भाषणांमुळे सनातनी मंडळींनी त्यांना मरणप्राय यातना दिल्या. विवेकानंद भारतात परत आल्यावर महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितलं, ‘‘हा माणूस शूद्र आहे. याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही. त्यातून हा समुद्र-प्रवास करून आलाय. याला आता प्रायश्चित्त देऊनही शुद्ध करता येणार नाही!’’ विवेकानंद कलकत्त्याला पोहोचले, त्या वेळी कलकत्त्यामधल्या बंगवासीने लिहिलं, ‘हा माणूस शूद्र आहे. समुद्र-प्रवास करून आलाय. हा माणसू स्वत:ला संन्यासी का म्हणवतो? आमच्या धर्मगं्रथांनी याला संन्यास घेण्याचा अधिकार दिलेला नाही. कलकत्त्यामधल्या धर्मप्रेमी माणसांनी याच्यापासून दूर राहिलं पाहिजे.’ हे इथेही थांबलं नाही. 28 फेब्रुवारी 1898 रोजी स्वामी विवेकानंद भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वरच्या मंदिरात श्रीरामकृष्ण जयंती साजरी करण्यासाठी गेले आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. अवमानित विवेकानंदांना निमूटपणे इतरत्र जाऊन श्रीरामकृष्ण जयंती साजरी करावी लागली. 14 सप्टेंबर 1899 रोजी लंडनमधले त्यांचे मित्र ई. टी. स्टर्डी यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलंय, ‘भारतात परत आल्यावर इथल्या लोकांनी सर्वप्रथम मला मुंडन करायला लावलं, कफनी घालायला लावली. या अशा स्वरूपाच्या अनेक धार्मिक अत्याचारांमुळे माझे मधुमेहासारखे अनेक जुने आजार आता फार बळकट झाले आहेत!’

भारतात परत आल्यावर विवेकानंदांनी त्यांच्या मनातला बेलूर  मठ स्थापन केला. या मठात प्रवेश देताना तुमचं लिंग, तुमचा धर्म, तुमचा पंथ, तुमची जात आणि तुमचं राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जाणार नव्हतं. ‘माणूस तेवढा एक! सारी ईश्वराची लेकरं किंवा सारेच ईश्वराचे अंश!’ असं बेलूर मठ सांगत होता. या मठात प्रशिक्षित होऊन भारतातल्या खेड्यांचं नवनिर्माण करण्यासाठी संन्यासी बाहेर पडणार होते. बेलूर मठ स्थापन करण्यासाठी विवेकानंद परदेशातून पैसे आणू शकले नव्हते आणि हा अशा स्वरूपाचा मठ काढण्यासाठी भारतातल्या एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक दमडीही दिली नव्हती. मठासाठी जमीन विकत घेण्यासाठी लागणारी भली मोठ्ठी रक्कम त्यांची इंग्लंडमधली मैत्रीण हेनरिटा मुल्लर यांनी दिली होती आणि मठाचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी ठेव म्हणून श्रीमती सारा ओली बूल यांनी भरपूर पैसे दिले होते. मात्र या देशात हे इथेच थांबलं नाही. या मठात सर्व धर्मांचे धर्मगंरथ होते; जगभरातल्या तत्त्वचिंतकांचे ग्रंथ होते. जगभरातले नवे नवे ज्ञान दर महिन्याला देणारे ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’चे खंड नियमितपणे येत होते. त्यामुळेच कोलकाता महानगरपालिकेचं म्हणणं होतं, ‘अशा स्वरूपाचा मठ असूच शकत नाही. हे तर विवेकानंदांचं आरामगृह आहे!’ म्हणून त्यांनी बेलूर मठावर भला मोठा कर बसवला. हा मनस्ताप सहन करत विवेकानंदांना याविरुद्ध कोर्टाची पायरी चढावी  लागली.

आता विवेकानंदांना निरोप देण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ या. या अशा एकाकी, क्लेशदायक परिस्थितीत विवेकानंदांनी प्रसन्न मनाने, अजिबात विचलित न होता वाटचाल कशी केली?

आयुष्यात दोन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत- मानसिक सामर्थ्य आणि मानसिक आधार. मनाचं सामर्थ्य प्रयत्नपूर्वक मिळवता येतं आणि ‘आपण ते कसं मिळवलं’ हे विवेकानंदांनी सांगितलंय. विवेकानंद जर्मनीत होते. मॅक्सम्युलर आणि डायसन हे जर्मनीतले जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत! हे दोघंही विवेकानंदांचे मित्र बनले. ही गोष्ट आहे विवेकानंद आणि डायसन यांच्या पहिल्या भेटीची. डायसन यांनी सकाळी नऊ वाजता विवेकानंदांना नाश्त्यासाठी बोलावलं. नऊला पाच मिनिटं असताना विवेकानंद डायसन यांच्या घरी, दिवाणखान्यात पोहोचले. समोर तिपाईवर डायसन यांचं एक नवं पुस्तक होतं. ते वाचायला विवेकानंदांनी सुरुवात केली. त्यांना नाश्त्यासाठी घेऊन जायला डायसन नऊ वाजता दिवाणखान्यात आले. विवेकानंदांचं डायसन यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ते पुस्तक वाचत होते. डायसन यांनी पाच मिनिटं वाट पाहिली. त्यांना हा उद्धटपणा वाटला. त्यांनी एकदम चढ्या आवाजात विचारलं, ‘‘स्वामी, मला येऊन पाच मिनिटं झाली. तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. एवढे कसले वाचनात गुंतला होतात?’’ आता विवेकानंद भानावर आले. म्हणाले, ‘‘मित्रा, तुझं गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेलं नवं पुस्तक तिपाईवर होतं, ते वाचून काढलं. तुझे विचार नवे आणि महत्त्वाचे आहेत. मात्र माझ्या मनात दोन-तीन शंका आहेत. त्या विचारू का?’’

डायसन गोंधळले. म्हणाले, ‘भल्या माणसा, मी वर्षभर खपून लिहिलेलं पुस्तक तू दहा मिनिटांत वाचून संपवलंस?’

विवेकानंद शांतपणे म्हणाले, ‘‘होय. अगदी पूर्णपणे वाचलंय. लहान मूल एकेक अक्षर वाचतं. थोडं मोठं झाल्यावर सबंध शब्द एकदम वाचायला लागतं. नंतर आपण एकत्रितपणे एक वाक्य वाचतो. मात्र आपल्याला विषय माहीत असेल आणि आपण मन एकाग्र करू शकत असू, तर प्रथम काही दिवस सबंध परिच्छेद आपण एका नजरेत वाचू शकतो आणि नंतर तर एका नजरेत पुस्तक वाचून संपवतो!’’

अशीच एक दुसरी गोष्ट आहे. बेलूर मठात विवेकानंद भली मोठी वर्गणी भरून एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे अंक मागवत होते, हे आपण वर पाहिलंय. हे भले मोठे खंड दर महिन्याला येत होते. त्यांत आदल्या काही महिन्यांत प्रत्येक क्षेत्रात कोणत्या ज्ञानाची भर पडली, ते छोट्या अक्षरांत, संक्षिप्त स्वरूपात दिलेलं असे. एका शिष्याने विवेकानंदांना विचारलं, ‘‘हे खंड आपण का मागवतोय? हे एवढे खंड कुणीतरी वाचू शकेल का?’’ हा प्रश्न ऐकून विवेकानंदांनी सर्व शिष्यांना बोलावलं. ते त्यांना म्हणाले, ‘‘हा मूर्खर् शिष्य म्हणतोय, हे एवढे खंड कोण वाचणार? गेल्या आठवड्यात इथे आलेले हे तीन खंड आहेत. त्यांतल्या कोणत्याही खंडातलं कोणतंही पान उघडा आणि मला त्यावर प्रश्न विचारा. मी ते तीनही खंड वाचलेले आहेत आणि तुम्हाला एक सांगतो, यात जे ज्ञान आहे, ते तुम्हाला माहीत नसेल आणि नुसतीच घोकंपट्टी आणि पोपटपंची करत असाल, तर तुमच्यात आणि जनावरांच्यात किंवा पोपटात काहीही फरक नाही. पाठांतर करणं सोपं आहे. वाचणं आणि समजून घेणं कठीण वाटतं, मात्र तेपण सोपं आहे. मात्र त्यासाठी ‘वाचावं कसं’ याचा अभ्यास हवा. वाचताना मन पूर्णपणे एकाग्र हवं. मी वाचत असताना माझ्या मानेवर तुम्ही जळता निखारा ठेवलात, तरी ते मला कळणार नाही.’

विवेकानंदांनी शिष्यांना सांगितलेली दुसरी गोष्टपण तशीच महत्त्वाची आहे. विवेकानंद खूप आजारी होते. कलकत्त्यामधील प्रख्यात वैद्याने येऊन त्यांना तपासलं, औषध दिलं, मात्र एक भयंकर अट घातली - ‘‘दिवसभर पाणी प्यायचं नाही. रात्री झोपताना फक्त एक ग्लासभर पाणी प्यायचं कलकत्त्यात उन्हाळा सुरू होता; घशाला कोरड पाडणारा! शिष्य विवेकानंदांना म्हणाले, ‘स्वामी, हे असं दिवसभर पाणी न पिणं उन्हाळ्यात कसं काय शक्य आहे?’’

विवेकानंद म्हणाले, ‘‘एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या शरीरावर तुमचा ताबा हवा. तुमच्या मनाने शरीराला एकदा सांगितलं की, ‘असं वागायचं आहे’ तर त्याने निमूटपणे तसं वागलं पाहिजे. पुढचा आठवडाभर तहान म्हणून काही गोष्ट असते, हेही माझ्या शरीराच्या लक्षात येणार नाही!’’ तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर तुमच्या शरीरावर तुमच्या मनाचा पूर्ण ताबा पाहिजे.

एक अगदी शेवटची, पण अगदी महत्त्वाची गोष्ट! आयुष्यात यश कशासाठी आणि कुणासाठी मिळवायचं, ते माहीत पाहिजे. विवेकानंदांना या देशाचं नवनिर्माण करायचं होतं, हे अगदी खरं! मात्र आणखी एक गोष्ट आहे. विवेकानंदांना नीटपणे समजून घेतलं, तर ते तुमच्या लक्षात येईल. ‘आईसारखे दैवत दुसरे जगतामध्ये नाही’ हे लक्षात ठेवून विवेकानंदांनी आजन्म वाटचाल केली आहे. ‘आई’ हा विवेकानंदांचा भला मोठा मानसिक आधार आहे. ‘माझ्या आईला कमीपणा येईल, असं काहीही मी अगदी चुकूनही करणार नाही. माझ्या प्रत्येक कृतीचा माझ्या आईला आनंद होईल, तिला मोठेपणा मिळेल याची मी काळजी घेईन’. नीट पाहिलंत, तर विवेकानंदांच्या वाटचालीत ही लक्ष्मणरेषा आहे. मात्र विवेकानंद इथेच थांबत नाहीत. ‘आईने लहानपणी आपली जशी काळजी घेतली, तशी काळजी मोठं झाल्यावर आपण आईची घ्यायची आहे’ हे त्यांच्या कायम लक्षात आहे. सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी खेत्री नरेशांकडून त्यांनी आईसाठी घेतलेलं वचन आपणाला माहीत आहे.

मात्र मृत्यूपूर्वी दोन वर्षं विवेकानंद अमेरिकेत परत गेले होते. इंग्लंड आणि अमेरिका इथे त्यांनी स्थापन केलेल्या आणि बहरलेल्या वेदान्त नावाच्या संस्था पूर्णपणे बंद पडल्या होत्या किंवा पार मोडकळीला आल्या होत्या. ‘भाषणं देऊन सभागृहाचं भाडंसुद्धा निघत नाही. भाषणं देऊन, पैसे मिळवून भारतात परत जाण्याएवढे तिकिटाचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत’ ही वेदना त्यांच्याबरोबर होती. या जगातले पैशाचे व्यवहार न समजल्यामुळे, न जमल्यामुळे विवेकानंदांच्या आयुष्यातलं हे यातनापर्व होतं आणि त्या वेळी विवेकानंदांच्या मनात आपल्या आईची काळजी होती.

17 जानेवारी 1900 रोजी श्रीमती सारा ओली बूल यांना पत्र पाठवून त्यांनी आपल्या मनातली वेदना सांगितली आहे - ‘माझ्या मठाचं सर्व काम माझ्या मनातून किमान काही काळासाठी पूर्णपणे बाजूला करून मला माझ्या आईकडे परत जायचं आहे. माझ्यामुळे तिला पुष्कळ दु:ख सोसावं लागलं आहे. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत, म्हणून मला प्रयत्न केलेच पाहिजेत. आमच्या भारतातल्या थोर शंकराचार्यांनासुद्धा असंच करावं लागलं होतं, हे तुम्हाला माहीत आहे काय? त्यांनासुद्धा आपल्या मातेच्या अखेरच्या दिवसांत तिच्याकडे जाऊन राहावं लागलं होतं. मलाही तसंच करावं लागेल. सारं काम थांबवून आईकडे जाण्याचा निर्णय घेतल्यावर माझं मन आता एकदम शांत आहे. 1887मध्ये आईला सोडून जाणं हा फार मोठा त्याग होता आणि आता तिच्याकडे परत जाण्यात त्याहूनही मोठा त्याग आहे.’

अमेरिकेतून आईकडे परत जाण्यापूर्वी विवेकानंद इथेच थांबत नाहीत. खेत्री नरेशांनी बेलूर मठ उभा करण्यासाठी काहीही मदद केलेली नव्हती. ‘खेत्री नरेशांनी आईला दर महिन्याला पाठवीन म्हणून सांगितलेले पैसे देणं थांबवलं तर काय?’ हा प्रश्नही त्यांच्या मनात होता. 7 मार्च 1900 रोजी धीरमाता यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंदांनी लिहिलंय, ‘माझ्या आईबद्दल बोलायचं म्हणजे, माझ्या आणि तिच्याही अखेरच्या दिवसांसाठी मी तिच्याकडे परत जातो आहे. न्यू यॉर्कमध्ये माझे जे हजार डॉलर्स आहेत, त्यांचं दरमहा नऊ रुपये व्याज येईल. शिवाय तिच्यासाठी मी जी जमीन विकत घेतली आहे, तिच्यातून महिन्याला सहा रुपये मिळतील आणि तिच्या जुन्या घरांचे दरमहा सहा रुपये येतीलच. तूर्तास ज्या घरासंबंधी दावा चालू आहे, ते घर माझ्या ताब्यात नसल्यामुळे मी त्याचा विचार करत नाही. तेव्हा माझी आई, माझी आजी आणि माझा भाऊ असे तिघं जण महिना वीस रुपयांवर सहज गुजराण करू शकतील. माझं संपूर्ण आयुष्य माझ्या दुर्दैवी आईला निव्वळ यातना देणारं ठरलं आहे. तिचं स्वत:चं आयुष्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतत दु:खात गेलं आहे. अशा या परिस्थितीत तिला शक्य तेवढं सुख देण्याचा हा माझा प्रयत्न आहे.’

विवेकानंद जानेवारी 1901च्या सुमारास भारतात परत आले. आल्यावर 26 जानेवारी 1901 रोजी धीरमाता यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, ‘पुढच्या आठवड्यात मी माझ्या आईला यात्रेसाठी घेऊन जाणार आहे. सर्व तीर्थस्थळांची यात्रा पुरी करायला काही महिने लागतील. ‘सर्व तीर्थांची यात्रा करणं’ ही हिंदू विधवेची एक मोठी इच्छा असते. माझ्या घरातल्या मंडळींना मी जन्मभर नुसतं दु:खच दिलं आहे. ही तिची एक इच्छा तरी पुरी करण्याएवढा मी भाग्यवान आहे.’

म्हणजे विवेकानंदांना समजून घ्यायचं म्हणजे ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही’ हे कायम लक्षात ठेवायचं.

(12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवकदिन म्हणून साजरा केला जातो. ते औचित्य साधून हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. दत्तप्रसाद दाभोळकर यांचे ‘मुलांसाठी विवेकानंद’ हे पुस्तक येत्या 26 जानेवारीला साधना प्रकाशनाकडून येत आहे, त्यातील हे समारोपाचे प्रकरण आहे.)

Tags: राष्ट्रीय युवकदिन मुलांसाठी विवेकानंद दत्तप्रसाद दाभोलकर स्वामी विवेकानंद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके