डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

स्वामी विवेकानंद यांची खरी ओळख (उत्तरार्ध)

विवेकानंद हे पहिले असे दार्शनिक आहेत, ज्यांनी सांगितलं की, ‘आपल्या देशात ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे झालं नाही त्यापेक्षा जास्त धर्मांतर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झाले आहे. ते आपले अभागी भाऊ आहेत.’ विवेकानंदांची दोन महत्त्वाची पत्रे आहेत. पहिलं पत्रं आहे, 20 सप्टेंबर 1892 चं. म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधीचं. हे पत्रं त्यांनी पंडित हरिलाल शर्मा यांना लिहिलंय. दुसरं पत्रं सर्वधर्म परिषदेनंतर नोव्हेंबर 1894 मध्ये त्यांनी बिहारीलाल देसार्इंना लिहिलंय. त्यात ते म्हणतात, ‘या त्रावणकोर, कोचीन प्रांतात जिथे ब्राह्मणांचा अत्याचार सर्वाधिक आहे, सर्व संपत्ती ब्राह्मणांच्या हातात आहे आणि राजघराण्यातल्या स्त्रियासुद्धा ब्राह्मणांच्या उपपत्नी होण्यात धन्यता मानतात.

प्रश्न - आरक्षण, जातिव्यवस्था आणि हिंदू-मुस्लिम प्रश्नांबद्दल काही तपशील सांगा.

- कुंभकोणमला विवेकानंदांनी एक भाषण केलं होतं. हे ठिकाण मद्रासमधल्या सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला आहे. तिथे विवेकानंद भाषण द्यायला गेले होते. ते भाषणात म्हणतात, ‘‘ब्रह्मवृंदहो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्युघंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर सुखाने मेलो तर मरू, नाही तर आपण कुजून जाऊ. त्याचा समाजाला त्रास होईल. तो होऊ नये असं वाटत असेल, तर मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. आपण असं सांगितलं पाहिजे की, आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी नोकरी करणार नाही. ती आपण दलितांसाठी ठेवून मोकळे होऊ या. या लोकांना आरक्षण देऊन काही उपयोग नाही. आपण त्यांना पाच हजार वर्षे शिक्षणच दिलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला एक शिक्षक लागत असेल, तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्या सातपट अधिक शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल.’’ त्याच वर्षी विवेकानंदांनी राखालला पत्र लिहिलंय. त्यात ते म्हणतात, ‘काही लोक म्हणतात- निसर्गातच समता नाहीये, तर ती समता माणसात आणायचा प्रयत्न तुम्ही का करताय? आपण त्यांना सांगितलं पाहिजे- निसर्गात जर समता नसेल, तर ती आणण्यासाठी निसर्गाने आम्हाला जन्माला घातलंय.

माझ्या भाषणात मी एक चूक केली. मी म्हटलं की, आपल्याला सातपट चांगलं शिक्षण द्यावं लागेल. भारतात हिंडल्यावर माझ्या लक्षात आलं की, त्यांच्यासाठी दहापट चांगल्या शिक्षणाची सोय करावी लागेल.’ असं सांगणारे विवेकानंद ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद खेळत नाहीयेत. ते शिवधर्माच्याही जवळ जात नाहीत. विवेकानंद त्यांच्या ‘महापराक्रमी पूर्वस्थामिल’ या लेखात म्हणतात, ‘समाजाच्या सर्व स्तरांत नेतृत्व देऊन आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. ते ब्राह्मण आहेत म्हणून नव्हे, तर त्यांना पाच हजार वर्षे आधी शिक्षण मिळालं, हे याचं खरं कारण आहे. आपण ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण करीत नाही आहोत. आपल्याला जातिअंताची लढाई लढायची आहे.’ आपल्याला माहिती आहे, राजर्षी शाहूमहाराजांनीही त्यांच्या राजधानीत वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळी वसतिगृहे सुरू केली होती. या घटनेच्या आधीच विवेकानंद अखंडानंदांना सांगतात, ‘आपल्या मठात ब्राह्मणांच्या बरोबर भंग्यांची मुलंही राहतील. त्यांना एकत्र राहावं लागेल, त्यांना एकत्र जेवावं लागेल. त्यांच्या जेवणाच्या सवयी वेगळ्या आहेत. त्यांना वेगळं जेवण द्या. आणि या काही सामाजिक गोष्टी सुधारा.’ आपल्याला आयुष्यात फार काही जमलं नाही, हे कळल्यावर विवेकानंदांनी भगिनी निवेदितांना जे पत्र लिहिलंय त्यात ते म्हणतात, ‘मी आयुष्यात एक गोष्ट केलीय. कॉलऱ्याने आजारी पडलेल्या भंग्यांची सेवा करायला आज माझ्या आश्रमातून ब्राह्मण तरुण मी बाहेर पाठवू शकलोय.’ विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘काही जण म्हणतात, जातिव्यवस्था नाहीशी झाली तर समाजव्यवस्थाच नाहीशी होईल. विशेषाधिकार जपणारे ब्राह्मण सर्व धर्मांत आहेत. हे विशेषाधिकार आपण नाहीसे केले पाहिजेत.’ या प्रश्नांची अशी भेदक मांडणी विवेकानंद करतात. ब्रुकली इन स्टडी सर्कलमध्ये दिलेल्या भाषणात विवेकानंद म्हणतात, ‘‘या देशातील जातिव्यवस्था मोडायची असेल, तर या देशातली आर्थिक घडी तुम्हाला नाहीशी करावी लागेल.’’ हे भाषण ‘विवेकानंद ग्रंथावली’च्या नवव्या खंडात पृष्ठ 333 वर आहे.

प्रश्न - दाभोळकरसर, स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल आणि आरक्षण, जातिव्यवस्थेबद्दल आपण बोललात; आता हिंदू-मुसलमान या प्रश्नावर तपशीलवार सांगा.

- विवेकानंद हे पहिले असे दार्शनिक आहेत, ज्यांनी सांगितलं की, ‘आपल्या देशात ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे झालं नाही त्यापेक्षा जास्त धर्मांतर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झाले आहे. ते आपले अभागी भाऊ आहेत.’ विवेकानंदांची दोन महत्त्वाची पत्रे आहेत. पहिलं पत्रं आहे, 20 सप्टेंबर 1892 चं. म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधीचं. हे पत्रं त्यांनी पंडित हरिलाल शर्मा यांना लिहिलंय. दुसरं पत्रं सर्वधर्म परिषदेनंतर नोव्हेंबर 1894 मध्ये त्यांनी बिहारीलाल देसार्इंना लिहिलंय. त्यात ते म्हणतात, ‘या त्रावणकोर, कोचीन प्रांतात जिथे ब्राह्मणांचा अत्याचार सर्वाधिक आहे, सर्व संपत्ती ब्राह्मणांच्या हातात आहे आणि राजघराण्यातल्या स्त्रियासुद्धा ब्राह्मणांच्या उपपत्नी होण्यात धन्यता मानतात. त्या त्रावणकोर-कोचीनमध्ये चाळीस टक्के माणसं ख्रिश्चन झाली, तर आपण कोणाला दोष देणार आहोत?’ दुसऱ्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ‘माझ्या बंगालमध्ये एवढे हिंदू मुसलमान का झाले? तलवारीच्या जोरावर ते मुसलमान झाले, असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. ते मुसलमान झाले, हिंदू जमीनदार आणि हिंदू ब्राह्मणांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, स्वायत्ततेसाठी.’ खरं पाहता, हे रामदासांनाही समजलंय. रामदास ‘दासबोधा’त म्हणतात, ‘कित्येक दावलमालकास जाती, कित्येक पिरासच पुजती, कित्येक तुरूक होती आपुल्या इच्छेने’. आपल्या इच्छेने माणसं तुरूक होताहेत, याचीही विवेकानंदांना जाणीव आहे, रामदासांनाही आहे.

विवेकानंदांनी 30 मार्च 1894 ला केरळचा धर्मगुरू रेव्हरंड आर. युंगला पत्र पाठवलंय. त्यात ते म्हणतात, ‘तू माझ्या हिंदूंना केरळमध्ये कॅथॉलिक केलंस याचं मला दुःख नाहीये आणि तुलाही सुख नाहीये. कारण तू त्यांना कॅथॉलिक केलं नाहीस, तर तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलंयस. धर्म बदलूनही या देशातली जात जात नाही. हे या देशासमोरचं सर्वांत प्रमुख असं कारण आहे.’ विवेकानंदांनी 10 जून 1898 ला सर्फराज मुहम्मद हुसेनला पत्र लिहिलंय. विवेकानंद त्या पत्रात म्हणतात, ‘आमच्या वेदांतले सिद्धांत कितीही सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणलाय तो इस्लामनेच. व्यवहारातली समता आम्ही इस्लामकडून शिकतोय. हे आदान-प्रदान आहे.’

 विवेकानंदांनी अमेरिकेत बोस्टन इथं ट्वेन्टीएथ सेंचुरी हॉलमध्ये जे भाषण दिलं, त्या भाषणात विवेकानंद सांगतात, ‘‘भारतातल्या इस्लामवर वेदांतातल्या उदारमतवाद्यांचा परिणाम झालेला आहे. तो सहिष्णू आहे. या देशातल्या आणि बाहेरच्या देशातल्या धार्मिक सत्तेने जर आम्हाला डिवचलं नाही, तर या देशात हिंदू-मुसलमान सुखाने राहतील. हे करताना दोन अडचणी आहेत. आपल्या मनावर असं एक बिंबवलं गेलंय की, मुसलमान राजवट वाईट होती.’’ विवेकानंदांनी ‘भारताचा ऐतिहासिक क्रमविचार’ हा निबंध लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, ‘मोगलांच्या दरबारात जे भौतिक वैभव होते, त्याचा अंशमात्रसुद्धा पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात नव्हता. हे आपण मान्य केलं पाहिजे.’ ‘भारताचा भावी काळ’ या निबंधात विवेकानंद सांगतात, ‘कोणतीही राजवट पूर्णपणे वाईट किंवा पूर्णतः चांगली नसते. मुसलमान राजवटीचे योगदान हे आहे की, त्यांच्या राजवटीत गरिबांची व दलितांची स्थिती सुधारली आणि इतरांचे विशेषाधिकार संपले.’

समर्थ रामदास म्हणतात, ‘राज्य गेले म्लेंच्छक्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही!’ विवेकानंद हिंदू-मुसलमान प्रश्नाची मांडणी अतिशय भेदकपणे करतात. ज्या वेळी विवेकानंदांचा मठ आर्थिक अडचणीत होता, त्या वेळी जी आर्थिक मदत त्यांना अटीवर आली होती. ती अट होती, यातलं काहीही मुसलमानांना द्यायचं नाही. विवेकानंदांनी ती मदत नाकारली. विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या अंगात ताप होता. त्याच वेळी अंबालामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली. विवेकानंद तिथे गेले. ती दंगल त्यांनी थांबवली. तिथल्या हिंदू-मुसलमानांसाठी असलेल्या शाळेला त्यांनी भेट दिली. तुम्ही भगिनी निवेदिता यांची पुस्तकं वाचा. त्यांच्या ‘आम्हाला कळलेले आमचे गुरू’ या पुस्तकात भगिनी निवेदिता म्हणतात- हा माणूस इस्लामी राजवटीचा एवढं कौतुक करायचा आणि एकदा हा म्हणाला, आपण जर शहाजहानला म्हटलं की, तू परदेशी आहेस, तर त्याच्या भूमीत थरकाप उडेल आणि ती भूमी फुटेल. हे लोक आपलेच आहेत.

प्रश्न - सर, हे जे लोकोत्तर पुरुष असतात, ते आपल्या कृतीमध्ये, नियोजनामध्ये काही स्ट्रॅटेजी आखतात. जसे- महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं लेखन आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं. प्रश्न असा आहे, विवेकानंदांची स्ट्रॅटेजी नेमकी काय होती?

- तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विवेकानंदांनी 19 नोव्हेंबर 1894 ला जे अळसिंगा पेरुमलला पत्र लिहिलंय त्यात ते म्हणतात, ‘बुद्धदेवापासून राजा राममोहन रॉयपर्यंत सर्व समाजसुधारकांचे आणि धर्मसुधारकांचे प्रयत्न फसले, कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. कारण विज्ञान कितीही श्रेष्ठ असले, कितीही बरोबर असले, तरी विज्ञान माणसाचं शाश्वत अस्तित्व नाकारतं. विज्ञान एवढंच सांगतं की, जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीतून बनलेलं एक रसायन होतास, आणि मृत्यूनंतर तू माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस.’ हे खरं की खोटं, हा मुद्दा वेगळा ठेवा. पण तो 99 टक्के माणसं हे स्वीकारू शकत नाहीत. माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात, म्हणून ते माणसाला हवे असतात. म्हणूनच तुम्हाला धर्माचा आधार घेऊन त्यातल्या अपप्रवृत्तींशी लढावं लागेल. विवेकानंदांच्या आधी तुकाराम या गोष्टी सांगतात. तुकारामांना माहिती आहे की, वेदांमध्ये अनेक वाईट गोष्टी आहेत. पण तुकाराम वेदांचं कौतुक करतात. म्हणजे तुकाराम सांगतात, ‘वेदाची जो निंदा करी, मातेची तो थाने फाडी’ आणि हे झाल्यावर समोरच्या ब्रह्मवृंदांना सांगतात,

 ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा’।

आपल्याला राजर्षी शाहूमहाराजांचं 1899 च्या चातुर्मासात झालेलं वेदोक्त प्रकरण माहितीच आहे. त्याच्या दहा वर्षे आधी 7 ऑगस्ट 1889 ला विवेकानंद सव्वीस वर्षांचे होते, त्या वेळी वराहनगरच्या विदिशानंदांएवढीच विवेकानंदांची ओळख होती. हे विदिशानंद पूज्यपादांना पत्रं लिहून सांगतात, ‘माझ्या वेदांनी स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कुठंच म्हटलेलं नाहीये. नंतर शंकराने आणि व्यासाने केलेली ती खेळी आहे.’ भटका संन्यासी म्हणून विवेकानंद जेव्हा फिरत आहेत, तेव्हा अधिक कठीण किंवा वाईट भाषा वापरतात.

सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधी 22 ऑगस्ट 1892 ला विवेकानंद पत्रात जी भाषा वापरतात ती भाषा जोतिबा फुले, शाहूमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणीच वापरलेली नाहीये. त्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ‘ज्यांच्या चारशे स्त्रियांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेले नाही, ते पुरोहित देशाला वेद शिकवत आहेत. देवा, ब्राह्मणांच्या रूपाने आज माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांपासून माझ्या देशाचं रक्षण कर.’ विवेकानंदांची ही स्ट्रॅटेजी कशी आहे, ती नीट समजून घ्यायला हवी. विवेकानंदांनी 1890 ला जेव्हा कलकत्ता सोडलं त्यानंतर सहा वर्षांनी त्यांचे भाऊ महेंद्रनाथ त्यांना अमेरिकेत भेटले. सकाळचं भाषण संपवून विवेकानंद खुर्चीत आराम करत बसले होते आणि समोर महेंद्रनाथ बसले होते. महेंद्रनाथ आपल्या ‘स्वामी विवेकानंद’ या पुस्तकात लिहितात, ‘माझा भाऊ दमला होता. त्याची डुलकी लागली होती. त्याने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून म्हणाला- भाऊ, मला ओळखलं का? मी सेंट कॉलप्रमाणे धर्माचं वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा भयावह रोग नाही.’

दि.10 जून 1898 च्या पत्रात विवेकानंदांनी म्हटलंय, ‘मला काय करायचंय; तर जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचंय. पण हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल.’ अमेरिकेत भाषण देत असताना त्यांनी एकदा सांगितलं, ‘‘या देशात तुम्हाला राजकारणावर बोलायचं असेल तरीसुद्धा धर्माचा आधार घेऊनच बोलावं लागेल. या देशात कोणतीही सामाजिक क्रांती तुम्हाला धर्माचा आधार घेऊन करावी लागेल.’’ म्हणूनच जोतिराव फुले आपल्याला सार्वजनिक सत्यधर्म देतात, धर्म नाकारायला सांगत नाहीत.

प्रश्न - साधारणतः लोकोत्तर पुरुष स्वतःचं मूल्यमापन करतात. त्यांची इझमच्या संदर्भात अनुयायांमार्फत मांडणी केली जाते. तुम्ही म्हणालात की, स्वामी विवेकानंद हे समाजवादी होते. म्हणजे काय नेमकं?

- ‘मी समाजवादी आहे’ असं स्वामी विवेकानंदांनीच म्हटलंय. विवेकानंद समाजवादी असले किंवा नसले तरी ते धर्माबद्दल, समाजवादाबद्दल आणि राज्यव्यवस्थेबद्दल 19 नोव्हेंबर 1894 च्या पत्रात प्रथम बोलले आहेत. ते म्हणतात, ‘हे लोक (काँग्रेसचे) म्हणतात, आम्हाला स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्य असं मागून मिळेल का?  समजा- इंग्रजांनी आपल्याला आपलं राज्य दिलं आणि ते निघून गेले, तर काय होईल? ज्यांच्या हातात राज्य येईल, ते इतरांना गुलामासारखे वापरतील. या देशात हजारो वर्षे हेच होत आलंय. गुलामांना राज्य हवं असतं इतरांना गुलाम करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत पुन्हा स्वतः गुलाम होण्यासाठी. आपण नवी रचना शोधतोय. या रचनेत समाजवाद येतो का?’ विवेकानंदांनी अमेरिकेतून 23 जून 1894 ला म्हैसूरच्या महाराजांना पत्रं पाठवलंय. त्यात ते म्हणतात, ‘अमेरिकन लोक आमच्या जातिव्यवस्थेला हसतात, पण जातिव्यवस्थेपेक्षाही वाईट अर्थगत जातिव्यवस्था अमेरिकेत आहे. आणि अशी अर्थगत जातिव्यवस्था मानणारा माणूस समाजवादी असू शकतो.’

विवेकानंदांनी  1895 मध्ये शशीला दोन पत्रं पाठवली होती. एका पत्रात त्यांनी लिहिलंय, ‘रामकृष्ण परमहंस यांनी आपल्याला सांगितलंय की- ते जेव्हा जन्माला आले तेव्हा स्त्री-पुरुष, चांडाळ-ब्राह्मण, हिंदू-मुसलमान, ख्रिश्चन, गरीब-श्रीमंत हे भेद संपले आहेत.’ आणि दुसऱ्या पत्रात म्हणतात, ‘मी गौतम बुद्धांना सर्वाधिक मानतो. कारण गौतम बुद्ध हा एकमेव दार्शनिक आहे, ज्याने प्रथम सांगितलं की, या देशाच्या अवनतीचं कारण जातिव्यवस्था हे आहे.’ विवेकानंद पुढे म्हणतात, ‘जातिव्यवस्था  म्हणजे केवळ जन्मगत जातिव्यवस्था नव्हे, तर ज्ञानगत, कर्मगत आणि अर्थगत या साऱ्या जातिव्यवस्था वाईट आहेत. या जातिव्यवस्था वाईट आहेत, असं म्हणणारा माणूस समाजवादी असू शकतो.’

विवेकानंदांनी 1 नोव्हेंबर 1896 ला स्पष्टपणे म्हटलंय, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. समाजवादी ही परिपूर्ण रचना आहे, असं मी मानत नाही. पण आतापर्यंत मानवी समाजाने ज्या रचना स्वीकारल्या, त्यात समाजवादी ही रचना सर्वाधिक चांगली आहे. आणि म्हणून आपण ती स्वीकारून त्यातले दोष दूर केले पाहिजेत.’ पण माणूस समाजवादी आहे म्हणून तो समाजवादी होऊ शकत नाही. मार्क्सने एक सांगितलंय की- कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात, कोणत्याही चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते. तुम्ही जर धर्मचिकित्सा केली तर भ्याड लोक तुम्हाला पाठीमागून गोळी घालून मारून टाकतात. किंवा श्रीराम लागूंसारखा एखादा ज्येष्ठ माणूस म्हणाला की, ‘देवाला रिटायर्ड करा.’ तर लागूंनाच रिटायर्ड व्हायची वेळ येते. असा आपला समाज आहे. श्रीराम लागूंनी देवाला रिटायर्ड करा म्हणायच्या शंभर वर्षे आधी म्हणजे 27 एप्रिल 1896 ला विवेकानंद आलामबजार मठातल्या आपल्या शिष्यांना पत्रं पाठवतात आणि त्यांना सांगतात, ‘आपले देव आता जुने झालेत. आपल्याला नवा देव, नवा धर्म आणि नवा वेद हवाय. कारण आपल्याला नवा देश घडवायचा आहे.’ त्यानंतर 9 सप्टेंबर 1895 ला विवेकानंदांनी त्यांचा लाडका शिष्य अळसिंगा पेरुमलला पत्रं पाठवलंय. त्यात ते म्हणतात, ‘समाजवादी माणूस देशात काम करीत असला, तरी तो साऱ्या जगाचा माणूस असतो. जात्यंध धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक, भेकड हिंदूंपैकी एक बनून जगावं आणि मरावं म्हणून मी जन्माला आलेलो नाही.  हा हिंदू धर्म जर तुम्ही बदलणार असाल, तर मी हिंदू आहे.’ जात्यंध धर्मभोळा, निर्दय, दांभिक, नास्तिक आणि भेकड हे पाचही शब्द विवेकानंदांच्या 9 सप्टेंबर 1895 च्या पत्रातले आहेत. अशी समाजवादाची विस्तृत मांडणी विवेकानंद करतात.

अमेरिकेतून परत आल्यानंतर विवेकानंदांनी अनेक ठिकाणी भाषणं दिली. त्यांचा काही गोषवारा ‘विवेकानंद ग्रंथावली’च्या सातव्या खंडात पृ. 29 वर येतो. विवेकानंद त्यात म्हणतात, ‘सर्व समाजवादी रचनांना आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागेल. कारण अध्यात्म ही मानवी मनाची एक गरज आहे.’ 

प्रश्न - विवेकानंदांना नेमकं काय करायचं होतं आणि कसं करायचं होतं? त्यांना जे काही करायचं होतं, ते त्यांना किती जमलं?

- विवेकानंदांना काय करायचंय, ते विवेकानंदांनी स्पष्टपणे लिहिलंय. सर्वधर्म परिषदेनंतर चारच महिन्यांनी त्यांनी त्यांच्या हरिपद मित्राला पत्र लिहिलंय 30 डिसेंबर 1893 ला. त्यात ते म्हणतात, ‘मी या देशात धर्म सांगायला, नाव मिळवायला किंवा कुतूहल म्हणून आलेलो नाही; तर माझ्या मनात माझ्या देशाबद्दल ज्या रचना आहेत, त्या रचनेसाठी मला मदत करणारे काही लोक किंवा काही रचना मला मिळतील का, हे मी शोधतो आहे.’ त्यांच्या मनातील या रचना कोणत्या आहेत, ते विवेकानंदांनी आपल्या चार पत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितलंय.

पहिलं पत्र 18 मार्च 1894 ला त्यांनी शशीला लिहिलं आहे. दुसरं पत्र 28 मे 1894 ला अळसिंगा पेरुमलला लिहिलेलं आहे. तिसरं पत्रं 20 जून 1894 ला हरिदास बिहारीलाल देसाई म्हणजे दिवाणजींना लिहिलं आहे. आणि चौथं पत्र 24 जून 1894 ला म्हैसूरच्या महाराजांना लिहिलंय. विवेकानंद म्हणतात, ‘आम्ही एवढे संन्यासी आहोत आणि भारतभर धर्म सांगत हिंडत असतो. माणसाला कधी भुकेल्या पोटी  तुम्ही धर्म सांगू शकता का? या देशातली एकचतुर्थांश माणसं भुकेनं तडफडून मरत आहेत. आपली खेडी गरीब आहेत, दरिद्री आहेत. पण सबंध जगातली संपत्ती लुटून आपण एखाद्या खेड्यात ओतली, तरी एक वर्षाने ते खेडं गरीब झालेलं दिसेल. आपल्याला सुरुवात खेड्यांपासून करावी लागेल. आपल्याला खेडी पुन्हा उभी करावी लागतील.’ विवेकानंद म्हैसूरच्या राजाला सांगतात, ‘मी सांगतो म्हणून तू शाळा काढशील. खेत्रीच्या महाराजांनी शाळा काढली. त्या शाळेत सर्व धर्माची मुलं येतील. सर्व जातीची मुलं येतील, पण खेड्या-पाड्यांतील मुलं शाळेत येतील का? शेतकऱ्यांना शेतात जायचंय आणि त्याच्या मुलांना गुरं राखायची आहेत. त्यांच्या बायका घरात राबताहेत. माझ्यासमोर एक रचना आहे. मला प्रत्येक खेड्यात दोन संन्यासी ठेवायचे आहेत. या देशात एक गोष्ट चांगली आहे. माणसाच्या अंगावर जेव्हा भगवं वस्त्रं असतं त्या वेळी माणसं उपाशी राहतात, पण तुम्हाला अन्न देतात. त्या माणसाजवळ वेद, पुराण आणि बायबल असेल. ती माणसं संध्याकाळी गावच्या पारावर बसतील. गावात येणाऱ्या लोकांना धर्म समजावून देतील. पण त्या माझ्या संन्याशांजवळ पृथ्वीचा गोल असेल. ते संपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून समजावून देतील. त्यांच्याजवळ लोहचुंबक असेल. त्यांच्याजवळ विज्ञानातले प्रयोग व रासायनिक क्रिया असतील आणि त्यांच्याजवळ प्रकाशचित्रं असतील. असं करून आपण हा देश इथे उभा केला, तर खेड्यापाड्यांतील माणसं सक्षम बनतील. त्याचबरोबर निसर्ग आणि विज्ञान वाचायला शिकतील.’ असा देश आपण उभा करू शकू. या कामासाठी दहा हजार संन्यासी मला भारतात मिळतील. पण भारतात श्रीमंत एक दमडीही देणार नाही. मी अमेरिकेत भाषणे देऊन पैसे मिळवीन आणि ते काम करीन.’ ही विवेकानंदांच्या मनातील रचना आहे. पण अमेरिकेतील भाषणे हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे.

विवेकानंदांना किती फसवलं गेलं, त्यांना किती कमी पैसे मिळाले- ते विवेकानंदांनी लिहिलेल्या त्यांच्या अतिशय क्लेशदायक पत्रामध्ये आहे. हे पत्र त्यांनी मृत्यूपूर्वी दोन वर्षे आधी लिहिलेलं आहे. दि.17 जून 1900 मधील हे पत्रं आहे. ते लिहितात की, ‘आज भाषण माझ्या उपजीविकेचं साधन उरलं आहे.’ आणि विवेकानंद ज्या देशात काम करताहेत तो देश कसा आहे? विवेकानंदांनी 23 ऑगस्ट 1896 ला अमेरिकेतून शशीला पत्रं लिहून सांगितलंय की, ‘दक्षिणेश्वराच्या मंदिराचे दरवाजे वेश्यांसाठी उघडे करा.’ विवेकानंद भारतात हिंडले. विवेकानंदांना सनातन संस्कृती काय आहे, हे कळालेलं नाही. विवेकानंद भारतात आले. दि.27 फेब्रुवारी 1898 ला ते दक्षिणेश्वराच्या मंदिरात चालले होते. कारण त्या दिवशी रामकृष्णांचा जन्मोत्सव होतोय आणि तो साजरा करायला त्यांच्याबरोबर भगिनी निवेदिता ख्रिस्तिन आणि इतर स्त्रिया आहेत. मंदिरातले पुजारी त्यांना सांगतात, ‘स्वामी, बाहेरचा रस्ता धरा. या मंदिरात परकीय स्त्रियांना प्रवेश नाही.’ विवेकानंदांना इतरत्र जावं लागलं.

विवेकानंद या देशात आले त्या वेळी काय झालं, ते विवेकानंदांनी सांगितलंय ते 14 सप्टेंबर 1889 च्या पत्रात. स्टर्डीला पत्र पाठवून कळवलंय. त्यात त्यांनी सांगितलंय, ‘या देशात आल्यावर माझ्या केसांचं तुम्हाला  फार कौतुक वाटायचं. त्यांचं मला मुंडण करायला लावलंय. मला कफनी घालावी लागते. त्यामुळे मला मानसिक आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागला आहे. माझा मधुमेह आणि इतर आजार वाढलेले आहेत.’ विवेकानंदांनी जेव्हा बेलूरमठ स्थापन केला, त्या वेळी निम्म्याहून अधिक पैसा रिटा मुल्लर या त्यांच्या शिष्येने दिला. हा मठ विवेकानंदांच्या मनाप्रमाणे काम करणार नाही, असं लक्षात आल्यावर त्या स्वदेशी निघून गेल्या. विवेकानंदांची रचना काय होती? या मठाचा सभासद व्हायला तुमचं लिंग, जात, धर्म, पंथ आणि राष्ट्रीयत्व आड येणार नाही.

प्रश्न - दाभोळकर सर, धनुर्धारी राम प्रस्थापित करणं हा सनातनी धर्मासमोर पर्याय राहिला, कारण गांधींनी आदर्श रामाची प्रतिमा सुराज्याच्या संदर्भात मांडली. मग विवेकानंद तर इतके तर्कशुद्ध विज्ञानवादी आहेत, तरीही सनातनी किंवा हिंदुत्ववाद्यांनी विवेकानंदांची प्रतिमा कशी काय पळवली किंवा त्यांना हायजॅक कसं केलं?

- या प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे. जर तुमचा बाप कोणी पळवून नेला आणि तो माझा बाप आहे असं म्हटलं, तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की- नाही, तो माझा बाप आहे. हा माणूस भगवा वेश घालत होता. त्यामुळे हा माणूस साधू आहे, संन्यासी आहे. याचं आमच्याशी काही देणं-घेणं नाही. त्याला तर 39 वर्षांचंच आयुष्य मिळालंय. त्याची अथक एकाकी धडपड आहे. म्हणून त्याने जे म्हटलंय की, ‘आयुष्यात मला खूप कमी यश मिळालंय. लोक माझ्या भवताली नव्हते. शरीर साथ देत नव्हतं. मी एक चूक केली- एकच माणूस एकाच आयुष्यात दार्शनिक म्हणजे तत्त्वज्ञ, संघटक, कार्यकर्ता, नेता आणि अशा अनेक गोष्टी करू शकत नाही. मी फक्त दार्शनिक होतो. मी हिमालयात राहून ही मांडणी करायला हवी होती. माझी हाडंसुद्धा चमत्कार करून दाखवतील.’ हाडं म्हणजे माणसाचे विचार. ते विचार जरा आपण समजावून घेतले पाहिजेत. आपल्यासमोरच्या आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची भेदक मांडणी करीत हा दार्शनिक उभा आहे.

जाधव - मित्रहो, जवळजवळ दीड तास आपण दाभोळकरसरांचं विवेचन ऐकत आहोत. स्वामी विवेकानंद यांच्या कार्याशी आणि विचारांशी संबंधित अलक्षित आणि दुर्मिळ माहिती त्यांनी आपल्यासमोर ठेवली आहे. स्वामी विवेकानंद अधिक समजून घेण्यासाठी आपल्या मनात जिज्ञासा निर्माण झालेली असणार. त्या जिज्ञासापूर्तीसाठी आपण विवेकानंदांची भाषणे, त्यांचा पत्रव्यवहार आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके वाचली, तर विवेकानंदांची अधिक विस्ताराने खरी ओळख आपल्याला होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी या कार्यक्रमासाठी आवर्जून आले. पूर्ण वेळ बसून त्यांनी विवेचन ऐकले आणि आपले मनोगतही व्यक्त केले. त्यांचे आभार मानतो. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी आपल्यासाठी बहुमोल वेळ काढला. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद!

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केलेल्या कै. ग. स. राजाध्यक्ष व्याख्यानमालेत मराठी भाषादिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद यांची खरी ओळख’ या विषयावर डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांची डॉ.मनोहर जाधव यांनी घेतलेली मुलाखत... ४ जुलै या विवेकानंदांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत.- संपादक)

मुलाखत : मनोहर जाधव, पुणे

Tags: स्वामी विवेकानंद मनोहर जाधव मुलाखत दत्तप्रसाद दाभोळकर swami vivekanand manohar jadhav interview dattprasad dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात