डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विवेकानंदांचा जन्म 1863 चा आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 चा आहे. गांधीजींचा जन्म 1869 चा आहे. विवेकानंद टिळकांहून सात वर्षांनी लहान आणि गांधींपेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत. तेरा वर्षांच्या कालखंडात तीन महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवले आहेत. आणखी एक गोष्ट आहे. या तिघांचाही जन्म 1857 च्या देदीप्यमान अपयशाच्या पार्श्वभूमीवर झालाय. 1857 हे अपयश तर आहेच, पण ते देदीप्यमान आहे. हा देश सहजपणे काय करतो आणि करताना सहजपणे कसा फसतो, हे 1857 अधोरेखित करतं. या तिघांच्याही  जागृत किंवा सुप्त मनावर 1857 चे ओरखडे उठलेले असणार. या तिघांनाही माहीत आहे, पूर्वीचे सारे मार्ग कायमचे संपलेले आहेत.

प्रश्न - स्वामी विवेकानंदांबद्दल फार वेगवेगळी माहिती आपल्यासमोर येत असते. पण दत्तप्रसाद दाभोळकरांनी अगदी तपशीलवार अभ्यास करून विवेकानंदांवर ‘शोध : स्वामी विवेकानंदांचा’ हे पुस्तक लिहिलं आहे. माझा पहिला प्रश्न आहे- स्वामी विवेकानंद या विषयाकडे तुम्ही कसे काय वळलात?

- नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि शंभर ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम यांची मी शोधयात्रा केली होती. तिथं मी काही काळ राहिलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला होता. भोवतालच्या खेड्या-पाड्यांत जाऊन ग्रामस्थांची मतं समजावून घेतली होती. त्यानंतर नानाजी देशमुख आणि प्रेमभाई यांच्याबरोबर विस्तृतपणे चर्चाही केली होती. यावर आधारित माझं ‘प्रकाशवाटा’ हे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तकही आहे. या पुस्तकाला त्या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये; महत्त्वाचा मुद्दा आहे हा की, या पुस्तकात मी गोंडा प्रकल्प आणि गोविंदपूर आश्रमावर टीका केली होती. तरीही ती टीका विधायक आहे, असं समजून नानाजी देशमुख आणि प्रेमभाई हे माझे जवळचे मित्र राहिले. नानाजी आणि प्रेमभाई यांच्याबरोबर जेव्हा मी एकत्रित बैठक घेतली होती. तेव्हा नानाजी आणि प्रेमभार्इंच्या उंचीची माणसं म्हणाली, ‘‘दाभोळकर, इथं आम्ही समाजाचे प्रश्न सोडवायला आलो. इथं आल्यावर आम्हाला समजलं की, आपल्याला समाजाचे खरे प्रश्नच माहिती नाहीत. आपल्याला काही वेळेला वाटतं, जातीयता हा प्रश्न आहे. काही वेळेला वाटतं, धार्मिक प्रश्न आहेत. कधी वाटतं, अज्ञान हा प्रश्न आहे. कधी वाटतं, दारिद्र्य हा प्रश्न आहे. तर कधी वाटतं अंधश्रद्धा हा खरा प्रश्न आहे. त्याहीपेक्षा वेगळा असा या देशाचा काही तरी मूलभूत प्रश्न असेल आणि अजून तो आम्हाला समजलेला नाही. पण इथं राहून काही काळ काम केल्यावर तो आम्हाला समजेल.

आमची पुढची पिढी त्याची नीट मांडणी करेल आणि त्याची उत्तरे शोधेल. मग चौथ्या-पाचव्या पिढीत आम्ही ती कार्यान्वित करू.’’ नानाजी आणि प्रेमभार्इंच्या उंचीची माणसं ही जमिनीशी जोडली गेली होती. ते जे सांगत होते, ते अस्वस्थ करणारं होतं. या अस्वस्थ मनःस्थितीत मी विवेकानंद वाचत असताना माझ्या हातात विवेकानंदांचं एक पत्र आलं. दि.20 ऑगस्ट 1893 चं हे पत्र होतं. त्या वेळी विवेकानंद अमेरिकेत होते. ‘सर्वधर्म परिषदे’साठी ते गेलेले होते. त्यांना या परिषदेचं आमंत्रण नसल्याने सर्वत्र त्यांची खिल्ली उडवली जात होती. आपण हे आमंत्रण मिळवूच, असा त्यांना विश्वास होता. त्यापूर्वी विवेकानंद अळसिंगा पेरुमल या त्यांच्या शिष्याला पत्रात लिहितात, ‘मी ठामपणे सांगतोय, माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे.’ तीस वर्षांचा एक माणूस असं कसं काय सांगतो, हे पाहायला गेलो तेव्हा लक्षात आलं की, विवेकानंदांनी वयाच्या 27 व्या वर्षी जून 1890 ला वराहनगर येथील मठ सोडला. दि.31 मे 1893 ला ते अमेरिकेत जाण्यासाठी बोटीवर चढले. पण या तीन वर्षांत त्यांनी भारत देश उभा-आडवा पिंजून काढला. ते त्या वेळी भंग्यांबरोबर राहिले. राजांबरोबर राहिले. त्यांनी अस्वस्थ होऊन पत्रे लिहिली. या पत्रांमध्ये विवेकानंद वयाच्या तिसाव्या वर्षी जे सांगत होते, ते नानाजी आणि प्रेमभार्इंना वयाच्या 65 व्या वर्षी जमत नव्हते. म्हणून मला वाटलं की, स्वामी विवेकानंद समजून घेतले पाहिजेत. म्हणून मी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे वळलो.

प्रश्न - दाभोळकर सर, तुम्ही आम्हाला विषय दिलाय- ‘स्वामी विवेकानंद यांची खरी ओळख’. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचलेली नाही?

- विवेकानंदांची आजवर करून देण्यात आलेली मांडणी ही अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे, असं म्हणणारा एक वर्ग आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत असलेले समाजवादी होते. विश्वनाथबाबू आणि भुवनेश्वरीदेवींना एकूण दहा मुले झाली. विवेकानंद सहाव्या क्रमांकाचे. भूपेंद्रनाथ दहाव्या क्रमांकाचे. त्या दोघांमध्ये सतरा वर्षांचे अंतर आहे. विवेकानंद फक्त 39 वर्षे जगले. भूपेंद्रनाथ 81 वर्षे जगले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगी अरविंदांच्या भावाबरोबर भाग घेतला होता, म्हणून त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. त्यातून सुटल्यावर भगिनी निवेदिताच्या मदतीने अमेरिकेत जाऊन त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. बंगालीतले ते एक नावाजलेले लेखकही होते. विवेकानंदांनी एका पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे, ‘मी साधू नाही, मी संतही नाही. मी गरीब आहे. मला गरिबांबद्दल प्रेम वाटतं. आणि दारिद्र्य, अज्ञान, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या गाळात रुतून बसलेल्या वीस कोटी भारतीय स्त्री-परुषांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतोय.’ हे काम फार कठीण आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांनी 20 जून 1894 ला हरिदास बिहारीलाल देसार्इंना जे पत्र पाठवले आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘माझे भाऊ गरीब आहेत. ते खेड्यात, झोपडपट्टीत राहतात. हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन या तीनही राजवटींत ते भरडले गेलेत. चिरडले गेलेत. आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. ते माणूस आहेत याची त्यांना आठवण करून देऊन आपल्याला सुरुवात करावी लागेल.’ त्यानंतर विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ‘या देशात अशोक, अकबर आणि शिवाजी सोडून रयतेचं राज्य कोणी दिलंच नाही.’ हे सांगणाऱ्या विवेकानंदांनी हिंदू धर्मावर घणाघाती टीका केली आहे. ‘हा धर्म आहे की सैतानाचं तांडव आहे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केलाय. पण हा गौरव करीत असतानाच त्यांनी सांगितलंय, ‘माणसाला जो माणूस बनवतो, तो धर्म. त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतात. आणि एक धर्म नाकारला, तर सर्व धर्म नाकारावे लागतील. आणि त्याच वेळी कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसं आपल्याभोवती आहेत, हेही तुम्हाला समजून घ्यावे लागेल.’ हे सांगणाऱ्या विवेकानंदांनी 1 नोव्हेंबर 1896 च्या पत्रात मेरी हेलला लिहिलेय, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे.’ भूपेंद्रनाथांनी विवेकानंदांवर एक पुस्तक लिहिलंय आणि त्यात माझा भाऊ समाजवादी आहे, असं ठामपणे म्हटलं आहे.

भुपेंद्रनाथ ‘युगांतर’ मासिकाचे संपादक होते. विवेकानंदांची मांडणी करताना ते जे सांगत होते; तेच सांगतो आहे का, की, किंवा आमची विचारधारा जे सांगते तेच विवेकानंद सांगताहेत का, हे आपण तपासले पाहिजे. विवेकानंद जे सांगताहेत तेच आम्ही सांगतोय आणि आम्हाला जे करायचं होतं तेच विवेकानंदांनाही करायचं होतं, असंही आज एखादा परिवार म्हणतो का- हेही बघितलं पाहिजे. या दोघांपैकी बरोबर कोण? चूक कोण? की दोघेही बरोबर आहेत वा दोघेही चूक आहेत? या देशासमोरच्या 125 वर्षांपूर्वीच्या व आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची ही मांडणी करत, त्यांची उत्तरं सांगत हा दार्शनिक उभा आहे. विवेकानंदांची कुंडली तीन प्रकारे मांडता येते. पहिली कुंडली अशी आहे की, विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झाला. या दिवशी बंगाली कालगणनेप्रमाणे मकर संक्रांत होती. म्हणजे त्यांचा जन्म मकर संक्रांतीला झाला. आणि हिंदू पंचांग सांगायचं तर, पौष वद्य सप्तमी होती. हस्त नक्षत्र होतं. आणि सकाळी 6 वाजून 49 मिनिटं झाली होती. एवढी माहिती जवळ असेल, तर जगातल्या सगळ्या ज्योतिषांची चंगळ असते. अनेक ज्योतिषांनी त्यांची अगदी आखीव-रेखीव कुंडली मांडलेली आहे. आणि ही कुंडली मांडणारे काही चलाख ज्योतिषी आणखी पुढे गेलेत. ते म्हणतात, जन्म 6 वाजून 49 मिनिटांनी झालाय. पाच मिनिटांनी सूर्योदय होणार होता. म्हणजे भुवनेश्वरीदेवी जर पाच मिनिटं आपल्या प्रसूतिवेदना सांभाळत थांबल्या असत्या, तर हा याच जन्मात या देशाचा भाग्यविधाता झाला असता. हे सांगणारे सारे लोक विसरतात की, महात्मा फुलेंनी केली नाही अशी विवेकानंदांनी ज्योतिषाची खिल्ली उडवलेली आहे. विवेकानंदांनी फॅसिडोना येथे अमेरिकन स्त्रियांच्या सभेत जे भाषण दिलं, ते विवेकानंद ग्रंथावलीच्या 10 व्या खंडात तुम्हाला पृष्ठ 130 वर मिळेल. विवेकानंद सांगताहेत, ‘‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात, यासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही.’’

विवेकानंद हे चलाख वक्ते होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे : एक फार चांगला राजा होता. त्याचा भविष्यवाणीवर खूपच विश्वास होता. एकदा एक ज्योतिषी त्याच्याकडे आला. या नावाजलेल्या ज्योतिष्याने भर दरबारात राजाची कुंडली पाहिली आणि म्हणाला, ‘‘राजा, सहा महिन्यांत तुला मृत्यू येणार आहे. कदाचित अपघात होईल किंवा दगाफटका बसेल.’’ हे ऐकून सारा दरबार अवाक्‌ झाला. प्रधान शहाणा होता. तो ज्योतिषाला म्हणाला, ‘‘आम्हाला तुझ्या-सारखाच एक हुशार राजज्योतिषी राजदरबारात कायम पाहिजे. तूच आमच्याकडे राहायला पाहिजेस. पण तुझं आयुष्य किती आहे?’’ ज्योतिषाने आपली कुंडली काढून दाखवली. म्हणाला, ‘‘अजून तेरा वर्षांनी अमरनाथ यात्रेत माझा मृत्यू होईल.’’ प्रधान म्हणाला, ‘‘पुन्हा एकदा कुंडली बघ.’’ ज्योतिषी म्हणाला, ‘‘कुंडली पुन्हा पाहावी लागत नाही.’’ प्रधानाने आपली तलवार काढली आणि ज्योतिषाचं डोकं उडवलं. आणि म्हणाला, ‘‘राजा, आता तरी कळलं का तुला- की, ग्रहगोलांचे भविष्य आणि माणसाचं सामर्थ्य यात  फरक असतो?’’ म्हणून विवेकानंदांनी एकदा सांगितलं होतं की, ‘हातावरच्या रेषा पाहण्यापेक्षा आपल्या मनगटातलं सामर्थ्य पाहायला हा देश कधी शिकेल?’ विवेकानंदांनी भविष्य आणि चमत्कार नाकारला.

सर्वधर्म परिषदेनंतर केवळ चार महिन्यांनी 15 जानेवारी 1894 मध्ये मेफिक्स कमरशेलला विवेकानंदांची मुलाखत झाली आहे. विवेकानंद सांगतात, ‘विज्ञान का आणि कसे, हे सांगतो. धर्म का आणि कशासाठी, हे माणसाला शिकवतो. कोणत्याही धर्मात चमत्कार करायला स्थान नाही. पण धर्मात ज्या मिथककथा, रूपककथा आहेत, त्यांचा वापर करून धर्म चमत्कार सांगतो.’ विवेकानंद सांगतात, ‘कोणत्याही धर्मात चमत्काराला स्थान आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्याच वर्षी 30 नोव्हेंबर 1894 ला त्यांनी सिंगवहा वेलमुलियाला पत्र पाठवलं. त्यात ते म्हणतात, ‘तू रामकृष्णांवर चरित्र लिहितोस, ही फार चांगली गोष्ट आहे. पण आपल्या मनातले चमत्कार त्यांच्या नावावर खपवू नकोस. रामकृष्णांचा जन्म काही चमत्कार करण्यासाठी झालेला नव्हता.’ आणि पुढे लिहितात, ‘जडाच्या रोगाने कधी चैतन्य सांगता  येतं का? चमत्काराच्या रोगाने कधी अध्यात्म शिकवता येईल का?’ विवेकानंदांनी यावर एक निबंध लिहिलाय आणि तो नोव्हेंबर 1896 च्या ‘लाईट ऑफ ईस्ट’ या अंकात आहे. विवेकानंद म्हणतात, ‘चमत्कार हे सत्यप्राप्तीच्या मार्गातले सर्वांत मोठे अडथळे आहेत, असं मी मानतो. आणि महात्मे व गूढ संदेश यावर माझा विश्वास नाही.’ ही विवेकानंदांची मांडणी आहे.

प्रश्न - अलीकडे आपल्या सामाजिक जीवनामध्ये काही शब्दप्रयोग वापरले जाताहेत. जसे की- गोहत्याबंदी, लव्ह जिहाद. याबाबत विवेकानंदांचे काही प्रतिपादन आहे का?

- आपल्याला माहिती आहे की, सावरकर म्हणाले होते, ‘‘गाय हा उपयुक्त पशू आहे; ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समृद्ध राष्ट्रं उभं करायचं असेल, तर भाकड गाय अवश्य कापा.’’ विवेकानंद ही मांडणी अधिक सजगपणे करतात. ‘विवेकानंद ग्रंथावली’च्या तिसऱ्या खंडात पृ. सातवर विवेकानंदांच्या एका शिष्याने त्याचा अनुभव सांगितला आहे. तो सांगतो : विवेकानंदांना भेटायला मुंबईचे काही गोरक्षक आले होते. ते म्हणाले, ‘‘स्वामी, आम्ही पांजरपोळ चालवतो. आम्ही कसायाशी भांडण करून, मारामारी करून किंवा पैसे देऊन भाकड गार्इंना आणतो. आम्ही त्यांचं रक्षण करतो. आम्ही त्याच्यासाठी खूप पैसे जमवलेत. तुम्ही आम्हाला पैसे नाही, तर आशीर्वाद द्या.’’ विवेकानंदांनी विचारलं, ‘‘किती पैसे जमवलेत?’’ त्यांनी आकडा सांगितला. तो खूप मोठा होता. विवेकानंद म्हणाले, ‘‘तुम्ही फार ताकदवान माणसं आहात. पण एक करा, मध्य प्रदेशात आणि इतरत्र माणसं भुकेनं मरत आहेत. गार्इंना विसरा आणि ते पैसे तिकडे पाठवा. ती माणसं जगतील तरी!’’ सनातनी मंडळी हुशार(?) असतात. ते गोरक्षक विवेकानंदांना म्हणाले, ‘‘स्वामी, तुम्ही सांगता ते खरं आहे. पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की, ती माणसं मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं. त्यांचं आपल्याला काय पडलंय?’’ पुढे विवेकानंदांचा शिष्य लिहितो की, या घटनेनंतर विवेकानंदांच्या फुलासारख्या डोळ्यांतून अग्निज्वाला बाहेर पडतात की काय, असं वाटलं. विवेकानंद त्या लोकांना म्हणाले, ‘‘अरे, मग आपण असं म्हणू शकतो की- त्या गाई मरत आहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं. आपल्याला काय पडलंय त्यांचं?’’ त्यावर सनातनी मंडळी म्हणाली, ‘‘स्वामी, तेही खरंच पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की, गाय ही आमची आई आहे. आई कितीही वाईट असली तरी तिचं रक्षण करायचं असतं.’’ पुढे तो शिष्य आणखी लिहितो की, आता विवेकानंदांमधला खट्याळ मुलगा जागा झाला. विवेकानंद त्यावर खळखळून हसले. त्यांनी त्या लोकांना नमस्कार केला नि म्हणाले, ‘‘निघा आता. आज मला तुमचे आई-वडील समजले. आणि हेच आई-वडील बरोबर घेऊन हिंडणाऱ्यांच्या या देशाचं नवनिर्माण करायचंय, याची मला जाणीव झाली आहे!’’

विवेकानंदांनी नंतर त्यांचा मित्र शशी म्हणजे रामकृष्णानंद यांना पत्र लिहून कळवलंय की- ‘अरे, या देशात हे काय चाललंय? उद्या मुंबईचे काही श्रीमंत मारवाडी ढेकणांसाठी दवाखाना काढतील. आणि ते सांगतील की, आमच्या गीतेत किंवा गीताईत म्हणतात, सर्व भूतांस जी रात्र जागतो संयमी जिथे-त्या संयमी माणसाला रात्रभर जागवायचं काम ढेकूण करत असतो, त्यामुळे ढेकणाला वाचविणे ही धर्माज्ञा आहे.’ विवेकानंदांना माहिती आहे की, लोक सांगतात ती रूढी आहे, ही परंपरा आहे. विवेकानंदांचा मालमदुरा इथं फार मोठा सत्कार झाला होता. म्हणून त्या सत्काराला उत्तर देत असताना विवेकानंद म्हणाले, ‘‘अरे, तुम्हाला माहितेय का, आपल्या आजूबाजूच्या खेड्यांतच रूढी वेगवेगळ्या आणि परंपराही वेगवेगळ्या आहेत. ग्रामदैवतंही वेगवेगळी आहेत. ती पुन्हा वेगवेगळीच आहेत असं नव्हे, तर ती परस्परविरोधीही आहेत.’’ रूढी आणि परंपरा काळाप्रमाणे बदलत असतात. त्या बदलल्या म्हणून धर्म बदलत नाही. धर्मातली मूलतत्त्वे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून विवेकानंद म्हणतात, ‘‘तुम्हाला माहिती आहे का- एक वेळ या देशात गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. तुम्ही वेद नीट वाचलेत का?

आपल्या वेदांमध्ये असं सांगितलंय की, राजा किंवा फार मोठा संन्यासी घरी आला तर बैल कापून त्याच्या सुग्रास मांसाचं जेवण त्याला द्यावं.’’ विवेकानंद म्हणतात, ‘‘त्या वेळचे दार्शनिक-विचारवंत शहाणे होते. त्यांच्या लक्षात आलं की, हा देश कृषिप्रधान आहे. गाय वाचली पाहिजे म्हणून त्यांनी एक रूढी निर्माण केली. आज जर परिस्थिती बदलली असेल, तर ती रूढी बदलली पाहिजे.’’ पण विवेकानंदांना माहिती आहे- काही लोक सांगत होते की, ही रूढी नाही, ही धर्माज्ञा आहे. आणि म्हणून विवेकानंदांनी जो निबंध लिहिलाय, ‘धर्म : त्याचा उद्देश आणि त्याच्या कार्यपद्धती’- तो तुम्हाला ‘विवेकानंद ग्रंथावली’च्या सातव्या खंडात पृष्ठ 94 वर मिळेल. विवेकानंद त्यात सांगतात, ‘अरे, एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे किंवा फार मोठा साधू सांगतोय; पण ती तुमच्या बुद्धीला पटत नसेल, तर तुम्ही स्वीकारू नका. कारण परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वांत मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती आहे. ती वापरून तुम्ही धर्माज्ञा नाकारलीत, तर तुम्ही माणूस आहात म्हणून परमेश्वराला आनंद होईल. तुमची विचारशक्ती न वापरता स्वीकाराल, तर तुम्ही पशू आहात असे परमेश्वर म्हणेल.’ विवेकानंदांची गोहत्येबद्दलची मांडणी अशी आहे.

आज आपण लवजिहादबद्दल बोलतो. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेनंतर आपल्या मद्रासमधल्या शिष्यांना दोन पत्रं पाठवली आहेत. त्यांना ते ‘माझ्या शूर सिंहांनो’ असं संबोधतात. या पत्रांची तारीख आहे- एकाची 24 जानेवारी 1894 आणि दुसऱ्याची आहे, 19 नोव्हेंबर 1894. विवेकानंद या पत्रात सांगतात, ‘माणसाला जिवंत राहायला केवळ हवा, पाणी, अन्न पुरेसे नाही. माणसाला जिवंत राहायला स्वातंत्र्य लागतं. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचारस्वातंत्र्य आणि उच्चारस्वातंत्र्य नव्हे; तर जोपर्यंत इतरांचं नुकसान होत नाही तोपर्यंत माणसाने काय खावं, कोणते कपडे घालावेत आणि कोणाशी विवाह करावा हा व्यक्तीचा संबंध आहे, समाजाचा नव्हे.’ आपल्याला आश्चर्य वाटेल की, लोहपुरुष सरदार पटेलांनी हेच सांगितलं आहे. दि.18 ऑगस्ट 1950 ला सरदार पटेलांनी नेहरूंना जे पत्रं पाठवलंय, त्यात त्यांनी सांगितलंय की, ‘मी हिंदू संस्कृती मानत नाही. मी मुसलमान संस्कृती मानत नाही. मी वेद हे शेवटचे शब्द आहेत, असंही मानत नाही. मी कुराण हे शेवटचे शब्द आहेत, असे मानत नाही. या देशाची राज्यघटना काय सांगते, एवढंच मी मानतो. आय ओपनली ॲडव्होकेट हिंदू-मुस्लिम मॅरेजेस. हा देश एकत्र राहायचा असेल तर आंतरजातीयच नव्हेत, तर आंतरधर्मीय विवाह व्हायला हवेत.’

प्रश्न - दाभोळकर सर, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये विवेकानंद यांची तुलना काही थोर पुरुषांबरोबर केलेली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आहेत. ही तुलना तुम्ही का आणि कशी केलीत?

- विवेकानंदांचा जन्म 1863 चा आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 चा आहे. गांधीजींचा जन्म 1869 चा आहे. विवेकानंद टिळकांहून सात वर्षांनी लहान आणि गांधींपेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत. तेरा वर्षांच्या कालखंडात तीन महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवले आहेत. आणखी एक गोष्ट आहे. या तिघांचाही जन्म 1857 च्या देदीप्यमान अपयशाच्या पार्श्वभूमीवर झालाय. 1857 हे अपयश तर आहेच, पण ते देदीप्यमान आहे. हा देश सहजपणे काय करतो आणि करताना सहजपणे कसा फसतो, हे 1857 अधोरेखित करतं. या तिघांच्याही  जागृत किंवा सुप्त मनावर 1857 चे ओरखडे उठलेले असणार. या तिघांनाही माहीत आहे, पूर्वीचे सारे मार्ग कायमचे संपलेले आहेत. आपल्याला अंधारात चाचपडत नवे मार्ग शोधत या देशाला स्वतंत्र करायला आणि ते स्वातंत्र्य कायम टिकवायला सक्षम करायचंय. या तिघांसमोर तीन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणालात त्यातल्या पहिल्या प्रश्नाबद्दल मी बोलतो. पहिली गोष्ट अशी आहे की, जगात सर्वत्र स्त्री-पुरुष असमानता आहे. भारतात तर ती भयावह आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, घृणास्पद अशी जातिव्यवस्था आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हिंदू-मुसलमान व्यक्तिगत पातळीवर प्रेम आणि सार्वत्रिक पातळीवर खुन्नस आहे. विवेकानंद, टिळक आणि गांधी या तिघांनीही या गोष्टीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलंय. मात्र गांधी आणि टिळकांपेक्षा विवेकानंद अनेक योजना पुढे आहेत. आपण स्त्रियांचा प्रश्न घेऊ. ज्या वेळी संमतिवयाच्या कायद्याची चर्चा होत होती, त्या वेळी 1895 मध्ये विवेकानंदांनी वराहनगरमधला त्यांचा मित्र राखालला पत्र पाठवलंय. हा राखाल म्हणजे ब्रह्मानंद होय. विवेकानंद पत्रात म्हणतात, ‘सहा वर्षांच्या मुलीचा चाळीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. या विवाहासाठी आई-वडिलांना आनंद होतोय. आणि त्याला मी विरोध केला तर, तुम्ही आमचा धर्म बुडवताय असं म्हणता. अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आलाय धर्म? काही जण सांगतात, आमच्या समाजात ते नव्हतंच. आमच्या धर्मात ते नव्हतंच. पण मुसलमान राजवटीत लहान मुलींचं रक्षण करायला आम्ही हे केलं. आपण किती खोटं बोलणार आहोत? मी सर्व गृह्यसूत्रं वाचली आहेत. मी सर्व ब्राह्मणग्रंथ वाचले आहेत. सर्वांनी मुलीच्या लग्नाचं वय लहान असावं, असंच सांगितलंय आणि आपल्या अश्वमेध यज्ञात तर याहूनही भयानक गोष्टी आहेत.’ विवेकानंद म्हणतात, याचा आपण आदर केला पाहिजे. पण ज्या गोष्टी वाईट आहेत, त्या वाईट आहेत असं सांगून त्यांचा ठामपणे विरोध करण्याची वेळ आली आहे.

विवेकानंदांची साताठशे पत्रे आहेत. त्यातलं 23 डिसेंबर 1895 चं एक पत्रं आहे. त्यात विवेकानंद लिहितात, ‘एखाद्या कोवळ्या मुलीचा एखाद्या वृद्ध माणसाशी विवाह करणाऱ्या माणसाचा मी सगळं काही विसरून खून करू शकेन.’ विवेकानंदांची स्त्रीप्रश्नांची मांडणी अधिक भेदक आहे. पुढे ते लिहितात, ‘काही लोक म्हणतात, स्त्री-पुरुष हे एकाच संसाररथाची दोन चाके आहेत. आपण किती खोटं बोलणार आहोत? एक चाक निखळलं, तर दुसरं लावता येतं. या समाजाला सांगितलं पाहिजे की, स्त्री-पुरुष हे एकाच पक्ष्याचे दोन पंख आहेत. ते दोन पंख जोपर्यंत समतोल नसतील तोपर्यंत घर, परिवार, कुटुंब, देश, मानवी संसार उभाच राहू शकणार नाही.’ विवेकानंद अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेसाठी आमंत्रण नसताना पोहोचले, तेव्हा त्यांची खिल्ली उडवली गेली. तेव्हा आपल्या शिष्यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ‘अमेरिका संपन्न आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे. कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या उभ्या आहेत. त्या साक्षात जगदंबा आहेत. मृत्यूपूर्वी अशा एक हजार स्त्रिया मी भारतात निर्माण केल्या, तर मी सुखानं मरेन.’ आणि या आयुष्यात हे शक्य नाही म्हटल्यावर त्यांनी भगिनी निवेदितांना पत्र पाठवलंय. त्या पत्रात ते लिहितात, ‘प्रिय भगिनी, समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न आहेत; पण स्त्रियांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरं शोधत, त्यांची मांडणी करत ती प्रत्यक्ष कार्यान्वित करायचं काम एक स्त्रीच करेल. अशा स्त्रिया भारतात निर्माण करायला मी आज अयशस्वी ठरलोय. म्हणून आज मी त्या अमेरिकेकडून उसन्या मागतोय. त्यामुळे तू आणि ख्रिस्तींनी इथं येऊन हे काम करा.’ भारतात स्त्रियांची काय भयाण स्थिती आहे, हे विवेकानंदांनी एका पत्रात लिहिलंय. विवेकानंद म्हणतात, ‘भारतात आम्ही स्त्रियांना भार वाहणारा पशू आणि संतती निर्माण करणारी दासी म्हणून आज वापरतोय. हे या समाजाला कधी कळेल का?’

विवेकानंद अमेरिकेत गेले. अमेरिकेतल्या स्त्रियांच्या व्यवहारज्ञानावर त्यांचा विलक्षण विश्वास आहे. विवेकानंदांना सर्वधर्म परिषदेचं आमंत्रण नाहीये. तेव्हा अमेरिकेतून ते आपल्या शिष्यांना लिहितात, ‘चांगल्या वक्त्याच्या दृष्टीने त्याचा वेष महत्त्वाचा असतो. इथं आल्यापासून मी वेष बदलून पाहतोय. काही वेळा रस्त्यावर चेष्टा करत मुलं माझ्या मागं लागतात. काही वेळा सभागृहात माझ्या भाषणापेक्षा माझ्या वेषभूषेचीच चर्चा जास्त होते. पण माझ्या भाषणाला येणाऱ्या अमेरिकेतल्या स्त्रिया सांगताहेत- स्वामी, सर्वधर्म परिषदेत उभे राहाल तेव्हा रुबाबदार फेटा आणि झगा घाला.’ विवेकानंदांचा सर्वधर्म परिषदेतला पोशाख अमेरिकेतल्या स्त्रियांनी ठरवलाय. आणि त्याचे पैसेही त्यांनीच दिले. म्हणून वि. रा. करंदीकर त्यांच्या ‘विश्वमानव विवेकानंद’ या पुस्तकात विवेकानंदांना विश्वमानव म्हणतात. स्त्रीप्रश्नांबद्दलची विवेकानंदांची मांडणी आणखी मोकळी आहे. ज्या वेळी अखंडानंद ‘अनाथ बालकाश्रम’ सुरू करीत होते, त्या वेळी विवेकानंदांनी त्यांना 10 ऑक्टोबर 1897 च्या पत्रात लिहिले, ‘अनाथ मुलांसाठी तुम्ही आश्रम सुरू करत आहात, पण मुलींसाठीसुद्धा अनाथाश्रम सुरू करायला पाहिजे. अडचण एवढीच आहे की, या अनाथाश्रमाची काळजी घेण्यासाठी एखाद्या खेड्यात जाऊन तिथल्या एखाद्या वृद्ध किंवा विधवेला (जिचं गावात चांगलं नाव आहे) त्या आश्रमाची प्रमुख म्हणून नेमा.’ विवेकानंद सर्व दृष्टीने विचार करतात. रजस्वलेनं मंदिरात जावं की जाऊ नये? (सध्या शबरीमला मंदिरासंबधी जी चर्चा चालू आहे.) त्यासंदर्भात विवेकानंद अमेरिकेतून 23 ऑगस्ट 1896 ला शशीला म्हणजे रामकृष्णनंदांना पत्र लिहून सांगतात, ‘मी असं ऐकतो की, दक्षिणेश्वरच्या मंदिरात वेश्यांना प्रवेश दिला जात नाही. अरे, मंदिर जर वेश्येसाठी नसेल, तर ते कोणासाठी आहे? ती आपली सर्वांत पददलित बहीण आहे. तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक असं सर्व प्रकारचं शोषण होतंय. मंदिराची गरज आज सर्वाधिक कोणाला असेल, तर ती वेश्येला आहे. हे दरवाजे वेश्येसाठी खुले झाले पाहिजेत. आपली अडचण एकच आहे- मंदिरात आल्यावर अमुक एक स्त्री रजस्वला असेल, एखादी वेश्या असेल किंवा एखादा माणूस गरीब असेल, एखादा दलित आहे; असे विचार ज्यांच्या मनात येतात (ज्यांना आपण सभ्य स्त्री-पुरुष म्हणतो.), त्यांची संख्या या देशात खूप मोठी आहे. या लोकांपासून या शोषितांना त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. ते जमत नसेल, तर तुमच्या मंदिराला टाळं ठोकून मोकळे व्हा.’ स्त्रीप्रश्नांबद्दलची विवेकानंदांची मांडणी एवढी भेदक आणि नेमकी आहे.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

शब्दांकन : ज्योत्स्ना खंडागळे, भिकचंद लांडे

मुलाखत : मनोहर जाधव

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित केलेल्या कै. ग. स. राजाध्यक्ष व्याख्यानमालेत मराठी भाषादिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद यांची खरी ओळख’ या विषयावर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची डॉ.मनोहर जाधव यांनी घेतलेली मुलाखत...)

Tags: भिकचंद लांडे ज्योत्स्ना खंडागळे मनोहर जाधव स्वामी विवेकानंद interview bhikchand lande jyotsna khandagale manohar jadhav swami vivekanand dattprasad dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Sanjay- 03 Jul 2020

  Apratim lekh. Mazya manatali anek dwandve samushtat Ali .

  save

 1. Shilpa- 04 Jul 2020

  खरचं इतकं अर्थपूर्ण विवेकानंद बद्दल वाचन गरजेचं आणि उपयुक्त वाटले

  save

 1. Sharad Ramchandra Gokhale- 05 Jul 2020

  ही मुलाखत ध्वनि-चित्रमुद्रित झाली आहे का? संकेतस्थळावर-यूट्यूबवर आहे का?

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके