डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि. 7 ऑगस्ट 1947 रोजी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘गोहत्या- बंदी करावयास हवी. बापूंचे मत असेच आहे’ वगैरे कळवले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘बापूंना गाईंचे रक्षण व्हावे, असे वाटते. त्यांना तसा कायदा नकोय. आज भारतभर गोहत्याबंदीची जी चर्चा आहे, ती दालमिया नावाच्या एका उद्योगपतीने प्रचंड पैसा आणि काही संघटना वापरून सुरू केलेली आहे. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करावे, हा त्यामागचा एकमेव हेतू आहे. आपण याबाबत फार सजग असले पाहिजे.’

काही महिन्यांपूर्वी एस.एम.जोशी सभागृहात माझे ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या विषयावर भाषण झाले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या रत्नाकर महाजन यांनी त्या भाषणानंतर मला एक विनंती केली. ते म्हणाले- ‘विवेकानंदांची विकृत प्रतिमा जनमानसात रुजवण्यात प्रतिगामी शक्ती यशस्वी झाल्यात. त्याचा प्रतिवाद करीत समाजवादी विवेकानंदांची खरी ओळख करून देत तुम्ही सध्या महाराष्ट्रभर हिंडत आहात. प्रतिगामी शक्तींनी विवेकानंदांचे जे केले, ते वेगळ्या प्रकारे करीत प्रतिगामी शक्ती आज पंडितजींना बदनाम करताहेत. म्हणून दि. 14 नोव्हेंबर 2014 हा पंडितजींचा 125 वा जन्मदिन. त्या दिवशी तुम्ही याच सभागृहात पंडितजींवर भाषण द्या.’

 माझ्या पिढीतील बहुतेक सर्वांप्रमाणे नेहरू या नावाचे  गारूड माझ्याही मनावर होते. मात्र अभ्यासाला सुरुवात केली आणि जाणवले, नेहरूंना समजावून घेऊन दुसऱ्याला समजावणे हे (विवेकानंदांना समजावून घेऊन समजावून देण्यापेक्षा) खूप कठीण व आव्हानात्मक आहे. मात्र त्याच वेळी विवेकानंदांबरोबर नेहरूंना पण समजावून द्यावयास हवे, हे तीव्रतेने जाणवले. कारण या देशाच्या नवनिर्मितीसाठी विवेकानंद जो आराखडा सुचवत होते, तो नेहरू कार्यान्वित करीत होते. नेहरूंना समजावून घेणे अधिक कठीण का आहे, तर नेहरू शोभादर्शक यंत्रासारखे म्हणजे कॅलिडोस्कोपसारखे आहेत. कॅलिडोस्कोप कसाही फिरवा आणि बघा, एक नवी विलोभनीय नक्षी आपणासमोर येते. प्रत्येक वेळी नवी नक्षी. त्यातून एकदा गेलेली नक्षी पुन्हा मिळणे अशक्य. मग लक्षात येतं- या यंत्राची रचना  समजावून घ्यावयास हवी.

रचना अगदी सोपी, पण अगदी सक्षम आहे. मात्र ही रचना किंवा रचना करून ती कार्यान्वित करणारे पंडितजी एका भाषणात समजावून देणे कठीणच नाही, तर अशक्य आहे, असे मला वाटले. म्हणून मी नेहरूंना समजावून देणारे नाही; तर त्यांच्यावर फार कावेबाजपणे जो अन्याय केला जातोय, त्यावर भाषण तयार केले आणि नेहरूंच्या सव्वाशेव्या जयंतीदिनी त्याच सभागृहात केले. त्यातून त्यांचे प्रतिगामी विरोधक आणि नेहरूंचे अलौकिक मोठेपण थोडे लक्षात येईल, अशी माझी कल्पना होती आणि त्याप्रमाणे घडले. तिथे केलेले भाषण मी नंतर लिहून काढले आणि तेच इथे सादर करीत आहे.

पहिली गोष्ट सांगायची तर, पंडितजी प्रतिगामी शक्तीच्या रडारवर किंवा खरे तर हिटलिस्टवर कायम राहिलेत. उलटी गणती करायची तर अगदी ऐन दिवाळीत केरळमधील संघ, भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘केसरी’त त्यांच्या त्या विभागातील सर्वेसर्वा असणाऱ्याने लिहिले, ‘गांधींऐवजी नेहरूंना मारायला हवे होते.’ त्याच्या दोन-तीन वर्षे आधी ‘हिंदू व्हॉईस’मध्ये श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांची एक सविस्तर मुलाखत आली. (होय, तेच ते प्रमोद मुतालिक- ज्यांनी मुलींना हॉटेलातून बाहेर काढून तुडवले आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण केले.)

मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘मी नथुरामला हिरो मानतो. पण त्याने एक चूक केली. त्याने त्याच वेळी नेहरूंना पण संपवायला हवे होते. किमान मी त्या वेळी तेथे असतो, तर हे धर्मकृत्य, राष्ट्रकृत्य केले असते.’ आणि ‘हिंदू व्हॉइस’ हे काही साधेसुधे मासिक नाही. त्या मासिकाला सरसंघचालकांनी दिलेला आशीर्वाद त्यात छापलाय. ही खुनी संस्कृती कायम कार्यरत आहे. गांधीजींचा खून झाल्यावर 8 फेब्रुवारी, 1948 रोजी सरदार पटेलांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना पत्र पाठवून खडसावलंय- हे काय चाललंय? महात्माजींचा खून झालाय आणि देशपांडे व महंत दिग्विजयनाथ भाषणांमधून ‘नेहरूंना फासावर लटकवले पाहिजे म्हणून सांगत हिंडताहेत?’- या ठिकाणी हा हिंदू महासभेचा महंत कोण, हे समजावून घ्यावयास हवे. नथुरामला पिस्तुल पुरवले म्हणून त्यांना नंतर अटक झाली होती. आणि या महंतांना ते पिस्तुल संघाच्या नानाजी देशमुखांनी दिले, म्हणून त्यांना कलम 302 खाली सहा महिने तुरुंगवासात ठेवले होते. त्यातून ते पूर्णपणे निर्दोष सुटले.

तर अभ्यासाला सुरुवात केली आणि तीव्रतेने पहिली गोष्ट जाणवली ती ही की- हे पंडितजींच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आहे, हे महत्त्वाचे; पण त्याहूनही अधिक महत्त्वाची आणि आपण चिंतन करावी अशी गोष्ट म्हणजे, या वर्षी पंडितजींना जाऊन पन्नास वर्षे पुरी होतात. हे वर्ष त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाचे आहे. त्यांना काळाच्या पडद्याआड जाऊन या वर्षी पाच दशके मागे पडलीत. अर्धे शतक संपलेय. नीटपणे विचार केला तर त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी धर्म, भाषा, पंथ अशा एक ना अनेक गोष्टींनी दुभंगलेला हा खंडप्राय देश टिकून आहे. देशात लोकशाही रुजली आहे. सर्वधर्मसमभाव मोठ्या प्रमाणात कायम राहिला आहे.

देश स्वतंत्र झाला... त्या वेळी हा देश भुकेलेला होता. परदेशात, डुकरांना खायला देतात तो लाल मिलो तिकडून आणून मोजून-मापून जनतेला घ्यावा लागत होता. आणखी एक होते. फाळणीनंतर वेगळ्या झालेल्या 20-25 टक्के लोकांकडे 75 टक्के सिंचित जमीन गेली होती. उरलेला भूभाग वैराण होता. आज हा देश अतिरिक्त धान्य पिकवतो. देश स्वतंत्र झाला, त्या वेळी या देशात टाचण्या, ओगलेंचे कंदील आणि किर्लोस्करांचे लाकडी नांगर होते. आज या देशात निर्माण होत नाही, निर्माण होऊ शकणार नाही, अशी वस्तू दाखवता येणार नाही. त्या वेळच्या या अडाणी अर्धशिक्षित देशातील शिक्षित तरुणांना आज  जगभर मागणी आहे. त्या वेळी ज्या विषयावर बोलणेही पाप होते, ते कुटुंबनियोजन आज देशाने स्वीकारलेय. हे स्थित्यंतर कसे झाले, ते अजिबात लक्षात घेतले जात नाही. मात्र, अणुऊर्जा आणि अंतरिक्ष यांतील नेहरूंचे योगदान आपल्याला थोडेफार तरी माहीत आहे. आज हा लोकशाही रुजलेला देश झपाट्याने प्रगती करतोय.

नेहरू या नावाचे गारूड माझ्या पिढीतील अनेकांप्रमाणे माझ्याही मनावर होते. पण अभ्यासाला सुरुवात केली आणि जाणवले, नेहरूंबद्दल टोकाचा विखार मनात ठेवणारा परिवार पटेलांचे गुणगान करतो. नेहरू रागावले, चिडले तरी लोकांना आनंद व्हायचा. आईने मुलांना कातावून ओरडावे, असा तो प्रकार वाटायचा. पटेलांचे वागणे आमच्या वेळच्या हेडमास्तरसारखे- सरळ कानाखाली आवाज काढायचा! पटेलांचा गौरव करत त्यांचा अतिभव्य पुतळा उभारणाऱ्यांनी पटेल त्यांच्याबद्दल काय म्हणालेत, ते वाचले नसावे किंवा वाचले असूनही त्यांना समजलेले नसावे.

दि. 6 मे 1948 रोजी श्यामाप्रसादांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलंय- ‘गांधीजींचा खून हिंदू महासभेने किंवा संघाने केलाय का, हे कदाचित कधीच कळणार नाही. पण हिंदू महासभा आणि संघ यांनी या देशात जे विखारी वातावरण निर्माण केलेय, त्यातून हा खून झाला, हे नाकारता येत नाही. त्याहूनही भयंकर अशी गोष्ट म्हणजे, आमच्याकडे आलेल्या अहवालाप्रमाणे अनेक ठिकाणी मिठाई वाटून संघ व हिंदू महासभा यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. माझ्या मते, हिंदू महासभेपेक्षा संघ अधिक धोकादायक आहे. कारण ती गुप्तता पाळणारी आणि सैनिकी शिक्षण देणारी संघटना आहे.’

गांधीजींचे नाव घ्यायचे, पटेलांचे नाव घ्यायचे आणि नेहरूंवर विखारी टीका करायची- यामागचे कारण पुढे कधी तरी नीटपणे समजावून घेऊ. आज मात्र नेहरू- गांधी-पटेल यांचे अद्वैत व त्यांची रचना लक्षात घेऊन नेहरूंच्या जीवनाकडे पुढे जाऊ. आज गांधीजींचे अलौकिक मोठेपण सांगणाऱ्यांनी खरे तर त्याच वेळी नि:शस्त्र गांधीजींचा खून करणाऱ्या नराधमाचा आणि ती मनोवृत्ती जोपासणाऱ्या व ते विखारी वातावरण देशात निर्माण करणाऱ्या संघटनांचा, त्यांच्या विचारांचा व कार्यपद्धतीचा निषेध करावयास हवा, किमानपक्षी गांधीजींचे गुणगान गाणाऱ्यांनी तरी! गांधीजींनी दोन वेळा ‘मी नेहरूंना माझा राजकीय वारस मानतो आणि नेहरू माझ्या मृत्यूनंतर त्यांच्या भाषेत माझे विचार मांडत असतील आणि माझ्या मनातील रचना आणि कार्य पूर्णत्वाला नेतील’ असे लिहून ठेवलेय.

नेहरू-पटेल यांच्यामधील वैचारिक व त्यामुळे व्यावहारिक मतभेदांबद्दल पुन:पुन्हा सांगणाऱ्यांनी, 28 मार्च, 1950 रोजी नेहरूंना सरदारांनी लिहिलेले पत्र वाचावयास हवे. त्यांनी लिहिलंय, ‘माझी आणि बापूजींची शेवटची भेट झाली, त्या वेळी त्यांनी तुम्हाला आणि मला एकत्रपणे काम करावयास सांगितलंय.’ त्यांनी पुढे सांगितलंय- ‘आपण दोघे वेगळे झालो; तर त्यामुळे या देशाची अपरंपार हानी होईल किंवा असे काही व्हावे असे ज्यांना वाटते, ते तुमच्यात आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत राहतील.’

नेहरू आणि पटेल ही गांधीजींनी निवडलेली आणि घडवलेली माणसे आहेत. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ हे दोघांवर झालेले वज्रलेप संस्कार आहेत. ते कसे आहेत, हे पाहावयास हवे. नेहरू अधिक भावनाप्रधान आहेत. दि. 26 मार्च, 1950 च्या पत्रात आपल्या मनातील खंत ते पटेलांकडे मांडतात. ते म्हणतात- मला भीती वाटते आहे  की, ‘आपली काँग्रेस नकळत पाकिस्तान, हिंदू महासभा यांच्या मार्गाने जाते आहे का? या देशाला सर्वधर्म समभाव हवा आहे. आपण अल्पसंख्याकांना केवळ संरक्षण देऊन चालणार नाही. त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे, हे गांधीजींनी सांगितलंय.’

पटेल हिंदुत्ववादी आहेत, अशी हवा निर्माण करण्यात या देशातील प्रतिगामी शक्ती यशस्वी होताहेत. पटेल-नेहरू यांच्यात अविश्वास निर्माण करण्याची ही खेळी आहे. याबाबत पटेलांची भूमिका काय आहे? नेहरूंना 12 ऑगस्ट, 1950 रोजी पाठवलेल्या पत्रात सरदार पटेल स्पष्टपणे सांगतात, ‘मी मुसलमान संस्कृती मानत नाही. मी हिंदू संस्कृती मानत नाही. कुराण हा शेवटचा शब्द आहे, असे मानत नाही आणि वेद शेवटचे शब्द आहेत, असेही मानत नाही. मानवी समाजाला जे हितकारक आहे, तेवढेच मी मानतो. माणसाने काय करावे आणि काय करू नये, हे सांगायचा कोणत्याही, ग्रंथाला काही अधिकार नाही.’ खरे तर या पत्रात सरदार आणखी पुढे गेलेत, ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्यांनी ते समजावून घ्यावे. सरदार म्हणालेत, ‘मी हिंदू-मुसलमान विवाहाचा पुरस्कार करतो...I openly advocate Hindu-Muslim marriages

आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. नेहरू-पटेल ही परंपरा समाजवादी विवेकानंदांपासून सुरू होते. म्हणून सनातनी मंडळींनी भारतातील या पहिल्या समाजवादी विचारवंतांला त्या वेळी फार त्रास दिलाय. कारण नेहरू- पटेल जे सांगतात, ते त्यांनी अधिक नेमक्या आणि भेदक व धारदार शब्दांत सांगितलंय. मृत्यूपूर्वी दोन-तीन वर्षे आधी- 10 जून, 1898 रोजी विवेकानंदांनी सर्फराज मोहमद हुसेन याला अलमोरा येथून जे पत्र पाठवलंय, त्यात लिहिलंय, ‘आमच्या वेदान्तातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला इस्लामनेच. पण जेथे वेदही नाहीत, कुराणही नाही व बायबलही नाही- अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचंय आणि ते काम आपणाला वेद, कुराण व बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’

एक मात्र खरे- दक्ष लोकांच्या व्यूहरचनेबाबत नेहरू हे पटेलांपेक्षा जास्त सजग आहेत. किंवा या बाबतीत ते समाजवादी विवेकानंदांच्या जवळ आहेत. दि. 7 ऑगस्ट, 1947 रोजी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘गोहत्या- बंदी करावयास हवी. बापूंचे मत असेच आहे’ वगैरे कळवले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘बापूंना गार्इंचे रक्षण व्हावे, असे वाटते. त्यांना तसा कायदा नकोय. आज भारतभर गोहत्याबंदीची जी चर्चा आहे, ती दालमिया नावाच्या एका उद्योगपतीने प्रचंड पैसा आणि काही संघटना वापरून सुरू केलेली आहे. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करावे, हा त्यामागचा एकमेव हेतू आहे. आपण याबाबत फार सजग असले पाहिजे.’

त्यानंतर 2 एप्रिल, 1955 रोजी शेठ गोविंददास यांनी गोहत्याबंदीचा कायदा करावा, म्हणून लोकसभेत विधेयक आणले. अनेकजणांचा त्याला छुपा वा उघड पाठिंबा होता. नेहरूंनी फार प्रभावीपणे त्याचा विरोध केला. पण नेहरू तेथेच थांबले नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर मी या देशाचा पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळू शकणार नाही.’ त्या वेळी आणि आज नेहरूंविरुद्ध आग ओकणाऱ्या परिवाराला सावरकरांनी ‘‘गाय हा एक उपयुक्त पशू; ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक नवे विज्ञाननिष्ठ राष्ट्र उभे करावयाचे असेल, तर भाकड गाय अवश्य कापा-’’ असे सांगितलंय, ते आठवत नाही. किंवा खरे तर विवेकानंदांनी या देशाच्या नवनिर्मितीचा जो आराखडा मांडलाय; त्याची नेहरू फक्त कार्यवाही करताहेत, हे लक्षात आले नाही.

या देशाच्या रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धा यांतून मुक्तता करणे हे प्रमुख काम आहे, असे सांगताना विवेकानंद म्हणतात, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात, असे समजणे हा मानवी मनाला होणारा भयावह रोग आहे.’ नेहरूंनी बेधडकपणे तो रोग देशाच्या शरीरातून हद्दपार करण्यासाठी पावले उचलली. मंगळवार 13 मे हा पहिल्या लोकसभेचा पहिला दिवस होता. मंगळाची अवकृपा, त्यातून 13 ही जागतिक अशुभ तारीख. इतरांचे राहू देत, खुद्द राजेंद्रप्रसादांनी तारीख बदलण्याची गळ घातली. नेहरूंनी सर्वांचे सांगणे धुडकावून लावले. या राष्ट्राला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचे हे पहिले सक्षम पाऊल आहे, असे सांगितले.

भ्रष्टाचार या देशाच्या हाडांत भिनलाय. लोकहितवादींनी आपल्या शतपत्रात म्हटलंय- ‘ब्राइब’ आणि ‘रिश्वत’ हे शब्द आम्हाला परकीयांनी शिकवले. आमच्या समृद्ध अशा संस्कृत भाषेत ‘लाच’ याला शब्दच नाही. कारण आमच्या समाजात भ्रष्टाचार हा शिष्टाचार होता. ‘बीना द्रव्यम्‌ न गंतव्यम्‌। राजानां ब्राह्मणो गुरु’ हे आमच्या हाडात रुजवले आहे.’ हा रोग किती भयावह झालाय, हे परिव्राजक म्हणून भारत उभा-आडवा पिंजून काढताना विवकानंदांनी नोंदवलंय. त्यांनी लिहिलंय, ‘चार चांदीची नाणी फेकलीत तर कोणत्याही देवळातील पुजारी देवांना रस्त्यावर रात्रभर ठेवेल आणि तुम्हाला गाभाऱ्यात निवांतपणे झोपायला देईल.’

नेहरूंच्या मनातील भ्रष्टाचाराबाबतची चीड प्रचंड आहे. स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्षे आधी त्यांनी भर सभेत सांगितले. ‘मी या देशात पंतप्रधान झाल्यावर काळाबाजारवाल्यांना फासावर चढवीन.’ काही काळाने यातील अडचण त्यांना समजली. काळा-बाजारवाल्यांना फासावर चढवायचे असेल; तर तो दोरही या देशात काळ्याबाजारातच विकत घ्यावा लागेल, हे त्यांना जाणवले. अशा वेळी काळाबाजार नाहीसा करण्याची सुरुवात वरून करावी लागेल; तळापासून नव्हे. (‘मी पैसे खाणार नाही; खायला देणार नाही, फक्त येदुयुरप्पाला माझ्या बरोबर ठेवणार’ असे म्हणून काही होत नाही!)

नेहरूंनी भ्रष्ट माणसांना आपल्याजवळही येऊ दिले नाही आणि अगदी जवळच्या सहकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. मालवीय हे नेहरूंच्या अगदी जवळचे. त्यांच्यावर आजच्या मानाने फारच छोटे आरोप झाले. नेहरूंनी कायदा थोडा गुंडाळून ठेवला. कायद्यात तशी तरतूद नसताना भूतपूर्व सरन्यायाधीश दास यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेली. त्याचा अहवालही बाहेर येऊ दिला नाही. मात्र मालवीय यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला. मुंद्रा यांच्या उद्योगात आयुर्विमा मंडळाने केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर आक्षेप घेण्यात आल्यावर त्यांनी न्यायमूर्ती छगला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीला ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’प्रमाणे झपाट्याने चौकशी करण्यास सांगितले. त्या समितीच्या अहवालात अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांच्यावर फक्त ठपका ठेवला होता. नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळातून काढले. त्या वेळी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि लंडनचे ‘इकॉनॉमिस्ट’ यांनी ‘नेहरू प्रगत देशांसाठीसुद्धा लोकशाहीतील नवे मानदंड प्रस्थापित करताहेत’ असे लिहिले.

धर्माने दिलेली मूर्ख शिकवण ही या देशाच्या अवनतीचे एक प्रमुख किंवा एकमेव कारण आहे, हे विवेकानंदांनी खणखणीत शब्दांत सांगितले. संमतिवयाची चर्चा सुरू असताना त्यांनी लिहिले, ‘अवर्षा मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय आणि त्याला विरोध केला,  तर तुम्ही आमचा धर्म बुडवताय म्हणून आरडाओरडा करताहात. मुलगी वयात येण्यापूर्वी तिला माता बनविण्यासाठी निघालेल्या समाजाला कुठला आलाय धर्म? आपल्या अश्वमेध यज्ञात तर आपल्या धर्माने याहून भयावह गोष्टी सांगितल्यात. आपल्या धर्मातील वाईट, कालबाह्य गोष्टी नाकारण्याची आज गरज आहे.’

नेहरूंच्या समोर बालविवाह नव्हते, तो कायदा झाला होता; पण झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही भयावह समस्या होती. कुटुंबनियोजन धर्मविरोधी होते. नेहरूंनी 1950 मध्ये पहिली जागतिक कुटुंबनियोजन परिषद दिल्लीत भरवली. या माझ्या देशाला कुटुंबनियोजन समजावून देण्यासाठी हे गरजेचे आहे, म्हणून सांगितले. कुटुंबनियोजन कार्यक्रम हातात घेणारे भारत हे जगातील पहिले राष्ट्र बनविले. मात्र त्याच वेळी आग्रहाने सांगितले, ‘हे काम कायदा करून होणार नाही. यासाठी शिक्षण आणि आर्थिक स्तर वाढवणे गरजेचे आहे.’ त्यासाठी लोकशिक्षण हातात घेतले. आणि या देशात 1960 पर्यंत तीन हजार शासकीय कुटुंबनियोजन केंद्रे अस्तित्वात आली.

सन 1950 ते 1960 या दहा वर्षांत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 42 टक्क्यांहून थोडे अधिक वाढले. लोकसंख्या 21 टक्क्यांहून अधिक वाढूनही दरडोई उत्पन्न 16 टक्क्यांनी वाढले. महत्त्वाचे म्हणजे, अभियंते हे नव्या जगाचे निर्माते आहेत, हे त्यांनी जनमानसात रुजवले. दर वर्षी इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्यांची संख्या 4100 वरून 14200 पर्यंत वाढवली. डिप्लोमा (पदविका) घेणाऱ्यांची संख्या सहा हजारांवरून 25 हजारांवर गेली. त्याच वेळी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अडीच कोटींहून साडेचार कोटींवर गेली. महत्त्वाचे म्हणजे, प्राथमिक शाळेबाबत नेहरूंचे आणि विवेकानंदांचे चिंतन अगदी सारखे आहे.

विवेकानंदांनी आपल्या किमान तीन पत्रांमधून सांगितलंय, ‘खेड्यात जाऊन संन्याशांनी शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्याबरोबर पृथ्वीचा गोल असेल, ते खेड्यातील लोकांना भूगोलाच्या मदतीने इतिहास शिकवतील. त्यांच्याकडे लोहचुंबक असेल, काही रसायने असतील. ‘मॅजिक लँटर्न’ (प्रकाशचित्रे)च्या साह्याने ते विज्ञान व रसायन शिकवतील. या आपल्या खेड्यांना जर आपण असे ज्ञानी केले नाही आणि साऱ्या जगातील संपत्ती लुटून आणून जरी एका खेड्यांत ओतली, तरी एका वर्षात आपले खेडे पुन्हा गरीब बनेल. संन्याशांनी असे खेड्यात जाऊन शिकवले पाहिजे. शाळा बांधण्यासाठी आज या देशाकडे साधनसंपत्ती नाही.’

नेहरूंनी खेड्यातील शाळांची कल्पना अशीच मांडली. त्यांनी आग्रहाने सांगितले की, आपल्याकडे साधनसंपत्ती कमी आहे. खेडी तर सज्ञानी करायचीत. आपल्याकडे कुठेच उन्हाळा वा हिवाळा परदेशांसारखा भयावह नसतो. आपण शाळांना फक्त पावसाळ्यात सुट्टी देऊया. शाळा झाडाखाली भरवून इमारतीचा खर्च वाचवून त्या पैशांमधून मुलांना साधनसुविधा पुरवूया. प्राथमिक शिक्षणाबाबत एवढे चिंतन करणाऱ्या नेहरूंनी या देशात भक्कम असा अणुशक्तींचा आणि अंतरिक्ष विभागाचा पाया घातला.

सर्वधर्म परिषदेपूर्वी विवेकानंद एक आठवडा शिकागो येथे मानवी संस्कृतीची वैज्ञानिक प्रगती दाखविणारे अतिभव्य प्रदर्शन पाहत हिंडले होते. अस्वस्थ होऊन त्यांनी मित्रांना पत्र पाठवून सांगितले होते, ‘हे प्रदर्शन पाहताना वैज्ञानिक क्षेत्रात जग किती पुढे गेलेय याचे विस्मयजनक दर्शन घडते. मी तीन वर्षे भारतभर हिंडत होतो आणि गंध उभे लावावे की आडवे; आणि जेवणापूर्वी दहा वेळा हात धुतला नाही तर दहा पिढ्या नरकात जातील की शंभर, याची गहन वैज्ञानिक चर्चा करत माझा देश उभा आहे याचा मला क्लेशदायक अनुभव येत होता. या जगातील वैज्ञानिक प्रयोगात माझा देश कधी उतरेल?’ विवेकानंदांचे स्वप्न साकार करीत नेहरू मार्गक्रमण करीत होते.

घरात स्वच्छता, घराबाहेर सर्वत्र प्रचंड घाण ही या देशाची दुर्दैवी परिस्थिती विवेकानंदांनी नोंदवली आहे. पणजीला गेल्यावर पणजी हे शहर स्वच्छ आहे, याची आनंदाने नोंद केली आहे. रस्ते साफ व्हावेत, म्हणून हातात झाडू घेऊन फोटो काढण्याचे तर आज वेडच पसरलेय. नेहरू प्रश्नांना भिडतात; फोटोंना नव्हे! या देशाला अणुयुगात आणि अंतरिक्ष युगात नेण्यासाठी धडपडणाऱ्या नेहरूंचे पाय जमिनीवर पक्के आहेत. स्वच्छतेसाठी प्रामाणिकपणे काय करावयास हवे, याचा ते शोध घेताहेत. दि.12 जून, 1960 रोजी परदेशातून पत्र पाठवून ते सांगताहेत, ‘या देशात स्वच्छता-कामगारांच्या हातात काठीला बांधलेला झाडू असतो. त्यामुळे त्यांचे वाकण्याचे श्रम वाचतात. अद्याप हे आपल्या लक्षात कसे आले नाही? यापुढे सर्व सफाई- कामगारांना लांब काठीला बांधलेली केरसुणी द्या. महत्त्वाचे म्हणजे, आपण त्यांना गणवेश द्यायला हवा. तो नेहमी स्वच्छ करून इस्त्री करून द्यावयास हवा. त्यामुळे त्यांचा स्वत:कडे व इतरांचा त्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यांचे जीवन सुसह्य होईल. त्यांचे सफाईचे काम अधिक चांगले होईल.’

नेहरू भारतभरच्या नव्हे, तर जगभरच्या मुलांचे लाडके चाचा होते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे- ते आपली काळजी घेताहेत, आपण सुरक्षित आहोत, ही भावना देशभर सर्वत्र सर्व स्तरांवर होती. अजाण मुलांना आपले वडील असेपर्यंत आपल्याला काही काळजी नाही, असे वाटते; ते या देशातील बहुसंख्य लोकांना वाटत होते. हे कसे होते, ते समजावून घ्यावयाचे असेल; तर 50 वर्षांपूर्वी नेहरू गेले, त्या वेळी देशभर सर्वत्र क्षणार्धात सन्नाटा पसरला. वडील गेलेत, आपले काय होणार म्हणून अजाण मुलांनी कावरे- बावरे, सैरभैर व्हावे, असे काहीसे झाले. सर्व भारतभर सर्व भाषांधून ही अगतिकता आणि असहायता सहजपणे व्यक्त झाली.

मंगेश पाडगावकरांनी त्या वेळी लिहिलेली कविता आहे, ‘महावृक्ष कोसळल्यावर’. त्या कवितेत या वृक्षाने आपणाला काय काय दिले आणि आपण अधीमधी त्याच्यावर दगड मारत राहिलो, याची खंत आहे. मात्र शेवटी ते म्हणतात, ‘महावृक्ष कोसळल्यावर भीती वाटते, भोवतालच्या खुरट्या झुडपांची, त्यांचे काटे आता आपली धोतरे ओरबाडतील याची!’ आचार्य अत्रे यांनी ‘सूर्यास्त’ असे म्हणत 13 मृत्युलेख लिहिले. मात्र ही भावना अधिक नेमकी आणि भेदक शब्दांत नारायण सुर्वे यांनी मांडली. त्या वेळी गरीब लोक चिमणी वापरत. पण चिमणीवर छोटी काच असे. फार गरीब लोकांकडे चिमणी असे, पण त्यावर काच लावण्याएवढे पैसे नसत. ते लोक प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून त्याभोवती वर्तानपत्राचे आवरण घालत. त्याला खोळ म्हणतात. सुर्वेंची कविता अशी आहे -

नेहरू गेले त्यावेळची गोष्ट

मी उदास खिन्न होऊन चाललो

रस्ते कसे भयाण वाटले

कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला

मी विचारले, ‘हा प्रकाश कशाला नेतोस बाबा?’

तो खिन्नपणे म्हणाला, ‘वा राव,

पुढे काळोख दात विचकीत असेल’

- नेहरू गेले त्यावेळची गोष्ट.

नेहरूंचे खरे मोठेपण हे की, अजाण मुलांनी वडिलांवर प्रेम करावे; आपण त्यांच्या हातात सुरक्षित आहोत, असे समजावे. ते गेल्यावर आपण आता पोरके झालो, असे त्यांना वाटावे आणि काही काळाने त्यांना समजावे- अरे, माझे वडील तर माझी सर्व व्यवस्था करून गेलेत!  गांधीजी आणि विवेकानंद यांच्याप्रमाणे नेहरूंनीही माणसे निवडली व घडवली.

 गेल्या वर्षी आपण यशवंतरावांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी केली, त्यांच्यावर सिनेमासुद्धा काढला! पण यशवंतरावांचे अलौकिक मोठेपण कुणीच अधोरेखित केलेले नाही. यशवंतराव हे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत, जे स्वातंत्र्यलढ्यात साधे सैनिक होते. गरीब कुटुंबात जन्मलेले होते. त्यापूर्वी सर्व मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते आणि बहुतेक सर्वजण श्रीमंत घरांत जन्मलेले होते. यात यशवंतरावांचे अलौकिक मोठेपण आहेच, पण तेच श्रेय त्यांना पुढे आणून घडवणाऱ्या पंडितजींकडे जाते.

नेहरूंनी या देशात लोकशाही प्रयत्नपूर्वक रुजवली. लोकशाही म्हणजे केवळ प्रत्येकाला एक मत नव्हे; तर दुसऱ्याच्या मताचा आणि संस्थात्मक रचनांचा आदर करणे, हे समजावून दिले. एकदा राज्यसभेत सर्वपल्ली राधाकृष्णन सभापती होते. एक मंत्री काही माहिती देत होता. नेहरू जागेवरून उठून दुसऱ्या मंत्र्यांकडून काही माहिती घेत होते. ‘हे योग्य नाही’ असे राधाकृष्णन यांनी म्हटल्यावर नेहरूंनी सभागृहाची माफी मागितली आणि पुन्हा कधी असे होणार नाही, म्हणून सांगितले. दि.5 जून, 1954 रोजी ‘मँचेस्टर गार्डियन’ने लिहिले, ‘ॲथेन्सला ग्रीसची शिक्षणभूमी म्हणतात. नेहरूंनी दिल्ली विकसनशील देशांची आणि आशियातील देशांची शिक्षणभूमी बनवली आहे. अप्रगत देश लोकशाही मार्गाने सर्वंकष प्रगती करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलंय.’

नेहरूंचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. अनेक मान्यवरांनी त्याबद्दल गौरोवोद्‌गार काढलेत. या खंडप्राय  देशात त्यांनी लोकशाही प्रयत्नपूर्वक रुजवली आणि काही चांगले संकेत प्रस्थापित केले. जगभरचे सारे विचारवंत हे मान्य करतात. मात्र भारतातील काही जण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तीन वेगळे मुद्दे अतिशय विकृत किंवा चुकीच्या पद्धतीने पुन:पुन्हा मांडतात. या देशाच्या फाळणीला नेहरू- गांधी जबाबदार आहेत, काश्मिरची चिघळणारी जखम नेहरूंमुळे झाली आणि या देशाचा 1962 मध्ये चीनसमोर जो दारुण पराभव झाला, त्याला फक्त नेहरू जबाबदार आहेत. या तीनही गोष्टी आपण विचारात घेणार आहोत. मात्र, त्यापूर्वी नेहरूंचे एक शक्तिस्थान- जे त्यांचे मर्मस्थानही आहे- ते लक्षात घ्यावयास हवे आणि या शक्तिस्थानाबाबतही नेहरू आणि विवेकानंद जुळे भाऊ आहेत, असे वाटावे एवढे त्यांच्यात साम्य आहे.

विवेकानंदांनी 1 नोव्हेंबर, 1896 रोजी लंडनहून अमेरिकेत मेरी हेल यांना पत्र पाठवताना लिहिले, ‘मेरी, मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद ही परिपूर्ण रचना आहे, असे मानत नाही. पण मानवजातीने आजवर ज्या रचना वापरल्या, त्या सर्वांहून ही रचना अधिक चांगली आहे. ती आपण प्रत्यक्षात आणू, त्या वेळी त्यातील त्रुटी समजावून घेऊन आपण ती परिपूर्ण करू.’ नेहरू आजन्म हेच करीत होते. काँग्रेसमधील डाव्या समाजवादी विचारांचा चेहरा म्हणून नेहरू स्वातंत्र्यलढ्यात 1920 मध्ये आले. वयाच्या 40 व्या वर्षी म्हणजे 1929 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्या वेळी त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. मी समाजवादी आहे, असे स्पष्टपणे सांगितले आणि काँग्रेस पक्ष डाव्या बाजूला वळविला.

मात्र, नेहरू आणि विवेकानंद यांचे जे शक्तिस्थान आणि मर्मस्थान आहे, ते हे नव्हे. नेहरूंना एकूण नऊ वर्षांचा तुरुंगवास झाला. नक्की आकडा सांगायचा तर तो तुरुंगवास 3265 दिवसांचा आहे. मात्र त्यातील फक्त दीड वर्ष सक्तमजुरीची आहेत. लोकमान्यांना मंडालेला होत्या त्या मानाने खूप कमी सोई-सवलती तुरुंगात नेहरूंना होत्या. बालपण प्रचंड राजेशाही थाटात गेलेल्या व्यक्तीला तर प्रथम त्या फारच जाचक वाटत असणार. मात्र एकांत, वाचन, लेखन यातून नेहरूंनी या कालखंडाचे सोने केले. नेहरूंनी या कालखंडात बारा-तेरा पुस्तके लिहिली. त्यांमध्ये रशियात साम्यवाद आल्यावर काही काळाने तेथे हिंडून केलेले अवलोकन नोंदवणारे ‘सोविएत रशिया’ हे पुस्तक आहे. आल्हाददायक ललित निबंध वाटावेत असे ‘ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात’, ‘काश्मीरची सहल’, ‘पावसाळ्यातील विमान उड्डाण’, ‘रेल्वेच्या डब्यातील सुट्टी’ इ. अनुभव आहेत. ते सर्व ‘युनिटी ऑफ इंडिया’ या पुस्तकात समाविष्ट आहेत.

मात्र त्यांचे बहुचर्चित असे तीन ग्रंथ म्हणजे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ आणि ‘ॲन ऑटोबायोग्राफी’. त्यांतला शेवटचा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा आहे. भारतातील त्यावेळची भयावह परिस्थिती, ब्रिटिशांच्या राजवटीचे खरे स्वरुप या पुस्तकातून त्यांनी जगासमोर आणले. जगभरच्या विचारवंतांनी भारताचे खरे प्रश्न या पुस्तकाने आम्हाला समजावून दिले म्हणून सांगितले. पण महत्त्वाचे म्हणजे नेहरूंची प्रसन्न, ओघवती सहजसुंदर शैली याच्या प्रेमात जगभराचे लेखक सापडले. या मनमोहक शैलीचे जॉन गुंथर, लॉर्ड आयर्विन, एडवर्ड थॉम्पसन आणि मादाम चँग कै शेक यांनी वारेमाप कौतुक केले. जॉन गुंथरने तर लिहिले, ‘आजच्या जगातील सर्वांत सुंदर शैलीदार इंग्रजी लिहिणाऱ्या दहा लेखकांची जर आपण नावे लिहिली, तर त्यांत नेहरूंचा समावेश करावा लागेल.’

नेहरूंप्रमाणे विवेकानंदांचीही इंग्रजी भाषेवर प्रसन्न, ओघवती अशी पकड आहे. ते त्यांचे प्रमुख शक्तिस्थान आहे. नेहरू आणि विवेकानंद यांनी प्रयत्नपूर्वक हे केलेय की, हा त्यांचा स्वधर्म आहे, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही. मात्र याचे महत्त्व विवेकानंदांनी ओळखलेय. आपल्या शिष्यांना त्यांनी लिहिलेय, ‘आपल्याकडे फक्त दोन शस्त्रे आहेत. इंग्रजी भाषा ही आपल्या हातातील तलवार आहे. संस्कृत ही ढाल आहे. इंग्रजीच्या मदतीने आपण परकीयांवर वार करून, संस्कृतची ढाल वापरून सनातनी मंडळीपासून आपले रक्षण करू. आमच्या वेदांत शूद्रांना वेदाध्यायनाचा अधिकार नाही, असे कुठेच म्हटलेले नाही, हे दाखवून आपण त्यांची बोलती बंद करू.’

विलक्षण प्रसन्न, रुबाबदार, मोहक व्यक्तिमत्त्व, इंग्रजी भाषेवरची श्रोत्यांना भुरळ पाडणारी पकड यामुळे काय झाले असेल, ते आपण ओळखू शकतो. सुंदर स्त्रियांवर पुरुषांनी मोहित व्हावे आणि देखण्या कर्तृत्ववान पुरुषांचे स्त्रियांनी सहजपणे कौतुक करावे, हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे आंबटशौकीन माणसांनी विवेकानंद आणि नेहरू यांच्याबाबत अशोभनीय चर्चा केल्याचा त्रास या दोघांना सारखाच झालाय. हा भटका संन्यासी- ज्याला धर्म अजिबात माहीत नाही- तो फक्त स्त्रियांना मोहित करतोय, भुरळ पाडतोय म्हणून विवेकानंदांवर केवळ अमेरिकेतील रमाबाई सर्कलने टीका केलेली नाही, ब्राह्मो समाजातील अनेक सनातनी मंडळींनीही तसा विखारी प्रचार केलाय.  भगिनी निवेदितांना मंदिर प्रवेश नाकारलाय! या दोघांच्यातील दाखवता येईल तेवढे हे साम्य किंवा अद्वैत बाजूला ठेवू! विवेकानंदांप्रमाणेच नेहरूंची परदेशातील जनमानसावर विलक्षण पकड आहे. जगभर भारताला ‘गांधी-नेहरूंचा देश’ म्हणून ओळखले जात होते. आता देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी काय झाले ते पाहू.

फाळणीला नेहरू गांधी जबाबदार आहेत का? हे तपासायला हवे. सुरुवात आपली अखंड भारताची जी कल्पना आहे तेथून करूया. ब्रिटिशांनी आपले प्रशासकीय कौशल्य आणि सैनिकी सामर्थ्य यांच्या जोरावर जो भूभाग एकत्र ठेवला तो आपला अखंड भारत, अशी आपली कल्पना आहे. नेपाळ हे जगातील शेवटचे हिंदू राष्ट्र. सामाजिक- धार्मिक अशा अनेक अंगांनी भारताला फार जवळचे. पण नेपाळ भारताचा भाग आहे, असे भारतातील जनतेने अगदी हिंदुत्ववादी पक्षांनीसुद्धा म्हटले नाही. आजही म्हणत नाहीत. नेपाळ नरेश व नेपाळी हिंदू जनता यांनीही त्यावेळी राहू दे, आजही असे काही म्हटलेले नाही.

अफगाणिस्तान तर महाभारतापासून भारताशी जोडलेला. त्यातून अफगाणिस्तान मोगल साम्राज्याचाही भाग होता. मात्र आम्ही भारताचे वा पाकिस्तानचे, असे अफगाणिस्तानातील कोणी म्हणत नाही. भारतात किवा पाकिस्तानातही ‘ही ब्याद आपणाला नको’ असेच कदाचित अनेकजण म्हणतील. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, ‘अखंड भारत’ म्हणणारे वीर सावरकरसुद्धा त्यावेळी वेगळ्या मन:स्थितीत होते. त्रावणकोर कोचीनच्या महाराजांनी त्यावेळी चक्क रुझवेल्टला लिहिलेले पत्र आता उपलब्ध आहे. त्यांनी लिहिलंय ‘जगातील सर्वांत समृद्ध असे थोरियमचे साठे माझ्या राज्यात आहेत. थोरियम हे उद्याचे अणूभट्‌ट्यांचे इंधन आहे. तुमच्या माझ्यामध्ये फक्त समुद्र आहे. मी स्वतंत्र राष्ट्र झालो तर थोरियमबद्दल अत्यंत स्वस्त असा दीर्घकालीन करार आपणाशी करावयास तयार आहे.’ भारत एकत्र राहावा म्हणून मनापासून प्रयत्न करणाऱ्या रुझवेल्ट यांनी या पत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले. पण वीर सावरकरांनी त्रावणकोर-कोचीन वेगळे राष्ट्र व्हावे, याला मान्यता दिली होती. सावरकरभक्त द.न.गोखले यांनी मौज प्रकाशानाने प्रसिद्ध केलेल्या सावरकरांच्यावरील त्यांच्या ग्रंथात याची नोंद केली आहे.

आता स्वातंत्र्य कसे मिळाले व त्यावेळी काय झाले ते जरा नीटपणे लक्षात घेऊ. 1930 साली इंग्रज सरकारने त्यांचे गुप्तहेर भारतातून फिरवले होते. त्यांनी अहवाल दिला होता. 2050 पर्यंत ही वसाहत सोडावी लागणार नाही. गांधीजींच्या आंदोलनामुळे कुकरमधील वाफ थोडी वाढेल वा कमी होईल, चुटपूट क्रांतिकारी घटना होतील. याहून अधिक काही होणार नाही. 1940 मध्ये अहमदाबाद येथे सर सॅम्युअल होअरे (Sir Samuel Hoare) यांचा सत्कार होता. ते वसाहतीचे सचिव होते. त्यांनी इंग्लडच्या लोकसभेत सांगितले होते. ‘भारत अजून स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी सक्षम झालेला नाही.’ त्यांच्या त्या भाषणाचा आधार घेऊन सरदारांनी त्यांना सांगितले, ‘आपण एक गोष्ट विसरत आहात, हे युद्ध हरलात, तर आपण सारे काही गमावून बसलेले असाल आणि आपणाला विजय मिळाला तरी तो वांझोटा असेल. एक नवी जागतिक रचना आता साकार होणार आहे. कोणताही देश आता दुसऱ्या देशाला पारंतंत्र्यात ठेवू शकणार नाही. भारताचं काय घेऊन बसलाय, साऱ्याच वसाहती तुम्हाला सोडाव्या लागतील.’

1940 मध्ये 18 नोव्हेंबरला गांधीजींनी पुकारलेल्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल सरदारांना अटक झाली. अर्थात पटेलांनी जे उघडपणे सांगितले ते इंग्रजांनी आधीच ओळखले होते. देश सोडताना आपले हितसंबंध कसे राखले जातील याबाबतची त्यांची व्यूहरचना सुरू होती. त्यावेळी नक्की काय झाले ते नरेंद्रसिंग सरिला यांनी त्यांच्या ‘दअनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज पार्टीशन’ या त्यांच्या पुस्तकात दिलंय. नरेंद्रसिंग सरिला यांनी अनेक देशांत आपले अँबॅसेडर म्हणून काम केलंय. राष्ट्रसंघातील आपल्या स्थायी समितीचे ते सदस्य होते. गुप्त कागदपत्रे मुक्त झाल्यावर लंडनमधील पार्लमेंटच्या ग्रंथालयात बसून त्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हा सारा विलक्षण इतिहास मांडलाय. एकसंध भारताला स्वातंत्र्य द्यावे, ही रुझवेल्ट यांची प्रामाणिक इच्छा आहे. रुझवेल्टला फारसे न दुखावता हे कसे टाळावयाचे हा चर्चिलसमोरचा प्रश्न आहे. नेहरू आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा व ओळखी वापरून रुझवेल्टवर दबाव आणताहेत. क्रिप्स योजनेच्यावेळी काय झाले ते पाहू.

 नेहरूंच्या प्रेमात असलेल्या चँग कै शेख आणि मादाम चँग कै शेख यांनी आपला भारताचा दौरा संपविला आणि रुझवेल्टला 25 फेब्रुवारी, 1942 रोजी ‘एकसंध भारत लोकशाही मार्गाने स्वातंत्र्य पेलण्यास सक्षम आहे. जपानविरुद्धची आपली लढाई जिंकण्यासाठीही ते आवश्यक आहे,’ असे कळविले. चर्चीलला या पत्राचा सुगावा लागला. त्याने 26 फेब्रुवारी, 1942 रोजी रुझवेल्टला तारेने कळविले, ‘काँग्रेसच्या हातात सत्ता देण्यास, भारत एकसंध ठेवण्यात एक फार मोठा धोका आहे. भारतातील सैन्यात 75 टक्के मुसलमान आहेत. त्यांची देशातील संख्या दहा कोटी आहे. तीन-चार कोटी दलित आहेत. पुन्हा संस्थाने, मुसलमान सैनिकांना न दुखावता हे सारे कसे करावयाचे हा यक्षप्रश्न आहे.’ सैनिकप्रमुखाने चर्चिलच्या लक्षात आणून दिले, सैन्यात फक्त 35 टक्के मुसलमान आहेत.’ चर्चील त्याला म्हणाला ‘मला शिकवू नकोस. मला खरी आकडेवारी माहीत आहे, पण राजकारणात खोटे बोलणे गरजेचे असते.’

 मात्र रुझवेल्ट जागरूक आहेत. रुझवेल्ट यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करून तोडगा काढण्याची गरज ओळखली आहे. क्रिप्स 22 मार्च, 1942 रोजी भारतात आले ते त्यामुळे. मात्र क्रिप्स खरे काय करताहेत हे त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्यावर नजर ठेवून आपणाला कळविण्याची जबाबदारी रुझवेल्ट यांनी त्यांचे विश्वासू मित्र कर्नल जॉन्सन यांच्यावर सोपवली आहे आणि जॉन्सन रुझवेल्ट यांना कळवतोय ‘क्रिप्स काँग्रेसला अजिबात मान्य होणार नाही अशा योजना सुचवतोय आणि मुसलमानांचा एकसंध हिंदुस्थानला वा काँग्रेसला विरोध आहे, असे मला वाटत नाही.’

क्रिप्सचा आडमुठेपणा मोडीत निघावा, अशी एक तडाखेबंद घटना 6 एप्रिल, 1942 रोजी झाली. जपानी विमानांनी विशाखापट्टणम्‌ आणि काकीनाडा येथे विमानातून बाँबवर्षाव केला. या विमानांचा मुकाबला किंवा पाठलाग करण्यासाठी ब्रिटिशांच्याकडे त्यावेळी एकही विमान नव्हते. साऱ्या भारतभर विखुरलेल्या फक्त नऊ विमानविरोधी तोफा भारतात आहेत. जपान्यांनी ब्रह्मदेश घेतलाय. बंगालच्या महासागरात त्यांचे वर्चस्व आहे. गांगरलेल्या क्रिप्स यांना नेहरू आणि जॉन्सन यांनी गुंडाळले. भारताला हंगामी स्वराज्य द्यावे. मात्र युद्ध संपेपर्यंत भारतीय सेना इंग्रजी सेनापतीचे हुकूम पाळतील, असा करार होत आला होता. भारतात त्यावेळी असलेले व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी लगेच अस्वस्थ होऊन ही गोष्ट चर्चील यांना कळवली. चर्चीलने क्रिप्स यांना ‘तुला दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडून काहीही करावयाचा अधिकार नाही,’ असा सज्जड दम दिला आणि त्याच दिवशी 11 एप्रिल रोजी रुझवेल्टला क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्याचे कळवले.

मात्र रुझवेल्ट यांना कर्नल जॉन्सनकडून सर्वकाही कळत होते. त्यांनी चर्चीलला खरमरीत पत्र पाठवून कळवले, ‘मलाच नव्हे तर अमेरिकन जनतेलाही हे पटत नाही. आम्हाला वाटते आहे, तुम्हाला काही करायचे नाही.’ चर्चील रुझवेल्टचे बारसे जेवलाय. त्याने 12 एप्रिलला रुझवेल्ट यांना पत्र पाठवले. पत्रातला मजकूर असा, ‘तुम्ही मला थोरल्या भावासारखे आहात. तुमच्या प्रत्येक शब्दाला माझ्या आयुष्यात केवढे स्थान आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पण परिस्थिती फार गोंधळाची आहे. मी खरेच गोंधळलोय आणि आता लगेच काहीच करता येणार नाही. कारण, परत येण्यासाठी क्रिप्स कालच बोटीत बसलाय!’

इंग्रजांना फाळणी हवी आहे आणि ती मुसलमानांच्या गळी कशी उतरावयाची हा त्यांच्यासमोरचा खरा प्रश्न आहे. कारण पंजाब आणि बंगालचे मुसलमान मुख्यमंत्री सिकंदर खान आणि फाजल अली 1945 पर्यंत फाळणीच्या विरोधी आहेत. त्यांचे बरोबर आहे. स्वतंत्र भारतात ते 25 टक्के असणार होते. लोकसभेत त्यांचा एक प्रबळ गट बनू शकत होता. ज्या प्रांतात त्यांचे बहुमत होते, त्या प्रांतात त्यांचेच राज्य असणार होते. महत्त्वाचे म्हणजे फाळणी झाली, तर ज्यात ते मनापासून गुंतलेत अशा अनेक वास्तू, जामा मशीद, लाल किल्ला, आग्र्याचा किल्ला, अजमेर शरीफ, निजामउद्दीन दर्गा, ताजमहल, कुतुबमिनार कायम त्यांच्या नजरेआड होणार होते.

ब्रिटिशांनी जीनांना उभे करून फाळणी या देशाच्या गळ्यात कशी मारली ती जिज्ञासूंनी मूळ पुस्तकातून वाचावयास हवे. 3 जून, 1947 रोजी इंग्रजांनी फाळणीची  घोषणा दिल्लीत केली. त्यानंतर एक आठवड्याने इंग्लंडमधील मजूर पक्षाचे वार्षिक अधिवेशन इंग्लडमध्ये मारगेट येथे होते. इंग्लडचे परराष्ट्र सचिव अरनेस्ट बेव्हिन यांनी त्या सभेत सांगितले ‘भारताची फाळणी आपल्या दृष्टीने आवश्यक होती. कारण रशिया आणि प्रामुख्याने आखाती देश यांच्यावर नजर ठेवून त्यांना आपल्या माऱ्याच्या टप्प्यात ठेवण्यासाठी कराची, लाहोर यांचा आपणाला सैनिकी तळ उभारण्यासाठी उपयोग करावा लागेल. स्वतंत्र, एकसंध भारतात आपणाला अशी परवानगी मिळाली नसती.’ मजूर पक्षाचे सन्माननीय सभासद म्हणून कृष्णमेनन या सभेत उपस्थित होते. मार्च 1947 रोजी माऊंटबॅटन भारताचे व्हाईसरॉय झाले होते. त्यांना मेनन यांनी याबाबत खरमरीत पत्रही पाठवले.

आपला मुद्दा वेगळा. काँग्रेसला फाळणी टाळावयाची होती. त्यांनी तसे शर्थीने प्रयत्न केले. पण इंग्रजांना ती हवी होती. त्यांच्यादृष्टीने त्यांची ती गरज होती. मग प्रश्न पुढे येतो, की काँग्रेसने ‘फाळणीसकट मिळणारे स्वातंत्र्यच आम्हाला नको,’ असे काही का म्हटले नाही? एक दाहक वास्तव समजावून घ्यावयास हवे. आपण स्वातंत्र्य मिळवले नाही, ब्रिटिशांनी ते दिले. त्यांना ते बदलत्या परिस्थितीत गरजेचे होते. भारतातील इतर सर्व चिल्लर पक्षांच्या तुलनेत काँग्रेस फार मोठी होती. पण काँग्रेसचे सामर्थ्य आणि मर्यादा लक्षात घ्यावयास हव्यात. काँग्रेसने या खंडप्राय देशात सर्व जाती- जमाती, भाषांचे गट, काही प्रमाणात मुस्लिम समाज, यांच्यात तळागाळात व शहरात आणि महानगरातही रुजवलेली अशी एक देशव्यापी संघटना उभी केली. महत्त्वाचे म्हणजे, ही संघटना सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही मानणारी होती.

इंग्रजांना ज्यावेळी हा देश सोडावा लागेल, त्या वेळी तो काँग्रेसच्याच हातात येईल आणि सर्वधर्मसमभाव व लोकशाही या दोन गोष्टींचे रक्षण करीत हा देश चालवायला ही संघटना सक्षम असेल. मात्र याच्यापलीकडे जाऊन ब्रिटिशांच्याकडून राज्य जिंकून घेण्याची ताकद त्यांच्याकडे अजिबात नव्हती. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्याचे वारेमाप कौतुक करताना त्याचा पार फज्जा उडालाय हे आपण विसरतो. काही महिन्यांत ही चळवळ मंदावली आणि संपली. काही हजार लोक तुरुंगात गेले. गंगेच्या खोऱ्यात, प्रामुख्याने बिहारमध्ये विमानातून गोळीबार करून दोन हजार माणसे मारावी लागली. पण या तीन-चार महिन्यातही हा खंडप्राय देश चिडीचूप होता. न्यायालये व्यवस्थित सुरू होती, झाले ते एवढेच की चर्चीलने रुझवेल्टला कळवले ‘गांधींचा भारतीय जनमानसावरचा पगडा किती कमी आणि वरवरचा आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यातून अगदी हा लढा सुरू झाला, त्या दिवशीही आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी आपल्या सैन्यात सामील होण्यासाठी प्रचंड गर्दी करून हिंदू- मुसलमान तरुण येत होते. त्यातून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. गांधींचा शांतीचा मुखवटा हा असा आहे, हे पण आपल्या लक्षात येते.’

हे सारे मान्य केले, तरीही फाळणी नाकारून काँग्रेस आणखी काही काळ द्यावा लागेल अशा आंदोलनात का उतरली नाही? त्यावेळची परिस्थिती लक्षात घ्यावयास हवी. इंग्रज जाणार हे समजल्यावर आपणच स्वतंत्र व्हावे, आपले नवे राष्ट्र स्थापन करावे, यासाठी अनेक गट कार्यरत होत होते. त्रावणकोर-कोचीनच्या महाराजांनी काय केले आणि त्या स्वतंत्र राष्ट्राला कुणी पाठिंबा दिला हे आपण पाहिलंय. राजस्थान आणि मध्यप्रदेशातील संस्थानिक स्वत:चा गट स्थापन करून ती मागणी करत होते आणि त्यांची, त्यांच्या विभागातील लोकप्रियता त्यावेळी प्रचंड होती. खरं तर आजही आहे. खलिस्तान आणि द्रविडीस्तान हे केव्हाही भडका घेऊ शकतील असे निखारे होते. ते राहू देत, सुभाषबाबूंचा भाऊ आणि सुऱ्हावर्दी हे दोघे अखंड बंगाल राष्ट्राची मागणी करून उभे होते. ब्रिटिशांनी यातील कोणताही पर्याय स्वीकारला असता. काँग्रेसला बाजूला सारून!

आणि मग अनेक शतके होता तसा छोट्या-मोठ्या राजांच्या आपापसातील यादवी युद्धात हा देश कायमचा सापडला असता. देश स्वतंत्र करून स्वतंत्र झालेला विभाग यादवी युद्धापासून वाचवून, त्यात लोकशाही रुजवून, सर्वधर्मसमभाव जोपासत त्याला प्रगतीच्या मार्गावर न्यावयाचे तर त्यावेळी फाळणी स्वीकारणे एवढाच एक मार्ग होता.

संस्थांनांचा आणि काश्मीरचा प्रश्न पण शांतपणे लक्षात घ्यावयास हवा. संस्थानांच्या प्रश्नांची जाणीव नेहरूंना पटेलांपेक्षा जास्त आहे. त्याची दाहकता सर्वाधिक नेहरूंनी सोसली आहे. नेहरूंना आयुष्यातील पहिली अटक नाभा संस्थानात झाली आणि चक्क रस्त्यावरून त्यांना हातात हातकड्या घालून नेले. आता आपला विश्वासही बसणार नाही; पण स्वातंत्र्यापूर्वी काही आठवडे आधी नेहरूंची शेवटची अटक काश्मीरमध्ये राजा हरिसिंग यांनी केली होती, जे सरदार पटेलांचे फार जवळचे मित्र होते. नेहरूंनी 1927 मध्ये सर्व संस्थानांधील रयतेची एक संघटना  बनवली. संघटनेचे नाव ‘ऑल इंडिया स्टेटस्‌ पीपल्स कॉनफरन्स’. नेहरू त्याचे पहिले अध्यक्ष होते. नेहरूंनी ती काँग्रेसची एक शाखा न ठेवता 1935 मध्ये सर्वांसाठी खुली केली.

संस्थानिकांचा प्रश्न फार मोठा होता; पण तो फार सोपा होता, असे लोहिया का म्हणालेत, हे लक्षात घ्यावयास हवे. या संस्थानिकांनी पाच लाख चौरस मैलांचा प्रदेश व्यापला होता. म्हणजे भारताचा 48 टक्के भूभाग त्यांच्या अमलाखाली होता. त्यांची लोकसंख्या 8 कोटी 65 लाख म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या 27 टक्के होती. त्यांच्या मुलखात पसरलेले 12 हजार मैल लांबीचे रेल्वेचे जाळे होते. त्यांची स्वत:ची छोटी-मोठी सैन्ये होती. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या-त्यांच्या विभागात त्यांची लोकप्रियता अमाप होती किंवा त्यांची रयत त्यांना देव मानायची.

हे सारे खरे; पण हे सारे कणाहीन होते. केंद्रीय सत्तेपुढे मुजरा करावयाचा असतो, हे त्यांच्या रक्तात होते. अगदी अवधची राणी, झाशीची राणी, सातारचे प्रतापसिंहमहाराज, नानासाहेब पेशवे हे सगळे ‘आमची संस्थाने खालसा करू नका,’ एवढीच विनवणी केंद्रीय ब्रिटिश सरकारला भारतात वा लंडनला जाऊन करीत होते. आपणाला पटो न पटो; लोहियांच्या मते, संस्थानांचे विलीनीकरण काही कठीण नव्हते. मला स्वत:ला हे पूर्णपणे पटत नाही. मात्र त्या वेळी सजग असलेले पंडितजी सरदारांना पत्र पाठवून सांगत होते की, ‘आपण संस्थानिकांना कारण नसताना जास्त तनखा मान्य करताय. तो यापेक्षा खूप कमी हवा.’

हैदराबाद पोलीस ॲक्शनवेळी- ज्याला जगभर लष्करी कारवाई समाजतात, त्याला- त्या वेळी नेहरूंचा विरोध होता, हे खरे आहे. मात्र नेहरूंचा विरोध कृतीला नव्हता, तर योग्य वेळ कोणती यावर होता. नंतर नेहरूंनी जिथे दुसरे युरोपियन राष्ट्र समोर होते, अशा गोव्यात सैनिकी कारवाई करून गोवा भारतात विलीन केला. काश्मीरचा प्रश्न तर अजूनही ऐरणीवर येतो. हा प्रश्न आपण युनोत नेला नसता, तरीही आज सुटलेला असता का? किंवा भारताचे माजी परराष्ट्रसचिव राम साठे जे म्हणालेत, ‘एखाद्या भूभागाला एखाद्या देशात रहावयाचे नसेल तर आजच्या काळात ते सैनिकी बळ वापरून करता येणार नाही. (एखाद्या बाईला नांदायचे नसेल तर हातात वहाण, काठी किंवा तलवार घेऊन ‘कशी नांदत नाही, ते बघतो’ असे म्हणण्यासारखं ते होईल.) दोन व्यक्ती, दोन भूभाग एकत्र राहू शकत नसतील; तर त्यांनी समंजसपणाने, गुण्यागोविंदाने म्हणजे ‘सिव्हिलाइजड्‌ वे’ वापरून वेगळे व्हावयास पाहिजे.’

त्यांचे सर्वच विचार मला पटतात, असे नव्हे. पण त्यांचे हे पत्र घेऊन 1988 मध्ये मी बलराज मधोक, शहाबुद्दीन, आशिष नंदी, मधु लिमये अशा अनेकांना प्रश्न विचारून त्यावरचा एक परिसंवाद ‘नवभारत’ मासिकाच्या दिवाळी अंकात दिला होता. (अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘ना डावे-ना उजवे’ या माझ्या पुस्तकात तो आहे. ते असो.) आपला मूळ मुद्दा असा की, प्रश्न युनोत नेल्याने आपला त्या वेळी फायदा आणि दीर्घकालीन तोटा झाला का? समजा- तो तसा नेला नसता- तरी काश्मीर कायम शांत राहिला असता का? खलिस्तानची चळवळ का उभी राहिली? युनोत प्रश्न होता म्हणून? आणि युगोस्लाव्हिया का फुटला? आणि स्कॉटलंडला आपल्यापासून वेगळे व्हायचे आहे का, हे ठरवण्यासाठी ब्रिटनला सार्वत का घ्यावे लागले?

आजच्या जगात या प्रश्नाचा नीटपणे मुळापासून विचार करण्याची गरज आहे का, पण तेही असो. आत्ता लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच की, नरेंद्रसिंग सरिलाचे पुस्तक सांगते- काश्मीरच्या फाळणीला शेख अब्दुल्ला, सरदार पटेल आणि नेहरू या तिघांचाही पाठिंबा होता. अखंड भारताचा विचार करून जर सैन्यबळाच्या जोरावर काश्मीर भारतात ठेवायचा, तर रशियाने सैन्यबळाच्या जोरावर जसा क्रिमिया रशियाला जोडावा तसा सैन्यबळाच्या जोरावर नेपाळ भारताला जोडायचा का? सांगण्याचा मुद्दा वेगळा. फाळणीच्या वेळी नेहरू-गांधी फसले किंवा चुकले नाहीत, त्याचप्रमाणे काश्मीर प्रश्नात नेहरू-पटेल चुकलेले वा फसलेले वाटत नाहीत.

चीनसमोर भारताचा मानहानिकारक असा पराभव झाला. पटेल चीनबाबत सजग होते. मात्र नेहरू त्याबाबत गाफील होते, असे म्हणता येईल का? दि.7 नोव्हेंबर, 1950 रोजी पटेलांनी नेहरूंना या प्रश्नावर विस्तृत पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी सांगितले आहे, ‘भारत-तिबेट यांच्यामध्ये 1914 मध्ये करार झाला होता. म्हणजे तिबेट हे सार्वभौम राष्ट्र होते. चीनमध्ये तिबेट सामील झाल्यामुळे त्यांच्याबरोबरचे जुने सारे करार रद्दबातल होतात,’ हे सांगून त्यांनी ‘भांडवलशाही मानणारी राष्ट्रे आक्रमक असतात त्याचप्रमाणे साम्यवादी राष्ट्रेही असतात, हे अजून तुच्या लक्षात आलेले दिसत नाही,’ असे म्हटले आहे. नेहरू त्या वेळी सावध होते की नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, नंतर ते सावध होते, हे नक्की सांगता येते. नेहरूंनी 1 ऑक्टोबर, 1959 रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवले,  त्यात स्पष्टपणे सांगितलेय, ‘चीन हा वेगाने वाढणारा देश आहे. तो सर्व बाजूंनी विस्तारित होण्याचा प्रयत्न करणार. त्याच्या मोठ्या आकारामुळे व बळामुळे पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. चीनची वाढती लोकसंख्या आणि एकजिनसीपणा आपल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका चीनपासून निर्माण होऊ शकतो.’

त्यानंतर भारताने तयारी केली होती की नाही? केलेली तयारी अपुरी होती का? याला जबाबदार कोण, हे पाहावयास हवे. प्रथम तिबेटचे काय झाले, ते पाहू. त्या वेळी चीनचे सैन्यदल 25 लाख बळाचे होते. ते रशिया आणि अमेरिका यांच्या एकत्रित सैन्यदलापेक्षा जास्त होते. कोणत्याही मोठ्या युद्धात उतरण्याची अमेरिकेची मानसिकता नव्हती. रशियाची सहानुभूती, किमान त्या वेळी तरी, चीनच्या बाजूने होती. युद्ध करायला तिबेट ही जागा भारतापेक्षा चीनला अनेक पटींनी सोईची होती. महत्त्वाचे म्हणजे, अपरिहार्य परिस्थितीत जगात त्या वेळी व आजही असे होते. तिबेट तर एकटा होता. क्रिमिया हा युक्रेनचा भाग होता. युक्रेन एकटा नव्हता, त्याच्यामागे नाटो आणि पर्यायाने अमेरिका होती. युक्रेन, नाटो, अमेरिका थोड्याफार शिव्या पुटपुटत शांत राहिले आणि युक्रेन हा रशियाचा भाग बनला.

सन 1962 च्या युद्धाच्या वेळी आपली तयारी चीनच्या मानाने फार अपुरी होती, हे खरे आहे. हे कुणामुळे वा कसे झाले याचा अभ्यास गरजेचा आहे. पण समजा- भारताने आपल्यापरीने पूर्ण तयारी केली असती, तरी परिस्थिती फारशी बदलली असती का? दुसऱ्या महायुद्धात फ्रान्स दोन दिवसांत का कोसळला? कलकत्त्यात लोकांना उपाशी मारून, रसद पुरवणारी आणि वीस लाख सैन्य पुरवणारी भारत ही वसाहत ताब्यात नसती; तर किमान पहिल्या लाटेत ब्रिटनचे काय झाले असते?

ज्या वेळी एखादा क्रूर, आक्रस्ताळी हुकूमशहा आपली सारी ताकद वापरून पुढे येतो; त्या वेळी जगभर काय झालंय? चीनने हे आक्रमण का केले, हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. त्यांना प्रचंड किंमत मोजूनही भूभाग जिंकावयाचा नव्हता, लूटमार करून खंडणी गोळा करायची नव्हती, त्यांचा विचारही भारतात पसरावयाचा नव्हता; उलट यामुळे भारतातील साम्यवादी पक्ष अडचणीत येईल, अप्रिय होईल, हे समजत होते. चीनने आक्रमण का केले, हे अजूनही कोडे आहे.

भारताचे माजी परराष्ट्रसचिव जगत मेहता त्याबाबत जे म्हणालेत, ते आज तरी थोडेफार बरोबर वाटते. ‘‘माओला आपली ताकद जागतिक स्तरावर दाखवायची होती. ‘आम्ही आक्रस्ताळे आहोत. आमची खोडी काढू नका. तुम्ही अणुबॉम्ब वापरलात तरीही आमचे काही कोटी लोक जिवंत राहतील! म्हणून मी क्रूरकर्मा आहे. युद्धात कारण नसतानाही कितीही सैनिक मी सहजपणे मारू शकतो आणि आशियात तरी मी सर्वश्रेष्ठ आहे,’ हे माओला तेव्हा अमेरिकेला सांगायचे होते.’’ मात्र हे पण अंदाजच आहेत. पुढे कधी तरी चीनची कागदपत्रे गुप्ततेच्या बंधनातून मोकळे होतील तेव्हा तिकडचे कोणी नरेंद्र सरिला आपल्यासमोर वेगळेच चित्र ठेवतील.

किमान आपल्या बाजूने काय झाले, ते तरी आपण उघड केले पाहिजे. ‘हँडरसन ब्रुक्स भगत अहवाल’ प्रसिद्ध केला पाहिजे. तसा तो फुटलाच आहे. मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियन वार्ताहराने याच वर्षी त्यातील काही भाग ‘द संडे गार्डियन’मध्ये प्रसिद्ध केलाय. त्यात त्याने म्हटलेय, ‘सरकारने सैन्याला चौक्या उभारण्याचे आदेश दिले होते. सैन्याने चौक्या उभारल्या; मात्र त्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागते, ती केली नाही. त्यामुळे तयारी न करता आपण चीनला डिवचले.’ हे पण पूर्णपणे खरे असेल, असे नव्हे. मात्र हा अहवाल बाहेर येऊन त्यावर साधक-बाधक चर्चा व्हायला हवी. नेहरूंच्या 125 व्या जन्मवर्षात आणि 50 व्या स्मृतिवर्षात त्यांना ही खरी श्रद्धांजली असेल. कारण मोकळी चर्चा हा नेहरूंचा श्वास होता. ‘मॉडर्न रिव्ह्यू’ या मासिकात नेहरूंवर वारेमाप टीका करणारा, त्यांचे अनेक दोष अधोरेखित करणारा एक लेख ‘चाणक्य’ या नावाने प्रसिद्ध झाला होता, तेव्हा दबक्या आवाजात बरीच उलटसुलट चर्चा झाली. मग जॉन गुंथर यांनी सांगितले, ‘हा लेख चाणक्य या टोपणनावाने नेहरूंनीच लिहिला आहे.’ खुली चर्चा, निर्भय चर्चा याचे या महामानवाने कायम स्वागत केलेय.

Tags: राष्ट्र मुस्लिम हिंदू फाळणी इंग्रज भारत स्वामी विवेकानंद सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी पंडीत जवाहरलाल नेहरू दत्तप्रसाद दाभोळकर आजच्या पिढीला पंडित नेहरू समजलेत का? तिपाई विशेषांक Nation Muslim Hindu Separation British India Swami Vivekanand Sardar Vallabhbhai Patel Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Neharu Dattaprasad Dabholkar Aajchya Pidhila Pandit Neharu Samjalet ka? Tipai Visheshank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Nachan Raj- 27 May 2021

  खूप छान लेखन

  save

 1. DATTATRAY CHAVAN- 27 May 2021

  महत्वाचा लेख विशेषता नव्या पिढीसाठी...

  save

 1. DATTATRAY CHAVAN- 27 May 2021

  महत्वाचा लेख विशेषता नव्या पिढीसाठी...

  save

 1. DATTATRAY CHAVAN- 27 May 2021

  महत्वाचा लेख विशेषता नव्या पिढीसाठी...

  save

 1. M N DAMLE- 28 May 2021

  नेहरू विषयीचा उत्कृष्ट लेख. सध्याच्या गरळ ओकण्याच्याच काळात खरे नेहरू ,गांधी कसे होते, त्यांची विचारधारा कशी होती हे नव्या पिढीला समजावून देणारा लेख.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके