Diwali_4 आपण विसरलोय आपला समृद्ध वारसा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

भानू काळे यांनी पुस्तक लिहिलंय म्हटल्यावर भाषा सहज, सोपी, प्रसन्न, सुंदर ओघवती आहे, हे वेगळे सांगावयास नको. लेखक म्हणून भानू काळे किती मेहनत घेतात, किती जणांना भेटतात; हे त्यांनी शरद जोशी यांच्यावर जे पुस्तक लिहिलंय, त्यावरून आपणाला माहिती आहे. तशी अथक धडपड आणि भ्रमंती या पुस्तकातही आहे. गद्रे परिवाराची पुरेशी प्रकाशचित्रे पुस्तकात आहेत. तसेच, गद्रे परिवाराबद्दल जमवलेली व शब्दबद्ध केलेली माहिती पुस्तकात आहे. पुढील आवृत्तीत ‘वंशवृक्ष’ देऊन प्रत्येक सदस्यासमोर क्रमांक देऊन त्यांची वेगळी ओळख करून द्यावी. आपण हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवायला हवे. आपल्या मित्रांनाही हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवण्याचा आग्रह करावयास हवा.

आपण आपला इतिहास विसरतो किंवा खरा इतिहास समजावून घेण्याचा फारसा प्रयत्न करीत नाही, ते तसे ठीक आहे; पण काल-परवाचा आपला समृद्ध वारसासुद्धा आपण विसरून जातो किंवा तो आपणाला माहीतच नसतो, हे भयंकर आहे.

समतानंद गद्रे हे नाव कदाचित काही जणांनी ऐकले असेल, कधी तरी चुकून-माकून कानांवरून गेले असेल. काही जणांना गिरणगावात कुठे तरी त्यांच्या नावाचा चौक आहे, हेसुद्धा कदाचित आठवेल. पण या माणसाचे कर्तृत्व अफाट आहे, आपल्या आचार्य अत्रेंसारखे- जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सहजपणे आपली राजमुद्रा कोरणारे. मात्र, समतानंद गद्रे यांचे अद्‌भुत कार्य म्हणजे झुणका-भाकर सत्यनारायण.

गद्रेंनी सांगितले, ‘‘प्रत्येक माणसाला कळत-नकळत आपल्या जातीचा थोडा तरी अभिमान असतो. मी ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मण व्यक्तीने केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे श्रेय मी घेतो. मग या ब्राह्मणजातीने केलेल्या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वीकारून मी ब्राह्मण म्हणून पापक्षालन केले पाहिजे. माझी रचना अशी आहे. सत्यनारायण हा एक चांगला उपक्रम आहे. अनेक लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात; पण तो खर्चिक आहे. तूप, साखर, रवा या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या गोष्टी. पोथीपण तशी कालबाह्य. म्हणून माझ्या सत्यनारायणात प्रसाद म्हणून भाकरीचा तुकडा आणि थोडा झुणका  मिळेल. हे मला परवडेल, इतर अनेकांना पण परवडेल. पोथीसुद्धा नवी असेल. फरक एकच- पूजेला जे जोडपे असेल ते दलित असेल, महार-मांग-भंगी असे काहीही. आणि पूजेनंतर मी त्यांच्या पायाचे तीर्थ सर्वांसमोर प्राशन करून सांगेन, ‘या देशात पिढ्यान्‌पिढ्या तुम्हाला आम्ही घृणास्पद वागणूक दिली आहे. या पापातून हा देश मुक्त व्हावा, म्हणून तुम्हाला वंदन करून आज एक ब्राह्मण तुमच्या पायाचे तीर्थ प्राशन करतो,’’

दि.11 ऑगस्ट 1941 पासून 1960 च्या दशकात निर्धन होऊन अंथरुणाला खिळेपर्यंत त्यांनी महाराष्ट्रात असे सुमारे साडेतीन हजार सार्वजनिक झुणका-भाकर सत्यनारायण घातले. समतेसाठी त्यांनी दिलेल्या या योगदानामुळे करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी त्यांना ‘समतानंद’ ही पदवी दिली. आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, महर्षी धोंडो केशव कर्वे, रघुनाथराव धोंडो कर्वे, आचार्य अत्रे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तींनी त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत त्यात अधून-मधून सहभागी होण्यासाठी वेळ काढला. गोरेगावला अस्पृश्य मुलांचा अनाथाश्रम गद्रे चालवत. दि. 11 जानेवारी 1954 रोजी गाडगेबाबा तो पाहावयास गेले. त्यांनी नंतर झुणका-भाकर सत्यनारायण पाहिला. 

सत्यनारायणानंतर त्या हरिजन जोडप्याचे पाय धुऊन अनंतरावांनी ते पाणी तीर्थ म्हणून स्वत: प्राशन केले, तसेच आपल्या पत्नीलाही ते तीर्थ दिले. हे पाहिल्यावर गाडगेबाबांना गहिवरून आले. खरं तर गाडगेबाबा कुणाला स्पर्श करत नसत, कुणाला आपल्यालाही स्पर्श करायला देत नसत; पण गाडगेबाबांनी गद्रेंना मिठी मारली. म्हणाले, ‘‘गद्रेकाका, तुम्ही छान! तुमचा झुणका-भाकर सत्यनारायण छान! मी शंभर कीर्तनं करून जे साध्य करू शकत नाही, ते तुम्ही एका सत्यनारायणात करता!’’

या अशा तथाकथित धर्मविघातक पापावर सनातनी मंडळींनी आग्या मोहळ उठवले. अनंतरावांनी त्या मंडळींना 12 सप्टेंबर 1957 रोजी जाहीर आव्हान दिले, ‘माझी चौकशी करा आणि माझी कृती समाजाचे अकल्याण करणारी आहे, असे सिद्ध करून तुमच्या दारासमोर तुमच्या शुभहस्ते मला फटके मारा-’! पण सनातनी मंडळी फालतू चर्चेत वेळ घालवीत नाहीत. ती मंडळी पाठीमागून गोळी मारून भित्र्या माणसासारखी पळून जातात, नाही तर तुम्हाला कोर्टात खेचतात.

अनंतरावांनी कोणकोणत्या संकटांना तोंड दिलंय याची एक गोष्ट. दि.8 ऑगस्ट 1946 रोजी सरदार हायस्कुलात सत्यनारायण संपन्न झाला. नव्या धर्तीची विवेकवादी पोथी र गो सरदेसाई यांनी वाचली. संगीतभूषण राम मराठे यांनी भजन केले. अण्णासाहेब कर्वे या पूजेला उपस्थित होते. पण सनातनी मंडळींनी एक छान गुगली टाकली. ते रेशनचे दिवस होते. कुठल्याही समारंभात चाळिसांहून अधिक लोकांना जेवण द्यायला बंदी होती. येथे चक्क शंभरहून अधिक लोकांना भाकरीचा तुकडा आणि त्यावर पेढ्याएवढा झुणका असे खरे तर प्रसादाच्या मागे आडून जेवण दिलंय यासंदर्भात सरकारकडे त्यांनी तक्रार नोंदवली. मग अनंतरावांनी जेवणावळबंदीचा भंग केला म्हणून सरकारने रीतसर गुन्हा दाखल केला. त्यामुळे अनंतरावांनी पूजेच्या आमंत्रणात ‘येताना चिमूटभर हरबरा डाळ आणि ज्वारी आणावी’ असे लिहावयास सुरुवात केली. पण खटला दाखल झाला होता. खालच्या कोर्टात तो दोन वर्षे चालला. वेळ खाणारा ‘तारीख पे तारीख’ हा कार्यक्रम सुरू राहिला. शेवटी कोर्टाने या गुन्ह्याबद्दल त्यांना शंभर रुपये दंड ठोठावला. म्हणजे त्या वेळच्या महागाईप्रमाणे एक-दोन तोळे सोने! अनंतरावांनी त्याविरुद्ध हायकोर्टात अपील केले. न्यायमूर्ती छागला आणि न्यायमूर्ती गजेंद्रगडकर यांच्यासमोर खटला चालला. निकालपत्रात त्यांनी म्हटले, ‘केवळ तांत्रिक कारणासाठी इथे कायदा मोडला गेला आहे. अनंतरावांचा उद्देश खूप चांगला आहे. आम्ही केवळ दहा रुपये दंडावर त्यांची सुटका करतोय.’ शेवटी अनंतरावांची जिरलीच, असे म्हणणारे खूप लोक भोवताली होते.

खरे तर एका आयुष्यात माणसाने एवढे कार्य केले तरी खूप झाले. पण अनंतरावांनी अनेक गोष्टी केल्यात. किंवा, अनंतरावांच्या भाषेत ‘‘मी खूप ‘भानगडी’ केल्यात!’’ एकूण सत्त्याहत्तर वर्षांचे आयुष्य. जन्म 17 ऑक्टोबर 1890, कोकणात देवरुख येथे. मृत्यू 4 सप्टेंबर 1967 रोजी कोल्हापुरात. देवरुखला छान मध्यमवर्गीय आयुष्य होते. पिढीजात चालणारे चांगले दुकान होते. माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून 1904 च्या सुमारास अनंता पुण्याला आला. हा सारा प्रवास त्या वेळच्या अनेक धडपडणाऱ्या मुलांनी केलाय तसाच. ते 1907 मध्ये मॅट्रिक झाले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. 1911 हे बी.ए.चे वर्ष. हा तसा हुषार विद्यार्थी. त्यांच्याबरोबरचे नंतरचे नावाजलेले प्राध्यापक भाटे म्हणतात, ‘‘याचे संस्कृत आमच्यापेक्षा चांगले होते.’’ पण त्या वेळी क्षयाची बाधा झाली. कोकणात एका वैद्याकडे त्या वेळचे अघोरी उपचार घेऊन ते बरे झाले. मात्र मग बी.ए. राहिले. ‘पोटासाठी दाही दिशा’ असा प्रकार झाला. हिमालयात हिंडून कोणी आध्यात्मिक गुरू भेटतो का, याचाही शोध घेतला.

अनंतराव 1914 मध्ये पुण्याला परतले. जोगेश्वरी नाक्यावर ‘सौगंधिक स्टोअर्स’ या नावाचे सुगंधी सामानाचे दुकान थाटले. पुन्हा दुकानाचे नाव म्हणजे कात्रजचा घाट! ‘आवळेल’, ‘अख्खा अंजीर’, ‘कोहिनूर गुलकंद’ अशी चित्रविचित्र नावे देऊन ते अशा स्वरूपाच्या वस्तू विकत. मात्र, टिळक मंडालेहून 17 जून 1914 रोजी पुण्याला आले. थोड्याच काळात टिळकांनी होमरूल लीग म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली. या स्वराज्य संघामुळे स्वातंत्र्याचा विचार भारतभर पसरला, असे मानले जाते. स्वराज्य संघाच्या प्रचारासाठी टिळकांनी आधी उत्तर प्रदेश व नंतर देशाच्या इतरही भागांत झंझावाती दौरे केले. त्या वेळी इतर सारे काही विसरून टिळकांसोबत अनंतराव सतत फिरले. अगदी कलकत्ता ते कोलंबो असा लांबचा प्रवासही त्यांनी केला. जागोजागी होणाऱ्या टिळकांच्या भाषणांची खास वार्तापत्रे त्यांनी लिहिली. भाषण करताना टिळकांचे हावभाव कसे असत, आवाजात कसा चढ-उतार होई, श्रोत्यांची प्रतिक्रिया कशी असे- या गोष्टींचे वर्णन करून ते भाषण लोकांसमोर अगदी हुबेहूब उभे करत. भाषणाचे वृत्तांकन कसे करावे याचा तो अद्‌भुत आदर्श नमुना आहे. काना-मात्रेचा फरक न करता त्यांनी टिळकांची भाषणे लिहून काढली आहेत. जागोजागी कंसात ‘हशा’, ‘टाळ्या’, ‘टाळ्यांचा कडकडाट’, ‘ऐका! ऐका!’ (हे शेवटचे शब्द म्हणजे Hear Hear या इंग्रजी शब्दांचे मराठीकरण) यांचा वास्तव उल्लेख केला. अनंतरावांनी धावती मोडी लिपी हस्तगत केली होती, त्यामुळे ते भाषण जसेच्या तसे लिहून घेत. ती भाषणे प्रामुख्याने ‘संदेश’मधून प्रसिद्ध होत. संदेशचे दहा-दहा रकाने या भाषणांनी भरलेले असत आणि संदेशची लोकप्रियता टिळकांच्या या भाषाणांवर अवलंबून होती. ही भाषणे सर्वदूर पसरली पाहिजेत, म्हणून त्यांनी स्वत:च ‘स्वराज्याची मोहीम’ या शीर्षकाखाली चार स्वतंत्र पुस्तकांच्या स्वरूपात, प्रत्येकी दीडशे पानात स्वत:च प्रसिद्ध केली. किंमत प्रत्येकी चार आणे.

भाषाशुद्धी आणि प्रकाशन या गोष्टीत अनंतराव असे ओढले गेले. सावरकरांनी रत्नागिरीतून त्वरित सुटका करा, असे निवेदन सरकारला एक लाख लोकांच्या सह्या घेऊन पाठविले ते अनंतरावांनीच. त्यामुळे सावरकरांची सुटका होताच रत्नागिरीला त्यांना प्रथम भेटायला गेले ते आचार्य अत्रे आणि अनंतराव. ‘कऱ्हेचे पाणी’ या आपल्या आत्मचरित्रात अत्रेंनी याचे सविस्तर वर्णन केलेय. त्यातील एक भाग असा रत्नागिरीहून सुटका झाल्यावर सावरकरांचा पहिला दौरा कोल्हापूरचा होता. बरोबर अत्रे आणि अनंतराव. मुक्काम ‘हंस पिक्चर स्टुडिओ’. कार्य- तेथे गप्पा मारता-मारता चित्रपटसृष्टीतील अनेक इंग्रजी शब्दांचे -त्यांनी मराठीकरण केले. फोटोग्राफीला  छायाचित्रण, टॉकीजला बोलपट, रेकॉर्डिंगला ध्वनिचित्रण... निर्माता, दिग्दर्शक, नेपथ्य असे अनेक शब्द.

अनंतराव प्रकाशक झाले. मराठी भाषेतील मानदंड समजली जाणारे पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. आचार्य अत्रेंचे ‘झेंडूची फुले’ आणि वि स खांडेकर यांचे ‘दोन ध्रुव’ या पुस्तकांचे प्रकाशक अनंतराव आहेत. सत्यकथा बंद होऊन वर्षे लोटली. दिवाळी अंक आणि प्रकाशित होणारी काही पुस्तके एवढेच सध्याचे मौजचे काम आहे. तरीही आजही मराठीतच नव्हे, तर इतर भारतीय भाषांतही मौज आणि सत्यकथा या सुवर्णमुद्रा समजल्या जातात. मात्र या मौज साप्ताहिकाचे मालक, प्रकाशक, संपादक आहेत आपले अनंतराव. खिशात दमडी नसताना 19 मार्च 1922 रोजी, गुढी पाडव्याला त्यांनी मौज साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. अंकाचे नाव, त्यांची परवानगी, कलेक्टरपुढे शपथपत्र, अंक टपाल करण्यासाठी पोस्ट खात्याची परवानगी, जाहिरातदार-विक्रेते आणि लेखक यांची साखळी निर्माण करणे- सारे एकहाती! खास अंकांची रेलचेल. दिवाळी अंक, वासंतिक अंक, काँग्रेस अंक. चटपटीत लिहिणे, जास्त करून स्वत:चेच. त्या काळात मौजचा कमीत कमी खप (सर्टिफाइड सेल) सात हजार प्रती होता. मात्र जाहिरातींची वानवा होती. अनेक सामाजिक भानगडींमुळे हिशेबीपणा अजिबात नाही. त्यामुळे एक वेळ केसरीपेक्षा अधिक खप नोंदवूनही मौज छापखाना व साप्ताहिक दोन्ही त्यांना लिलावात विकावे लागले. पांडुरंग महादेव भागवत यांनी तो लिलावात विकत घेतला. मात्र पत्राची मालकी बदलली, तरी संपादक म्हणून मौजेत त्यांनी दीड-दोन वर्षे काम केले.

अनंतराव सावरकरभक्त झाले होते, त्यामुळे ते हिंदू महासभेशी जोडले गेले. त्यांनी अनेक पदांवर काम केले; तन, मन, धन ओतून काम केले. त्यांनी भागावर (हैदराबाद) सत्याग्रहात मुंबईतील दीडशे लोकांचे नेतृत्व करत सत्याग्रह केला. पावणेतीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. मात्र चार महिने सश्रम कारावास भोगल्यावर त्यांचा तुरुंगवास संपला. अनंतराव हिंदू महासभेचे निष्ठावान कार्यकर्ते, पण त्या वेळचे वातावरण मोकळे होते. अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते त्यांचे मित्र होते. गांधीजींबद्दल त्यांच्या मनात आदर होता, प्रामुख्याने गांधीजींनी हरिजनांसाठी केलेले काम आणि गांधीजींचे उपाय यामुळे. गोंदवले येथे स्वत: अनंतरावांनीच पाच दिवसांचा उपवास केला आणि तेथील सुप्रसिद्ध समाजसेवक व मुस्लिम डॉक्टर तांबोळी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपास सोडला. नंतर तांबोळी दांपत्याने झुणका-भाकर सत्यनारायणाची पूजा केली.

नाटककार गद्रे हे एक विलक्षण प्रकरण आहे. मराठी नाटके आणि मराठी माणसांचे नाटकप्रेम हे आंतरभारतीत महाराष्ट्राचे मानदंड आहेत. पण 1913 मध्ये आलेल्या मूकपटांमुळे आणि नंतरच्या बोलपटांमुळे मराठी नाटकांना उतरती कळा लागली. याचे महत्त्चाचे कारण दोन-तीन तासांत संपणारे हे चटपटीत सिनेमे आहेत, हे अनंतरावांनी ओळखले. छोटी, दोन तासांची नाटके हवीत, हे त्यांनी सांगितले. सांगून थांबतील तर ते अनंतराव कसले! 1930 ते 1934 या कालखंडात अनंतरावांनी एकूण नऊ नाटके लिहिली. पण मी फक्त आचारी नाही, ही अनंतरावांची भूमिका होती. ते स्वत:च निर्माते होते, प्रचारप्रमुख होते. दौऱ्याचे नियोजन आणि जाहिरातही तेच करत. योग्य दिग्दर्शक मिळत नसेल, तर दिग्दर्शनही स्वत:चेच. एखादा नट अडला तर नट म्हणून अनंतराव. रोज दोन किंवा तीन प्रयोग. म्हणजे प्रत्येक नाटकाचे किमान हजार-बाराशे प्रयोग. अनेक नटांना अनंतरावांनी पुढे आणले. दामूअण्णा जोशी आणि सदाशिव अनंत शुक्ल या दोन तरुणांना त्यांनीच मुंबईत आणून नाटक-सिनेमात रुजवले. संगीतभूषण राम मराठे, बाबूराव माने, पंडितराव नगरकर यांनाही त्यांच्याच नाटकात प्रथम संधी दिली. पुरुषांनी स्त्रीभूमिका करण्याचा तो काळ होता. बालगंधर्व एकच होते, त्यातून थकत चाललेले. अनंतरावांनी आपल्या ‘स्वराज्य-सुंदरी’ या नाटकात स्त्रीनट म्हणून नानासाहेब चापेकर यांना पुढे आणले. ‘स्वरूपसुंदरी’ म्हणून त्यांनी प्रसिद्धी केली. त्यांना नाव मिळाले. केशवरावांनी त्यांनी ललितकलेत ओढले. अनंतरावांना राग आला. पुण्याच्या नाट्य संमेलनात ‘बेइमान चापेकर’ ही पत्रके त्यांनी वाटली. पण त्या वेळच्या लोकांचे हे राग वरवरचे व तात्पुरते असत. केशवराव-अनंतरावांत मैत्री तशीच होती. चापेकरही दोन्हींकडे काम करू लागले. नट कोठेही काम करणारा असो, त्याला छान नवे नाव हवे. अनंतरावांनी अनेक नटांचे बारसे घातले. ‘सौदागर’ला त्यांनी ‘छोटा गंधर्व’ म्हटले. राम आपटे हा सहा वर्षांचा छोटा मुलगा बालमोहन संगीत मंडळीत गेला. अनंतरावांनी त्याची जाहिरातीत ‘बाल-गणपतराव’ अशी केली.

आचार्य अत्रे अनंतरावांचे जवळचे मित्र, त्यामुळे त्यांच्या ‘त्राटिका’ आणि ‘कवडीचुंबक’ या दोन नाटकांत अनंतरावांनी भूमिका केल्या. आचार्य अत्रेंच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या सिनेमातही अनंतरावांनी कम केलंय. आपले ‘वंदे मातरम्‌’ हे नाटक अत्रेंनी अनंतरावांना अर्पण केलंय. अनंतराव हा फार चलाख माणूस आहे. मुंबई मराठी साहित्य संघातर्फे मराठी रंगभूमीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने 1944 मध्ये राम गणेश गडकरी यांचे ‘संगीत वेड्यांचा बाजार’ हे प्रहसनपर नाटक बसवले होते. काम करणारे सर्व साहित्यकार. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, अप्पा पेंडसे, मामा वरेरकर, वा रा ढवळे अशी सारी नटमंडळी. त्यात अनंतरावांना एका कुडबुड्या ज्योतिषाची भूमिका करावयाची होती. लांबलचक विनोदी भाषणे अनंतराव पाठ कशी करणार, याची मित्रांना चिंता! अनंतरावांनी काय करावे- त्यांनी भाषणे लिहून काढली. त्याच्या गुंडाळ्या केल्या. भाषणाची वेळ आली की, ‘थांबा, कुंडली पाहून सांगतो’ म्हणून गुंडाळी सोडून भाषण करायचे!

दि.5 सप्टेंबर 1930 रोजी मुंबईत भरलेल्या रौप्यमहोत्सवी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अनंतराव होते. त्याआधीच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते बालगंधर्व. त्यांच्या हातून अनंतरावांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. अनंतरावांच्या नाटकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, पण पुढील आठ-दहा वर्षांत त्या सगळ्या संपल्याने, एकही प्रत कुठेही उपलब्ध नसल्याने ‘नाटिकानवरत्नहार’ या शीर्षकाखाली 1 जानेवारी 1942 रोजी त्यांनी या नऊ नाटकांच्या संहिता एकत्रित स्वत:च प्रसिद्ध केल्या. हे पुस्तक 360 पानी आहे. ‘अच्युताचे चरणी’ अशी छान प्रस्तावना त्यात त्यांनी लिहिली आहे. अच्युत बळवंत कोल्हटकर या आपल्या गुरूंना अर्पण करताना त्यांनी लिहिलंय- ‘स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांची सेवा प्रामाणिकपणे, झीज सोसून निर्भीडपणे कशी करावी, हे आपण मला शिकवलेत.’

आपला विश्वासही बसत नाही- केवळ जाहिराती जमवता येत नाहीत, म्हणून त्यांची मौज गाळात गेली आणि त्याच अनंतरावांच्या उपजीविकेचे जवळजवळ एकमात्र साधन ‘जाहिरात व्यवसाय’ हे होते. अत्रेंच्या अनेक नाटकांच्या जाहिराती त्यांनी केल्यात. ‘घराबाहेर’ नाटकाची त्यांनी केलेली जाहिरात- ‘सगळी मुंबई घराबाहेर पडली का?’ अशी होती. याच नाटकाची जाहिरात करताना ‘हाऊसफुल्ल’ हा शब्दप्रयोग मराठीत त्यांनी केला. युरोपात प्रेक्षागृहाच्या बाहेर ‘टिकेट्‌स सोल्ड’ असा शब्द असायचा. त्यापेक्षा हा शब्द पॉवरफुल. दोन तुल्यबळ नट नाटकात असतील तर दुसरे नाव कुणाचे घालायचे, पहिले कुणाचे- हे अवघड जागेवरचे दुखणे. अनंतरावांचा तोडगा. एकाचे नाव   शेवटी घालायचे, मात्र त्यापूर्वी ठळक अक्षरात ‘आणि’ हा शब्द! आजकाल वापरले जाणारे ‘बेफाट’, ‘दणदणीत’, ‘खणखणीत’, ‘तडाखेबंद’ हे सारे तडाखेबंद शब्द ही त्यांचीच देणगी आहे. ‘सौंदर्याचा ॲटमबाँब’ हा एक शब्द त्यांनी शोधलेला नाही, कारण त्या वेळी ॲटमबाँब नव्हता, असे विनोदाने सांगणाऱ्या आचार्य अत्रेंनी आपल्या एका भाषणात त्यांना ‘जाहिरातजनार्दन’ अशी पदवी दिली. आणि आमची नाटकेच नव्हे, तर ‘अमृतमंथन’ व ‘तुकाराम’सारखे प्रभातचे अनेक चित्रपट त्यांनी केवळ जाहिरातीच्या जोरावर यशस्वी करून दाखवलेत, असंही म्हटलंय.

हा कोहिनूर हिरा आहे, हे सोहराब मोदींनी ओळखले. अनेक यशस्वी सिनेमे बनविणारी ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही त्यांची कंपनी. शिवडीमध्ये स्वत:चा भव्य स्टुडिओ. न्यू एम्पायर, एक्सेलसियर, स्टॅ्रंड, सेंट्रल अशी अनेक थिएटर्स त्यांच्या मालकीची. ‘झाशीची राणी’ हा भारतातील पहिला टेक्निकल चित्रपट त्यांनी काढलाय. त्यांनी गद्रेकाकांना आपल्या मिनर्व्हा कंपनीचे जाहिरातप्रमुख म्हणून काम करण्याची विनंती केली. काका म्हणून त्यांचा कायम सन्मान केला. त्यांना ऑफिस दिले. ड्रायव्हर आणि गाडी दिली. ‘काका, तुम्ही अनेक सार्वजनिक कामे करता; कचेरीत फक्त दोन तास येऊन बसलात तरी चालेल’, म्हणून सांगितले. ‘दरमहा तुमचा पगार सहाशे रुपये.’ त्या वेळी ही फार मोठी रक्कम. ‘पण काका, पगार तुमच्या हातात पडणार नाही. तो तुम्ही घरासाठी खर्च करणार नाही. दर महिन्याला एक तारखेला आमच्या काकूंच्या म्हणजे सत्यभामाबार्इंच्या हातात देणार!’ धार्मिक तेढ माजवणाऱ्या आजच्या मंडळींचा विश्वासही बसणार नाही. अनंतराव हिंदू महासभेचे पदाधिकारी तर मोदी पारशी, त्यांची बायको मुसलमान; मात्र मोदींची पत्नी मेहताब जेव्हा गरोदार राहिली, त्या वेळी सत्यभामाबार्इंनी त्यांना अळीवाचे लाडू करून पोचवले आणि अनंतरावांची धाकटी मुलगी सिंधू ही आपलीच मुलगी आहे असे मानून तिचे लग्न सोहराब मोदी पती-पत्नीने साजरे केले!

हे असे अनंतराव मुंबईला कायम गोरेगावकर चाळीत राहिले. चाळ क्रमांक सहा, तळमजला. प्रत्येक चाळीला चार मजले होते. प्रत्येक मजल्यावर आठ बिऱ्हाडे. प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्यात आठ भाडेकरूंसाठी एक सामाईक संडास. अनंतरावांचे चाळीतील एक महत्त्वाचे काम म्हणजे- चाळीतील जे कुणी येतील, त्यांना बरोबर घेऊन संडासासकट चाळ साफ करणे. दादरहून सेनापती बापट आपला झाडू-खराटा बरोबर घेऊन या चाळींच्या सफाईकामात सामील होत. या चाळीत सत्यभामाबार्इंची एकूण अकरा बाळंतपणे झाली. पाच मुले लहानपणीच गेली. पाच मुली आणि एक मुलगा अशी सहा मुले राहिली. वसंत हा एकमेव मुलगा, जन्म 1923 मधला.

त्या वेळचे जीवन कसे होते हे समजावे, म्हणून दोन प्रसंग सांगावेसे वाटतात. मित्र एकमेकांना चिमटे काढत, छान थट्टामस्करी करत. हे समजावे म्हणून अत्रेंनी त्यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते सांगतो. अत्रे लिहितात- ‘गद्रे सकाळीच घराबाहेर पडतात. गळ्यात शबनम, वर खोचलेले धोतर, लगबगीने पडणारी पावले, डोक्यात विचारांचे चक्र. आपला विश्वासही बसणार नाही एवढी कामे गद्रे एका दिवसात करतात- मात्र गद्रे रात्री घरी जात असावेत, कारण दर वर्षी घरी पाळणा हलत असतो.’

गद्रे हे मुंबई हिंदू महासभेचे उपाध्यक्ष. मुंबईत 1942 मध्ये हिंदू-मुसलमान दंगल उसळली. मिनर्व्हा मूव्हीटोनमधील एका मुसलमान कर्मचाऱ्याला पोलिसांनी पकडले. तो निरपराध आहे, याची अनंतरावांना खात्री होती. अनंतराव पोलिसांत गेले, जामीन राहिले आणि त्याला सोडवून आणले. वीर नरिमन हे काँग्रेसचे तडफदार नेते. मुंबईचे महापौर. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. पण 1937 च्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसला बहुमत मिळाले, त्या वेळी त्यांना डावलून काँग्रेसने बाळासाहेब खेर यांना मुख्यमंत्री केले. या देशात जात, धर्म, भाषा याचे राजकारण सुरू होतंय- अशी नरिमन यांनी जाहीर टीका केली. त्यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकले. आता अनंतराव मुंबई हिंदू महासभेचे उपाध्यक्ष. त्यातून खेर हिंदू, ब्राह्मण, मराठी भाषक. नरिमन पारशी, गुजराती बोलणारे. मात्र या देशातील सामाजिक मैत्रीवर यातून वाईट संदेश जातोय, असे अनंतरावांना वाटले. त्यांनी ‘नरिमन यांना वाचवा’ म्हणून भली मोठी मोहीम उघडली. चक्क सात दिवसांचा उपवास केला.

आज मनातल्या मनात ब्राह्मण-ब्राह्मणेतर, त्यात पुन्हा ओबीसी, दलित, त्यानंतर शहरी-ग्रामीण अशी पत्रकारांची प्रतवारी होते. त्या वेळचे वातावरण कसे होते? कोल्हापूरचे सत्यवादीकार बाळासाहेब पाटील यांनी लिहिलंय- ‘समतानंद अनंत हरी गद्रे हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र. आमची मैत्री तीन तपांची आहे. सत्यवादीच्या वाढ-दिवसाला अनंतरावांची उपस्थिती अनिवार्य. एकदा या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण हे अध्यक्ष होते. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात गर्जून लिहिणारे व गर्जून बोलणारे दोन पत्रकार आहेत. एक अनंतराव, दुसरे सत्यवादीकार बाळासाहेब पाटील. दोघेही येथे आहेत, जरा जपून बोलतो,’’

या छोटेखानी पुस्तकात मानवी जीवनातील ऊन-पावसाचे खेळ आणि ‘ज्याची हिंमत हरली नाही, तो कधीच हरत नाही’ हे लेखकाने अनंतरावांच्या आयुष्यातील एका प्रसंगातून आपल्याला सांगितलंय. अनंतरावांनी ‘निर्भीड’ हे साप्ताहिक 1942 मध्ये सुरू केले. चार वर्षांत त्याचा सरकारमान्य खप दहा हजार झाला होता. अनंतरावांचा एकुलता एक मुलगा वसंता त्या वेळी तेवीस वर्षांचा झाला होता. कथा, वैचारिक लेख, रेडिओवरचे कार्यक्रम यामुळे त्याचे नाव सर्वत्र दुमदुमत होते. तो निर्भीडमध्ये अनंतरावांना मदत करत होता. पण 1946 मध्ये त्याला टायफॉइड झाला, त्या वेळी त्यावर औषध नव्हते. त्या मुदतीच्या तापात तो 14 दिवसांत मरण पावला. त्या वेळी मुुंबईत येणाऱ्या निर्वासितांचे पुनर्वसन करण्याचे काम हिंदू महासभेतर्फे सुरू होते. अनंतराव हिंदू महासभेचे मुंबई उपाध्यक्ष. दुसऱ्या दिवशी अनंतराव या कामात हजर होते. म्हणाले, ‘‘मी घरी बसून वसंता थोडाच परत येणार आहे?’’ मात्र निर्भीडच्या अंकावर वसंताचा फोटो छापून, त्याच्या कार्याचे मूल्यमापन करत हृदय हेलावून टाकणारा व अंक भरणारा एक मृत्युलेख त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी लिहिले, ‘बाळा, मला कल्पना होती, माझ्या मृत्यूनंतर निर्भीडवर माझा फोटो छापून माझ्यावर मृत्युलेख लिहून तू निर्भीड जोमाने पुढे नेशील. काही तरी उलटंच घडतंय.’ निर्भीड काही काळाने बंद पडले. स्वत:साठी आयुष्यात दमडी न ठेवणाऱ्या अनंतरावांचे अखेरचे दिवस विपन्ना-वस्थेत गेले. आपला भाऊ, आपली मुलगी यांच्या आश्रयात त्यांनी सत्यभामाबार्इंबरोबर दिवस पुढे ढकलले.

भानू काळे यांनी पुस्तक लिहिलंय म्हटल्यावर भाषा सहज, सोपी, प्रसन्न, सुंदर ओघवती आहे, हे वेगळे सांगावयास नको. लेखक म्हणून भानू काळे किती मेहनत घेतात, किती जणांना भेटतात; हे त्यांनी शरद जोशी यांच्यावर जे पुस्तक लिहिलंय, त्यावरून आपणाला माहिती आहे. तशी अथक धडपड आणि भ्रमंती या पुस्तकातही आहे. गद्रे परिवाराची पुरेशी प्रकाशचित्रे पुस्तकात आहेत. तसेच, गद्रे परिवाराबद्दल जमवलेली व शब्दबद्ध केलेली माहिती पुस्तकात आहे, मात्र ती समजायला थोडी अवघड वाटते. पुढील आवृत्तीत ‘वंशवृक्ष’ देऊन प्रत्येक सदस्यासमोर क्रमांक देऊन त्यांची वेगळी ओळख करून द्यावी.

आपण हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवायला हवे. आपल्या मित्रांनाही हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवण्याचा आग्रह करावयास हवा. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे हे अनंतरावांचे नातू. त्यांनी अनंतरावांवर नाटक किंवा बायोपिक करणे मनावर घ्यावयास हवे. शून्यातून विश्व निर्माण करून, जगभर आपली ऑफिसेस उघडून, रत्नागिरीत तीन हजार तरुणांना रोजगार देणारे ‘गद्रे मरिन प्रॉडक्ट’चे दीपक गद्रे यांचे ते चुलतआजोबा. त्यांनी हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात शाळेत पोचेल, हे पाहिले पाहिजे. शाळकरी मुलांसाठी ‘समतानंद अनंत हरी गद्रे व्याख्यानमाला’ सुरू करायला हवी. शाळकरी मुलांनी अनंतरावांचे आयुष्य आणि आजची आव्हाने यांवर आपले विचार मांडायला हवेत.


समतानंद अनंत हरी गद्रे

लेखक : भानू काळे

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे.

पृष्ठे : 175, किमत : 225 रुपये)

Tags: पुस्तक परिचय समतानंद अनंत हरी गद्रे नवे पुस्तक भानू काळे pustak parichay samatanand anant hari gadre nave pustak bhanu kale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात