डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मोदींचा करिष्मा आणि भाजपमधील बंडखोरी

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने गुजरात निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्याकरिता दोन टीम पाठवण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा अभ्यास करण्याकरता चारजणांची टीम सौराष्ट्रात गेली होती. दुसर्या टप्प्याकरता आम्ही चारजणांनी (दीपक जाधव, किशोर रक्ताटे, सुरेश इंगळे व चित्रा लेले) सुरत, अहमदाबाद आणि बडोदा या तीन शहरांचा दौरा केला. त्यानिमित्ताने आलेल्या अनुभवांचा हा आढावा…
 

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील 87 जागांकरता मतदान पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचार देखील थांबला आहे. रविवार दि. 16 डिसेंबरच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सर्वांना प्रतिक्षा असेल ती निकालाची. गुजरातच्या निकालाचा दिल्लीच्या राजकारणावर परिणाम होणार असल्यामुळे या निकालाचे महत्त्व वाढले आहे. राहुल गांधी आणि वरुण गांधी यांनी रोड-शोद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मनमोहन सिंग सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, वसुंधरा राजे यांच्या सभांनी वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मोदीकेंद्रित प्रचार : भाजपकडून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना उतरवले असले तरी गुजरातेतील भाजपचा संपूर्ण प्रचार नरेंद्र मोदींभोवतीच केंद्रित झाला होता. काँग्रेसने केलेल्या आरोपांचे वार उलटवून प्रतिवार करण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत. जाहीर सभांमध्ये ते भाषणांऐवजी प्रश्नोत्तररूपी संवाद साधतात. गेल्या 45 वर्षांत काँग्रेसने केलेली कामे आणि 5 वर्षांत भाजपने केलेला विकास चतुराईने आकडेवारीच्या स्वरूपात ते जनतेसमोर मांडतात. रामायण घडल्याचे, रामसेतूचे अस्तित्व असल्याचे लोकांकडूनच वदवून घेतात. तुम्ही हिंदू आहात का? असाल तर अतिरेकी आहात का ? 

सोनियाबेन तुम्हांला अतिरेकी म्हणते, हा गुजरातचा अपमान तुम्ही सहन करणार का? असे प्रश्न जनसमुदायाला विचारून त्यांची होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तरे घेतात. सोनिया गांधींनी आपल्यावर केलेल्या 'मौत का सौदागर' या टीकेचा समाचार घेताना आपण 'मौत के सौदागर' ठरलेल्या लोकांना जीव मुठीत घेऊन पळवून लावले असे सांगतात. गेल्या चार वर्षांत गुजरातमध्ये एकही दहशतवादी हल्ला झाला नसल्याचा हवाला द्यायलाही ते विसरत नाहीत. मोदींच्या आक्रमक आणि तितक्याच भावनिक भाषणाचा प्रभाव लोकांवर पडल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदींचे वाजले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र विहिंपचे कार्यकर्ते भाजपला मदत करत आहेत.

सेनापतीशिवाय काँग्रेस रणांगणात : भारत सोळंकी, शंकरसिंह वाघेला, अर्जुनसिंह मोढवाढिया हे गुजरात काँग्रेसच्यावतीने किल्ला लढवत असले तरी मोदींच्या लोकप्रियतेच्या आसपासही ते फिरकू शकत नाहीत. काँग्रेसने सुरुवातीच्या टप्प्यात भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावर लक्ष्य न करण्याची भूमिका स्वीकारली होती. मात्र सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर 'मौत का सौदागर' अशी टीका करून त्यांना उलटवार करण्याची आयती संधी उपलब्ध करून दिली. केशूभाई पटेलांची नाराजी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देईल असे मतदानोत्तर सर्वेक्षणातून तरी वाटत नाही. मोदींवर निशाणा साधून भाजपमधून बाहेर पडलेल्या बंडखोरांना काँग्रेसने आपल्या तिकीटावर उभे केले आहे. त्यांचा विजय हा काँग्रेसच्या सौराष्ट्रातील जागा वाढवणारा ठरू शकेल.

2002 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा अनुभव लक्षात घेता, यंदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे मतविभाजन काँग्रेसला टाळता येईल. बडोद्यात शवपुरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक पवारांनी दाखल केलेली उमेदवारी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार की भाजपच्या परंपरागत मराठी मतदारांमध्ये फूट पाडणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

बहुजन समाज पक्षाने 116 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 2००2च्या दंगलीनंतर भाजपच्या पाठीमागे गेलेला दलित मतदार आणि काँग्रेसचा परंपरागत मुस्लिम मतदार यांमध्ये बसपाचा वाढता जनाधार फूट पाडू शकतो.

भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी काही जागांवर उमेदवार उभे करून शिवसेनाही मैदानात उतरली आहे. परंतु खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच नरेंद्र मोदींना जाहीररीत्या आशीर्वाद दिल्याने गुजरातच्या निवडणुकीतील शिवसेनेची लढाई लुटुपुटुचीच ठरणार आहे.

सुरत, अहमदाबाद आणि बडोद्यातील प्रचार शांततेत पार पडताना दिसत होता. महाराष्ट्रात चौकाचौकात दिसणारी, विविध कारणांनी लावलेली (गल्लीतल्या युवा नेत्यापासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंतची) होर्डिंग्ज, डिजिटल फ्लेक्स या शहरांमध्ये कोठेही पहायला मिळाली नाहीत. निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे प्रचारामध्ये एक प्रकारची शिस्त जाणवत होती.

आम्ही गुजरातमधील अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. विविध पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते, पत्रकार, विद्यापीठातील प्राध्यापक; तसेच रिक्षावाल्यांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत विविध व्यवसायांतल्या, विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींना भेटून गुजरातमधील राजकारणाविषयी त्यांची मते जाणून घेतली. त्यामध्ये मोदींच्या करिष्म्याविषयी, हिंदुत्व आणि विकासाविषयी न थकता भरभरून बोलणारे मोदीभक्तही भेटले. गुजरातमधल्या सामाजिक परिस्थितीचे वास्तवकारी आकलन विद्यापीठातील प्राध्यापकांनी करून दिले. कुणीही सत्तेवर आले तरी आमच्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, असे विचारणाऱ्या सर्वसामान्यांच्या वेदना व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियाही मिळाल्या. 

सुरतच्या रेल्वेस्टेशनवर भेटलेले वापीचे मनोहर महाडकर यांनी आमच्याशी मराठीत संवाद साधत मोदी सत्तेवर यावेत अशी इच्छा व्यक्त केली. 2००2च्या दंगलीविषयी बोलताना ते म्हणाले की, 'गोध्रा हत्याकांडानंतर लोकांचा रोषच इतका भयानक होता की पोलिसांचे त्यासमोर काही चालले नाही. मोदींची केलेली बदनामी हा सारा मीडियाचा खेळ होता.' गुजरातमधील मराठी भाषिक भाजपाचे खंदे समर्थक असल्याचे या भेटीत मराठी लोकांशी मारलेल्या गप्पांतून प्रकर्षाने जाणवले.

भरूच येथील कंपनीत उच्च पदावर नोकरीस असलेल्या अजय बयाणी यांनी मोदींचीच 'री' ओढली. गुजरात भयमुक्त झाल्याचे सांगितले. तुम्ही गुजरातमध्ये रात्री-बेरात्री कुठेही फिरू शकता असेही सांगितले. मोदींच्या दहशतीविषयी विचारले असता मोदींच्या विरोधात जाणार्यांना मात्र गुजरातमध्ये जागा नाही, हे कबुल केले.

राहुल गांधींच्या रोड-शोमध्ये भेटलेले सिटी चॅनेलचे पत्रकार अस्मान शेख यांनी गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षांत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही या वक्तव्यावर - 'दहशतवादीच सत्तेवर आहेत, मग हल्ले कोण करणार?' अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रसेविका समितीच्या गुजरात आणि राजस्थान राज्याच्या प्रमुख सरोज मुझुमदार या विविध विषयांवर मोकळेपणाने आमच्याशी बोलल्या. नरेंद्र मोदींनी भूजच्या भूकंपात, सुरतच्या महापुरात तडफेने केलेली कामे उदाहरणे देऊन सांगितली. केशुभाई पटेलांपेक्षा प्रशासनाला हलवण्यात मोदी सरस ठरल्याचे सांगितले. 2००2च्या दंगलीत बाबू बजरंगीने केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याविषयी विचारले असता, असे काही घडलेच नाही; बाबू बजरंगीने प्रसिद्धीसाठी अशी विधाने केल्याचे त्या म्हणाल्या. नरेंद्र मोदींनी आणखी पाच वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रहावे आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर जावे अशी इच्छा शेवटी प्रदर्शित केली.

बडोद्याच्या एस. एम. विद्यापीठातील प्राध्यापक आणि सी.एस.डी.एस.च्या गुजरात विभागाचे प्रमुख प्रियवृंदन पटेल यांनी गुजरातच्या राजकारणाच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. गुजरातच्या पटेल समाजात फूट पडल्याचे सांगून लेवा पटेल केशुभाईच्या बाजूने आहे तर कडवा पटेल मोदींना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. गुजरातच्या राजकारणावर गोध्रा हत्याकांडाइतकाच स्वामी नारायण मंदिरावरील हल्लयाचाही परिणाम झाल्याचे सांगितले. भीतीपोटी हिंदू समाज भाजपच्या मागे गेला. 

काँग्रेसला मतदान केल्यास मुस्लिम शिरजोर बनतील, अशा मानसिकतेपोटी आणि तिसरा पर्याय नसल्याने मध्यमवर्गीय भाजपला मतदान करीत असल्याचे नमूद केले. मोदींच्या लोकप्रियतेमागे त्यांनी घेतलेला जकात रद्द करण्याचा निर्णय, वीजचोरीला घातलेला आळा, रस्त्यांचे विणलेले जाळे, खंबीर प्रशासन हे असल्याचे सांगितले गुजरातचा विकास झाल्याचे मान्य करून त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका महशिश्वता जानी यांनी 2००2च्या दंगलीनंतर हिंदू-मुस्लिमांच्या समाजजीवनात झालेले बदल विशद केले. इंडो-पाक सर्व्हेच्या निमित्ताने त्या मुस्लिम वस्त्यांमधून फिरल्या. (सुरुवातीला त्यांच्याशी बोलण्यास कोणीही तयार नव्हते. आपण मुस्लिम असल्याचे सांगून त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी माहिती गोळा केली. ) अनेक मुस्लिम कुटुंबीयांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या त्यांनी बनवलेल्या वस्तू अहमदाबादमधील हिंदू व्यापाऱ्यांनी घेण्याचे थांबवल्याचे त्यांनी सांगितले. 

जत्रेच्या काळात गावोगाव फिरून व्यवसाय करण्यास मुस्लिमांना मज्जाव केला जात असल्याचेही सांगण्यात आले. अहमदाबादमध्ये आज हिंदू-मुस्लिम वस्त्यांमध्ये सरळ सरळ विभाजन झाल्याचे महशिश्वता यांनी सांगितले. हिंदू वस्त्यांमध्ये मुस्लिम राहण्यास धजावत नाहीत आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये हिंदू राहत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही अहमदाबाद शहर सोडताना रिक्षावाल्या चाच्यांनी दिलेली माहिती खूपच हृदयद्रावक होती. निवडणुकीविषयी त्यांना काय वाटते, असे विचारले असता त्यांनी 'भाजपचे सरकार आले तर चालेल, मात्र मोदी मुख्यमंत्री नको' असे उत्तर दिले. कारण विचारले असता, रिक्षात लावलेले फोटो दाखवून त्या सर्वांना 2००2च्या दंगलीत जिवंत जाळण्यात आल्याचे त्यांनी डोळे पुसत सांगितले.

या निवडणुकीत कोणाचा तरी जय होईल आणि कोणाचा तरी पराजय. मात्र हिंदू-मुस्लिमांची दुभंगलेली मने कशी जुळतील, हाच प्रश्न उरी बाळगून आम्ही गुजरात सोडले.

Tags: वसुंधरा राजे राजनाथ सिंग लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी मनमोहन सिंग सोनिया गांधी गुजरात काँग्रेस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दीपक जाधव

'जागल्या' या वेबपोर्टलचे संपादक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके