डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सभोवतालच्या अस्वस्थतेतून उभा राहिलेला ‘परिवर्तन’ कलामहोत्सव

अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित ‘अमृता, साहिर आणि इमरोज’ हे नाटक या  कलामहोत्सवात दुसऱ्या दिवशी सादर  करण्यात आले. जसा गांधी जगाला आजही सहजासहजी पचत नाही, तसेच अमृता प्रीतम  हिचं जगणं आजही झेपण्यासारखं नाही ! तिचं  आयुष्य आणि लेखन यावर तासाभरात एखादी कलाकृती सादर करणं कठीण तर आहेच, मात्र त्याचबरोबर ते तिच्या जगण्यावर अन्याय  केल्यासारखंसुध्दा आहे. म्हणून ‘रसिदी टिकट’ या तिच्या आत्मचरित्रावर आधारित, तिच्या  आयुष्यात आलेल्या साहिर लुधियानवी आणि  इमरोज या दोन पुरुषांच्या सहवासाला  मध्यवर्ती ठेवून तिची कहाणी सांगणारे हे  नाटक तयार करण्यात आले. याची संकल्पना  राहुल निंबाळकर यांची असून, दिग्दर्शन मंजूषा  भिडे यांचे आहे. हर्षदा कोल्हटकर आणि शंभू  पाटील या कलावंतांनी याचं सादरीकरण केलं. 

‘परिवर्तन संस्था’- जळगाव, ‘नाटक घर’- पुणे आणि ‘रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ते 5 जानेवारी या दिवशी पुणे येथे तीनदिवसीय ‘परिवर्तन कलामहोत्सव’  ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार  पडला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन वेगळ्या  पध्दतीने करण्यात  आले. लोकशाहीच्या नावाखाली आज देशात सुरू  असलेल्या गोष्टींचे ‘चित्र’ तिथे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. आलेल्या पाहुण्यांना रंग आणि ब्रश देऊन समोर ठेवलेल्या  मोठ्या कॅनव्हासवर त्यांना वाटेल ते चित्र रेखाटण्याची  विनंती करण्यात आली. सर्वांनी आपापल्या परीने चित्र  रंगवले. कोणी मेणबत्ती, कुणी दिवा, कुणी भारताचा झेंडा, तर कुणी झाडाचं पान- कॅनव्हासवर रंगवले. त्यानंतर मीलन राठोड नावाचा एक तरुण चित्रकार ते चित्र पूर्ण करणार, असे सांगण्यात आले. त्याने भगवा रंग घेऊन संपूर्ण कॅनव्हास त्या  एकाच रंगाने रंगवून टाकला. आता आपले चित्र पूर्ण झाले  आहे, असे म्हणताच संपूर्ण प्रेक्षागृह शांत झाले आणि काही  क्षण त्या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर टाळ्या वाजवायला  सुरुवात झाली...

‘‘भोवतालच्या परिस्थितीमुळे वाटत असलेली  अस्वस्थता,  वेदना,  त्रास यातून कलेची निर्मिती होते. ही निर्मिती काही प्रश्नांना उत्तर देते, तर काही प्रश्नसुध्दा उपस्थित  करते. ‘आपण नेमके कसे जगतो आहोत?’ याचे  सिंहावलोकन आणि चिकित्सा करायला लावते, ती कला!  अशा निर्मितीतूनच आपली सांस्कृतिक जडण-घडण होत  असते,’’ असे अभिनेता-दिग्दर्शक नंदू माधव यांनी  महोत्सवाच्या उद्‌घाटन भाषणात सांगितले. ‘‘यशवंतराव चव्हाण म्हणायचे की, विकास दोन  प्रकारचा असतो. एक- भौतिक विकास आणि दुसरासा  सांस्कृतिक विकास. या दोन्ही विकासांचं समान महत्त्व  असतं. यातल्या कोणत्याही एकाचं दुसऱ्यावर अतिक्रमण  होता कामा नये.’’ असे कलाप्रेमी उल्हासदादा पवार  म्हणाले. त्याच धर्तीवर अतुल पेठे म्हणाले, ‘‘भौतिक प्रगती  होत असताना आपली सांस्कृतिक प्रगती होते आहे की  नाही, हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. कारण राजकीय दारिद्य्र  कळून येतं, (जे आपण सध्या बघतोच आहोत.) सामाजिक  दारिद्य्र कळून येतं, आर्थिक दारिद्य्र कळून येतं, पण  सांस्कृतिक दारिद्य्र पटकन कळून येत नाही.

मराठी नाटकांची अवस्थाही एका अर्थाने उत्साहवर्धक आहे, पण तितकीच  गंभीरसुध्दा आहे. गंभीर अशा अर्थाने, कारण अजूनही अनेक  गावांमध्ये व्यावसायिक नाटकसुध्दा जात नाही अशी अवस्था  आहे. इकडचं नाटक तिकडे जात नाही आणि तिकडचं  नाटक इकडे येत नाही;  मग दूर प्रांतांतली नाटकं इथे येणं तर लांबच! अशा परिस्थितीत सांस्कृतिक विकास कसा होणार? यासाठी गावा-गावांमध्ये असे लहान-सहान उपक्रम सुरू व्हायला हवेत, जसे जळगावमध्ये शंभू पाटील  2011 पासून परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून राबवत  आहेत. चित्रकला,  साहित्य,  संगीत,  नाटक यांचे विविध  महोत्सव ते उत्कृष्टरीत्या करतात.

अखिल भारतीय नाट्य  परिषदेने असे उपक्रम गावागावांत राबवायला हवेत, यंदा  शंभरावे नाट्य संमेलन होत आहे, ज्यात छोट्या-छोट्या  गावांतून आलेल्या व सिन्सिअरली या क्षेत्रात काम करणाऱ्या  लोकांना नक्कीच स्थान असेल, अशी मी आशा करतो.’’ भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या कादंबरीचे पंचवीस भागांत रेडिओवर वाचन करणारे शंभू पाटील यांनी  जळगावच्या संस्कृतीची झलक पुणेकरांना मिळावी आणि  एकमेकांच्या विचारांचं आदान-प्रदान व्हावं, या हेतूने हा ‘परिवर्तन कलामहोत्सव’ पुण्यात आयोजित केला. ‘परिवर्तन’ ही संस्था गेली दहा वर्षे दर वर्षी किमान आठ  महोत्सव महाराष्ट्रभर राबवते. यात ‘नली’ या एकलनाट्याचे  40 प्रयोग,  बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे 18 प्रयोग  झाले आहेत.

या महोत्सवामध्ये सादरीकरण करणारे कलाकार हे शिक्षक, चित्रकार, वकील, व्हालीबॉल खेळाडू, प्रकल्प-अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत  असून, आपापले दैनंदिन काम सांभाळून परिवर्तनचे प्रयोग  करतात. या तीनदिवसीय कलामहोत्सवात पहिल्या दिवशी ‘गांधी नाकारायचाय, पण कसा ?’  या नाटकाचे अभिवाचन झाले. दुसऱ्या दिवशी ‘अमृता, साहिर आणि इमरोज’ हे नाटक आणि ‘नली’ हे एकल नाट्य सादर करण्यात आले. तिसऱ्या दिवशी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांच्या ‘अरे संसार संसार’ या गीत-संगीतमय कार्यक्रमाने महोत्सवाची  सांगता झाली. ‘‘इतिहासाची चिकित्सा, ऐतिहासिक गोष्टींचा तपास व  तटस्थपणे इतिहासाकडे बघणे, हे आपणाकडून होत नाही, म्हणून आपणच आपल्याभोवती त्रासदायक परिस्थिती तयार  करून ठेवतो.

जगाला खरं-खोटं काय आहे हे सांगणं खरं तर  माझं काम नाही; मात्र धादांत खोट्या इतिहासावर आधारित काही नाटकं आजच्या जगात हजार प्रयोग पूर्ण करत  असतील, तर मलाही माझ्या माध्यमातून चिकित्सापूर्वक  सत्य मांडायला पाहिजे,  या तळमळीतून ‘गांधी  नाकारायचाय,  पण कसा?’ या नाटकाचा जन्म झाला.’’ अशी भूमिका त्याचे लेखक-दिग्दर्शक शंभू पाटील यांनी  मांडली. या नाटकाचे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा  भिडे,  होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील, विजय जैन यांनी केले. व्यासपीठावर गांधींनी उपस्थित राहावं आणि आपल्या  आरोपांना उत्तरं द्यावे,  असा अट्टहास करणारी काही पात्रे  गांधीजी आल्यावर मात्र त्यांनी एकही शब्द बोलू नये,  असं त्यांना बजावतात.

आरोपीच्या पिंजऱ्यात गांधींना उभं करून  त्यांच्यावर मनसोक्त आरोप करण्याची खुमखुमीच जणू काही त्यांच्यात असते. ‘त्यांचं रक्त सारखं सळसळतं आहे’ असं  सतत म्हणणारी काही पात्रं गांधींनी त्यांच्या शंकांचं आणि आरोपांचं निरसन करावं,  असा हट्ट धरून बसलेली  असताना,  आपणच गांधींना गप्प राहायला सांगितलं आहे,  हे पार विसरून गेलेली असतात. ‘हा गांधी काय बोलणार?’ असं म्हणत ते त्यांच्यातच चर्चा सुरू करतात आणि  एकमेकांचं उणं-दुणं शोधून काढत असताना स्वतःच्या  स्वातंत्र्याच्या बचावासाठी गांधीजींचा हात हळूच कधी  धरतात, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. साधारण तासभर  चाललेलं ‘हे नाटक’  गांधींवरच्या आरोपांकडे डोळसपणे  पाहायला लावतं. आरोप जसे की- गांधी हे ‘द मोस्ट कन्फ्युज्ड पर्सन होते’; गांधी स्त्रियांबद्दल अत्यंत अनुदार  होते; अहिंसा आणि सत्याचा मार्ग असं जे काही गांधी  सांगायचे, ते अस्तित्वात नसतं व क्रांतीचा मार्ग रक्ताळलेल्या  रस्त्यावरूनच जातो, म्हणून गांधींमुळे स्वातंत्र्य मिळालेले  नाही.

भारताच्या फाळणीला गांधी जबाबदार आहेत, गांधी  स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घ्यायचे, मुखात रामनाम  जपायचे आणि रोज प्रार्थना करायचे. म्हणून ते इतर धर्मांवर प्रेम करू शकत नाहीत. पुणे करार आणि डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर यासंदर्भातले आरोप- सुभाषचंद्र बोस यांना  गांधींमुळे देश सोडून जावं लागलं; एवढंच नाही तर सरदार  पटेलांवरसुध्दा गांधींनीच अन्याय केलेला आहे.  अशा विविध मजेशीर आरोपांवर हे नाटक ‘गांधी  नाकारायला’ उभं राहतं आणि तेही ‘गांधींचाच हात धरून!’ याच गांधींच्या ‘स्वातंत्र्य आणि अहिंसा’ यावर आधारित  प्रेमाच्या व्याख्येने आयुष्य जगलेल्या कवयित्री-लेखिकासहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित ‘अमृता, साहिर आणि इमरोज’ हे नाटक या कलामहोत्सवात  दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आले. जसा गांधी जगाला  आजही सहजासहजी पचत नाही,  तसेच अमृता प्रीतम हिचं  जगणं आजही झेपण्यासारखं नाही!

तिचं आयुष्य आणि  लेखन यावर तासाभरात एखादी कलाकृती सादर करणं  कठीण तर आहेच, मात्र त्याचबरोबर ते तिच्या जगण्यावर  अन्याय केल्यासारखंसुध्दा आहे. म्हणून ‘रसिदी टिकट’ या तिच्या आत्मचरित्रावर आधारित, तिच्या आयुष्यात  आलेल्या साहिर लुधियानवी आणि इमरोज या दोन  पुरुषांच्या सहवासाला मध्यवर्ती ठेवून तिची कहाणी सांगणारे  हे नाटक तयार करण्यात आले. याची संकल्पना राहुल निंबाळकर यांची असून, दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे.  हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील या कलावंतांनी याचं  सादरीकरण केलं. सन 1919 मध्ये जन्माला आल्याबरोबरच जिचं स्वातंत्र्य  ती मुलगी असल्यामुळे नाकारलं गेलं,  अशी अमृता  स्वातंत्र्याचा जयघोष करते आणि ‘सगळ्या जगाशी आणि बुरसटलेल्या मानसिकतेशी एकटी लढेन, पण माझ्या  स्वातंत्र्याशी तडजोड करणार नाही’ असं ठामपणे सांगते  तेव्हा तो आपल्याला स्वातंत्र्याचे मूल्य शिकवते. धार्मिक  कवी आणि धर्मप्रसारक असणाऱ्या आपल्या वडिलांसमोर  तिची आई गेल्यानंतर अकरा वर्षांची अमृता म्हणते की- ‘देव नाही! मी त्याला मानत नाही, कारण तो असता तर  माझ्यासारख्या लहान मुलीची प्रार्थना त्याने ऐकली असती.’

अमृताची पहिली कविता वडिलांना सापडल्यानंतर मार  खाणाऱ्या अमृताने पुढेही आयुष्यभर समीक्षक आणि टीकाकारांचे फटके खाल्ले. पण अमृता लिहीतच राहिली-

मेरी माँ की कोख मजबूर थी  मैं भी तो एक इन्सान हूँ  

आजादियों की टक्कर में  उस चोट का निशान हूँ

1947 मध्ये लिहिलेली ही कविता आजही मुलींना  आपली कहाणी वाटते.

पुढे साहिर व अमृता यांची झालेली  ओळख आणि केवळ कविता व गाण्यातूनच आयुष्यभर होत  राहिलेला संवाद यावर हे नाटक काहीसा गीतमय प्रकाश  टाकतं. अनेक वेळा ऐकलेल्या साहिर लुधियानवीच्या  प्रसिध्द हिंदी गाण्यांमागची खरी कहाणी आणि किस्से ऐकून  प्रेक्षक भुवया उंचावत टाळ्या वाजवत होते. ‘साहिरची जागा माझ्या आयुष्यात दुसरा कोणीही घेऊ  शकणार नाही,  कारण मी ती दुसऱ्या कुणालाही देणार नाही.  माझं प्रेम साहिरवर आहे आणि ते कायम राहील. मी पुन्हा  कुणावर प्रेम करू शकणार नाही, तरी तुला माझ्याशी लग्न  करायचंय?’ अमृताच्या या प्रश्नावर चित्रकार असलेल्या  इमरोजने एका वाक्यात दिलेलं उत्तर आणि त्यानंतर  आजपर्यंत अमृताशी निभावलेलं एकनिष्ठ नातं या नाटकातून  अनुभवायला मिळतं.

अमृता, साहिर व इमरोज तिघेही कवी आणि  कलाकार...

 ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया  ये इन्साँ के दुश्मन, समाजों की दुनिया  ये दौलत के भूखे,  रवाजों की दुनिया  ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है  यहाँ इक खिलौना है इन्साँ की हस्ती  ये बस्ती है मुर्दा-परस्तों की बस्ती  यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती  ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है... - हे लिहिणारा साहिर  

मेरा शहर एक लंबी बहस की तरह है  सड़कें-बेतुकी दलीलों-सी और गलियाँ इस तरह  जैसे एक बात को कोई इधर घसीटता कोई उधर। ...जो भी बच्चा इस शहर में जनमता  पूछता कि किस बात पर यह बहस हो रही? फिर उसका प्रश्न ही एक बहस बनता  बहस से निकलता, बहस में मिलता। - हे लिहिणारी अमृता....

आणि  इतिहास कहता है की सभ्यता के पहले  बंदा जंगली था, वहशी था पर, 1947 कह रहा है की सभ्यता के बाद भी  बंदा जंगली भी है और वहशी भी! - हे लिहिणारा इमरोज...

 हे तिघे आजही जिवंतच आहेत आणि त्यांच्या  कवितांमधून व कलेतून आजच्या आपल्या या परिस्थितीत ‘आपण काय करू शकतो?’ याची उत्तरे देत आहेत.

‘खुलेआम’ स्वातंत्र्याने जगलेल्या आणि प्रेम केलेल्या या  व्यक्तीनंतर ‘परिवर्तन’ कलामहोत्सवाच्या रंगमंचावर ‘नली  आणि बाळू’ची कहाणी एकल-नाट्याच्या रूपाने  प्रेक्षकांसमोर येते. सामाजिक भीतीमुळे, गुलामगिरीच्या  ठसलेल्या वृत्तीमुळे एकमेकांवर असलेल्या आपल्या  प्रेमाबद्दल कधीही व्यक्त न होऊ शकलेल्या या पात्रांची  कहाणी साहित्य अकादमी पुरस्कारविजेते श्रीकांत  देशमुख लिखित व शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर केलेली  असून योगेश पाटील यांनी दिग्दर्शित केलेली आहे.

हर्षल  पाटील हा व्यवसायाने शिक्षक असलेला कलाकार आपल्या  अभिनयातून आणि तावडी बोलीतून ‘नली’ हे एकल-नाट्य  सादर करताना नलीच्या आयुष्यात संवेदनशीलपणे  डोकवायला लावतो. सामाजिक, आर्थिक, मानसिक, शेती, स्त्री-पुरुष समानता इत्यादी विषयांवर बोट ठेवणाऱ्या एका  सत्य घटनेकडे प्रेक्षकांना समानुभूतीने बघायला लावणारं हे  नाट्य आहे. चौथी नापास झालेली नली जेव्हा सहज  बाळूला म्हणते, ‘मी नापास झाली. पण मी एकली नापास नी  झालीए ते संगी, राम्या गहिरे पोरं-पोरी नापास झाले! पण आते माले शायेत याल नी भेटनार.’ आपल्याला गुलामासारखे वागवलं जातंय, स्वातंत्र्य  नाही हेसुध्दा कृषिजन्य संस्कृतीतील अनेक मुली-बायकांना  कळत नाही- त्याचं आपण काय करणार आहोत?  हा प्रश्न हे  नाट्य आपल्यासमोर ठेवते. याच कृषिजन्य भागात जन्माला आलेल्या आणि तिथेच  जगलेल्या ‘बहिणाबाई’ यांच्या कवितांनी महोत्सवाचा  समारोप झाला.

संकल्पना विजय जैन यांची असून, दिग्दर्शन  सुदीप सरकार यांचे आहे. हा कार्यक्रम मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी,  हर्षदा कोल्हटकर,  अक्षय गजभिये,  भूषण गुरव, योगेश पाटील, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर,  हर्षल पाटील आणि शंभू पाटील या कलाकरांनी सादर केला.  

जळगावमधील असोदा नावाच्या गावात 1880 मध्ये  जन्मलेली बहिणाबाई आयुष्याकडे चिकित्सक वृत्तीने बघते. त्या अनुभवातून तिने कविता लिहिलेल्या आहेत. एकदा तिच्या मुलाने म्हणजे सोपानने तिला विचारले की, ‘तू त  काई शिकेल नी व माय मंग तुले हे गानं कसं सुचतं?’ त्यावर ती म्हणाली, ‘बापा मले धरित्रीत सर्ग दिसतो.’ तिला ती माती वाटत नाही, आरसा वाटतो- त्यात तिला  स्वतःचे प्रतिबिंब दिसते. बहिणाबार्इंच्या कविता त्यांच्या  मुलाने एका वहीत टिपून ठेवल्या,  त्यामुळे आज आपण  त्यातून जगण्याची दृष्टी मिळवू शकतो. अत्यंत साध्यासोप्  या शब्दांत बहिणाबाई मोठमोठे अनुभव व्यक्त करतातदेव  कुठी?  देव कुठी?  तुया भूबुळाच्या मझारी  देव कुठी?  देव कुठी? आहे आभाळाच्या पारी... देव शोधणाऱ्याला जर तो स्वतःमध्ये नाही सापडला तर, ‘जा मग आभाळाच्या आरपार आणि शोधत बस,’ असं  नम्रपणे स्पष्ट बोलणारी बहिणाबाई अनेक संतांपासून ते  गांधींपर्यंत स्वतःच्या जगण्याची चिकित्सा करणाऱ्या  लोकांची आठवण करून देते. जात-धर्मावरून भेदभाव  करणाऱ्या एका देवाच्या भक्ताला ती साधेपणाने विचारते  की, तू असा का वागतो?  वेगवेगळी उदाहरणं आणि संगीतबध्द केलेल्या  बहिणाबार्इंच्या बावीस कविता ऐकत आपण युवा-नोआह हरारीपर्यंत येतो!

‘माणसाला सगळं कळतं, दिसतं, समजतं  आणि त्याला विचार करता येतो;  तरी तो असा विकृत का वागतो?’ या प्रश्नाचे उत्तर या कार्यक्रमात मिळते.  भालचंद्र नेमाडे लिखित ‘मुंजा’ हा ‘वही’कविता प्रकार प्रतीक्षा कल्पराजच्या आवाजात ऐकण्यासारखा आहे. ‘‘झिरीमिरी रे बरसू मेघू, या झाडाले कडं केला देहू, नातं तोडू नये मातीचं, मातीचं मह्या देवा!  उगोयोले रे कोंब लाडानं, लाडानं दारी तुह्या...’’ अशा ओळी संबळच्या ठेक्यासोबत आपल्यात घट्ट रुजून  जातात. ‘माणसा-माणसा, कवा होशीन रे माणूस?’ असा प्रश्न  विचारणारी बहिणाबाई मातीपासून ते माणसापर्यंत  सगळ्यांकडे तटस्थ नजरेतून अभ्यासाचा एक विषय म्हणून  बघते आणि त्यामुळेच स्वतःचं व इतरांचंही ‘माणूसपण’ ती  सहज स्वीकारू शकते. गांधीजींना नाकारण्यापासून सुरू झालेल्या या  महोत्सवाचा समारोप बहिणाबार्इंना कळालेल्या गांधींबद्दल लिहिलेल्या या ओळींनी होतो- सदा  जगाच्या कारणी चंदनापरी घसला  आरे, स्वतःमधी त्याले देव दिसला... त्याले देव दिसला...!

‘परिवर्तन’ कलामहोत्सवाचे किंवा त्यातील प्रयोगांचे आयोजन  करायचे असल्यास संपर्क : परिवर्तन संस्था, जळगाव. Mob. 9823023072

Tags: परिवर्तन कला महोत्सव दिपाली अवकाळे अमृता प्रीतम amruta pritam parivartan kala mahotsav deepali awkale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिपाली अवकाळे,  पुणे
deepaliawkale.25@gmail.com

संचालिका, स्वानुभव इंडिया.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात