डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींचे उपोषण : सामाजिक समता प्रबोधनाची आगामी वाटचाल

10 मे. गुरुजींच्या उपोषणाची सांगता झाली, तो हा दिवस. या घटनेच्या पन्नासाव्या स्मृतिदिनी पंढरपूरला सामाजिक समतेच्या लढ्यात मनापासून सामील झालेल्या कार्यकर्त्यांचा, विचारवंतांचा मेळावा भरणार आहे. केवळ पूर्वदिव्य स्मरणे हे या मेळाव्याचे प्रयोजन नाही. भविष्यकाळातही सामाजिक समतेसाठी कसे प्रबोधन करीत राहावे लागेल याचाही शोध बोध घेण्या-देण्यासाठी या 10 मे च्या मेळाव्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या विचारविमर्शाचे नेतृत्व करणाऱ्या देवदत्त दाभोलकर यांनी या विषयासंबंधीचे आपले मनोगत येथे व्यक्त केले आहे.

भारतीय संस्कृती हा साने गुरुजींचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. भारतीय संस्कृतीत जे जे काही मंगल आहे त्याविषयी त्यांना उत्कट आत्मीयता होती. त्या संस्कृतीत जे जे काही हीण होते त्याविषयी त्यांच्या मनात तीव्र विरोध होता. 'गुरुजींचे राग- लोभ तीव्र होते, परंतु ते देवाच्या चरणी वाहिलेले होते. असे विनोबाजींनी गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले होते. त्या रागद्वेषांमागे व्यक्तिगत आकस नव्हता व त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचा तर लवलेशही नव्हता. एखाद्या संताचे रागद्वेष असावेत त्या स्वरूपाचे ते रागद्वेष होते. काटेकोर मूल्यमापन करणाऱ्या विनोबाजींनाही 'तुकारामादी संतांच्या मालिकेत मी निःशंक मनाने त्यांची गणना करीन' असे म्हणावेसे वाटले, यातच सर्व काही आले.

गुरुजींचे मानस

भारतीय संस्कृतीतील मांगल्याचे आकलन साने गुरुजींच्या रोमारोमात भिनलेले होते. त्या आकलनाच्या मागे पांडित्य नव्हते, विद्वत्ता नव्हती. प्राच्यविद्याविशारदत्व नव्हते, गहन गंभीर गूढ असे काही एक नव्हते, असे गुरुजींनीच स्वतः सांगितले आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात त्यांनी केलेला प्रवेश व तिच्या अंतरंगाचे त्यांनी घेतलेले दर्शन यांमागे त्यांनी घेतलेली सहृदय जीवनानुभूती होती. 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पवे' याचे ते प्रत्यक्ष साक्षात्कारी आकलन होते. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची त्यांनी थेट भेट घेतली होती. 'भारतीय संस्कृती' या आपल्या ग्रंथाच्या उपसंहारात साने गुरुजी लिहितात- 'भारतीय संस्कृतीवर ज्ञानाने लिहिण्याचा मला अधिकार नाही. परंतु प्रेमाने लिहिण्याचा मला अधिकार आहे. भारतीय संस्कृतीवर प्रेम करण्यात मी कोणासही हार जाणार नाही. या प्रेमानेच मला वेडेवाकडे लिहावयास लाविले आहे. भक्तीमुळेच मी बोललो आहे.'

तेथेच ते पुढे लिहितात : 'भारतीय संस्कृती निर्दोष व्हावी, वाढत जावी, तेजाने फुलावी, असे मला उत्कटतेने वाटते. ही संस्कृती ज्ञानमय आहे, संग्राहक आहे, कर्ममय आहे, ही संस्कृती सर्वांना जवळ घेईल, नवीन नवीन प्रयोग करील, अविरत उद्योग करील. भारतीय संस्कृती म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांचा विकास. भारतीय संस्कृतीचा आत्मा स्पृश्यास्पृश्यता मानीत नाही. हिंदु-मुसलमान जाणत नाही. प्रेमाने व विश्वासाने सर्वांना मिठी मारून, ज्ञानमय व भक्तिमय कर्माचा अखंड आधार घेऊन मांगल्य सागराकडे, खऱ्या मोक्षसिंधूकडे जाणारी ही संस्कृती आहे. हा ग्रंथ 1937 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या प्रस्तावनेत शेवटी गुरुजींनी आपल्या मनाची असोशी सांगितली आहे. ते लिहितात : 'भारतीय संस्कृती म्हणजे मेळ. सर्व धर्मांचा मेळ सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञान-विज्ञानांचा मेळ, सर्व काळांचा मेळ. अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी, सर्व मानवजातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी, अशी ही थोर संस्कृती. तिचाच लहानसा- निदान मानसिक तरी- उपासक मला होऊ दे. दुसरी कोणतीही इच्छा मला नाही."

संकल्प

दुसरी कोणतीही इच्छा त्यांच्या मनात नव्हती याला त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र साक्ष आहे. "लब्धप्रकाश इतिहास निसर्ग-माने' या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मकसोटीवर उतरू शकेल अशी ही ग्वाही आहे. पंढरपूरचे उपोषण गुरुजींच्या मनात आले नसते तरी त्यांच्या जीवन चरित्र ग्वाही तशीच राहिली असती. परंतु ते उपोषण हे देखील एखादा अपघात अशा स्वरूपाचे नव्हते. गुरुजींनी जन्मभर मनात वागवलेल्या अशोसीचा तो विशुद्ध भावात्मक परिपाक होता. त्यांच्या उपोषणाच्या मागील भावना विशुद्ध होती याची ग्वाही सेनापती बापट यांनी, त्यांची या सर्व कालखंडात जी साथ केली तिच्यातूनच मिळाली होती. आणि सेनापती बापटांहून अधिक तोलामोलाचा साक्षीदार तरी महाराष्ट्रात कोण होऊ शकला असता?

आणि सिद्धी

हे उपोषण आता महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचा एक उज्वल अविभाज्य अंग बनले आहे व ते तसे निरंतर राहील. अपुऱ्या माहितीच्या आधारावर महात्मा गांधींनी प्रथम या उपोषणाला दाखविलेली प्रतिकूलता हा तर गुरुजींच्या दृष्टीने उपोषण काळातील सर्वात कसोटीचा क्षण होता. गांधीजींच्यावरील निष्ठेबाबत गुरुजी कोणालाही हार गेले नसते. परंतु आपली नम्र परंतु आग्रही भूमिका त्यांनी सोडली नाही. ‘बापूजी, हरिंश्चद्राने स्वप्नात दिलेले वचन प्राणपणाने पाळले म्हणून आपण त्याचा आदर्श मानतो आणि मी तर हजारो लोकांच्यासमोर माझी प्रतिज्ञा उच्चारत आलो आहे. मला माघार कशी घेता येईल?" अशा आशयाची मांडणी त्यांनी केली. त्यांनी आपले उपोषण, त्याचे कार्य सिद्धीस गेल्यानंतरच समाप्त केले. सर्व पार्श्वभूमी नीट समजल्यानंतर गांधीजींनी गुरुजींचा गौरव केला. 

गुरुजीच्या भक्तीचा आणि कृतीचा तो विजय होता. आळंदी, देहू, पैठण आदी संतस्थाने महाराष्ट्राची सांस्कृतिक पीठे आहेत. त्या सर्वांचे आदिपीठ पंढरपूर येथे आहे. तेथील मंदिर प्रवेशासाठी केलेल्या उपोषणाची यशस्वी सांगता ही. म्हणूनच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक क्रांतिकारक घटना होती. त्या घटनेचे सुवर्णस्मृतिस्मरण कृतज्ञतेने करावेसे वाटणे हे साहजिकच आहे. या दिशेने आपल्याला अजूनही कितीतरी वाटचाल करावयाची आहे. याचे पुनःस्मरण या पुण्यस्मरणात व्हावयास हवे. सामाजिक व सांस्कृतिक समतेसाठी करावयाचे कितीतरी विचारमंथन, तदनुसार प्रबोधन व त्यावर आधारित समंजस कृती यासाठी कितीतरी वाटचाल अद्याप महाराष्ट्रात व भारतातही केली गेली पाहिजे. 

प्रगत राष्ट्रातूनही येणारा हाच अनुभव आहे. अनेक शतकांच्या विपरीत व्यवहारातून निर्माण झालेल्या समस्या एकदोन दिवसांतच काय, परंतु एकदोन शतकांतदेखील दूर करणे दुष्कर असते. महापुरुषांचे अथक भगीरथ प्रयत्नही अशा संदर्भात अपुरे पडतात. असाच जगाचा इतिहास आहे. याची अनेक क्षेत्रांतील असंख्य उदाहरणे जगाच्या इतिहासात आपल्याला आढळून येतात. सुधारणेची गंगा समाजजीवनात निर्मळ वाहू लागण्यापूर्वी या भगीरथ प्रयत्नांना परिस्थितीचे दुर्लघ्य पहाड फोडीत, केव्हा त्यांतून वाट काढत पार करावे लागतात. हा प्रवाह समाजजीवनात निर्मल उपकारक राहावयास हवा असेल तर कृतीचे आवश्यक कार्यक्रम करताना मनातील पूर्वग्रह, विविध किल्मिषे ते पाणी कलुषित तर करीत नाहीत ना, या विषयीही दक्षता घ्यावी लागते. व्यवहारात हे सांभाळणे दुष्कर असते, परंतु ते करावे लागते किंवा निदान आपण त्या दिशेने सतत जागरूक असणे आवश्यक आहे, याचे अवधान ठेवावे लागते. सुजाण कणखर नेतृत्वाची ती कसोटी असते. 
कृती

या सर्व मर्यादांचे भान म्हणजे व्यक्तिगत वा संघटनात्मक क्रियाशून्यतेचे तात्त्विक समर्थन असे होता कामा नये. कितीही अडचणी असल्या तरी अशा सर्व प्रयत्नांना एक आश्वासनही आहे. छोटी मोठी प्रत्येक चांगली कृती आपला काही ना काही ठसा उमटवल्याखेरीज राहत नाही आणि ते अंतिमतः परिणामकारक होतेच असे ते आश्वासन आहे. 'स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।' हे गीतेने दिलेले आश्वासन याच स्वरूपाचे आहे.

सहवीर्यं करवामहै 

त्यामुळे कोणाचीही मंगल हेतूने प्रेरित अशी कितीही छोटी कृती असली तरी ती समाजाला हितकारकच होते. परंतु अशा फुटकळ प्रयत्नांपेक्षा किंवा प्रत्येकाच्या स्वतंत्र तंत्र कार्यापेक्षा काही कार्य सर्वांच्या सामंजस्याने, सहकार्याने व अशा प्रश्नांच्या बाबतीत तरी एकाकी भावना राखून करता आले तर समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी व गतिमान स्वरूप देता येईल. याविषयी आवश्यक ते चिंतन व काही संघटनात्मक कृती यांचा प्रारंभ जर आपण आजच्या या पुण्यदिवशी करू शकलो तर ते एक छोटेसे परंतु महत्वाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरेल. खरे तर भारतात आज सर्वच क्षेत्रांत छोटे मोठे मतभेद बाजूला टाकून सर्वांनी एकजुटीने व समर्थपणे काम करण्याचा काळ आला आहे. 

"काळ आला पण वेळ आली नाही," या पद्धतीने भारत गेल्या पाच दशकांत कसा तरी तग धरीत आलेला आहे. परंतु याचे आपल्याला भान राहिलेले नाही तर, काळ आला आणि वेळही निघून गेलेली होती अशा अवस्थेत भारत अंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर संकटात सापडणे अटळ आहे. गेल्या दशकातील जागतिक य भारतीय परिस्थितीचाही रेटा असाच आहे. या रेट्याचा तीव्र अनुभव आपण आर्थिक क्षेत्रात घेत आहोत व राजकीय क्षेत्रातही घेत आहोत. मोठमोठे हेलकावे घेत भारत हेलपाटत आपले पाय स्थिर असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

ही आज कोणत्याही तात्विक विवेचनाखेरीज निरक्षर सामान्य माणसालाही कळू शकेल अशी अनुभवसिद्ध गोष्ट झालेली आहे. राजकीय, आर्थिक क्षेत्रांत किमान वैचारिक एकता व कृतीची एकात्मता क्रमाक्रमाने कशी येणार असेल ती येवो, परंतु सामाजिक क्षेत्रात तरी वैचारिक मूलभूत विवाद आता फारसे राहिलेले नाहीत. निदान त्या क्षेत्रात तरी काही पथदर्शक रचना करता आल्यास ते या पुण्यदिवशी केलेले एक महत्त्वाचे कार्य ठरेल.

Tags: पंढरपूर    महात्मा गांधी साने गुरुजीं भारतीय संस्कृती देवदत्त दाभोलकर Pandharpur Mahatma Gandhi sane Guruji Indian Culture Devdatt Dabholakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके