डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘साधना’ साप्ताहिकाच्या 11 जून 2011 अंकात डॉ.आशुतोष मुळ्ये यांचा ‘प्राचीन भारतातील विज्ञानाचा ऱ्हास का झाला?’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे.

त्या लेखात पान नं.12 वर पहिल्या स्तंभात, दुसऱ्या परिच्छेदात पहिली ओळ अशी आहे की, ‘‘दर्शनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जीवनाला मिथ्या मानणारे शंकराचार्य समाजधारणेच्या क्षेत्रात मात्र नव्या हिंदू धर्मव्यवस्थेचे निर्माते ठरले.’’ लेखाच्या शेवटी पुन्हा एकदा लेखकाने म्हटले आहे की, ‘‘विज्ञान नेहमीच भौतिक जगाबाबत असतं. पण जग ही माया आणि ब्रह्म हेच सत्य अशा विचारसरणीच्या प्रसारामुळे भौतिक जगातल्या गोष्टींबद्दल अनास्था निर्माण झाली. ‘ठेविले अनंते...’ अशा पद्धतीनं भौतिक गरजाच गोठवल्या तर शोध कुठून येणार? तत्त्वज्ञान आणि भजनकीर्तनात रमणाऱ्या ‘साधूं’चीच पैदास होणार!’’ वरील दोन अवतरणे वाचल्यावर शंकराचार्य आणि तुकाराम यांच्याबद्दल डॉ.मुळ्ये यांनी घेतलेले दोन आक्षेप किंवा गैरसमज ठळक होतात. पैकी शंकराचार्य यांच्यावरील आक्षेप हा त्यांचे विधान नीटपणे समजून न घेता केलेला आहे.

उपनिषदात एक वाक्य आहे की, ‘ब्रह्म सत्य, अनंत आणि ज्ञानरूप आहे. जे अविनाशी आहे त्याला सत्य म्हटले जाते.’

‘‘विज्ञान तथ्याला सत्य म्हणते आणि विज्ञानाची ही परिभाषा आज मोठ्या प्रमाणावर स्वीकृत आहे. विज्ञान म्हणते की जे तथ्य आहे तेच सत्य आहे. तथ्यचा अर्थ आहे ते की जे प्रयोग करून पारखून घेता येईल, ज्याच्यासाठी वस्तुजगतामध्ये प्रमाण मिळेल.’’

‘‘उपनिषदाला याच्याशी काही नाराजी नाही. पूर्वेकडच्या चिंतकांनी यावर आक्षेप घेतला नाही, की तथ्य सत्य आहे. ते म्हणतात की, ठीक आहे की समूहाच्या समोर जे वस्तुगतपणे आहे ते तथ्य म्हणजे सत्य आहे. पण ते तथ्य उद्या गैरहजर होऊ शकते. आणि काल जे गैरहजर होते ते आज उपस्थित होऊ शकते. म्हणून पूर्वेकडचे चिंतक असे म्हणतात की, आम्ही सत्य तर त्यालाच म्हणतो की जे कधीही गैरहजर होत नाही. असे नाही की आज आहे आणि उद्या नसेल. जे नेहमी आहेच, त्यालाच आम्ही सत्य म्हणतो; बाकीच्यांना आम्ही तथ्य म्हणतो. (तथ्य = fact? )’’

‘‘म्हणजेच, पूर्वेकडचे चिंतक तीन भाग करतात. स्वप्न त्याला म्हणतात, जे व्यक्तीची स्वत:ची कल्पना असते. तथ्य त्याला म्हणतात जे समुदायाचा अनुभव आहे. आणि सत्य त्याला म्हणतात जी शाश्वताची व्यवस्था आहे, जे नेहमी आहे. कारण जे काल तथ्य होते, ते आज तथ्य नाही.’’ ‘‘काल तुम्ही तरुण होता आणि सगळ्यांनी साक्ष दिली होती की तुम्ही तरुण आहात आणि आज तुम्ही तरुण नाहीत. सत्य कोणते  आहे? काय झाले? आणि जर सत्यसुद्धा असे दहा वर्षांत बदलणार असेल तर मग रात्रभर जे स्वप्न चालू होते आणि दहा तासांनंतर त्यात बदल झाला, तर मग ती दहा वर्षे आणि हे दहा तास यांत काय फरक राहिला?’’

‘‘म्हणूनच आमची सत्याची परिभाषा अविनाशीला, शाश्वताला, नित्यपणाला आधार धरते. म्हणून आम्ही जगाला माया म्हटले. ‘‘जेव्हा शंकराचार्य म्हणतात की हे जग माया आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की हे जग नाही आहे. त्याचा अर्थ एवढाच असतो की हे जग असे आहे की ते नेहमी आहे तसेच राहणार नाही. पुष्कळांना असे वाटले की शंकराचार्य म्हणतात की हे जग नाही आहे. हे जे झाड दिसते आहे ते नाही आहे. किंवा तुम्ही जे आता येथे बसला आहात ते तुम्ही नाही आहात.

शंकराचार्यांचा म्हणण्याचा असा अर्थ नाही. शंकराचार्य म्हणतात की तुम्ही अगदी आहातच. पण तुम्ही असे आहात की आता तुम्ही आहात आणि उद्या तुम्ही नसाल. म्हणून आम्ही तुम्हांला सत्य म्हणणार नाही. आम्ही तुम्हांला माया म्हणतो. आम्ही तर तुमच्यामध्ये असलेल्या त्या तत्त्वाला सत्य म्हणतो. जे आजही तुमच्यात आहे, जे तुम्ही उद्या नसलात तरी असेल आणि जे तुम्ही काल नव्हता तरी होते.’’

डॉ.मुळ्ये लेखाच्या शेवटी म्हणतात की, ‘ठेविले अनंते...’ अशा पद्धतीने भौतिक गरजाच गोठवल्या तर शोध कुठून येणार?’’

या प्रश्नातील ‘ठेविले अनंते...’ हे दोन शब्द तुकारामाच्या अभंगातील आहेत. तुकारामाचा तो अभंग मुळात काय आहे ते आपण पाहू.

हेचि थोर भक्ति आवडती देवा।

संकल्पावी माया संसाराची।।1।।

ठेविले अनंते तैसेचि रहावें।

चित्तीं असों द्यावें समाधान।।2।।

वाहिल्या उद्वेग दु:खचि केवळ।

भोगणे ते फळ संचिताचें।।3।।

तुका म्हणे घालू तयावरी भार।

वाहूं हा संसार देवापायी।।4।।

हा अभंग वाचल्यावर लक्षात येईल की ‘ठेविले अनंतें तैसेचि रहावें’ हे विधान स्वतंत्र नसून अभंगातल्या दुसऱ्या कडव्यातली पहिली ओळ आहे. ही ओळ अभंगातल्या पहिल्या कडव्यातल्या विधानाचे स्पष्टीकरण करण्यासाठी आलेली आहे.

पहिल्या कडव्यात तुकारामाने म्हटले आहे की, ‘हेचि थोर भक्ति आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची।।1।।’

ह्या कडव्यातील दोन-तीन शब्द वाचून अडखळायला होईल. भक्ती, देव, माया हे शब्द वाचल्यावर डॉ. मुळ्ये म्हणतील की, आली का ती तुमची टाळकुटी पंढरपुरी भक्ती! पण त्यांनी थोडा धीर धरावा. 

तुकारामाने भक्ती या शब्दाचा अर्थ ह्याच चरणात स्पष्ट केला आहे.

तुकाराम म्हणतो की, देवाला फक्त एकच आणि एकच भक्ती आवडते. ‘हेचि’ या सर्वनामाचा वापर तेवढ्यासाठीच केलेला आहे. ‘हेचि’ म्हणजे ‘हीच’, दुसरी तिसरी कोणतीही नाही. आणि ‘हीच’ भक्ती थोर आहे हेही तुकारामाने खणखणीतपणे सांगितले आहे.

म्हणजे गंधअक्षता, आरतीधुपारती, टाळकुटेपणा ह्या कर्मकांडाला तुकारामाने कणखरपणे बाजूस सारले आहे; आणि मग ‘हेचि’ म्हणजे कोणती, तर तुकाराम म्हणतो की संसाराची माया सोडणे हीच भक्ती थोर आहे आणि हीच थोर असलेली भक्ती देवाला आवडते.

येथे ‘माया’ हा शब्द आला आहे. ‘देव’ हा शब्दही आहे. ‘माया’ ह्या शब्दाबद्दल आधी थोडासा खुलासा केलेला आहे. शिवाय आणखी खुलासावजा सांगणे आवश्यक आहे.

त्या अगोदर ‘देव’ ह्या शब्दाचा कोणता अर्थ तुकारामाला अभिप्रेत आहे तेही धुंडाळून पाहू या. देव म्हणजे कोणी आकाशात राहणारी व्यक्ती नाही.

तुकाराम ठणकावून सांगतो की,

जे का रंजले गांजले।

त्यांसि म्हणजे जो आपुले।।1।।

तोचि साधु ओळखावा।

देव तेथेचि जाणावा।।2।।

मृदु सबाह्य नवनीत।

तैसें सज्जनांचे चित्त।।3।।

ज्यासि आपंगिता नाही।

त्यासि धरी जो हृदयीं।।4।।

दया करणे पुत्रासी।

तेचि दासा आणि दासी।।5।।

तुका म्हणे सांगू किती।

तोचि भगवंताची मूर्ति।।6।।

डॉ. मुळ्ये विचारतात की, ‘‘ठेविले अनंते... अशा पद्धतीनं भौतिक गरजाच गोठवल्या तर शोध कुठून येणार?’’ प्रश्नाला वरील अभंगात उत्तर दिले आहे. त्यावरून कळेल की भौतिक शोध कुठून येवोत अगर न येवोत, पण तातडीचा मार्ग म्हणजे रंजल्यागांजलेल्यांना भौतिक पातळीवर समानतेने वागवणारा माणूस हाच तुकारामाचा ‘अनंता’ होता, देव होता.

हा एवढा क्रांतिकारी शोध भौतिकच होता. अजूनही डॉ.मुळ्ये शंकाकुल असतील तर त्यांची खातरजमा व्हावी म्हणून तुकारामाचा आणखी एक रामबाण अभंग पहा :

तीर्थीं धोंडा पाणी।

देव रोकडा सज्जनीं।।1।।

अबब! हे म्हणजे फारच झाले. In cash payment देव शोधायचा असेल तर, तुकाराम म्हणतो की, सज्जन हाच देव आहे; तीर्थाच्या ठिकाणी फक्त धोंडा आणि पाणी आहे. तुम्ही आम्ही सुद्धा, नास्तिक असूनसुद्धा, देवाला रिटायर करा असे सांगणारेसुद्धा तीर्थाची अशी खरडपट्टी काढायला धजावणार नाहीत. असा रोकडा आणि भौतिक देव असलेला सज्जन जवळ करायला कोण धजावेल?

तरी सुद्धा तुकाराम न कंटाळता तुम्हा-आम्हांला विनवतो की,

देव घ्या कोणी देव घ्या कोणी।

आइता आला घर पुसोनी।।1।।

देव नलगे देव नलगे।

सांठवणाचे रुधले जागे।।2।।

 देव मंदला देव मंदला।

भाव बुडाला काय करू।।3।।

 देव घ्या फुका देव घ्या फुका।

नलगे रुका मोल काही।।4।।

 दुबळा तुका भावेंविण।

उधार देव घेतला ऋण।।5।।

असा भौतिक देव उधार घेतल्यावर संसाराची माया सोडावी लागत नाही, ती माया आपोआप गळून पडते. मग ‘अवघे जन झाले मज लोकपाळ’ असा ‘भौतिक’ अनुभव येतो, असा ‘भौतिक शोध’ लागतो. मग,

 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता।

बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा।।1।।

कृष्ण माझा गुरू कृष्ण माझा तारूं।

उतरी पैलतीरू भवनदीचा।।2।।

 कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन।

सोईरा सज्जन कृष्ण माझा।।3।।

 तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा।

वाटे न करावा परता जीवा।।4।।

अशी जागरूकता आल्यावर मनाचा व्यापार थांबतो. आणि जेव्हा मन भरकटणे थांबते तेव्हा तुम्ही काम-क्रोधापासून मुक्त होता.

अशा परिस्थितीत कोणी जर विचारले की लग्न करणार काय? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले, ‘करणार’. सगळे अचंबित झाले.

रामकृष्ण म्हणाले, ‘जर मी कालीमातेशी लग्न केले आहे तर मग शारदेशी का नाही करणार?’

 त्या दिवसापासून शारदा ही शारदामाँ झाल्या.

सगळेच असे झाले तर? तर मग मुलेबाळे होणार नाहीत. सर्व जग ब्रह्ममय होऊन जाईल आणि मग ‘आनंदाचे डोहीं आनंदतरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।’

कोणी म्हणेल की ही गोष्ट सर्वसामान्यांना कशी जमणार? सर्व- सामान्यांना जमेल असे काहीतरी सांगा. त्याला उत्तर असे की असे सांगण्याची गरज नाही. फक्त आदर्श सांगण्याचीच गरज असते. ‘नेहमी खरे बोलावे’ हे आदर्श सांगणे आहे. ‘जमेल तेव्हा खरे बोलावे, नाही जमले तर खोटे बोलावे’ हे सांगण्याची गरज नाही किंवा त्याची कागदी पट्टिका छापून भिंतीवर लावण्याची आवश्यकता नाही.

‘चोरी करावी’ हा आदेश चोरांच्या टोळीतसुद्धा निषिद्ध आहे. निषिद्ध नसेल तर चोरांची टोळी होणारच नाही. म्हणजे आदर्शाची आस सगळ्यांनाच असते. कोणाला केव्हा जमेल त्याची प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा कोणत्या तरी भौतिक चमत्काराची नव्हे, तर स्वत:च्या जागरूकतेची.

भारतीय चिंतनातील ही भाषा बीजगणिताची भाषा आहे, ही गोष्ट सतत लक्षात ठेवली तर आणि तरच उपनिषदांपासून संतांपर्यंतच्या उद्‌गारांतील संकेत ध्यानात येतील.

तुकाराम तेव्हा म्हणतो की, ‘देव घ्या कोणी देव घ्या कोणी’, तेव्हा त्यालाही असेच म्हणायचे असते की, जागरूकता घ्या कोणी जागरूकता घ्या कोणी.

तुकाराम म्हणतो, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्तीं असों द्यावें समाधान.’

अनंते म्हणजे ‘जागरूकतेने’.

तैसेचि म्हणजे फक्त वर्तमानकाळी रहावे. भूतकाळाचे ओझे नको, भविष्यकाळाची ओढ नको. त्यासाठी अहंकार नष्ट झाला पाहिजे.

Tags: ब्रह्म जागरूकता माया शंकराचार्य तुकाराम Brahman awareness Maya Shankaracharya Tukaram weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात