डिजिटल अर्काईव्ह

1917 ते 1928 पर्यंत कोणत्या ना कोणत्या नात्याने सरदारांचा अहमदाबाद नगरपालिकेशी संबंध आला. या काळात त्यांनी अहमदाबाद शहर नावारूपाला आणले व त्या शहराला आधुनिक काळात आणून सोडले. त्यांच्या प्रतापानेच अहमदाबादचे सार्वजनिक जीवन फुलले आणि आजपर्यंत अहमदाबादचा विकास या ना त्या दिशेने चालूच राहिला आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कार्यात सरदार पटेलांचा वाटा जितका मोलाचा तितकाच अद्वितीय आणि यशस्वी असा होता. स्वातंत्र्यानंतर भारतातील संस्थानांचे सरदारांनी अल्प काळात, सुरळीतपणे पण परिणामकारक रीतीने घडवून आणलेले विलीनीकरण हे भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी प्रकरण आहे. त्याचप्रमाणे स्थानिक कमिट्यांपासून अखिल भारतीय समितीपर्यंतची काँग्रेसची संघटना उभी करण्याची व त्यांच्या व्यवस्थापनाची सरदारांची कामगिरी उल्लेखनीय म्हटली पाहिजे. खालपासून वरपर्यंत राज्यकारभाराच्या प्रत्येक स्तरावर काम करताना त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता केवळ अप्रतिम होती.

त्यांच्या अंगच्या उपजत गुणांचे व विविध सामर्थ्यांचे  दर्शन त्यांच्या अगदी सुरुवातीच्या कारकीर्दीत स्पष्टपणे होते. इ. स. 1917 ते 1928 पर्यंत कोणत्या ना कोणत्या नात्याने त्यांचा अहमदाबाद नगरपालिकेशी संबंध आला. या काळात त्यांनी अहमदाबाद शहर नावारूपाला आणले व त्या शहराला आधुनिक काळात आणून सोडले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना स्वतःला लोकप्रियता मिळाली एवढेच नव्हे तर अहमदाबाद शहरातील जनतेच्या सुप्त शक्तीलाही त्यांनी जाग आणली. त्यांच्या प्रतापानेच अहमदाबाद शहराचे सार्वजनिक जीवन फुलले आणि त्या शहराचा हा विकास आजपर्यंत या ना त्या दिशेने चालूच राहिला आहे.

एक यशस्वी वकील म्हणून त्यांची कारकीर्द 1913 सालापासून अहमदाबादलाच सुरू झाली. दोन वर्षानंतर, म्हणजे 1915 साली, गांधीजींनीपण अहमदाबाद हे आपले कार्यक्षेत्र बनवले. परस्परांचा परिचय झाल्यावर दोघांत निकटचे व दृढ नाते निर्माण झाले व ते आयुष्यभर रिटकून राहिले. हे नाते सर्वार्थाने सुपरिणामदायी झाले.

वकील म्हणून सरदार पटेल यांची कीर्ती शहरभर पसरली, कारण ते कोणाचीही भीडभाड बाळगत नसत गोऱ्या न्यायाधीशांनाही निडरपणे ठणकावीत असत. अशा हिमतीचा वकील अहमदाबाद नगरपालिकेत आला तर मग्रूर इंग्रज अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणता येईल अशा विचाराने अहमदाबादच्या नगरजनांनी वल्लभभाईंना नगरपालिकेची निवडणूक लडविण्याचे आमंत्रण दिले. निवडणुकीत त्यांचा विजय झाला. नंतर नगरपालिकेच्या आरोग्यसमितीचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली.

इ. स. 1917 हे वर्ष एक संस्मरणीय वर्ष होते. त्या वर्षी गोध्रा येथे पहिली राजकीय परिषद भरली. राजकीय परिषदेच्या या अधिवेशनात गांधीजी आणि वल्लभभाई यांचाच पुढाकार होता. खेडा जिल्ह्यातील सत्याग्रहही त्याच वर्षात यशस्वीरीत्या पार पडला. अशा रीतीने एका बाजूला वल्लभभाई गुजरातमध्ये प्रांतीय पातळीवर काम करीत असतानाच शहरपातळीवरही नगरहिताच्या कामांत ते क्रियाशील होते.

अहमदाबाद नगरपालिकेतील त्यांच्या कामगिरीचे वर्णन चार टप्प्यांत करता येईल: (1) 1917 ते 1920 या काळात त्यांनी नगरपालिकेत अधिकारावर असणाऱ्या गोऱ्या अंमलदारांना निष्काळजीपणा, मग्रुरी व कार्यक्षमतेचा अभाव अशा कारणांसाठी त्यांच्या पदांवरून हटविले. (2) 1920 ते 1922 या दोन वर्षांच्या काळात त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून असहकाराची चळवळ चालवली. (3) 1922 ते 1924 या काळात सरकारने नगरपालिका निलंबित केली, किंवा सरकारला तसे करणे भाग पडले. (4) 1924 ते 1928 या चार वर्षांत ते नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले व अहमदाबाद शहराचे जुने स्वरूप बदलून त्याला देखणेपणा देण्याच्या कामात सतत व्यस्त राहिले.

1917 ते 1920 या तीन वर्षांत वल्लभभाईंनी शीलडी नावाच्या गोऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या गैरवर्तनाबद्दल जबाबदार ठरवून नगरपालिकेच्या सामान्य सभेत प्रश्न विचारून त्याच्यातील कार्यक्षमतेचा अभाव व त्याची पक्षपाती वागणूक सभासदांच्या नजरेस आणून दिली व त्या अंमलदाराला राजीनामा देण्यास भाग पाडले. मुन्शी नावाच्या व्यापाऱ्याला शहराबाहेर असलेल्या एका तलावाचा खाजगी उपयोग करू देण्याची शीलडीची अनधिकृत व अयोग्य कारवाई वल्लभभाईंच्या नजरेतून सुटली नाही. मुन्शीचा फायदा करून देण्यात शीलडीचा स्वार्थ दडलेला होता ही गोष्ट लोकांच्या नजरेस वल्लभभाईंनी आणून दिल्यावर शीलडीला जावेच लागले.

त्यानंतर नगरपालिकेच्या माथी लादण्यात आलेल्या मॅकसे नावाच्या गोऱ्या इंजिनिअराची पाळी आली. अहमदाबाद शहराच्या काही भागांना म्युनिसिपालिटीचे पाणी मिळत नव्हते. या गोष्टीचा छडा लावून लोकांच्या होणाऱ्या हालांना मॅकसेच जबाबदार आहे हे वल्लभभाईंनी पुराव्यानिशी सिद्ध केले. परिणामी मॅकसेला राजीनामा देऊन नोकरी सोडून जाणे भाग पडले. तिसरा किस्सा आहे वाडिया नावाच्या पाणी खात्यातील इंजिनिअरचा. शहरात एका ठिकाणी आग लागली तेव्हा आग विझवायला पुरेसे पाणी मिळू शकले नाही आणि आगीने अतोनात नुकसान झाले. या घटनेस खरोखर कोण किती प्रमाणात जबाबदार होते हे नक्की करण्याचे काम वल्लभभाईंनी स्वतःच्या हाती घेतले. या बाबीचा पूर्ण अभ्यास करून व स्वतःची वकिलीतील हुशारी पणाला लावून, या घटनेतील दोष मुख्यतः वाडियांचा होता हे त्यांनी सिद्ध केले. वाडियांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. 

वल्लभमाईंच्या जीवनातील 1917 ते 1920 हा तीन वर्षांचा काळ weeding out- म्हणजे तण उखडून काढून फेकून देण्याचा होता, असे म्हणता येईल. एक कडक पण कार्यक्षम व्यवस्थापक अशी कीर्ती वल्लभभाईंनी या काळात मिळवली व लोकांचा विश्वास संपादन करून जनजीवनात स्वतःचे स्थान दृढ केले. 

1920 साली कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात असहकाराचा कार्यक्रम स्वीकारण्यात आला व त्याचबरोबर देशात, गुजरातमध्ये व अहमदाबादेत एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. गांधीजींच्या असहकारितेच्या तत्त्वांचा अंमल नगरपालिकेच्या पातळीवर कसा करता येईल, असहकारिता आंदोलनात नगरपालिकेतील सत्तेचा एक शस्त्र म्हणून कसा उपयोग करता येईल, याचा वल्लभभाईंनी सखोल विचार केला व नगरपालिकेच्या द्वारे सरकारशी असहकार पुकारून एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आणि आपल्या मौलिकतेचे दर्शन घडवले. 

1920 साली गांधीजींनी गुजरात विद्यापीठाची स्थापना केली आणि राष्ट्रीय शिक्षणाचा आरंभ केला. राष्ट्रीयतेचे एक नवीन वारे देशात वाहू लागले. याचा परिणाम म्हणून की काय, वल्लभभाईंनी असहकारासाठी शिक्षणाचे क्षेत्र निवडले. असहकार पुकारण्यापूर्वी वल्लभभाईंनी स्वत:च्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतील अशा सहकाऱ्यांचा गट तयार केला. गांधीजींचा संदेश व प्रेरणा यांना वल्लभभाईंनी आपल्या नेतृत्वाची जोड दिली. या त्यांच्या सहकाऱ्यांत गणेश वासुदेव मावळंकर, बळवंतराय प्रमोदराय ठाकोर, जीवनलाल दिवाण तसेच हरिप्रसाद व्रजराय देसाई यांचा समावेश होता.
असहकारिता आंदोलनाच्या सुरुवातीस नगरपालिकेतर्फे चालणाऱ्या शाळेतील दोन शिक्षकांनी आपल्याला मिळणाच्या पाठ्यपुस्तकांमार्फत राष्ट्रीयतेचे शिक्षण देता येणार नाही असे कारण सांगून राजीनामे दिले. म्युनिसिपल स्कूल बोर्डाने हे राजीनामे जनरल बोर्डाकडे पाठवले. जनरल बोर्डाच्या सभेत त्यावर सविस्तर चर्चा झाली, वल्लभभाई व त्यांचे सहकारी यांनी शिक्षकांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. शाळा आणि पाठ्यपुस्तके यांवरील सरकारचे नियंत्रण काढून टाकले पाहिजे असा सूर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच उमटला. सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हायचे तर सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर पाणी सोडावे लागले असते. तसे ते सोडल्यास म्युनिसिपालिटीने तयारी दाखवली पाहिजे असे बहुसंख्य सभासदांचे म्हणणे पडले व सरकारी अनुदान न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 

अनुदानाशिवाय शाळा चालवायला पैशाची आवश्यकता होती. त्यासाठी एका नवीन शिक्षणमंडळाची स्थापना करण्यात आली. निधी गोळा करण्यात आला. सरकारी अनुदान न घेतले तरी शाळांचे निरीक्षण करण्याचा अधिकार सरकारला आहे असे सरकारचे म्हणणे पडले. वल्लभभाईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला. शाळा जनतेच्या इच्छेप्रमाणे स्वतंत्ररीत्या चालवल्या जाऊ लागल्या, त्यांत राष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण दिले जाऊ लागले व सरकारी नियंत्रणाला आव्हान देण्यात आले. या गुंत्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने म्युनिसिपालिटीला देण्यात येणाऱ्या पैशावरच टाच आणली. वल्लभभाईंनी या प्रश्नाला जाहीर संघर्षाचे स्वरूप दिले. लोकांत जागृती निर्माण केली व प्रजेचा पैसा अयोग्य रीतीने दाबून ठेवण्याचा आरोप सरकारवर ठेगून सरकारला दोषी ठरवले. थोडक्यात सांगायचे तर सरकार व नगरपालिका दोघे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. अहमदाबाद म्युनिसिपालिटीच्या पाठोपाठ नाडियाद व सुरत येथील नगरपालिकांनीही याच मार्गाचा अवलंब केला. शेवटी कंटाळून सरकारने 1922 साली अहमदाबाद नगरपालिकाच निलंबित करून टाकली. 

असहकाराच्या चळवळीमुळे अहमदाबादच्या नागरिकांत राष्ट्रीय भावना जागृत झाली, राष्ट्रीय शिक्षणाचा व्याप वाढला. प्रजाशक्तीची वाढ झाली व जनतेच्या मनात स्वावलंबनाच्या भावनेचा उदय झाला. सरकारचा दुबळेपणा उघडकीस आला आणि प्रजेच्या मनात स्वतःचा कारभार करण्याची व स्वराज्य चालवण्याची क्षमता निर्माण झाली. लोकशाहीचा आरंभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फतचं होतो, ही गांधीजींची शिकवण खरी ठरली. गांधीजींच्या असहकाराचे क्षेत्र व्यापक झाले आणि असहकाराचे मार्ग जनतेच्या ध्यानी आले. लोक स्वत:च्या ताकदीने आपले प्रश्न सोडवू शकतात व यातच लोकशाहीचे मर्म सामावलेले आहे ही गोष्ट सिद्ध झाली. 

1920 ते 1922 पर्यंत नगरपालिकेचे काम ठप्प झाले. पण त्यानंतर शिक्षणाच्या प्रश्नावर सरकारशी तडजोड झाली. वल्लभभाईंचा विजय झाला. हा विजय हा अहमदाबादच्या जनतेचा विजय आहे असे वल्लभभाईंनी सांगितले. लोकशाहीतील नेत्याला साजेल अशा रीतीने त्यांनी लोकांनाच या लढ्याच्या यशाचे श्रेय दिले. 

1924 ते 1924 ही चार वर्षे ते नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर होते. ही चार वर्षे त्यांनी रचनात्मक कार्य व शहराचे आधुनिकीकरण करण्यात घालवली. पाणी व आरोग्य या दोन विषयांना त्यांनी अग्रक्रम दिला. जागोजागी दवाखाने सुरू केले. यूनानी चिकित्कापद्धती व आयुर्वेद यांनाही या योजनेत स्थान देण्यात आले. मजुरांच्या वस्तीत स्त्रियांना स्नान करता यावे म्हणून न्हाणीघरांची सोय केली. रस्तेरुंदीचा कार्यक्रम हाती घेतला व नव्या रस्त्यांचे आयोजन केले. वल्लभभाईंच्या प्रेरणेनेच नदीपलीकडच्या वसाहती सुरू झाल्या. टाऊन प्लॅनिंगच्या नव्या योजना हाती घेण्यात आल्या. 1921 साली येथे काँग्रेसचे अधिवेशन अहमदाबादला भरले होते त्याच जागी मागाहून वाडीताल साराभाई हॉस्पिटल बांधण्यात आले. नगरपालिकेच्या रिपन हॉलला आता गांधी हॉल असे नाव देण्यात आले. नगरपालिकेचा कारभार आता गुजराती भाषेत होऊ लागला. तसेच उर्दू व मराठी शाळांनाही प्रोत्साहन देण्यात आले. 

पाणी प्रश्नाच्या बाबतीत खोलवर जाऊन, तपास करून वल्लभभाईंनी हे सत्य शोधून काढले की कॅंटोन्मेंटला पाणी पुरवठा करण्यासंबंधी कोणताही करार म्युनिसिपालिटीने केला नव्हता. केवळ तोंडी ठरल्याप्रमाणे फक्त निम्मे पैसे भरून कॅंटोन्मेंट दुप्पट पाण्याचा वापर करीत होते. या वेळी अपूर्व हिंमत दाखवून वल्लभभाईंनी सहा महिऱ्यांच्या आत स्वत:ची पाण्याची वेगळी व्यवस्था करण्याची नोटीस कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांना दिली. कॅंटोन्मेंटच्या लष्करी अधिकाऱ्यांचा रागाने जळफळाट झाला आणि दिल्ली-सिमल्याकडे त्यांनी धाव घेतली. वल्लभभाईंना आमंत्रण आले तेव्हा त्यांनी जाण्यास नकार दिला. कॅंटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद नाही असा युक्तिवाद केला. वल्लभभाईंनी दिलेले उत्तर मासलेवाईक आहे. ते म्हणाले, “तुमच्याशी लढायला शत्रू येतो त्या वेळी ‘आमच्याकडे पैशाची तरतूद नाही; सबब लढाई होणार नाही’ असे तुम्ही म्हणता काय?” कॅंटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली व शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाची तीव्रता थोडी कमी झाली. 

अकरा वर्षे इतका दीर्घ काळ वल्लभभाईंनी नगरपालिकेत जबाबदारीचे व परिणामकारक काम केले. शहराचा कापापालट केला. प्रजाणीवनात शक्ती आणि आत्मविश्वास यांचे सिंचन केले आणि जनतेला स्थानिक स्वराज्याचे व स्वशासनाचे धडे दिले. याशिवाय त्यांनी नेत्यांची दुसरी फळीही शिकवून तयार केली. 1928 साली त्यांनी अहमदाबाद सोडले, त्यावेळी त्यांची जागा घेणारे प्रबळ नेतृत्व जबाबदारी सांभाळायाला तपार होते. स्थानिक स्वराज्याच्या कारभाराचे एक अद्भुत उदाहरण वल्लभभाईंनी घालून दिले. 

1948 साली ते भारताचे उपपंतप्रधान असताना मुंबई महानगरपालिकेने त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते, ‘माझ्या जीवनात मी अनेक कामे केली, पण सर्वांत अधिक प्रिय असे कोणते काम मला वाटले असेल व जे करताना मला सर्वात अधिक आनंद मिळाला असेल असे काम म्हणजे अहमदाबाद नगरपालिकेतील माझे कार्य.’

वल्लभभाईंच्या उगवत्या नेतृत्वशक्तीचे दर्शन आधी अहमदाबादमध्ये घडले. त्यांनी अहमदाबादला आपले मानले व अहमदाबादनेही त्यांच्यावर असीम प्रेमाचा वर्षाव केला. 1928 नंतर त्यांनी बारडोली हे आपले कार्यक्षेत्र मानले त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर काम केले. वल्लभभाई का अहमदाबाद शहराने राष्ट्राच्या चरणी अर्पण केलेला बहुमोल नजराणा होता.

Tags: Development Gujrat corporation Ahmadabad sardar Patel sovereignty इंग्रज नगरपालिका अहमदाबाद सार्वभौम भारत राष्ट्रभावना एकता स्वातंत्र्यसंग्राम संस्थान देवव्रत पाठक सरदार पटेल विकास weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी