डिजिटल अर्काईव्ह

गांधीजींच्या आसपास एक विशाल ग्रहमंडळ होते, आणि या ग्रहमंडळात सरदार पटेल, दादासाहेब मावळंकर आणि इंदुलाल याज्ञिक ह्या त्रिमूर्तीला एक विशिष्ट स्थान होते. गांधीजी आणि ही त्रिमूर्ती म्हणजेच गुजरातचे प्रभावशाली चतुष्टय!

विसाव्या शतकातील गुजरातच्या जडणघडणीत महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, गणेश वासुदेव तथा दादासाहेब मावळंकर आणि इंदुलाल याज्ञिक या चार महानुभावांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचा प्रभाव गुजरातपुरता मर्यादित राहिला नाही तर संबंध भारतखंडावर पडला. कमी-अधिक प्रमाणात विदेशातसुद्धा त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला. गांधीजींचा प्रभाव तर पंचखंड पृथ्वीवर पोहोचला. सरदार पटेल, दादासाहेब आणि इंदुलाल याज्ञिक यांचे कार्यही विदेशांत काही अंशी आपला प्रभाव पोचवू शकले आणि म्हणून ह्या गुर्जर प्रभावक चतुष्टयांच्या योगदानाविषयी मिताक्षरी व्याख्या करण्याचा हा प्रयत्न आहे.

गुजरात गुजरात बनले हयाचे यश ज्या ज्योतिर्धरांना इतिहासकारांनी दिले आहे, त्यांच्याविषयी थोडेसे. ज्योतिर्धर सूर्यासारखे असतात पण त्यांनासुद्धा स्वत:चे आदर्श साकार करण्यासाठी ग्रहमंडळाची जरूर पडते. गुजरात एक आहे, महान आहे व वंदनीय आहे ही भावना पाटणचा प्रतापी राजा सिद्धराज जयसिंग याच्या कार्यामुळे लोकांच्या मनात पसरली, पण गुजरातला कोणी ससंकल्प जिवंत व्यक्ती म्हणून आपल्या कल्पनेत आणण्याचा प्रयत्न केला असेल तर तो धंधुका गावच्या एका मोढ वणिक पुत्राने. ते होते सर्वज्ञ म्हणून ओळखले जाणारे आचार्य हेमचंद्र सूरी. महाराजा सिद्धराज, मंत्री कुमारपाळ वगैरेंनी गुजरातच्या अस्मितेची जी मुहूर्तमेढ रोवली त्याच्या मागचे प्रभावी बळ हेमचंद्रांचेच होते.

त्यानंतर गुजराती भाषेची तिच्या आधुनिक स्वरूपात घडण होऊ लागली. त्याच वेळी संत नरसी मेहतासारखा महाकवी प्रकट झाला. सिद्धराजच्या साम्राज्याचा अंत झाला होता. पण गुजराती भाषेची अस्मिता तेजोमय बनवण्याचे कार्य या संतकवीने केले. मात्र हे कार्यसुद्धा या ज्योतिर्धराच्या आसपास असणाऱ्या भक्तमंडळाच्या कार्याशिवाय होऊ शकले नसते.

मग आले कीर्तनरंगात लोकांना रंगवणारे माणभट्ट. महाकवी प्रेमानंद हा त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ कीर्तनकार. असे म्हणतात की इंग्रजी भाषा जशी शेक्सपीयर आणि बायबलच्या प्रतापामुळे दैदीप्यमान झाली आहे तशीच गुजराती भाषेला महाकवी प्रेमानंदांच्या आख्यानांनी आणि महाकवी नानालालने लिहिलेल्या विविध काव्यप्रकारांमुळे शक्ती आली. गुजरातीची व्याख्या कुठे मिळायची असेल तर ती महाकवी प्रेमानंदाच्या आख्यानश्रेणींचा अभ्यास करून मिळेल.

प्रेमानंदांनंतर गुजराती अस्मितेला ओहोटी लागली. दीडशे वर्र्षांनंतर अर्वाचीन युगाचा आद्यप्रवर्तक नर्मद आला. गुजरात आणि गुजराती भाषा पुन्हा वैभव प्राप्त करतील अशी घोषणा करून त्यांनी ‘जय जय गर्वी गुजरात’ हे पहिले गुजरात-गीत लिहिले. वंदे मातरमची रचनासुद्धा त्यानंतर केली गेली. नर्मदने आधुनिक युगाच्या अनेक लोकांना प्रेरणा दिली.

नर्मदेने लावलेला हा वृक्ष गांधीजींच्या व्यापक प्रवृत्तींमुळे फोफावला. गांधीजींच्या आसपास एक विशाल ग्रहमंडळ होते आणि ज्या ग्रहमंडळात सरदार, दादासाहेब आणि इंदुलाल याज्ञिक या त्रिमूर्तीला एक विशिष्ट स्थान होते. आणि म्हणूनच गांधीजी आणि त्या त्रिमूर्तीला त्या लेखात प्रभावी गुर्जर चतुष्टय म्हटले आहे. 

गांधीप्रभाव ही एक सर्वस्वीकृत गोष्ट आहे. गांधीजींनी सर्वप्रथम भारतीय मनात धैर्य उत्पन्न करण्याचे कार्य केले. गांधीजींची दृष्टी घेऊन जर आपण खेडेगावच्या लोकांत गेलो तर ते आपणाला म्हणतील,  ‘आम्ही भुकेले आहोत, आम्हाला धान्य द्या. आम्ही उघडे आहोत, आम्हांला झाका. आमच्या मुलांसाठी शाळा नाहीत, शाळा उघडा. आम्ही आजारी आहोत. आम्हांला डॉक्टर मिळत नाही. त्याची व्यवस्था करा.’

गांधीजींनी केलेले मुख्य कार्य, त्यांनी केलेली दरिद्रनारायणाची आराधना हे होते. गांधी म्हणाले होते, 'गांधीवाद नावाची काही चीज नाही. माझ्यामागे कुठलाही पंच ठेवून जायची माझी इच्छा नाही.' पण क्रांती ही नेहमी विशाल समुदायाच्या आंदोलनातून निर्माण होते आणि गांधीजींच्या संघर्षाच्या परिणामी साम्राज्यवादाची मृत्युघंटा वाजली. दुसरे विश्वयुद्ध सुरू झाले तेव्हा गांधीजींनी नाझी आक्रमणाला विरोध करून सोविएत संघाविषयी सहानुभूती व्यक्त केली. हिरोशिमा आणि नागासाकीवर साम्राज्यवादी सत्तांनी जेव्हा निष्कारण अणुबॉंब टाकले तेव्हा त्यांचा सात्त्विक संताप प्रकटला आणि त्यांनी निशस्त्रीकरणाचे प्रतिपादन केले. महात्मा हे त्यांचे बिरुव त्यांच्या जीवनाच्या अंतिम अध्यायात त्यांनी पूर्णपणे यथार्थ केले.

गांधीजींकडून प्रेरणा मिळवून सरदार पटेल, दादासाहेब आणि इंदुलाल पाज्ञिक या ग्रहत्रिकुटाने आपले कार्य सुरू केले. सरदार पटेलांच्याविषयी लिहिताना जवाहरलालजींच्या शब्दांनी सुरुवात करू या, ‘इतिहास त्यांच्या कार्याविषयी पाने भरून भरून लिहील आणि त्याना नूतन भारताचा निर्माता आणि संघटनकार म्हणून ओळखेल.' सरदारांचे कार्य, ते गांधीजींना भेटले नसते तर अशक्यवत् होते. भारताच्या या भूमीत सत्याग्रहाचे जे शस्त्र घडवले गेले ते खरोखर घडवले गेले बारडोली सत्याग्रहात. या सत्याग्रहाने वल्लभभाईंना सरदार बनवलं. सरदारांनी गांधीजींच्या जीवनकालात आणि त्यानंतरसुद्धा गुजरात विद्यापीठाच्या अनेकविध शैक्षणिक प्रवृत्तींना मार्गदर्शन केले. काँग्रेसला त्यांनी संघटनेची शिस्त दिली, ती त्यांच्यानंतरच्या खुज्या नेतृत्वामुळे नामशेष झाली.

त्यांनी देशाचे ऐक्य घडवले. देशातील राज्यांच्या विलिनीकरणामुळे देश आणि गुजरात कधी नव्हे तेवढे एक झाले. सरदार सेवाव्रतधारी होते, राष्ट्रविधाते होते, शैक्षणिक क्षेत्राचे मार्गदर्शक होते आणि भाषास्वामीसुद्धा होते. त्यांच्या भाषणामुळे गुजराती भाषेच्या गद्य स्वरूपाच्या विकासाला हातभार लागला. आचार्य हेमचंद्रांनी ज्या गुजरातचे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न गांधीजींकडून प्रेरणा घेऊन सरदारांनी साकार केले. आता फक्त दीव आणि दमण गुजरातमध्ये विलीन झाले तर ते स्वप्न संपूर्ण होईल. सरदारांचे वर्तन कठोर वाटत असले तरी ती कठोरता नारळाची होती. त्यांचा स्वभावसुद्धा तसाच होता. वरून कठीण पण आतून मातेसारखं कोमल हृदय असणारा हा महामानव होता.

गांधीजींशी परिचय होण्यापूर्वी दादासाहेबांचा परिचय सरदारांशी झाला. सरदार आणि दादासाहेब सहकारी होते. दादासाहेब, गांधीजी, सरदार आणि इंदुलाल याज्ञिक यांचे आजीवन सहकारी होते. दादासाहेब कुशल कायदेपंडित होते, राजकारणी होते व अहमदाबाद शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. संसदीय लोकशाहीच्या क्षेत्रात आणि शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप महत्त्वाचे कार्य केले. ते एक संवेदनाशील लेखकसुद्धा होते आणि त्यांच्या संसदीय कामामुळे त्यांनी देशभर आपला प्रभाव पाडला. ‘कामये दुःखतप्तानाम् प्राणिमाम् आर्तिनाशनम्’ हा त्यांनी स्वीकारलेला ध्यानमंत्र त्यांनी जीवनभर आचरून दाखवला. संबंध देशात कस्तुरबा स्मारकनिधी, गांधीस्मारकनिधी वगैरे संस्थांनी ज्या विकासप्रवृत्ती चालवल्या त्यांना दादासाहेब मावळकरांनी मार्गदर्शन दिले. 

इंदुलाल याज्ञिक हे आपल्या चतुष्टयातील इतर तीन व्यक्तींहून वेगळे होते, पण त्यांच्याशी याज्ञिकांचे काही बाबतीत साम्यसुद्धा होतं. ते मनस्वी होते आणि त्यामुळे गांधीजी आणि सरदारांपासून थोडेसे दूर गेले पण त्यांच्या कार्यपद्धतीत जरी पुष्कळ फरक असला तरी त्यांच्या कार्याच्या मूळ प्रेरणा एकच होत्या. 1956 नंतरच्या कालखंडात तर ते गांधीजी आणि सरदारांचे कार्य पुढे चालवणारे त्यांचे शिष्य बनले. गुजरातमधल्या विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांचे ते जनक होते. एकात्म आणि अखंड गुजरातच्या रचनेसाठी त्यांनी केलेले कार्य सरदार आणि दादासाहेबांच्या स्वप्नांना साकार करणारे होते. देशाला त्यांनी किसानसभा दिली आणि आंतरराष्ट्रीय शांतिआंदोलनासारख्या कार्यात स्वत:ला झोकून दिले.

गोखल्यांच्या भारत सेवक समाजाचे आजीवन सेवक बनण्याचा मनोदय गांधीजी, दादासाहेब आणि इंदुलाल याज्ञिकांनी केला होता. यासाठी गांधीजींनी केलेला अर्ज नामंजूर झाला होता. दादासाहेबांनी आईपासून दूर रहावे लागेल म्हणून अर्जच केला नाही. इंदुलाल याज्ञिक आजीवन सेवक बनले होते पण गांधीजीप्रणित चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिल्यानंतर त्यांनी भारत सेवक समाजातून निवृत्ती घेतली होती. मात्र गोखले आज असते तर निश्चितपणे म्हणाले असते की, हे तिघे आणि सरदार पटेल जन्मभर भारतसेवक समाजाच्या सदस्याचे जीवन जगले आणि सेवायज्ञ चालवत राहिले.

मानवाच्या मुक्तीच्या संग्रामात ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्याग आणि तप केले त्या ह्या प्रभावी गुर्जर चतुष्टयाचे नाव आणि कार्य चिरंजीव राहील.
 

Tags: Indulal Yadnyik Dadasaheb Mavalankar Gujarat Gnadhi saradar Patel नर्मदा साम्राज्यवाद गुजरात धनवंत ओझा गांधी दादासाहेब मावळंकर आणि इंदुलाल याज्ञिक सरदार पटेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी