डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

“धमक हवी धमक माणसात! एक पाय तुरुंगाच्या दारात आणि दुसरा संसारात. एखाद्या क्रांतिकारकासारखा जगलो रोज. तुरुंगाच्या यात्रा तीन घडल्या तरी हिंमत नाही खचली, उलट वाढली.” या माणसाच्या फिलॉसॉफीचं, किंवा या व्यक्तिरेखेचंच मूळ मला तेंडुलकरांच्या यंदाच्या 'अक्षर' दिवाळी अंकातल्या 'माणूस' या लेखातल्या, त्यांना भेटलेल्या 'भोपे' या माणसात दिसलं. कदाचित त्याच्यावरूनच त्यांना ही तात्या कुलकर्णीची व्यक्तिरेखा सुचली असेल. स्वतः केलेल्या फसवाफसवीच्या, भ्रष्टाचाराच्या समर्थनासाठी ते जे तत्त्वज्ञान सांगतात (भोपे आणि तात्या, दोघेही) ते चोख बिनतोड युक्तिवादाचं आणि म्हणूनच धडकी भरवणारं आहे.

तल्लख डोक्याचा आणि धारदार जिभेचा 'एक हट्टी मुलगी'चा सासरा तात्या आपल्या सर्व गैरव्यवहारांचं समर्थन करत असला, सफाई देत असला तरी तो खलनायक नाही. त्याची ही जगण्याची पद्धत आहे. ती अंगवळणी पडलेला माणूस मी उभा केला. इतक्या बदमाश माणसाची व्यक्तिरेखा उभी करताना ती 'कॅरिकेचर' (व्यंगचित्रात्मक) होणार नाही- जशी बऱ्याच अंशी 'चिमणराव'ची होती याची मी काळजी घेतली. तसंच ती 'अॅक्टिंग' न वांटता खरी वाटण्यासाठी त्याचं तत्त्वज्ञान स्वतःत भिनवून म्हणजे पटवून घेऊन मग त्याच्या नजरेतून सारं न्याहाळणं- जोखणं फसवणं, हे करायचं होतं. त्यासाठी प्रसंगांमधला आणि तात्यांच्या एकेक डावपेचामधल्या 'ह्यूमर'ची मला खास मदत झाली.

बाहेरून सावजं गळाला लावून तात्या त्यांना घरी आणतात. देवादिकांचे, बाबा-बुवांचे फोटो बाहेरच्या खोलीत आहेत. एक धर्मादाय पेटीही आहे. त्यात ते 'गुरुमाऊली'साठी मदत टाकायला सांगतात. पुण्यकर्म म्हणून. मुलाच्या लग्नाच्या मांडवातही वधुपक्षाकडच्या एका माणसाला जमिनीच्या व्यवहारात गंडवतात. एवढंच नव्हे, तर एकदा स्वतःच्या मुलांना अनाथाश्रमातली मुलं म्हणून उभी करून घरी आलेल्या पाहुण्यांकडून मदत गोळा करतात!

त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीला- कमळीला (सुप्रिया मतकरी)- ते फ्रॉडसाठी तीन वेळा घडलेल्या स्वतःच्या जेलयात्रेबद्दल अभिमानाने सांगतात -

'धमक हवी धमक माणसात! एक पाय तुरुंगाच्या दारात आणि दुसरा संसारात. एखाद्या क्रांतिकारकासारखा जगलो रोज. तुरुंगाच्या यात्रा तीन घडल्या तरी हिंमत नाही खचली, उलट वाढली.’ या माणसाच्या फिलॉसॉफीचं, किंवा या व्यक्तिरेखेचंच मूळ मला तेंडुलकरांच्या यंदाच्या 'अक्षर' दिवाळी अंकातल्या 'माणूस' या लेखातल्या, त्यांना भेटलेल्या 'भोपे' या माणसात दिसलं. कदाचित त्याच्यावरूनच त्यांना ही तात्या कुलकर्णीची व्यक्तिरेखा सुचली असेल. स्वतः केलेल्या फसवाफसवीच्या, भ्रष्टाचाराच्या समर्थनासाठी ते जे तत्त्वज्ञान सांगतात (भोपे आणि तात्या, दोघेही) ते चोख बिनतोड युक्तिवादाचं आणि म्हणूनच धडकी भरवणारं आहे.

यासाठीच पंचवीस वर्षांपूर्वी येऊन गेलेलं हे नाटक आम्ही केलं तेव्हा 'आजचं' वाटलं आणि आज केलं तरी ते आजचंच वाटेल इतका या 'तात्या- तत्त्वज्ञानाच्या अनुयायांचा सुळसुळाट झाला आहे.

पण ‘पहुचा हुआ आदमी' वाटणाऱ्या आणि घरच्यांवर जरब असलेल्या तात्यांना कुठेतरी घरात या नवीन आलेल्या या सुनेबद्दल सुप्त आदरभाव आहे. तिच्या सत्प्रवृत्तीचा एक धाक आहे. स्वतःच्या मुलांच्या अंगावर ते ओरडतील, पण सुनेवर नाही. मुलगा एकदा त्यांना धीर करून विचारतो, "तात्या, माझ्या लग्नाच्या मांडवात उद्योग केलात तुम्ही?" तेव्हा ते म्हणतात- “माझ्या उद्योगांवरच लग्न करण्याएवढे वाढलेत, आपण पैसे आणणारा कोणताही उद्योग न करता.”

एक छान सीन होता. 'जगणं म्हणजे एक भला-थोरला गळेकापू व्यवहार आहे. यज्ञ आहे, जगणं म्हणजे एक! यज्ञाला बोकडांचे हविर्भाग द्यावेच लागतात.' असं म्हणणाऱ्या तात्यांकडे एक आर्थिक गैरव्यवहारात अडकलेल्या बड्या धेंडाच्या रूपातला नोटांची चरबी झुलवणारा बकरा येतो. त्याच्यावर इंप्रेशन पडावं म्हणून तात्या सर्वोदयी अवतारात वावरण्याची प्रॅक्टीस करून चरख्यावर सूत कातत बसतात. त्या प्रवेशात मी पंचा, कोपरी आणि खादीची टोपी या वेषात चालून बघत असे. वेगवेगळे नमस्कार करून बघत असे आणि घोटाळ्यात अडकलेल्या कोट्याधीशाची चाहूल लागताच लगबगीने चरखा चालवायला बसत असे. (चरख्यावर सूत कातायची वेगळी तालीम करावी लागली, पण ते मात्र शेवटपर्यंत नीट जमलं नाही.) अर्थमंत्र्यांच्या कार्यालयात मोठमोठ्या ओळखी आहेत, तुम्हांला मी सोडवीन, अशा थापा मारून पैसे काढू पाहणाऱ्या तात्यांचा डाव सुनेमुळे आणि आयत्या वेळी आलेल्या तिच्या खऱ्याखुऱ्या सर्वोदयी मामांमुळे फसतो.

या प्रवेशातली ढोंगबाजी, थापेबाजी, सस्पेन्स, तात्यांचा जळफळाट या साऱ्याच गोष्टींना प्रेक्षकांचा खूप रिस्पॉन्स मिळे.

हळूहळू घरातली सगळीच माणसं तात्यांच्या विरोधात आणि मंगलाच्या बाजूने उभी राहतात. ती सचोटीने, सहकाराने 'गृहउद्योग भांडार' सुरू करते. तात्याच घराच्या किल्ल्या तिच्या हातात देतात. सत्प्रवृत्तींचा आता विजय होणार, या अपेक्षेवर इथे दुसरा अंक संपायचा. तिसऱ्या अंकात माझं काम बरचसं रिअॅक्टिंगचं होतं. सुनेच्या धडपडीत, नव्या उद्योगात एकीकडे आज्ञाधारकपणे निमूटपणे काम करायचं, पण हे सध्याच्या व्यवहारी जगात कसं कुचकामी आहे आणि प्रामाणिकपणाने- सचोटीने चालवलेला उद्योग कसा फसणार आहे, असा भाव चेहऱ्यावर ठेवून सूचक धारदार बोलायचं, असं जवळजवळ अंकभर काम होतं.

शेवटी तिचा पराभव होतोच. घरातली मंडळी निष्फळ कष्टांना कंटाळतात. तिच्या विरोधात जातात; आणि तात्या पुन्हा एकदा सगळे व्यवहार हाती घेतात. मोठ्या कंपन्यांची लेबलं लावून घरगुती माल विकायला काढतात.

तिसऱ्या अंकातलं माझं काम सुनेच्या न पटणाऱ्या आणि अंती अयशस्वी होणार अशी खात्री असलेल्या उद्योगात निमूटपणे मदत करण्याचं होतं. तात्यांच्या मधल्या कॉमेंट्सना लोक हसायचे; पण सुनेचे प्रामाणिकपणे चाललेले प्रयत्न आणि नंतर होणारी परवड; या व्यवहारी, दगलबाज आणि कृतघ्न जगात तिला मिळणारं अपयश हे जास्त महत्त्वाचं होतं. तो मूड झाकोळून चाललं नसतं. हे लक्षात ठेवूनच कावेबाज तात्यांचे नोंदी करत राहाणं, शेरे मारणं, निरीक्षणं करणं मी दाखवत असे मुद्दाम कॉमिक काही न करता.

या माझ्या भूमिकेची दखल घेतली गेली हे खरं. सगळ्याच समीक्षकांनी खूप उचलून धरली ही आगळी व्यक्तिरेखा. पण नाटक फार चाललं नाही. 30-40 प्रयोग झाले असतील. तेंडुलकरांच्या दोन्ही नाटकातील मला आवडलेल्या भूमिकांचं असंच झालं. जास्त प्रयोग नाही झाले. आधी 'विठ्ठला' आणि आता 'एक हट्टी मुलगी.’ दोन्ही अतिशय भिन्न, परंतु आव्हानात्मक भूमिका होत्या. करता करता अनेक शक्यता जाणवून देणाऱ्या. तुमच्या बुद्धीची, मेहनतीची मागणी करणाऱ्या. प्रयोग होत राहिले की व्यक्तिरेखा विकसित व्हायला, तिथे कंगोरे कळायला स्वभावातली कोडी सोडवायला वाव मिळतो. (पण शेकड्यांनी प्रयोग झाले की यांत्रिकता, साचलेपणाही येऊ शकतो).

लोकांना फसवून जगणाऱ्या अत्यंत बनेल, गेंड्याची कातडी असलेल्या माणसांबद्दल आपण वाचतो. संताप व्यक्त करतो. मला नाटकापुरतं तथा व्यक्तिरेखेचं कातडं पांघरायला मिळालं. काही असो, पण वारंवार आपल्या मुलांसमोर मारलेल्या बढाईतून, बोलण्यातून व्यक्त झालेल्या त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानातून, सर्व वैशिष्ट्यांनिशी उभा राहिलेला हा 'अर्क' माणूस, मलाही अपेक्षित नव्हता.

(क्रमशः)

Tags: नाटक अक्षर तेंडुलकर चिमणराव सासरा Drama Akshar Tendulkar Chiman Rao Father-in-law weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिलीप प्रभावळकर,  मुंबई

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके