डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दिलीप प्रभावळकर हे प्रतिभाशाली कलावंत आहेत. त्यांचे 'हसवाफसवी' पाहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी काढलेले उद्गार असे होते - 'हसवाफसवीमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी सहा निरनिराळ्या भूमिकांचा अभिनयकलेद्वारा वैशिष्ट्यपूर्ण समर्थ आविष्कार केला आहे. त्याची व्हिडिओ कॅसेट जर कोणी फ्रेम बाय फ्रेम अभ्यासली तर त्याला दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पुरा केल्याचे श्रेय लाभेल. दिलीप प्रभावळकर यांच्या अक्षर प्रकाशनातर्फे येणाऱ्या नाट्यविषयक आत्मकथनातील भाग आम्ही कमशः प्रकाशित करणार आहोत.

कॉलेज आणि कॉलनीत नाटकं करताना पहिली खरीखुरी संधी मिळाली ती 'रंगायन' या प्रायोगिक नाटकं करणाऱ्या मातब्बर संस्थेत. विजया मेहतांचा (त्या वेळच्या विजया खोटे) 'रंगायन' वर पगड़ा होता. 'रंगायन' ने केलेल्या नाटकांबद्दल नाटयवर्तुळात जबर कुतूहल असे. त्याचा गवगवा, बोलबाला होई. त्यातल्या प्रायोगिकतेबद्दल, प्रवाहांबद्दल उलटसुलट चर्चा होई. तेंडुलकरांच्या 'लोभ नसावा ही विनंती' या नाटकात वृंदावन दंडवते मला घेऊन गेला. त्यांना एका उंच कलाकाराची गरज होती. 'माझी उंची वाढत्येय की ही कॉट लहान होत चाललीये' अशी काही वाक्यं होती. विजयाबाई त्या वेळी इंग्लंडला होत्या; आणि त्या वेळचे 'रंगायन'चे कर्णधार असलेल्या अरविंद देशपांडे यांनीच दिग्दर्शन केलेल्या या नाटकात मधुकर नाईकची ओळख झाली.

एकदा दिल्लीला आमचा प्रयोग होता. प्रयोग संपल्यानंतर स्टेजवरच नाटकातल्या आमच्या कोट्सवर आम्ही लोळत पडलो होतो. ('लोभ नसावा ही विनंती' मध्ये दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या छावणीतील एका हॉस्पिटलचा सेट होता.) तेव्हा मधुकर नाईकने विचारलं, रत्नाकर मतकरीच्या बालनाट्यात काम करायला आवडेल का? त्या वेळी काहीही नवीन करायला आवडलं असतं, अशा मनःस्थितीत मी होतो. मी लगेच 'हो' म्हटलं.

काही दिवसांनी मतकरींकडून बोलावणं आलं. पुढील सहा वर्षांमध्ये तिथे मी एकूण बारा नाटकं केली; सहा बालनाट्य आणि सहा प्रौढांची नाटकं. शिवाय काही एकांकिका. 'रंगायन'मध्येच राहिला असतो: किंवा वर्षभरातच 'रंगायन' फुटून आविष्कार' संस्था झाली, त्यांच्याच संस्थेपुरती नाटकं करत राहिलो असतो, तर मतकरींच्या 'बालनाट्य' आणि 'सूत्रधार' संस्थांमध्ये मिळाला तसा वाव, तशी संधी, तसं समाधान मिळालं असतं असं आता वाटत नाही. स्वतःला शोधण्याच्या, स्वतःला काही वैशिष्टय सापडण्याच्या, सतत नव्हे काही करून पाहण्याच्या प्रक्रियेची सुरुवात येथे झाली. 

दरवर्षी मतकरींच्या नव्या नाटकात, नवं काय करायला मिळेल, नवी भूमिका कशी असेल, याची उत्सुकतेने वाट पाहणं व्हायचं, 'राक्षसराज झिंदाबाद' या नाटकात चष्मा लावलेला धांदरट 'चष्मासूर राक्षस,' इंद्राचं आसन नारदाची शेंडी' मधला देवांच्या राजाचा आब राखणारा शैलीदार इंद्र, 'धडपडे, बडबडे, मारकुटे आणि मंडळी' मधला कार्टूनटाईप मारकुटेमास्तर केल्यानंतर प्रौढांच्या 'शापित' नाटकात एका सत्प्रवृत्त संस्कृतच्या प्राध्यापकाची भूमिका मी केली. आणि त्यानंतर येणाऱ्या 'अलबत्या गलबत्या' या बालनाट्यात मतकरींनी एक धाडसी निर्णय घेतला. मला 'चेटकी' करण्याचा. निरनिराळ्या भूमिका (रंगभूषेचं साहाय्य घेऊन) करून बघायला मला आवडायचं. त्या पलीकडे चेटकीची भूमिका मला शोभेल किंवा त्या भूमिकेला मी न्याय देऊ शकेन, असं वाटण्याजोगं माझ्या व्यक्तिमत्त्वात काहीच नव्हतं.

चेटकीचं रूप विचित्र होतं. ढगळ परकरासारखा घागरा, वर काळा ब्लाऊज, खांद्याभोवती गडद रंगाची शाल, चिकटवलेलं लांब नाक, मोकळे सोडलेले पांढरे जटा झालेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, गळ्यावरती काळी वर्तुळं, मनगटाला कथलांच कडं, पायात मोजे (फार घसरायला व्हायचं म्हणून हे पुढे काढून टाकले) आणि हातात वाकडी काठी, असे एकूण रूप होतं. 

चेटकीची एण्ट्री नाटयपूर्ण होती. नाटकाचा नायक अलबत्या-गलबत्या चांदण्या रात्री एका गावाच्या ढोलीपाशी पहुडतो. प्रेक्षकांच्या उजव्या बाजूच्या स्टेजवरल्या विंगमधून मी डोकं  हळूच बाहेर काढत असे. स्टेजवर त्यावेळी अंधुक प्रकाश असायचा, आणि माझ्या चेहऱ्यावर स्पॉट. अशा अनपेक्षित रीतीने चेटकीचा प्रवेश झाल्याबरोबर प्रेक्षकांतली सुन्न विलक्षण दचकायची, ओरडायची. दोन-चार तरी राहण्याचे स्वर कानी पडायचे. 'आई, घरी जाऊ या, 'माउला भीती वाटते'- असंही ऐकू यायचं. सावधपणे, पार्श्वसंगीताच्या तालावर नाचाची पावलं टाकत मी इकडे-तिकडे लुक् लुक् बघत स्टेजवर वावरायचो, आणि मग खाली झोपलेल्या नायकाच्या पायाला अडखळायचो. अडखळल्याबरोबर मी एक सणसणीत किंकाळी मारत असे. मुलांना हलवायला, दचकवायला नाटकात त्यांचं लक्ष खेचून धरायला, भीती आणि उत्कंठा वाढवायला तिचा उपयोग व्हायचा. आणि दुसरं म्हणजे त्या किंकाळीने मला माझ्या चेटकीच्या आवाजाची पट्टी पकडता यायची. खूप वरच्या पट्टीत मी बोलत असे. स्वर बायकी आणि काहीसा कर्कश. त्याच आवाजात हसणं, रागवाणं, राजकन्येशी (कपटीपणाने) लाडात बोलणं, शाप देणं वगैरे व्हायचं. तो आवाज आत-रंगपटात काढून बघता येत नसे. त्या आवाजात अखंडपणे अडीच तास बोलता येईल की नाही, कळत नसे. या अडखळण्यानंतर घेतलेली किंकाळी म्हणजे ती आवाजाची पट्टी पकडायला घेतलेला 'स्टार्ट' होता. क्रिकेटमध्यल्या फास्ट बोलरच्या 'स्टार्ट' सारखा. तो आवाज आणि बोलण्याची ती स्टाईल वेगवेगळ्या प्रकारे मी त्या नाटकात वापरली. मग चेटकीचं तिच्या गुलामांवर रागावून बोलणं असो; गुप्त खजिन्याकडे नेणारा झाडाच्या ढोलीचा दरवाजा उघडणारा किंवा पोटभरेंची खाणावळ शोधताना तालात म्हटलेला मंत्र असो; पोटभरेंना शाप देणं असो; वा वेषांतर करून महालात घुसल्यावर राजकन्येशी कपटीपणाने गोड बोलणं असो; अगर स्वतःशी धुसफुसणं असो. चेटकीची व्यक्तिरेखा उभारताना बदललेल्या आवाजाची ही व्हेरिएशन्स परीकथेतल्या त्या खलनायिकेला अतिशय पूरक ठरली.

चेटकीच्या नाटकभर हालचाली खूप होत्या. म्हातारी म्हणून वाकलेली असली तरी चटपटीतपणे ती रंगमंचावर फिरे. मान वळवणं, हातांच्या, बोटांच्या हालचाली, डोळे, ओठ (आणि जीभही) यांचा उपयोग करून घेत सारं शरीरच चेटकीसाठी वापरायचा मी प्रयत्न केला. लांब दांडयाच्या केरसुणीवर स्वार होऊन चेटकी उडत असे. म्हणजे स्टेजवर स्टार्ट घेऊन 'टेकऑफ' घेतल्यासारखा मी विंगेमध्ये जाई, जादूच्या कुत्र्यांचा पाठलाग करण्यासाठी. मग पुढल्या सीनला विमानाच्या 'लँडिंग' सारखा विंगमधून स्टेजवर येऊन, घसरत जाऊन धपकन पडे. 'दमले गउ बाई दमले... काय मेले कुत्रे की राक्षस! जादूनंदेखील त्यांच्यामागे उड़ता उड़ता। नाकी नऊ आले', असा संवाद होता. मुलं तिच्या या फजितीला मनापासून हसायची. दुष्ट चेटकीचा हा मूर्खपणा, तिची  वारंवार उडणारी तारांबळ, कपट कारस्थानं अयशस्वी होऊन शेवटी होणार असलेला अटळ पराभव लक्षात घेऊन विनोदाचा अंतःप्रवाह सतत या कॅरेक्टरसोबत होता. प्रेक्षकांना तिची भीती वाटणं आणि राग येणं, याबरोबरच तिची गंमतही वाटावी असा उद्देश होता. चेटकी नुसतीच उग्र न वाटता तिच्या कॅरेक्टरला आणखी एक परिमाण मिळे. मलाही करताना मजा येई. एकेक प्रसंग स्वतःला गंमत वाटून घेत केला जाई. 

ही भूमिका करताना खूप दमणूक झाली- तरी त्या भूमिकेचे आव्हान, भूमिकेतला आनंद, मुलांकडून मिळणारा उत्साही रिस्पॉन्स हे सारं मला चेटकी करता करता मिळालं. साऱ्या नाटकभर दुष्ट कारवाया करणारी चेटकी मुलांच्या रागाचं लक्ष्य व्हायची, त्यामुळे शेवटी नाटकांच्या नायकाच्या सांगण्यावरून जेव्हा तीन महाकाय कुत्रे माझ्या अंगावर चाल करून यायचे, तेव्हा प्रेक्षागृहातून जो कानठळ्या बसवणारा आनंदाचा अखंड ओरडा व्हायचा, तो अजूनही कानात घुमतो! 

'अलबत्या-गलबत्या 'प्रमाणेच त्या आधीच्या आणि नंतरच्या बालनाट्यांमध्ये आवाजांचे प्रोजेक्शनचे अनेक प्रयोग केले. तेसुद्धा ' आता हा प्रयोग करतो' असं म्हणून काही केसं नाही. वेगळी भूमिका उभी करताना, नवं वेगळं काय करता येईल; भूमिका परिणामकारक करण्यासाठी कुठल्या प्रकारचा आवाज कसा वापरता येईल याचा विचार करून तसा प्रयत्न केला. चेटकीसाठी वरच्या पट्टीतला म्हाताऱ्या खलनायिकेला शोभेल असा आवाज होता. त्याच्या पुढच्याच वर्षी 'सरदार फाकडोजी वाकडे' नाटकातल्या सुभेदार विक्राळ या  खलनायकासाठी प्रथमच खर्जातला आवाज वापरला. 'अलबत्या- खलबत्या' च्या आधीच्या 'इंद्राच आसनं, नारदाची शेंडी' मध्ये इंद्रासाठी देवाच्या रागाला शोभावी अशी (शैलीदार) बोलण्याची पद्धत होती; तर 'धडपडे, बडबडे, मारकुटे आणि मंडळी' मधले  मारकुटेमास्तर भावडे आणि व्यंगचित्राने बोलावे तसे बोलत. हे मास्तर जुन्या परंपरेतले आणि कडक असले तरी 'लव्हेबल' होते. मास्तरांच्या बोलण्याच्या पद्धतीवर मी पूर्वी अनेक वेळा पाहिलेल्या पु, लं.च्या 'बटाट्याची चाळ' मधल्या कोचरेकर मास्तरांच्या बोलण्याचा प्रभाव होता. नकळत पडलेला. (बऱ्याच वर्षानंतर केलेल्या चिमणरावचं या मास्तरांशी काही लकबींच्या बाबतीत साम्य होतं.) माझं शेवटचं बालनाट्य 'अदृश्य माणूस' मध्ये विक्षिप्त शास्त्रज्ञाच्या बोलण्यातून त्याचा धांदरटपणा, तऱ्हेवाईकपणा दिसावा असा प्रयत्न मी केला. 'वाचिक' अभियानाचा ती व्यक्तिरेखा उभी करायला मला खूप उपयोग झाला, क्वचित कधी बोलण्याच्या पद्धतीवरून, आवाजाची विशिष्ट शैली, पट्टी यांवरून ते कॅरेक्टर सापाडायलाही मदत झाली.

मतकरींच्या या नाटकांमध्ये आणि व्यक्तिरेखामध्ये खूप विविधता आणि वैचित्र्य होतं. अभिनयासाठी, त्यांच्याच दिग्दर्शनासाठी जशा मोकळ्या जागा होत्या, तसंच नवं काही करून बघायला मोकळीक होती, वाव होता. या साऱ्याच बालनाटयांमध्ये ठळक पद्धतीचा अभिनय हवा होता. त्या व्यक्तिरेखा ठसठशीतपणे उभ्या राहून मुलांना (आणि त्याच्या मोठ्या भावंडांना आणि पालकांनाही) रिझवतील, अशीच सोय होती. प्रेक्षकांचा प्रतिसादही तसाच थेट आणि ठसठशीत असायचा. अभिनयाच्या, भूमिकेच्या प्रोजेक्शनच्या कमालमर्यादा ताणून पाहायला मिळत. 'Adult Plays' करण्याआधीचा तो 'exercise' होता. खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेला बालनाट्याच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद बरंच काही देणारा आणि शिकवणारा असे. या समोरच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं आहे, कंटाळा येऊ द्यायचा नाही, भूमिका त्यांचं  लक्ष वेधून घेईल. अशी साकाराची आहे, हे सगळं  मनात असायचं. 

रंगमंचावरून नाटक करताना नटाच्या नजरेची पातळी समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या पातळीच्या वर असते. प्रेक्षकांच्या नजरेला नजर मिळविण्यासाठी तो ही पातळी खाली आणत नाही. (काही नट-नट्या नव्या प्रेक्षकांत ओळखीचे कोणी आले की त्यांच्या प्रतिक्रियेसाठी पुन्हा पुन्हा बघत राहतात, ते वेगळं! ) मी कधी प्रेक्षकांत मुद्दाम पाहण्याचा प्रयत्न करत नाही, पण हे कबूल केलंच  पाहिजे की या बालनाट्यात रंगलेल्या, समरस झालेल्या, चेटकीला घाबरणऱ्या, तिच्यावर चिडणाऱ्या, फजितिला हसणाऱ्या मुलांच्या चहऱ्याकडे बघण्याचा मोह मला अनेकदा आवरायचा नाही. नाटकात आपल्या लाडक्या मुलीवर-राजकन्येवर- प्रेम केल्याबद्दल 'अलबत्या-खलबत्या' ला फाशी देण्याची शिक्षा राजा जाहीर करतो. तो फाशीचा कार्यक्रम रंगमंचावर चालू असताना कारस्थानी चेटकी रंगमंचावर अगदी पुढे, प्रेक्षकांच्या डावीकडे बसत असे. वाकून आणि कपटीपणाने हसत. रंगमंचावरील त्या थरारक आणि उत्कंठावर्धक घटनेकडे माझी पाठ असे; आणि प्रेक्षकांकडे तोंड. त्यावेळी समोरच्या प्रेक्षागातील मुलांचे चेहरे मी बघत असे. नाटकातील प्रसंगाशी एकरूप झालेले ते प्रेक्षक अत्यंत प्रेक्षणीय असत. त्यांच्या चेहऱ्यावरचे ताण, भीती, उत्कंठा आणि भाव... प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा उत्तम अनुभव देत.

पुष्कळदा वॉल्ट डिस्नेच्या कार्टून फिल्म्समधल्या कॅरेक्टर्सच्या भावमुद्रा, हालचाली ह्या व्यक्तिरेखा सादर करताना उपयोगी पडल्या असंही आता आठवतं. नाट्यसमीक्षकांनीही या चेटकीची मोठया प्रमाणावर दखल घेतली. कुणी मुलांबरोबर नाटकाचा आनंद घेताना, अनुभवलेल्या थरारक क्षणांबद्दल लिहिलं, कुणी कारस्थानी चेटकीची भूमिका एका पुरुष कलाकाराला देण्याच्या मतकरींच्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं, कुणाला चेटकी पाहून ब्रिटिश रंगभूमीवरच्या 'मॅक्बेथ' नाटकांमधल्या चेटकोची आठवण झाली! एकूण बराच बोलबाला झाला. 

हे नाटक संपल्यावर अनेकदा मुलांना घेऊन त्यांचे पालक आत रंगपटात यायचे. भीतीदायक, विक्षिप्त, लांब नाकाची आणि पांढऱ्या पिंजारलेल्या केसांची उंच चेटकी प्रत्यक्षात कशी दिसते हे मुलांना पहायचं असायचं. अनावर, उत्सुकतेने, कुतुहलाने आणि घाबरत ती मुलं जात गर्दी करायची. पांढऱ्या केसांचा विग उतरवून, नाक काढून चेटकीच्या कपड्यांतच मेकअप पुसत बसलेल्या मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अविश्वास आणि आश्चर्य आणि दिसत असे. नाटकभर कारस्थानं करणारी, हलवून सोडणारी चेटकी खलनायिका सोडाच, पण एक सौम्य दिसणारा पुरुष आहे हे पाहून ती मुंल धीर करून पालंकांबरोबर माझ्याजवळ येत. बघत उभी राहत. आई (किंवा वडील) आपल्या पाल्यांना 'हात लाव-हात लाव' त्यांना. काही करणार नाहीत' असं म्हटल्याचं आणि मुलांनी ( माझ्या परवानगीशिवाय) मला हळूच कुरवाळून पाहिल्याचं आणि पाठीवर (घोड्यासारखं) थोपटल्याचंही आठवतं! 

पुण्याची एक गंमत सांगण्यासारखी आहे. आमचे पुण्यात लागोपाठ दोन प्रयोग होते. एक होता एका शाळेच्या पटांगणात आणि दुसरा भरत नाट्य मंदिरात. कपडे बदलून, मेकअप काढून पुन्हा थिएटरला जाऊन मेकअप करण्याइतका वेळ नव्हता. म्हणून मेकअप, कपडे तसेच ठेवून भरत नाट्य मंदिरात जायचे होते. त्यासाठी दोन गाड्या होत्या. पहिला प्रयोग संपल्यावर (नेहमीप्रमाणे) मुलं आणि मोठी माणसं आत भेटायला, बघायला आली. त्यात माझा एक मित्रही होता. त्याच्या मुलींना माझ्याशी शेकहॅण्ड करायला लावून गप्पा मारत राहिला होता. त्या नादात दोन्ही गाड्या निघून गेल्या. प्रत्येक गाडीतल्या माणसांना मी दुसऱ्या गाडीत आहे असं वाटलं.

थोड्याच वेळात शाळेच्या त्या विस्तीर्ण पटांगणात मी चेटकीच्या रूपात एकटाच उभा असल्याचे माझ्या लक्षात आलं! नाटकवाली मंडळी निघून गेली होती. आणि मला तर लगेच निघणं आवश्यक होतं. शाळेच्या बाहेर गल्लीत आलो पण कोणी रिक्षावाला थांबायला तयार होईना. शेवटी शाळेच्या वॉचमनने एका स्कूटरवाल्याला विनंती केली, तो कसाबसा तयार झाला. परकरवजा रंगीत घागरा कम स्कर्ट, ब्लाऊज, वर शाल, लांब नाक, भुवया आणि मोकळे सोडलेले पांढरे केस अशा अवतारात मी त्याला बिलगून बसलो आणि संध्याकाळच्या वेळी, तुडुंब ट्रॅफिकमध्ये, भर टिळक रस्त्यावरून सावकाश स्कूटर चालवत त्याने मला सुरक्षितपणे भरत नाट्य मंदिरला पोचवलं. रस्त्यावरच्या, सायकलवरच्या, रिक्षा गाड्यांमधल्या, बसमधल्या लोकांचे मला रोखून, आ वासून, निरखून, दचकून पाहणारे चेहरे मला अजून आठवतात. 

'रिअ‍ॅलिटी' आणि 'मेक बिलिव्ह वर्ल्ड' मी नेहमीच वेगळे ठेवतो. नाटकातल्या आभासातल्या व्यक्तिरेखांचा नेहमीच्या वास्तवातल्या जगण्यावर परिणाम होऊ देत नाही. पण क्वचित कधी अशी सरमिसळ होऊन फजिती होते. 

बालनाट्यांमधल्या भूमिकांमधील विविधता आणि आवाज, वाचिक अभिनयामधले प्रयोग आणि अतिशय संवेदनक्षम प्रेक्षकांशी परिणामकारक रीतीने साधलेला संवाद पुढील करियरच्या दृष्टीने जमेच्या बाजू होत्या. बालनाट्यांचा रंगमंच माझी प्रयोगशाळाच होती. मनापासून आणि परिश्रमपूर्वक केलेल्या सहा बालनाट्यामधल्या अतिशय वेगळ्या सहा भूमिका. त्यातल्या चेटकीच्या भूमिकेची आठवण आजही आनंद देते...!

Tags: मॅक्बेथ   अलबत्या- गलबत्या चेटकीण बालनाट्य लोभ नसावा अरविंद देशपांडे हसवा-फसवी दिलीप प्रभावळकर Macveth Alabatya- Khalbatya Chetakin Balnaaty Lobh Nasaava Arvind Deshpande rangaayan Hasva Fasvi Dilip Prabhavalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिलीप प्रभावळकर,  मुंबई

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके