डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘‘मी तुला आईला विसरायला कुठे सांगतो आहे? फक्त दुःख, विलाप करण्यासाठी आईची  आठवण काढू नकोस. मनात काही तरी संकल्प  कर आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आईची  आठवण सतत काढत राहा. तुझ्या आईला  वाचन-लेखनाची खूप आवड होती ना? तूही ती  आवड जोपास.’’ ‘‘माझी आई खूप धार्मिक वृत्तीची होती. सतत  कसले ना कसले उपास-तापास करायची. दिवस- दिवस तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायची नाही. आम्ही सर्व जण तिला खूप ओरडायचो. पण ती  आमचे कोणाचे काही ऐकायची नाही आणि तरीही देवाने तिच्या बाबतीत असे का केले  असेल?’’  पंकज व्याकूळ होऊन म्हणाला. ‘‘या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी कोणाकडेच  नाही पंकज. पण त्या गंभीर अपघातातून तूआश्चर्यकारकरित्या वाचला आहेस,  म्हणजे तुझे जगणे अजून संपलेले नाही. हे खरे आहे की, आता जगताना तुला आईचे प्रेम लाभणार नाही. पण तुला जगण्यासाठी आईकडून प्रेरणा  घेण्यापासून तरी कोणी रोखू शकणार नाही ना ?’’ मी त्याची पाठ थोपटत म्हणालो.

पंकजने केक कापला. ‘‘गेट वेल सून पंकज...’’ असे म्हणत आम्ही सर्वांनी  टाळ्या वाजवत त्याला शुभेच्छा दिल्या. काळेआजी मात्र  नेहमीच्या सवयीने ‘‘हॅप्पी बर्थ डे टू यूऽ’’ म्हणत टाळ्या  वाजवीत होत्या.
‘‘काळेआजी, आज त्याचा वाढदिवस कुठे आहे ?  तो बरा होऊन घरी चालला आहे !’’
काळेआजींना अडवीत वनिता म्हणाली. ‘‘असू दे, वाढदिवसच म्हणायचा हा. पुनर्जन्मच आहे  त्याचा.’’

त्याचे मामा वनिताला समजावीत म्हणाले. मी केकचा एक तुकडा कापून त्याला भरविला. त्याच्या  पाठीवरून मायेनं हात फिरवीत त्याला मनःपूर्वक शुभेच्छा  दिल्या. त्याच्या मामांना आणि वडिलांना पुढे बोलावून  त्याला केक भरवायला सांगितले. त्यानंतर वॉकरच्या मदतीने पंकज उठून उभा राहिला.  त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला. येथील काही  आजी-आजोबांच्या बेडजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद  साधत त्यांचा निरोप घेतला. सर्व जण भावुक होऊन त्याला  शुभेच्छा व आशीर्वाद देत होते.  खरं तर संवेदना शुश्रूषा केंद्रातील आम्हा सर्वांसाठी हा  एक खास प्रसंग होता.

आमच्याकडे प्रामुख्याने अंथरुणावर  खिळलेले वृध्द सेवा-शुश्रूषेसाठी भरती होत असतात. त्यामुळे बरे होऊन स्वतःच्या पायांनी घरी चालत जाण्याचे  प्रसंग फार कमी येत असतात. सर्वांचा निरोप घेऊन पंकज वॉकरच्या मदतीने त्याच्या  मामांच्या गाडीत जाऊन बसला. त्याच्या मामांनी व  वडिलांनी आम्हा सर्वांना धन्यवाद दिले. त्यांना टाटा-बाय बाय करून मी माझ्या केबिनमध्ये आलो. दोन महिन्यांपूर्वी संवेदना शुश्रूषा केंद्रात पंकज भरती  झाला, तेव्हापासूनचा एक-एक प्रसंग मला आठवू लागला.  त्याअगोदर त्याचे मामा येऊन चौकशी करून व त्याची सर्व  पार्श्वभूी सांगून गेले होते. एका गंभीर अपघातात पंकजच्या खुब्याचे हाड मोडले  होते. पंधरा-वीस दिवस तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट  होता. त्याचे ऑपरेशन झाले होते. पायाला प्लॅस्टर  असल्यामुळे सेवा-शुश्रूषेसाठी त्याला आमच्याकडे भरती  केले होते. पण त्याहून अधिक दुःखाची गोष्ट म्हणजे, त्या अपघातात त्याची आई गेली होती आणि ही गोष्ट त्याला  अजून कळू दिली नव्हती. तो थोडाफार सावरल्यानंतर ही बातमी त्याला सांगायची, असे त्याच्या नातेवाइकांनी ठरविले होते. तोपर्यंत त्याच्या मामांनी त्याला ‘आई  सिरीयस आहे आणि पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये  ॲडमिट आहे’ असे सांगितले होते.  

पंकजच्या आई शिक्षिका होत्या. त्यांना लेखनाची व  कविता करण्याची आवड होती. ते सर्व जण देवदर्शनासाठी  चालले होते. पंकज,  त्याची आई,  आजी आणि गाडीचा ड्रायव्हर असे सर्व जण मिळून स्वतःची गाडी घेऊन निघाले  होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान पंकजला स्वतः गाडी  चालविण्याचा मूड आला. त्याने ड्रायव्हरला तसे सांगून गाडी चालवायला घेतली आणि दुर्दैवाने काही वेळातच  अपघात झाला. तेथील लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या  हॉस्पिटलमध्ये भरती केले, परंतु आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या वाचू शकल्या नाहीत. पंकजच्या  खुब्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्याची आजी  आणि गाडीचा ड्रायव्हर यांना किरकोळ दुखापत झाली होती. पंकज स्वतः गाडी चालवीत असताना अपघात  झाला असल्यामुळे तो हा धक्का कसा सहन करू शकेल,  याची सर्वांना धास्ती वाटत होती. संवेदना शुश्रूषा केंद्रातील घरगुती वातावरणामुळे काही  दिवसांतच तो इथे रुळला. तो तरुण असल्यामुळे येथील  सिस्टर्स व मावश्यांकडून स्पंजिंग करून घेताना आणि  डायपर बदलताना सुरुवातीला त्याला संकोच वाटायचा.

मी  रोज सकाळी दहा-पंधरा मिनिटे त्याच्याशी गप्पा मारायचो. त्याच्या आवडीनुसार त्याला वेगवेगळ्या विषयांवरची  पुस्तके वाचायला द्यायचो. मी त्याला आग्रहाने नियमितपणे  डायरीलेखनाची सवय लावली. त्याचे मामा रोज सायंकाळी  त्याला भेटायला यायचे. तो प्रत्येक वेळी मामांना आईबद्दल  विचारायचा. ‘आई खूप सिरियस आहे. बाबा तिच्याजवळ  थांबले आहेत,’ असे सांगून मामा त्याची समजूत  घालायचे. काही दिवसांनंतर तो बऱ्यापैकी सावरल्यावर आम्ही  त्याला त्याच्या आईबाबत सांगण्याचा निर्णय घेतला. त्याचे  मामा,  वडील,  काका असे सर्व जण मिळून आम्ही त्याच्या  रूममध्ये गेलो. सर्वांना एकत्र येताना पाहून तो कावरा- बावरा झाला. ‘‘पंकज,  तुला एक दुःखद बातमी सांगायची आहे.  अपघातानंतर दोन-तीन दिवसांतच आई गेली आहे. तुला  लगेच सांगू नका,  असे तुझे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी  सांगितले होते. तू त्रास न करून घेता ही गोष्ट आता  स्वीकारायला हवीस.’’ त्याचे काका धीर एकवटून  म्हणाले. पंकजने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. चेहरा दोन्ही  हातांनी ओंजळीत झाकून घेतला. त्याच्या मामांनी पट्‌कन  पुढे होऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला धीर  दिला. तो त्यांच्या कुशीत शिरून स्फुंदत-स्फुंदत रडू  लागला.  थोड्या वेळाने तो शांत झाला. ‘‘तुम्ही मला लगेच का सांगितले नाही ?  आईला जाऊन  नक्की किती दिवस झाले?’’ त्याने आपल्या मामांकडे पाहत  विचारले. ‘‘डॉक्टरांनीच आम्हाला तसे सांगितले होते.

आई तर  गेली होती; तू बरा होणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते.’’ त्याचे मामा त्याला समजावीत म्हणाले. ‘‘माझ्यामुळे आई गेली मामाऽऽ’’ असे म्हणत तो पुन्हा  हुंदके देत रडू लागला. ‘‘असा विचार मनात आणू नकोस पंकज. उलट,  त्या  अपघातातून तू वाचला आहेस. म्हणजे आईचं स्वप्न पूर्ण  करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. तुला खंबीर  व्हायला हवं.’’  त्याचे मामा त्याला धीर देत म्हणाले.  त्याच्या नातेवाइकांना काही वेळ त्याच्यासोबत थांबायला  सांगून मी ओपीडीत आलो. थोड्या वेळाने पंकजचे नातेवाईक पुन्हा मला भेटायला  माझ्या केबिनमध्ये आले. ‘‘आजचा दिवस त्याचा मनावरचा ताण कमी होण्यासाठी काही औषध वगैरे देता का डॉक्टर ?’’  त्याच्या  मामांनी मला विचारले. ‘‘मी रात्री राऊंडच्या वेळी त्याची मनःस्थिती पाहून  ठरवितो,  काळजी करू नका.’’ मी त्यांना समजावीत  म्हणालो. त्यानंतर ते सर्वजण माझा निरोप घेऊन निघून  गेले.  

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे पंकजच्या  रूममध्ये आलो.

‘‘गुड मॉर्निंग पंकज. कसा आहेस ?  रात्री झोप  व्यवस्थित लागली का ?’’
‘‘हो,  लागली थोडा वेळ.’’ तो चेहऱ्यावर उसने हसू  आणत उदासपणे म्हणाला.
‘‘डॉक्टर,  मला इथे भरती केले,  तेव्हा माझी आई गेल्याचे तुम्हाला माहीत होते का ?’’
‘‘हो, तुझ्या मामांनी मला कल्पना दिली होती.’’  
‘‘मग तुम्हीही मला इतके दिवस आईबद्दल का सांगितले नाहीत?’’  
‘‘तुझ्या नातेवाइकांनी तुझ्या भल्यासाठीच सांगितले  नव्हते पंकज. या धक्क्यातून तुला आता हळूहळू  सावरायला हवं.’’  
‘‘माझ्यामुळे आई गेली,  ही अपराधी भावना मनाला सतत अस्वस्थ करते आहे डॉक्टर. मला आता जगावंसंच  वाटत नाही.’’  तो उदासपणे म्हणाला.
‘‘असा निराश होऊ नकोस पंकज. निर्मिती व नष्ट होणे ही निसर्गाची निरंतर प्रक्रिया आहोत आणि आपण त्या प्रक्रियेचा केवळ एक छोटासा भाग आहे. आपणा सर्वांनाच दुःखावर मात करत वाट्याला आलेलं आयुष्य आनंदाने जगता यायला हवं. तुला हा अपघात विसरून नव्याने  जगायला सुरुवात करायला हवी.’’  
‘‘पण आईला कसं विसरू डॉक्टर?’’ ‘‘मी तुला आईला विसरायला कुठे सांगतो आहे ?  फक्त  दुःख, विलाप करण्यासाठी आईची आठवण काढू नकोस. मनात काही तरी संकल्प कर आणि ते ध्येय पूर्ण  करण्यासाठी आईची आठवण सतत काढत राहा. तुझ्या  आईला वाचन-लेखनाची खूप आवड होती ना ?  तूही ती  आवड जोपास.’’
‘‘माझी आई खूप धार्मिक वृत्तीची होती. सतत कसलेना कसले उपासतापास करायची. दिवस-दिवस तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायची नाही. आम्ही सर्व जण तिला खूप ओरडायचो. पण ती आमचे कोणाचे काही ऐकायची नाही आणि तरीही देवाने तिच्या बाबतीत असे का केले  असेल ?’’  पंकज व्याकूळ होऊन म्हणाला.
‘‘या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी कोणाकडेच नाही  पंकज. पण त्या गंभीर अपघातातून तू आश्चर्यकारकरित्या  वाचला आहेस, म्हणजे तुझे जगणे अजून संपलेले नाही. हे  खरे आहे की, आता जगताना तुला आईचे प्रेम लाभणार नाही. पण तुला जगण्यासाठी आईकडून प्रेरणा घेण्यापासून  तरी कोणी रोखू शकणार नाही ना ?’’ मी त्याची पाठ  थोपटत म्हणालो.  

मी रोज सकाळी नियमितपणे त्याच्याशी संवाद  साधायचो. त्याने दिवसभर वाचलेल्या पुस्तकाबद्दल  त्याच्याशी चर्चा करायचो. एके दिवशी त्याने मला त्याची  डायरी वाचायला दिली. डायरीमध्ये त्याने आपल्या  आईच्या आठवणींबद्दल लिहिले होते. तसेच काही  संकल्पही केले होते. संवेदना शुश्रूषा केंद्रातील सर्व स्टाफही  तो आनंदी राहावा म्हणून येता-जाता त्याच्याशी संवाद  साधत राहायचा. त्याचे मामा व इतर नातेवाईकही  नियमितपणे येऊन त्याची विचारपूस करून,  त्याला बरे  होण्यासाठी प्रोत्साहन देऊन जायचे. दीड महिन्यानंतर त्याच्या पायाचे प्लॅस्टर काढले.  त्यानंतर त्याने नियमित व्यायाम व वॉकरच्या मदतीने चालायला सुरुवात केली. दैनंदिन विधीसाठी बाथरूमचा  वापर करणे त्याला जमू लागले. त्याचा आत्मविश्वास  वाढल्यानंतर त्याला घरी जायचे वेध लागले. मग त्याच्या  मामांशी चर्चा करून त्याला घरी पाठवायचे ठरवले. तो घरी  गेल्यानंतर सुरुवातीला त्याला आईची उणीव पदोपदी  भासणार होती. त्यामुळे मी त्याला आम्ही ठरविल्याप्रमाणे  आईच्या आठवणींपासून प्रेरणा घेत नियमितपणे डायरी  लिहिण्याची आठवण करून दिली. त्याला स्वतःच्या  पायावर उभे राहत चालत घरी जाताना पाहून आम्हाला खूप समाधान वाटले.  पंकज आपल्या मामांसोबत निघून गेला. पण जाता- जाता त्याने नर्सिंग स्टाफला धन्यवाद देताना काढलेले  उद्‌गार मी कधीही विसरू शकणार नाही. ‘‘तुम्ही सर्वांनी आईच्या मायेने माझी सेवा-शुश्रूषा  केली आहे.’’ तो हात जोडून कृतज्ञतापूर्वक म्हणाला होता.  तेव्हा नर्सिंग स्टाफपैकी अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याचे हित चिंतणाऱ्या,  भलं करणाऱ्या आणि मार्गदर्शन  व प्रेरणा देणाऱ्या अनेकांच्या रूपाने त्याची आई त्याला  सतत अशीच भेटत राहो.

Tags: दिलीप शिंदे वृद्ध old age jagnyache bhan dilip shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात