Diwali_4 गंगारामभाऊ म्हस्के : मराठ्यांचा ‘अलक्षित’ महानायक
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

गंगारामभाऊ म्हस्के : मराठ्यांचा ‘अलक्षित’ महानायक

महापुरुष स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या आपल्या परंपरेमुळे आपले किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी तावडेंचे वरील चिंतन फारच उपकारक ठरेल. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याचा इतिहास महाराष्ट्राबाहेर बडोद्यात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. 1885 ला सयाजीरावांनी म्हस्केंना आर्थिक मदत सुरू केली. त्यानंतर लगेच जानेवारी 1886 ला खासेरावांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणाले होते की, या मदतीने आमचे हेतू पूर्ण होण्यास फायदा होईल. आज 144 वर्षांनंतर आपण जेव्हा महाराजांच्या या पत्राचे वाचन करतो तेव्हा महाराजांचा तो निर्णय किती क्रांतिकारक होता याचा साक्षात्कार होतो. गंगारामभाऊंच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा ‘पाया’ घातला. या पायातील ‘दगड माती’ बडोद्यातून आली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये ‘चैतन्याचे झरे’ फुलवेल असा आहे.

गंगारामभाऊ म्हस्के हा आधुनिक महाराष्ट्रातील पूर्णतः अलक्षित महानायक आहे. माझे हे विधान महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, चळवळीतील बुद्धिजीवी आणि शिक्षित वर्गाला चक्रावून सोडेल. परंतु आजच्या मराठा आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्या गंगारामभाऊंचे पुनर्वाचन हे मराठ्यांबरोबर बुद्धिजीवींसाठी अनिवार्य आहे. गंगारामभाऊ हे सत्यशोधक समाजाचे सदस्य आणि हितचिंतक होते. म्हस्केंनी पुण्यामध्ये मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने 1885 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा विकास तपासला असता, जवळजवळ सर्व ज्ञानशाखांतील मराठ्यांमधील पदवीधरांची पहिली पिढी गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेली होती. इतकेच नव्हे तर बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, कोल्हापूर या महत्त्वाच्या संस्थानांमधील प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे बहुतेक उच्चशिक्षित मराठे हे गंगारामभाऊंचे बौद्धिक ‘उत्पादन’ होते.

गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची यादी हजारांत जाईल. 1883 ते 1935 या 52 वर्षांत त्यांच्या शिष्यवृत्तीद्वारे 338 मराठे पदवीधर झाले. आजही ही संस्था कार्यरत आहे. तिचा पत्ता पुढीलप्रमाणे- 991, म्हस्के स्मारक मंदिर, हिरा बाग, लोकमान्य बाळगंगाधर टिळक रोड, सारस्वत सह. बँकेच्या वर, शुक्रवार पेठ, पुणे. बहुजनांच्या शिक्षणासाठी 1885 पासून आजअखेर 135 वर्षे कार्यरत महाराष्ट्रात किती संस्था आहेत? हा मुद्दासुद्धा विचार करण्यासारखा आहे. परंतु महाराष्ट्रात याबाबत पूर्ण अज्ञान असल्यामुळे म्हस्केंचे योगदान महाराष्ट्राला माहिती नाही आणि बगाडेंसारखे संशोधक गंगारामभाऊंवर अन्याय करताना दिसतात. विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, वासुदेव लिंगाजी बिर्जे, पांडुरंग चिमाजी पाटील, रामचंद्र शामराव माने-पाटील, दाजीराव विचारे, शाहू महाराजांनी करवीरपीठाचे क्षात्रगुरू म्हणून ज्यांची नेमणूक केली ते सदाशिव पाटील बेनाडीकर, दत्तात्रय रामचंद्र भोसले, सीताराम तावडे, इतिहास संशोधक डॉ.अप्पासाहेब पवार यांसारखे शेकडो कर्तबगार लोक त्यांच्या शिष्यवृत्तीमुळे पुरोगामी महाराष्ट्र घडवू शकले याचे भान आपल्याला ठेवावे लागेल. या लोकांनी केलेले शैक्षणिक कार्य मराठ्यांबरोबर अस्पृश्य जातींच्या उद्धारालाही उपकारक ठरले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अनेक शिक्षण संस्थांचे सूत्रधार हे गंगारामभाऊंच्या दातृत्वाचे लाभार्थी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुजनांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात 85 वर्षांपूर्वी शिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे यांनी म्हस्केंच्या कार्याचे मूल्यमापन करताना काढलेला निष्कर्ष आजही चिंतनीय आहे. तावडे म्हणतात, ‘मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय कै.गंगारामभाऊ म्हस्के यांना आहे.’

ज्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाची पार्श्वभूमी तयार केली, त्याचप्रमाणे गंगारामभाऊंनी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामासाठी जमीन नांगरून ठेवली. लोकसंख्येत तसेच सामाजिक आणि राजकीय नेतृत्वात आघाडीवर असणाऱ्या मराठा जातीच्या उन्नतीसाठी पायाभूत काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्केंचे नावही आज महाराष्ट्रात कुणाला माहीत नाही. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचा ‘तुटलेला’ इतिहास ‘जोडून’ तातडीने अभ्यासण्याची गरज आहे. सयाजीराव गायकवाड यांचे या संस्थेला स्थापनेपासूनच सर्वाधिक आर्थिक साह्य होते. या संस्थेची स्थापना करण्याचे निश्चित झाल्याबरोबर गंगारामभाऊंनी आर्थिक साह्यासाठी सयाजीरावांची मदत घेण्याचे ठरवले. 1881 मध्ये महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. पुढे लगेचच 1883-84 ला म्हस्केंनी आर्थिक मदतीसाठी सयाजीरावांची भेट घेतली असावी. यासंदर्भात सीताराम तारकुंडे म्हणतात, श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची स्वारी पुणे मुक्कामी आली होती. श्रीमंताकडे रा.ब. महादेव गोविंद रानडे, रा.रा.गंगाराम म्हस्के, वकील रा.रा.राजन्ना लिंगू व आणखी दोन तीन सभ्य गृहस्थ यांचे हेप्युटेशन गेले. रा.ब.रानड्यांनी गायकवाड सरकारास डेप्युटेशचा उद्देश सांगितला. डेप्युटेशनचा उद्देश हा होता की, मराठे लोकांची, त्यांस विद्या नसल्यामुळे किती शोचनीय स्थिती झाली आहे हे श्रीमंतास विदित आहेच. तरी मराठ्यांच्या गरीब व होतकरू मुलांस हायस्कुलाचे शिक्षण मिळण्याकरता त्यांस स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत. या कामाकरता आम्ही फंड काढला आहे, त्यास श्रीमंतांनी हातभार लावावा.

सयाजीरावांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन अर्थसहाय्य  सुरू केले. या संस्थेचे महाराष्ट्रासाठीचे महत्त्व ओळखून 1885 पासून ते 1939 पर्यंत अशी 54 वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ सयाजीरावांनी दिले. ही मदत 5 लाख 29 हजार 556 रुपये इतकी होती. आजच्या रुपयाच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य 72 कोटी 45 लाखांहून अधिक होईल. मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आधुनिक काळात सयाजीरावांनी जेवढे प्रयत्न केले, तेवढे आजतागायत कोणीही केलेले नाहीत. यामध्ये गंगारामभाऊंची डेक्कन मराठा असोसिएशन हे एक प्रमुख माध्यम होते. यासंदर्भात 23 जानेवारी 1886 ला खासेराव जाधवांना लंडनला लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, ‘आपल्या समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुण्यात स्थापन झालेल्या एका मराठा संस्थेला आम्ही दरमहा दोनशे रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आमचा हेतू पूर्ण होण्याच्या दृष्टीने ते अनुदान उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.

म्हस्केंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील ओढे रंगराव या गावात 1831 मध्ये झाला. त्यांचे वडील घरच्या गरिबीमुळे पोटापाण्याच्या शोधात पुण्यात आले, तेथे ते हमालीचे काम करत होते. गंगारामभाऊंचे शिक्षण पुण्यातील मिशन शाळेत झाले. शिक्षण झाल्यावर त्यांनी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. पुणे कँटोन्मेंट मॅजिस्ट्रेटचे शिरस्तेदार म्हणून त्यांना नोकरी मिळाली. याचदरम्यान त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. 1876 मध्ये त्यांनी पुण्यात वकिली सुरू केली. वकिलीच्या व्यवसायात मोठा लौकिक आणि चांगला पैसा त्यांनी मिळवला. 1873 मध्ये फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते स्थापनेपासूनच सदस्य आणि हितचिंतक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी त्यांच्याच पुढाकाराने स्थापन झाली. 1901 मध्ये विषमज्वराने त्यांचा बळी घेतला. न्यायमूर्ती रानडे आणि गंगारामभाऊ यांची मैत्री होती. डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेवेळी रानडे आणि सत्यशोधक राजन्ना लिंगू ही प्रमुख मंडळी त्यांच्याबरोबर होती. 1880 च्या जनगणना अहवालात मराठा जात शैक्षणिक क्षेत्रात मागास असल्याचे त्यांना आढळले. म्हणूनच त्यांनी 1884 मध्ये सर डब्ल्यु. वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली मराठा जातीच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी सभा भरवली. पुढे 1885 ला डेक्कन मराठा एज्युकेशन संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासूनच सयाजीरावांनी या संस्थेला 2400 रुपयाचे वर्षासन दिले होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनीही पुढे या संस्थेस आर्थिक साह्य केले होते. यासंदर्भात डॉ.रमेश जाधव म्हणतात, न्या.रानडे यांच्या प्रेरणेने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी  ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन’ निर्माण झाली होती. या संस्थेचे प्रमुख गंगारामभाऊ म्हस्के हे होते. म्हस्के यांच्या विनंतीवरूनच शाहू छत्रपतींनी या संस्थेला कोल्हापूर दरबारमार्फत 30 रुपयांचे वर्षासन मंजूर केले होते.

न्या.रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक हे पुण्यातील तीन महत्त्वाचे नेते गंगारामभाऊंचा वारंवार  सल्ला घेत. गंगारामभाऊ म्हस्के हे किती मोठे होते हे समजण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. महाराष्ट्रातील एक महान पण दुर्लक्षित सुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षणासाठीसुद्धा गंगारामभाऊच्या डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची शिष्यवृत्ती होती. 1893 पासून पहिली तीन वर्ष म्हस्केंची दरमहा 10 रुपये  शिष्यवृत्ती आणि 1896 पासून पुढे पाच वर्ष सयाजीरावांच्या दरमहा 25 रुपयांच्या शिष्यवृत्तीवर शिंद्यांचे शिक्षण झाले होते. शिष्यवृती मिळवण्यासाठी शिंदे जेव्हा पहिल्यांदा म्हस्केंना भेटायला गेले तेव्हाची आठवण शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवली आहे. शिंदे म्हणतात, ‘गंगारामभाऊ म्हस्के ह्या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत. त्या काळचे एक फर्डे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुशार वकील अशी त्यांची प्रसिद्धी होती. पुणे लष्करात मेन स्ट्रीटवर त्यांचे मोठे चांगले स्वतःचे घर आहे. रानडे-भांडारकर वगैरेंसारखी त्या काळच्या सुधारक पक्षात त्यांची चांगली मान्यता होती. वकिलीत त्यांनी बरेच पैसे मिळवले होते. हिराबागेत असलेल्या कॉस्मोपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यात पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या तैल-तसबिरी टांगल्या आहेत, त्यात त्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे. त्यांची मराठा संस्थानिक, राजे व इतर जातीचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ यांच्यामध्ये त्या काळी छाप होती.

शिंदेंच्या मनावर पहिल्या भेटीत म्हस्केंचा पडलेला प्रभाव त्यांच्यावरील आठवणीतून व्यक्त होतो. याबरोबरच मराठा जातीवर त्यांचे असणारे उपकार याचीही कल्पना येते. पुण्यासारख्या शहरात त्या काळात मराठा जातीतील व्यक्तीने आपला प्रभाव कसा निर्माण केला असेल आणि पहिल्या भेटीतील आकलनापेक्षा आपल्याला पुण्याची सर्व माहिती झाल्यानंतर त्यांच्या योग्यतेची कशी कल्पना आली याबद्दल शिंदे पुढे लिहितात, त्या काळात मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता. इतकेच नव्हे तर ते वकिलीतही बरेच पुढारलेले आणि तत्कालीन नागरिकांत मान्यता पावलेले होते. हे माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. कारण ही तुलना करण्याइतकी माझी पुण्याची माहिती नव्हती. ज्या म्हस्केसाहेबांच्या प्रयत्नाने आज शेकडो मराठे पदवीधर झाले, त्यापैकी एकही आज पुण्यातल्या समाजात अशा मान्यतेने राहात नाही. म्हस्केसाहेब त्यावेळी कसे राहू शकले ही मननीय गोष्ट आहे.

राजर्षी शाहूमहाराजांचा म्हस्केंशी पत्रव्यवहार होता. वसतिगृह, शिक्षण आणि संस्थानी प्रशासनासाठी शिकलेले लोक मिळवण्यासाठी हा पत्रव्यवहार होत होता. 1894-95 च्या दरम्यान शाहूमहाराजांनी म्हस्केंना बहुजन समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांची नावे मागितली होती. यासंदर्भात डॉ.रमेश जाधव म्हणतात, राज्यकारभारात समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्याचा शाहू छत्रपतींचा निर्धार कायम होता. ते धोरण त्यांनी आयुष्यभर अमलात आणण्याचे जीवापाड प्रयत्न केले. हेच धोरण मनात ठेवून त्यांनी पुण्यातील एक नामवंत वकील आणि ब्राह्मणेतर समाजाचे नेते गंगारामभाऊ म्हस्के यांना बहुजन समाजातील पदवीधर आणि नोकरीस पात्र अशा लोकांची नावे कळविण्यास विनंती केली. गंगारामभाऊ म्हस्के यांनी 1883 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेमार्फत अनेक गरीब आणि होतकरू अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांनी दाजीराव अमृतराव विचारे आणि भास्करराव विठुलराव जाधव या दोन होतकरू तरुणांची नावे शाहू छत्रपतींना कळविली. पुढे शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची  8 जून 1895 रोजी असिस्टंट सरसुभे म्हणून कोल्हापूर संस्थानात नेमणूक केली. पुढे 27 वर्ष भास्करराव जाधवांनी कोल्हापूर संस्थानात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शाहू महाराजांनी दाजीराव विचारे यांनाही बांधकाम विभागाचे प्रमुख केले. या उदाहरणावरून 1885 पासून सयाजीरावांनी या संस्थेला दिलेला राजाश्रय महाराष्ट्राला किती उपकारक ठरला हे सूचित होते.

शिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे यांनी 1935 मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित ग्रंथात व्यक्त केलेली खंत आणि मराठा समाजाची आपल्या इतिहासाबद्दलची अनास्था आपल्याला आत्मटीकेकडे घेऊन जाते. तावडे लिहितात, ‘मराठा समाजाच्या उन्नतीसाठी डोंगराएवढे काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्के हे मराठा समाजाचे एक आद्य नेते ठरतात; पण बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या मंडळींची ओळख पुढील पिढीस नीटशी होऊ शकली नाही, हाही इतिहास आहे. गंगारामभाऊ एक कर्मवीर होते.’ पुणे येथे अनेक माणसांचा इतिहास सांगितला जातोय. तो सांगितलाच पाहिजे; पण त्यांनी फक्त स्वत:पलीकडची गुंतवणूक म्हणून समाजच्या उत्कर्षासाठी आयुष्य झोकून दिले, त्यांचे छोटे चरित्रही एवढ्या काळात उपलब्ध होऊ नये, ही बहुजन कर्मवीरांची खरी परवड आहे. त्यात गंगारामभाऊ लेखक नव्हते, बोलघेवडे वक्ते नव्हते, त्यामुळे त्यांचे बोलणे, विचारही आज समाजासमोर आले नाहीत. मराठा समाजाच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी पुढे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ही संस्था उदयास आली; पण तत्पूर्वी गंगारामभाऊ हे जग सोडून निघून गेले होते. मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे मोठे श्रेय गंगारामभाऊ म्हस्के व त्यांचे आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आहे. महाराष्ट्रात आज संख्येने मोठा असलेल्या मराठा समाजाच्या या नेत्याबद्दल, संस्थेबद्दल आमची अनास्था ही कृतघ्नतेचे व अनास्थेचे उदाहरण अस्वस्थ करणारे आहे.

महापुरुष स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या आपल्या परंपरेमुळे आपले किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी तावडेंचे वरील चिंतन फारच उपकारक ठरेल. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याचा इतिहास महाराष्ट्राबाहेर बडोद्यात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. 1885 ला सयाजीरावांनी म्हस्केंना आर्थिक मदत सुरू केली. त्यानंतर लगेच जानेवारी 1886 ला खासेरावांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणाले होते की, या मदतीने आमचे हेतू पूर्ण होण्यास फायदा होईल. आज 144 वर्षांनंतर आपण जेव्हा महाराजांच्या या पत्राचे वाचन करतो तेव्हा महाराजांचा तो निर्णय किती क्रांतिकारक होता याचा साक्षात्कार होतो. गंगारामभाऊंच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा ‘पाया’ घातला. या पायातील ‘दगड माती’ बडोद्यातून आली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये ‘चैतन्याचे झरे’ फुलवेल असा आहे. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, बडोद्यातील मराठा फंड व अखिल भारतीय शिक्षण परिषद या तीन संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी मराठ्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. आजच्या रुपयाच्या मूल्यांत ही रक्कम 100 ते 150 कोटींच्या घरात जाईल.

1936 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी महाराष्ट्रातील 74 संस्थांनी एकत्र येऊन महाराजांचा सत्कार केला होता. मुळात एवढ्या संस्थांनी पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र येऊन ‘बडोद्याच्या’ महाराजांचा सत्कार का केला असेल, याचा शोध घेणे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा लिहिणे आहे. याच सार्वजनिक सत्कारात महाराजांच्या आर्थिक पाठबळाने 1885 पासून कार्यरत असलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने महाराजांना 3 जानेवारी 1936 ला जे मानपत्र दिले त्या मानपत्रात सयाजीरावांचे मराठे आणि महाराष्ट्र यांच्या उत्कर्षात काय योगदान आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हे मानपत्र म्हणते, महाराजसाहेबांनी केवळ आपल्याच राज्यातील प्रजेच्या उन्नतीप्रीत्यर्थ प्रयत्न केले नसून राज्याबाहेरही सक्रिय सहानुभूती दाखविली आहे. महाराष्ट्रतील ज्या अनेक संस्थांना महाराजसाहेबांनी मदत केली आहे, त्यापैकी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही एक होय. या संस्थेस महाराजांनी सन 1886 सालापासून मदत केलेली आहे व याच मदतीवर आतापर्यंत या संस्थेने मराठा समाजांत शिक्षण-प्रसाराचे काम केले आहे. या संस्थेची मदत घेऊन पुष्कळ मराठा गृहस्थ नावारूपास येऊन आज मोठमोठ्या हुद्यांवर कामे करीत आहेत. महाराजसाहेबांनी मराठा समाजात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी दिलेल्या या उत्तेजनामुळे त्या त्या व्यक्तींचाच उत्कर्ष झाला असे नसून सर्व मराठा समाजाचा अप्रत्यक्षत्या उत्कर्ष झालेला आहे. अशा रीतीने महाराजांनी मराठा समाजाला चिरकाल उपकारबद्ध करून ठेविले आहे. याची फेड आमच्या समाजाच्या यापुढील कार्यक्षमतेनेच होणार आहे.

मराठ्यांचे उद्धारकर्ते म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर थेट राजर्षी शाहू महाराजांकडे जातो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड, खासेराव जाधव यांनी मराठ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षाचा पायाभूत प्रयत्न अतिशय विचारपूर्वक घातला होता. या दोघांच्या प्रयत्नाशी सुसंगत काम गंगारामभाऊ म्हस्केंनी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या भक्कम आर्थिक सहकार्याने 135 वर्षांपूर्वी सुरू केले होते. मराठ्यांच्या दारिद्य्रामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, या वास्तवाला भिडण्याची दूरदृष्टी गंगारामभाऊंनी त्यावेळी दाखवली नसती तर आज मराठ्यांमध्ये जी शैक्षणिक प्रगती दिसते तीसुद्धा दिसली नसती. त्यामुळे या महानायकाचा पुतळा नव्हे तर कृतिशील व वैचारिक स्मारक त्यांची कर्मभूमी असणाऱ्या पुणे येथे साकारण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती शेवटी करावीशी वाटते.

 

संदर्भ :

1. पवार गो.मा. व शिंदे, रणधीर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‌मय खंड 2 : आत्मपर लेखन, विभाग दुसरा:माझ्या आठवणी व अनुभव, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,2016.

2. भांड बाबा, महाराजा सयाजीरावआणि पुणे शहराचे प्रेम, औरंगाबाद, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्था, 2019.

3. पगार अेकनाथ, (संपा.) ‘‘महाराजा सयाजीराव गायकवाड पत्रसंग्रह भाग 1’’, औरंगाबाद, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, 2017.

4. जाधव रमेश, लोकराजा शाहू छत्रपती, पुणे, सुरेश एजन्सी, 2015.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिनेश पाटील
dineshpatil1942@gmail.com

समाजशास्त्र विभाग प्रमुख- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात