डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सयाजीराव : फुलेविचारांचा परिपूर्ण कृतिकार्यक्रम राबवणारा राजा

जोतिबा फुले यांचा उल्लेख सयाजीराव महाराज नेहमी ‘महात्मा’ असा करत. महाराजांनी 1888 मध्ये केलेल्या सूचनेनुसार मुंबईमधील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी जोतिरावांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण केली. सयाजीरावांबद्दल महात्मा फुल्यांना असणारा आदर फुल्यांनी एक अखंड लिहून व्यक्त केला. हा अखंड त्या वेळी दीनबंधू वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता. फुल्यांनी पत्राद्वारे मागणी करून सयाजीरावांचा फोटो हवा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाराजांनी आपला राजवेषातील फोटो फुल्यांना पाठवला. परंतु त्याऐवजी साध्या वेशातील फोटो मागवून तो फुल्यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत लावला होता. महात्मा फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो आपल्या बैठकीच्या खोलीत लावणे यातच पुरोगामी महाराष्ट्राचा ‘खरा’ इतिहास लपला आहे. महाराष्ट्र जेवढ्या लवकर हे वास्तव स्वीकारेल, तेवढे ते महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी पोषक ठरेल.   

विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली, 
नीतिविना गती गेली, गतीविना वित्त गेले, 
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। - महात्मा फुले 

महात्मा फुल्यांच्या या ओळी गेल्या 60 वर्षांतील महाराष्ट्रातील पुरोगामी प्रबोधनपरंपरेचा ‘मूलमंत्र’ म्हणून लाखो वेळा उच्चारल्या गेल्या असतील, परंतु आपल्या प्रबोधनपरंपरेतील ‘जयघोष’ संस्कृतीत या ओळी सुभाषिताच्या दर्जापलीकडे गेल्या नाहीत. ‘अज्ञान हेच गुलामीचे प्रमुख कारण आहे’ याची चर्चा महाराष्ट्रात वारेमाप झाली, परंतु फुल्यांच्या या ओळींचा मथितार्थ सर्वार्थाने ‘कृतिशील’ करणारा एकमेव प्रशासक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे असणारे योगदान मात्र चर्चेच्या परिघाबाहेर ठेवले गेले. 

‘फुले असे म्हणाले’ आणि ‘फुले तसे म्हणाले’ याचीच कीर्तनं आम्ही करत राहिलो. फुल्यांचे अज्ञानाला भिडण्याचे तत्त्वज्ञान आम्ही अक्षरओळख आणि नकारात्मक धर्मटीका या चौकटीत बंदिस्त केले. याउलट, फुले ज्यांना गुरुस्थानी मानत होते, ते फुल्यांचे सृजनशील अनुयायी महाराज सयाजीराव मात्र फुल्यांना अपेक्षित असणारा ‘अज्ञान निर्मूलनाचा कृतिकार्यक्रम’ मानवी जीवनाचे एकही अंग न सोडता, शांतपणे, कोणताही डांगोरा न पिटता व स्टंटबाजी न करता आपल्या बडोदा संस्थानाबरोबर महाराष्ट्रभर राबवत होते. 

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, फुल्यांचे अनुयायी असणे म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणे आणि त्यांचा द्वेष करणे या संकुचित सूत्रापलीकडे जाऊन, प्रसंगी फुल्यांपेक्षाही परखड भाषेत परंतु ब्राह्मणद्वेषविरहित दृष्टिकोनातून ब्राह्मणांचा समाचार घेणाऱ्या सयाजीरावांना महाराष्ट्र कृतघ्नपणे विसरला, यातच आपल्या पुरोगामी चळवळीतील काहीशी  ‘जातीयकरणा’ची बीजे लपली आहेत. म्हणूनच कॉ.शरद पाटील ज्याला ‘आत्मटीका’ म्हणतात, तो जीवघेणा मार्ग स्वीकारून आजच्या फुले जयंतीच्या निमित्ताने जोतिबा आणि सयाजीराव हा ‘क्रांतिसेतू’ समजून घेणे म्हणजे विषमतेचा प्रवाह ओलांडण्याचा ‘नवा विचारपूल’ तयार करणे होईल. 

‘शेतकऱ्यांचा असूड’ या 1883 मध्ये लिहिलेल्या ग्रंथाच्या आरंभी फुल्यांनी वरील ओळी लिहिल्या होत्या. हा ग्रंथ प्रकाशित होण्याअगोदर दोन वर्षे- 1881 मध्ये सयाजीरावांना राज्याधिकार प्राप्त झाले. या ग्रंथाच्या प्रकाशनाला सयाजीरावांनी आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे, या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे संपादक असणाऱ्या ‘दीनबंधू’ पत्रात क्रमशः प्रकाशित झाले होते. परंतु फुलेंनी या ग्रंथात भारतातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीसाठी ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच ब्रिटिश सरकारवरही सडकून टीका केली होती. ब्रिटिश सरकारचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून, सत्यशोधक असणाऱ्या लोखंडेंनी या ग्रंथाचे क्रमशः प्रकाशन बंद केले होते. या पार्श्वभूमीवर तर सयाजीरावांचे या ग्रंथाला उघडपणे अर्थसाह्य करणे किती हिमतीचे होते, हे आपल्या लक्षात येईल. नुकताच राज्यकारभार हाती घेतलेल्या अवघ्या 20 वर्षांच्या राजाने कारकिर्दीच्या आरंभीच इंग्रजांशी थेट भिडण्याची ही कृती अतिशय महत्त्वाची आहे. महात्मा फुल्यांच्या संदर्भाने गेली 60 वर्षे संशोधन-लेखनाचे पीक उदंड झाले असले तरी फुल्यांच्या एकाही अभ्यासकाने सयाजीरावांच्या या कृतीचे मोल लक्षात घेतले नाही.

महात्मा फुले 19 ऑक्टोबर 1882 रोजी हंटर कमिशनसमोर बहुजनांच्या शिक्षणासंदर्भात मागणी करत होते. त्याच वर्षी सयाजीराव अस्पृश्य आणि आदिवासींसाठी मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य व वसतिगृहाच्या सोई उपलब्ध करून देऊन फुल्यांच्या मागणीबरोबर कृतीचे पाऊल टाकत होते. इतकेच नव्हे, तर शिक्षिका तयार करण्याच्या उद्देशाने स्त्रियांचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयही याच वर्षी महाराज जेव्हा सुरू करतात, तेव्हा शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या उन्नतीचे महाद्वार उघडतात. इतकी कृतिशीलता सयाजीरावांनंतर एकाही फुले अनुयायाला प्रत्यक्षात आणता आली नाही. पुढे 1906 मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात महाराज जेव्हा सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करतात, तेव्हा तर ते फुल्यांपेक्षाही मोठे क्रांतिकारक ठरतात. कारण या कायद्यात 10 वर्षांपर्यंतची मुले आणि 8 वर्षांपर्यंतच्या मुलींना शाळेत पाठवले नाही, तर पालकांना ते दिवसाला एक रुपया दंडाची तरतूद करतात. 

फुल्यांनी हंटर कमिशनसमोर केलेल्या 1882 मध्ये मागणीशी या तरतुदीचा थेट संबंध आहे. कारण ही मागणी करत असताना फुल्यांनी पालकांना दंड करून पालकांकडून जमा होणारा दंड बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशीही मागणी केली होती. 1906 च्या 1 रुपयाचे आजचे मूल्य 2500 रुपये भरते, हे वाचून आज आपण यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु, यातून शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, ही बाब महाराज किती गंभीरपणे घेत होते याचा साक्षात्कार होतो. फुल्यांची मागणी आणि सयाजीरावांची कृती यांची जेव्हा आपण तुलना करतो, तेव्हा फुल्यांना गुरू मानणाऱ्या इतर सर्व समाजक्रांतिकारकांच्या किती पुढे सयाजीराव या बाबतीत होते याचा पुरावा मिळतो. 

फुल्यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’मध्ये मांडलेली भूमिका आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण जेव्हा सयाजीरावांच्या शेतीविषयक कार्याशी जोडून समजून घेतो, तेव्हा सयाजीरावांच्या कृतिशीलतेचे मोठेपण लक्षात येते. सयाजीरावांनी 1897 मध्ये स्वतंत्र शेती खाते सुरू केले. शेतीसाठी पाणी, अवजारांबरोबरच कृषिविषयक प्रगत ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. ‘कृषिकर्मविद्या’ हा 600 पानांचा ग्रंथ 1898 मध्ये प्रकाशित केला. बँक ऑफ बडोदा आणि विविध सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. संस्थानाच्या वतीने 12,000 विहिरी खोदल्या. संस्थान आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त मालकीचा गणदेवी हा आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना 1885 ला सुरू करून भारतात कृषीऔद्योगिक क्रांतीचा पाया घातला. शेती विकासासाठी 42 प्रकारच्या सहकारी संस्थांमार्फत ‘कृषी सहकारा’चा मानदंडही निर्माण केला. हे सर्व प्रयत्न म्हणजे फुल्यांच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाचाच परिपूर्ण विकास आहे. 

फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पाहिलेल्या स्वप्नांचा सयाजीरावांनी फुल्यांच्या कल्पनेपलीकडे विस्तार केल्याचे शेकडो पुरावे मिळतात. धार्मिक विधी, संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद, अस्पृश्यांसह सर्व जातींच्या लोकांना मोफत संस्कृत शिक्षण, पाश्चात्त्य  संस्कृतीचा परिचय करून देणारे ग्रंथ प्रकाशन, ग्रंथालय चळवळ, सक्तीच्या व मोफत शिक्षणाबरोबरच लोकांमध्ये अधिकार व कर्तव्यांबाबत साक्षरता निर्माण करणे, ग्रंथ व वर्तमानपत्रांचे प्रकाशन आणि व्याख्याने या माध्यमातून जनजागृतीचे बहुमूल्य कार्य महाराजांनी सातत्याने केले. हे कार्यसुद्धा फुल्यांच्या अपेक्षित ‘प्रबोधना’चा सकारात्मक विस्तारच आहे. 

फुल्यांचे बडोद्याला 1883 ते 1890 या वर्षांत सातत्याने जाणे-येणे होते. यामध्ये एकदा ते तीन महिने बडोद्यात राहिले होते. धामणस्कर यांच्याकरवी महाराजांनी फुल्यांना 1884 च्या दरम्यान बडोद्याला बोलावले. समाजसुधारणेवर त्यांची दोन-तीन व्याख्याने ठेवली. हेच धामणस्कर पुढे 1901 मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण झाले. नामांकित कंत्राटदार असणारे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू या प्रमुख सत्यशोधक नेत्याला सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामाचे काम दिले. दामोदर सावळाराम यंदे आणि रामजी संतूजी आवटे यांनी 11 ऑक्टोबर 1885 रोजी ‘बडोदा वत्सल’ हे सत्यशोधकी वर्तमानपत्र बडोद्यात सुरू केले, तर 31 नोव्हेंबर 1893 रोजी दामोदर सावळाराम यंदे यांनी ‘श्री सयाजीविजय’ हे नवे साप्ताहिक स्वतंत्रपणे सुरू केले. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात 1885 मध्ये शेटजी- भटजींच्या विरुद्ध सत्यशोधकांच्या ज्या सभा होत त्या वेळी सत्यशोधक समाजातर्फे सयाजीरावांचा सत्कार झाला होता, अशी आठवण सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांनी नोंदवली आहे. या वेळीच सत्यशोधकांच्या काही शाळांमध्ये महाराज उपस्थित राहिले होते. सत्यशोधक समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शाळेला महाराजांनी बरीच वर्षे दरमहा 100 रुपये देणगी दिली. 

रामजी संतूजी आवटे आणि धामणस्करांनी मिळून 1896 च्या दरम्यान बडोद्यात माधवराव पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू केला. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचे ‘क्षत्रिय व त्यांचे अस्तित्व’ हे पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले. दि.17 फेब्रुवारी 1930 रोजी महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही कार्यकर्त्यांची व्याख्याने जनतेसाठी मुद्दाम ठेवली होती. या व्याख्यानांना महाराज स्वत: हजर होते. या वेळी नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून 200 रु. रोख दिले होते. 

मॅक्स मुल्लरने भाषांतरित केलेल्या ‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या मालेत प्रकाशित केलेल्या बारापैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याचे काम सयाजीरावांनी सत्यशोधक विचारधारेच्या केळुसकरांवर सोपवले. हे भाषांतर करत असताना केळुसकरांनी मॅक्स मुल्लरऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांवरून ते केले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळुसकर हे पहिले ब्राह्मणेतर ठरतात. कोल्हापूर संस्थानचे दिवाण भास्करराव जाधव हे सयाजीरावांच्या आश्रयाने सुरू असलेल्या गंगारामभाऊ म्हस्के यांच्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकले. त्यांना सयाजीरावांनी बडोद्यात नोकरीस येण्याची सूचना केली होती. सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील यांनासुद्धा रयत शिक्षण संस्थेची प्रेरणा सयाजीरावांकडून मिळाली होती, हे त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवले आहे. सत्यशोधक जागृतीकार पाळेकर हे बडोद्यात ‘जागृती’ वर्तमानपत्र यशस्वीपणे चालवत होते. 

वरील सर्व नामावली विचारात घेता, फुल्यांच्या सत्यशोधक संस्कारांत घडलेली ही सर्व महत्त्वाची मंडळी सयाजीरावांकडून ‘उपकृत’ झालेली होती. सयाजीरावांनी सर्व विचारधारांना राजाश्रय दिला असला, तरी सत्यशोधक आणि बौद्ध विचाराचे लोक हे सयाजीरावांसाठी सर्वांत जवळचे होते याचे स्पष्ट पुरावे मिळतात. सयाजीरावांच्या एकूण चिंतनात तुलनात्मक विचारपद्धतीला महत्त्वाचे स्थान होते. फुल्यांचा टोकाचा विद्रोह मूलभूत सकारात्मक धर्मसाक्षरतेत रूपांतरित करण्याचे अत्यंत क्रांतिकारक काम सयाजीरावांनी तुलनात्मक धर्मचिंतनाच्या आपल्या व्यासंगातून केले होते. यावर वेळीच प्रकाश पडला असता, तर सत्यशोधक चळवळीचे पुढे फुल्यांनंतर ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर होत असताना झालेले ‘जातीयीकरण’ टाळता आले असते. परिणामी, आज पुरोगामी चळवळीचे काही प्रमाणात झालेले ‘विषारीकरण’ टळले असते. पुरोगामी चळवळ अधिक ‘संवादी’ आणि ‘सकारात्मक’ झाली असती. ती आपल्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ गेली असती. 

फुल्यांच्या मागणीला पुढे नेणारे शैक्षणिक काम सयाजीरावांनी 1882 ला सुरू केले. 1884 ला फुल्यांनी मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्याची  मागणी केली होती. त्याचप्रमाणे बालविवाह करणाऱ्या दोन्ही पक्षांतील पालकांकडून दंड वसूल करावा, आणि हा दंड बहुजनांच्या शिक्षणासाठी खर्च करावा हा मुद्दाही या मागणीत होता. सयाजीरावांनी फुल्यांच्या मागणीनंतर 4 वर्षांनी 14 जुलै 1886 ला सर इलियट यांना लिहिलेल्या पत्रात बालविवाह प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा निश्चय केल्याचे लिहिले आहे. पुढे 1904 मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. हा कायदा फुल्यांच्या मागणीशी सुसंगत होता. पण येथेही महाराजांनी एक पाऊल पुढे टाकले होते. फुल्यांनी बालविवाह करणाऱ्या वधू आणि वर पक्षाला दंड करावा, अशी मागणी केली होती. महाराजांनी मात्र वधू आणि वर पक्षाबरोबर लग्न लावणाऱ्या भटजीलासुद्धा दंड आणि शिक्षेच्या तरतुदीत आणले होते. 50 रु. दंड किंवा 1 महिन्याचा तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरूप होते. पुढे 1937 मध्ये दंडाची रक्कम 50 रु.वरून 100 रु. झाली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयांच्या मूल्यात 1 लाख 57 हजार रु.हून अधिक भरते. 

फुले हे भारतातील पुरोहितशाहीचे सर्वांत ‘कडवे’ विरोधक होते. सयाजीराव मात्र त्यापुढे जाऊन, लग्न लावणाऱ्या भटजीला जेव्हा कायद्याच्या चौकटीत दंड देण्याची तरतूद करतात, तेव्हा ते शिवराय आणि शंभूराजे यांचा पुरोहितशाहीने केलेल्या छळाचा एक प्रकारे ‘सूड’ उगवताना दिसतात. भारतीय धर्मक्रांतीच्या महाचर्चेत सयाजीराव या ‘क्रांतिसूर्या’ला बेदखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हे नवे संशोधन अभ्यासतो, तेव्हा आपली प्रबोधनपरंपरा किती ‘नि:सत्त्व’ झाली आहे याचा साक्षात्कार होतो. सयाजीचिंतन ही आपली तातडीची गरज का आहे, हे समजण्यासाठी एवढी चर्चा पुरेशी आहे. 

पुरोहितशाहीच्या विळख्यात जगातील सर्वच मानवी समाज ‘गुदमरत’ जगत आले आहेत. फुल्यांनी म्हणूनच या पुरोहितशाहीवर घणाघात केले. या पुरोहितशाहीला पर्याय देण्याचा ‘प्रतीकात्मक’ प्रयत्न केला. या प्रयत्नाचाच भाग म्हणून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक विधीसंबंधी मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधींची छोटी पुस्तिका 1887 मध्ये प्रकाशित केली होती. फुल्यांचे हे काम नेमके याच वर्षी 1887 मध्ये ‘नीतिविवाह चंद्रिका’ हा ग्रंथ मराठीत प्रकाशित करून सयाजीराव पुढे व्यापक करताना दिसतात. ‘हे असे का घडले’ याचा शोध घेण्याचे आमच्या ‘महान’ संशोधनपरंपरेने टाळले. यातूनच प्रबोधनपरंपरेचे  आजचे ‘अनर्थ’ घडले. या मालेत पुढे 1903 मध्ये ‘वधुपरीक्षा’, 1904 मध्ये ‘लग्नविधी व सोहळे’ , 1913 मध्ये ‘विवाह-विधीसार’, 1916 मध्ये ‘उपनयन- विधीसार’ पुढे ‘श्राद्ध-विधीसार’, ‘अंत्येष्टी-विधिसार’, ‘दत्तकचंद्रिका’, ‘दानचंद्रिका’ इत्यादी ग्रंथ प्रकाशित करून फुल्यांनी सुरू केलेल्या धर्मचिकित्सेला सयाजीरावांनी सकारात्मक धर्मसाक्षरता अभियानात रूपांतरित केले. 

1896 च्या वेदोक्तानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील 16 संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम रियासतकार सरदेसाईंकडून करून घेतले होते. इतकेच नाही, तर 1905 च्या हिंदू विवाह कायद्यात 1928 मध्ये सुधारणा करून लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात यावे आणि ते भाषांतर वधू-वरांच्या मातृभाषेत लग्न लावणाऱ्या पुरोहिताने वाचून समजावून सांगावे व तसे न केल्यास त्याला 50 रु. दंड करण्याची तरतूद केली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात 1 लाख 30 हजार रु.हून अधिक भरते. 

बडोद्यात 1915 मध्ये लागू झालेला हिंदू पुरोहित कायदा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील अशा प्रकारचा पहिला आणि आजअखेरचा एकमेव कायदा आहे. या कायद्यातील कलमे, डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 1936 च्या जगप्रसिद्ध  Annihilation of Caste या न झालेल्या प्रकाशित भाषणात धर्मसुधारणेचा कार्यक्रम म्हणून जशीच्या तशी दिलेली आहेत, यातच या कायद्याचे वैश्विक ‘अनन्यत्व’ सिद्ध होते. 

महाराजांनी पुजारी आणि पुराणिक यांच्यासाठी परीक्षा घेण्याचा आदेश 1911 मध्ये दिला. नोव्हेंबर 1912 ला या कायद्याच्या अनुषंगाने पहिली पुरोहित परीक्षा घेण्यात आली. दि.22 मे 1913 ला हिंदू पुरोहित बिल प्रसिद्ध झाले. 1913-1914 मध्ये धारा सभेच्या दुसऱ्या सत्रात या बिलावर चर्चा करण्यात आली आणि यावर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला. अशा प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन या कायद्यात दोन वेळा दुरुस्त्या केल्या आणि 30 डिसेंबर 1915 मध्ये हिंदू पुरोहित कायदा बडोदा जिल्ह्यात लागू केला. या कायद्याचा मुख्य उद्देश धार्मिक विधी योग्य पद्धतीने व्हावे आणि त्यांचा खरा अर्थ यजमानांना कळून यजमानांचा पूजेमागील आध्यात्मिक हेतू साध्य व्हावा, हा होता. 

पुढे 14 सप्टेंबर 1934 ला हा कायदा संपूर्ण संस्थानात लागू करण्यात आला. या कायद्यानुसार हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञिक विषयातील किंवा श्रावण मास दक्षिणा परीक्षा यापैकी कोणत्याही परीक्षेत पास झाल्यास किंवा संस्थानाकडून विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या व्यक्तीस संस्थानाकडून परवाना मिळाल्यावरच पौरोहित्याचा अधिकार प्राप्त होत होता. या निकषात न बसणारा पुरोहित धार्मिक विधी करत असल्यास त्याला 25 रु. पर्यंत दंडाची तरतूद होती. पण पुरोहित उपलब्ध नसल्यास सवलत दिली जात होती. तसेच पौरोहित्याचा हक्क प्राप्त झालेल्या पुरोहितास सहा वर्षांतून एकदा पुरोहित परीक्षा पास होणे बंधनकारक होते. ही परीक्षा पास होणाऱ्या सर्व हिंदूंना- मग त्यांची जात कोणतीही असो त्याला- ही परीक्षा पास झाल्यावर पौरोहित्य करता येत होते. ही बाब 2000 वर्षांच्या हिंदू धर्म-संस्कृतीच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती. परंतु हिंदू धर्म अभ्यासाच्या इतिहासात या कायद्यावर एक शब्दही लिहिला गेला नाही. नंतर ही मर्यादा तीन वर्षांवर व शेवटी दर वर्षी परीक्षा पास होऊन परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले. पारंपरिक पुरोहितांना हा कायदा लागू झाल्यानंतर सहा वर्षांच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. 

या कायद्याने स्वातंत्र्यपूर्व काळात पूजा, धार्मिक कार्य करणाऱ्या पुरोहितांसाठी परवानापद्धत सुरू केली. पुरोहितांनी पूजेवेळी केल्या जाणाऱ्या मंत्रपठणातील मंत्राचा अर्थ यजमानांना समजून सांगणे बंधनकारक केले. पुरोहित व्यवसाय वंशपरंपरेऐवजी गुणवत्तेवर असावा, म्हणून परीक्षा-पद्धतीद्वारे ज्ञान तपासण्याची व्यवस्था करून ब्राह्मण जातीची पुरोहित मक्तेदारी नष्ट केली आणि ब्राह्मणेत्तर सर्व हिंदू जातींना पुरोहिताची संधी देऊन जाती-जातीमधील उच्च-नीचपणा कमी केला. धर्म आणि पुरोहित वर्गाचे जगभर वर्चस्व असताना पुरोहितांकडून होणाऱ्या शोषणातून लोकांची मुक्तता करणारा पुरोहित कायदा हा भारतातीलच नव्हे, तर जगातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता जो आजच्या क्रांतिकारक बदलाच्या कालखंडातही भारताला करणे शक्य नाही. 

महात्मा फुल्यांच्या धर्मचिकित्सेची आणि सांस्कृतिक बंडाची तुलना सयाजीरावांच्या फक्त या एका कायद्याशी केली तरी सयाजीरावांचे फुलेविचाराच्या विकासाला असणारे योगदान स्पष्ट होते. फुले आणि सयाजीराव यांनी केलेल्या पुरोहितशाहीच्या ‘शवविच्छेदना’च्या पार्श्वभूमीवर 1907 मध्ये भोर संस्थानात केलेले भाषण महत्त्वाचे आहे. हे भाषण ऐकायला जर फुले हजर असते, तर तेसुद्धा सयाजीरावांपुढे नतमस्तक झाले असते, एवढी रोखठोक भूमिका या भाषणात सयाजीराव घेताना दिसतात. सयाजीरावांनी 8 सप्टेंबर 1907 मध्ये भोर संस्थानाला भेट दिली. त्या वेळी केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, ‘‘ब्राह्मण विद्वान आहेत; पण देशाची सुधारणा होणे अपेक्षित असेल तर ब्राह्मणांच्या विद्वत्तेबरोबर त्यांचे विचारही सुधारले पाहिजेत. ब्राह्मण-भिक्षुकवर्ग यांचे कर्तव्य किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा; परंतु ते आपल्यावरील जबाबदारी ओळखीत नाहीत, ही गोष्ट फार वाईट आहे. मी खरे आहे ते बोलतो याचा कोणी राग मानू नये. बैलावर साखरेची अगर मातीची गोणी घातली तरी त्याला सारखीच, त्याप्रमाणे भिक्षुकवर्गाची स्थिती झाली आहे. भिक्षुकांचे नुसते पोपटपंचीचे ज्ञान बिलकुल उपयोगाचे नाही. असा श्रेष्ठ वर्ग जर अडाणी राहिला, तर देशाचे कोणत्याही प्रकारे कल्याण होणार नाही. सुशिक्षित शास्त्री संस्कृत पाठ म्हणू शकतात; परंतु मातृभाषेत आपले विचार त्यास सांगता येत नाहीत. धर्माचा उपदेश देणारे लोक चांगले समजदार असले पाहिजेत. जुने रिवाज मोडणे शक्य व कायदेशीर असेल, तर राजाने धैर्याने त्यांत फेरफार केला पाहिजे.’’ सयाजीरावांचे हे भाषण वाचत असताना तुकाराम महाराजांच्या ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा॥’ या ओळींची आठवण होते. 

पक्षाघाताच्या पहिल्या आजारपणात उपचारासाठी सयाजीरावांनी फुल्यांना आर्थिक मदत केली. या आजारात उजवा हात पक्षाघाताने निकामी झाल्यामुळे फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा महत्त्वाचा ग्रंथ डाव्या हाताने लिहिला! या ग्रंथाच्या शेवटी या आजारपणातून वाचण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक अखंड फुल्यांनी लिहिला आहे. त्या अखंडाच्या पहिल्या दोन ओळी महत्त्वाच्या आहेत. या अखंडाची सुरुवातच सयाजीरावांच्या उल्लेखाने झाली आहे. त्या ओळी पुढीलप्रमाणे - गायक्वाडी आश्रय, घोल्याची नजर ॥ 
होती अनिवार ॥ फी न घेतां ॥1॥ गा.॥ धृ.॥ 
दुष्ट रोगांतून फुल्या वांचविला ॥ आनंदी पत्नीला ॥ केली ज्याच्या ॥2॥ 

महात्मा फुल्यांची सर्वांत महत्त्वाची लेखनकृती असणाऱ्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाच्या शेवटी सयाजीरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना महाराजांचा उल्लेख फुले ‘सदसद्‌विचारसंपन्न’ असा करतात. यावरून फुल्यांच्या जीवनात सयाजीरावांचे स्थान काय होते, हे लक्षात येते. 

फुल्यांच्या मृत्यूनंतर (1890) सावित्रीबाई आणि यशवंत यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागत होते. मामा परमानंदांच्या विनंतीवरून महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी धामणस्करांच्या हस्ते एक हजार रुपयांचा चेक पाठवून दिला- असे धामणस्करांनी मामांना लिहिलेल्या 10-2-1892 च्या पत्रावरून कळते. हा चेक मामांचे स्नेही तुकाराम तात्या भागीदार असणाऱ्या एस.नारायण कंपनीत ठेवून त्या रकमेच्या व्याजातून दर तिमाहीस सावित्रीबाना 50 रु. मदत मिळण्याची व्यवस्था झाली. या ठेवीची पावती सावित्रीबाईंकडे ठेवण्याचा हुकूम महाराजांनी धामणस्करांना दिल्याप्रमाणे रजिस्टर पत्राने ती सावित्रीबाईंकडे पाठवण्यात आली. 

फुल्यांच्या मृत्यूनंतर बडोद्यातील ‘बडोदावत्सल’ या सत्यशोधकी विचाराच्या साप्ताहिकाने 7 डिसेंबर 1890 मध्ये लिहिलेल्या मृत्युलेखात फुल्यांचे समग्र वाङ्‌मय प्रकाशित करण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. पुढे 79 वर्षांनी 1969 मध्ये महाराष्ट्र शासनाने फुल्यांचे समग्र वाड्‌मय प्रकाशित केले. 1892 मध्ये ‘बडोदा वत्सल’ने सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह प्रकाशित केला. फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक झाल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची सयाजीरावांनी तयारी दर्शवली होती, परंतु तसे प्रयत्न न झाल्याने तो विषय तेथेच थांबला. पुढे ‘सत्यप्रकाश’ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र प्रकाशित करण्याची योजना पुढे आल्यानंतर त्याला मदत करण्याची भूमिका सयाजीरावांनी घेतली होती. 

ज्याप्रमाणे निरक्षर सावित्रीबाईंना महात्मा फुल्यांनी शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून तयार केले, त्याचप्रमाणे सयाजीरावांनी त्यांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई- ज्या विवाहापर्यंत निरक्षर होत्या- यांना शिक्षण दिले. पुढे चिमणाबाईंनी 1911 मध्ये The Position of Women In Indian Life हा संशोधनात्मक ग्रंथ इंग्रजीत लिहिला, जो लंडनमधून प्रकाशित झाला. विशेष म्हणजे सर्व खंडांतील   स्त्रियांच्या दर्जाचा प्रत्यक्ष फिरून व 100 संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिला गेलेला तो जगातील आजअखेरचा एकमेव ग्रंथ आहे. फुले सयाजीरावांना आपला आदर्श मानत होते, तर सयाजीराव आपल्या सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या धोरणांमध्ये कौशल्याने आणि कोणताही गाजावाजा न करता ‘फुलेविचार’ विकसित करून पेरत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, फुले विचाराबाबतची सयाजीरावांची कृतिशीलता अतिशय लक्षणीय आहे. 

जोतिबा फुले यांचा उल्लेख सयाजीराव महाराज नेहमी ‘महात्मा’ असा करत. महाराजांनी 1888 मध्ये केलेल्या सूचनेनुसार मुंबईमधील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी जोतिरावांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण केली. सयाजीरावांबद्दल महात्मा फुल्यांना असणारा आदर फुल्यांनी एक अखंड लिहून व्यक्त केला. हा अखंड त्या वेळी दीनबंधू वर्तमानपत्रात प्रकाशित झाला होता. फुल्यांनी पत्राद्वारे मागणी करून सयाजीरावांचा फोटो हवा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महाराजांनी आपला राजवेषातील फोटो फुल्यांना पाठवला. परंतु त्याऐवजी साध्या वेशातील फोटो मागवून तो फुल्यांनी त्यांच्या बैठकीच्या खोलीत लावला होता. महात्मा फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो आपल्या बैठकीच्या खोलीत लावणे यातच पुरोगामी महाराष्ट्राचा ‘खरा’ इतिहास लपला आहे. महाराष्ट्र जेवढ्या लवकर हे वास्तव स्वीकारेल, तेवढे ते महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी पोषक ठरेल. 

हा सर्व इतिहास जाणून घेताना होणाऱ्या आनंदापेक्षा होणाऱ्या वेदनाच ‘भयंकर’ आहेत. कारण गेली 60 वर्षे फुले नावाच्या ‘खळ्या’भोवती ‘रिंगण’ घालण्यातच आम्ही धन्यता मानली. फुलेविचाराचा गाभा असणाऱ्या या ‘मूळ’ खळ्यापर्यंत मात्र आम्ही पोहोचलोच नाही. परिणामी, फुल्यांच्या विचाराला कृतिशील करणारे सयाजीराव आमच्यासाठी अज्ञात राहिले. फुलेविचारांतील कालबाह्य घटकांना पर्याय देऊ शकणारे सयाजीचिंतन ‘जोडून’ घेण्याची प्रक्रिया आम्ही स्वीकारली नाही. फुलेविचार म्हणजे ‘संकटकाळी बाहेर पडण्याचा रस्ता’ अशी ‘तात्पुरती सोय’ म्हणून आम्ही स्वीकारला. फुले अभ्यासकांचा श्रेष्ठत्व गंडाने ‘पछाडलेला’ आत्मकेंद्री ‘अहंकार’ जोपासण्यासाठी फुलेविचारप्रवाह संकुचित केला गेला. त्यातून त्याला साठलेपण आले. हे साठलेपणच त्याला निस्तेज करण्यास कारणीभूत झाले. 

अपवाद फक्त कॉ.शरद पाटलांचा. कॉ.पाटलांनी मुख्यतः फुल्यांच्या तत्त्वचिंतनातील काळ आणि ज्ञानाच्या मर्यादा निर्भीडपणे पुढे आणून ‘कालबाह्य फुले सोडण्याची आणि कालसुसंगत फुल्यांचा विकास करण्याची’ भूमिका घेत फुल्यांच्या तत्त्वज्ञानाला जात व स्त्रीदास्यांतक भूमिकेतून ‘अद्ययावत’ केले. आपल्या उर्वरित ‘पुरोगामी’ अभ्यासपरंपरेने मात्र वि.का. राजवाडेंचा आदर्श प्रमाणभूत मानला. वि.का. राजवाडेंनी ब्राह्मणजातीला अडचणीचे ठरणारे कागद खाऊन टाकण्याची ‘किमया’ केली होती. अशी किमया करणारे ‘किमयागार’ ब्राह्मणी परंपरेपेक्षा पुरोगामी परंपरेतच जास्त आहेत, हे सयाजीरावांचा इतिहास जसजसा पुढे येईल तसतसे अधिक ठळकपणे स्पष्ट होत जाईल. 

कारण फुले-शाहू-आंबेडकरी संशोधनात महापुरुषांच्या मर्यादा झाकण्याचा आटापिटा करणारे संशोधक अधिक संख्येने सापडतात. आपल्या या पुरोगामी संशोधनपरंपरेने बहुजनांचे जेवढे नुकसान केले, तेवढे अडीच हजार वर्षांच्या ब्राह्मणी परंपरेनेही केले नाही. ‘हा इतिहास कोणासाठी गौरवशाली आहे?’ या प्रश्नाचे उत्तर आता महाराष्ट्राला शोधावे लागेल. फुले जयंतीच्या निमित्ताने या चिंतनाचे ‘खडतर’ व्रत स्वीकारण्याची प्रेरणा सयाजीरावांच्या निमित्ताने नव्या पिढीला मिळाली, तर पुरोगामी महापुरुषांच्या ‘स्वप्नपूर्ती’कडे टाकलेले ते एक ‘क्रांतिकारक’ पाऊल ठरेल. 

(येत्या 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची 196 वी जयंती येत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे सयाजीराव महाराजांशी असलेले वैचारिक व कृतिशील नाते अधोरेखित करणारा हा संशोधन लेख प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)  

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिनेश पाटील
dineshpatil1942@gmail.com

समाजशास्त्र विभाग प्रमुख- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर


Comments

  1. Dinesh Jadhav- 22 Apr 2021

    Very nice research and thanks shri.Dinesh Patil for putting valuable evidence in front of people.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके