डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

पाण्याच्या प्रेमात पडलेला मुलगा : चित्रेश तथा (तामिळनाडू)

चित्रेश रोज सहा तास नौकानयनाचा सराव करू लागला. एशियन गेम्सबद्दल चित्रेश ऐकून होता. आपण एशियन गेम्समध्ये भारताला घेऊन जायला हवे, असे त्याला वाटू लागले आणि त्याने त्यानुसार सराव सुरू केला. 2014 मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये बारा वर्षांचा चित्रेश भारताचा सर्वांत लहान नाविक ठरला आणि ‘द एंगेस्ट सेलर ऑफ इंडिया’ अशी त्याची स्वतःची एक ओळख निर्माण झाली.

आपण सर्वांनीच कधी ना कधी पावसाळ्यात कागदाची होडी बनवली असेल. आपण बनवलेली होडी पावसाच्या पाण्यात सोडल्यावर तिला त्यात वाहताना पाहून मनात अनेक विचारही येऊन गेले असतील. काहींच्या मनात तर असाही विचार येऊन गेला असेल की, आपल्याला एखाद्या होडीत बसून समुद्रात सफर करता आली तर!

प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येऊन गेलेली ही कल्पना तमिळनाडूमधील एका लहान मुलाने त्याच्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या अर्थाने कृतीत उतरवली आहे. त्या मुलाचं नाव चित्रेश तथा!

चित्रेशचा जन्म 30 ऑक्टोबर 2001 रोजी झाला. तो तमिळनाडूमधील चेन्नई शहरात राहतो. भारताच्या नकाशात अगदी खालच्या टोकाला असलेल्या तमिळनाडू राज्याच्या एकूण 14 जिल्ह्यांना तब्बल 1076 किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी आहे. सर्वांत मोठी किनारपट्टी असलेल्या राज्यांच्या यादीत गुजरातनंतर तमिळनाडूचा क्रमांक लागतो. बंगालच्या उपसागराला लागून असलेले हे राज्य समुद्री व्यापार, मासेमारी आणि शेती, बंदरे, समुद्रकिनारे पर्यटन इत्यादी गोष्टींबरोबरच वॉटर स्पोटर्‌ससाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.

अशा वातावरणात वाढलेला चित्रेश मात्र पाण्याला प्रचंड घाबरायचा! त्याला समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याचीसुद्धा भीती वाटायची. त्याच्या वडिलांचा लहानसा व्यापार आहे आणि त्याची आई गृहिणी आहे. एके दिवशी चित्रेशची मोठी बहीण मेघना हिने वृत्तपत्रात एक बातमी वाचली. त्यात असे लिहिले होते की, तमिळनाडू सेलिंग असोसिएशन (TNSA)तर्फे नौकानयनाचे (नौका चालवण्याचे) प्रशिक्षण देणारे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तिला ही कल्पना फारच आवडली आणि म्हणून तिने त्यात सहभागी होण्याचे ठरवले. वेगळं काही तरी शिकते आहे म्हणून तिच्या आई-वडिलांनीही तिला पाठिंबा दिला. आठ वर्षांचा चित्रेश आपल्या वडिलांबरोबर मेघनाचा सराव बघण्यासाठी जायचा. तिला सराव करताना बघून त्याच्या मनात भीती आणि मजा अशा दोन्ही भावना यायच्या. सराव बघण्यासाठीसुद्धा लाईफ जॅकेट घालूनच बोर्डवर उभे राहायला लागायचं.

एके दिवशी तो बोर्डच्या कोपऱ्यावर उभा राहून बहिणीचा सराव बघत असताना तिथल्या ट्रेनरने त्याला हळूच पाण्यात ढकलले. पाण्यात पडल्याबरोबर चित्रेश घाबरला आणि ओरडायला लागला. त्याला वाटले, आता आपण मेलो!! मात्र त्याच्या आजूबाजूला दिसत असलेले ट्रेनर आणि त्याचे वडील हाताची घडी घालून शांतपणे उभे होते. हे बघून त्याला आणखीनच भीती वाटली. काही काळ ओरडून झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपल्या अंगात असलेल्या लाईफ जॅकेटमुळे आपण पाण्यावरच तरंगत आहोत. मग तो थोडा शांत झाला आणि त्याने पुन्हा इकडे-तिकडे पाहिलं. लाईफ जॅकेटमुळे आपण बुडणार नाही, हे पूर्णपणे पटल्यावर मात्र त्याला पाण्यात किंचित मजा वाटायला लागली. थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर त्याला ट्रेनरने विचारले, ‘‘तुला या शिबिरात सहभागी व्हायचे आहे का?’’ त्यावर तो ‘हो’ म्हणाला ...आणि त्या दिवशी तमिळनाडू सेलिंग असोसिएशनमध्ये मिळालेला हा अनुभव पुढे त्याला इंग्लंड, मलेशिया, टर्की, आयर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, माल्टा, दक्षिण कोरिया इत्यादी नवनवीन देशांची सफर करायला घेऊन गेला!

सन 2009 पासून चित्रेशचे नौकानयनाचे प्रशिक्षण सुरू झाले, तेव्हा तो आठ वर्षांचा होता. या प्रशिक्षणात- नौकानयनाचा अभ्यास करताना त्याने अनेक नवीन गोष्टी अनुभवल्या उदा. रीग्गिंग- म्हणजे नौकेच्या पालाला दोरी कशी बांधतात, त्यामागचे विज्ञान कसे आहे आणि त्याचे तंत्र काय आहे, याचे शिक्षण त्याने घेतले. त्याचबरोबर मॅनोवर म्हणजे वारा किंवा लाटांमुळे अचानक उद्‌भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारे कौशल्य आणि विविध युक्त्या याबद्दलही त्याचा अभ्यास सुरू झाला. जसा काळ लोटत गेला तशी त्याच्या प्रशिक्षणाची लेव्हलसुद्धा कठीण होत गेली. इतर प्राथमिक कौशल्यांसोबत त्याने नौकेचे पथ-निर्देशन कसे करावे, नौका रिव्हर्स म्हणजे मागच्या दिशेला कशी चालवावी, रुडरच्या (नौकेची दिशा नियंत्रित करणारा कर्ण) नियंत्रणावर प्रभुत्व मिळवणे आणि अँकरिंग (नौका पुढे जाऊ नये म्हणून पाण्यात सोडलेला अवजड धातूचा तुकडा) याचा योग्य वेळी वापर करणे, इत्यादी गोष्टींचा सराव सुरू केला.

महत्त्वाचे प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारा सराव पूर्ण केल्यानंतर, 2013 मध्ये बारा वर्षांखालील वयोगटांमध्ये इंडियन इंटरनॅशनल रेगाटा या स्पर्धेत चित्रेशने सुवर्णपदक मिळवले. यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. आता त्याला त्यांची नौका घेऊन पाण्यावर सफर करण्यात मजा वाटायला लागली होती. मग तो रोज सहा तास नौकानयनाचा सराव करू लागला. एशियन गेम्सबद्दल तो ऐकून होता. त्यामुळे आपण एशियन गेम्समध्ये भारताला घेऊन जायला हवे, असे त्याला वाटू लागले आणि त्याने त्यानुसार सराव सुरू केला. 2014 मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये बारा वर्षांचा चित्रेश भारताचा सर्वांत लहान नाविक ठरला आणि ‘द एंगेस्ट सेलर ऑफ इंडिया’ अशी त्याची स्वतःची ओळख निर्माण झाली.

लहान आकाराची, सिंगल-हँडेड नौका चालविणाऱ्या ‘ऑप्टिमिस्ट’ गटातून तो खेळला होता. या गटात केवळ पंधरा वर्षे वयापर्यंतच्या खेळाडूंना खेळता येते. वजन आणि इतर फिटनेस लक्षात घेतल्यानंतर या वयोगटातील मुलांना ही नौका चालवण्याची परवानगी दिली जाते. हा एक लोकप्रिय गट म्हणून ओळखला जातो, या गटातून दीड लाखाहून अधिक नौका रजिस्टर्ड आहेत! (नौकायानाच्या स्पर्धांना ‘रेगाटा’ असे संबोधले जाते).

पुढच्या स्पर्धांदरम्यान त्याचे दहावीचे वर्ष होते. भारतीय विद्याभवनच्या राजाजी विद्याश्रम शाळेत शिकणाऱ्या चित्रेशला त्याच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी खूप सहकार्य केले. सरावावेळी त्याची शाळा बुडायची आणि स्पर्धा संपल्यानंतरच्या वेळेत तो राहिलेला अभ्यास करायचा. शाळेतून आणि घरातून मिळालेल्या सहकार्यामुळे त्याला सरावावर लक्ष केंद्रित करता यायचे. 

नौकानयनामुळे चित्रेशमध्ये अनेक चांगले बदल घडले- उदा.- त्याचे काँसेंट्रेशन वाढले. कारण नौकानयनात वारा, पाण्याच्या लाटा, आपले शरीर आणि आपली नौका या सगळ्यांकडे एकाच वेळी लक्ष ठेवावे लागते. त्याची प्रकृती सुदृढ झाली आहे, कारण खेळासाठी लागणारा व्यायाम आणि सराव यामुळे त्याच्या शरीराला शिस्त लागली. विविध देशांत स्पर्धेसाठी जायला मिळाल्याने त्याच्या वागण्या-बोलण्यात प्रगल्भता आली. कुमारवयातील बहुतांश मुलांप्रमाणे चित्रेशचे स्वप्न सतत बदलले नाही. तो त्याच्या ध्येयावर लहानपणापासूनच ठाम होता आणि आजही आहे! 2013 पासून ते आजपर्यंत नॅशनल सेलर म्हणून तो खेळत आहे. 

आता चित्रेश अठरा वर्षांचा आहे. तो अजूनही नौकानयनचा सराव करत असतो, मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून त्याचा सराव थांबलेला आहे. आपले शालेय शिक्षण पूर्ण करून आता तो वाणिज्य शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याची बहीण मेघना एका कंपनीत नोकरी करते आणि वेळ मिळेल तेव्हा नौकानयनसुद्धा करते. इतर महाविद्यालयीन मुलांच्या तुलनेत चित्रेशचे विचार फारच प्रगल्भ आहेत असे दिसते.

‘‘पाच-सहा बातम्या जर सोडल्या तर तुझ्याबद्दल इंटरनेटवर काहीही माहिती उपलब्ध नाही. आणि फेसबुक, इंस्टाग्राम, टि्वटर किंवा स्वतःची वेबसाईट अशा कुठल्याही सोशल मीडियावर तू नाहीस. याचं नेमकं कारण काय?’’ असे विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘‘अनुभव घेण्यावर माझा जास्त विश्वास आहे. मी जे काही करतो, त्यात मनाने पूर्ण उतरलेला असतो आणि मला त्यातून खूप आनंद मिळतो. नौकानयन किंवा इतर कुठल्याही गोष्टी मी कुणालाही दाखवण्यासाठी करत नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी आणि अनुभवासाठी करतो. त्यामुळे माझ्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टी सोशल मीडियावर टाकाव्या याची मला अजून तरी गरज वाटली नव्हती, म्हणून मी कोणत्याही सोशल मीडियावर नाही. व्हर्च्युअल आयुष्यापेक्षा मला खरेखुरे अनुभव जास्त भावतात. मात्र असे जरी असले, तरी अजून एक गोष्ट मला इथे शेअर करणे आवश्यक वाटते. ती म्हणजे- सोशल मीडियावर नसल्यामुळे मला काही अडथळ्यांनाही सामोरे जावे लागते आहे. उदा. मला फंडिंग मिळायला त्रास होतो आहे. ट्रेनिंगच्या फंडिंगसाठी खूप स्ट्रगल करतो आहे. नौकानयन खेळातल्या प्रेझेंटेशन बरोबरच माझ्या खेळातील कामगिरीबद्दलचे प्रेझेंटेशनसुद्धा करता येण्याची गरज आता मला वाटते.’’

चित्रेश मितभाषी असला तरी त्याच्या आवाजात ठामपणा आहे. प्रशिक्षक त्याच्याबद्दल अगदी कौतुकाने आणि आदराने सांगतात की- तो लहानपणापासूनच मेहनती आहे आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी जे काही लागतं, ते सर्व शिकण्याची त्याची पूर्ण तयारी असते. पाण्याशी त्याचं एक घट्ट नातं तयार झालेलं आहे. लहान वयापासून मिळालेले एक्स्पोझर आणि अनुभवांमुळे त्याच्या वागण्या-बोलण्यात प्रगल्भता व नम्रता दोन्ही आहेत, यात शंका नाही. 

लॉकडाऊननंतर  आता  विशेष काळजी घेऊन विविध खेळांसाठी परवानगी मिळालेली असल्याने, सराव पुन्हा सुरू करून नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईत होणाऱ्या नॅशनल रेगाटा स्पर्धेत चित्रेश आपली नौका घेऊन उतरणार आहे. ऑलिम्पिकमध्ये नौकायानासाठी भारताचे नेतृत्व करण्याचीसुद्धा त्याची इच्छा आहे.

‘‘तू बारा वर्षांचा असताना नौकानयनसाठी भारताला एशियन गेम्सपर्यंत घेऊन गेलास. तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन म्हणून मान मिळवलास. त्याचबरोबर नौकानयनातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सिल्व्हर आणि गोल्ड मेडल्सचा मानकरी ठरलास. 2009 पासून सुरू झालेल्या या क्षेत्रातील तुझ्या अनुभवाचा कालखंड आता बारा वर्षांचा होतो आहे! अशा वेळी इतर मुलांना काय सांगशील?’’ असे विचारल्यानंतर चित्रेश म्हणाला, ‘‘मला असं वाटतं की, मी जे काही काम केलं त्यापेक्षाही अधिक वाखाणण्याजोगी कामं माझ्या सिनिअर खेळाडूंनी केलेली आहेत. माझ्या या प्रवासाबद्दल माझ्या बहिणीचे आणि माझ्या प्रशिक्षकांचे आभार मानतो.  बहिणीने मला या अद्‌भुत अनुभवापर्यंत पोहोचवले आणि प्रशिक्षकांनी पुढच्या प्रवासात मार्गदर्शन केले, अजूनही करत आहेत.  माझे आई-वडील आणि माझे शिक्षक हे तर माझ्या आयुष्यातले लाईट हाऊस आहेत. ते एका ठिकाणी शांतपणे उभे राहून माझ्याकडे लक्ष देतात, माझी काळजी घेतात आणि वेळोवेळी मला सावधही करतात. मी या सगळ्यांचा कृतज्ञ आहे.

या क्षणी मला जर कुणाला काही सांगायचे असेल, तर असे म्हणेन की- तुम्हाला जे करायला आवडतं, ते आवर्जून करायला पाहिजे. या प्रवासात ज्या कुठल्या गोष्टींची भीती वाटेल, त्या गोष्टी तर करूनच बघायलाच पाहिजेत. असे केल्याने आपली भीती कमी होते आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये हळूहळू मजासुद्धा वाटू लागते. हे सोपे नाही याची मला कल्पना आहे. पण कठीण गोष्टी करण्यातसुद्धा मजा असते, हे मी आतापर्यंतच्या अनुभवावरून सांगू शकतो. मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची. मात्र जेव्हा मी त्या भीतीच्या पलीकडे गेलो, तेव्हा  पाण्याच्या प्रेमात पडलो आणि मग माझ्यासाठी जगातील समुद्र सफर करण्यासाठी खुले झाले!’’

Tags: दिपाली अवकाळे चित्रेश तथा पाण्याच्या प्रेमात पडलेला मुलगा तामिळनाडू tamilnadu chitresh tatha dipali awkale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिपाली अवकाळे,  पुणे
deepaliawkale.25@gmail.com

संचालिका, स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट प्रा. लि.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात