डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : किल्ला (मराठी, महाराष्ट्र)

या सिनेमात आई आणि मुलाच्या नात्याव्यतिरिक्त शाळेतील मुला-मुलांमधील मैत्रीचे नाते अनुभवायला मिळते. एकीकडे शिस्तीत शर्ट इन करणारा, तेल लावून केसांचा नीट भांग पाडणारा, कमी बोलणारा आणि अभ्यासात विशेषतः दैनंदिन जीवनात महत्त्व असलेल्या गणित या विषयात अधिक लक्ष घालणारा चिन्मय आणि दुसरीकडे कुत्र्यांची मस्करी करणारी, वर्गात कमी लक्ष असणारी, बंडखोर असणारी आणि बिनधास्तपणे आयुष्य अनुभवणारी बंड्या आणि गँग! 

सिनेमा सुरू होतो आणि आपल्या डोळ्यांसमोर नारळाच्या उंच झाडांमधून समुद्राकडे जाणारी एक पायवाट दिसते. त्या पायवाटेवरून कॅमेरा हळूहळू पुढे सरकत असताना कोसळणाऱ्या पावसाचा व समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. जणू काही अपरिचित असलेल्या या ठिकाणी कुणीतरी हळूहळू चालत जात असावे. काही मिनिटांनंतर राखाडी रंगाच्या आकाशाखाली असलेल्या अंधारलेल्या वातावरणात समुद्रकिनाऱ्यावर एक दहा-बारा वर्षांचा मुलगा उभा असलेला दिसतो. पुढे काही मिनिटांनंतर पावसात चिंब भिजलेला हा मुलगा एका कौलारू घरात शिरतो. तितक्यात हातात छत्री आणि खांद्यावर पर्स घेतलेली त्याची आई त्या घराच्या गेटमधून आत येते. त्या दोघांमध्ये घडलेल्या संवादातून आपल्या लक्षात येते की, नुकतेच या मुलाच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि आईच्या सरकारी नोकरीच्या बदलीमुळे अचानक पुणे शहरातून कोकणातील एका खेडेगावात यायला लागल्याने हा मुलगा अस्वस्थ झालेला आहे. इथूनच सिनेमा सुरू होतो...

जून 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किल्ला’ या मराठी सिनेमाची ही गोष्ट. आपल्या मुलाचा एकट्याने सांभाळ करणारी आई- अरुणा (कलाकार- अमृता सुभाष), सरकारी नोकरीत तिची नेहमी होणारी बदली आणि त्यातून होणाऱ्या बदलांसोबत स्वत:ला जुळवू पाहणारा तिचा मुलगा- चिन्मय (कलाकार अर्चित देवधर) यांची ही कथा आहे. सिनेमाचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांची सतत बदली व्हायची. यादरम्यान त्यांनी अनेक वेळा अस्वस्थता, भीती, राग, एकटेपणा आणि आपल्याला कुणी समजून घेत नसल्याची भावना यांचा सामना केला होता. आज अपण मोठे झालो असलो तरीसुद्धा आपल्या मनातील लहानपणातले काही प्रसंग आणि आठवणी पुसल्या जात नाहीत, असे त्यांच्या लक्षात आले. हे अनुभव सिनेमात उतरवायला हवेत असे त्यांना वाटले आणि ‘किल्ला’ हा सिनेमा बनवण्याचा प्रवास सुरू झाला.

‘किल्ला’ या सिनेमाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यातला एक विशेष वाटणारा पुरस्कार म्हणजे- बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 2014 मध्ये, ‘जनरेशन के प्लस’ या कॅटेगरीत मिळालेला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार’! या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बालचित्रपट या कॅटेगरीचे परीक्षक 11 ते 14 वर्षे वयोगटातील मुले असतात. सिनेमाच्या कथेतील पात्रांच्या समवयस्क असलेल्या मुलांकडून ‘किल्ला’ला उत्कृष्ट सिनेमा असा पुरस्कार मिळणे, याहून सिनेमाच्या यशाची मोठी पावती काय असू शकते!

एका मुलाखतीत अविनाश अरुण यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की- या सिनेमात लहान मुले अभिनय करीत असली तरी हा सिनेमा केवळ बालचित्रपट नाही, कारण या सिनेमाला एक प्रगल्भ थीम आहे. तुम्हांला नाही का वाटत की, या सिनेमाला तुम्ही थोडे कमी प्रगल्भ केले असते तर मुलांनाही हा सिनेमा एन्जॉय करता आला असता? यावर त्यांनी असे उत्तर दिले की- ‘‘मला नाही वाटत, मुले प्रगल्भ नसतात! किंबहुना मोठ्यांच्या तुलनेत मुलांना किती तरी प्रगल्भतेने भावना आणि विचार समजतात. कदाचित त्यांना ते योग्य शब्दांत व्यक्त करता येत नसावं. मात्र त्यांना जाणवत नाही असं अजिबात नाही. कधी कधी मोठ्यांना सिनेमातल्या सीनमधले शब्द जास्त समजतात, पण मुलांना त्या सीनमधल्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या मूळ भावना समजतात, असा माझा विश्वास आहे आणि याच विश्वासातून मी ‘किल्ला’ हा सिनेमा बनवला आहे.’’

1991 ची ही गोष्ट. अकरा वर्षांचा, सातवीत शिकणारा, नुकताच पुण्याच्या शाळेतून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेडेगावात आलेला चिन्मय हा मुळातच एक गुणी, समजूतदार आणि शांत स्वभावाचा मुलगा असतो. आईच्या बदलीमुळे त्याच्यासमोर आलेला हा नवीन बदल स्वीकारणे त्याला कठीण जाते. कोकणातील खेडेगावातील वातावरण, रस्ते, जेवण, शाळा आणि तिथले विद्यार्थी हे सर्वच त्याच्यासाठी अपरिचित असते. अशा परिस्थितीत तो काय करतो? त्या शाळेत त्याचे कुणी मित्र होतात की नाही? त्याला तिथे रमायला कुठल्या गोष्टी मदत करतात? या सर्व गोष्टी सिनेमात पाहायला मिळतात. चिन्मय ज्या वयात आहे त्या वयातील मुले कोणकोणत्या मिश्र भावनांतून जात असतात? त्यांच्या मानसिक गरजा नेमक्या काय असतात? शांत आणि गुणी असलेला मुलगा अचानक चिडचिड का करायला लागतो? शाळेतला एखाद-दुसरा विद्यार्थी इतका बंडखोर का असतो? निसर्गात मोकळेपणाने फिरायला मिळाल्याने आपल्यामध्ये काही बदल होऊ शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘किल्ला’ या सिनेमात मिळतात.

या सिनेमाच्या तीन विशेष गोष्टी म्हणजे, एक- सिनेमॅटोग्राफी (शूटिंगसाठी कॅमेऱ्याचा केलेला योग्य वापर), दोन- सिनेमातील कलाकारांचा विशेषतः बालकलाकारांचा अभिनय आणि तीन- सिनेमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दाखवल्या गेलेल्या मुलांच्या विश्वातील लहानमोठ्या घटना व प्रक्रिया. या तीनही गोष्टींमुळे हा सिनेमा जवळचा वाटू शकतो. किती जवळचा? तर- लहान मुलांनी जर हा सिनेमा पाहिला तर त्यांना ‘आपल्या भावविश्वाला कोणीतरी मनापासून आणि आदरपूर्वक समजून घेतले आहे’, असे वाटेल आणि मोठ्यांनी हा सिनेमा पाहिला तर त्यांना त्यांच्या बालपणात जाण्याची संधी तर मिळेलच; पण त्याचबरोबर बालपणात घडलेल्या काही अनुभवांमुळे मनात अडकून राहिलेल्या भावनांना कदाचित व्यक्त व्हायला आणि पूर्णत्व यायला मदत मिळू शकेल.

पालक आणि मुलांचं नातं, विशेषतः आई आणि मुलाचं नातं, याबद्दल हा सिनेमा अगदी खऱ्याखुऱ्या गोष्टी आपल्याला सांगतो. आई आणि मुलं यांचं नातं केवळ गोड-गोड आणि खाण्या-पिण्यापुरतं मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि वैचारिक पैलू आहेत, हे स्वीकारायला या सिनेमामुळे आपल्याला मदत होते.

आई आणि मूल यांच्यात केवळ मातृत्वाचं नाही तर माणूसपणाचं नातंसुद्धा असतं हे सत्य हा सिनेमा मांडतो. माणूसपणाचं नातं म्हणजे - आपली आईसुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिच्यासमोर काही अपरिहार्य जबाबदाऱ्या आहेत ज्या पूर्ण करण्याशिवाय तिला गत्यंतर नाही. तिला शक्य आहे तेवढी आपल्या मुलाची काळजी घेऊन त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा, तीसुद्धा केवळ प्रयत्नच करत असते. ती वयाने आपल्यापेक्षा मोठी आहे म्हणून तिच्याकडे सगळ्यांच प्रश्नांची यथायोग्य उत्तरे असायलाच हवीत अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे, हे चिन्मयला काही काळ स्वीकारता येत नाही. त्याचबरोबर आपण आणि आपला मुलगा एखाद्या बदलातून जात असताना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याला आपल्यापेक्षा वेगळ्या भावना वाटू शकतात, त्या भावनिक घुसळणीतून तोसुद्धा त्याच्या-त्याच्या पद्धतीने प्रगल्भ होऊ शकतो हा विश्वास अरुणाला वाटायला काही काळ जावा लागतो. त्यामुळे, ‘लहान मुलांना कळत नाही’ किंवा ‘मोठ्यांना सगळं कळतं’ असे दोन्ही गैरसमज दूर होण्यासाठी हा सिनेमा खूप मदतीचा ठरतो.

या सिनेमात आई आणि मुलाच्या नात्याव्यतिरिक्त शाळेतील मुला-मुलांमधील मैत्रीचे नाते अनुभवायला मिळते. एकीकडे शिस्तीत शर्ट इन करणारा, तेल लावून केसांचा नीट भांग पाडणारा, कमी बोलणारा आणि अभ्यासात विशेषतः दैनंदिन जीवनात महत्त्व असलेल्या गणित या विषयात अधिक लक्ष घालणारा चिन्मय आणि दुसरीकडे कुत्र्यांची मस्करी करणारी, वर्गात कमी लक्ष असणारी, बंडखोर असणारी आणि बिनधास्तपणे आयुष्य अनुभवणारी बंड्या आणि गँग! आपल्यालाही यांनी त्यांच्यात सामील करून घ्यायला हवे या भावनेतून आणि या नवीन ठिकाणी ‘आपलेपणा’ वाटण्याच्या गरजेतून चिन्मय त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन या गँगसोबत अनेक लहानमोठे उद्योग करतो.

अकरा-बारा वर्षांची मुले एकत्र आल्यावर काय काय गमती करू शकतात याचे काही मजेशीर प्रसंग बंड्या (कलाकार पार्थ भालेराव), प्रिन्स (कलाकार गवरीश गावडे), ओंड्या  (कलाकार अथर्व उपासनी) आणि त्यांच्या गटात नव्याने जोडला गेलेला चिन्मय यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. टॉयलेटच्या भिंतींवर शिव्या लिहिण्यापासून तर परीक्षेत आपला पेपर सफाईने मित्राला दाखवण्यापर्यंत; त्याचबरोबर मासे पकडायला गेले असताना मेलेला साप हातात घेऊन एकमेकांना घाबरवणे यापासून ते घाबरणाऱ्या चिन्मयला हातात खेकडा धरायला लावण्यापर्यंतचे प्रयोग ही मुले करतात.

या मुलांची एकमेकांशी असलेली मैत्री आणि या सगळ्यांचं एकत्रितपणे त्यांच्या परिसरातील निसर्गाशी असलेलं नातं प्रेक्षकांना अनुभवता येणं हे सिनेमातील चित्रीकरणाचं मोठंच यश आहे. सिनेमा पाहताना आपण खरोखरच कोकणात आहोत असे वाटायला लागते. अथांग समुद्रकिनारे, नदीवरील जुने पूल, नारळांची उंच झाडी, पावसाळा सुरू असल्याने बराच काळ राखाडी रंग असलेले आकाश, पावसाळ्यातील दाट हिरवळ आणि विजयदुर्गचा किल्ला!

पावसाळ्यातील अंधारलेले वातावरण आणि चिन्मयच्या मनातील एकटेपणा याच्याशी संबंधित एक महत्त्वाचा प्रसंग त्या विजयदुर्ग किल्ल्यावर घडतो. किल्ल्यापर्यंत आपण सायकलची शर्यत खेळायची, असे या मित्रांमध्ये ठरते. डोंगराच्या रस्त्यावरून शर्यत सुरू असते आणि या शर्यतीत नेहमी जिंकणाऱ्या प्रिन्सला हरवून चिन्मय किल्ल्यावर अगोदर पोहोचतो. सगळी मुले डोंगरावरील निसर्गाचा आनंद घेत असताना चिन्मय किल्ला पाहण्यासाठी एकटाच पुढे जातो. त्या किल्ल्यात त्याला मिळालेल्या शांततेत तो रमलेला असतानाच अचानक जोरदार पाऊस सुरू होतो आणि दाटून आलेल्या ढगांमुळे किल्ल्यातील अंधारदेखील गडद होतो. चिन्मयला भीती वाटते आणि तो आपल्या मित्रांना आवाज देतो. मात्र वादळाच्या आवाजामुळे त्याचा आवाज किल्ल्याच्या बाहेर जात नाही. घाबरलेला चिन्मय रस्ता शोधत किल्ल्यातून बाहेर पडतो आणि जोरदार पावसात धावतच त्याच्या सायकलपाशी येतो. एकटी उरलेली त्याची सायकल पाहून त्याच्या लक्षात येते की, त्याचे मित्र त्याला सोडून निघून गेले आहेत. बरेच परिश्रम केल्यानंतर नवीन मित्रांवर विश्वास ठेवू शकणाऱ्या चिन्मयला हा प्रसंग विश्वासघात वाटतो. या प्रसंगामुळे तो पुन्हा एकदा स्वत:च्या कोशात जातो. त्याच्या मनात एकटेपणाची भावना पुन्हा एकदा घर करते आणि यामुळेच की काय, एका प्रसंगी - ‘‘इथे कुणाला माझ्याबद्दल काहीही पडलेलं नाहीये. तूसुद्धा मला समजून घेत नाहीस. कारण तुझं आपलं नीट चाललेलं आहे,’’ असं तो आईला सुनावतो. इथून पुढे सिनेमा एक वेगळेच वळण घेतो. या सगळ्यानंतर आई काय करते? चिन्मयचे मित्र त्याच्याशी बोलतात की नाही? हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं होऊन जातं.

पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सरकारी नोकरीत काम करताना वरिष्ठांकडून येणाऱ्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करत राहण्यासाठी आईची धडपड चालू असते. त्यामुळे येणाऱ्या तणावांचा सामना तिला करावा लागतो.

यादरम्यान, चिन्मयचं तिथल्या निसर्गाशी एक घट्ट नातं तयार झालेलं असतं. बऱ्याच वेळा तो एकटाच समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसत असतो. तिथे काही मच्छीमार आपल्या बोटी घेऊन समुद्राकडे निघत असतात. त्यांना बघत असतांना ‘आपल्यालासुद्धा समुद्राची सफर करायला मिळावी’ असे त्याच्या मनात अनेक वेळा येऊन गेलेले असते. एकदा तो समुद्र- किनाऱ्यावर फिरत असताना एक दारू प्यायलेला मच्छीमार त्याला आपल्यासोबत बोटीवर येण्याची संधी देतो आणि पुन्हा एकदा ‘विश्वास ठेवायचा की नाही’, असा प्रश्न चिन्मयसमोर उभा राहतो! नुकताच विश्वासघात झालेला आणि आईवर चिडलेला चिन्मय समुद्रात जाण्यास तयार होतो. किल्ल्याच्या चार भिंतींमध्ये एकटेपणात अडकलेला चिन्मय जेव्हा मोकळ्या अथांग समुद्रात जाण्याची ‘स्वतःला परवानगी देतो’ तेव्हा त्याच्या मनाच्या भोवती त्यानेच बांधलेल्या भिंती कोसळतात. त्याला मोकळेपणाची भावना वाटू लागते. आपल्याला एकटे सोडून जाणाऱ्या आपल्या मित्रांना आणि नोकरीत सतत बदली होणाऱ्या आईला समजून घेण्याची क्षमता त्याच्यात आली आहे, असे त्याला जाणवू लागते. आपण मनाने मोठे झालो आहोत असा शांततापूर्ण आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो.

परिपूर्णतेची भावना मनात घेऊन चिन्मय घरी येतो, तेव्हा आई त्याची वाट बघत असते. समजूतदारपणे तो आईची माफी मागतो आणि तिला मिठी मारतो. या नंतर चिन्मय त्याने लिहिलेली एक कविता आईला वाचून दाखवतो. ही कविता आपल्या वहीत लिहून ठेवावी अशी आहे. सिनेमा इथेच संपला असावा असे आपल्याला वाटू शकते. मात्र तसे होत नाही. एक शेवटचा महत्त्वाचा प्रसंग बाकी राहतो.

नुकतीच परिपूर्णतेची भावना वाटणाऱ्या आणि अनुभवाने प्रगल्भ होऊ पाहणाऱ्या चिन्मयला आई एक बातमी सांगते- ‘‘माझी पुन्हा एकदा बदली झाली आहे. आपल्याला साताऱ्याला जायला लागणार आहे.’’ हे ऐकून चिन्मय काय करतो, हे सिनेमाच्या शेवटी पाहणे फार महत्त्वाचे आहे.

----

साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'किल्ला' या मराठी चित्रपटावरवर दिपाली अवकाळे यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिपाली अवकाळे,  पुणे
deepaliawkale.25@gmail.com

संचालिका, स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट प्रा. लि.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके