डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भूमिपुत्राचे बाबासाहेब : सर्वहारा शोषितांच्या उत्थानाचा काव्याविष्कार

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आली तरी शोषणाची चिरंतन परंपरा कायमच ठसठसत असते. जगणं नकोसं करत असते. पांढऱ्या कपड्यांतील काळे सचिव चष्म्यातून देशाचा, राज्याचा, लोकांचा कारभार हाकतात. त्यांना ‘हवे तसे, हवे तेव्हा’ योजनांचा पाऊस फिरवत असतात. म्हणायला संसदेच्या सभागृहांत गेलेली शेतकऱ्यांची, दलितांची पोरं सचिवाच्या तालावर नौटंकी करतात. ‘अच्छे दिन’चं काल्पनिक आभासपण ‘मन की बात’मधून मांडतात. शोषणाचं गतिमान चक्र निरंतर धावत राहतं. रक्त शोषून घेणाराही दिसत नाही. युरोपीय राष्ट्रांत गोरे-निग्रोच्या शोषणाची दरी चटकन्‌ लक्ष वेधते. आज कृषिप्रधान राष्ट्राचा कणा मोडून पडला. अस्मानी-सुलतानीकडून नागवला गेला. बाजारी व्यवस्थेत लुटला गेला. अनेक अदृश्य जळवांकडून शोषला गेल्याने आत्महत्येचा जीवघेणा फास घेण्यास कारण ठरला. हे दाहक वास्तव चंद्रशेखर मलकमपट्टे नेमकेपणाने मांडतात.  

‘भूमिपुत्राचे बाबासाहेब’ या चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या दीर्घ पटाच्या कवितांनी आशयविषयाच्या खोलीचं, जाणिवेचं निराळेपण जपलं आहे. पूर्वीच्या ‘कळ भुईच्या पोटात’मधून त्यांच्या लेखणीचं गांभीर्य, चिंतनशीलतेचा पोत आपण अनुभवला आहे. ग्रंथाली प्रकाशनाकडून दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने नव्या रूपात आलेल्या ‘भूमिपुत्राचे बाबासाहेब’मधील कवितांनी महानायकाच्या उत्तुंग, अथांग व द्रष्ट्या विचारांचा सर्वव्यापी धांडोळा अभ्यास-साधनेच्या कसोटीवर घेतला. या साधनेला कमालीची संवेदनशीलता, सजगता व कृतज्ञतेचा विनयशीलपणा प्राप्त झाल्याने ती समतोलपणा साधू शकली.

मुळात थोरा-मोठ्यांची चरित्रे पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखी प्रकाशमान करत राहतात. अंधाराला कापत उज्ज्वलतेची पायवाट चालण्यास भाग पाडतात. दिशादर्शकतेचं सूचन करतात. पण दुर्दैवाने प्रत्यक्षात थोरांच्या सर्वव्यापी विचारकार्याला सुरूंग लावून त्यांना जाती-पातीच्या उतरंडीला उभं केलं जातं. संकुचितपणाच्या दहशती कुंपणात बंदिस्त केलं जातं. जयंती-पुण्यतिथीला जात-धर्माची पिलावळ जेवणावळीचे, भावनेचे, उत्सवाचे बेधुंद नशिली जथे भरवते अन्‌ विचारकार्य मारत राहते. हे अविवेकी, टोकाचं भावनिक प्रदर्शन अन्य जनांच्या मनात दहशतीची कंपने उत्पन्न करतं. थोरांचा आदर-थोरपण निखळून तिरस्काराचं कारण ठरतं. या थोरांचं सर्वहारा उत्थानाचं कार्य उजेडाचा भाग बनणार नाही, म्हणून दुसरी पर्यायी व्यवस्थाही समाजात छुप्या पद्धतीने काम करत असतेच. अज्ञानाला ‘ज्ञानी’ करणं अन्‌ झोपलेल्यांना ‘जागं’ करणं हे त्यांच्या कधीच भल्याचं नसतं. समाजमनात विवेकाची कास रुजविणाऱ्यांना संपविल्याचा इतिहास तुकोबापासून आजतागायत आपणा सर्वांना ज्ञात आहे. ‘व्यक्ती’ मारणारी संप्रदायवृत्ती ‘विचार’परंपरा मारू शकेल का? ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ ही कळवळ्याची, तळमळीची, जागवण्याची परंपरा ‘भूमिपुत्राचे बाबासाहेब’मधील कवितांनी जपली.

बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारकार्यावर विपुल लेखन झालं आहे. डॉ.यशवंत मनोहर यांनी ‘भूमिपुत्राचे...’ या कवितासंग्रहाच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेतून लेखनपरंपरेची वाचकांच्या जिज्ञासेची आटोपशीर नोंद घेतली आहे. आंबेडकरी जलसे, गीत, लोकगीत, कथा, कविता, कादंबरी, आत्मकथनं या विविधांगी स्रोतांतून बाबासाहेबांचा आत्मभानी इतिहास उजागर होत राहिला. या विपुल संपदेपेक्षा ‘भूमिपुत्राचे...’मधील कवितांनी यापेक्षा वेगळं असं कोणतं चिंतन माडलं असावं, वाचकांनी ही कविता का वाचावी- याचं उत्तर या संग्रहातील कवितांनी दिलंय. ही कविता समग्र बहुजनांच्या उत्कर्षात बाबासाहेबांचं ‘आयडॉल’पण सिद्ध करते. बाबासाहेब आंबेडकर यांच दलितेतरांसाठीचं कार्य उजळून दाखवते. या जाणिवेची पायवाट हरी नरके यांच्या प्रबोधनात्मक अभ्यास-बैठकीतून व ‘अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा’ या वैचारिक ग्रंथासह लेखन-चिंतनातून डॉ.प्रल्हाद लुलेकरांनी केली आहे. याच जाणिवेला काव्यात्म भाषेत, सहजसुंदर शैलीत चंद्रशेखर मलकमपट्टे आणू पाहतात. सचित्र वर्णनातून वाचकांच्या मनास जाऊन भिडतात, आत्मभान जागं करतात. 

बाबासाहेब, 
तुमच्यासारख्या वाली रक्षणकर्त्याला 
ओळखलं नाही आम्ही अजून 
तिथं व्ही. पी. सिंग आणि बी.पी. मंडल 
यांची काय बिशाद! 
का निपजलो आम्ही इतके कुळबुडवे? 
कुणाच्या फायद्याचा हा आयोग 
आम्हाला नव्हता याचा गंध... 
अंमलबजावणीसाठी या आयोगाच्या 
तमाम आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर 
सरकारबी लईच लाड करतंय राव मांगा-महारांचं 
असं म्हणत, 
आम्ही निपचित आमच्या घरात आमच्या शेतातल्या बांधावर... 
विद्यापीठाच्या नामांतरालाही केला विरोध 
जीवाच्या आकांताने.... 
आम्ही तर करंटेच. 
पण त्यांनीही कळू दिलं नाही आम्हाला 
तुमचे महानत्व... 
आंबेडकर बीसीवाल्यांचे नेते 
म्हणून करून टाकला आम्ही 
तुम्हाला जय भीमवाल्यांचा देव 
मात्र राज्यघटनेत ते एससी 
तर आम्ही बीसी आहोत 
याची जाण नाही आम्हाला... 
बीसीला ओबीसी करून 
हिंडतो आम्ही रुबाबात 
आणि करून घेताहोत घात..
 
बाबासाहेबांना ‘दलितांचे कैवारी’, ‘दलितांचे उद्धारकर्ते’ म्हणून ओळखलं गेलं. बाबासाहेबांच्या द्रष्ट्या विचाराची, कृतीची देन म्हणून एसटी, एनटी, ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात, पण आपण ‘दलित’ कोषात बसत नसल्याचा आविर्भावही दाखवून देतात. आमच्या आयुष्यातील अंधार दूर सारून ‘सूर्यफुले’ पेरणाऱ्या युगपुरुषाविषयीचा कृतज्ञभाव जाणीवपूर्वक टाळतात. बाबासाहेबांना ‘महार-मांगांचं दैवत’ म्हणून करंटेपण दाखवून देतात. पण ‘दाट सावली देणारं, भीम रानातलं झाड, आदिवासी भटक्याचे भीम बारमाही आड’ ही जाणीव उपकारकर्त्याच्या ठायी दिसत नाही. दलित, आदिवासी, भटके, ओबीसी, शेतकरी, स्त्रिया, अल्पसंख्याक अशा  गुलामीचं जिणं जगणऱ्या किती तरी वंचित-उपेक्षितांचा आधारवड बाबासाहेब राहिले. ‘अत्त दीप भव’चा मूलमंत्र दिला. पण दुर्दैवाने याची जाणीव संबंधितांना झाली नाही, होऊ दिली नाही. आजही खेड्यापाड्यांतून अनुभवास येणारे असंख्य अनुभव चंद्रशेखर मलकमपट्टे सहजसुलभ संवादशैलीत उभे करतात. 

गावातली पहिली वहिली भीमजयंती 
पिचलेले अडाणी महार सामील मिरवणुकीत बाकी सारे 
आपापल्या घरी दारी माळवदावर 
कुणी येत नव्हतं रस्त्यावर 
मिरवणूक आमच्या आळीत आली 
मी विचारलं मायला, 
माय, त्या फोटोतला निळा माणूस कोण? 
माय म्हणाली तवा, 
तो महारावाचा देव हाय 
त्यानंच ह्यान्‌ला माणसात आणलंय 
आज इतक्या वर्षांनंतरही 
ती असंच म्हणते, 
तिला माहीत नाही 
तिच्यासारख्या आयाबाया याव्यात माणसात 
म्हणून किती खपलात तुम्ही, 
अजूनही कवटाळतेय वडाच्या झाडाला 
सत्यवान सावित्रीच्या पुण्याईचं आख्यान गुणगुणत 
कधी कळणार तिला जोतिबाची सावित्री? 
अजून कळली नाही माय 
तिथं भीम क्रांतीचं काय? 

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शूद्रांना पशुतुल्य वागणूक मिळाली. विषारी साप, कुत्रा, बैल, गाई, किड्या-मुंग्यांत दैवत्व शोधलं गेलं; पण माणसातील ‘माणूसपण’ ओरबाडून घेतलं गेलं. ही जशी शूद्रांची अवस्था, तशीच चारही वर्णांच्या समस्त स्त्रियांची राहिली. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीला ‘अबला’ केलं गेलं. चूल-मुलाच्या कक्षेची किनार दाखवून चार भिंतींत बंदिस्त केलं गेलं. दागदागिन्यांचे मोहमयी पाश दाखवून गुलामीच्या बेड्या घातल्या गेल्या. स्व-अस्तित्व झुगारून देत परावलंबी बनवल गेलं. पुरुषी व्यवस्थेने ‘बाई’माणूस म्हणत हलक्या-फुलक्या कामात अडकवलं गेलं. पिंजऱ्यातल्या पोपटाला जगण्याची शाश्वती-सुरक्षितता असते, पण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास कुठे घेता येतो? जसं ‘लेकीचा जलम कोणा घातला येड्यानं, पराया घरी बैल राबतो भाड्यानं’- तसं बंदिवासात जगणाऱ्या स्त्रियांना महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबार्इंनी दिलेल्या अक्षरज्ञानामुळे मोकळा श्वास घेता आला. स्वातंत्र्याचं मुक्त द्वार ‘हिंदू कोड बिला’च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे अधिक खुलं झालं. प्रसंगी मंत्रिपदावर पाणी सोडत राजीनामा दिला गेला, पण दुर्दैवाने स्त्रियांच्या ‘उद्धारकर्त्या’विषयीची जाणीव स्त्रियांनाच नसावी, याची खंत कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांना अस्वस्थ करते. बाबासाहेबांनी ‘माणूस’पण हिरावणारी मनुसंस्कृती नाकारली. पुराणग्रंथ, भाकडकथांची होळी केली. समतेच्या सगराचं अथांगपण जपणारा तथागताचा तेजोमय सत्यधर्म आचारला. शिका, संघटित होऊन संघर्ष करण्याचा आत्मभानी लढा शिकवला. दलितांनी गुलामीची शकल धुडकावून बंडाचे, नवबदलाचे भाले अंगीकारले. पण कोसो दूर असणारे आदिवासी या जाणिवेला पारखे राहिले. सुधारणेच्या नावाखाली फिरणाऱ्या मिशनरीचे क्रूस अडकवून रानावनात फिरू लागले. अशा मूलनिवासी भूमिपुत्रांचे तारणहार बाबासाहेब ठरले. 

बाबासाहेब, 
तुमचा पदर होता धरणीएवढा. 
आदिवासीच्या जीवनशैलीत करू नये कुणी हस्तक्षेप
यासाठी राज्यघटनेत करून त्यांचा अंतर्भाव 
बहाल केलंत माणूसपण 
त्यांना माहीत नसलेलं, 
अजूनही माहीत न झालेलं. 
कुण्या सावकाराची पडू नये 
त्यांच्या शेतावर वाकडी नजर 
म्हणून केलात तुम्ही कायदा 
आदिवासीच्या जमिनी कुणाला 
घेता येणार नाहीत विकत 
म्हणून तर तग धरून आहेत ते 
नाहीतर केव्हाच उडून गेले असते पाचोळ्यासारखे!
 
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आली तरी शोषणाची चिरंतन परंपरा कायमच ठसठसत असते. जगणं नकोसं करत असते. पांढऱ्या कपड्यांतील काळे सचिव चष्म्यातून देशाचा, राज्याचा, लोकांचा कारभार हाकतात. त्यांना ‘हवे तसे, हवे   तेव्हा’ योजनांचा पाऊस फिरवत असतात. म्हणायला संसदेच्या सभागृहांत गेलेली शेतकऱ्यांची, दलितांची पोरं सचिवाच्या तालावर नौटंकी करतात. ‘अच्छे दिन’चं काल्पनिक आभासपण ‘मन की बात’मधून मांडतात. शोषणाचं गतिमान चक्र निरंतर धावत राहतं. रक्त शोषून घेणाराही दिसत नाही. युरोपीय राष्ट्रांत गोरे-निग्रोच्या शोषणाची दरी चटकन्‌ लक्ष वेधते. आज कृषिप्रधान राष्ट्राचा कणा मोडून पडला. अस्मानी-सुलतानीकडून नागवला गेला. बाजारी व्यवस्थेत लुटला गेला. अनेक अदृश्य जळवांकडून शोषला गेल्याने आत्महत्येचा जीवघेणा फास घेण्यास कारण ठरला. हे दाहक वास्तव चंद्रशेखर मलकमपट्टे नेमकेपणाने मांडतात. 

महानायका, 
युरोप-अमेरिकेत 
काळ्या गुलामांना चाबकाने मारतात 
गोरे लोक. 
मारणारा कोण अन्‌ मार खाणारा कोण 
वेळ लागत नाही हे कळायला तिथं. 
इथली तऱ्हाच न्यारी 
ना मारणारा दिसतो ना त्याच्या हातचा चाबूक 
वळ मात्र उठत असतात 
आमच्या पाठाडावर... 

गुलामांची वागणूक देणाऱ्या अडीचशे वर्षांच्या निजामी राजवटीची, मराठवाडा स्वातंत्र्यसमराची नोंद कवी करतो. भांडवलदार, सावकार, खोत, धनदांडग्यांच्या पालनकर्त्या काँग्रेसवर जहरी टीका करत घंटानाद, गोवंशाचा आटापिटा करत बळीवंशाला गाडणाऱ्या वर्तमान राज्यकर्त्यांचा परखडपणे समाचार कवी घेतो. शेतकऱ्यांवर उपकाराचा गाजावाजा करत तोंडाला पानं पुसणाऱ्या तकलादू कर्जमाफीचा निषेध नोंदवत कवी शेतकऱ्यांच्या जगण्याचं शाश्वतपण आणू पाहणाऱ्या बाबासाहेबांच्या दृश्य स्वप्नांची नोंद घेतो. 

भाक्रा नानगलची परिभाषा 
म्हणजे बाबासाहेब. 
देशातल्या नद्या जोडणारी रेषा 
म्हणजे बाबासाहेब. 
उत्तरेच्या बलशाली पूर्ववाहिनी नद्यांचं 
अतिरिक्त पाणी आणून सोडावं 
दक्षिण भारताच्या नद्यांत 
व्हावा देश सुजलाम्‌ सुफलाम्‌ 
म्हणून केलंत याबाबत विवेचन 
आमच्या अंगणात गंगा आणण्यासाठी 
केलात तुम्ही जीवाचा आटापिटा 
मात्र आम्ही चवताळून जातो 
तुमच्या त्या लेकराच्या अंगावर 
आमच्या हिरीचं पाणी बाटलं म्हणून! 

चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी रचनेच्या अंगाने मुक्तछंदासह अभंग शैलीला चपखलपणे हाताळले आहे. बोरीच्या काट्यानं फाटावं धोतर, तशी फाटत गेली आमची संघटना, ठेच लागलेल्या लेकराला माय आठवावी जशी!, काणीचा फास पडलेल्या वासराला, आडरानातली गाय आठवावी तशी... फुलत गेला स्वतंत्र मजूर पक्षाचा मळा, काटा रुतला सनातन्यांच्या गळा, सहन झाल्या नाही त्यांना, तुमच्या रूपाच्या निळ्या सावळ्या सूर्यकळा(पृ.67)... काय सांगू बाई तुला, भीम माझा कसा होता? लेकराला जशी माता, भीम माझा तसा होता (पृ.94)... भीम बोलतो अजून, भीम चालतो अजून, प्राण फुंकून कानात, केले आम्हावर ऋण (पृ.111)... यांसारख्या कवितासंग्रहातील प्रतिमेच्या अंगाने जाणाऱ्या अशा किती तरी लयदार रचना वाचकांची वाचनीयता वाढवण्यास पूरक ठरतात. यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे या पुरोगामी विचारांच्या वाहकांची दोन आवृत्तीतील दीर्घ प्रस्तावना व स्त्रीवादी साहित्याच्या साक्षेपी अभ्यासक डॉ.वंदना महाजन यांची पाठराखण या संग्रहाच्या आशयमूल्याची उंची-खोली दर्शविते. सर्वहारा उपेक्षित, वंचितांचा विषमतावादी इतिहास उजागर करत समतावादी विचाराच्या वाटा उजळण्यास, आत्मपरीक्षण करण्यास हा दीर्घ कवितासंग्रह यशस्वी ठरणार, यात संदेह नाही. 

भूमिपुत्राचे बाबासाहेब

चंद्रशेखर मलकमपट्टे, 
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.   

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके