डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

शिक्षकदिन विशेष- माहिती ते गोष्ट व्हाया अनुभव

‘गाय’ या विषयावर विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे लेखन, व चर्चेनंतरचे लेखन मी आपणासमोर मांडलेच आहे. यानंतर मी विद्यार्थ्यांना महाश्वेता देवी यांचे ‘आमची भन्नाट गाय’ हे पुस्तक वाचून दाखवले. ‘आमची भन्नाट गाय’ हे पुस्तक खूपच मजेशीर आहे. गोष्ट ऐकताना मुले अगदी रंगून गेली होती. मी गोष्ट वाचताना पुस्तकातील गाय व त्यांच्या परिसरातील गाय यांची तुलना केली. त्यांचे अनुभव वर्गात आणले. गोष्टीच्या सुरुवातीला लेखिकेने ‘आमची गाय चहा पीत होती, भात खात होती’ असे वर्णन केले आहे. हे ऐकल्यानंतर मुलांना आश्चर्य वाटले. मुले म्हणाली, ‘गाय कधी चहा पिते होय? आमची गाय चहा पीत नाही.’ त्यानंतर गाईचे नाव ऐकल्यानंतर तर वर्गात खूप हशा पिकला. मुलांनी आतापर्यंत कधीही न ऐकलेले नाव होते ‘न्यॅदोश’. मुलांना माहित असलेली कपिला, राणी, गंगा, कृष्णा अशी नावे त्यांनी सांगितली.

भाग्यश्री पुन्हा तीन दिवस गैरहजर होती. शाळेत का नाही आलीस? मी तिला विचारले. ती खाली बघत काहीतरी पुटपुटली. मला काहीच कळले नाही. हे रोजचेच झाले होते. आमची शाळा म्हणजे पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा, वावेघर. रसायनी परिसरातील वावेघर ही इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणारी एक शाळा. वावेघर गावाचे दोन भाग आहेत - गाव आणि वावेघर झोपडपट्टी. रसायनी परिसरात औद्योगिक कारखाने जास्त प्रमाणात असल्याने रोजगारानिमित्त विविध प्रदेशांतील लोक येथे रहायला येतात. यामध्ये कर्नाटकातील बंजारा समाज, बिहार व उत्तर प्रदेशातील लोक, स्थानिक आगरी लोक आणि केरळ, पश्चिम बंगाल इत्यादी प्रांतातील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे विविध भाषा बोलणारे विद्यार्थी माझ्या वर्गात होते.

कदाचित विद्यार्थ्यांची मातृभाषा व माध्यम भाषा वेगवेगळी असल्यामुळे त्यांना वर्गातील अभ्यास समजत नसे, त्यामुळे ते बऱ्याच वेळा अनुपस्थित राहायचे. गैरहजेरीमुळे अभ्यासात मागे पडायचे. आपण वयाने मोठे असूनही आपल्याला या मुलांची भाषा समजत नाही तर त्यांना वर्गात काय समजत असेल असा विचार माझ्या मनात आला. मग मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारू लागलो. त्यांच्याबरोबर गाणी म्हणू लागलो. त्यांना गोष्टी सांगू लागलो. परंतु यामध्येही मराठी भाषिक विद्यार्थीच जास्त सहभागी होत होते.

मग इतर अमराठी विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग मिळवण्यासाठी त्यांची घरची भाषा शिकण्याचे ठरवले. यासाठी इयत्ता सहावी सातवीतील अमराठी विद्यार्थ्यांकडून मराठी शब्दांचे त्यांच्या भाषेतील पर्यायी शब्द समजून घेतले. मग दैनंदिन वापरातील ठराविक शब्द, वाक्ये यांचा वापर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी करू लागलो. उदाहरण द्यायचे म्हणजे आपण जसे मराठीमध्ये जेवण केलं का? असे विचारतो तेच बंजारा व हिंदी भाषेत म्हणायचो, बाटी खायो का? खाना खाया क्या? शिक्षक आपल्या भाषेतून बोलतात हे पाहून सुरुवातीला विद्यार्थ्यांना गंमत वाटली, ते हसू लागले. नंतर मात्र हळूहळू ते व्यक्त होऊ लागले. माझ्याशी गप्पा मारू लागले. वर्गात आम्ही घरची भाषा व माध्यम भाषा यांची सांगड घालून अध्ययन-अध्यापन करू लागलो. ह्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास समजू   लागला. वर्गातील उपस्थितीचे प्रमाण वाढले आणि मुले शिकू लागली.

रायगड जिल्हा परिषदेकडून आंतरजिल्हा बदलीने मी जून 2013 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिवरकरवाडी येथे हजर झालो. ही फलटणपासून चार किलोमीटर अंतरावर असलेली इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची द्विशिक्षकी शाळा. शाळेचा पट 28 आहे. शाळेत प्रामुख्याने शेतमजुरी व रोजंदारी करणाऱ्या पालकांची मुले आहेत. या शाळेत सर्व मुले मराठी भाषिक होती. त्यामुळे आमचा संवाद चांगला होत होता. मला असे दिसून आले की विद्यार्थ्यांना एखाद्या सणाविषयी किंवा परिसरात घडलेल्या एखाद्या प्रसंगाबद्दल बोलायला सांगितले तर ते खूप चांगल्या प्रकारे बोलत. पण त्यांना त्याच विषयावर लेखन करायला सांगितले तर मात्र ते चांगले लेखन करू शकले नाहीत. आणि जरी केले तरी त्यांच्या लिखाणात एक प्रकारचा साचेबद्धपणा दिसून आला.

उदाहरण द्यायचे तर मी इयत्ता दुसरीच्या मुलांना ‘गाय’ या विषयावर लिहिण्यास सांगितले. मुलांच्या वह्या तपासल्या तेव्हा असे वाटले की, एका निबंधाच्या पुस्तकामधून सगळ्यांनी उतरवले आहे. निबंध काहीसे असे होते: गाय गवत खाते. गाय दूध देते. गाईला चार पाय असतात. गाईला दोन डोळे असतात. गाईला दोन शिंगे असतात. गाईला दोन कान असतात. गाईला एक शेपटी असते. या लिखाणात मला कुठेही विविधता, सृजनशीलता दिसून आली नाही. मग मी विद्यार्थ्यांचे लेखन विकसित करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागलो. भाषा शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अनुभवाला फार महत्त्व आहे. याचा उल्लेख राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा- 2005 मध्ये ज्ञानरचनावादाच्या चर्चेमध्ये आलेला आहे.

मूल शाळेत दाखल होते तेव्हा त्याच्याकडे अनेक अनुभव असतात. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील घटनांचे ते सतत निरीक्षण करत असते. पूर्वानुभवाच्या आधारे मूल त्या नवीन निरीक्षणांचा व घटनांचा अर्थ लावत असते. अनुभव घेतलेल्या गोष्टींवर मुले छान बोलतात. एखादी कृती स्वत: करून पाहिली तर ती मुलांच्या जास्त वेळ लक्षात राहते. याच गोष्टीचा मी विद्यार्थ्यांचे लेखन विकसित करण्यासाठी उपयोग करण्याचे ठरवले.

लेखनासाठी चित्रांची मदत

पहिली-दुसरीच्या मुलांबरोबर काम सुरु केले. त्यांना एवढे लिहिता येत नव्हते, म्हणून ‘एखादे चित्र काढा आणि त्याखाली मजकूर लिहा’ असे सांगितले. वर असलेल्या आपणच काढलेल्या चित्राचा आधार घेऊन मुले पहिल्यापेक्षा अधिक छान व्यक्त होऊ लागली. यासाठी मुलांना कागदाचे दोन भाग करून दिले. सुरुवातीला मोठे चित्र काढून त्याविषयी दोन-तीन वाक्यांचा मजकूर, नंतरच्या टप्प्यात चित्राचा आकार छोटा व मजकूर जास्त आणि शेवटी विद्यार्थ्यांना सुरुवातीला मजकूर लिहिण्यास सांगून त्याआधारे छोटेसे चित्र काढण्यास सांगितले. या टप्प्यांमुळे विद्यार्थ्यांना लेखन करण्यास मदत झाली.

चित्रांवरून अनुभव लेखन

 एकदा मी घराचे चित्र दाखवून विद्यार्थ्यांना आपापल्या घराविषयी लिहिण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील वस्तू, घराच्या आजूबाजूचा परिसर, शेजारील घरे, शेजारील माणसे यांचा वापर करून आपल्या शब्दांत लिहिले. कुणी घरातील माणसे घराच्या स्वच्छतेसाठी काय करतात याचेही अनुभव लिहिले होते. इयत्ता दुसरीतील समीक्षाने लिहिले होते -यशच्या घरात सगळा पसारा असतो. कॉटवर कपडे, आंथरूणं कशीपण टाकलेली असतात. रिक्षाचे टायर, ट्यूब घरातच ठेवली असतात. त्यामुळे मला यशच्या घरी जावं वाटत नाही. अहिल्याने स्वतःच्या घराचे वर्णन करतांना, आमच्या घराला खुंट्या, फरतळी आणि देवळ्या आहेत. असे लिहिले होते.

लेखन झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापले लेखन वाचून वर्गासमोर वाचून दाखवतात. घराबद्दल निबंध वाचल्यावर काही मुलांनी खुंट्या, फरतळ, देवळी हे शब्दच माहीत नसल्याचे सांगितले. मी मुलांना सांगितले की आपण अहिल्याच्या घरी जाऊ आणि प्रत्यक्ष या गोष्टी पाहू. मी अहिल्याच्या वडिलांशी याविषयी चर्चा केली व त्यांना आमचे विद्यार्थी तुमचे घर पाहण्यासाठी येणार आहेत याची कल्पना दिली. त्यांनीही आम्हास लगेच परवानगी दिली.

आमच्या शाळेत शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवला जातो. या दिवशी विद्यार्थी शाळेत दप्तर आणत नाहीत. आम्ही विद्यार्थ्यांना वाचनासाठी गोष्टीची पुस्तके देतो. याचबरोबर शनिवारी व्यायाम, कवायत  प्रकार, योगासने, प्राणायाम करून घेतले जातात. पाढे, कविता, स्पेलिंग पाठांतर घेतले जाते. गाणी, गोष्टी, नाट्यीकरण असे विविध उपक्रम आम्ही राबवतो. अहिल्याच्या घरी जाण्यासाठी आम्ही असाच एक शनिवार ठरवला. ठरल्याप्रमाणे शनिवारी शाळेत परिपाठ झाल्यानंतर आम्ही अहिल्याचे घर पाहण्यासाठी गेलो. तेथे आम्ही खुंट्या, फरतळी आणि देवळ्यांचा उपयोग विचारला. तेव्हा अहिल्याच्या आजीने सांगितले, “खुंट्याला आम्ही पिशव्या अडकावतू, कपडे अडकावतू. देवळीत दिवा, बारक्या वस्तू, औषधं, गोळ्या ठेवतू अन फरतळीत डाळींचं डबं, शेतासाठी लागणाऱ्या वस्तू, विळे, खुरपी, कुऱ्हाड, कोयता हे ठेवतू.”

मुलांना खुंटी, देवळी व फरतळ प्रत्यक्ष पाहून खूप आनंद वाटला. त्या गोष्टी नेमक्या काय असतात ते आणि कशा वापरल्या जातात हे सुद्धा समजले. एक दिवस मी मुलांना बाजाराचे चित्र दाखवून आपापले बाजाराविषयी अनुभव लिहिण्यास सांगितले. मी मुलांना कधीच चित्रवर्णन करायला सांगत नाही. परंतु त्या चित्रावरून आठवणारे आपले अनुभव लिहायला सांगतो. इयत्ता दुसरीतील मुलांनी लिहिताना ते बाजारात कोणाबरोबर जातात, कसे जातात, बाजारात कशाकशाची दुकाने असतात, दुकानात कोणकोणत्या वस्तू असतात, विविध वस्तूंची खरेदी-विक्री करताना होणारे संवाद, बाजारातील गर्दी, बाजारात होणारे वाद, भांडणे या बारीकसारीक गोष्टींचे अनुभव छान लिहिले.

 साहिलने लिहिले, मी, पप्पा आणि दादा फलटणला रविवारच्या बाजाराला गेलो होतो. सगळ्या रस्त्यांवर वाहनांची अन माणसांची गर्दी होती. आम्ही एका दुकानातून पप्पांची कामे घेतली (साहिलचे पप्पा टेलर आहेत. ते फलटणमधून मोठ्या दुकानातून शिलाईसाठी आलेले कपडे घरी घेऊन जातात व शिवून झाल्यावर त्या दुकानात परत नेऊन देतात) आणि भाजी घ्यायला मंडईत गेलो. मंडईत भाज्या विकायला होत्या. आम्ही भाज्यांचे दर विचारत होतो, तेवढ्यात मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. आम्ही तिकडे गेलो तर सगळे लोक जमा झाले होते व एका माणसाला मारत होते. आम्ही शेजारच्या माणसाला विचारले काय झाले? तेव्हा तो म्हणाला की, या माणसाने एका माणसाचे पाकीट मारले म्हणून त्याला पकडून पोलिसांकडे देणार आहेत. त्या चोराला खूप मारले होते. तो रडत होता, पाया पडत होता  पण माणसे त्याला मारत होती. थोड्या वेळाने पोलिस आले अन्‌ त्याला घेऊन गेले.

यावर वर्गात चर्चा केली तेव्हा मुलांनी आपली मते मांडली. कोणी म्हणाले लोकांनी केले ते बरोबर केले. कोणी म्हणाले चोरी करू नये, चोरी केल्यावर पोलिस पकडून नेतात. कोणी म्हणाले मारू नये.

समान अनुभवांबद्दल चर्चेचा लेखनासाठी उपयोग

साधारणतः सर्व शाळांमध्ये (विशेषतः ग्रामीण भागातील) मुलांना पशु-पक्ष्यांबद्दल लिहायला सांगतात. यांचे वर्णन करणारी ठराविक सात ते आठ वाक्येच मुले लिहितात. हे परभाषिक विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांनी कधी प्राणीच पाळले नाहीत त्यांनी लिहिले तर ठीक आहे. पण आपल्या मातृभाषेतून, आपल्या अनुभवांबद्दल लिहिताना तरी मुलांच्या लिखाणात विविधता, सर्जनशीलता असावी असे मला वाटते. गाईच्या बाबतीत लिहिताना तोचतोचपणा यायचा, त्याचा उल्लेख आधी केलाच आहे. तो घालवायला एके दिवशी मी वर्गात परत गाईविषयी चर्चा सुरू केली. वर्गातील जवळजवळ सर्व मुलांकडे किंवा शेजारीपाजारी गाय आहे. यावेळी इयत्ता दुसरीच्या मुलांनी सुरुवातीला नेहेमीप्रमाणे गाईच्या अवयवांची माहिती सांगायला सुरुवात केली.

नंतर मुलांना त्यांचे गाईबद्दलचे अनुभव विचारले असता मुले एक एक गोष्ट सांगू लागली. चर्चा सुरू असताना मुलांनी सांगितलेले मुद्दे फळ्यावर लिहिले व नंतर मुलांना त्यांच्या वहीत लिहिण्यास सांगितले. यावेळी वर्गात झालेली चर्चा व अनुभव खूप विस्तृत होते. ही चर्चा खालीलप्रमाणे: 

मी फळ्यावर ‘गाय’ शब्द लिहिला व चर्चेला सुरुवात झाली.

श्रावणी : गाय गवत खाते.

श्रद्धा : गाय कडबा खाते.

शंतनू : गाय मका, कडवाळ खाते.

मयुरेश : गाय गोळी, भुसा पेंड खाते.

प्रियांसी : गाय ऊस, वाडे खाते.

श्रद्धा : गाईला मम असतो.

श्रावणी : ए, नाही ग श्रद्धा, त्याला मम नाही सड म्हणतात.

मयुरेश : गाईपासून आपल्याला शेण मिळते त्या शेणाचा शेतीत खत टाकण्यासाठी उपयोग होतो.

श्लोक : घर सारवायला पण शेण लागतं.

तनुजा : पाडव्या दिवशी घराला शेणाचे पाडवे काढतात.

मी : शेणाचा खत, सारवणे याशिवाय आणखी काय उपयोग करतात?

श्रद्धा : आमच्या मामांच्या तिकडे शेणाच्या गोवऱ्या करतात.

मी : आणखी काय उपयोग आहे शेणाचा?

श्रावणी : एवढाच उपयोग असतो की.

मी : शेणापासून बायोगॅस (गोबरगॅस) तयार करतात.

मयुरेश : अजून गाईची पूजा करतात. गाय दूध देते.

श्रावणी : गाय विकतात आणिक नवी आणतात.

श्रद्धा : नवीन गाय आणल्यावर तिची पूजा करतात.

मी : गाईची पूजा कशी करतात?

श्रावणी : आधी पायावर पाणी टाकतात. हळद-कुंकू लावतात. मंग तांदूळ डोक्यावर टाकतात. भाकरीचा तुकडा चारतात. गाईला ओवाळतात.

अशा प्रकारे वर्गात विद्यार्थ्यांनी आपले अनुभवातून गायीची माहिती सांगितली. चर्चा केल्यामुळे मुलांना एकमेकांचे अनुभव समजले आणि याचा वापर त्यांचे लेखन विकसित होण्यासाठी झाला. आतापर्यंत गाय गवत खाते हे वाक्य लिहिणाऱ्या मुलांनी गवताबरोबरच गाय आणखी काय काय खाते ते लिहिले. शेणाचा उपयोग कशासाठी होतो, गाईची खरेदी-विक्री करतात, या आणि इतर अनेक गोष्टी मुलांनी सांगितल्या. चर्चेनंतर विद्यार्थ्यांना ‘गाय’ या विषयावर लिहिण्यास सांगितले. तेव्हा सुरुवातीला 7 ते 8 वाक्ये लिहिणाऱ्या विद्यार्थांनी चांगली 20 ते 25 वाक्ये लिहिली.

‘गाय गवत, मका, कडबा, वैरण, पेंड, भुसा खाते. गाईला बाळ होते त्याला वासरू म्हणतात. वासरू फार छान दिसते. गाईची पूजा करतात. गाय दूध देते. गाईला चार सड असतात त्यातून दूध येते. गाय शेण देते त्याचा उपयोग शेतात खत म्हणून करतात. शेणापासून गोवऱ्या बनवतात. आम्ही बेंदरादिवशी गाईला धुतो आणि रंगवतो. गाय काळ्या, पांढऱ्या, तांबड्या रंगाची असते. गाय विकतात आणि नवीन आणतात. गाय टेम्पोत भरून नेतात.’

अशा प्रकारे एकेकट्याने आपापले लेखन करण्यापेक्षा विविध मुलांच्या अनुभवांच्या वर्गात केलेल्या चर्चेनंतर केलेले लेखन खूप जास्त विस्तृत आणि सकस होते. याच प्रकारे कुत्रा, बैल, घोडा, म्हैस, शेळी या प्राण्यांविषयी  लिहिण्यास सांगितले. चिमणी, कावळा, मोर या पक्ष्यांविषयी लिहितानाही विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव, ऐकलेले वर्णन, वाचलेली माहिती यांचा वापर केला.

पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या घटनेचे लेखन

मुले पाहिलेली घटना/ प्रसंग यांचे वर्णन चांगल्या पद्धतीने करतात असा माझा अनुभव आहे. याच गोष्टीचा वापर करून मी विद्यार्थ्यांना सण-उत्सव, लग्न, खेळ, प्रवास, जत्रा यांसारखे प्रसंग देऊन अनुभव लिहायला सांगितले. तेव्हा मुलांनी अगदी वास्तव अनुभव लिहिल्याचे जाणवले. हे अनुभव लिहिताना ती बोलीभाषेतील शब्दांचा वापर करतात असे जाणवले.

मुलांना ‘गणेशोत्सव’ हा सण तुम्ही कसा साजरा केला हे शब्दात उतरवण्यास सांगितले. काही मुलांनी त्यांच्या घरी गणेशोत्सव कसा साजरा करतात याचे अनुभव लिहिले तर काही मुलांनी सार्वजनिक गणपती मंडळातील अनुभव लिहिले. वेदांत या दुसरीतील विद्यार्थ्याने सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल लिहिले. त्यात त्याने घडलेल्या घटनांचे खूप परिणामकारक वर्णन केले. त्यामुळे सारा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.

आम्ही गणपती आणायला गेलो. आम्ही गणपती ट्रॅक्टर-टायलीत आणायला गेलो. गणपतीचे मंडळ आले की आम्ही ढोल, ताशा वाजवायचो. आम्ही गणपती मोठा आणला होता. गणपती उचलायला 30 माणसे लागत होती. गणपती ठेवतठेवत टायलीत चढवला. आम्ही गणपती आणताणा हार घेतला. गाणपती आणायला पाचला गेलो होतो. आम्ही नाऊ वा घरी आलो. आम्ही टायालीचा फळका काढला. गणपती उचलायला माणसांनी टायलीतून गणपती काढला. मग गणपती मंडळात बसत न्हवता म्हणून थोडा खाली घेतला. मग गणपती मंडळात बसला. ते करताकरता दहाला तरी आम्ही आरती केली. आम्ही गणपतीचे शर्ट शिवले गणपतीचे नाव लालबागचा राजा असे होते. गणपती 10 फुटाचा होता. गणपती शर्ट शिवल्यानंतर सजावट केली. मग मुलींनी गणपती पुढचे अंगण झाडले. मग मुलांनी अंगणात पाणी टाकले. मुलांनीच शेन आणले. मग मुलींनी सारवले. मुलींनी रांगोळी काढली. रांगोळीत श्रीगणेश लिहिले. मोठी रांगोळी काढली होती. आम्ही सकाळी पाच वाजता आरती करायचो. रात्री आठ वाजता आरती कारायचो. आकरा दिवस व्हायला एक दिवस राहिला होता. सकाळी गणपतीची पुजा केली. रात्री जेवण होते. म्हणून दुपारी जेवण करण्यासाठी सुरवात केली. जेवण पुरी भाजी भजी पापड गुलाबजाबुन हे होते. आरती झाल्यावर जेवण केले. उद्या आम्ही गणपती घेऊन कॅनेल जवळ जाणार. गणपती पाण्यात न्हेला मध्य भागी न्हेला. गणपती बुडला.

वेदांतप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनीही गणेशोत्सवाविषयी 10 दिवसांचे अनुभव लिहिले होते. कुणी ‘गौरी’विषयी लिहिले होते, तर कुणी विसर्जन मिरवणुकीविषयी लिहिले होते. ‘सण-उत्सव’ याप्रमाणेच लग्न, सहल, खेळ, प्रवास, परिसर भेट हेही विषय विद्यार्थ्यांना लिहायला खूप आवडतात.

सूचनांचा लेखनावर परिणाम

विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला माहितीपर लेखन करण्यास सांगितले. माहितीपर लेखनाचा पुरेसा सराव झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अनुभवाचा वापर करून लेखन कसे करता येईल याविषयी चर्चा केली. लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ शब्दभांडार असणे आवश्यक आहे. शब्दभांडार वाढवण्यासाठी मुलांसोबत गप्पा मारणे, गोष्टी सांगणे, गाणी, कविता म्हणून दाखवणे, एखाद्या विषयावर चर्चा करणे, गोष्टींची पुस्तके वाचणे या बाबींचा मी वापर केला. नव्याने आलेला प्रत्येक शब्द मुलांना मी नीट समजावून सांगत असे. एखाद्या विषयावर विद्यार्थ्यांना आपण जेव्हा माहिती लिहा असे सांगतो तेव्हा विद्यार्थी त्या विषयावर वर्णनात्मक लेखन करतात.

उदा: दिवाळी सणाविषयी माहिती लिहा असे सांगितले तेव्हा एका विद्यार्थ्याने पुढीलप्रमाणे लिहिले. दिवाळीत फटाके फोडतात. दिवाळीत किल्ला बनवतात. दिवाळीत कपडे आणतात. दिवाळीत रांगोळी काढतात. दिवाळीत लाडू, करंजा, कापण्या, शंकरपाळ्या, चकल्या. दिवाळीत संध्याकाळी पनत्या लावतात. दिवाळीत सैनिक आनतात. दिवाळीत आकाश कंदील लावतात. दिवाळीला सुट्टी असते. दिवाळीत मामाच्या गावाला जातात. दिवाळीत सामान आनतात. दिवाळीत मोती साबन किवा उठणे आनतात. दिवाळीत खूप मझ्झा येते. दिवाळी हा सन मला खूप आवडतो.

‘माहिती लिहा’ याऐवजी आपण जर ‘अनुभव लिहा’ असे म्हटले तर विद्यार्थी स्वतः दिवाळी हा सण कसा साजरा केला याविषयी लेखन करतात.

मी दिवाळीत कापण्या, शंकरपाळ्या, लाडू हे आईला  करू लागले. आईला कडीपत्ता चिवडयात टाकायला लागणार होता. मग मी तो आईला आणून दिला. मग आम्ही फटाके वाजवले. तेव्हा एक आजोबा झाडाखाली झोपले होते. मग मी त्यांना म्हणजेच आबांना उठवले आणि त्यांना सांगितले आबा आम्ही फटाके वाजवतोय तुम्ही तिकडे पेरूच्या झाडाखाली जावा आणि बसा. आम्ही पावसाळा, भुई चक्र, ऑटम बॉम, सुतळी बॉम, हे फटाके वाजवले. आम्ही करंज्या, कापण्या, लाडू, चिवडा हे पदार्थ खाल्ले. आम्ही तिथे झाडावर चढलो नारळ्याचा, पेरूच्या झाडावर चढलो. आम्ही भाऊबिजला मामा, आजोबा, शुभम भैय्याला अंघोळ घातली मग दुसऱ्या दिवशी मावशी आली. मग तिने येताना सैनिके आणली मग आम्ही तिसऱ्या दिवशी किल्ला केला आणि त्यावर सैनिक मांडली. मग आम्ही मावशीला विचारलं मावशी किल्ला कसला झाला आहे? मावशी म्हणाली छान झाला आहे मग आम्ही काकांचा टँम्पो धुवायला गेलो मग टँम्पो धुउन येताना काकांनी गाणे लावले होते. मग आम्ही नाचलो. मग मावशी आणि काका गेले.

याऐवजी आपण विद्यार्थ्यांना ‘दिवाळीसणाची गोष्ट लिहा’ असे सांगितले तर त्यांच्या कल्पनेला वाव मिळतो. कदाचित लेखनात एखादे गाव असेल, विविध पात्रं असतील, पात्रांना नावे देऊन त्यांच्यात घडलेला संवाद विद्यार्थी काल्पनिकरीत्या मांडतील. आमच्या विद्यार्थ्यांनी अशीच लिहिलेली एक गोष्ट :

एक गाव होते. त्या गावाचे नाव नागपूर असे होते. दिवाळी सण होता. त्या गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो सर्वांना मदत करत असे. त्या माणसाचे नाव राम होते. दिवाळी सण होता. म्हणून सगळ्या गावाला रामने आपल्या घरी बोलवले. सर्वांना कपडे, लाडू, करंजी, कानवले दिले. सर्वजन खूश झाले. रामने मुलांना फटाके दिले. मुलेसुद्धा खुश झाली. पण रामने त्यांना सांगितले की कधीसुद्धा फटाके वाजवू नका. मुले म्हणाली ठीक आहे. त्या गावात एक कुटुंब राहत होते. रामचा मुलगा रमेश त्याचा मित्र व त्याचे आईबाबा आले होते. रामने त्यांना खाली बसविले. रमेशने त्यांना दिवाळी दिली. ते खुश झाले. त्यांनी रामचे आभार मानले.

आपण जशा सूचना देऊ त्याप्रमाणे विद्यार्थी लेखन करत असतात. म्हणून माहिती लिहा असे न सांगता तुमचा अनुभव लिहा किंवा गोष्ट लिहा असे जर सांगितले तर विद्यार्थ्यांचे लेखन अधिक प्रभावी व परिणामकारक झाल्याचे दिसून येईल.

गोष्ट लिहिणे

अनुभवावर आधारित लेखनाचा सराव झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढच्या स्तरावर नेण्यासाठी स्वतःच्या शब्दांत गोष्ट लिहिण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला जरा विद्यार्थ्यांना स्वतः गोष्ट लिहिणे अवघड वाटले. कारण आपली गोष्ट पुस्तकातल्यासारखी येणार नाही अशी त्यांना भीती वाटे. परंतु त्यांना आपण स्वतः कल्पना करून गोष्ट लिहीत असल्यामुळे ती आपली स्वतःची गोष्ट आहे व ती बरोबर आहे असे सांगितल्यावर मुले गोष्ट लिहू लागली. मुलांनी स्वतःची गोष्ट लिहिण्यासाठी मी त्यांना तीन किंवा चार शब्द देत असे. हे शब्द सुरुवातीला विद्यार्थ्यांना सहजपणे गोष्ट लिहिता येईल असे होते. नंतर शब्द देताना त्यांना कल्पनाशक्तीचा जास्त वापर करावा लागेल, त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल असे पाहिले.

सुरुवातीला मी मुलांना काही गोष्टी तयार करून दाखवल्या. नंतर मुलांचा सहभाग घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून सामूहिकरीत्या गोष्ट तयार करून घेतली. नंतर गटा- गटात गोष्टी तयार केल्या. यामध्ये ज्यांचे लेखन चांगले आहे अशा विद्यार्थ्यांच्या गटात लेखनात मागे असणारे विद्यार्थी समाविष्ट केले. यामुळे विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून, अनुभवांचा वापर करून लेखन करत होते. लेखनात प्रगती झालेले विद्यार्थी मागे असणाऱ्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत होते, चर्चेमध्ये त्यांनाही स्थान देत होते. यामुळे लेखनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, लेखनात सुधारणा झाली व त्यांनाही लेखनाची दिशा मिळाली.

गट पद्धतीने लेखन झाल्यावर शेवटी व्यक्तिगतरीत्या गोष्टी लिहिल्या. गोष्ट लिहिण्यासाठी मुलांना शब्दांवरून पात्रं कशी निवडावी, पात्रांमध्ये संवाद काय झाला असेल? गोष्ट कोठे घडली? गोष्टीचा शेवट कसा करावा याविषयी बोलत राहिलो. टी.व्ही. वरील कार्टून्स, सिनेमे मुले पाहतात. शाळेत गोष्टी ऐकतात, गोष्टींची पुस्तके वाचतात. यामध्ये मिळणाऱ्या सर्व ज्ञानाचा, अनुभवांचा वापर मुले गोष्ट लिहिताना करत असल्याचे जाणवले. ‘गाय’ या विषयावर विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे लेखन, व चर्चेनंतरचे लेखन मी आपणासमोर मांडलेच आहे. यानंतर मी विद्यार्थ्यांना महाश्वेता देवी यांचे ‘आमची भन्नाट गाय’ हे पुस्तक वाचून दाखवले.  

‘आमची भन्नाट गाय’ हे पुस्तक खूपच मजेशीर आहे. गोष्ट ऐकताना मुले अगदी रंगून गेली होती. मी गोष्ट वाचताना पुस्तकातील गाय व त्यांच्या परिसरातील गाय यांची तुलना केली. त्यांचे अनुभव वर्गात आणले. गोष्टीच्या सुरुवातीला लेखिकेने ‘आमची गाय चहा पीत होती, भात खात होती’ असे वर्णन केले आहे. हे ऐकल्यानंतर मुलांना आश्चर्य वाटले. मुले म्हणाली, ‘गाय कधी चहा पिते होय? आमची गाय चहा पीत नाही.’ त्यानंतर गाईचे नाव ऐकल्यानंतर तर वर्गात खूप हशा पिकला. मुलांनी आतापर्यंत कधीही न ऐकलेले नाव होते ‘न्यॅदोश’. मुलांना माहित असलेली कपिला, राणी, गंगा, कृष्णा अशी नावे त्यांनी सांगितली. लेखिकेच्या आईने एका मुलाकडून गाय विकत घेतली होती. तेव्हा आपल्या मालकाने आपल्याला विकले म्हणून गाईने त्याची केलेली गंमत ऐकून मुलांना मजा वाटली. पण आपल्या आई-वडिलांपासून दूर होताना आपल्याला कसे वाटेल? असा प्रश्न विचारल्यावर मुले म्हणाली, आम्हाला वाईट वाटेल, आम्हाला रडू येईल.

श्रुती म्हणाली, मी आमच्या मामाच्या गावाला गेले होते तेव्हा मला मम्मीची खूप आठवण येत होती, म्हणून मी रडू लागले. मग माझ्या मामाने दुसऱ्या दिवशी घरी मम्मीकडे आणले. गाईने मालकाचे धोतर फाडले, चघळले, मालकाला तळ्यातून बाहेर येऊ दिले नाही हे प्रसंग वाचताना मुले खूप हसली. पण तिने असे का केले हे समजल्यावर अनुष्का म्हणाली, आमची गाय विकली तेव्हा आमचा समर्थ खूप रडला आणि काकांना म्हणाला की मला गाय पाहिजे, आताच्या आता गाय आणा. त्यानंतर लेखिकेच्या घरात नऊ भावंडे होती हे ऐकून मुलांना आणखीनच धक्का बसला. आताच्या विभक्त आणि लहान कुटुंबाची माहिती (अनुभव) असणाऱ्या मुलांना नऊ भावंडे हे जरा वेगळेच वाटले. लेखिकेने भावंडांचे वर्णन करताना वापरलेली विशेषणे, उपमा ऐकून मुले खूप हसली.

‘न्यॅदोश’ पुस्तके खात होती, यावर मुले म्हणाली, ही असली कसली गाय आहे? चहा पिते, भात खाते आणि आता काय पुस्तके खाते. ओम म्हणाला, अशी गाय खरोखर होती का? ही गोष्ट खरेच घडली आहे का? सुशांतला प्रश्न पडला, गाईने पुस्तके कशी खाल्ली असतील? यावर कहर म्हणजे गाय मासे, मटण खेकडे खात होती असे लेखिकेने लिहिले आहे. यावर मुलांचे चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. ओम म्हणाला, काय? गाय मासे खाते? तिला काटे टोचले नसतील होय? मला पण मासे खूप आवडतात. आमचे पप्पा गावात गेल्यावर मासे आणतात. आमच्यात कोंबड्या खूप आहेत. आमच्यात उद्या कोंबडा कापायचा आहे. आपण तर लय मटण खातो, रसा पितो. यावर श्रावणी म्हणाली, आमच्या खेळाला तर दोन बकरी कापतात. गाईने मासे मिळवण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न, तिने केलेला स्वयंपाकघरातील प्रवेश, घरात घातलेला गोंधळ त्यामुळे घरातल्या लोकांची तारांबळ हा प्रसंग ऐकून मुले खूप हसली.

गाईपासून मासे वाचवण्यासाठी लेखिकेच्या आईने ते तिच्या तोंडाला येऊ नयेत म्हणून उंचावर ठेवले होते. मग मी मुलांना प्रश्न विचारला, तुमची आई तुमच्यापासून एखादा पदार्थ, वस्तू लपविण्यासाठी काय करते? श्रद्धा म्हणाली, आमची आई तर दिवाळीत लाडूचा डबा कपाटावर ठेवते. रिया म्हणाली, आमची आईपण आमच्या हाताला येणार नाही अशा उंच ठिकाणी ठेवते. ओम म्हणाला, आईने उंचावर डबा ठेवल्यावर मी किचनवर चढून डबा काढतो अन्‌ लाडू घेतो. कुणाल म्हणाला, मी आणि आमचा दादा तर काय करतो माहिती आहे का? दादा खाली वाकतो आणि मी त्याच्या पाठीवर उभा राहून खाऊचा डबा काढतो अन्‌ खाऊ खातो. खरी गंमत तर तेव्हा आली जेव्हा गाय दारू पिल्याचा प्रसंग आला.

श्रुती म्हणाली, ही असली कसली गाय आहे, ही कायपण खाते, कायपण पिते. गाय दारू पिते हे ऐकल्यावर ओम लगेच म्हणाला, आमच्यात वशाटाचे कालवण, मटण करतात तेव्हा माझे पप्पा आणि साहिलचे पप्पा टाकून येतात. मी म्हटले, टाकून येतात म्हणजे काय? तेव्हा तो म्हणाला, म्हंजी, अहो सर, ते दारू पिऊन येतात. श्रावणी म्हणाली, आमच्या शेजारचे गवळीमामा तर रोज पिऊन येतात अन्‌ शिव्या देतात, गाणी म्हणतात. श्रद्धा म्हणाली, संस्कारचे मामा तर लय प्यायचे, त्यांना तर पुण्यालाच न्यावं लागलं, ते लय आजारी आहेत. मग मी विचारले, दारू पिणं चांगलं की वाईट? तेव्हा सगळी मुले म्हणाली, सर दारू पिणं वाईट असतं.

त्यानंतर गाईने पोलिसांची केलेली गंमत, पोलिसांनी गाईविरुद्ध दाखल केलेला खटला, गाय त्रास देत होती म्हणून तिला गोठ्यात ठेवण्याचा निर्णय, गोठ्यातून बाहेर येण्यासाठी गाईने केलेली धडपड इत्यादी प्रसंग मुलांनी लक्षपूर्वक ऐकले व आपले अनुभव कथन केले.  लेखिकेच्या शेजारच्या काकांची गंमत मुलांना खूप आवडली. न्यॅदोश गाय चारा खाण्यासाठी गच्चीवर जिना चढून जायची. शेजारचे काका फक्त पौर्णिमेच्या रात्री आकाशातील पूर्ण चंद्र पाहण्यासाठी त्यांच्या घराची खिडकी उघडायचे. पण एके पौर्णिमेला रात्री न्यॅदोश बरोबर त्या काकांच्या खिडकीसमोर उभी राहिली अन्‌ काकांना चंद्राऐवजी न्यॅदोशचे दर्शन घ्यावे लागले.

न्यॅदोश आजारी पडली आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. या प्रसंगावेळी मी मुलांना विचारले, आपण आजारी पडल्यावर आपले आई बाबा काय करतात? तनुजा म्हणाली, आई आपली काळजी घेते. साहिल म्हणाला, माझे पप्पा मला डॉक्टरांकडे नेतात. श्रुती म्हणाली, डॉक्टर आपल्याला गोळ्या, औषधे देतात. मग आपल्याला बरं वाटतं. न्यॅदोशने उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांची कशा प्रकारे फजिती केली हे ऐकल्यावर मुलांना खूपच मजा आली. पण जेव्हा कोणत्याही डॉक्टरांना उपचार करू न दिल्यामुळे न्यॅदोशला शेवटी हे जग सोडून जावे लागले या प्रसंगावेळी मात्र सर्व मुले गंभीर झाली. श्लोक म्हणाला, डॉक्टरांकडून तपासून घेतलं असतं तर डॉक्टरांनी तिला बरं केलं असतं. अशाप्रकारे ‘आमची भन्नाट गाय’ हे पुस्तकवाचन करतेवेळी मुलांनी आपले अनुभव, विचार मांडले.

यानंतर मी मुलांना न्यॅदोश आणि आपली गाय यांची तुलना करून लेखन करण्यास सांगितले. ‘आमची भन्नाट गाय’ ही गोष्ट लिहिण्यास सांगितले. तेव्हा मुलांनी चांगली तुलना केली. गोष्टीतील काही प्रसंग त्यांनी आपल्या लिखाणात उतरवले होते आणि यावेळचे लेखन पूर्वीच्या लिखाणापेक्षा निश्चितच प्रभावी होते. मुलांमध्ये बदल घडवताना मला माझ्यातसुद्धा काही बदल करावे लागले. सुरुवातीला माझी शिकवण्याची पद्धत ही जुनी, प्रचलित पद्धत होती. शिक्षकांनी सांगायचे आणि मुलांनी ऐकायचे, शिक्षक सांगतील तेच बरोबर. मुले स्वतःहून लिहू शकत नाहीत म्हणून त्यांना निबंध फळ्यावर लिहून देणे, मुद्यावरून गोष्ट तयार करताना त्याने स्वतः ऐकलेली, वाचलेली गोष्ट तयार करण्यास देणे. मुलांनी वर्गात बोलायचे नाही, प्रश्न विचारायचे नाहीत, इत्यादी पण प्रकल्पाच्या निमित्ताने ज्ञानरचनावादाबद्दल जेव्हा वाचले, ऐकले, तेव्हापासून माझ्या अध्यापन पद्धतीत, मुलांशी वागण्याच्या पद्धतीत बदल होत गेला.

मुलेसुद्धा विचार करू शकतात, स्वतःहून शिकू शकतात, लिहू शकतात याची मला जाणीव झाली. सुरुवातीला उभा राहून शिकवणारा मी आता मुलांसोबत बसून त्यांच्याशी मुक्तपणे गप्पा मारू लागलो, चर्चा करू लागलो त्यामुळे मुलांच्या मनात माझ्याविषयी असणारी भीती दूर झाली. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध जेवढे जिव्हाळ्याचे असतील तेवढे अध्ययन-अध्यापन सुकर होते. वर्गात जर भयमुक्त वातावरण असेल तर त्याचाही शिक्षणाच्या दृष्टीने चांगला फायदा होतो. भयमुक्त वातावरणात विद्यार्थी जास्त सहभागी पण होतात. एखादा पाठ किंवा कविता पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शिक्षकांनी धडा वाचायचा, अर्थ समजावून सांगायचा, शब्दार्थ लिहून द्यायचे आणि प्रश्नोत्तरे लिहिण्यास सांगायचे असे शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांशी चर्चा करून, त्यांचे अनुभव विचारून, परिसरातील घटनांचा त्याच्याशी संबंध जोडून, विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शिकवले तर ते नक्कीच अधिक परिणामकारक झाल्याचे व मुलांना व्यवस्थित समजल्याचे दिसून येते.

या सगळ्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. मुलांसोबत मी खेळू लागलो, गाणी म्हणू लागलो. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा भावनिक विकासही होऊ लागला.

Tags: प्राथमिक शिक्षण अनुभव आणि धडे शिकवण्याची पद्धत निमित्त शिक्षक दिन teaching method nimitta shikshak din dnyaneshwar kadam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ज्ञानेश्वर शांताराम कदम

उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके