डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अरे बापरे!... हे कसं शक्य आहे?' मी स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणालो. 'काहीही शक्य आहे' दामोदरन म्हणाले, 'एकदा पंतप्रधानांचा त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खून केला की काहीही शक्य आहे.' दामोदरन् काही शीखविरोधी नव्हते. त्यांचे वाक्य वस्तुस्थिती निदर्शक होते. पण मला अस्वस्थ वाटत होते. संपूर्ण दिल्ली कोणत्या तरी मानसिक आजारातून जात असावी असे वाटले.

दूतावासातील नोकरीचे एक वैशिष्ट्य असे, की भारताची नाळ कधीच तुटत नाही. विदेशात असूनही राजनीतिज्ञाला दररोज भारत भेटतच असतो. खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांचे जीवन वेगळे असते. त्यातील बहुसंख्य भारतीयांना भारत सतत भेटण्याचे कारण नाही. कुणी माहिती तंत्रज्ञान, कुणी आयात निर्यात, तर कुणी बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करतो. त्यांचा भारताशी सुरुवातीला असणारा घनिष्ठ संबंध, हळूहळू क्वचित् होणाऱ्या भारतभेटी, अधूनमधून मिळणारी किंवा लिहिली जाणारी पत्रं आणि व्हिसा किंवा पासपोर्टसाठी होणाऱ्या दूतावासातील चकरा यांच्यापुरता मर्यादित राहतो. मनाने किंवा भावनेने भारताशी जोडले जाऊनही दररोजच्या व्यवहारात त्यांची व भारताची पूर्ण फारकत असते. दूतावासात तसे होत नाही- ‘भारत' हेच आमचे काम असते. भारतात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे बरे-वाईट पडसाद दूतावासाच्या इमारतीत लगेच ऐकू येतात. बाबरी मशिदीवरचा हल्ला असो; किंवा सुरतेतील प्लेग, भोपाळमधील गॅस दुर्घटना असो; या पोखरणमधील अणुस्फोट, कारगिल युद्ध असो वा दक्षिण भारतातील त्सुनामी, प्रत्येक घटनेचा परिणाम कामकाजावर होताना मी पाहिला आहे.

आता प्रत्येक घटना इंटरनेट, इ-मेल, रात्रंदिवस टीव्हीवार्ता यांच्यामुळे तत्काळ कळतात. पूर्वी असे व्हायचे नाही. कधी वृत्तपत्रांत तर कधी दूरध्वनीद्वारे, कधी तारेने अशा घटना कळायच्या. इन्स्टंट जमाना आला, तशी इन्स्टंट वार्ता मिळू लागली. 1984 मध्ये मात्र असे नव्हते.

ऑक्टोबर 1984 मध्ये दोन घटना घडल्या. तेव्हा मी जपानमध्ये होतो. माझ्या चुलतबहिणीच्या मृत्यूचे वृत्त मला फोनवर कळले. त्याच महिन्यात 31 ऑक्टोबरमध्ये मी माझे जपानी वर्ग संपवले आणि सहज म्हणून दूतावासात जाऊन तेथील ग्रंथालयात थोडा वेळ नवी पुस्तके चाळावीत असे ठरवले. भुयारी रेल्वेने मी दूतावासात पोहोचलो, तेव्हा साधारण तीन वाजले असावेत.

दूतावासाच्या पायऱ्या चढत असताना दूतावासाचे दार उघडून बाहेर येणारे श्री.आर्या नावाचे एक अधिकारी दिसले. मी सवयीने 'नमस्कार' म्हटले, तेव्हा प्रतिनमस्काराऐवजी 'आपको पता चला की नही?' असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्याचा महासागर होता.

‘नही तो? क्या? कुछ हो गया क्या?’ मीही तात्काळ चिंताग्रस्त होऊन विचारले. मला वाटले माझ्या जपानी शाळेने दूतावासाला पाठवलेल्या प्रगतीपत्रकात माझ्या जपानी भाषेच्या ज्ञानाविषयी जरूर काही नकारात्मक शेरे मारले असणार!

‘श्रीमती इंदिरा गांधी की हत्या हो गयी.’

‘माय गॉंड, अरे बापरे! क्या और कैसे हुआ यह हादसा?’

इंग्रजी-मराठी-हिंदी सगळ्या भाषांमधून मी मला बसलेला धक्का व्यक्त केला.

‘अभी ठीक पता नहीं चला... कहते है उनके सुरक्षा गार्डौने उनको मार दिया...’

'मेरा तो विश्वास ही नही हो रहा है...' माझा खरोखरच विश्वास बसत नव्हता. खरे तर त्या बातमीने भय, चिंता, दुःख अशा सगळ्यांचे एक अजब मिश्रण मनात तयार झाले. मी इंदिरा गांधींचा चुकूनही चाहता नव्हतो. मला आणीबाणीतील वर्षाबद्दल थोडीफार चीडच होती. पण तरीही मला अपार दुःख झाले. त्या माझ्या व माझ्या देशाच्या पंतप्रधान होत्या. माझ्या पंतप्रधानांची गोळी मारून हत्या करण्यात आली, ही बातमीच मन स्वीकारायला तयार नव्हते. एक अत्यंत जगावेगळी अनाथपणाची भावना दाटून आली. त्यावेळी मी भारतात असतो तर मला नेमके तसेच वाटले असते का, याची मला खात्री नाही.

मी घरी परतलो आणि दूरचित्रवाणीचा पडदा उघडला. एकीकडे पंतप्रधानांची हत्या आणि दुसरीकडे शीख समुदायाविरुद्ध दंगलींचे विदारक चित्र, माणूस नावाच्या प्राण्याच्या अधःपतनाचे साक्षात् दर्शन सुदैवाने स्टार न्यूज, झी टीव्ही वगैरे वरून त्या काळात नव्हते. आजकालच्या वृत्तवाहिन्यांना दंगली, गुन्हे, रक्तपात म्हणजे आवडीची रसद झाली आहे. श्रीमती गांधींची हत्या करणारे त्याचे सुरक्षा कर्मचारी धर्मवेडाच्या सूडाच्या भावनेने पछाडले होते, ते निंद्यच होते. पण संपूर्ण समाजसुद्धा दृष्टी गेल्यासारखा वागतो. त्याच समाजातील नेतृत्व त्यांना समजावण्याऐवजी भडकावण्याचे काम करते. माणसे घरातून बाहेर काढली जातात. त्यांना जिवंत मारले जाते, जाळले जाते.

टीव्हीवर ते सगळे पाहता शरमेने मान खाली तर गेलीच, पण आपण पाच हजार वर्षांच्या गौरवशाली संस्कृतीचे वारसदार वगैरे खरोखरच आहोत का, हा प्रश्न पडलाच पडला. प्रत्येक समाजाच्या इतिहासात असे भ्रष्ट क्षण येतात, पण तरी त्याचे समर्थन करणे अक्षम्य आहे. आज एकवीस वर्षानंतरही या लोकांना... ज्यांची घरे जाळली गेली, घरातली माणसे मारली/ जाळली गेली, त्यांतील बहुसंख्यांकांना ना नुकसानभरपाई मिळाली आहे; ना न्याय.

तो दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत दुःखदायी होता. दुसऱ्या दिवशी दंगली तशाच चालू राहिल्या. माझे मन सुन्न झाले. दंगल फक्त दिल्लीतच सुरू नव्हती; ती माझ्या मनातही सुरूच होती. 

संध्याकाळी फोन खणखणला. रिसीव्हर उचलला. पलीकडे कार्यालयातील एक कर्मचारी श्री. दामोदरन् होते.

‘बातमी कळली का?' ते थोडेसे दबल्या आवाजात बोलत होते.

'मी टीव्ही पाहतोय. किती लज्जास्पद घटना घडताहेत. आपण भारतीय आहोत याची लाज वाटणारे असे हे क्षण आहेत.' मी उद्विग्नतेने बोललो.

'ग्रोवर साहेबांचे कळले का?" दामोदरने विचारले.

‘काय? काय झाले?' मी विचारले. मोहिंदर ग्रोवर हे दूतावासातील दोन शिखांपैकी एक. पण सुदैवाने दोघेही तोकियोत होते.

‘फार वाईट झाले. त्यांच्या भावाचाही खून झाला दिल्लीत.'

क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी विचार करत होतो, की दंगली फक्त दिल्लीत होत्या; पण ती दंगल आणि तिची झळ तोकियोपर्यंत केव्हाच पोहोचली होती.

‘अरे बापरे!... हे कस शक्य आहे?’ मी स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणालो.

'काहीही शक्य आहे,' दामोदरन म्हणाले, 'एकदा पंतप्रधानांचा त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खून केला की काहीही शक्य आहे.’ दामोदरन् काही

शीखविरोधी नव्हते. त्यांचे वाक्य वस्तुस्थिती निदर्शक होते. पण मला अस्वस्थ वाटत होते. संपूर्ण दिल्ली कोणत्या तरी मानसिक आजारातून जात असावी असे वाटले.

मी श्री. ग्रोवरना फोन केला. सहानुभूती व्यक्त केली. पण माझ्या शब्दांना कसलाच अर्थ नव्हता. माझे सगळे प्रश्न पोकळ होते. फक्त भावना खऱ्या होत्या, पण त्यामुळे वस्तुस्थितीत बदल करण्याचे सामर्थ्य येत नाही. ग्रोवरना 'मी नेमके काय झाले,' असे विचारले. त्यांनाही पूर्ण कल्पना नव्हती. एवढेच कळले होते की त्यांच्या भावाचा भर रस्त्यावर जाळून खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह दिल्लीतील कुठल्या तरी इस्पितळात नेण्यात आला होता, पण तो कुठे आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. 

श्री. ग्रोव्हर दिल्लीला जाण्याची तयारी करत होते. दोन भावांपैकी आता फक्त ते एकटे शिल्लक होते. त्यांची म्हातारी आई दिल्लीत होती. श्री. ग्रोव्हरांची शोकांतिका शब्दांपलीकडची होती. ग्रोव्हरांच्या भावाप्रमाणेच शेकडो शिखांना मारल्याची बातमी होती. दिल्लीतील दंगली अजून शमल्या नव्हत्या. ग्रोव्हरही पगडी वापरत होते. अशा दंगलीत दिल्लीला कसे जाणार? तिथून ते सुरक्षित परत कसे येणार, बाबत मला चिंता वाटत होती. 'सांभाळून प्रवास करा व सुरक्षित परत या' एवढे बोलण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. का कुणास ठाऊक; पण ग्रोवरांच्या भावाच्या खुनाला आपणही जबाबदार आहोत, असे वाटत राहिले.

ग्रोव्हर भारतात गेले. आठ दिवसांनी ते परतले. या वेळेस त्यांच्याबरोबर त्यांची आई होती. आता भारतात तिची देखभाल करण्यासाठी कुणीच उरले नव्हते. श्री.ग्रोवर त्यानंतर संपूर्णपणे बदलले, ते निराशावादी झाले. ते संशयी झाले. मुळात बुद्धिमान अशा या अधिकाऱ्याचे संपूर्ण नकारात्मक माणसात रूपांतर झाले. भारत सरकारने त्यानंतर त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग दिली, आईला बरोबर नेण्याची परवानगी दिली, वेळच्या वेळेस बढती दिली पण भारत सरकार त्यांचा भाऊ त्यांना परत देऊ शकले नाही. दिल्लीच्या भर रस्त्यावर काहीही गुन्हा नसताना त्याला जाळून टाकले होते.

विदेशात दूतावासात काम करताना भारताच्या चांगल्या-वाईट प्रतिमेचा कामावरही परिणाम होताना दिसला.

बहुतेक दूतावासात माहिती व जनसंपर्काचे काम करणारा एक अधिकारी असतो. या अधिकाऱ्याची जी कामे असतात, त्यांतील एक काम भारतीच्या (चांगल्या) प्रतिमेचे दर्शन विदेशी जनतेला करवणे असे असते. मी जपानला पहिल्यांदा चार वर्षे होतो, तेव्हा (1984-88) भारताची प्रतिमा एक सुमार देश अशी होती. साप गारूडी, झोपडपट्ट्या, अपघात, भयानक गरिबी, विषमता, रस्त्यावर सर्रास फिरणारे वाघ व हत्ती इत्यादी... यांचा देश म्हणजे भारत अशी ही सर्वसाधारण प्रतिमा होती. भारताने 1974 ला अणुस्फोट केला; त्याच्याकडे उपग्रह निर्माण करण्याची क्षमता आहे; शास्त्रीय उच्चविद्याविभूषित असा एक मोठा वर्ग आहे, याचे त्यांना अजिबात कौतुक नव्हते.

मुख्य म्हणजे भारतात लोकशाही आहे आणि नियमित निवडणुका होतात, याचाही अनेकांना परिचय नव्हता. सगळ्या बातम्या पाश्चात्त्य वृत्तसेवांकडून उचलायचा जपानमध्ये प्रघात होता. योमिडरी शिंबुन, जिजी प्रेस या जपानी वृत्तसेवांचे भारतातील प्रतिनिधीसुद्धा ज्या बातम्या किंवा लेख पाठवायचे तेसुद्धा असेच भारतीय व्यवस्था, अवस्था यांचे दयनीय 'दर्शन' घडवणारे असायचे, भारत म्हणजे प्रगती किंवा सगळ्या चांगल्या गोष्टींचे प्रतीक नाही हे माहीत असूनही विदेशातील ते भारत-दर्शन सुन्न करणारे असायचे.

अधिकाऱ्यांच्या बैठकीत आम्ही वारंवार या विषयाची चर्चा करीत असू. पण प्रत्यक्षात फार करणे शक्य नाही, असाच निष्कर्ष निघायचा. दूतावासाचे भारत प्रतिमा दर्शनाचे उपक्रम होते, नाही असे नाही. त्यात चित्रपट दाखविणे, माहिती दाखवणे, काही पत्रकारांशी संपर्क ठेऊन त्यांना भारताविषयी चांगले लेख देण्याविषयी प्रवृत्त करणे, वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर पत्रके कातून ती प्रमुख वृत्तपत्रे वृत्तसेवांना पाठवणे, भारताच्या बातम्या ‘इंडिया न्यू' नावाच्या पुस्तिकेतून दर महिन्यास प्रसिद्ध करणे वगैरे... स्थानिक वृत्तपत्रे स्वतंत्र तर होतीच; पण दूतावासातून प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकांना विश्वासार्ह मानण्याची प्रथाही अजिबात नव्हती.

एकदा 'योमिउरी शिंबुन' या वृत्तपत्रात भारतातील दारिद्र्य, झोपडपट्ट्यांविषयी एक लेख आला. सोबत एक शिसारी आणणारा गरिबीचा फोटोसुद्धा होता. अधिकाऱ्यांच्या बैठकीत असे ठरले की श्री. पी.के.दाबला या माहिती विभागाच्या प्रमुखांनी त्या वृत्तपत्राच्या संपादकांची भेट घ्यावी व भारत म्हणजे दारिद्र्य नव्हे हे समजावून सांगावे. मीही त्यांच्याबरोबर जावे असे ठरले. त्यामुळे मी थोडा उत्साहित झालो.. पण प्रयत्न करूनही आम्हांला संपादकांची वेळ मिळाली नाही. शेवटी मोठ्या कष्टाने (आणि परत भाग्याने) 'योमिउरी शिंबुन' या जगातल्या सर्वांत मोठा खप असलेल्या (त्यावेळेस म्हणजे 1986-87 मध्ये 75 लाख वर्गणीदार) वृत्तपत्राच्या विदेश विभागाच्या उपसंचालकाची वेळ मिळाली. 

त्या वृत्तपत्राचे कार्यालय कित्येक मजल्यांचे तर होतेच. पण एकंदरीतच मनावर दडपण आणणारे होते. भारत किंवा ‘इंडिया' या शब्दांना अजून महत्त्व यायच्या आधीचा तो काळ होता. आम्ही त्या जपानी उपसंचालकाच्या खोलीत आलो, खोली नव्हती ती. तो एक मोठा हॉल होता. त्यात जपानी व्यवस्थेप्रमाणे सर्व श्रेणीचे लोक आपापली टेबले टाकून बसले होते. त्यांच्यामध्येच एक थोडीशी मोकळी जागा होती, त्यात एक सोफा व दोन-तीन खुर्च्या होत्या. आम्ही स्थानापन्न झालो. 

आमच्या भेटीचा उद्देश श्री. दाबला यांनी समजावून सांगितला. "भारताविषयी फक्त गरिबी, दंगली, संप, मोर्चे, झोपडपट्ट्या याबाबतच्या नकारात्मक बातम्याच तुम्ही छापता, भारतात याशिवाय महान लोकशाही अपूर्व संस्कृती, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक, प्रगत अंतराळ संशोधन वगैरे वगैरेसुद्धा आहे याची नोंद तुम्ही का घेत नाही? प्रत्येक समाजात वाईट गोष्टी असतातच; पण बातम्या देताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे वगैरे वगैरे... आमची विनंती अशी की तुम्ही भारताविषयी समतोल बातम्या द्या. फक्त झोपडपट्ट्या व भिकाऱ्यांचे फोटो देऊ नका.... त्या उपसंचालकाने कोणतीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर न आणता सगळे ऐकले. खरे तर तो ऐकत होता की नाही कुणास ठाऊक? त्याचे मुळातले छोटे डोळे त्याच्या मनातले विचार अजिबात कळू देत नव्हते.

दाबलांचे बोलणे संपल्यानंतर त्याने, आपण जागे आहोत असे दाखवले. हाताने ‘थोडी वाट पहा' असे सांगत तो उठला. शेजारच्या टेबलावरची तीन-चार वृत्तपत्रे उचलली. पुन्हा परत येऊन बसला.

(क्रमशः)

Tags: शीख दंगली खून इंदिरा गांधी दूतावास जपान riots murder indira Gandhi ambassy japan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके