डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गेल्या 20 वर्षापासून ज्ञानेश्वर मुळे भारतीय विदेश सेवेत (आय.एफ.एस.) कार्यरत आहेत. त्यांनी जपान, रशिया व मॉरिशस येथील भारतीय वकिलातीत काम केले आहे. सध्या ते दमास्कस (सीरिया) येथील भारतीय वकिलातीत उच्चाधिकारी आहेत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांतून त्यांनी काव्यलेखन केले आहे. त्यांचे 'माती, पंख आणि आकाश' हे आत्मकथन यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' हे दुसरे आत्मकथानात्मक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे, प्रशासनातील 'रंगी-बेरंगी' अनुभव ते सांगणार आहेत 'साधना' च्या वाचकांना... दर पंधरा दिवसांनी 'नोकर-शाई' चे रंग या लेखमालेतून…

फोनची घंटी वाजली, तो इंटरकॉम होता. मी उचलला.

'हॅलो मुले साब है क्या?’ 

'हां, बोल रहा हूँ’

‘सर, कोई जगदाले महाराष्ट्र से आये है. आपसे मिलना चाहते है, भेज दूं सर?’

मी एक महत्वाची फाईल वाचत होतो... कारण एक महत्वाची नोट लिहायची होती मला.... एक महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक दोन दिवसांत होणार होती... या महत्त्वाच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार होती.... ही चर्चा, सामान्य माणसाच्या भेडसावणाऱ्या दररोजच्या वस्तूंच्या भाववाढीच्या संदर्भात होती!... पण हा सामान्य माणूसच खाली स्थागतकक्षात उभा होता.

मी फाईल वाचून नोट बनवू, की खाली वाट पाहणाऱ्या श्री जगदाळेंना भेटू, असा प्रश्न स्वतःलाच विचारला.

‘उनको उपर भेज दीजिए,' मी फोनवर स्वागत अधिकाऱ्यास सांगितले. श्री.जगदाळे. आणि माझा परिचय नव्हता. पण महाराष्ट्रातून आलेल्या माणसाला भेटणे, मी माझे कर्तव्य समजत आलो आहे. मी जगदाळेंचे हसून स्वागत केले. सेक्रेटरीला चहाची व्यवस्था करायला सांगितली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.

जगदाळे निघाले जयसिंगपूरचे. स्वतःच्या हिंमतीने त्यांनी जयसिंगपूरच्या माळावर छोटे नंदनवन फुलवले आहे.

मुंबई-पुण्यातील चांगली नोकरी सोडून जगदाळेंनी अवघड मार्ग निवडला होता, एवढेच नव्हे, तर आपले उत्पादन ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगल्या भावाने विकत होते.

"आमच्या उत्पादनाशी गुणवत्तेच्या बाबतीत भारतातील मोठ्या कंपन्याही स्पर्धा करू शकत नाहीत”, असं जगदाळे म्हणाले, तेव्हा मला अभिमान वाटला. हा साध्या कपड्यातील मराठी माणूस, मला असामान्य वाटला. तब्बल दोन तासांच्या सरकारी वेळेचा अपव्यय करताना, मला अजिबात ताण वाटला नाही. कारण हा माणूस 'वेगळा' होता. बरेच काही नवे सांगत होता. माझी ती महत्त्वाची सरकारी 'नोट' उद्यापर्यंत लांबली. तर फारसे बिघडणार नव्हते.

“ते निघायला उठले तेव्हा मी सहज विचारल कार्यालयात आत येताना त्रास तर झाला नाही ना?”

"मी साडेअकरा वाजता खाली आलो होतो. दीड वाजता तुमची भेट झाली.”

“काय? पण आधी फोन का नाही केलात तुम्ही?"

“मी आल्यापासून स्वागत अधिकाऱ्यांना सांगत होतो. सुरुवातीला अर्धा तास तर त्याने माझ्याकडे पहायलासुद्धा नकार दिला. त्यानंतर तो फोन उचलायचा, नंबर फिरवायचा व 'साब करमरेमे नही है', म्हणून ठेवायचा.”

“अरे पण आज सकाळपासून मी तर माझ्या खोलीतच आहे. आणि माझा फोनही वाजला नाही. स्वागत अधिकारी खोटं बोलतोय....”

“ते तुम्हालाच माहीत, मी मात्र अडीच तास खाली वाट पहात बसलो होतो.”

“पण आधी का सांगितलं नाहीत तुम्ही?”

“सांगून काय फायदा साहेब? सरकारी कार्यालयाचे यापेक्षा वाईट अनुभव घेतले आहेत आम्ही! अडीच तास त्या मानाने काहीच नाहीत!”

“अरे पण तुम्ही सांगितलं नाहीत, तर कळणार कसं आम्हाला?"

“साहेब हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाही, आणि दुसरं मी तुम्हांला सांगितल्यानं हा प्रश्न सुटणार आहे, असं मलाही वाटत नाही. मी तुम्हाला कशाला कोड्यात टाकू? तुम्ही भेटलात यातच मला आनंद आहे. काही मराठी अधिकारी भेटायलासुद्धा तयार नसतात. कारण महाराष्ट्रातून एवढ्या दूर भेटायला येणारा माणूस काही तरी समस्या घेऊनच येणार, याची त्यांना खात्री असते”....

“पण यात गैर काय आहे...? माणसाच्या समस्या असणारच”...

“साहेब एवढ्या वर्षांच्या सर्व्हिसनंतर तुम्ही अजून अडाणीच दिसता.” जगदाळे निघून गेले. पण जाताजाता संपूर्ण व्यवस्थेविषयी, जबरदस्त भाष्य करून गेले, मी धका बसल्यासारखा काही काळ खुर्चीवर तसाच बसून राहिलो.

या साध्या प्रसंगात, माझ्या दृष्टीने फार मोठे तात्पर्य लपले होते. ज्या सामान्य माणसाचे नाव घेऊन निवडणुका लढवल्या जातात, ज्यांच्या नावावर राज्य केले जाते. आणि ज्यांच्या सोयीसाठी अवाढव्य सरकारी यंत्रणा उभारली गेली आहे, त्या जनतेला सरकारी इमारतींमध्ये प्रवेश करणेसुद्धा कठीण आहे... याउलट उद्योगपती, राजकारणी, दलाल, मध्यस्थ व इतर भानगडखोर लोक सरकारी इमारतीच्या प्रशस्त कॉरिडॉर वाट्टेल तसे भटकत असतात... त्यांना परवानगी लागत नाही... त्यांना गेटवरचा सुरक्षा कर्मचारी अडवत नाही...

हा सगळा प्रकार आहे तरी काय? या सगळ्यांचा उलगडा हळूहळू होत गेला.

उद्योगभवनात मी 1989 पासून 1992 पर्यंत जवळजवळ साडेतीन वर्षे होतो. अप्पर सचिव या पदावर मी काम करत होतो. अप्पर सचिव ही मंत्रालयातील अधिकाऱ्यांची सगळ्यांत खालची पायरी, पण अप्पर सचिवांच्या हाताखालीसुद्धा प्रभाग अधिकारी, कारकून यांचा एक ताफा असतो. जाने. 1989 मध्ये उद्योग भवनात प्रवेश केला तेव्हा मंत्रालयातील कार्यपद्धतीचा मला गंधही नव्हता. जपानमध्ये तीन चार वर्षे काढल्यानंतर थोडासा हवेतच होतो. नव्या कल्पना, नवा विचार, सकारात्मक बदल यांनी झपाटलो होतो व म्हणूनच विदेश मंत्रालयाने मला न विचारता वाणिज्य मंत्रालयाकडे डेप्यूटेशनवर पाठवले. तेव्हा आढेवेढे न घेता जायला तयार झालो. विदेश मंत्रालयातील अनेकांच्या दृष्टीने इतर मंत्रालये कमी दर्जाची होती. काहींच्या मते इतर मंत्रालयातील आय.ए.एस. अधिकारी विदेश सेवेतील अधिकाऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत. आपण स्वतः दुसऱ्या मंत्रालयात जाऊन काम करत नाही, तोपर्यंत याबाबत काही बोलणे मला गैर वाटले. मी आव्हान स्वीकारले व वाणिज्य मंत्रालयात जाण्याची तयारी केली. माझ्या दृष्टीने नव्या ठिकाणी काम करण्याची, नवे काही शिकण्याची ती एक संधी होती. ज्या नोकरशाहीच्या पोलादी व्यवस्थेविषयी इतका काळ वाचत होती, ऐकत होती, त्या व्यवस्थेला आतून बघण्याची, तिचा अनुभव घेण्याची आणि शक्य झाले तर काही चांगले करण्याची संधी माझ्याकडे चालून येत होती. मी तिचे सहर्ष स्वागत केले. 

सत्ता आणि अधिकाराच्या दृष्टीने, राजधानीत उद्योग भवनाचे स्थान, अगदी वरचे नसले तरी खालचे मुळीच नाही. वेगवेगळ्या मंत्रालयाच्या इमारतीतून व त्यांच्या स्थानावरून, त्या त्या मंत्रालयाच्या सापेक्ष महत्त्वाचे आकलन करता येते. राष्ट्रपतीभवनाची इमारत रायसीना टेकडीवरची, सगळ्यांत भव्य म्हणून सगळ्यांत महत्त्वाची इमारत. भारतातील सर्वोच्य पदावरील व्यक्तीचे म्हणजेच राष्ट्रपतींचे कार्यालय व निवासस्थान इथे आहे. राष्ट्रपती भवनाच्या मजबूत पोलादी महाद्वारासमोर उभे राहिले, तर डाव्या उजव्या बाजूला राष्ट्रपतीभवनाच्या शैलीतील व तशी गुलाबी लालसर रंगाच्या दगडांनी बनवलेल्या दोन इमारती दिसतात. त्यांना अनुक्रमे 'साऊथ (दक्षिण) ब्लॉक' व ‘नॉर्थ (उत्तर) ब्लॉक' म्हटले जाते. या दोन्ही इमारती इंग्रजांनी सचिवालयांसाठी बनवल्या होत्या. आजच्या घडीला 'साऊथ ब्लॉक’मध्ये पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय व संरक्षण मंत्रालय आहे; तर ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये अर्थ मंत्रालय व गृहमंत्रालय आहे. म्हणूनच ही मंत्रालये महत्त्वाची, किंवा ही मंत्रालये महत्वाची म्हणून त्यांना या विशेष इमारती लाभल्या, विषमता फक्त माणसामाणसांतच नसते, ती प्रत्येक पातळीवर असते, फक्त तिचे स्वरूप वेगळे असते.

इतर मंत्रालयांच्या जागा रायसीना टेकडीवरून खाली व म्हणूनच विजय चौकाच्या खाली. अर्थातच बहुसंख्य इमारती राजपथाच्या दोन्ही बाजूला आहेत. या मंत्रालयांच्या सापेक्ष महत्त्वाची कसोटी म्हणजे, राष्ट्रपती भवनापासूनचे त्यांचे अंतर टेकडीवरून उतरताच रफी मार्गाच्या पलीकडे डाव्या बाजूला ‘उद्योग भवन’, उजवीकडे ‘कृषी भवन’ दोन्ही भवने जवळ असली तरी राजपथाच्या विरुद्ध बाजूला आहेत. त्यामुळेच ‘कृषी’ आणि 'उद्योग' गेली पन्नास वर्षे एकमेकांपासून दूर आहेत.

उद्योग भवनात, उद्योग मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, पोलाद व खाण मंत्रालय, वस्त्र मंत्रालय, आयात-निर्यात आयुक्त, उद्योग विकास महानिदेशक, वस्त्र आयुक्त, हस्तोद्योग आयुक्त वगैरेंची महत्त्वाची कार्यालये होती.

वाणिज्य मंत्रालयातील अप्पर सचिव म्हणून मी उद्योग भवनात घुसलो. तीन-साडेतीन वर्षे तिथे काढली, सुरुवातीला मला दुसऱ्या मजल्यावरची 226 क्रमांकाची खोली मिळाली. मी खोलीत घुसलो तर अत्यंत घाणेरडा वास. शेजारच्या मुतारीतून भिंतीत मुरलेला तो वास. मी नुकताच जपानमधून आलो होतो. स्वच्छता टापटीप याविषयीच्या माझ्या 'कल्पना’ व अपेक्षा वेगळ्या होत्या. मी ताबडतोब तक्रार केली.

“तूर्त तिथेच बसावे लागेल, पर्यायी खोली उपलब्ध होईपर्यंत!”

“पण, पर्यायी खोली केंव्हा उपलब्ध होणार?”

“सांगता येणार नाही!”

मी नाखुषीने ती खोली स्वीकारली. त्याच खोलीत नेगी नावाचा आणखी एक अप्पर सचिवही बसत होता, त्याची कसलीच तक्रार नव्हती. मी पुन्हा पुन्हा तक्रार करून खोलीला नवा रंग लावून घेतला. पुढचे वर्ष-दीड वर्ष मी त्याच खोलीतून काम केले. इतकी महत्त्वाची मंत्रालये, इतकी घाण कशी सहन करतात. हा त्या काळातला मला वारंवार सतावणारा प्रश्न होता. पण मीही तिथेच बसून भारत व अमेरिकेच्या व्यापारविषयक संबंधांच्या महत्त्वाच्या विषयांवर डोकेफोड केली. तिथेच महत्त्वाच्या फाईलवर, महत्त्वाची शोरेबाजी केली, नोट्स लिहिल्या.

विदेशातून आलेल्या प्रतिनिधींना भेटलो. या सर्व फायलीतून आपण केवढे 'कर्तबगार' व 'बुद्धिमान' आहोत, हे दाखवण्याचा इतरांप्रमाणेच माझाही प्रयत्न होता. पण भिंतीतून मुरलेला वास माझ्यापर्यंत येऊ नये, यासाठी मी कोणताच तोडगा काढू शकलो नाही. प्रशासनातल्या सगळ्यांनाच या वासाची सवय झाली होती. त्यामुळे माझ्याकडे योग्य वेळेची वाट पाहून, (तिथून) पळ काढण्याशिवाय पर्याय नव्हता.

(क्रमशः)

(ही लेखमाला मी त्रयस्थपणे लिहिली आहे. सरकारी यंत्रणेतील भलेबुरे जे काही पहायला मिळाले. त्यातील काही मराठी वाचकांपर्यंत पोहोचावे हा यातला मुख्य हेतू आहे. म्हातारपणी या सर्वावर लिहिण्यापेक्षा आत्ताच लिहिणे अधिक महत्वाचे वाटते, कारण या व्यवस्थेत राहून मी काम करत आहे, आणि आणखी काही वर्षे तरी करणार आहे. अशा पद्धतीचे लिखाण फारसे पहायला मिळत नाही, म्हणूनही मी हे लिहिले आहे. चुकून कुठे आत्मस्तुतीचा भाग आला तर तो माझा दोष समजावा.

ही लेखमाला (थोडीफार) वैचारिक असल्याने 'साधना’ चे व्यासपीठ मला महत्त्वाचे वाटते. साधनासाठी बऱ्याच दिवसापासून लिहिण्याचे मनातील स्वप्नही या निमित्ताने साकार होत आहे. हा अनुबंध मला जवळचा वाटतो!

ज्ञानेश्वर मुळे)

Tags: नोकरशाहीचे रंग प्रशासन विदेश मंत्रालय उद्योग भवन कृषी भवन साउथ ब्लॉक ज्ञानेश्वर मुळे Nokarshahiche Rang Foreign Ministry Udyog Bhawan Krushi Bhawan Southe Block Dnyaneshwar Mule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके