डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मनात येईल तेव्हा, वेळ असेल तेव्हा मी ‘नक्षत्रां’ची पानं चाळत बसतो. या पुस्तकातून अनेक गोष्टी जगतो, अनेक आठवणी जागवतो. आनंदाची अनुभूती घेतो. खानोलकर वाच्यार्थाने समाजसुधारक नव्हते. त्यांनी समाज परिवर्तनाच्या कार्याला झोकून दिल्याचे किंवा एखाद्या विशिष्ट सामाजिक कार्यात (उदाहरणार्थ- स्त्रीशिक्षण, ग्रामिणांचे प्रश्न) त्यांना रुची असल्याचे दिसत नाही. पण त्यांच्या विशुद्ध मनाच्या पारदर्शी तलावात या सगळ्या सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक व दार्शनिक प्रश्नांचे प्रतिबिंब निश्चित पडत होते/असणार. सुधारकांच्या सावलीत वाढलेल्या माझ्या मनाला त्यांच्या ‘तटस्थ’ मनाची या प्रश्नांमधली काव्यमय ‘गुंतवणूक’ भावली असावी.

कसे ठरवायचे प्रभावित करून मनातून कधीही न गेलेले पुस्तक? माझी तर तारांबळ उडाली. माझ्या मनाचे सगळे रस्ते धुंडाळत तिथं वेगवेगळ्या अवस्थेत विखरून पडलेली पुस्तकं शोधताना विदेशी लेखक निवडायचा की देशी? मनावर शेक्सपिअर, जॉन डन, आयन रँड, पुष्कीन, दोस्तोवस्की आणि मिल्टन सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने आपापली मुद्रा ठेवून गेलेत. आपल्याकडचेही असेच अनंत लेखक आहेत, ज्यांच्या पुस्तकांनी जिवाला भुरळ पाडली आहे. मेघदूत असो वा ज्ञानेश्वरी, कबीर असो वा तुकाराम, ‘सत्याचे प्रयोग’ असोत वा क्रांतीचा जयजयकार करणारी ‘विशाखा’ असो; प्रत्येक पुस्तकाने वेगवेगळ्या प्रकारे मनावर अधिराज्य केले आहे. जुन्यातले एखादे पुस्तक निवडायचे की आताचे? समाजसुधारकांची पुस्तके निवडायची की आधुनिक चिंतनावरची निवडायची हाही अवघड प्रश्न मनाला पडलाच. शिवाय कोणता साहित्यप्रकार घ्यायचा? आत्मकथनात्मक की कादंबरी की कथासंग्रह  असाही प्रश्न पडतो. उत्तमोत्तम पुस्तके चहूबाजूला दिसतात आणि त्यात परिणाम करून गेलेली पुस्तकेही अनेक असतात. काळाच्या ओघात अनेक पुस्तकांचा प्रभाव कमी होतो किंवा पूर्णपणे गायबही होतो, पण त्या त्या वेळेस अशा पुस्तकांनी माझ्यावर प्रचंड गारुड मिरवलेलं आहे.

या पार्श्वभूमीवर मी जे पुस्तक निवडले आहे, ते आहे कवितांचे. मला आवडणाऱ्या कवींमध्ये तुकोबांचे स्थान अद्वितीय आहे. बहिणाबाई चौधरींच्या कविताही अतिशय प्रिय आहेत. भा. रा. तांबे, बोरकर, कुसुमाग्रज, करंदीकर, महानोर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कवितांच्या मोहक जाळ्यात मला बांधून ठेवले आहे. स्त्री कवींमध्ये शांता शेळके, कविता महाजन आणि नव्या पिढीची कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितांनी मला खूपच प्रभावित केले आहे. पण या सर्वांना निवडणे शक्य नाही. शेवटी माझ्या मनात उरतात पु. शि. रेगे (सुहृदगाथा), नारायण सुर्वे (जाहीरनामा) आणि आरती प्रभू (नक्षत्रांचे देणे). गंमत म्हणजे हे तीनही संग्रह 1975 मध्ये प्रथम प्रकाशित झाले. पण यातही रेगे कितीही भावले तरी ते आधीच्या पिढीचे. कवितांच्या बाबतीत त्यांचा पिंड सुर्व्यांपेक्षा खूप वेगळा, काहीसा आरती प्रभूंसारखा; पण तरीही पूर्णत: सर्जनावर केंद्रित. शेवटी राहिले दोन कवी, नारायण सुर्वे आणि आरती प्रभू. दोघांची काव्यप्रकृती व व्यक्तिमत्त्व यांच्यात साम्यस्थळे दिसणे जवळजवळ अशक्य. पण दोघेही मला तितकेच प्रिय. कॉलेजात असताना माझ्या कविता दोघांचेही अनुकरण करीत असत. (म्हणूनच त्या कसल्याही असणार.) सुर्व्यांची सामाजिक दृष्टी प्रभूंकडे असण्याची शक्यता नव्हती. दोघांचेही बालपण व प्रौढत्व वेगवेगळ्या प्रकारे घडलेले. समाजाभिमुख सुर्वे आणि मनस्वी प्रभू या त्यांच्या व्यक्तिवैशिष्ट्यांचे त्यांच्या काव्यात प्रतिबिंब दिसते. अशा या दोन कवींची तुलना करणे शक्य असले, तरी त्यातलाही एक कसा निवडावा या प्रश्नाची उकल मला होत नव्हती. दोघांनीही मला समजत असल्यापासून व्यापले आहे, ग्रासले आहे आणि शब्दांत वर्णन करता येणार नाही असे झपाटलेपण देऊन प्रभावित केले आहे.

मग या दोघांमधला एक निवडणे ही माझी सत्त्वपरीक्षाच होती. माझ्या 36 वर्षांच्या विदेश मंत्रालयात सात देशांना व दरम्यान भारतात तीनदा- अशा दहा बदल्या झाल्या. या दहाही बदल्यांमध्ये प्रत्येकदा निघण्यापूर्वी आणि देशात परत येण्यापूर्वी पुस्तकांचे ओझे हलके करण्याच्या प्रयत्नांत अनेक पुस्तके इतरांना देऊन टाकत असे, पण त्यातही काही पुस्तके दहा बदल्यांनंतरही सतत सोबत राहिली आणि माझ्या बरोबर भारतात परत आली. माझ्याकडच्या शेकडो पुस्तकांमधून या दोन पुस्तकांपैकी जे पहिल्यांदा हातात येईल त्या पुस्तकावर मी लिहायचे ठरवले. तर ‘नक्षत्रांचे देणे’ पटकन सापडले.

माझ्या आणि समकालीनांच्या कॉलेजजीवनात कवितेला एक अस्सल असे स्थान होते. सुमार कविता आम्ही (तेव्हाही) लिहीत आणि वाचत होतो; पण उत्तम कवितांची जाणही वाढत होती. पाडगांवकर, बापट-करंदीकर या त्रिकूटासह सुरेश भटांच्या गझलांनी सर्वांनाच काबीज केले होते. या सगळ्यांना वाचत- ऐकत कॉलेजची वर्षे जात असताना एखाद्या विद्युल्लतेसारखे आरती प्रभू माझ्यावर कोसळले. ‘नक्षत्रांचे देणे’ या दोन शब्दांमध्येच त्यांच्या ताकदीची पूर्ण कल्पना येत होती. हे केवढे विलक्षण देणे आहे, असाच विचार तेव्हाही आणि आजही मनात येतो. तसं हे एकदम पिटुकलं कवितेचं पुस्तक. दोन्हीकडची धरून 93 पानं. पण त्यातल्या कवितांनी माझी घेतलेली पकड आजही जशीच्या तशी आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची ऐपत नव्हती, अशा काळात दहा रुपयांचं ते पुस्तक मी कोल्हापूरच्या मेहता बंधूंच्या अजब पुस्तकालयात खरेदी केलं, तेव्हा ‘नक्षत्रांचं देणं’ हातात आल्यासारखं वाटलं.

कॉलेजच्या स्वप्नील जीवनात अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, काव्यस्पर्धा, वादविवाद, भित्तिपत्रक, वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन, परीक्षा, कँटीन या रोमँटिक जगात कविता आणि प्रेम यांना अनन्यसाधारण स्थान होतं. कवितांवरचं प्रेम आणि प्रेमावरच्या कविता यांत माझ्यासारख्या (संवेदनशील) मनाची गल्लतही स्वाभाविक होती. त्या वयात वांछित-अवांछिताच्या किनाऱ्यावर प्रेम-प्रणय-मैत्री या सर्वांबाबत एक ‘रोमँटिक गोंधळ’ मनात असायचे. अशाच भरकटलेल्या क्षणात सुकलेल्या पारदर्शक पिंपळपानासहित हातात आलेल्या कवितासंग्रहातील ‘एका सरळ रेषेला एकाएकी इजा झाली, वक्र झाली... थांबली... भांबावली.’ या ओळी वाचल्या आणि स्वत:लाच पारदर्शी करून पाहतो आहोत, असा भास झाला.

त्या क्षणापासून आजपर्यंत ‘नक्षत्रांचे देणे’ सतत सोबत आहे. आता एक प्रत कार्यालयात व एक घरी असते. मनात येईल तेव्हा, वेळ असेल तेव्हा मी ‘नक्षत्रां’ची पानं चाळत बसतो. या पुस्तकातून अनेक गोष्टी जगतो, अनेक आठवणी जागवतो. आनंदाची अनुभूती घेतो.

खानोलकर वाच्यार्थाने समाजसुधारक नव्हते. त्यांनी समाज परिवर्तनाच्या कार्याला किंवा एखाद्या विशिष्ट कार्यात झोकून दिल्याचे किंवा एखाद्या विशिष्ट कार्यात (उदाहरणार्थ- स्त्रीशिक्षण, ग्रामिणांचे प्रश्न) त्यांना रुची असल्याचे दिसत नाही. पण त्यांच्या विशुद्ध मनाच्या पारदर्शी तलावात या सगळ्या सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक व दार्शनिक प्रश्नांचे प्रतिबिंब निश्चित पडत होते/असणार. सुधारकांच्या सावलीत वाढलेल्या माझ्या मनाला त्यांच्या ‘तटस्थ’ मनाची या प्रश्नांमधली काव्यमय ‘गुंतवणूक’ भावली असावी. शिवाय परिवर्तनाचे संवाद किंवा परिसंवाद अनेकदा फारच रुक्ष व गद्य:प्राय होतात. कारण तिथे भावनेपेक्षा तार्किकता व प्रखर बुद्धिवादाला वरचे स्थान असते. सुर्वे आपल्या कवितेतून विषमता, अस्वस्थता, पेटलेपण, संघर्ष जगताना दिसतात. त्यांचा तो अंगार मला जसा भिडतो, तितक्याच तीव्रतेने आरती प्रभूंच्या तरंगविहीन जलाशयात कोणत्याही ‘अंगारांशिवाय पडलेले प्रश्नांचे प्रतिबिंब’ संमोहित करणारे आहे. आरती प्रभूंच्या कवितेत सामाजिकता शोधणे म्हणजे हिमालयात महासागर शोधण्यासारखे आहे. पण हिमालयही कधीकाळी महासागरातून उभा झालेला आहे आणि तिथे समुद्राच्या सगळ्या खुणा मानववंश शास्त्रज्ञांना सापडतात. जीवाश्मांचे असे अनेक नमुने हिमालयात सर्वत्र सापडतात. तो प्रत्येक जीवाश्माचा तुकडा हातात लागल्यानंतर शास्त्रज्ञाला जो आनंद मिळतो, तो मला ‘नक्षत्रांचे देणे’ वाचताना होतो. ‘संसारात राहून काय झालो? पोराबाळांचा फक्त बाप झालो’ आणि त्या पाठोपाठ ‘समाजात राहून काय झालो? वृत्तपत्रांचा एक वाचक झालो’, असं आरती प्रभू का लिहीत असावेत? या ओळींमध्ये कोकणच्या जीवनात आलेला कोरा दैववाद नसून स्वत:च्या सीमित जीवनाच्या आणि योगदानाच्या जाणिवेतली दिलगिरी आहे. संवेदशील कविमनाला फक्त निसर्ग, पक्षी, डोंगर, नद्या, समुद्र या गोष्टीच प्रेरित करतात असे नाही. जीवनातील रौद्र, भीषण, बीभत्स व क्रूर अशा संप्रेषकांपासून संवेदना स्वत:ला दूर ठेवू शकत नाही. ‘कोंडुरा’ हे त्या रौद्र भीषण सौंदर्याचे रूपक आहे. जीवनातील विषमता आरती प्रभू त्यांच्या पद्धतीने जगतात व गातातही. ते त्यांच्या कवितेत येताना ‘भद्र’ आणि ‘रुद्र’ दोन्ही रूपात भेटते. ते केवळ विलोभनीय आहे.

त्यांच्या कवितेशी असणारं माझं नातं कधी दुर्बल झालं नाही. त्यांच्या कवितांचा ताजेपणा कधीही न सुकणाऱ्या फुलांप्रमाणे कित्येक दशकं माझं जीवन सुगंधित करत आला आहे. माझ्या प्रवृत्तीची माणसं शोधताना मी हे अनुभवलं आहे, की तुकाराम आणि आरती प्रभू किंवा सुर्वे आणि आरती प्रभू दोघेही ज्यांना भावतात, त्यांच्याशी माझी मैत्री कायम टिकते.

आरती प्रभूंच्या कवितांमध्ये बारीकसारीक अनेक रंजक व म्हणून मनाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांपैकी सर्वांचा उल्लेख करणे अनावश्यक आहे आणि अशक्यही. पण मला अतिशय भावलेली जी दोन वैशिष्ट्ये आहेत, त्यांच्याविषयी लिहितो. कारण त्यांचा माझ्या मनावरचा पगडा अजिबात जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे- त्यांच्या कवितेतील ‘मनस्वी’ रूप. ते रूप जसं त्याचं तसंच त्यांच्या अनुभवांचं, जगण्याचं, सतत ‘अर्थ’ शोधण्याच्या तहानेचं. मनस्वी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. लहरी, स्वच्छंदी, स्वैर, अमर्याद, छंदिष्ट, बेदरकार, बेलगाम किंवा विपुल (अतिशय) असे. या सगळ्यांचेच एक सुरम्य मिश्रण ‘नक्षत्रां’मध्ये आहे. आपल्याच मनाचा वेध घेत बेभान घोड्यासारखी त्यांची कविता उधळत जाते. दशदिशा आपल्याच आहेत, सभोवतालचे विश्व, पायाखालची जमीन, वारा, जंगल, समुद्राची गाज, मंदिरातील मंत्रघोष किंवा ग्रासणाऱ्या रीती सगळ्यांनाच त्यांची कविता भिडते. तीही मोजक्या शब्दांत कोणत्याही अभिनिवेशाशिवाय आणि निष्कर्षांची तमा किंवा काळजी न करता. ‘नक्षत्रांच्या देण्या’त या त्यांच्या ‘बेदरकार मनस्वी’ रूपाचा पहिल्याच कवितेत परिचय होतो.

‘‘या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या
मोडून पडाल
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल’’

या पहिल्या कवितेतील ओळी अशाच खळाळणाऱ्या तिस्ता नदीसारख्या पुढेही उन्मत्त वाहत राहतात. उसळणाऱ्या लाटांच्या तडाख्यात वाचक अक्षरश: घायाळ होतो. पण तरीही वाचक कविता सोडत नाही. डंख मारून राहणाऱ्या वेदनेला कवटाळून घेत आपण पुढचे धक्के सहन करत राहतो. या कवितांचे शब्द एकाच वेळी अस्वस्थ करतात. बेहोषी आणतात आणि नकळत आपले खुजेपण दाखवतात. जागोजागी कुकरमुत्त्यासारख्या उगवलेल्या ‘आत्म-शब्द संतुष्ट’, ‘घोषणाबाज’, ‘प्रेम निसर्ग ग्राम नगर’ यांच्या पाकात गळ्यापर्यंत बुडालेल्या पैशाला पासरी कविराजांना मुळापासून हलवण्याचे सामर्थ्य आरती प्रभूंच्या शब्दाशब्दांत भरलेले आहे. पहिली कविता तुलनेने दीर्घ असली, तरी त्यातला एखादा शब्दही अतिरिक्त ठरवून कापता येत नाही. कारण मुळातच कवीने प्रत्येक शब्दाला धगधगत्या अग्निकुंडातून तावून सुलाखून काढले आहे. माझ्या कवितांचे प्रेम हवे असेल, तर ‘आत्म्याची बाग फुलवता येईल का तुम्हांला?’ असं कवी म्हणतो तेव्हा एका क्षणासाठी रसिक हतबद्ध होऊन जातो. असं विचारण्याचं धाडस कवी करू शकतो, यावर विश्वास बसत नाही. हीच आरती प्रभूंची ताकद आहे. पहिल्या काही ओळींत ‘कुणी घर देता का घर!’ अशा धरतीवर ‘प्रेम हवंय का या कवितेचं?’ असा आर्त प्रश्न विचारणारी ही कविता शेवटच्या ओळीपर्यंत पोहोचता पोहोचता तिच्या आगीत वाचकाला लपेटून घेते. सुरुवातीच्या या कवितेतच वाचकाला आव्हान देऊन ‘दम नसेल तर या कवितांच्या वाटेला लागू नका, पुढे अवघड घाट आहे’ असा इशारा कवी देतो. पण या काहीशा बेदरकार इशाऱ्यातही जी उत्कटता आणि ‘मनस्वी’ता आहे, ती अत्यंत देखणी आहे.

आरती प्रभूंच्या कवितेतील सगळ्या वैशिष्ट्यांची चर्चा करणे किंवा पुस्तकांची समीक्षा हा माझा हेतू नाही. पण मला जाणवलेल्या आणखी एका वैशिष्ट्याविषयी मला लिहायचंय. सुर्व्यांच्या कवितेचा स्थायी भाव ‘सामाजिक न्याय’ किंवा ‘सामाजिकता’ आहे. महानोरांच्या कवितेत ‘निसर्ग-शेतकरी-ग्राम्य संस्कृती’हा स्थायी भाव आढळतो. ‘नक्षत्रांच्या देणे’त कोणता स्थायी भाव आहे? या कवितांमध्ये सामाजिक निरीक्षणं आहेत, निसर्गही ओतप्रोत भरलेला आहे, पण तरीही ही कविता सुर्वे किंवा महानोर यांच्यापेक्षा वेगळी आहे. आरती प्रभूंच्या रक्तातच कोकणचा निसर्ग आहे. ते तो निसर्ग आणि त्या अनुषंगाने तिथल्या जीवनात असणाऱ्या श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रथा, कुप्रथा, चालीरीती स्वीकारतात. यात काहीसा दैववाद आहेच, पण आरती प्रभूंचे ‘सौंदर्य’ त्या दैववादापलीकडे जाणाऱ्या दार्शनिकतेत आहे. सॉक्रेटीस दिसेल त्याला संधी मिळेल तसे प्रश्न विचारायचा. आरती प्रभूंना पडणाऱ्या शंका आणि प्रश्न अगणित आहेत.

आरती प्रभू प्रश्न विचारत जातात, तेही स्वत:ला? प्रेम, विरह, मीलन यांतल्या प्रत्येक आयामांवर प्रश्न विचारून थांबत नाहीत, ते जीवनाच्या अपरिहार्यतेवरती प्रश्नांचे तीर सोडतात. तत्त्वज्ञानाच्या दिशेने जातात. कधी स्वत:च उत्तर देतात, कधी प्रश्न पतंगासारखा आकाशात सोडून देतात. ‘हलता झुला वाऱ्याचा... कसा कसा बांधायचा?’ (नको, पृ.63) याचं उत्तर देताना ते अधिकच घोटाळ्यात टाकतात.

कवितेच्या उत्स्फूर्त प्रवाहात अधूनमधून डॉल्फिनसारखे हवेत उंच झेप घेणारे त्यांचे सगळे प्रश्न मला खूप आवडतात. आणि त्यातही जागोजागी विखुरलेली दार्शनिकतेची बेटं पाहताना, वाचताना मनात सुखद झरे वाहतात. शिवाय ही दार्शनिकता कवितेचा अभंग हिस्सा असतो. ती लेखकाच्या एकाच वेळी खोल आणि उंच जगण्यातून सहज येते. जगद्‌्‌व्यापाराविषयी अंतर्मुख झाल्यानंतर या ओळी कवितांमध्ये येतात. उपऱ्या किंवा उपदेशात्मक नव्हेत.

या संग्रहात ‘ती येते आणिक जाते’, ‘लव लव करी पातं’ व ‘तू तेव्हा तशी’ अशा गाजलेल्या किंवा गायिलेल्या कविताही आहेत. त्या छानच आहेत, पण मराठी मनावर प्रभाव टाकलेली कविता किंवा गाणे म्हणजे ‘कोणाच्या खांद्यावर?’ हीच आहे. आरती प्रभू प्रत्येक कवितेतून जीवनावर भाष्य करतात, असे दिसते. पण या कवितेतील भाष्याला तोड नाही.

‘अंत झाला अस्ता आधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी’

एकाच वेळी काव्याला आवश्यक प्रेरणांची उत्स्फूर्तता आणि जीवनाच्या मूलभूताला भिडणारी दार्शनिकता असणारा आरती प्रभू पराकोटीचा प्रतिभावान माणूस होता.

Tags: मराठी साहित्य पुस्तक दिन मराठी पुस्तके साहित्य वाचन influential favourite book marathi books Good books in marathi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके