डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दिल्लीतील दिवाळी व नंतरचा अंधार

जगातल्या कोणत्याही देशात उत्सवाच्या निमित्ताने इतके ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण होत नसेल. दिल्लीत रात्री 11 नंतर सार्वजनिक कार्यक्रमांना आणि ध्वनिप्रक्षेपकांना मजाव आहे. पण राजधानी दिल्लीत याचे पालन कुणीच करीत नाही. विदेशात सर्वसाधारण असे कार्यक्रम नदीच्या काठावर किंवा मोकळ्या मैदानात नगरपालिका आयोजित करतात आपल्या गरिबीने भरलेल्या देशात करोडो रुपये फक्त फटाक्यांवर खर्च करणे हा माझ्यामते मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे.

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यपंक्तीत दिवाळीचा मूड स्पष्ट होतो. पण दिल्लीतच नव्हे तर पूर्ण भारतात आणि आता जगभर या सणाचा महोत्सव झाला आहे. महोत्सवामुळे दिवाळीचे महत्त्व वाढले असले तरी दिवाळीची मजा कमी झाली आहे. दिवाळीचे भारतीय जीवनातले आणि मन:पटलावरचे स्थान मला माहीत आहे तरीही वाटते; हा सण साजरा करण्याच्या पद्धतीत आणि एकंदरीतच सणांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मूलगामी बदल आणण्याची गरज आहे. पण ही गोष्ट सोपी नसावी. कारण प्रकाशाचे महत्त्व सांगणारी दिवाळी स्वतः अंधारात चाचपडते आहे की काय असे वाटावे, असे काहीसे विकृत स्वरूप या सणाला प्राप्त झाले आहे.

मला या महोत्सवात जे खटकते, त्रास देते आणि समजायचा प्रयत्न करूनही समजत नाही, असे अनेक मुद्दे आहेत. त्यातल्या काहींचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. पुराणकथा, धार्मिकता, पूजा, देवदर्शन या सगळ्या गोष्टी अनुस्यूत आहेत. आकाशकंदील, मेणबत्त्यांची रांग, थोडीफार रोषणाई समजण्यासारखी आहे. पक्वान्ने आणि भेटीगाठी यांचा आनंदही वर्णन न करता येणारा. या निमित्ताने नवीन कपडे थोडा थाटमाटही चालणारच. पण आता आपण या गोष्टी पराकोटीला घेऊन चाललो आहोत.

दिवाळीच्या संध्याकाळी मी मुद्दामच शहराचे दर्शन घ्यायला बाहेर पडलो. सुदैवाने रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी होती, कारण प्रत्येकजण घरात पूजा करत होता. यावर्षी 8.55 ही पूजेची वेळ होती असे अनेकांचे म्हणणे. त्यामुळे सामसूम.

रस्त्यावर फटाक्यांच्या धुराने निर्माण झालेले गडद धुके. गाडीसमोर तीस चाळीस मीटरनंतर काय आहे हे समजण्याला मार्ग नाही, पण अजून फटाके वाजायला सुरुवातही झाली नव्हती.

थोड्याच वेळात ते सुरू झाले. तो कानठळ्या बसवणारा आवाज रात्री साडेनऊच्या आसपास सुरू झाला. मला वाटले तो तासाभरात थांबेल, पण आवाजाची तीव्रता आणि फटाक्यांची संख्या दोन्हीही भौमितिक प्रमाणात वाढत गेली आणि वाढतच चालली. असे वाटले की, शहरात प्रचंड युद्ध चालले आहे. लोक एक-दुसर्यांवर बंदुका, मशीनगनच्या फैरी झाडताहेत, बाँब टाकताहेत. 

आवाज ही जीवनाची एकमेव निशाणी आहे. असे वाटावे असा तो माहौल. या शहरात आजारी माणसं असतील; वृद्ध माणसांना झोपणं गरजेचं असेल, कुणी महत्त्वाच्या वाचनात गुंतलं असेल किंवा कुणी दिवसभर कारखान्यात काम करून झोपेच्या प्रतीक्षेत असेल, कुणी फक्त चिंतनाच्या मूडमध्ये असेल- यातल्या कशाचेही भान न ठेवता दिल्लीतल्या शहाण्या लोकांनी फटाक्यांचा भडिमार रात्रभर चालू ठेवला. ही कसली दिवाळी, जी माणसाला शांतपणे झोपण्याचे सुखही देऊ शकत नाही? आवाज जितका मोठ्ठा तितक्या प्रमाणात आपण मनोभावे दिवाळी साजरी करतो असा भाव सर्वांच्या ठायी जाणवला.

दुसऱ्या दिवशी शहरभर फटाक्यांचा कचरा होता. रात्रभर सुरू राहिलेले फटाक्यांचे आवाज सकाळीही पूर्णपणे थांबले नव्हते. शिवाय रात्रभरच्या फटाक्यांच्या धुरांचे ढग एखाद्या जाड कांबळीसारखे शहराला धरून पडले होते. दिवाळीचा आनंद घ्यायला निदान हवा तरी फुफ्फुसात घेण्यालायक हवी. ती तशी अजिबात नव्हती.

दिवाळीच्या दोन-तीन दिवसात आणि त्यापूर्वीही मिठाईचे आगमन सुरू झाले. पूर्वी आईच्या हाताच्या करंज्या, कडबोळी, लाडू वगैरेंची खास चव असायची. दिवाळीची प्रतीक्षा या गोड फराळामुळे फारच मनापासून व्हायची. पदराखालच्या बशीत स्वत:च्या हाताने बनवलेली करंजी किंवा शंकरपाळी घेऊन शेजारच्या वहिनी किंवा काकू यायच्या. 

आता सुबक पॅकींग केलेली ओळीने बसलेली मिठाईची रांग डोळ्यांना सुखद वाटते, पण उचलायचे धाडस होत नाही. दिवाळीच्या व्यापारीकरणात फटाके आणि मिठाई यांची महत्त्वाची भूमिका आहे. मिठाईचे हे पुडे नको नको म्हटले तरी येतात आणि आता पुढचा बॉक्स कुणाला द्यायचा याची चिंता आधीपासून भेडसाऊ लागते. या एका आठवड्यात कुणीही घराची घंटी वाजवली की भीतीपोटी दरवाजा उघडावासा वाटत नव्हता. एका नवीन मिठाईच्या पुड्याची भीती!

पण बेल दाबली गेली तेव्हा काळजीचे आणखी एक कारण होते. जेव्हा जेव्हा मिठाई आली नाही तेव्हा तेव्हा कुणी ना कुणी 'बक्षीस' मागायला आले. धोबी, पोस्टमन, झाडूवाली, सुरक्षा कर्मचारी, माळी वगैरे मी कधीही न पाहिलेले लोक अचानक बक्षीस पात्र' झाले होते. बक्षीस देणे इथे सक्तीचे आहे. एकाने वीस रुपये दिले तेव्हा नाक मुरडले. कमीत कमी पन्नासचा दर आहे म्हणे! आलेल्या प्रत्येकाला मी पहिला प्रश्न 'आपण कोण?' म्हणून विचारला कारण हे लोक मला (धोब्याचा अपवाद) काम करतानाच काय, माझ्या वसाहतीत फिरतानासुद्धा दिसलेले नाहीत.

हे असे दानशूर मिठाईवाले किंवा बक्षीसपात्र लोक जेव्हा आले नाहीत तेव्हाही घरात शांत बसून आनंद मानायची फुरसत नव्हती. मोबाईल नावाचा राक्षस नरकासुराचे काम करत होता. दिवाळीच्या शुभेच्छा आणि संदेश शेकडोंनी पाठलाग करू लागले. आता प्रत्येकाला उत्तर पाठवावे तर ते एकच काम करावे लागेल. आणि उत्तर पाठवले नाही तर माझ्या सौजन्यशीलतेवर संशय. शिवाय अनेक अपरिचितांचे संदेशही येतात त्याचे काय? मोबाईल हे पेचात टाकणारे आणि छळणारे यंत्र आहे. दिवाळीत त्याने अधिकच छळले. फटाक्यातून, मिठाईतून वाचलो तरी मोबाईलमधून वाचणे कसे शक्य आहे. मोबाईल बंद ठेवणे शक्य आहे, पण त्याचवेळी बॉक्स, भाऊ-बहीण किंवा खास मित्रांचा फोन आला तर? 

जगातल्या कोणत्याही देशात उत्सवाच्या निमित्ताने इतके ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण होत नसेल. दिल्लीत रात्री 11 नंतर सार्वजनिक कार्यक्रमांना आणि ध्वनिप्रक्षेपकांना मज्जाव आहे. पण राजधानी दिल्लीत याचे पालन कुणीच करीत नाही. या सर्वांचे परिणाम आपणच भोगत असतो. विदेशात आतिषबाजीसाठी फारच कडक नियम असतात. सर्वसाधारण असे कार्यक्रम नदीच्या काठावर किंवा मोकळ्या मैदानात नगरपालिका आयोजित करतात आणि आतिषबाजीची रात्रीच्या आकाशातली नक्षी पाहता पाहता देहभान हरपून जाते. आपल्या (अजूनही) गरिबीने भरलेल्या देशात करोडो रुपये फक्त फटाक्यांवर खर्च करणे, हा माझ्यामते मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे.

माझे हे मत दृढ व्हायला दिवाळीच्या दिवसात मला दिसलेल्या दोन घटना कारणीभूत झाल्या.

दिवाळीच्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला मी सकाळी सात- साडेसातला माझा सकाळचा फेरफटका मारत होतो. कोपऱ्यावरच्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात माझ्याच वयाचा एक माणूस वापरता येण्यासारख्या वस्तू शोधत होता. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद, चिनीमातीचे तुकडे आपल्या जवळच्या फाटक्या पोत्यात भरत होता. हा माणूस दिवाळीच्या सणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी इथे सकाळी सकाळी कचऱ्याच्या ढिगावर उभा राहून काहीतरी शोधतोय... अजूनही दिवाळी साजरी करण्याला आपण अपात्र तर नाही? माझ्या मनात हा विचार वारंवार आला.

दिवाळीच्या रात्री अकराच्या सुमारास दिल्लीतील दिवाळीचे दर्शन (आणि तद्नुषंगाने 'धूम्र सेवन) करून परत येताना अखिल भारतीय वैद्यकीय संस्थानासमोर गाडीचा वेग कमी करावा लागला. चार पाच माणसं रस्ता ओलांडत होती. त्यातल्या एकाला बाकीचे लोक धरून चालवत होते. त्या माणसाचे हात सरळ ताठ होते. पूर्णपणे काळवंडलेले आणि त्यावर औषध लावलेले होते. मन चर्र झाले. दिवाळीच्या फटाक्यांचा बळी, तरी बरं झालं, वाचला म्हणायचा.

देशभर किती मेले किती जखमी झाले, किती जणांचे डोळे हात आणि अवयव जायबंदी झाले-शुभ दीपावलीच्या निमित्ताने याची खरी आकडेवारी कधीतरी प्रसिद्ध होईलही. पण अशा उत्सवांना शुभ करण्याची जबाबदारी कोण घेणार?

Tags: वायूप्रदूषण ध्वनीप्रदूषण देवदर्शन पूजा धार्मिकता पुराणकथा दिल्लीतील दिवाळी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके