पुन्हा आमची चर्चा. एक जण म्हणत होता, ‘जबरदस्ती इन लोगो को लाया गया है. एक दिन मोदीजी यहाँ आनेसे इनको क्या फायदा होगा? कुछ फरक नहीं पडनेवाला.’ आणखी कोणाचे तरी विरुद्ध मत- ‘कमसे कम आज तो अपने पॉलिटिशियन यहाँ तक आये. आज के दिन तो अपने देश के लोग इनके बारे मे जानेंगे, सोचेंगे. इससे पहले तो किसीको पडी नहीं थी इन लोगो की. बदलाव आने में वक्त लगेगा, लेकिन कहीसे शुरुवात तो होनी चाहिये.’ पूर्वी छत्तीसगड मध्य प्रदेशचा भाग होते. तेव्हा हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. विकास जवळजवळ शून्य. छत्तीसगड हे वेगळे राज्य झाल्यापासून विकासाने गती घेतली. त्यात बस्तर, दंतेवाडा, बिजापूर, सुकमा हे पिछाडीवर राहिले. सध्याच्या महत्त्वाकांक्षी आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या धडाडीमुळे तिथे वेगाने बदल होतो आहे.
प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना’-अंतर्गत गर्भवती महिला तपासणीदिन घोषित केला आहे. या दिवशी सर्व सरकारी दवाखान्यांत गर्भवतींची सर्व प्रकारची तपासणी मोफत केली जाते. खेड्या-पाड्यांत, प्राथमिक आरोग्य केंद्रात या दिवसांचे महत्त्व जास्त आहे. अशा ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसतात. मग नऊ तारखेला मानधन देऊन स्त्रीरोगतज्ज्ञाला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतींच्या तपासणीसाठी बोलावले जाते. आजू-बाजूच्या खेड्यांत सरकारी वाहन पाठवून रुग्णांची येण्याची व त्यांना परत सोडण्याची मोफत सोय केली जाते. रुग्णालयात स्वयंपाक बनवून रुग्णांना जेवणही दिले जाते. खरे तर आमच्या बिजापूर जिल्हा रुग्णालयात सध्या आम्ही तीन स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध असल्याने, दररोजच गर्भवतींची सर्व तपासणी मोफत होते. परंतु पूर्वीपासून इथे नऊ तारखेचा प्रघात पडल्याने, बऱ्याच खेड्यांतील गर्भवती फक्त नऊ ताखेलाच रुग्णालयात येतात. मितानी तिच्या कार्यक्षेत्रातील सर्व गर्भवतींना सकाळी गोळा करते. काही जणी यायला तयार होतात, काही जणी सरळ नकार देतात. मग मिळून सरकारी वाहनाला फोन लावला जातो, त्यातून सारे रुग्णालयात पोहोचतात. नऊ तारखेला त्यामुळे एकच झुंबड उडते रुग्णांची.
बिजापूर जिल्ह्यामध्ये रस्ते बनवण्याचे काम चालू असल्याने, बऱ्याचदा मोबाईलचे नेटवर्क जाते. त्यामुळे नऊ तारखेला जर नेटवर्क गेले, तर रुग्णांना वाहनाची अडचण होते. मग कोणी दुचाकीवरून येते, तर कोणी खासगी वाहनातून, तर काही गर्भवती स्त्रिया अक्षरशः चालत येतात.
नऊ तारखेला नेहमीपेक्षा गर्दी कमी वाटत होती. मोहाचा बहर चालू असल्याने सर्व जण मोह गोळा करायला जात आहेत. मला वाटले, त्यामुळे गर्दी कमी असेल. दुपार चढू लागली, तशा स्त्रिया येऊ लागल्या. मी मितानींना विचारले, ‘‘इतका उशीर का लावला यायला? सकाळी लवकर का नाही आलात?’’ तेव्हा कळले की, 108 या रुग्णवाहिका सेवेचा संप सुरू आहे. मितानींनी वाहनासाठी फोन लावला, तेव्हा त्यांना संपाबद्दल कळले. मग बरेच रुग्ण आले नाहीत. काही खासगी वाहनाने आले, तर बिजापूरपासून अकरा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमनार या गावच्या तीन गर्भवती आणि त्यांच्यासोबतच्या दोन मितानी चक्क चालत आल्या. मी थक्क होऊन पाहत राहिले त्यांच्याकडे. मार्च महिन्यापासून रोज बाहेर कडक ऊन पडते आहे. आम्ही डॉक्टर लोक हॉस्पिटलमध्ये आणि होस्टेलवर पण ए.सी. लावून बसतोय. उन्हात पाच मिनिटे जायलाही नको वाटतेय आणि या गर्भवती उन्हात 10 किलोमीटर चालत येताहेत! माझा जीव तुटतो त्यांच्यासाठी. त्यांना मी समजावत राहते की- आम्ही लोक रोजच असतो इथे, रोजच सर्व तपासणी मोफत असते. नऊ तारीख सोडून इतर कोणत्याही दिवशी त्या येऊ शकतात. मग तिथून पुढे प्रत्येक स्त्रीला मी विचारत राहते, कशी आलीस? बऱ्याच गर्भवती चालत आल्या होत्या आणि ते त्यांच्यासाठी नेहमीचे, अगदी सवयीचे आहे.
एक काळ असा होता की, सरकारी रुग्णालयात यायला रुग्ण नको म्हणायचे. सध्या अतिदुर्गम भागातील, खेड्यातील गर्भवती जंगलातील किती तरी किलोमीटर अंतर पायाने तुडवत डांबरी रस्त्यापर्यंत येतात आणि तिथून मग वाहन मिळते. काही जणी नदीतील कंबरेपर्यंतचे पाणी ओलांडून येतात. त्यामुळे कितीही गर्दी झाली, तरी आम्ही डॉक्टर्स आणि नर्सेस रुग्णांना कधीही चिडून बोलत नाहीत. उशीर झाला तरी सर्व तपासणी, सोनोग्राफी करतो. कधी रुग्णाला राहायची सोय नसेल, तर रुग्णालयात भरती करून ठेवतो.
येथील अनेक गर्भवतींना आपला गरोदरपणाचा कितवा महिना चालू आहे, हेही माहीत नसते. अशाच एकीला मी तपासून तिचा आठवा महिना संपत आल्याचे सांगितले. सोनोग्राफी करून प्रसूतीची अंदाजे तारीख सांगितली. तर, तिच्या सोबतच्या नातेवाईक स्त्रीची हसत-हसतच त्यावर टिप्पणी-
‘मतलब इस साल ए अब पत्ता तोडने नहीं आ पायेगी’. कारण मी सांगितलेली प्रसूतीची तारीख नेमकी तेंदूपत्ता तोडण्याच्या काळात येत होती. मग त्या दोघींनी मिळून त्यावर गोंडीमधे चर्चा केली. इतके दिवस त्यांच्यासोबत राहून मला कळून चुकले होते की, तेंदूपत्ता हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
संध्याकाळी डॉ.नागुलनसर भेटले. ‘
‘मॅडम, ब्लास्ट हुआ.’’ चौकशी केल्यावर कळले की, बिजापूरपासून सातआठ किलोमीटरवर असलेल्या नेमेड गावापासून कुटरूकडे जाणाऱ्या रोडवर CRPFचे वाहन चालले असताना पुलासकट उडवले गेले. दोन जवान जागीच गेले, बाकीचे आठ-नऊ जखमी झालेले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉ.नागुलन, मी, डॉ.पुजारी, डॉ.तामस्करसर, आमची टीम त्याच रस्त्याने काही दिवसांपूर्वी कुटरूला गेली होती. आज माझ्या किती तरी गर्भवती त्याच रस्त्याने आल्या होत्या. सुन्न होऊन गेले मी ती घटना ऐकून. रात्री 11 वाजता आम्ही पाच-सहा डॉक्टर्स कॅम्पसमध्ये गप्पा करत चालत होतो. बिजापूरपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आणखी एका ठिकाणी बॉम्बब्लास्ट झाला होता, त्याची चर्चा चालू होती. नरेंद्र मोदी कदाचित रुग्णालयात येण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर तयारी चालली आहे. समोर गस्तीवर असणारे सीआरपीएफचे जवान. त्यांना पाहून वाटते, हे मरायलाच इथे आले आहेत. डॉ.नागुलनची मस्करी नेहमीच चालू असते. ‘इन पॉलिटिशिअन के चक्कर में हम सब मरेंगे. अपनाभी इधर शहीद मेमोरिअल बन जायेगा. चेन्नई से आये डॉक्टर, ये महाराष्ट्र, इधर ओरिसा, छत्तीसगड, विशाखापट्टणम, उत्तर प्रदेश...’
दोन दिवसांनी कळले की, पंतप्रधान मोदीजी बिजापूर रुग्णालयात येणार नाहीत. बिजापूर-दंतेवाडा रोडवर 30 किलोमीटरवर असणाऱ्या, जांगला या रोडलगतच्या गावातील उपस्वास्थ केंद्रात 14 एप्रिलला आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ, नंतर तिथूनच आमच्या रुग्णालयाच्या नव्या डायलिसिस विभागाचे डिजिटल उद्घाटन, नंतर भाषण असा कार्यक्रम ठरला होता. त्यानिमित्ताने जांगलाला आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, रेशीम उत्पादन, आदिवासी मुलांचा राष्ट्रीय खेळात सहभाग, दंतेवाड्यात सुरू झालेले बीपीओ यांचे विविध स्टॉल्स उभे करण्यात येणार होते. आमचा बिजापूर रुग्णालयाचाही स्टॉल त्यात होता. आम्हाला प्रश्न पडला होता की, आयुष्मान भारत या योजनेच्या शुभारंभासाठी छत्तीसगडच्या ‘जांगला’ची निवड कशी काय झाली? त्याचे उत्तरही मिळाले. नीती आयोगाने काही महिन्यांपूर्वी भारतातील एकूण 640 जिल्ह्यांमधून असे 101 जिल्हे निवडले, जे विकासामध्ये सर्वांत जास्त पिछाडीवर आहेत. यातील 70 जिल्हे हे झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, ओरिसा या विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या राज्यांतून निवडले होते. नीती आयोगातर्फे येथील जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत पूर्ण पाठबळ देण्यात आले. या 101 जिल्ह्यांतून बिजापूर जिल्ह्याने बाजी मारली आणि जिल्हाधिकारी डॉ.अय्याज तांबोळी यांनी बिजापूर जिल्ह्यात केलेल्या नेत्रदीपक व सर्वंकष विकासामुळे 14 एप्रिल 2018 या डॉ.आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमित्त ‘जांगला’ची निवड आयुष्मान भारत योजनेच्या उद्घाटनासाठी करण्यात आली.
दि. 13 एप्रिलला सकाळीच डॉ.नागुलन बोलवायला आले. रुग्णालयाच्या स्टॉलसाठी भूलतज्ज्ञ डॉ.मित्तल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अरुण, डॉ.नागुलन, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ.पुष्पेंद्र, मुख्य मेडिकल ऑफिसर डॉ.पुजारी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मीही- अशी टीम बनवण्यात आली होती. आज मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम असणार होती. आठलाच आम्ही जांगलामध्ये पोहोचलो. पंधरा दिवसांपूर्वी आम्ही पाहिलेले जांगला आणि आजचे चित्र यात खूप फरक होता. डांबरी रोड बनले होते, हेलिकॅाप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार होते. छोट्याशा गावात एकजणू नवे शहर वसवले गेले होते. खूप सारी पक्क्या बांधकामाची दुकाने, SBIचे नवे ATM मशीन, सुरेख रंगवलेले उपस्वास्थ्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, आदिवासी संस्कृतिदर्शनासाठी निरनिराळ्या मूर्ती, बांबूचे विविध काम... आम्ही सारे थक्क होऊन पाहत राहिलो. दुकानांवर नावे रंगवणे अजूनही चालू होते. एका पेंटरने नावात चूक केली होती, मग तिथे चहा पिता-पिता मी त्याला दुरुस्ती सांगू लागले. तिथून आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कसून झडती घेणे चालू होते. कुत्रे, मशिन्स, गार्ड्स... प्रत्येकाला प्रवेशासाठी पास दिलेला होता. सर्व पार करून आम्हीही आत गेलो. थोड्याच वेळात जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसर भेटले. कामाच्या अतिताणाने ते अशक्त झालेले दिसले. आमचा शेजारी जिल्हा दंतेवाड्याचे जिल्हाधिकारी डॉ.सौरभ कुमार, NRHMचे MD डॉ.सर्वेश भुरे, असे अनेक लोक कामाच्या देखरेखीत व्यग्र होते. आम्ही आमच्या स्टॉलवर जाऊन उभे राहिलो. उन्हे चढत राहिली, तालीम चालू राहिली, पुन:पुन्हा सर्व परीक्षण करणे, सूचना देणे चालू राहिले. आम्ही सर्व जण थकून खाली जमिनीवर बसून राहिलो. एकच खुर्ची ठेवली होती, आळीपाळीने एकमेकांना खुर्ची देत राहिलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच आम्ही सर्व जांगलाकडे निघालो. बऱ्याच अलीकडे पार्किंगची सोय केली होती. जांगलामध्ये झाडे न तोडता मधे-मधे केलेली पार्किंगची जागा मी प्रथमतःच पाहत होते. बऱ्याच अलीकडे गाडी सोडून आम्ही चालत निघालो. एका मोठ्या मंडपात नाश्त्याची सोय होती. अनेक ठिकाणी सुरक्षापथकांकडून तपासणी होत होती. एक स्त्री पोलीस म्हणाली, ‘आपके पास कुछ नहीं है ना? मै भरोसा कर रही हूँ’ तिला म्हटले, ‘मै डॉक्टर हूँ’
आज पुन्हा स्टॉलमध्ये ताटकळत उभे राहिलो. बरेच IAS ऑफिसर्स येऊन कुठे उभे रहायचे, कसे बोलायचे, चेहऱ्यावर कसे स्मित ठेवायचे, वगैरे सूचना देत होते. बाराच्या सुमारास हेलिकॉप्टर आले. सर्वत्र शांतता पसरली. बऱ्याच वेळाने काळ्या रंगाची, मोठी बुलेटप्रूफ गाडी आली. ढोलांचा आवाज आणि विविध पेहराव केलेल्या आदिवासी लोकांचे नृत्य सुरू झाले. आम्ही तिथून बरेच दूर असल्याने नक्की पंतप्रधान मोदीच आले का, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यावर मग आम्ही बराच वेळ आपसात चर्चा करत राहिलो. त्या वेळेस उपस्वास्थ्य केंद्रात आयुषमान योजनेचे उद्घाटन, तेथील स्टाफसोबत चर्चा, आमच्या डायलिसिस विभागाचे उद्घाटन हे सर्व चालू होते. काळे गॉगल्स व काळे सूट घातलेले सुरक्षारक्षक सर्वत्र फिरून निरीक्षण करू लागले. मग काहीच वेळात उपस्वास्थ्य केंद्रातून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह आणि डॉ.अय्याजसर बाहेर पडलेले दिसले. स्त्रीचालकाच्या इलेक्ट्रॉनिक रिक्षामध्ये मोदीजी व रमण सिंहजी दोघेही बसले व त्यातून स्टॉलकडे निघाले. SBIच्या ATM ब्रँचचे उद्घाटन झाले. आमचा दुसरा स्टॉल होता. डॉ.अय्याजसर मोदीजींना व रमण सिंहजींना सर्व योजनांची, उपक्रमांची, स्टॉल्सची माहिती देत होते. ते पाहून आम्हाला बिजापूर जिल्ह्याबद्दल व अय्याजसरांबद्दल खूप अभिमान वाटत होता. आमच्या स्टॉलवर ते येताच अय्याजसरांनी रुग्णालयाची माहिती दिली, डॉक्टरांच्या कामाचे कौतुक केले. आम्ही प्रत्येकाने नाव, राज्य व अनुभव सांगितले. इतक्या जवळून मी पंतप्रधानांना पाहते आहे, यावर माझा विेश्वास बसत नव्हता. मुख्यमंत्री रमण सिंहजी हसत-खेळत बोलत होते. पंतप्रधान व मुख्यमंत्री पुढच्या स्टॉलवर गेले आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. पलीकडे बिजापूरच्या स्पोर्ट्स अकादमीचा स्टॉल होता. बिजापूर जिल्ह्यातून बरीच आदिवासी मुले राज्य व देशस्तरावर गेली आहेत. मोदीजी तिथे बराच वेळ रमले.
इथला कार्यक्रम आटोपून मोदीजी व रमण सिंहजी भाषणस्थळी रवाना झाले, जिथे अनेक आदिवासी गावागावांतून गोळा झाले होते अथवा करण्यात आले होते. विविध ठिकाणी फोटो काढून आम्ही बिजापूरला परत निघालो. जाताना जांगलामधून नव्याने करण्यात आलेल्या बायपास रस्त्याने बाहेर पडावे लागले. तिथे अनेक मंडप लागले. गावातून आलेल्या आदिवासी लोकांसाठी राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाषणस्थळी अनेक आदिवासी लोक तर होतेच, परंतु इकडे मंडपातही अनेक स्त्री-पुरुष आराम करत होते, जेवत होते. भाताच्या खिचडीचा मस्त वास सुटला होता. मंडपात लोकांसाठी आमची डॉक्टर्सची टीमही तैनात होती. रस्त्यालगत एके ठिकाणी बाजार लागला होता. भाज्या- फळे, वस्तूंची खरेदी-विक्री चालू होती. त्या सर्व मेळाव्याला एका तात्पुरत्या नव्या गावाचे स्वरूप आले होते. आणखी पुढे गेलो तर शे-सव्वाशे स्त्री-पुरुष घाईघाईत निघाले होते. कदाचित ते गावी परतत असावेत. वाहने दूरवर असल्याने त्यांना पार्किंगपर्यंत चालत जावे लागणार होते. जवळजवळ 90 टक्के लोक अनवाणी होते. आम्ही ए.सी. गाडीतही उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ झालो होतो आणि हे लोक भर उन्हात अनवाणी पायाने चालत आहेत... कशाचे बनलेले असतात हे लोक?
पुन्हा आमची चर्चा. एक जण म्हणत होता, ‘जबरदस्ती इन लोगो को लाया गया है. एक दिन मोदीजी यहाँ आनेसे इनको क्या फायदा होगा? कुछ फरक नहीं पडनेवाला.’ आणखी कोणाचे तरी विरुद्ध मत- ‘कमसे कम आज तो अपने पॉलिटिशियन यहाँ तक आये. आज के दिन तो अपने देश के लोग इनके बारे मे जानेंगे, सोचेंगे. इससे पहले तो किसीको पडी नहीं थी इन लोगो की. बदलाव आने में वक्त लगेगा, लेकिन कहीसे शुरुवात तो होनी चाहिये.’
पूर्वी छत्तीसगड मध्य प्रदेशचा भाग होते. तेव्हा हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. विकास जवळजवळ शून्य. छत्तीसगड हे वेगळे राज्य झाल्यापासून विकासाने गती घेतली. त्यात बस्तर, दंतेवाडा, बिजापूर, सुकमा हे पिछाडीवर राहिले. सध्याच्या महत्त्वाकांक्षी IAS अधिकाऱ्यांच्या धडाडीमुळे तिथे वेगाने बदल होतो आहे.
पुन्हा बिजापूरला पोहोचलो. सिव्हिल सर्जन डॉ.कुंवरसरांच्या केबिनमध्ये सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चालू होते. मी डायलिसिसचा विभाग पाहायला गेले. महाराष्ट्रातील कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या तोडीचा तो सुसज्ज डायलिसिस विभाग पाहून मी आश्चर्याने दंग झाले. आमचे फिजिशिअन डॉ.ब्रिजलाल व डॉ.ज्योती या विभागाची पूर्ण जबाबदारी पेलायला तयार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून डॉ.अय्याजसरांचे स्वप्न होते डायलिसिस सुरू करण्याचे आणि आज ते प्रत्यक्षात आले. यामुळे आता किडनीच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांचा, सर्पदंश- मलेरिया यामुळे किडनीवर परिणाम होऊन निर्माण होणाऱ्या व्याधींचा इलाज होऊ शकणार आहे.
Tags: डॉ.अय्याज मलेरिया सर्पदंश डायलिसिस विभाग डॉ.सर्वेश भुरे डॉ.सौरभ कुमार मेडिकल ऑफिसर डॉ.पुजारी डॉ.पुष्पेंद्र प्रोजेक्ट मॅनेजर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अरुण भूलतज्ज्ञ डॉ.मित्तल नीती आयोग ओरिसा राजस्थान आसाम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार झारखंड आयुष्मान भारत योजना जांगला दंतेवाडा डॉ.तामस्कर डॉ.पुजारी डॉ.नागुलन कुटरू नेमेड तेंदूपत्ता तुमनार गर्भवती डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्रीरोगतज्ज्ञ बिजापूर Dr. Aishwarya Revadkar Dr. Ayyaz Maleriya Snake Byte Dialysis Machine Dr. SaurabhKumar Dr. Sarvesh Bhure Medical Officer Project Manager Dr. Pushpendra Dr. Arun Dr. Mittal NIti Aayog Orisa Rajasthan Assam Uttarpradesh Madhyapradesh Chattisghar Chattisgadh Bihar Zarkhand Jharkhand Aayushyaman Bharat Yojana Jangala Tantewada Dr. Tamaskar Dr. Pujari Dr. Nagulan Kutaru Nemed Tumnar Pregnant Pregnancy Bijapur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या