डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विज्ञानाने जगण्याचा हेतू तर स्पष्ट केलाच पण...

नवे उपक्रम योजणे, जुन्यांमधले सातत्य व ताजेपणा जपणे आणि स्वतःच्या ऊर्जेसोबत अनेकांची ऊर्जा टिकवणे-  हे विषय व्यवस्थापनशास्त्राचे! पण माझ्या विज्ञानाच्या वाटेनेच मला व्यवस्थापनाचे आणि संघटनाचातुर्याचे शिक्षण दिले. त्याचबरोबर मानसशास्त्रालाही मी नव्याने ओळखायला लागलो. डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या विवेकनिष्ठ मानसशास्त्राची ओळख झाली ती पंचवीस वर्षांपूर्वी. वैयक्तिक जीवनातल्या भावनिक उलघालींचे उत्तर मिळत नव्हते, म्हणून  त्या काळात मी कदाचित्‌ दैववादी, कर्मकांडनिष्ठ, देवतावलंबी असा झालो असतो... पण विवेकवाद आयुष्यात आला तो आधी प्रा. किशोर फडके  ह्यांच्या शिकवण्यातून आणि डॉ.शुभा थत्ते ह्यांच्या सहवासातून.

 

आमच्या घराच्या गच्चीतून दिसणारी शरद ऋतूमधल्या स्वच्छ आकाशाची, शुक्ल पक्षातील उजळलेली रात्र. आम्ही भावंडे वडलांच्या आजूबाजूला अंथरुणात... आणि वडील आम्हाला सांगताहेत, आकाशगंगा म्हणजे काय? ...नक्षत्रांना नावे कशी पडली?... संस्कृतमध्ये, इंग्रजीमध्ये. व्याधाच्या धनुष्याला जोडणाऱ्या काल्पनिक रेषा काढताना काय मस्त झोप यायची! आणि त्यातही असायच्या वडिलांच्या गोष्टी. माझे वडील तसे रसायनशास्त्राचे प्राध्यापक... पण आमच्या घरातला विज्ञानाचा संस्कार हा असा खेळकर होता. वेगळ्या रंगाच्या लाकडी गोट्या आणि त्यांना जोडणाऱ्या स्प्रिंग्ज्‌ होत्या घरात...  रासायनिक रचना शिकवताना मॉडेल म्हणून वडील ते वापरायचे... एक दिवस त्यांनी मलाही हे सारं सोपं करून पाच वर्षांच्या बुद्धीला झेपेल असं शिकवलं. त्यांना झाडा-फुलांची आवड... आमच्या अंगणात अनेक फुलझाडे आणि फळझाडे. डाळिंबाच्या फुलापासून ते फळातल्या दाण्यापर्यंतचे आवर्तन त्यांनी मला झाडाच्या साक्षीने समजावून सांगितले. आणि वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी लगेच पुस्तक आणून दिले. ते होतं, ‘वनस्पतींचा जादूगार : ल्यूथर बरबँक’... पुढे कॉलेजात गेलो आणि वडिलांच्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या तासाला बसलो. तेव्हा ती समीकरणे फळ्यावर छान डौलात नाचताना दिसायची. तेसुद्धा वडलांचे कसब होते.

ह्या संस्कारांमुळे शाळा-कॉलेजातल्या विज्ञान विषयांबद्दल भीती तर वाटली नाहीच, पण मोकळी मैत्री होऊ शकली. चांगले गुण मिळण्याच्या यशस्वी अपघाताने जेव्हा मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजला पोहोचलो, तेव्हा सुदैवाने वडिलांच्याच वृत्तीचे शिक्षक भेटले. एम.बी.बी.एस.च्या पहिल्या वर्षी, धसमुसळेपणे डिसेक्शन करणाऱ्या मित्राला आमचे नोटॉमीचे डॉ.एम.एल. कोठारीसर एकदा हळुवारपणे म्हणाले, ‘‘डेलिकेटली... माय बॉय... डेलिकेटली! तर तो उत्तरला, सर इट्‌स ए कॅडेव्हर...’’ मृत शरीर आहे हे... तसे सर म्हणाले, ‘इफ यू विल नॉट लर्न टू रिस्पेक्ट द डेड... हाऊ विल यू रिस्पेक्ट द लिव्हिंग?’ मृत शरीराचा आदर करायला नाही शिकलो आपण, तर पुढे जाऊन जिवंत शरीराचा- माणसाचा आदर कसा करणार आपण?... वैद्यक विज्ञानातला हा बेसिक फंडा सरांकडून पहिल्या वर्षीच समजला.

आता जाणवतं आहे की- अशा संस्कारांमुळे, भौतिक विज्ञानातल्या Reductionistic thinking कडेही Holistic म्हणजे सर्वसमावेशक दृष्टीने पाहण्याचे शिक्षण मिळाले. साधी गोष्ट इंजेक्शन देणे. आमचे विजय आजगावकर सर हा ‘विषय’ तपशीलवार ‘शिकवायचे’... छोट्या मुलाला इन्शुलिनचे इंजेक्शन देताना ते त्या मुलाला, त्यांचा स्वतःचा दंड पकडायला सांगायचे. ‘‘मी तुला ह्या सुईने जेवढे दुःख देणार, तेवढे दुःख तू माझ्या दंडाला चिमटा काढून मला द्यायचं... मी तुला वेदना देणार, तर मीसुद्धा तुझ्याकडून वेदना घ्यायला नको?...’’ आणि वेदनेच्या खेळात ती वेदनाच हरवून जायची. वैद्यकशास्त्र असं जिवंत होऊन समोर येते, तेव्हा त्यातल्या माणुसकीसकट ते शिकायला मिळतं... शरदिनी डहाणूकर मॅडम झाडांविषयी बोलायच्या, तेव्हा झाड डोलतंय्‌ असं वाटायचं... माझे रवी बापटसर शास्त्रीय संगीताच्या समेवर पोटातला अवघड पेच स्वतःच्या सर्जरीने सोडवायचे... आणि जोडीला आयव्हॅन इलिच, फ्रिजिट कॅप्रासारखे लेखक... ‘जिथे डॉक्टर नसेल’, तिथे ह्यासारखी पुस्तके... शिवाय कॉनन डॉयल, चेकॉव्ह, श्वायट्‌झर अशा डॉक्टर लेखकांचे साहित्य जोडीला. ए.जे. क्रोनिनच्या ‘सिटॅडेल’ने एवढे इम्प्रेस केलं की, त्या कादंबरीवर आधारित देव आनंदचा एक पिक्चरही भक्तिभावाने, फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला.

म्हणजे वैद्यकशास्त्र शिकतानाच विज्ञान प्रत्यक्षात जगायचे पाठ मिळत होते. पुढे मनोविकारशास्त्र प्रवेशले मेंदूच्या परिघामध्ये. इथे तर अधिकच गंमत... अमूर्त मनाचे विज्ञान... फ्रॉईडबाबा कळायला कठीण. पण त्यांचं चरित्र वाचल्यावर आपल्यातले वाटू लागले. सव्वीस वर्षांचा सिग्मंड एकवीस वर्षांच्या मार्थाच्या प्रेमामध्ये कसा धाड्‌कन्‌ आपटला होता, हे कळल्यावर ‘इड-ईगो-सुपरइगो’चे भेंडोळे जरा आवाक्यातले वाटू लागले. दुसऱ्या बाजूला मनोविकारांकडे ‘जीवरसायनांच्या’ दृष्टिकोनातून Organic Psychiatry. सुदैवाने (पुन:पुन्हा सुदैवाने) त्या क्षेत्रातले एक पारशी महर्षी म्हणजे डॉ.डुंगजीसर... लक्षणे आणि निदान ह्यांची तर्कशुद्ध समीकरणे... त्यावर आधारित औषधी मॉलेक्यूल... त्यांच्या बुद्धीचे आश्चर्य वाटायचे... आणि दुसरे प्रोफेसर डॉ. एल.पी.शहा. त्यांनी तर मला व्यसनाधीनता ह्या विषयाच्या प्रॅक्टिकलमध्येच बुडवले... म्हणजे मी माझ्या वॉर्डातल्या व्यसनी मित्रांकडूनच शिकायला लागलो. व्यसनमुक्त होणाऱ्या पेशंट्‌सबरोबर अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या मीटिंग्ज करायला लागलो... आता मला मनोविकारशास्त्र चोहो अंगांनी आवडू लागले होते. कारण माझे विज्ञान आता अनुभवाशी जोडले जात होते. ए.ए. संघटनेच्या एका सभेला मला त्या काळात वक्ता म्हणून बोलवले होते. एम.डी.च्या परीक्षेच्या आधी. भाषण देऊन व्यासपीठावरून उतरलो तर वयाने सिनिअर, प्रभावी डोळ्यांचे एक गृहस्थ समोर आले. मला म्हणाले, ‘‘अतिशय छान बोललास... मी अमुक अमुक... ह्या फेलोशिपचा सभासद!’’ मी आश्चर्याने बेशुद्ध पडायच्याच वाटेवर होतो. ‘‘तू स्वतःहून जे ग्रुपथेरपीचे सेशन्स घेतोस... सोपे करून सांगतोस... त्या सगळ्याचं माझ्या रेसिडेंट्‌स आणि स्टाफसाठी एक क्लिनिक घेशील का?’’ मुंबईतले एक ज्येष्ठ मनोविकारतज्ञ होते ते. एका डिपार्टमेंटचे प्रमुख आणि वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या व्यसनमुक्तीसाठी ए.ए.च्या मीटिंगला येणारे सभासद. ह्या सरांसोबत पुढे माझी खूप मैत्री झाली. पण त्या प्रसंगाने मला माझ्याच ‘माणूस’पणाबद्दलची एक प्रचंड मोठी Insight दिली.

म्हणजे माझे विज्ञान मला प्रयोगशाळेत वापरायचं नव्हतं, तर माणसांमध्ये जाऊन माणसांसाठी वापरायचे होते. एम.डी. होता-होता गर्दचे व्यसन आलं होतं क्षितिजावर. तेव्हा एकांड्या शिलेदारासारखंच काम सुरू केलं होतं, मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन... त्यातून पुढे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आकाराला येण्यास मदत झाली... ह्याच प्रवासात कळलं की, माझ्या शास्त्राचे नाव फक्त मनोविकारशास्त्र नसून मनआरोग्यशास्त्र आहे... आपल्याच विज्ञानाची विस्तारित कक्षा लक्षात येण्याचा हा प्रवास गेली तीस वर्षे आय.पी.एच. (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) ह्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यातून कळालेला एक महत्त्वाचा मुद्दा हा की, विज्ञानाने जनविज्ञान व्हायला हवं. मनआरोग्यक्षेत्रातले फक्त व्यावसायिक नकोत, पण समाजातले कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत हवेत. कारण त्यामुळे मनआरोग्यशास्त्र आणि समाज ह्यांच्यामधली अज्ञान-अंधश्रद्धांची दरी कमी होत जाणार.

मनोविकारशास्त्र आणि मानसशास्त्र हे दोन्ही प्रांत आधुनिक वैद्यक विज्ञानाच्या प्रांतातही तसे नवेच म्हटले पाहिजेत. जेमतेम शे-दीडशे वर्षांचा इतिहास आहे त्यांना. इंग्रज राज्यकर्त्यांसोबत ते आपल्या देशात आले,  मनोरुग्णालयांची एक ‘व्यवस्था’ घेऊन. आपल्या देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मनोविकारशास्त्राचे विभाग सुरू झाले, तेसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही काळ आधी आणि नंतर. त्यातही भर होता तीव्र मनोविकारांच्या लक्षणांवरच्या उपचारांवर. म्हणजे ह्या विकारांकडे (Disorders) जे विसंवाद  (Distress) घेऊन जातात, त्यांच्यासाठी एक वेगळी आधार आणि मार्गदर्शक व्यवस्था असायला हवी (Support and Counselling). आजवर आपल्या समाजात हे काम कुटुंबव्यवस्थेने, संस्कृतीने आणि उपासना धर्मांमधल्या मानवधर्म प्रमाण मानणाऱ्यांनी केले. आधुनिक मानसशास्त्र बहुसंख्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेच नाही. मनोविकारतज्ज्ञ तर अजूनही संख्येने इतके कमी (आज घडीला जेमतेम 8500) की, औषधे लिहिण्यातच त्यांची आयुष्याची कार्यमग्नता कामी यावी. आपल्या असे लक्षात येईल की, ह्या  Distress गटाची व्याप्ती आर्थिक उदारीकरणानंतर वाढू लागली आणि गेल्या तीस वर्षांमध्ये अशी ‘व्यवस्था’ तयार करणारे अध्यात्मक्षेत्रातले कुशल उद्योजकही तयार झाले. ह्यामध्ये उपहास नसून वास्तवाचे दर्शन आहे. आमचे मनआरोग्यशास्त्र  (मनोविकारशास्त्र आणि मानसशास्त्र) काही असा सामाजिक प्रभाव पाडू शकले नाही.

त्याचे एक प्रमुख कारण- आमची संख्या, पण तितकेच महत्त्वाचे आमच्यातल्या संघवृत्तीचा आणि उद्योजकतेचा अभाव. जिथे व्यावसायिक एकत्र होऊन काम करतात आणि सामाजिक सहभागाला अतिशय महत्त्व देतात, त्या ठिकाणी मानसिक विकारांवर सर्वसमावेशक उपचारपद्धती तयार होतेच; पण समाजातील गैरसमजुतींचे उच्चाटन व्हायलाही मदत होते. आय.पी.एच. संस्थेचे, मुक्तांगणचे, परिवर्तनचे कार्य या अशा ॲप्रोचच्या उदाहरणादाखल केस स्टडीज्‌ आहेत. अगदी निराधार मनोरुग्णांपर्यंत पोहोचून त्यांच्या पुनर्वसनातून समाजालाच माणुसकीचा पाठ देणारे डॉ. भरत वाटवाणी, डॉ.धामणे पती-पत्नी ह्यांचे काम अतिशय स्फूर्तिदायक आहे. पण तरीही मनआरोग्यक्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करणारी मंडळी एकाच शहरात स्वतःच्या स्वतंत्र चुली उभारण्यातच धन्यता मानतात, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. आमच्या विज्ञानशाखेमधल्या व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिचभर संघटनांमध्येही जेव्हा सत्ता आणि प्रसिद्धीचे हव्यास पाहायला मिळतात, तेव्हा दुःखदायक अनुभव असतो तो. कोविडकाळाच्या पार्श्वभूमीवर खरे तर, मनआरोग्यक्षेत्राचे महत्त्व नव्याने अधोरेखित करायची एक संधी आमच्या विज्ञानासमोर आलेली आहे. संवादाची नवी माध्यमे उपलब्ध झालेली आहेत. गरज आहे ती एकत्र येऊन मनआरोग्याच्या झेंड्याखाली काम करण्याची.

माझ्या पस्तीस वर्षांच्या प्रवासात लक्षात आलेला आणखी एक मुद्दा आहे, सामाजिक सहभागाचा. मनआरोग्यविज्ञान हे जनविज्ञान बनायचे, तर समाजाची भूमिका फक्त हितचिंतकाची नको; कार्यकर्तेपणाची पाहिजे. खानदेशामधल्या एका दर्ग्याजवळ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मनोविकारांवर उपचार करण्याचा एक सामाजिक प्रयोग सुरू केला. जळगावच्या डॉ.प्रदीप जोशींसारख्या मनोविकारतज्ज्ञांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यामधून शेकडो रुग्णांना आजवर मदत झाली. आय.पी.एच. संस्थेच्या वतीने गंभीर मानसिक आजारातून सावरलेले रुग्ण (शुभार्थी), त्यांचे नातेवाईक (शुभंकर) तसेच ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पण मनआरोग्य व्यावसायिक नसणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘द्विज’ पुरस्कार दिला जातो. एका वर्षी चाळीसगाव अंनिसला हा पुरस्कार मिळाला. एकदा डॉ.धामणे पती-पत्नींना. तर, एकदा मधुकर गीते ह्या नाशिक भागातल्या व्यसनमुक्त व्यक्तीला- ज्याने स्वतः पुढाकार घेऊन व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. अशा सक्रिय जनसहभागाला शाबासकी आणि पाठिंबा दोन्ही हवेच.

महाराष्ट्रातील मुक्तांगणच्या बावीस पाठपुरावा केंद्रांचे काम आमचे व्यसनमुक्त मित्र आणि त्यांच्या सहचरी पाहतात. आय.पी.एच.ची ‘मैत्र’ ही दूरध्वनी सेवा सलग बावीस वर्षे फक्त प्रशिक्षित स्वयंसेवक यशस्वीपणे चालवू शकतात- अगदी कोविडकाळातही. अशा सहभागाशिवाय मनआरोग्यशास्त्र सुदृढ बनणार नाही. आय.पी.एच.चा ‘वेध’ (Vocational Education Direction Harmony) हा उपक्रम ‘जीवनकी पाठशाला’ म्हणून जेव्हा महाराष्ट्राच्या दहा शहरांमध्ये पसरतो, तेव्हा शेकडो कार्यकर्ते मनोविकासाच्या यात्रेत जोडले जात असतात. मनोविकास म्हणजे Development. त्यासाठी विज्ञानाने समाजापर्यंत पोहोचायला हवं. आय.पी.एच.च्या माध्यम विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या, ‘आवाहन आय.पी.एच.’ ह्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आमच्या दर दिवशी वाढणाऱ्या 65000 सबस्क्रायबर्सपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. यंदा तर ‘वेध’ही ग्लोबल स्वरूपात इंटरनेटवर येऊ घातला आहे. नवे उपक्रम योजणे, जुन्यांमधले सातत्य व ताजेपणा जपणे आणि स्वतःच्या ऊर्जेसोबत अनेकांची ऊर्जा टिकवणे- हे विषय व्यवस्थापनशास्त्राचे!

पण माझ्या विज्ञानाच्या वाटेनेच मला व्यवस्थापनाचे आणि संघटनाचातुर्याचे शिक्षण दिले. त्याचबरोबर मानसशास्त्रालाही मी नव्याने ओळखायला लागलो. डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या विवेकनिष्ठ मानसशास्त्राची ओळख झाली ती पंचवीस वर्षांपूर्वी. वैयक्तिक जीवनातल्या भावनिक उलघालींचे उत्तर मिळत नव्हते, म्हणून त्या काळात मी कदाचित्‌ दैववादी, कर्मकांडनिष्ठ, देवतावलंबी असा झालो असतो... पण विवेकवाद आयुष्यात आला तो आधी प्रा. किशोर फडके ह्यांच्या शिकवण्यातून आणि डॉ.शुभा थत्ते ह्यांच्या सहवासातून. ह्या Rational Emotive Behaviour Therapy अर्थात्‌ REBT मुळे माझे वैयक्तिक आयुष्य सुस्थिर व्हायला मदत झालीच, पण संस्थेच्या कामाचीच वैचारिक भूमिका पक्की झाली. मनआरोग्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या उपचारपद्धतीचे अनंत प्रयोग करता आले आणि ते अजूनही सुरूच आहेत. विज्ञानाच्या अभ्यासातून आपली दृष्टी संकुचित व्हायला नको, तिचा विस्तार व्हायला हवा; म्हणूनच मानसशास्त्रासोबत आपल्याला इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय कसे जोडता येतील ह्याचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे विज्ञानामधले नवे आयाम शोधण्याचा एक Interdisciplinary approach मिळाला आणि ह्या अभ्यासातले प्रयोग लेखन-भाषणाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवताही आले... म्हणजे विज्ञानाने माझ्या जगण्याचा हेतू स्पष्ट केलाच, पण जगण्याच्या गणिताच्या अनेक रीती दाखवल्या. अद्वैत तत्त्वज्ञानामधल्या ‘तत्त्वबोध’ ह्या ग्रंथावरची टीका वाचत होतो. त्यात ‘श्रद्धा’ म्हणजे काय ह्याची एक नवीनच व्याख्या समोर आली. आत्मविकासासाठी जो अभ्यासमार्ग स्वीकारला आहे, त्यावरचा अढळ विश्वास म्हणजे श्रद्धा!... ती व्यक्तीवरची, विचारांवरची, धर्मावरची नव्हे- तर चांगला माणूस बनण्याच्या अभ्यासमार्गावरची श्रद्धा... मनआरोग्य-शास्त्राच्या विस्तारणाऱ्या पैलूंसोबत माझ्यातला (activist) कार्यकर्ता जसा मला सापडत गेला तसतशी माझी विज्ञानावरची श्रद्धा दिवसेंदिवस छानपैकी पिकत चालली आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात