डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - त्यांच्याच शब्दांत
वास्तवावर आधारलेल्या काल्पनिक मुलाखती….(11)

युवा पत्रकार : गेल्या वेळी कायदामंत्री म्हणून आपण केलेल्या कार्यासंबंधी सांगितले.

डॉ. आंबेडकर : कामगारमंत्री म्हणून मी शक्य ते केले, परंतु वाटाघाटींचे पर्व सुरू झाल्यावर मात्र माझ्या वाट्याला उपेक्षाच आली. 1946च्या सार्वत्रिक निवडणुकीत आमच्या पक्षाचा पराभव झाला आणि त्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या पक्षांचे सरकार स्थापण्याचे ठरले, तेव्हा व्हाइसरॉय वेव्हेल यांनी कार्यकारी मंडळाला रजा देण्याचा निर्णय घेतला. मी मे 1946 मध्ये मुंबईला परतलो. सुरुवातीला मी घटना समितीवर बंगालमधून निवडून आलो होतो; परंतु बंगालचा काही भाग पाकिस्तानमध्ये जाणार असल्यामुळे माझ्या सभासदत्वाचे भविष्य अनिश्चित होते.

मला समाधान देणारी या काळातील मुख्य घटना म्हणजे शिक्षणक्षेत्रातील माझे स्वप्न मी साकार करू शकलो. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी आणि विशेषतः दलितांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता मी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून तिच्या अधिपत्याखाली मुंबईमध्ये फोर्ट भागात सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले, माझे सहकारी म. भि. चिटणीस, अनंतराव चित्रे, बॅरिस्टर समर्थ, सुरबानाना टिपणीस यांची मला फार मदत झाली आणि उत्तम शिक्षकवर्गही मला मिळाला. उत्कृष्ट ग्रंथालय उभे करण्यात शां. श. रेगे यांचे मला फार साहाय्य मिळाले आणि विज्ञान शाखेसाठी आम्ही अत्यंत सुसज्ज प्रयोगशाळा उभारल्या.

माझा या वेळी काँग्रेसशी संघर्ष सुरू होता. त्यामुळे काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांचा माझ्यावर फार राग होता. परंतु 13 डिसेंबरला मी घटना समितीत केलेल्या भाषणामुळे सर्व वातावरणच बदलले. 9 डिसेंबरला सच्चिदानंद सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरती नेमणूक झाली होती. घटना समितीने राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी निवड केली आणि 13 डिसेंबरला घटना समितीची पहिली बैठक भरली. सुरुवातीस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीचा उद्देश व साध्य स्पष्ट करणारा ठराव मांडला, पंडित नेहरूंचे भाषण फार प्रभावी झाले. परंतु बॅरिस्टर जयकर यांनी मुस्लीम लीग व संस्थानिकांचे प्रतिनिधी येईपर्यंत पंडित नेहरूंचा ठराव संमत करू नये अशी दुरुस्ती मांडली. सरदार पटेल यांनी बॅरिस्टर जयकर यांच्या सूचनेवर कडाडून हल्ला केला. त्यानंतर फ्रेंक अँथनी बोलले. अध्यक्षांनी माझे नाव पुकारले. काँग्रेस सदस्य माझ्यावर संतापलेले होते, हे मला माहीत होते. परंतु मी या ठरावाकडे राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहत होतो. मी माझ्या भाषणाची सुरुवातच अशी केली की, आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगलो आहोत. मी युद्धाची छावणी ठोकून राहिलेल्या एका जमातीचा नेता आहे. परंतु माझी खात्री आहे की, परिस्थिती बदलताच आणि योग्य काळ येताच, आपल्या एकीस कोणीही अडथळा आणू शकणार नाही. जरी अनेक जाती आणि धर्म आपल्या देशात असले तरी आपण एक राष्ट्र होऊ याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. माझ्या या भूमिकेमुळे सभागृहाचे वातावरणच बदलले. काँग्रेस सदस्य मधून मधून टाळ्या वाजवून मला पाठिंबा देऊ लागले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी म्हणालो की, देशातील सर्व वर्गांना बरोबर नेण्याचा आणि अंती एकी होईल असा मार्ग स्वीकारण्याची ताकद आणि शहाणपण आपल्यात आहे, हे आपण आपल्या वागणुकीने दाखवू या. माझ्या आयुष्यातील तो एक समरप्रसंग होता. परंतु माझ्या कळकळीच्या भाषणाने पंडित नेहरूही प्रभावित झाले. माझ्या सूचनेप्रमाणे पंडित नेहरूंच्या ठरावावरील निर्णय पुढे ढकलण्यात आला आणि पुढे 20 जानेवारी 1947ला वाटाघाटींचे पर्व संपुष्टात आल्यानंतर तो संमत करण्यात आला.

घटना समितीत भावी काळात जी घटना संमत होणार होती, तिचा घाट कसा असावा, या संबंधीचे विचार स्पष्टपणे मांडण्याची हीच वेळ आहे. हे मी जाणत होतो. म्हणून मी घटनेचा एक मसुदा तयार केला होता. ब्रिटिश पार्लमेंटने हिंदी स्वातंत्र्याचा ठराव 15 जुलै 1947 रोजी संमत केला. भारताची फाळणी झाली होती आणि घटना समिती आता सार्वभौम झाली.

बंगालच्या फाळणीमुळे माझी जागा कमी झाली, परंतु बॅरिस्टर जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्या आदेशानुसार, मुंबई विधिमंडळातील काँग्रेस पक्षाने घटना समितीवर माझी निवड केली. मला याचे फार समाधान वाटले.

युवा पत्रकार : आपली घटना समितीवर निवड करून काँग्रेस पक्षाने आपल्या विद्वत्तेचा आणि विशेषतः कायद्यावरील आपल्या प्रभुत्वाचा योग्य तो गौरव केला, असे मलाच नव्हे तर सर्व जाणकारांना वाटते. आपली स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पंडित नेहरूंनी नियुक्ती कशी केली, हे आपण मला सांगाल का?

डॉ. आंबेडकर : सांगतो. तो एक मजेदार किस्सा आहे. गांधी जेव्हा दुसऱ्या राउंडटेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला गेले होते, तेव्हा त्यांचा मुक्काम ईस्ट लंडनमधील 'किंग्जले हॉल' या समाजसेवा केन्द्रामध्ये होता. त्या केन्द्राच्या संचालिका मिस लेस्टर या होत्या. लेस्टरबाई 1946 मध्ये हिंदुस्थानात आल्या होत्या, त्या वेळी त्या वर्ध्याला एक आठवडा राहिल्या, लेस्टरबाईंची आणि माझी इंग्लंडमध्ये ओळख झाली होती. लेस्टरबाई मुंबईला ड्रेशरबाईंकडे राहिल्या होत्या. त्याही माझ्या ओळखीच्या होत्या. ड्रेशरबाईंनी मला जेवायला बोलावले होते, त्या वेळी लेस्टरबाई तिथे होत्या. संभाषणाच्या ओधात त्या ड्रेशरबाईंना म्हणाल्या की, मी गांधीजींबरोबर डॉ. आंबेडकर आणि त्यांची चळवळ याबद्दल वर्ध्याला गेले असताना स्पष्टपणे बोलले. मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आणि काँग्रेसवाले डॉ. आंबेडकरांना चांगले वागवीत नाही. त्यांना सतत विरोध करता, म्हणून डॉ. आंबेडकर तुमच्याशी सहकार्य करीत नाहीत.’’ ड्रेशरबाईंनी विचारले, ‘‘मग यावर गांधी काय म्हणाले?’’ लेस्टरबाईनी उत्तर दिले की, गांधीजी म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता ते खरे आहे. ही आम्हां हिंदूंची चूक आहे आणि ती सुधारली पाहिजे, डॉ. आंबेडकर घटना समितीत आहेत, ते फार विद्वान आहेत आणि देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी केन्द्रीय मंत्रिमंडळात ते असावेत असे मला वाटते. पण ते यायला तयार होतील की नाही हे सांगता येणार नाही.’’ लेस्टरबाई मला म्हणाल्या, ‘‘डॉक्टरसाहेब, तुम्हांला विचारले तर तुम्ही केन्द्रीय मंत्रिमंडळात जावे असे मला वाटते.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘मला असे वाटते की, कोंडीत पकडून नामोहरम करण्याचा काँग्रेसवाल्यांचा डाव आहे.’’  मी लेस्टरबाईंना 1930 पासून काँग्रेसजनांनी माझ्याशी कसे शत्रुत्व केले ते सांगितले. मी त्यांना म्हणालो, 1939 पासून आजपर्यंत माझा जो छळ येथील काँग्रेसजनांनी केला आहे, तो इतका अनन्वित आहे की, त्यांच्या नेतृत्वाखालच्या केन्द्रीय मंत्रिमंडळात जावेसे मला वाटत नाही. लेस्टरबाई मला म्हणाल्या, "तुमच्यावर घोर अन्याय झाला आहे, हे खरे आहे; पण मला वाटते की तुम्ही आता भूतकाळ विसरावा आणि मंत्रिमंडळात जावे." आमच्या त्या दिवशीच्या भेटीनंतर लेस्टरबाई गांधींना भेटल्या आणि आमचे काय काय बोलणे झाले ते त्यांनी गांधींना सांगितले. यानंतर गांधींनी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना सांगितले की, त्यांनी मला मंत्रिमंडळात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. पंडित नेहरू मला भेटले त्या वेळी मंत्रिमंडळात येण्याबद्दलची त्यांची विनंती मान्य करावी की नाही, या बाबत माझ्या मनाचा निर्णय होत नव्हता. परंतु अखेर मी केन्द्रीय मंत्रिमंडळात जाण्याचे ठरविले; आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदामंत्री म्हणून काम करण्यास मी संमती दिली. मला जे, ‘ब्रिटिशांचा बगलबच्चा', अशा शिव्या देत होते, त्याच काँग्रेसजनांनी मी कायदामंत्री झाल्यावर माझा जयजयकार केला. मला एका पत्रकाराने विचारले, ‘‘तुम्ही काँग्रेसचे कट्टर विरोधक, मग काँग्रेसच्या मंत्रिमंडळात कसे गेलात?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘स्वतंत्र भारतात अधिकार पक्षाच्या नेत्याने सहकार्य मागितल्यावर ते करणे माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. शिवाय मी काँग्रेस पक्षात सामील झालेलो नाही. त्या पक्षाचे माझ्यावर कसलेही बंधन नाही. मी स्वतंत्रपणे माझ्या खात्याचा कारभार पाहणार आहे. त्याहीपेक्षा मला अनपेक्षित म्हणजे 29 ऑगस्टला घटना समितीने घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमून तिचे अध्यक्षपद मला दिले. घटना समितीमध्ये अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर यांच्यासारखे महान कायदेपंडित असताना मला ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्षपद देण्यात आले, यामुळे मी आश्चर्यचकित झालो. हे नवे आव्हान आहे. आपल्या देशाच्या सेवेची नवी संधी आहे, या जाणिवेने मी घटनेचा मसुदा तयार करण्याच्या समितीचा चेअरमन झालो. ड्राफ्टिंग कमिटीची नियुक्ती 29 ऑगस्टला झाली आणि आमच्या कमिटीने 30 ऑगस्टपासून 141 दिवसांत घटनेचा मसुदा तयार केला. घटना समितीत त्यावर सविस्तर चर्चा झाली आणि घटना मंजूर करण्यात आली. आपल्या घटनेत 295 कलमे आणि 8 परिशिष्टे आहेत. या कामात मला फार मोठे साफल्य मिळाले. काही ठळक गोष्टी मला तुला सांगितल्याच पाहिजेत. देशातील सर्व लोकांचा दर्जा समान असला पाहिजे आणि सर्व नागरिकांना स्वतःची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी समान संधी मिळाली पाहिजे, या प्रमेयाबाबत मी ड्राफ्टिंग कमिटीत दीर्घ काळ चर्चा करून या संदर्भातील घटनेमधील कलमे तयार केली. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा व्हावा म्हणून घटनेत एक कलम घालणे आवश्यक आहे, हे मी आमच्या कमिटीच्या सभासदांना पटवून दिले. मागासलेल्या वर्गांना- विशेषतः अस्पृश्यांना आणि वन्य जातींना घटनात्मक हक्क मिळणे जरूर आहे, हे तत्त्वही मी माझ्या सहकाऱ्यांना पटवून देऊन त्याबद्दलची कलमे तयार केली. शतकानुशतके दलित जातींचे जे जीवनमरणाचे प्रश्न होते, ते सुटण्यासाठी दलितांना घटनात्मक हक्क मिळवून देण्यात मी यशस्वी झालो, याबद्दल मला फार समाधान वाटते.

ड्राफ्टिंग कमिटीतर्फे घटना समितीला राज्यघटनेचा मसुदा सादर करताना मी केलेले भाषण आणि घटना मंजूर होण्यापूर्वीचे माझे समारोपाचे भाषण तू मुळातूनच वाच. माझ्या समारोपाच्या भाषणात 'या देशात घटनेने जी लोकशाही स्थापन होत आहे, ती टिकण्यासाठी तीन पथ्ये पाळणे आवश्यक आहे', असे मी सांगितले. मी म्हणालो की आपण सर्वांनी आपल्या पुढची आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे प्राप्त होण्यासाठी सनदशीर मार्गानेच गेले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटनेने आपली लोकशाही ज्या तीन खांबांवर उभी केली आहे, ते तीन खांब, त्या तीन मुख्य संस्था, लेजिस्लेचर (कायदेमंडळ), एक्झिक्युटिव्ह (मंत्रिमंडळ) आणि ज्युडिशिअरी (न्यायदान मंडळ) यांच्या अधिकारांचा संकोच कोणीही सत्ताधारी व्यक्ती करणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण कोणाही व्यक्तीला मग ती कितीही मोठी असो; हे करू देता कामा नये.

युवा पत्रकार : मी मध्येच बोलतो. पण मला बोलल्याशिवाय राहवत नाही. आपण केलेली ही सूचना 1975 मध्ये इंदिरा गांधींनी पायदळी तुडवली आणि लोकसभेत बहुसंख्य असलेल्या काँग्रेसने ते त्यांना करू दिले. आता आपण मला लोकशाहीसाठी आपण सांगितलेले तिसरे पथ्य सांगा.

डॉ. आंबेडकर : तिसरे पथ्य सर्वांत अधिक महत्त्वाचे आहे. मी घटना समितीला आणि पर्यायाने माझ्या सर्व देशबांधवांना सांगितले की, आपण या देशातील प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा हक्क देऊन राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत; परंतु या लोकशाहीस सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान नसेल तर ती टिकणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन उदात्त जीवनमूल्यांची एकमेकांपासून फारकत करता येणार नाही. समता नसेल तर स्वातंत्र्यामध्ये मूठभर लोक इतरांवर सत्ता गाजवतील, समता असेल पण स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तींची उपक्रमशीलताच नष्ट होईल आणि स्वातंत्र्य व बंधुभावाची जोड नसेल तर आपापसांतील दुहीमुळे स्वातंत्र्य आणि समता धोक्यात येतील. मी शेवटी हे सांगितले की, 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा ही घटना अस्तित्वात येईल तेव्हा आपण एका विसंवादी युगात प्रवेश करणार आहोत. कारण आपल्या राजकीय जीवनात समता असेल आणि आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात विषमता असेल. अशा विसंवादी पद्धतीने आपण जगत राहिलो तर, जे लोक सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे आज भरडले जात आहेत, होरपळून निघत आहेत, ते शांत राहणार नाहीत आणि आपला हा लोकशाहीचा डोलारा धोक्यात येईल. लोकशाहीला समता व बंधुतेचे अधिष्ठान देणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. लोकशाही ही राज्यपद्धती नाही, ती एक उदात्त जीवनपद्धती आहे आणि ही जीवनपद्धती भारतात रुजवण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन जीवनमूल्यांचे पालन केले पाहिजे. हे सांगून मी माझे भाषण संपवले.

युवा पत्रकार : मी आपली ही दोन्ही भाषणे मुळातून वाचेन. आपण मला द्यावीत. 

डॉ. आंबेडकर : पुढच्या खेपेस तू येशील त्या वेळी मी त्या भाषणांच्या प्रती तुला देईन.

युवा पत्रकार : आपण हिंदू कोड बिलासंबंधी मला काही सांगाल का? 

डॉ. आंबेडकर : त्या संबंधी फारसे बोलण्याचीही माझी इच्छा नाही. मी तुला थोडेसे सांगतो. वस्तुतः हे विधेयक जहाल वा क्रांतिकारक नव्हते. नव्या प्रगतिशील गोष्टींना मान्यता देताना अस्तित्वात असलेल्या जुन्या चालीरीती नष्ट करण्याची त्यात तरतूद नव्हती. 'हिंदू कोड बिल' पास व्हावे अशी पंतप्रधान पंडित नेहरूंची इच्छा होती, परंतु काँग्रेस पक्षातील सनातनी प्रवृत्तींच्या अनेक खासदारांचा त्या बिलाला जबरदस्त विरोध होता. पंडित नेहरू हा विरोध मोडून काढू शकले नाहीत. विधेयकाला विरोध करणारे खासदार पंडित नेहरूना म्हणाले की, आता सार्वत्रिक निवडणुका लवकरच होतील आणि त्या निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकांच्या भावना दुखावून चालणार नाही. दुर्दैवाने पंडित नेहरू काँग्रेस पक्षातील बहुमतापुते नमले. विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्यात आले आणि सिलेक्ट कमिटीने विधेयकाच्या मूळ मसुद्यात अनेक दुरुस्त्या केल्या. हिंदू कोड बिल लवकर मंजूर करा, असे पंडित नेहरू म्हणत होते. दुर्गाबाई देशमुखांनी पंडित नेहरूंना विचारले की, बिलाची अशी वासलात लागणार असेल तर वारसा हक्क, स्त्रियांचा मालमत्तेवरील हक्क या प्रमुख तरतुर्दीचे काय होणार? पंडित नेहरूंनी सांगितले की, बिल जसेच्या तसे मंजूर होणे या अधिवेशनात शक्य नाही; म्हणून त्यातला काही भाग पुढील अधिवेशनात मांडला जाईल. ते बिल ज्या स्वरूपात मी तयार केले होते, त्यात बदल करण्यास मी मुळीच तयार नव्हतो. पंडित नेहरूना 10 ऑगस्टला सविस्तर पत्र लिहिले, परंतु ते माझे समाधान करू शकले नाहीत. या प्रश्नावर तत्त्वाच्या बाबतीत तडजोड करून माघार घेण्यास मी तयार नव्हतो. म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझ्या राजीनाम्याबद्दल पंडित नेहरूनी खेद व्यक्त केला आणि हे प्रकरण संपले. या संबंधी मला तुला सगळे सविस्तर सांगावे लागेल, पण ते करण्याची आता मला इच्छा नाही. 

या दुर्दैवी घटनेनंतर काही दिवसांनी एक अत्यंत सुखद अशी घटना घडली. कोलंबिया विद्यापीठाने मला डॉक्टरेट ही पदवी देण्याचा निर्णय मला कळवला. 6 जून 1952 रोजी हा पदवीदान समारंभ कोलंबिया विद्यापीठातर्फे न्यू यॉर्कमध्ये साजरा झाला. ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये मी विद्यार्थी म्हणून अभ्यास केला आणि राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवली त्याच विद्यापीठाने मला माझ्या ज्ञानोपासनेबद्दल आणि घटना समितीतील माझ्या कार्याबद्दल मला 'डॉक्टर ऑफ लॉ’ज' ही पदवी दिली, याचे मला फार समाधान वाटले. पदवी देताना विद्यापीठाने माझा उल्लेख भारताचे एक प्रमुख नागरिक, मोठे समाजसुधारक आणि मानवी हक्कांसाठी खंबीरपणे लढत राहणारे लढवय्ये अशा गौरवपर शब्दांमध्ये केला.

दुसरी सुखद घटना म्हणजे राष्ट्रपतींनी माझी नियुक्ती राज्यसभेवर केली. मी राज्यसभेचा सदस्य असताना पुण्यातील वकील मंडळींनी मला भाषणासाठी बोलावले. ते भाषण पूना डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. मी तुला पुढील खेपेस तू येशील तेव्हा त्या भाषणाची प्रत देईन. (11वा खंड, पृष्ठ 35 ते 50.)

1953 मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीने डॉ. राधाकृष्णन, मी आणि एम. के. वेलोदी अशा तिघा जणांना 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' ही पदवी दिली. मी राज्यसभेचा सदस्य असताना जी भाषणे केली, त्यांच्यामध्ये शेड्युल्ड कास्ट्स अँड शेड्युल्ड ट्राइब्ज रिपोर्टावरील माझे भाषण मला स्वतःला महत्त्वाचे वाटते. त्याची प्रतही मी तुला देईन.

Tags: घटनेचा मसुदा घटना समितीवर नियुक्ती काँग्रेबराबर समझोता त्यांच्याच शब्दांत जीवनप्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर draft of constitution appointment on constitution committee agreement with Congress in his own words Jeevanpravas Dr. Babasaheb Ambedkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ग. प्र. प्रधान

प्राध्यापक, साधनेचे माजी संपादक आणि विधान परिषदेचे माजी सभापती 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके