डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

माझ्या असे लक्षात आले की, माझ्याप्रमाणेच संवेदनातील सर्व स्टाफ व इतर आजी-आजोबांनाही कुसुमबद्दल आस्था व  आदर वाटतो आहे. पण हा आदर म्हणजे  केवळ तिच्याबद्दल वाटणारी कणव नसून ती  ज्या प्रकारे आपल्या आजाराशी दोन हात करत  संघर्ष करत होती,  त्याला दिलेली दाद होती. माणसाला नेहमी ज्ञानी,  तपस्वी किंवा नेते, कलाकार, वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर वाटतो  तसा तो आपल्या आजाराशी संघर्ष  करणाऱ्याबद्दलही वाटत असतो. कुसुमचा हा संघर्ष खरोखरच असामान्य होता. कल्पना आणि वास्तविकता यामध्ये गफलत असणे हे स्किझोफ्रेनिया या आजाराचे मुख्य  लक्षण असते. आयुष्यभर आपल्या  जगण्याबाबत गफलत झालेल्या कुसुमने आपल्या मृत्यूबाबत मात्र ती कशी होऊ दिली नसेल? भलेही तिला आपले जीवन आपल्या  कल्पनेप्रमाणे जगता आले नसले,  तरी ती ज्या  पध्दतीने मृत्यूच्या वास्तवाला सामोरी गेली,  ते पाहून खुद्द मृत्यूसुध्दा थक्क झाला असेल.  

कुसुम आज पहाटे देवाघरी गेली. देव आणि पुनर्जन्म वगैरे  तुम्ही मानता की नाही,  माहीत नाही;  पण ‘मृत्यू म्हणजे देवाघरी  जाणे’ असं आजी मला लहानपणी सांगायची. पुढे आजी गेली  तेव्हा बापूंना धाय मोकलून रडताना पाहून मी त्यांनाही देवाच्या  घराबद्दल विचारले होते. पण ‘तू मोठा झाल्यावर तुला समजेल’,  असं तेव्हा ते हुंदके देत म्हणाले होते.  आता मी मोठा वगैरे झाल्यावर आणि विशेषतः डॉक्टर झाल्यावरही देवाच्या घराबद्दलचे गूढ काही मला समजू  शकलेले नाही. पण काही का असेना- किमान कुसुमच्या  बाबतीत तरी देव आणि देवाचे घर असायला हवे, असे मला  प्रकर्षाने वाटते. नाही तर तिने ‘हे असले आयुष्य माझ्या  वाट्याला का दिलेस?’  म्हणून आपल्या प्राक्तनाबद्दल जाब  तरी कोणाला विचारायचा?  देवाने तिला आपल्या कुशीत  घेऊन आईच्या मायेने कुरवाळावे आणि ‘तुला आयुष्य  देताना माझ्या हातून चूक झाली,’  असे म्हणत तिची समजूत  काढावी अन्‌ तिला आपल्या घरात आनंदाने राहू द्यावे,  अशी  काहीशी भाबडी कल्पना माझ्या मनात आली. अर्थात,  देव  आणि देवाच्या घराबद्दल जरी मी तुम्हाला खात्रीने काही सांगू  शकत नसलो,  तरी आमच्या संवेदना शुश्रूषा केंद्रातील  कुसुमच्या सहा-सात महिन्यांच्या वास्तव्यात तिच्या  जगण्यात काही आनंदाचे क्षण निर्माण करू शकलो,  याचे  समाधान वाटते आहे.  
          
सुरुवातीला तिचा भाऊ आमच्याकडे चौकशी  करण्यासाठी आला,  तेव्हा तिला आमच्या केंद्रात भरती करून घ्यावे की घेऊ नये- असे व्दंव्द माझ्या मनात निर्माण  झाले होते. कुसुमला जिभेचा कॅन्सर होता आणि तिचे एका  कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतेच ऑपरेशन झाले होते. नाकात  नळी होती. त्याव्दारेच द्रवाहार व औषधे सुरू होती.  हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिची शुश्रूषा व  देखभाल यासाठी तिचा भाऊ तिला आमच्याकडे भरती करू  इच्छित होता. पण त्यासोबतच जवळपास गेली पस्तीस वर्षे  ती स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारानेही ग्रस्त होती आणि  गेली दहा वर्षे एका मनोरुग्णालयात भरती होती. त्यामुळे  आमच्या केंद्रात भरती केल्यानंतर ती जर दंगा वगैरे करू  लागली तर इतर वृध्दांना तिचा त्रास होऊ शकेल, अशी भीती  माझ्या मनात होती. त्याविषयी मी तिच्या भावाशी चर्चा  केली. पण स्किझोफ्रेनियासाठी तिला नियमित औषधोपचार  सुरू असून सध्या ती व्हायोलंट वगैरे होत नाही, अशी माहिती तिच्या भावाने दिली. तसेच इथे भरती केल्यानंतर  तशी काही अडचण आल्यास तिला परत मनोरुग्णालयात  दाखल करेन,  असे त्याने सांगितले. त्यानुसार मी कुसुमला  आमच्या केंद्रात भरती करून घ्यायला तयार झालो.  दुसऱ्या दिवशी सकाळी नाकात नळी घातलेल्या व तोंडातून  गळणारी लाळ रुमालाने सतत पुसणाऱ्या कुसुमला घेऊन तिचा  भाऊ ठरल्याप्रमाणे आमच्या केंद्रात आला. मी आमच्या  केंद्राची व्यवस्थापिका माधुरीला बोलावून कुसुमला भरती  करून घ्यायला सांगितले. 
       
प्रथमदर्शनी तिचा एकूण अवतार  पाहून ती आमच्याकडे कशी रुळेल याची धास्ती मनातून वाटत होती. पण माधुरी आणि इतर नर्सिंग स्टाफने मिळून  कावऱ्याबावऱ्या झालेल्या व भेदरलेल्या कुसुमशी गप्पा मारत  तिच्या मनातली भीती दूर केली. बघता-बघता आमच्या  नर्सिंग स्टाफशी कुसुमची छान मैत्री जमली. तिने आपल्या  वयाची साठी ओलांडली असली,  तरी आमच्याकडे भरती  करताना तिचा भाऊ तिला परकर-पोलक्यातच घेऊन आला  होता. त्यामुळे नकळतपणे मी तिच्याशी ‘अरे-तुरे’ बोलायला  सुरुवात केली. पुढे मात्र सर्वच जण तिच्याशी ‘अरे-तुरे’ बोलू  लागले.  जणू ती आमच्या सर्वांची लाडकी मुलगीच झाली.  अनेक वर्षे ती मनोरुग्णालयात भरती असल्यामुळे तिच्या  डोक्यात उवा-लिखा झाल्या होत्या. केसांच्याही जटा झालेल्या. आमच्या नर्सिंग स्टाफने तिला न्हाऊ घातले व तिची  समजूत काढून छानपैकी बॉबकट केला. तिचे बदललेले रूप  पाहून मलाही आश्चर्य वाटले. कारण पहिल्या दिवशी आम्ही  भरती करून घेतले,  तेव्हा तिला आपल्या रूममध्ये घ्यायला  कोणीच आजी तयार नव्हती. त्यामुळे तिला आम्हाला स्वतंत्र खोली द्यावी लागली होती.  काही दिवसांतच कुसुम आमच्या शुश्रूषा केंद्रात इतकी  छानपैकी रुळल्याचे पाहून तिच्या भावालाही नवल वाटले.
        
ती तोंडाने थोडा-थोडा द्रवाहार व औषधे घेऊ लागल्यावर  तिच्या नाकातील नळी काढली. त्यानंतर ती आपल्या  घोगऱ्या आवाजात सर्वांशी बोलू लागली. महिन्याभरानंतर  तिच्या भावाने तिला फेरतपासणीसाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये  नेऊन आणले. तिचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. खरं तर  एका महिन्यानंतर तिच्या नाकातली नळी काढली की,  तिला  पुन्हा मनोरुग्णालयात भरती करायचे तिच्या भावाने ठरविले  होते. पण ती आमच्याकडे छान रुळल्याचे पाहून त्याने तिला  इथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ती आमच्या संवेदना शुश्रूषा  केंद्राचा हळूहळू एक घटकच बनली. कधी स्वयंपाकघरात  जाऊन वहिदाला भाजी निवडण्यासाठी मदत करणे,  तर कधी  जेवणाच्या वेळी इतर आजी-आजोबांना हवं नको ते पाहणे- अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ती भाग घेऊ  लागली. दिवसभर इकडे-तिकडे वावरत असली तरी मी  राऊंडला आल्याची चाहूल लागली की मात्र- ती आपल्या  बेडवर जाऊन बसायची. तिची विचारपूस केली की,  तिला  खूप बरे वाटायचे. एके दिवशी मला तिच्या बेडवर एक डायरी  दिसली. मी तिला त्याबद्दल विचारले. तिने ती डायरी  माधुरीकडून मागून घेतली होती आणि त्यामध्ये अनेक भजने  व भावगीते लिहून काढली होती. विशेष म्हणजे,  ती सर्व भजने व भावगीते तिला तोंडपाठ होती. तिचे अक्षरही  अतिशय सुरेख होते. तिला गायनाची खूप आवड असून  लहानपणी ती आपल्या आईसोबत मंदिरात जाऊन भजने  गायची, असे तिच्या भावाने मला सांगितले. 
          
ती ग्रॅज्युएट  असल्याचे समजल्यावर मला आश्चर्य वाटले. तिचा स्वभाव  काहीसा तापट आणि हट्टी होता. पण गेली दहा वर्षे तिला  मनोरुग्णालयात का ठेवावे लागले,  याबद्दल मी एकदा तिच्या भावाला विचारले. ‘‘सध्या तिच्या मानसिक स्थितीत बरीच सुधारणा झाली  आहे. आम्ही तिला तिकडे मनोरुग्णालयात ॲडमिट केले,  तेव्हा तिच्या मानसिक आजाराने खूप गंभीर स्वरूप धारण  केले होते. तिला सतत वेगवेगळे भास व्हायचे. त्यामुळे काही  कारण नसतानाही,  ती आरडा-ओरडा करायची. घरातील वस्तूंची आदळआपट करायची. आम्ही अडवायला गेलो की  आमच्या अंगावर धावून यायची,  कधी कधी आईला  मारहाणही करायची. आईचेही वय झाले होते. त्या अगोदर  जवळपास 15-20 वर्षे आई तिची देखभाल करत आली  होती,  परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तिच्या विसंगत  वागणुकीमुळे आणि आक्रमक वर्तनामुळे आमचाही  नाइलाज झाला. तिला मानसोपचारतज्ज्ञांची ट्रीटमेंट सुरूच  होती. पण आमच्याकडून ती वेळच्या वेळी औषधे घ्यायची  नाही. शेवटी डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून शॉक ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्हाला तिला तिकडे ॲडमिट करावे लागले.’’
            
तिच्या भावाने मला थोडक्यात तिचा पूर्वेतिहास सांगितला. ‘‘तिच्या मानसिक आजाराची सुरुवात कशी झाली,  हे  तुम्हाला आठवते का?’’  मी तिच्या मानसिक आजाराचे  स्वरूप जाणून घेण्याच्या हेतूने विचारले. ‘‘त्या वेळी मी लहान होतो. पण कॉलेजमध्ये असताना  ती एक वर्ष नापास झाली. तेव्हापासून ती हळूहळू विचित्र  वागायला लागली,  असे आई सांगायची. अलीकडे दोनतीन  वर्षे तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ लागली  होती. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे वेळच्या वेळी औषधेही  दिली जात होती. मी तिला घरी घेऊन जाण्याचाही विचार  करत होतो. तेवढ्यात तिला हे कॅन्सरचे दुखणे उद्‌भवले.’’  तिचा भाऊ हताशपणे म्हणाला. ‘‘आयुष्यभर तिला खूप  हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या आहेत. पण तुमच्या शुश्रूषा  केंद्रात मात्र ती चांगली रुळली आहे. तुमचा सर्वच नर्सिंग  स्टाफ अगत्याने तिची काळजी घेतो आहे.’’  त्याने  कृतज्ञतापूर्वक सांगितले. त्याचा हा अभिप्राय ऐकून मलाही  समाधान वाटले. हॉस्पिटल आणि घर या दोहोंची सांगड  घालत आम्ही हे केंद्र चालवतो आहे. आजारी व्यक्तीस  लवकर बरे वाटण्यासाठी हातभार लावावा आणि वृध्दांना  आपले म्हातारपण सुसह्य व्हावे,  यासाठी आम्ही इथे प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीने खास कौटुंबिक वातावरण  तयार केले आहे. 
        
वेगवेगळे सण-समारंभ वेळोवेळी साजरे  करत असतो. आठवणीने प्रत्येकाचा वाढदिवसही साजरा करीत असतो. कुसुमच्या वाढदिवसाचा भावस्पर्शी प्रसंग तर  मी कधीच विसरू शकणार नाही.  इथे आम्ही सर्वांचे वाढदिवस साजरे करतो,  हे  पाहिल्यावर एके दिवशी कुसुमने माझी पत्नी डॉ. नीलम  हिच्याकडे ‘माझाही वाढदिवस करा’ अशी इच्छा गुपचूप  व्यक्त केली. हा किस्सा नीलमने मला भावुक होऊन सांगितला. त्यानंतर मी कुसुमच्या भावाशी संपर्क साधून  तिच्या जन्मतारखेबाबत चौकशी केली. त्यांनाही कुसुमची  जन्मतारीख माहीत नव्हती. आम्ही तिचा वाढदिवस साजरा  करू इच्छित असल्याचे ऐकल्यावर त्यांनी एक-दोन  दिवसांत चौकशी करून कळवितो,  असे सांगितले.  योगायोगाने पुढच्या एक-दोन महिन्यांनंतर कुसुमचा  वाढदिवस होता. त्या दिवशी डॉ. नीलमने पुढाकार घेऊन  कुसुमच्या वाढदिवसाचे सर्व नियोजन केले.  कुसुमच्या वाढदिवसासाठी आम्ही तिच्या भावालाही  बोलावले होते. त्यांनी येताना येथील सर्व आजी- आजोबांसाठी घरी बनविलेली मिठाई आणली होती.  माधुरीने बेकरीतून विदाउट आयसिंगचा मिक्स फ्रूट फ्लेवरचा  केक आणला होता. रूममध्ये फुगे वगैरे टांगून तिची रूम  सजविली होती. कुसुमच्या आनंदाला तर त्या दिवशी  पारावार उरला नव्हता. 
       
भल्या पहाटे उठून तिने अंघोळ वगैरे  आटोपून नवे कपडे परिधान केले होते. येथील परिचारिका, मावश्या व आजी-आजोबा यांच्या शुभेच्छा स्वीकारत  सर्वत्र वावरताना ती अगदी हरखून गेली.  सायंकाळी चार वाजता आम्ही सर्व जण तिच्या रूममध्ये  जमलो. एका तिपाईवर मधोध केक मांडून ठेवला होता. त्या  शेजारी ठेवलेल्या खुर्चीत  कुसुम बसली होती. आम्ही सर्व जण  तिच्याभोवती जमलो होतो. कुसुमने केक कापला,  तेव्हा  सर्वांनी टाळ्या वाजवून तिला वाढदिवसाच्या भरभरून  शुभेच्छा दिल्या. डॉ. नीलमने पुढे होऊन तिला केकचा तुकडा  भरवला. तेव्हा त्या दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.  त्यानंतर ती पट्‌कन खुर्चीतून उठली आणि मला काही  समजण्याअगोदर नमस्कारासाठी खाली वाकून माझ्या पायाला  स्पर्श करू लागली. मी तिला अडवत माझ्याऐवजी तिच्या  भावाला नमस्कार करायला सांगितले. कुसुमने आपल्या भावालाही नमस्कार केला. त्या वेळी हळवेपणाने भाऊ मला  म्हणाला,  ‘‘डॉक्टर,  तुम्हीही कुसुमचे दुसरे भाऊच आहात  की!’’ त्याचे ते उत्स्फूर्त उद्‌गार म्हणजे प्रे, विश्वास व  सुरक्षितता या कौटुंबिक मूल्याचे जतन करत आस्थापूर्वक  सेवा-शुश्रूषा करणारे केंद्र चालवण्यामध्ये आम्ही यशस्वी होत असल्याची पोचपावतीच होती.
      
कुसुम तर जणू हे आपले घरच  असल्याप्रमाणे इथे मनमोकळेपणाने वावरत होती.  दुर्दैवाने नियतीस कुसुमचे हे सुख-समाधानाचे जगणे  अधिक काळ बघवले नाही. एके दिवशी सकाळी तिने  आपल्या घशात दुखत असल्याचे सांगितले आणि अचानक  तिच्या घशातून रक्तस्राव सुरू झाला. मी तातडीने तिच्या भावाला बोलवून तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाठविले.  तिकडे ॲडमिट केल्यानंतर तिच्या घशातील रक्तस्राव  थांबला. पण तपासण्यांध्ये तिच्या कॅन्सरच्या आजाराने  पुन्हा डोके वर काढल्याचे लक्षात आले. या वेळी तिच्या  घशाबरोबरच छातीमध्येही आजार पसरला होता. त्यानंतर  बरेच दिवस ती तिकडे हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होती. पण  उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तिची प्रकृती  दिवसेंदिवस अधिकच खालावत होती. शेवटी तेथील  डॉक्टरांनी तिच्या भावाला तिला घरी नेऊन सेवा-शुश्रूषा  करत राहण्याबद्दल सुचविले. त्यानंतर तिचा भाऊ तिला  घेऊन पुन्हा आमच्या शुश्रूषा केंद्रात आला. उदास आणि  मलूल झालेल्या कुसुमला पाहून माझे मन हेलावून गेले.  तिच्या नाकात औषध व अन्न देण्यासाठी नळी पुन्हा  बसविली होती. तोंडाला दुर्गंधीही येत होती. माझ्या मनात  पुन्हा पूर्वीचेच व्दंव्द निर्माण झाले. अशा अवस्थेत पुन्हा  आमच्या केंद्रात तिला भरती करून घेतले,  तर इतर आजी- आजोबांचे नातेवाईक काही हरकत तर घेणार नाहीत ना?  असा विचार मनाला सतावत होता. पण अशा अवस्थेत  आम्ही घरी तिची देखभाल व्यवस्थित करू शकणार नाही,  अशी तिच्या भावाने कळकळीची विनंती केली. 
      
माझ्याही  मनाला कुसुमला असे वेदनेच्या वाटेवर शेवटी-शेवटी एकटे  सोडणे प्रशस्त वाटेना. पूर्वीप्रमाणे तिला स्वतंत्र खोली  देण्याबाबत सूचना देऊन मी माधुरीला तिला भरती करून  घ्यायला सांगितले.  कुसुमला पुन्हा आमच्याकडे भरती करून घेतल्यानंतर  तिच्या मनामध्ये ‘आपण आता कोणालाही नकोसे झालो आहोत’  असे विचार डोकावू नयेत, म्हणून आम्ही सर्वजण  प्रयत्न करायचो. मी राऊंडच्या वेळी सकाळ-संध्याकाळी  तिच्याशी संवाद साधायचो. तेव्हा ती निर्विकारपणे  हसायची. तिला स्किझोफ्रेनिया असल्यामुळे आपल्या  मृत्यूला सामोरे जाताना ती कदाचित अधिक भयभीत होईल  व आक्रस्ताळेपणा करेल, अशी शंका मला वाटत होती. पण  प्रत्यक्षात मात्र ती अगदी शहाण्या मुलीसारखी धीराने  आपल्या मृत्यूला सामोरी गेली. दिवसभर वेदना सहन करत  आपल्या बेडवर पडून राहायची. तिने स्वतःला आपल्या  खोलीत बंदिस्त करून घेतले होते. कसलाही विरोध न करता  वेळच्या वेळी औषधे व द्रवाहार घ्यायची. माझ्या असे  लक्षात आले की,  माझ्याप्रमाणेच संवेदनातील सर्व स्टाफ व  इतर आजी-आजोबांनाही कुसुमबद्दल आस्था व आदर वाटतो आहे. पण हा आदर म्हणजे केवळ तिच्याबद्दल  वाटणारी कणव नसून ती ज्या प्रकारे आपल्या आजाराशी  दोन हात करत संघर्ष करत होती,  त्याला दिलेली दाद होती. 
          
माणसाला नेहमी ज्ञानी,  तपस्वी किंवा नेते,  कलाकार,  वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर वाटतो तसा तो आपल्या  आजाराशी संघर्ष करणाऱ्याबद्दलही वाटत असतो. कुसुमचा  हा संघर्ष खरोखरच असामान्य होता.  कल्पना आणि वास्तविकता यामध्ये गफलत असणे हे  स्किझोफ्रेनिया या आजाराचे मुख्य लक्षण असते. आयुष्यभर  आपल्या जगण्याबाबत गफलत झालेल्या कुसुमने आपल्या  मृत्यूबाबत मात्र ती कशी होऊ दिली नसेल?  भलेही तिला  आपले जीवन आपल्या कल्पनेप्रमाणे जगता आले नसले,  तरी ती ज्या पध्दतीने मृत्यूच्या वास्तवाला सामोरी गेली,  ते पाहून खुद्द मृत्यूसुध्दा थक्क झाला असेल.

Tags: कॅन्सर आजार स्किझोफ्रेनिया वैज्ञानिक कलाकार मनोरुग्ण cancer Aajar skiJhofreniya Vaidnyanik Kalakar Manorugn weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात