डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

म्हणजे हळूहळू माझ्या असे लक्षात येऊ लागले की, आत्तापर्यंतचे आयुष्यही आपण खूप समृद्धपणे जगलो आहे. आपण स्वतःच्या जगण्याच्या आनंदाबरोबरच इतरांच्या जगण्याच्या आनंदाचे निमित्तही झालो आहे. या जाणिवेमुळे मनातील अस्वस्थता कमी होऊ लागली. इतक्यात प्रा.मिचेल व्हेले महाशयांचा ‘ओके’ असा आवाज आला. ‘‘आता हळुवारपणे आपले डोळे उघडा.’’ त्यांनी सूचना दिली. ‘‘कसे वाटते आहे?’’ प्रा.मिचेल हसत हसत विचारत होते. मी माझ्या आजूबाजूच्या डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. त्यांच्यापैकी काहीजण शांत होते, काहीजण काहीसे अस्वस्थ दिसत होते. तर काहीजण वैतागलेलेही दिसत होते. एक महिला डॉक्टर मात्र रुमालाने आपले डोळे टिपत होत्या. ‘‘आता तुच्यापैकी एकेकाने तुम्हाला काय वाटले ते थोडक्यात सांगायचे आहे.’’ प्रा. मिचेल आपली नजर सर्वत्र फिरवत म्हणाले.

एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तिला मृत घोषित करताना किंवा ती दुःखद घटना तिच्या नातेवाईकांना सांगताना डॉक्टर आपल्या बोलण्याची सुरुवात क्षमा मागून करतात. कारण यावेळी नेका कसा संवाद साधावा याविषयीचे काही संकेत ठरलेले आहेत. ‘तुचे दुःख मी समजू शकतो’ किंवा ‘मीही तुच्या दुःखात सहभागी आहे’ असे अप्रत्यक्षपणे सांगण्याची ती पद्धत आहे. अशा वेळी डॉक्टरांनी अलिप्त, कोरडेपणाने बोलून चालत नाही किंवा भावनाविवश होऊनही चालत नाही. बऱ्याच वेळा संवाद कौशल्याचा अभाव असणारे डॉक्टर यावेळी गोंधळून जातात. म्हणून अशा वेळी जागरूक संवाद कसा साधावा या विषयावरचे एक खास वैद्यकीय चर्चासत्र पुण्यात आयोजित केले होते.

भारती हॉस्पिटल, चौथा मजला, प्रशस्त सेमिनार हॉल, सकाळचे नऊ वाजलेत, एसीचा गारवा सर्वत्र भरून राहिला आहे. सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत. सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे आहे. अमेरिकेतील प्रख्यात विद्वान प्रा. मिचेल लेव्हे आपल्या धीरगंभीर आवाजात एक एक सूचना देत आहेत. त्यांचे अमेरिकन इंग्लिश उच्चार समजून घेण्यासाठी मला अधिक लक्षपूर्वक ऐकावे लागते आहे. मनातल्या मनात मराठीत भाषांतर करून घेत त्यांची एक एक सूचना अमलात आणतो आहे. ‘‘पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात मांडीवर पालथे ठेवा. चित्त एकाग्र करा. लक्ष श्वासावर केंद्रित करा. आता अशी कल्पना करा की तुची श्रद्धांजली सभा सुरू आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. एकाग्र केलेले चित्त विचलित झाले. प्रोफेसर महाशय आपल्याला ही कसली कल्पना करायला सांगत आहेत, असा विचार मनात आला.

अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवाशुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून तीन वर्षांपूर्वी आम्ही संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू केले आहे. यामध्ये अनेक वेळा एखादी आजी किंवा आजोबा मयत झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधावा लागत असतो. यासाठी  आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून मोठ्या अपेक्षेने मी सांगलीहून या वैद्यकीय चर्चासत्रासाठी आलो होतो. विशेष म्हणजे देशभरातील पन्नासहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर या वैद्यकीय चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते आणि प्रा. मिशेल महाशय आम्हाला आमच्या मरणाची कल्पना करायला सांगत होते. साहजिकच मनात चलबिचल सुरू झाली. मी पुन्हा प्रयत्नपूर्वक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित केले. ‘‘तुच्या श्रद्धांजली सभेला किती लोक आले आहेत? कोण कोण आले आहे? कोण आले नाही? कोणाला किती दुःख झाले आहे? कोण काय बोलते आहे? तुमचा कोणता फोटो निवडला आहे? त्याला कोणत्या फुलांचा हार घातला आहे? तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारा की तुमच्या मृत्युसमयी तुम्ही समाधानी होता का? तुमच्या मनातल्या गोष्टी तुच्या जिवलगांजवळ बोलायच्या राहिल्या आहेत का? तुम्हाला लाभलेल्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटते आहे?...’’

मी तसा विचार करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ऐन पंचेचाळीशीत कोणालाही असे आपल्या मृत्यूचा विचार करणे जीवावर येणार नाही का? आत्ता कुठे जगण्याची नुसती पायाभरणी करून झाली आहे. अजून खरी इमारत तर उभी करायची आहे. तरीही आत्तापर्यंत लाभलेल्या आयुष्याबद्दल आपण समाधानी आहोत का? याबद्दलही मी विचार करू लागलो आणि मनात ‘होय’ असे उत्तर आले. गेल्या दोन-तीन वर्षात तर अनेक सर्वोच्च समाधानाचे क्षण लाभले आहेत, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. सामाजिक पातळीवर विचार करताना प्रेम, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवाशुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून आम्ही ना नफा ना तोटा तत्त्वावर संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू केले आहे. हा उपक्रम म्हणजे माझ्यातल्या लेखकाने माझ्यातल्या कार्यकर्त्यास दिलेले आव्हान होते आणि ते समर्थपणे पेलण्यामध्ये यशस्वी होऊ लागलो आहे. आत्तापर्यंत अडीचशेहून अधिक वृद्ध माता-पित्यांची सेवाशुश्रूषा करण्याची संधी आम्हाला लाभली आहे. हे सेवाकार्य करण्यामध्ये पुढाकार घेण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल अतिशय समाधान वाटते आहे.

पण दुसरीकडे असेही वाटते आहे की, आता कुठे या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याला दिशा गवसली आहे. अजून आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. समाजानेही आमच्या या उपक्रमाला भरभरून दाद दिली आहे. पुरस्कार व देणग्यांच्या रूपाने अनेक हितचिंतक आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांचा विश्वास आणि भरवसा आम्हाला सार्थ ठरवायचा आहे. साहित्यक्षेत्राबाबत विचार करताना मी माझ्या लेखनाबद्दलही समाधानी आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे ‘व्हिजिट बॅग आणि मी’, ‘रुग्णानुबंध’ व ‘चिखलाचे पाय’ या माझ्या तीन पुस्तकांतून व्यक्त केलेल्या करुणेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करू शकल्याचे समाधान वाटते आहे. कौटुंबिक पातळीवरही मी अतिशय समाधानी आहे. ‘तुम्ही खूप पुण्याईचे काम करत आहात. ज्येष्ठांचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद लाभतील’ असा अभिप्राय संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट देणारे व्यक्त करत असतात. गेल्या वर्षी माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या संशोधन क्षेत्रातील आवडीनुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, तिरुपती’ येथे प्रवेश मिळाला, तेव्हा ही जणू त्याचीच प्रचिती आहे असे आम्हाला वाटले होते.

सुरुवातीला आमच्या राहत्या घरात संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू करण्यास माझ्या वडिलांचा विरोध होता. त्यासाठी मला त्यांची खूप समजूत काढावी लागली होती. पण आता प्रत्यक्ष काम पाहून त्यांनाही कौतुक आणि अभिमान वाटतो आहे. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त आम्ही तिघा भावांनी आणि बहिणीने मिळून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यावेळी विस्तारलेल्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना आई- वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद ओसंडून वाहत होते. मलाही मोठा मुलगा या नात्याने कुटुंबाचे नेतृत्व करताना सर्वजण आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्याचे समाधान वाटले होते. अशा पार्श्वभूमीवर मला विचार करायचा होता- ‘आत्ता आपला मृत्यू झाला तर आपल्या आई-वडिलांना काय वाटेल? बायकोला काय वाटेल? मुलांना, भावांना आणि मित्रांना काय वाटेल?’ मनात प्रचंड कालवाकालव सुरू झाली. असाही विचार आला की, आपल्याला आणखी काही वर्षे जगायची संधी लाभली तर आपण प्राधान्याने काय काय करू? ‘

सर्वांत प्रथम मी माझ्या कुटुंबासाठी आणखी थोडा दर्जेदार वेळ द्यायला सुरुवात करेन. विशेषतः माझ्या पत्नीला आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. इतकी वर्षे मी असे गृहीत धरत आलो आहे की माझे ध्येय, माझा आनंद हाच तिचाही आनंद आहे. तिनेही त्याप्रमाणे मनःपूर्वक साथ दिली आहे. आता उरल्या आयुष्यात मी तिच्या आनंदाचे निमित्त होण्याचा प्रयत्न करेन. संवेदना शुश्रूषा केंद्रात गेल्या साडेतीन वर्षांत जवळपास सत्तरहून अधिक मृत्यू जवळून पाहिले आहेत. यानिमित्ताने एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की बऱ्याच वेळा कौटुंबिक जीवनात विशेषतः सहजीवनात व्यक्ती समाधानी नसेल तर ती मृत्यूलाही समाधानाने सामोरी जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संवेदना शुश्रूषा केंद्रात काम करत असताना प्रेम हे सर्वाधिक महत्त्वाचे मानवी मूल्य आहे, याची जाणीव आम्हाला पदोपदी होत असते. ही गोष्ट लेखन आणि भाषण या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.’ म्हणजे हळूहळू माझ्या असे लक्षात येऊ लागले की, आत्तापर्यंतचे आयुष्यही आपण खूप समृद्धपणे जगलो आहे. आपण स्वतःच्या जगण्याच्या आनंदाबरोबरच इतरांच्या जगण्याच्या आनंदाचे निमित्तही झालो आहे. या जाणिवेमुळे मनातील अस्वस्थता कमी होऊ लागली.

इतक्यात प्रा.मिचेल व्हेले महाशयांचा ‘ओके’ असा आवाज आला. ‘‘आता हळुवारपणे आपले डोळे उघडा.’’ त्यांनी सूचना दिली. ‘‘कसे वाटते आहे?’’ प्रा. मिचेल हसत हसत विचारत होते. मी माझ्या आजूबाजूच्या डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. त्यांच्यापैकी काहीजण शांत होते, काहीजण काहीसे अस्वस्थ दिसत होते. तर काहीजण वैतागलेलेही दिसत होते. एक महिला डॉक्टर मात्र रुमालाने आपले डोळे टिपत होत्या. ‘‘आता तुच्यापैकी एकेकाने तुम्हाला काय वाटले ते थोडक्यात सांगायचे आहे.’’ प्रा. मिचेल आपली नजर सर्वत्र फिरवत म्हणाले. सुरुवातीला त्यांनी त्या बार्इंनाच बोलायला सांगितले. ‘‘मी माझ्या मृत्यूची इतक्यात कल्पनाच करू शकत नाही.’’ त्या बाई मुसमुसत म्हणाल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी या विषयावर आपण अधिक बोलू शकत नाही अशी स्पष्ट कबुलीच दिली. खरं तर त्या वैद्यकीय चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आम्ही सर्वजण प्रथितयश डॉक्टर होतो. सर्वांचेच आपापल्या शहरामध्ये स्वतःचे हॉस्पिटल होते. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूच्या घटना अधूनमधून घडतच असणार. त्यामुळे मृत्यू कधीही येऊ शकतो, हे माहीत असतानाही त्याची केवळ कल्पना करणे ही तीव्र मनोवेदना देणारे का वाटावे? ‘कसा आणि केव्हा हे माहीत नसलं तरी एक दिवस आपल्यालाही मृत्यू येणार आहे, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच ठाऊक असते. त्यामुळे मृत्यूचा विचार असा नाकारण्यापेक्षा त्याला आपल्या जीवनाचा एक भाग मानता आले तर आपला जगण्याविषयीचा दृष्टिकोन अधिक समृद्ध होऊ शकेल’, असा विचार माझ्या मनात आला.

त्यानंतर एका तरुण डॉक्टरांनी आपला अनुभव सांगितला. ‘‘मला लाभणारा मृत्यू हा झटपट आणि आकस्मित असावा किंवा शक्यतो बेशुद्ध अवस्थेत यावा. अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ माझ्यावर येऊ नये. म्हणजे माझ्या पाठीमागे राहणाऱ्यांसाठीही कदाचित कमी दुःख होईल, असे मला वाटते. पण या निमित्ताने आज मला एका गोष्टीची मात्र जाणीव झाली की, बऱ्याच वेळा आपण डॉक्टर एखाद्या रुग्णाचा मृत्यू म्हणजे वैद्यकशास्त्राचा पराभव अशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहत असतो. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे प्रत्येक जीव वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे आपल्याला वाटत असते. पण आपली लढाई त्या रुग्णाच्या मृत्यूशी नसून, त्याच्या व्याधीशी असते हे आपण नकळतपणे विसरतो. तो व्याधी बरा करण्यासाठी आणि वेदना दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे इतकेच आपल्या हातात असते.  त्यामुळे इथून पुढे मी माझ्या रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू घोषित करताना त्याच्या नातेवाईकांशी अधिक मोकळेपणाने आणि सहजतेने संवाद साधेन.’’

याउलट एक सिनियर डॉक्टर म्हणाले, ‘‘मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर मला माझ्या मृत्यूची चाहूल लागलेली असावी, असे मला वाटले. माझ्या आयुष्याचा शेवट होत असताना माझ्या जिवलगांनी आसपास असावे, प्रेमाने आधार द्यावा. मरतेवेळी नाकातोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत, बंद काचेआड मी एकटा आणि एकाकी असू नये. तसेच आपण डॉक्टरांनीही आजारी व्यक्तीला तिच्या आजाराच्या स्थितीबाबत स्पष्टपणे सांगायला हवे. आजारी व्यक्ती सत्याला सामोरी जाऊ शकणार नाही, सत्य समजले तर तिच्या उरलेल्या जगण्यातील आनंद मावळेल, असे समजून बहुतेक वेळा आपण सत्य तिच्यापासून लपवीत असतो. ती व्यक्ती मात्र अजून तब्येतीत का सुधारणा होत नाही असे चिंताक्रांत नजरेने विचारत असते. कारण आपण कितीही सत्य लपविले तरी त्या व्यक्तीस आतून त्याची जाणीव होऊ लागलेली असते. त्यामुळे आजारी व्यक्तीला तिच्या मृत्यूच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी राहण्याचा अधिकार द्यायला हवा, असे माझे प्रामाणिक मत आहे.’’ त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

मीही माझा अनुभव सर्वांना सांगितला. ‘‘सुरुवातीला माझ्या मृत्यूची कल्पना करताना मीही काहीसा अस्वस्थ आणि उदास झालो होतो. पण नंतर हळूहळू माझ्या असे लक्षात येऊ लागले की, अशाप्रकारे आपल्या मृत्यूचा विचार करणे हे आपल्याला जगण्याचे भान देणारे ठरते आहे. इथून पुढे आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण अधिक समरसतेने आणि जाणीवपूर्वक जगायला हवा, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक रुग्णाला त्याचा मृत्यू जसा असेल तसा मनःपूर्वक स्वीकारण्यासाठी तयार करणे व त्यासाठी मानसिक आधार देणे हेही आपले डॉक्टरांचे कर्तव्य आहे असे मला वाटते.’’

आमच्यापैकी इतर काही जणांनीही आपापले म्हणणे सांगितले. शेवटी प्रा.मिचेल यांनी रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांशी कसा संवाद साधावा याविषयीचे आपले विचार मांडले. ‘‘एखाद्या रुग्णाचा मृत्यू घोषित करत असताना आपण कितीही भावनिक दुरावा राखण्याचा प्रयत्न केला तरी, काही प्रमाणात का होईना आपल्यालाही मानसिक घालमेल सहन करावी लागत असते. ती आपल्या माणूसपणाची आणि आपण संवेदनाहीन न झाल्याची खूण असते. आपण मात्र बऱ्याच वेळा संयमाच्या नावाखाली त्या रुग्णाच्या नातेवाईकांशी मोकळेपणाने बोलणे टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याक्षणी गरज असते ती अंतरलेल्या व्यक्तीबद्दल व तिच्या मृत्यूबद्दल बोलण्याची आणि त्या निमित्ताने नातेवाईकांच्या मनात निर्माण झालेली पोकळी दूर करण्याची. त्या दृष्टिकोनातून आपण मृत रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधायला हवा.’’ असे मनोगत व्यक्त करत प्रा.मिचेल यांनी चर्चासत्राचा समारोप केला.

वैद्यकीय चर्चासत्र संपल्यानंतर रात्री सांगलीला परतताना माझ्या असे लक्षात आले की, दिवसभर मृत्यूविषयी झालेला ऊहापोह आणि चिंतन यामुळे माझे मन उदास झालेले नाही. उलट मनामध्ये जीवनाविषयी उत्कटता आणि कुतूहल निर्माण झाले आहे. गेली काही वर्षे संवेदना शुश्रूषा केंद्राच्या माध्यमातून अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची सेवाशुश्रूषा करत असताना, त्यांच्यापैकी काहींचे मृत्यू जवळून पाहिले आहेत. प्रत्येकाचा मृत्यू व त्याला सामोरे जाण्याची पद्धत कशी निराळी होती आणि क्षणाक्षणाला त्यांची भावस्थिती कशी बदलत होती ते पाहिले आहे. जणू प्रत्येकजण मृत्यूपूर्वी आपल्याला काहीतरी संदेश व शिकवण देऊन गेला आहे, असे माझ्या लक्षात आले.

‘प्रेम उपेक्षू नका, आयुष्याकडे दुर्लक्ष करू नका, आनंदाने जगायला शिका, सहजीवनात समजूतदारपणा दाखवा, संवादनाते जपा, चांगुलपणावर भरवसा ठेवा व आपण सर्वजण मर्त्य आहोत याची सतत जाणीव ठेवा.’ अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आहेत, मिळत आहेत आणि दिवसेंदिवस माझे जगणे अधिक समृद्ध होत चालले आहे याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. मावळतीच्या संधिप्रकाशाप्रमाणे मृत्युसमयीचे त्यांचे व्यक्त-अव्यक्त बोल माझ्या मनात तरळू लागले. ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविले तर तुमच्या जगण्याचे भानही नक्कीच थोडे अधिक प्रगल्भ होईल.

Tags: चिखलाचे पाय रुग्णानुबंध व्हिजिट बॅग आणि मी चर्चासत्र सांगली संवेदना शुश्रूषा केंद्र भारती हॉस्पिटल रुग्ण डॉक्टर मृत्यू मिचेल दिलीप शिंदे मावळतीचे बोल जगण्याचे भान Chiklach Paay Rugnanubandh Visit bag aani mi Sangali Sanvedna Sushrusha Kendra Bharati Hospital Patient Doctor Death Dilip Shinde Mavltiche Bol Jagnyache Bhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


Comments

  1. Nilam Pawar- 03 Oct 2020

    Sir khup chan lihl ahe. Sanglila alyavr tumchi bhet gyayla nakki aavdel.

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके