Diwali_4 मानवता आणि सर्वधर्म‐समभाव
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

त्या मुलाचे वय पंधरा-सोळा वर्षे असेल. त्याच्यामध्ये पौगंडावस्थेतील बदल होत होते. त्यामुळे खरं तर त्याला एखाद्या रिहॅबिलेशन सेंटरमध्ये दाखल करणे योग्य होते. त्यानुसार अंजली एका सेंटरमध्ये चौकशीही करून आली होती. पण आईच्या आजारपणामुळे त्याला आमच्याकडे भरती करावे लागले होते. त्या निरागस आणि भोळ्या-भाबड्या मुलाबद्दल आम्हा सर्वांनाच खूप आपुलकी वाटायची. आमच्याकडे किचनची जबाबदारी सांभाळणाऱ्या वहिदाला तर त्याचा खूपच लळा लागला होता. तिने त्याला व्यवस्थित आंघोळ करायला शिकविली. स्वतःचे स्वतः तेल, केसांचा भांग, पावडर करायला शिकविले. स्वतःच्या हातांनी जेवण करायला शिकविले. तो आनंदी आणि मजेत राहावा म्हणून वहिदा सदैव त्याला गप्पा-गोष्टीत गुंतवून ठेवायची. टीव्ही पहायला हॉलमध्ये घेऊन यायची. त्याला गाणी खूप आवडायची. कधी कधी मधूनच तो गाणी ऐकता ऐकता नाचू लागायचा.

मानवता हे कसे चिरंतन मानवी मूल्य आहे, याची प्रचिती आम्हाला संवेदना शुश्रूषा केंद्रात वारंवार येत असते. त्यामुळे हल्ली मानवता ऱ्हास पावत चालली आहे वगैरे लोकांच्या मताशी मी बिलकूल सहमत नाही. हे खरं आहे की जगण्याचा वाढता वेग आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे परंपरा व वास्तव यांची सांगड घालताना आजची पिढी काहीशी गोंधळलेली आहे. पण म्हणून वृद्धांचा सांभाळ करण्याच्या बाबतीत सरसकट तरुण पिढीस बेजबाबदार ठरवून चालणार नाही. कारण अंथरुणावर खिळलेल्या आपल्या वयोवृद्ध माता-पित्यांच्या व्यथा-वेदना पाहताना त्यांच्या मुला-मुलींची होणारी घालमेल आणि व्याकुळता आम्ही जवळून अनुभवतो आहे.

बहुतेक सर्वजण आपापल्या परीने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून माता-पित्यांची सेवाशुश्रूषा करण्यासाठी धडपडत असतात. पण काही वेळा एखादा दुर्धर आजार किंवा एखाद्याचे मानसिक संतुलन हरविले तर घरच्या घरी त्यांची सेवाशुश्रूषा करण्यावर मर्यादा येतात. अशा वेळी अगतिक होऊन नाइलाजाने आपल्या वृद्ध माता-पित्याच्या सेवाशुश्रूषेसाठी शुश्रूषा केंद्राची मदत घेणाऱ्या मुला-मुलींची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे. पण हा पर्याय निवडतानाही नैराश्याने ग्रासलेले आणि आपले अवघे जगणेच निरर्थक वाटू लागलेल्या मुला-मुलींची समजूत काढण्याची वेळ ही आमच्यावर येत असते.

कॅन्सरपीडित आई आणि मतिमंद भाऊ या दोघांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असलेल्या अंजलीची तगमग ही अशीच आम्हा सर्वांना हेलावून टाकणारी होती. भावनेवर मात करत व्यवहाराची सांगड घालताना तिचा स्वतःशीच सुरू असलेला झगडा हृदय पिळवटून टाकणारा होता. अंजलीच्या आईचे वय अवघे पन्नाशीच्या आसपास असेल. आठ-दहा वर्षांपूर्वी त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. त्या वेळी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून रेडिएशन आणि केमोथेरपीचे उपचारही केले होते. त्यानंतर गेली सात-आठ वर्षे त्यांना काही त्रास नव्हता. वर्षभरापूर्वी त्यांना एके दिवशी अचानक फिट आली. त्या वेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या मेंदूत कॅन्सर पसरला असल्याचे लक्षात आले.

त्यावर मग जवळपास गेले वर्षभर उपचार सुरू होते. पण उपचारांना त्या फारसा प्रतिसाद देत नव्हत्या. वारंवार फिट येऊ लागल्याने घरच्या घरी त्यांची सेवाशुश्रूषा करणे अंजलीला जिकिरीचे होऊ लागले. अंजलीचे वडीलही वारले होते आणि लहान भाऊ मतिमंद असल्यामुळे त्याचीही देखभाल करावी लागत होती. तिचे लग्न झाले होते आणि तिला दोन लहान मुलेही होती. त्यामुळे शेवटी नाइलाजाने तिने आपल्या आईला शुश्रूषेसाठी आमच्या केंद्रात भरती केले होते. शेवटच्या दिवसात त्या माउलीला आपल्या मुलाचा सहवास लाभावा म्हणून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या मतिमंद मुलालाही आईसोबत आमच्याकडे भरती करण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार अंजलीने आपल्या लहान भावालाही भरती केले होते.

आम्ही त्या दोघा मायलेकांसाठी एक स्वतंत्र खोली दिली होती. त्या माउलीला आपला मुलगा क्षणभरही आपल्या नजरेआड होऊ नये असे वाटायचे. तो मुलगाही दिवसभर आपल्या आईभोवती घुटमळत राहायचा. तिचे डोके, पाय चेपायचा. कधी कधी स्वतःच्या हाताने भरवायचा प्रयत्न करायचा. आईने जेवण घेतले नाही तर तिच्यावर चिडायचा.

त्या मुलाचे वय पंधरा-सोळा वर्षे असेल. त्याच्यामध्ये पौगंडावस्थेतील बदल होत होते. त्यामुळे खरं तर त्याला एखाद्या रिहॅबिलेशन सेंटरमध्ये दाखल करणे योग्य होते. त्यानुसार अंजली एका सेंटरमध्ये चौकशीही करून आली होती. पण आईच्या आजारपणामुळे त्याला आमच्याकडे भरती करावे लागले होते. त्या निरागस आणि भोळ्या-भाबड्या मुलाबद्दल आम्हा सर्वांनाच खूप आपुलकी वाटायची. आमच्याकडे किचनची जबाबदारी सांभाळणाऱ्या वहिदाला तर त्याचा खूपच लळा लागला होता. तिने त्याला व्यवस्थित आंघोळ करायला शिकविली. स्वतःचे स्वतः तेल, भांग, पावडर करायला शिकविले. स्वतःच्या हातांनी जेवण करायला शिकविले. तो आनंदी आणि मजेत राहावा म्हणून वहिदा सदैव त्याला गप्पा-गोष्टीत गुंतवून ठेवायची. टीव्ही पहायला हॉलमध्ये घेऊन यायची. त्याला गाणी खूप आवडायची. कधी कधी मधूनच तो गाणी ऐकता ऐकता नाचू लागायचा. त्या दोघाही मायलेकांची वहिदा खूप आस्थेने काळजी घ्यायची.

दिवसेंदिवस अंजलीच्या आईला फिट येण्याचा प्रमाणात वाढ होत चालली होती. प्रकृती खालावत चालली होती. केवळ द्रव आहारच सुरू होता. रोज सायंकाळी अंजली आपल्या आईला व भावाला भेटायला यायची. तिचा भाऊ बाहेर वेटिंगहॉलमध्ये तिची वाट पाहत बसायचा. त्याला भेळ खूप आवडायची. अंजली त्याच्यासाठी कधी भेळ कधी वडा-पाव वगैरे घेऊन यायची. ती आपल्या दोन्ही लहान मुलांनाही सोबत घेऊन यायची. त्यांना आपल्या भावासोबत बाहेर वेटिंग हॉलमध्ये खेळत बसवायची आणि आईला भेटायला रुममध्ये यायची. सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यातून मला तिची घालमेल दिसायची. बऱ्याच वेळा तिची आई तिचा हात घट्ट पकडून ठेवायची. आपल्या पश्चात आपल्या मुलाचे कसे होणार या विचाराने त्या माउलीचा जीव तीळ तीळ तुटत असावा. जवळपास चार महिने ते दोघे मायलेक आमच्या शुश्रूषा केंद्रात होते.

मी एकदा अंजलीला तिच्या भावाबद्दल विचारले. ‘‘तुम्ही त्याला विशेष मुलांच्या शाळेत का पाठवले नाही?’’

‘‘आईने त्याचे अति लाड केले आहेत. आजूबाजूची मुले त्याला चिडवतात व त्याची चेष्टा करतात म्हणून तिने त्याला फारसे घराबाहेरच पडू दिले नाही. आपला समाजही अशा मुलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही.’’ तिने आपल्या मनातील खंत व्यक्त करत सांगीतले. ‘‘काही दिवसांपूर्वी सातारा जवळच्या एका संस्थेमध्ये मी चौकशी करून आले, पण आईच्या या आजारपणामुळे त्याला तिकडे पाठवता आले नाही. आई ऐकायला तयार नाही. ‘माझे आता किती दिवस राहिले आहेत? माझ्या हयातीत त्याला माझ्या नजरेआड करू नकोस’ म्हणत रडू लागते. त्यामुळे माझाही नाइलाज होतो.’’ अंजली पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली.

मी याबाबत सांगली येथे मतिमंद मुलांची शाळा चालविणाऱ्या प्रा. रेवती हातकणंगलेकर मॅडम यांच्याशी या मुलाच्या पुनर्वसनासाठी काय करता येईल याविषयी सल्ला विचारला.

‘‘ही मुले कोणाच्या उपयोगाची नाहीत, असा आपल्या समाजाचा दृष्टिकोन असतो. पण या मुलांना सुरक्षित काम करायला शिकवले तर सहजपणे समाजामध्ये मिसळू शकतात. साधारणपणे मतिमंद मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 3 टक्के इतके आढळते. विशेषतः मुस्लिम व पारशी समाजामध्ये हे प्रमाण अधिक आहे. नात्यातील लग्न हे या पाठीमागचे प्रमुख कारण आहे. खरं तर पालकच अशा मुलांना अतिकाळजीपोटी विकसित व्हायची संधी देत नाहीत. विशेष म्हणजे सुशिक्षित पालकांपेक्षा अशिक्षित पालक अशा मुलांना सहजपणे स्वीकारतात. त्यांना त्यात फारसा कमीपणा वाटत नाही.

सध्या मात्र अशा मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे. पूर्वी मतिमंद मूल म्हणजे मानसिक रुग्ण असा दृष्टिकोन होता. पण हा काही मानसिक आजार नसून केवळ मानसिक विस्कळीतपणा आहे, याची लोकांना आता जाणीव होऊ लागली आहे.’’ मॅडमनी सविस्तरपणे सांगितले. तसेच या मुलाच्या बाबतीत आवश्यक ते सहकार्य करण्याचे त्यांनी कबूल केले.

काही दिवसांनंतर एके दिवशी सकाळी सातच्या दरम्यान अंजलीच्या आईला जोरात फिट आली. एरवी तीन-चार तासांनंतर त्या हळूहळू शुद्धीवर येऊ लागायच्या. पण त्या दिवशी मात्र त्या दुपारपर्यंतही शुद्धीवर आल्या नाहीत. त्यांचा मुलगा वारंवार त्यांच्या जवळ जाऊन हाक मारून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करायचा. वहिदा त्याची समजूत काढत त्याला बाहेर हॉलमध्ये आणून बसवायची. त्या दिवशी मी अंजलीला बोलवून सर्व परिस्थितीची कल्पना दिली. या अवस्थेतून त्या आता बाहेर येणार नाहीत ही गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली होती.

‘‘स्वतःला किती त्रास करून घेते आहे बघा डॉक्टर, तिचा जीव माझ्या भावात अडकला आहे.’’ अंजली अवंढा गिळत म्हणाली. मी तिला माझ्यापरीने धीर दिला. आपल्या असण्याची कोणाला तरी गरज आहे हे ज्यांना माहीत असते किंवा वाटत असते ते आपल्या मृत्यूलाही काही काळ कसे थोपवू शकतात, याची प्रचिती मला त्या माउलीचा आपल्या मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष पाहताना येत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी शुश्रूषा केंद्रात आल्याबरोबर त्यांच्या खोलीत गेलो. त्यांची प्रकृती ‘जैसे थे’च होती. नेहमीप्रमाणे फेरफटका मारून झाल्यावर मी माझ्या केबिनमध्ये आलो. अधून मधून सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यातून आतील कामाचा आढावा घेत होतो. त्या दिवशी वहिदाही ड्यूटीवर आल्याबरोबर त्या मायलेकांच्या खोलीत गेली. तिने त्या मुलाची विचारपूस केली. आपल्या पर्समधून ताजी फुले काढून त्या मुलाच्या ओंजळीत दिली. त्या मुलाला आपल्या आईला नमस्कार करायला लावला. त्यानंतर ती फुले गणपतीच्या मूर्तीसमोर वाहायला लावली. खरं तर वहिदा मुसलमान आणि तो मुलगा मतिमंद. पण ज्या श्रद्धेने ती त्या मुलाला प्रार्थना करायला सांगत होती. ते पाहून मी अचंबित झालो.

त्या दिवशी दुपारी ती माउली निवर्तली. त्या मुलाला मात्र आपली आई गाढ झोपली आहे असेच वाटत होते. त्यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह घेऊन जाताना आम्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते. संवेदना शुश्रूषा केंद्रातील आम्ही सर्वजण भावनिक दृष्ट्या त्या मायलेकात गुंतलो होतो. पण डोळ्याला पदर लावून हात हालवीत त्या मुलाला निरोप देणाऱ्या वाहिदाला पाहिल्यावर मानवता आणि सर्व धर्म समभाव ही किती चिरंतन मानवी मूल्ये आहेत, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.

Tags: दृष्टीकोण समाज मुल परंपरा कुटुंबपद्धती जगणे शुश्रूषा केंद्र संवेदना मूल्य मानवी चिरंतन मानवता दिलीप शिंदे drushikon samaj mul paranpara kutunmbpadhhati jsgsne Kendra shushrusha sanwedna mulya chirantan manwata dilip shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात