डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विज्ञानाला मानवी चेहऱ्याची गरज हे विज्ञानाच्या अभ्यासातून कळले...

विज्ञानामुळेच माझी सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली. याच कालखंडात  डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर अनेक वेळा भेट झाली. क्वचित फोनवरही बोलणे  होत असे. यापैकी दोन प्रसंगांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्या वेळी वास्तुशास्त्राचा बोलबाला वाढत होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करीत होती. या विषयावर दोन्ही बाजूंनी वादविवाद व्हावा, असे ठरले. त्यानुसार इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली. डॉ. जयंत नारळीकर आणि मला समितीच्या वतीने बाजू मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. वास्तुशास्त्राच्या बाजूने बोलणाऱ्या दोन व्यक्ती होत्या. ‘आम्ही प्रथम बोलणार’ असा आग्रह त्यांनी धरला. तो मान्यही करण्यात आला. आश्चर्य म्हणजे, त्यांची भाषणे संपल्यावर ते थांबलेच नाहीत.

 

विज्ञान विषय शालेय जीवनापासून शिकत असलो तरी त्या विषयाची जाणीव झाली ती अकरावीत असताना. सामान्य विज्ञानाबरोबर शरीरशास्त्र हा विषय न घेता, भौतिकशास्त्र आणि रसायन हा विषय घेणारे मोजकेच विद्यार्थी होते, त्यात मीही एक होतो. या विषयामुळे वेगळी ओळख मिळाल्याची भावना मनात निर्माण झाली. या विषयात नव्वदपेक्षा अधिक गुण मिळाल्याने ती भावना अधिकच बळावली. त्यातूनच विज्ञान शाखेकडे जाण्याचा विचार पक्का झाला. पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असूनही भौतिकशास्त्राची निवड केली. याच विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तोपर्यंत या विषयाचा अभ्यास करणे, चांगले गुण मिळवणे आणि पुढे जाणे एवढ्यापुरतेच विषयाचे आकलन होते. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एक नावीन्यपूर्ण गोष्ट घडली. शेवटच्या वर्षात नव्यानेच सुरू झालेला जीवभौतिकशास्त्र हा विषय निवडला. असे करणे थोडे धाडसाचे होते; कारण या विषयाचा भविष्यात कसा फायदा होणार, याबद्दल साशंकता होती. यात भौतिकशास्त्रासोबत जीवशास्त्राचाही अभ्यास करावा  लागणार होता, ही बाब आव्हानात्मक होती. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असताना फक्त विषयाच्या आकलनाकडे लक्ष केंद्रित केले. खरा बदल झाला तो पीएच. डी.साठी हाच विषय निवडल्यानंतर. विषयाची निवड तर केली, मात्र त्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्या काळी पुणे विद्यापीठात नव्हत्या. त्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागला.

सुदैवाने मुंबईमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या एका संस्थेने मला शिष्यवृत्ती देऊ केली. ‘फाउंडेशन फॉर मेडिकल रिसर्च’ ही संस्था कुष्ठरोगाविषयी संशोधन करणार होती. कुष्ठरोगाविषयी मनात भीती होतीच, शिवाय इतरांच्या प्रतिक्रिया काय असतील याची धास्तीही होती. संशोधन सुरू करीत असतानाच दोन महत्त्वाचे धडे मिळाले, ज्यांचा परिणाम आयुष्यभर टिकून राहिला. एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी भीती अज्ञानमूलक कशी असते, हे कळले. संस्थेमध्ये कुष्ठरोग झालेल्या व्यक्ती प्रयोगशाळेत, त्याचप्रमाणे कार्यशाळेत काम करीत. त्यांच्याशी बोलायची भीती वाटत असे. आमचे संचालक डॉ. ऑन्टिया यांच्या ध्यानात ही बाब आली. त्यांनी आम्हाला एकत्र बोलावून कुष्ठरोग कसा होतो, हे समजावून सांगितले. संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर कुष्ठरोगाच्या खुणा दिसत असल्या, तरी ते या आजारातून बरे झालेले आहेत, हे प्रथमच कळले. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंच्याऐंशी टक्के लोकांत या रोगासाठीची प्रतिकारशक्ती निसर्गत:च असते; राहिलेल्या पंधरा टक्क्यांपैकी काहींमध्ये कमी प्रमाणात, तर काहींमध्ये अजिबात नसते. मुंबईत लोकलमधून प्रवास करताना या जीवाणूंचा संपर्क होणे अगदी अपरिहार्य आहे, त्यामुळे तुम्हाला आता घाबरण्याचे कारण नाही. मग मनातली भीती कमी होऊन सर्व कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही मोकळेपणाने वागू लागलो. दुसरा महत्त्वाचा धडा संचालकांनीच दिला. सजीव प्राण्यांवर संशोधन करायचे म्हणजे प्राण्यांची शरीररचना माहीत असणे आवश्यक असते. त्यासाठी शरीर-विच्छेदनाचा अभ्यास करावा लागतो. तसा अभ्यास करण्याची मानसिक तयारी मी केली होती. भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे शरीर विच्छेदन करताना पाहिले होते, मात्र स्वत: केले नव्हते. उंदीर अथवा बेडकाचे विच्छेदन शिकण्याची माझी तयारी होती. संचालकांनी मानवी शरीराचे विच्छेदन करण्याची सूचना केली. तसा तो आदेशच होता. सर्व धैर्य एकवटून मी नाइलाजाने होकार दिला.

हा अनुभव घाबरवणारा असला, तरी त्यामुळे जो आत्मविश्वास वाढला, तो अवर्णनीय होता. या अनुभवामुळे आलेले आकलन पुढे कायमचे टिकून राहिले. या व्यापक आकलनामुळे विज्ञान विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. मानवी जीवनाशी विज्ञानाच्या असलेल्या संबंधाची ओळख पटली. विज्ञानाच्या या आकलनामुळे सामाजिक जाणिवेची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा खोलवर झालेला परिणाम पुढेही टिकून राहिला. पीएच. डी. करीत असताना आणखी एक प्रसंग घडला. त्या काळात प्लँचेट या प्रकाराचा सुळसुळाट झाला होता. त्याचे लोण विद्यापीठापर्यंत पोहोचले होते. तो साधारणपणे 1978 चा कालखंड होता. विद्यापीठातील काही विद्यार्थी हा प्रयोग करीत. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ते शोधून देत असत. माझा त्यावर विश्वास नव्हता. तसे मी बोलून दाखवत होतो. त्यामुळे त्यांनी मलाच प्रश्न विचारण्यासाठी बोलावले. एका गुळगुळीत पृष्ठभागावर एक वाटी पालथी ठेवून त्यावर मेणबत्ती लावीत. त्या वाटीवर चार जण आपले बोट ठेवीत. त्या पृष्ठभागावर इंग्रजी अक्षरे आणि खुणा असत. प्रश्न विचारल्यानंतर ती वाटी आपोआप सरकून अक्षरे आणि खुणांकडे निर्देश करून उत्तर सुचवत असे. हा प्रयोग अंधुक प्रकाशात करण्यात येई. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या चौघांपैकी कुणाला तरी माहीत असेल, तरच प्रयोग यशस्वी होईल, हे माझ्या ध्यानात आले. विचारले गेलेले प्रश्न हे भौतिकशास्त्रासंबंधी होते. मी जीवशास्त्राशी संबंधित प्रश्न विचारला. चौघांपैकी कुणालाच उत्तर माहीत नसल्यामुळे वाटी दिशाहीन होऊन फिरत राहिली. प्रसंगाचे आकलन करून चिकित्सा करण्याची क्षमता ही विज्ञानाची देण होती. अनेक विज्ञान-संशोधक आणि अभ्यासक ही क्षमता असूनही तिचा वापर करीत नाहीत.

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जोर धरू लागली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर हिरिरीने ती पुढे नेत होते. त्याच वेळी केरळमध्ये पीपल्स सायन्स मूव्हमेंट ऐन  भरात होती. त्याच धर्तीवर पुण्यात काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन लोकविज्ञान चळवळ सुरू केली. त्या चळवळीच्या स्थापनेत मीही सहभागी झालो. त्यासाठी एक घटना कारणीभूत झाली. विद्यापीठात आंतरजातीय विवाहासंबंधीच्या चर्चासत्रात या विवाहासाठी असणाऱ्या वैज्ञानिक आधाराचे विवेचन मी केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून त्याविषयीची पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे ठरले. त्या पुस्तिकेचा मजकूर डॉ. प्रदीप गोखले आणि मी लिहिला. या पुस्तिकेचे लेखन प्रसिद्ध लेखक संजय पवार यांनी केले. या पुस्तिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लोकविज्ञान चळवळीत सामील होता आले.

लोकविज्ञान चळवळीत काम करताना अनेक कार्यक्रमांत भाग घेतला. त्यात ग्रामीण, आदिवासी भागात अनेक व्याख्याने दिली. विज्ञानयात्रेचे नेतृत्व केले. प्रदर्शनाची निर्मिती केली. हा अनुभव जीवन समृद्ध करणारा ठरला. विज्ञानाचे व्यापकत्व जसे कळले, तसेच त्याचा मानवी जीवनाशी असणारा संबंधही कळला. विज्ञान-प्रसाराच्या कार्याचा परिचय झाला. त्याची क्लिष्टता जशी कळली, तसाच विज्ञानप्रसाराचा आनंदही घेता आला. विज्ञानप्रसारासाठी कोणती साधने वापरावीत, भाषेचा वापर कसा करावा, प्रात्यक्षिकासाठी विज्ञान खेळणी कशी वापरावीत, दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे गैरसमज दूर करण्यासाठी विज्ञानाचा वापर कसा करावा, याचे आकलन झाले. माझ्या व्यक्तिमत्त्वाला निश्चितपणे नवे आयाम मिळाले. विज्ञानामुळेच माझी सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली.

याच कालखंडात डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर अनेक वेळा भेट झाली. क्वचित फोनवरही बोलणे होत असे. यापैकी दोन प्रसंगांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्या वेळी वास्तुशास्त्राचा बोलबाला वाढत होता. त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करीत होती. या विषयावर दोन्ही बाजूंनी वादविवाद व्हावा, असे ठरले. त्यानुसार इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली. डॉ. जयंत नारळीकर आणि मला समितीच्या वतीने बाजू मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. वास्तुशास्त्राच्या बाजूने बोलणाऱ्या दोन व्यक्ती होत्या. ‘आम्ही प्रथम बोलणार’ असा आग्रह त्यांनी धरला. तो मान्यही करण्यात आला. आश्चर्य म्हणजे, त्यांची भाषणे संपल्यावर ते थांबलेच नाहीत. आमच्या भाषणाआधीच त्यांनी आपला पराभव मान्य केला होता. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर डॉ. श्रीराम लागूही उपस्थित होते. त्या वेळच्या भाषणात संत रामदासांच्या वचनात फेरफार करून मी असे म्हटले होते की, वास्तुशास्त्राचा दावा करणाऱ्या लोकांचे वर्णन असे करता येईल –

            आपणास जे हवे ते इतरांशी सांगावे

            मूर्ख करून सोडावे सकळ जन।

दुसरा प्रसंग हा धुळे जिल्ह्यात घडलेल्या प्रसंगाशी संबंधित आहे. या जिल्ह्यात एक झाड उन्मळून पडले होते. काही काळानंतर ते पुन्हा उभे राहिले. लोकांना तो चमत्कार वाटला. त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा घाट घातला. त्यामुळे ज्याचे शेत होते, तो शेतकरी घाबरला आणि त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. डॉ. दाभोलकरांनी मला फोन करून ‘त्याचे स्पष्टीकरण देता येईल का?’ असे विचारले. ‘जर मुख्य मूळ शाबूत असेल, तर हे घडू शकते,’ हे मी सांगितल्यावर त्यांनी तेथील कार्यकर्त्यांशी बोलण्यास सांगितले. त्या कार्यकर्त्यांना हे पटवून दिल्यानंतर तो प्रश्न सुटला.

लिखाणाची क्षमता हे विज्ञानाने मला दिलेले सर्वांत मोठे वरदान आहे. विज्ञानाचे दालन अतिशय समृद्ध आहे. यात अनेक शास्त्रज्ञांचे जीवन आणि कार्याचा समावेश आहे. तसेच त्यात संशोधकांनी शोधलेले निसर्गनियम आहेत. यात निरनिराळी तंत्रे आणि प्रक्रिया आहेत. प्राणी, पक्षी यांच्या शरीररचना आणि कार्य, निसर्गात घडणाऱ्या वादळ-ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनांचे आकलन, मानवाच्या मेंदूचे आकलन आणि ग्रह, तारे, नक्षत्र, दीर्घिका यांची निर्मिती व कार्य यांचा समावेश आहे. एवढे असूनही विज्ञानात संशोधनाला वाव आहे. विज्ञानाची अद्‌भुतता, अचूकता आणि आश्वासकता ही मोहून टाकणारी आहे. निसर्गाची अनंत रहस्ये अद्याप उलगडायची आहेत. यात विज्ञानापैकी फारच थोड्या भागाचे आकलन झालेले आहे, ही जाणीव मला आहे. असे असूनही हे आकलन शेकडो लेख, तेवढीच व्याख्याने आणि वीस पुस्तकांचे लिखाण करण्यासाठी पुरेसे पडले. या लिखाणामुळे विज्ञानप्रसाराच्या कार्यात योगदान देता आले. या लेखनाचा वाचकांनी आनंद लुटला, तर काहींना त्यातून लेखनाची स्फूर्ती मिळाली. मराठी वाङ्‌मयात त्यामुळे भर पडली. वैयक्तिक पातळीवर अनेक मानसन्मान मिळाले. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, मिळालेले मानसिक समाधान. काही पुस्तकांमुळे मराठी साहित्यात नवे पायंडे पडले; तर काही पुस्तकांचे हिंदी, कन्नड आणि इंग्रजीत भाषांतर झाले. विज्ञानानेच मला हे सर्व काही दिले.

लिखाणामध्ये सुपरक्लोन ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. साप्ताहिक सकाळमधून ती क्रमश: प्रसिद्ध झाली. तिचे हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये भाषांतर झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठीसाठी तिचा क्रमिक पुस्तकाच्या स्वरूपात समावेश झाला. आज तीस वर्षांनंतरही तिला मागणी आहे. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या पुस्तकाने नवा पायंडा पाडला. मराठी भाषा अभिजात आहे, याला आधार देणारे हे लेखन आहे. अभिजात भाषा ही जशी प्राचीन असावी लागते, तशी ती आधुनिक ज्ञान लोकांपर्यंत नेण्यास सक्षम असावी लागते. ओवीच्या स्वरूपात विज्ञान हा जगातील पहिला प्रयोग हे सिद्ध करतो. या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजी भाषांतर मॅकमिलन या जगप्रसिद्ध प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या लिखाणामुळे  अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले. ‘ओवी गाऊ’ प्रथम साधना मासिकामध्ये ‘विज्ञानबोध’ या नावाने प्रसिद्ध झाले.

विज्ञानामुळे माझे व्यावसायिक जीवनही समृद्ध झाले. तीस वर्षांहून अधिक काळ शिकविण्याचा आनंद घेता आला. उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मान झाला. नवे अभ्यासक्रम रुजवता आले. अनेक विद्यार्थी देशात आणि परदेशांत चमकले, त्याचप्रमाणे संशोधनात वेगळा ठसा उमटवता आला. कुष्ठरोगाबरोबरच द्राक्षे गुलाबी का होतात? तांदूळ व गव्हाच्या वाढीवर प्रकाश संश्लेषण आणि गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम यासारख्या विषयात संशोधन केले. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. पुणे विद्यापीठात प्राध्यापक त्याचप्रमाणे विभागप्रमुख अशी पदे भूषवता आली. उच्च शिक्षणात आपल्या कार्याचा ठसा उमटवता आला. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेडच्या कुलगुरुपदावर पाच वर्षे भरीव योगदान दिले. पंचवीसहून अधिक देशांना भेटी देता आल्या. सोळा विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी आणि एकोणीस विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी मार्गदर्शन करता आले. यातील अनेक जण देशात आणि परदेशात उच्चपदावर कार्यरत आहेत. शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

विज्ञानामुळे जीवन बहुआयामी आणि समृद्ध झाले. जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. जीवनातील कर्मकांड कमी झाले. पत्रिकेसारख्या गोष्टींना जीवनात स्थान उरले नाही. जातिभेद नाहीसा झाला. माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची शिकवण मिळाली. पर्यावरणाची ओळख झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन हे परंपरागत घातक रूढी आणि पायंडे नष्ट करू शकतो, हे मनोमन पटले. विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी आणि शाश्वत विकासासाठी कसा करता येईल, याचे आकलन झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे- विज्ञानाला मानवी चेहरा देणे आवश्यक आहे, हे विज्ञानाच्या अभ्यासातून कळाले. ही सर्व मला मिळालेली विज्ञानाची देणगीच आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात