डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मानवी काया अभ्यासिली। हाडांची संख्या मोजिली मोतीबिंदू क्लिष्ट प्रसवकाळी। शल्यक्रिया शोधिली।। कण जखम अन्य घाव। दुर्लक्षिता निर्मिती स्राव। उपायाविना घेती जीव। सांगे सावधान वर्तावे।। संहिता आणि शल्य प्लॅस्टिक। म्हणती यांचे जनक। सुश्रुतांचे शल्य गमक। आजही विशारद अभ्यासिती।। कुष्ठरोगे बाधीत होता। विद्रूप करी नासिका हाता। 

शल्य विशारद करिती उपयोजिता। शल्य पद्धती सुश्रुताची विज्ञानाचा इतिहास, भारतीय संशोधकापासून सुरू करता येतो ही एक समाधानाची बाब आहेच. सुश्रुत हा ख्रिस्तपूर्व 600 वर्षे या कालखंडात होऊन गेला. वैद्यकीय शास्त्रसंबंधी त्याने विकसित केलेल्या चिकित्सा आणि उपचार पद्धती केवळ थक्क करणाऱ्या आहेत. सुश्रुतांनी सुरू केलेली परंपरा टिकली असती तर वैद्यकीय शास्त्रातील प्रगती कमीत कमी एक हजार वर्षांनी पुढे गेली असती. मानवी शरीराचे त्यांचे आकलन त्या काळी उपलब्ध साधनांचा विचार करता खूपच उच्च दर्जाचे होते. त्यांनी लिहिलेल्या सुश्रुत या संहितेत एकूण 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजार, 700 वनस्पती, 64 क्षारांपासून तयार केलेली औषधे आणि 57 प्राणिजन्य औषधांचा समावेश आहे. त्यांनी विकसित केलेल्या शल्यविषयक आणि इतर उपचार पद्धतींची यादी न संपणारी आहे. मात्र त्यातील काहींचाच इथे उल्लेख करणे शक्य आहे. शल्यक्रियेशी संबंधित त्वचेवर खोलवर चीर पाडणे, त्वचेत खोलवर वेध घेणे (प्रोब), शरीरातून वस्तू बाहेर काढणे, आम्ल आणि औष्णिक उपचार, दात काढणे, कापणे, जखमेतील पू, पाणी काढणे, बेंडाचा निचरा करणे, वृष्णग्रंथी काढणे, मूत्रनलिका विस्तारित करणे, हर्निया शस्त्रक्रिया, सीझेरियन, रक्ताच्या गाठी काढणे, गुदद्वारातील गाठी काढणे, आतड्यामधील अडथळे काढणे, ढळलेली हाडे बसविणे, मोडलेली हाडे सांधणे, हाडांचे वर्गीकरण आणि जखमांना हाडांनी दिलेला प्रतिसाद यांचाही अभ्यास त्यांनी केला होता. फाटलेले ओठ अथवा चेहऱ्यावरील नाक, गाल या भागात व्यंग असल्यास त्या व्यक्तीमध्ये नैराश्याची भावना असते. विशेषत: स्त्रियांच्या जीवनावर अशा व्यंगामुळे खूपच परिणाम होतो. कुष्ठरोगामध्ये नाक आणि हाताची बोटे यामध्ये व्यंग निर्माण होते. यावर प्लास्टिक सर्जरी केली जाते. डॉ. ऑंटिया यांनी सुश्रुताने योजलेली पद्धत वापरून 1980 च्या दशकात पुण्यामध्ये कोंढवा येथे कुष्ठरोगाने ग्रस्त व्यक्तींवर शस्त्रक्रिया केल्या. अगदी तुटपुंज्या सुविधा असतानाही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे शक्य झाले. 

शस्त्रक्रियांच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सुश्रुत हे प्रसिद्ध आहेत. मात्र या व्यतिरिक्त त्यांनी मधुमेह, छातीतील वेदना (अंजायना) आणि लठ्ठपणा यांविषयी दिलेल्या योगदानाविषयी फारशी माहिती नाही असे दिसते. सुश्रुताने मधुमेहाचे वर्णन केले आहे, जास्त प्रमाणात लघवी होणे आणि त्यात साखरेचे अधिक प्रमाण असणे हे मधुमेहाचे लक्षण त्यांना माहीत होते. त्यांनी निरीक्षणावरून लठ्ठ माणसांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते असे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांनी मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम केला पाहिजे हे त्यांचे निरीक्षण आजही ग्राह्य मानले जाते. त्याकाळी चिकित्सेची साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी केवळ निरीक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे केवळ थक्क करणारे आहेत. यावरून त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा आणि विश्लेषणक्षमतेचा प्रत्यय येतो. 

शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला अशी मान्यता आहे, परंतु सुश्रुत यांनी हृदय आणि त्याच्याशी संबंधित जीवनासाठी आवश्यक द्रवाचे विवेचन केले आहे, हा द्रव विशिष्ट नलिकांमधून वाहतो याचेही त्यांना ज्ञान होते. त्यांनी सुश्रुत संहितेत ‘हृदयशूल’ या विकाराचे वर्णन केले आहे. यात वेदनेचे स्थान, वैशिष्ट्ये आणि निर्माण होण्याची व शमण्याची कारणे यांची दखल घेतली आहे. त्यांच्या मते हृदयवेदना ही तात्पुरती दमल्यामुळे येणारी, भावनिक, दाहकारक आणि विश्रांतीमुळे शमणारी असते. लठ्ठपणामुळेदेखील अशा प्रकारची वेदना जाणवते हेही त्यांनी नमूद केले आहे. ताणवृद्धीच्या लक्षणांविषयी त्यांनी भाष्य केले आहे. वातरक्त ही संज्ञा त्यांनी त्यासाठी योजिली आहे. सुश्रुतांचे मोठेपण यात आहे की त्यांनी वैद्यकशास्त्रात दिलेले मौलिक योगदान हे हिप्पोक्रेटिसच्या दीडशे वर्षे अगोदर आहे. 

सुश्रुतांचे वास्तव्य हे आजच्या बनारस येथे होते. ते धन्वंतरी यांचे शिष्य होते. धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि देवस्थानी मानले जाते. त्या काळी ज्ञानाचा प्रसार हा बोलण्यातूनच प्रामुख्याने होत असे. त्याचप्रमाणे संवादाची भाषा संस्कृत होती. इ.स.650 च्या कालखंडात सुश्रुत यांचे लिखित साहित्य अरबी भाषेत भाषांतरित झाले. नंतर ते युरोपमध्ये गेले. इटलीमध्ये सुश्रुतांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला गेला. ब्रिटिश शरीर चिकित्सकांनी भारतात येऊन सुश्रुतांनी विकसित केलेल्या शल्यतंत्राचा भारतात कसा उपयोग केला जातो हे पाहण्यासाठी भेटी दिल्याचे उल्लेख आढळतात. जंटलमनस्‌ मॅगेझिन या नियतकालिकात भारतीय ऱ्हीनोप्लास्टीवर आधारित अठराव्या शतकात लेख प्रसिद्ध झाला. ‘प्लॅस्टिक सर्जरी’ हे तंत्र तर सुश्रुतांएवढे कुणालाही आत्मसात झाले नव्हते, हे विज्ञानाच्या इतिहासावर नजर टाकली तर दिसून येते. ‘कॉन्स्टेनटाईन कार्प’ यांनी भारतातील स्थानिक ‘प्लॅस्टिक सर्जरी’च्या पद्धती समजून घेण्यासाठी 20 वर्षे वास्तव्य केले. नाक तुटल्यामुळे आलेले व्यंग घालविण्यासाठी गालाच्या त्वचेचा वापर सुश्रुतांनी केला, परंतु मऊ कातडी वापरल्यास ती टिकून राहत नाही हे लक्षात आल्याने कपाळावरील त्वचेचा वापर करण्यास सुरुवात झाली. या तंत्रात कातडीचा जो भाग वापरला जातो त्याला इंडियन फ्लॅप हीच संज्ञा वापरली जाते. सुश्रुत यांचे मोठेपण यातच सामावलेले आहे. 
 

Tags: विज्ञानबोध शास्त्र शस्त्रक्रिया इंडियन फ्लॅप प्लॅस्टिक सर्जरी आयुर्वेदिक उपचार पद्धती सुश्रुत आरोग्य चिकित्सा डॉ. पंडित विद्यासागर plastic surgery aayurvedic sushrut treatment health science dr. pandit vidyasagar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके